सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट

Submitted by केदार on 17 November, 2008 - 10:18

'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय. विचार करा यातून बाहेर पडायला हवय ना! काही करायचं तर आहेच मग आपला मार्ग आपणच शोधायला लागूयात, काय म्हणता? आपण एकत्र येऊन काही तरी नक्कीच करु शकतो. आपला देश बदलायला आपण हातभार लावणार नाहीतर कोण, युनो? नक्कीच नाही. ह्यावर विचार करायला हवा. देश बदललेला सर्वांना हवाय पण वेळ व पैसा द्यायची किती लोकांची तयारी असते? आपण चार लोकं एकत्र आल्यावर सर्व काही बदलेल, आलबेल होईल अशा भ्रमात राहून चालणार नाही, पण निदान चार गरजू लोकांच्या आयुष्यात आपण नक्कीच बदल घडवू शकतो, त्यांना त्यांचे जीवन घडविण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो. ती चार लोक अजून दहाजणांचे जीवन घडवू शकतील आणि ती दहा अजून वीस .. आणि हा क्रम अव्याहत चालू राहू शकेल.

आपल्यापैकी बरेच सुस्थितीत आहेत, त्यांच्या सामाजिक जाणीवा अजून जिवंत आहेत, काहीतरी करायची तळमळ आहे पण परिस्थिती, व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदार्या,परदेशातील वास्तव्यामुळे येणार्या भौगोलिक मर्यादा अशा अनेक कारणांमुळे इच्छा असूनही आपण कुठलीही मदत करु शकत नाही. भारतात रहाणार्या कित्येकांची प्रत्यक्ष तसेच आर्थिक योगदान देण्याची तर परदेशातील लोकांची आर्थिक मदत करण्याची क्षमता असते आणि इच्छाही. दरवेळी जेव्हा मदत करण्याचे आवाहन केले जाते तेव्हा हे लोक पुढे होऊन मदत देखील करतात, पण पुढे त्या पैशांचे काय होते, कुठल्या संस्थेला ते पैसे जातात त्यांचा विनियोग कशाप्रकारे केला जातो? असे बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. ह्यामुळे बरेच जण तर 'मी दुसर्यांना पैसे देणार नाही कारण पुढे त्याचे काय होते हे मला माहिती नाही, कदाचित लोक मदतीच्या नावाखाली फसवत देखील असतील, सत्पात्री दान होणार नाही म्हणून मी मदत करणार नाही' ह्या मताचे बनतात. अनेकजण सुरुवात तर जोरात करतात पण पुढे कालौघात ह्या गोष्टींचा विसर पडतो कारण आपण स्वत: अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. ह्यावर उपाय शोधायला हवा. आजच्या इंटरनेटच्या काळात आपल्या सर्वांच्या ओळखी ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जास्त होतात, त्यामुळे आम्हीही ह्याच माध्यमातून एका अनोख्या मदत गटाची, फंडाची रचना करु पाहतोय. ह्या संकल्पनेचे स्वरूप पुढे ठेवायचा हा प्रयत्न.

मदतगटाच्या निर्मितीचे उद्देश:
१. ज्या लहान सेवाभावी संस्था अपुर्या निधीसह तळागाळातील लोकांसाठी मदतकार्य करत आहेत परंतु पुरेश्या संसाधनांच्या अभावामुळे आपल्यापर्यन्त पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी नियमित स्वरुपाचा आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
२. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सुस्थितील व्यक्तींना ह्या कार्यात मदत करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि मासिक योजनेद्वारे नियमित मदतकार्याचा ओघ निर्माण करणे.

मदतगट कसा ऒळखला जावा?
गरजूंसाठी वाहून घेतलेल्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करणारी आणि त्या मदतीचा सुयोग्य उपयोग होतो आहे ह्याची नियमित पणे चाचणी करणारी संस्था.

फंडाच्या स्वरुपाविषयी--
१. ह्या मदत गटाची वाटचाल पूर्णपणे एकमेकांच्या विश्वासावर आधारीत आहे. पुरेश्या आणि नियमित आर्थिक पाठबळाची खात्री होई पर्यन्त ह्या फंडाची कुठल्याही सरकारी कार्यालयात नोंदणी केली जाणार नाही. भविष्यात नोंदणी भारतात केली जाईल.
२. सर्व पैसे हे एका वैयक्तिक बचत खात्यात जमा होतील (नोंदणीकृत नाही).
३. आर्थिक मदत ही रोखस्वरुपात स्विकारली जाणार नाही. त्या खात्यात पैसे जमा करण्याकरता ई- ट्रान्सफर वा चेक द्यावा लागेल.
४. हे खाते ऑनलाईन असल्यामूळे दरमहा ECH/ACH पध्दतीने देखील मदत देता येईल.
५. संस्थेच्या मदत निधीशिवाय इतर कुठल्याही प्रकारचा खर्च ह्या खात्यामधून केला जाणार नाही. उदा. संस्थेला भेट द्यायला येणारा खर्च हा संबधित सहकारी स्वतःच करेल.
६. दर महिन्याच्या महिन्याला एका ठराविक दिवशी सर्व सहभागी मदतकर्त्यांसाठी त्या खात्याचे सगळे व्यवहार(जमा आणि खर्च) प्रकाशित केले जातील. तसेच ज्या संस्थांना देणगी देण्यात येईल त्यांच्याकडून सगळ्या देणग्यांच्या पावत्या घेऊन त्या दर महा प्रकाशित करण्यात येतील. मदतगट नोंदणीकृत झाल्यावर प्रत्येक देणगीची पावती दिली जाईल.
७. संस्थेला मदत देण्याआधी त्या संस्थेचे कार्य माहिती करुन घेणे अतिशय आवश्यक ठरेल, त्या शिवाय कुठल्याही संस्थेला मदत देण्यात येणार नाही. त्यासाठी काही निकष पुढीलप्रमाणे --
अ. अशा संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली आहे का?
ब. एखाद्या मोठ्या समाज सेवकाने तिला चांगली संस्था म्हणून घोषित केले आहे काय?
क. त्या संस्थेचे लाभार्थी कॊण आहेत?
कोणत्या संस्थाना कधी, किती आणि कशी मदत करायची ह्यासाठी सभासदांची मते विचारात घेतली जातील, अंतिम निर्णय मदत गट चालवणाया विश्वस्त समितीचा असेल
८. सामाजिक शिक्षण, आरोग्यसुविधा, बालसुधार, अपंग मदत,अनाथ सेवा अशा कोणत्याही विषयात सामाजिक काम करणाया संस्थांचा विचार करण्यात येईल.
९. तळमळीने काम करणाया सामाजिक संस्थेस मदत हा मुख्य उद्देश असून प्रसंगानुरुप एखाद्या गरजू व्यक्तिचा(विद्यार्थी,आर्थिक पाठबळ नसलेले रुग्ण) मदतीसाठी विचार करण्यात येईल.
१०. मुख्यत्वे सभासदांकडून नियमित मासिक देणगी घेण्याचा ह्या योजनेचाउद्देश आहे, तरीही एक रकमी,एकावेळी देणगी स्वरुपातील रक्कमही स्विकारली जाईल. कोणताही सभासद मासिक देणगी देणे कधीही सुरु करू अथवा बंद करु शकेल.

मदतगट काय करणार नाही--
१. पुरेसा पैसा किंवा स्त्रोत असलेल्या सामाजिक संस्थांचा विचार करण्यात येणार नाही (उदा. क्राय,गीव्हइंडिया)
२. कुठल्याही धार्मिकप्रचारासाठी अथवा धार्मिक कार्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला आर्थिक मदत केली जाणार नाही.

पुढे काय?
हे जितक्या सहज लिहीले तितक्या सहज होणार नाही ह्याची जाणीव आहेच. ह्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच ह्यात आम्हाला तुमचा सहभाग हवाय. ज्यांना ज्यांना ह्या मासिक योजनेत सहभागी व्हावेसे वाटते आहे त्यांनी केदार जोशी, प्रशांत उपासनी वा रश्मी ओक यांच्याशी संपर्क साधावा. ह्या गटाची नोंदणी गुगलगृप्स वर केलेली आहे. सहभागी होण्यासाठी http://groups.google.com/groups/search?q=supanth&sitesearch= वर क्लिक करा वा http://groups.google.com वर जाऊन supanth असा सर्च मारा. तिथे जॉइन अशी लिंक असेल.
ज्यांना काही करायची तळमळ आहे अशा समविचारी लोकांसाठी आम्ही हा एक विचार मांडतोय. आम्ही तिघांनी सुरुवात तर केलीये पण तुम्ही सहभागी झालात तर ही योजना अजून पुढे नेता येऊ शकते. गरज आहे ती फक्त काही पैशांची व थोड्या वेळाची. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातील केवळ ह्या कामासाठी म्हणून वेगळे काढलेले १ ते २ तास प्रति महिना बरच काही घडवून आणू शकतील.

तळटीप.
आम्ही हे जे काम करत आहोत त्यात मायबोली बॅनरचा काही संबध नाही. हे आपण सगळे मिळून करणार आहोत, फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात इथून करत आहोत इतकच.

धन्यवाद!

प्रशांत उपासनी (upas)
रश्मी ओक (marhatmoli)
केदार जोशी (kedarjoshi)

मायबोली प्रशासनाची हा गट स्थापण व्हायला खुप मदत झाली. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाला माझ्यावर विश्वास टाकून "हो" असे उत्तर दिले. त्याबद्दल हा गृप त्यांचा सदैव ऋणी राहील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रुप मधे सामिल झाले आहे.

मी ओर्कुटवरील अनिल अवचट कम्युनिटीचा सभासद आहे. काही महिन्यांपुर्वी या कम्युनिटीतील काही सभासदांनी एकत्र येऊन असाच बचत गट स्थापन केला (http://anilawachat.wordpress.com/bachat-gut). सध्या आम्ही पुण्यातील दोन संस्थांना दर महिना मदत करतो. http://anilawachat.wordpress.com/bachat-gut/ इथे या गृपची माहिती बघायला मिळेल.

सुपंथला शुभेछा! जमेल तशी मदत करायची माझी तयारी आहे.

रोहीत मस्तच रे! लिंकबद्दल धन्यवाद.. आपणही अगदी अस्सच करतोय..
चिनूक्स सूचना अगदी बरोब्बर आहेत.. अवचट मदतगटात सुद्धा काही चांगले मुद्दे आहेत उदा. उत्सव समित्या, पेपरांचे रिलीफ फंड्स तसेच पंतप्रधान किंवा मुख्यंमत्री निधी ह्यांना आर्थिक मदत दिली जाऊ नये.
छान वाटलं सगळ्यांच्या प्रतिक्रीया पाहून.. सातत्य राखणं महत्त्वाच आहे ह्याची जाणीव आहेच..

केदार,

भारतात नोंदणी करणे कठिण असणार याची कल्पना होतीच. पण अमेरिकेत त्या तुलनेत सोपे असावे. अर्थात आपण डोनेशन स्विकारणे त्यासाठी थांबवणार नाहीच. पण इथे नोंदणी केली तर २ गोष्टींचा फायदा होईल.

१. टॅक्स ब्रेक
२. कॉर्पोरेट मॅचिंग

काही कंपन्या तर २:१ असे पण मॅच करतात which is a lot of money.
आपण सगळे इथे आहोत तर फंड रेझिंगचे कार्यक्रम पण आपण इथेच करणार त्या दृष्टीने इथे (अमेरिकेत) नोंदणी करणे गरजेचे आहे.

अश्विनी, इथे ngo म्हणून केलेल्या नोंदनीकृत खात्यातून भारतात वैयक्तीक सेव्हींग्स खात्यात पैसे ट्रान्सफर करता येनार नाहीत कारण ऑडीटला प्रॉब्लेम येईल असे प्रथमदर्शनी वाटत आहे. पण तरिही अमेरिकेत नोंदनी करन्यासाठी काय करावे लागेल ह्याचा शोध घेतोच आहे व हा येनारा प्रॉब्लेम कसा सोडविता येईल त्याचाही विचार करतो.

नात्या लिंक साठी धन्यवाद. मी ऑर्कूटवर जात नसल्यामूळे ह्याची कल्पना न्हवती. तीथे लोक चालवित आहेतच, त्यांना काही ह्यात अडचनी आल्या का हे पण मी विचारुन घेईन. इनफॅक्ट रुपाली ही दोन्ही गृपची कॉमन मेंबर आहे.

उपास, त्या संस्थेबाबत अवचटांच्या गृपवर पण लिहीले आहे. त्या संस्थेचे नाव निराधार बाल संगोपण केंद्र. ( faithinfuture.org ) ह्या संस्थे बद्दल मला माझ्या भावाने सांगीतले होते, जे मी तूला व रश्मीला बोललो. त्यांचे काही मुद्दे, पेपर निधी, पंतप्रधाण निधी वैगरे आवडले, ते आपण पण नियमात ठेवूयात.

जागू तुम्हाला गृप मध्ये सामिल केल आहे.

गटाची पुढील माहीती. ( अपडेट)

१.चिनूक्स आणि सरिविना हे दोघे भारतात अकाउंट सेट अप च्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. ते झाल्यावर इथे डिटेल्स टाकले जातीलच. चिनुक्स ने लिहील्याप्रमाने साधारण आठवडा लागेल हे सर्व व्हायला.
२. बघता बघता सदस्य संख्या १८ झाली आहे. तूम्ही सर्वांनी विश्वास दर्शविल्या बद्दल सर्वांचे धन्यवाद.

कोणालाही काही प्रश्न असतील तर ते इथे वा सभासद असलेल्यांनी, गृपच्या इमेल आयडी वर (supanth@googlegroups.com) वा मला माझ्या भ्रमनध्वनीवर ९१६ ५०५ ६५२५ (अमेरिका) वर फोन केला तरी चालेल.
(फक्त सभासद असलेल्यांनाच त्या गृप आयडी वर मेल करता येईल कारण सभासद नसाल तर वर मृ ने दिलेला मेसेज येईल.)

मायबोली प्रशासनाची हा गट स्थापण व्हायला खुप मदत झाली. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाला माझ्यावर विश्वास टाकून "हो" असे उत्तर दिले. त्याबद्दल हा गृप त्यांचा सदैव ऋणी राहील.

केदार, रश्मी आणी उपास, अतिशय स्तुत्य उपक्रम.
त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन!
यात मला पण सर्व प्रकारची मदत करायला आवडेल..

मी सुपंथ मधे सामील झाले आहे. बरेच दिवस अशा प्रकारचा ग्रुप शोधत होते. मायबोली वर आहे म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवता येईल.
प्राजक्ता

मीही सहभागी आहे.
खूप चांगला विचार आणि उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा.

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद मंडळि. इतका भरभरुन प्रतिसाद बघुन हुरुप वाढला. मायबोलि प्रशासकांना पण शतशः धन्यवाद. प्राजक्ता ने म्हंटल्याप्रमाणे ह्याच श्रेय मायबोलिलाच आहे. पण प्राजक्ता एक सुचना, वर लिहल्याप्रमाणे हा मदतगट मायबोलिशि सलंग्न नाहिये, तुम्हा सगळ्यांपर्यन्त हि कल्पना पोहचवण्यासाठि मायबोलिचि मदत झालि. पण ह्या गटाच्या कार्यास मायबोलि प्रशासन कुठल्याहि प्रकारे जबाबदार नाहि.

रश्मी, मला असं म्हणायचं होतं की सहभागी होणारे लोक मायबोली वर मे बघते तेव्हापासून आहेत आणि वेळोवेळी त्यांचे विचार मी वाचले आहेत. त्यांच्यावर विश्वास आहे.
प्राजक्ता

धन्यवाद प्राजक्ता,

कुणाच्या मनात कसलाहि गैरसमज राहु नये एवढाच त्या स्पष्टिकरणाचा उद्देश. तुमचा विश्वास खुप मोलाचा आहे आमच्यासाठि, एवढ्या विश्वासाने ह्या कार्यात सहभागि झाल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.

वा.. छान प्रतीसाद मिळत आहेत. केदार, उपास, ममो.. तुमचे जाहीर आभार. पुण्याला मी डिसेंबर अखेर जाणार आहे, काही काम असेल तर सांगा तिथे.
केदार/ऊ/ममो माझी वहिनी भरतात सीए आहे, काही माहिती हवी असेल तर तिला निदान विचारुन पाहु शकतो आपण. इथे पण आमचा जो सिपिए आहे तो पण हवे असल्यास काही टॅक्स संबंधी अडले तर सांगु शकेल (जरूर पडली तर).

मायबोलीचे धन्यवाद आहेतच.. सगळ्यांनी जो विश्वास दाखवलाय तो स्तुत्य आहे. पैशाचा प्रश्न आहे त्यामुळे पारदर्शकता महत्त्वाची असेलच पण कित्येक मायबोलीकरांना अशा मदतीची संधी मिळाली तर त्यांना मदतीचा हात द्यायला नक्की आवडेल हे वाटत होतच. आपल्याला महिन्याला ठराविक रक्कम नियमित पणे बाजूला ठेवून समाजपयोगी कार्याला द्यायचेय.. आपण आईवडिलांची काळजी घ्यायला किंवा तरूण वयातल्या मुलामुलीला पॉकेटमनी देतो तसं काहीसं. किती रक्कम द्यायची हे व्यक्तीवर आहे.. प्रत्येकास महिना काही रुपये बाजूस टाकता येतील असा प्राथमिक अंदाज आहे...
आमचं अभिनंदन वगैरे नको, अत्ता कुठे काम सुरु होतय.. जेव्हा त्याचा जम बसेल, गरजूंना मदत मिळेल.. आपल्याकडून नियमित मदत मिळू शकते असा विश्वास त्यांना निर्माण होईल, तेव्हा आपण सगळेच अभिनंदनास पात्र असू..
तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल किवा सूचना असतील तर केदारने वर म्हटल्याप्रमाणे त्याला फोन करता आला तर उत्तम अथवा गुगलग्रुपवर इमेल केले तरी चालेल. चिनूक्स तसेच इतरांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन सुधारीत मसुदा लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

आपल्या सहकार्‍यांनी मला विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देन्याचा प्रयत्न.

१. मी किती रक्कम देऊ?
- तूम्ही किती रक्कम देनार हे तूम्ही स्वतःच ठरवा. फक्त ती दरमहा दिली
तर, ज्या संस्थांना आपण पैसे देनार आहोत त्यांना आपण दरमहा काही रक्कम
कमीट करु शकतो.

२. सभासद होण्यासाठी मिनीमम किती रक्कम द्यावी लागेल?
किमान रक्कम असे काही ठरवले नाही. ती आधी लिहील्याप्रमाने तूम्हीच ठरवा व
कळवा. २ / ४०० रु महिना, $५०,१०० महिना अशी कितीही असु शकेल. एखाद्या
सभासदाची जास्त रक्कम आहे म्हणून त्याचे सर्व ऐकले जाईल असे होणार नाही.
सहकारी किती पैसे देतात ह्यापेक्षा ते पैसे देतात ह्याला महत्व आहे.

३. तूझ्या अकांऊट मध्ये पाठवू का?
आधी मी माझेच ऐक वेगळे अकाउंट ह्या कामासाठी ठरविले होते. पण मी सध्या
भारतात राहत नाही व ते येथून मॅनेज करायला ( म्हणजे दरवेळी संस्थेला चेक
देने वैगरे) अवघड पडेल, हा विचार करुन तिथेच नविन अकाऊंट उघडायचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे आधी लिहील्या प्रमाने चिन्मय व सरिता ह्यावर काम
करत आहेत. अकाऊंट पुण्यात असेल त्या बद्दलची माहीती ती दोघे देतीलच.

४. काही टार्गेट डेट सेट केलीये का? की minimum corpus amount जमली की
पहिली मदत देणार?

ह्या साठी तुम्हा सर्वांची मदत लागेल. प्रत्येक मेंबरने ते किती रक्कम
गटाला देनार हे गटाला सांगीतले की साधारण महिन्याचे बजेट तयार होईल. त्या
प्रमाने किती संस्थाना मदत करता येईल ते ही ठरविता येईल. आधी
लिहील्याप्रमाने ती रक्कम कितीही असु शकेल. फक्त ती आधी कळली तर मासीक
विनीयोग कसा करता येईल ह्याचा आराखडा आपल्याल बनविता येईल. (बजेटींग
म्हणा हव तर). अकाऊंट सेट अप होउन, पैसे जमून पहिला चेक जायला साधारण
अजुन महिना लागेल असे आत्ता वाटतेय. पण हे लवकरही होऊ शकत.

५. कोणाला देणार काही ठरवलंय का?
सध्या काही संस्थाचा विचार करने सुरु आहे. ह्या बद्दल लवकरत कळविन्यात
येईल.

६. मदत दिल्यावर संस्थांचे नाव कळवनार का?
नाही. आपण आधीच ती नाव जाहीर करनार आहोत.

७. अमेरिकेतून रक्कम कशी पाठविता येईल?
दोन मार्गांनी पैसे पाठविता येतील.
१. तुमचे अकाऊंट जर भारतात असेल तर तेथील अकाऊंटला तुम्ही पैसे पाठवुन
नंतर त्या खात्यातून आपल्या गृपच्या खात्यात.
२. डायरेक्ट डिपॉझीट. - बर्‍याचशा मनी ट्रान्सफर साईट साइट्स (जसे मनी
कंट्रोल, टाईम्स ऑफ मनी वैगरे) फुकटात भारतात पैसे पाठवतात. त्या साइट वर
तुम्ही तुमचे बाहेर देशातील खाते रजिस्टर करायचे, तसेच आपल्या गृपचे खाते
रजिस्टर करायचे, मग ई ट्रान्सफर द्वारे ते पैसे त्या खात्यात सरळ जमा
होतील.
शेवटचा मार्ग
३. मला चेक पाठवून. माझ्या पत्यावर तूम्ही चेक पाठविला तर मी तो माझ्या
येथील खात्यात भरुन, ती रक्कम भारतातील गृपच्या खात्यात देखील पाठवीन्यास
तयार आहे.

८. एकावेळी किती संस्थांना मदत देणार?
पुरेसे पैसे असतील तर आपण नक्कीच दोन किंवा जास्त संस्थाना मदत करु शकतो. हे सर्व आपल्या महिन्याचा जमेच्या अंदाजावर अवलंबून असेल.

९. मी संस्था सुचवू शकते का? की तूम्ही आधीच ठरविली आहे?
नक्कीच तुंम्ही देखील संस्था सुचवा. फक्त ती सद्या तरी फार दुरची (वा
दुसर्‍या राज्यातली) नसावी कारण भारतात त्यांना भेट देनारे सहकारी देखील
आपला वेळ सांभाळून हे कार्य करनार आहेत. पुढे मागे आपण ह्यावर एक पोल पण
घेऊयात.

चांगला उपक्रम आहे, शुभेच्छा. मी खारीचा वाटा उचलण्याचा जरुर प्रयत्न करेल.

I think idea is good. But I sincerely think all the ideas in this web site are coming from socialistic views. But India has changed and so is world. We need to change our views now. Instead of giving money to people for education, and facilities I think we need to spend money in generating various small business. In india I have seen people are ready to do anything to be successful. I have seen business mentality in the person from Zopadpatti to billionares. So the smart thing to do is create groups which will launch new businesses and there by generate money instead of giving money. India is no longer in Bhiksha mode. It has moved to Rajas path long ago. So to change india, we need to help people generate money rather than giving money. Just my two cents.
One good idea was starting chains of bathrooms all over mumbai. It came from maayboli.

मी_ना, तुम्ही ईग्लीशमधुन का लिहिताय?

मी_ना, मला वाटते तुम्ही फार एकांगी विचार करत आहात. इथे सरसकट सगळ्या गरजू व्यक्ती अथवा संस्थांना देणगी देण्याची कल्पना नसुन परिस्थितीनुरुप मदत करण्याचा विचार आहे. काही बाबतीत आर्थिक मदतचीच गरज पडते. उदा. २५ अनाथ मुलांचे संगोपन करणारी एकाकी स्त्री, अतिशय लहानपणी आई वडलांचे छत्र हरवणारे मुल. अशी अनेक उदाहरणे सापडतील. तसेच आर्थिक मदतीशिवाय प्रत्यक्ष काम करण्याचीही बरेच जणांनी तयारी दाखवली आहे.

अर्थात तुम्ही सुचवलेला पर्याय हा अनेक पर्यायांपैकी एक होउन शकतो, एकमेव नाही.

Well said नात्या!!!!!

>>India is no longer in Bhiksha mode.
फारच व्हेग वाक्य! सुनामी, वादळ, भुकंप ह्यासारख्या नैसर्गिक दु:र्घटनांत भारताने आर्थिक मदत स्विकारली नाही . ह्या संदर्भात जर तुमचं हे वाक्य असेल तर ते 'सुपंथ' कुठल्या संदर्भात लागु होतं? कुठल्याही नाही.

दुसर्‍यासाठी झटताना, स्वार्थ सोडून ज्यांच्यासाठी झटतोय त्यांच्या कल्याणाकरता मागीतलेली भिक्षा सुध्दा महत्त्वाची!!!!!!!!!! उदा: सिंधुताई सपकाळ.

नात्याने उत्तर दिलेच आहे. पुढे काही लिहायची गरजच उरली नाही पण तरिही ..

socialistic views >> मी_ना तूम्ही माझे इतर लिखान पाहिले तर आढळेल की मी सोशॅलिस्ट नाही तर कॅपीटॅलिस्टीक मनोवृत्तीचा आहे. जी तूमच्या पोस्ट मधून दिसतेय अगदी त्याच विचारांचा मी आहे. (उदा जातीय आरक्षनाला विरोध करुन त्याचबरोबर आर्थीक आरक्षणाला पाठिंबा देतो, )

मग का हा उपद्व्याप? तर प्यूअर कॅपीटॅलिस्ट दृष्टीकोण ठेवनारे लोक चांगली कॉम्पीटीशन पैदा करतात, ती पैदा करन्यासाठी हा प्रपंच. उत्तम उदा म्हणजे बिल गेटस वा वॉरन बफेट.
तुम्हाला वाटतय की असे गट त्यांना भिक देत आहेत, मला वाटतय की असे गट त्यांना काहीतरी बनन्यासाठी भांडवल (क्रेडीट) देत आहेत, ज्याची परतफेड पुढच्या काळात होइल.

अश्या गटांनी वा व्यक्तीनी मदत दिल्यावर फरक पडेल काय? तर नक्कीच. अश्या अनेक ष्टोर्‍या नेट वर व इथे वाचल्या ज्यात कोणाच्या तरी मदती मूळे एखादा माणूस पुढे आला. रघुनाथ माशेलकर, मनोहर जोशी ही त्यातली फार मोठी उदाहरने आहेत. त्यांचा पुर्वजिवना बद्दल नेट वर नक्कीच माहीती उपलब्ध असेल.

प्रश्न उरतो 'सुपंथ' गटातून असा एखादा माशेलकर तयार होइल का? कदाचित होनार ही नाही. आम्ही फक्त तो शेअर घेतोय, भाव वाढेल का नाही हे आत्ताच कसे सांगता येईल. काळच ते ठरवेल.

नात्या, केदार, मृ ने उत्तरे दिलीच आहेत.. समाजाचे उपकार आपल्यावर ह्या ना त्या मार्गे होत असतातच.. आपण थोडीफार मदत करून संधी न मिळालेल्या 'गरजूंना' किमान गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करायचेय.. आपल्यापैकी बरेचजण भांडवलवादी आहेत आणि आपण त्याची फळेही चाखतोय.. पण तो सुपंथ चा उद्देश नाही.. सुपंथ venture capitalist ही नाही.. मी_ना, तुम्ही चूक किंवा बरोबर हे ठरवण्याचा आमचा उद्देश नाही पण तुम्हाला तुमचा मार्ग बरोबर वाटत असेल तर तुम्हीही एखादी संस्था निर्माण करू शकता.. लोकांना लघुद्योगाची , कामाची गरज आहेच.. तुम्हाला मनापासून शुभेच्छा..

वर सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहेच. मुख्य म्हणजे खुप मोठ्या गप्पा, काहीतरी भव्य-दिव्य उद्देश असा सुपंथचा हेतू नाही. सुपंथच्या माध्यमातून, ज्यांना समाजासाठी, आपल्या देशासाठी काही योगदान मनापासुन द्यावंसं वाटतंय, अशा समविचारी मित्र-मैत्रिणींनी आपापला खारीचा वाटा उचलावा आणि त्यायोगे अनेक संस्था ज्या आरोग्य, शिक्षण, बालसंगोपन, समाजसुधारणा अशा महत्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहेत त्यांच्या कामाला आर्थिक हातभार लावावा असा अगदी साधा-सरळ उद्देशा आहे. हा सफल झाला की मग पुढचा विचार करुया. केदार, उपस, चिन्मय ह्यांनी लिहिलेल्या पोस्ट्स मधुन हे अधोरेखित केलंच आहे.. मी फक्त पुनरुच्चार केला एवढंच..

सर्व संबंधितांचे अभिनंदन!

अश्विनी व केदार, तुम्हाला माहीत असेलच, पण देणगीदारांना करात सवलत मिळण्यासाठी NGO असून चालत नाही तर Not for Profit असे रजिस्टर असावे लागते. हा तपशीलातला फरक सांगितला एवढेच. अमेरिकेत अशी सूट मिळण्यासाठी त्या संस्थेचे 501(c)(3) असे status असणे आवश्यक आहे. याची नोंदणी कशी करावी याची पूर्ण माहिती महाजालावर सहज उपलब्ध आहे. याविषयी काही माहिती हवी असल्यास CRY America ला विचारून सांगू शकेन.

(पूर्वानुभवावरून) दुसरे असे सांगावेसे वाटले की कुठल्याही संस्थेला आर्थिक मदत देताना ती रोख देण्यापेक्षा इतर प्रकारे दिली तर ती मदत देणगीदारांना अधिक विश्वासार्ह वाटते. (Donations to the END USER in cash are NOT preferred over kind.) तेव्हा मग ते शाळा/हॉस्पिटल बांधून देण्यासारखे मोठे काम असो, किंवा अगदी शाळेची पुस्तके किंवा नवीन कपड्यांसारखी लहान मदत... चेक किंवा कॅश देण्यापेक्षा अशी मदत जास्त credible वाटते. अर्थात त्यासाठी मनुष्यबळ भारतात असणे अतिशय महत्त्वाचे आहे.

चाफा हो ते स्टेटस माहीती आहे. त्याचा वेगळा फॉर्म भरन्या आधी पहिल्या EIN च्या स्टेप मध्येच ते स्टेटस घ्यावे लागते. बर्‍यापैकी किचकट आहे तो फॉर्म असे भरनार्‍यांचे म्हणने आहे. शिवाय ते स्टेटस मिळविन्यासाठी वकिलांची मदत घ्यावी लागेल. अपुर्‍या निधीत हे होईल की नाही हे अजुन माहीत नाही. दोन्ही देशात तुलना केली असता भारतात देखील ४ टाईपचे फॉर्म भरुन (FIRC) सहीत व भरपुर वेळ देउन ते स्टेटस मिळवता येईल. त्या दृष्टीने प्रयत्न नक्कीच सुरु करता येतील.

मागे झुलेलाल यांनी दरवर्षी शाळा सुरु व्हायचा आधी एक गृप कोकनात शाळेच्या मुलांना गणवेश, पुस्तके, वह्या वैगरे देतो त्या बद्दल सांगीतले होते, तिथे इन काईंड मदत देखील करता येईल. पण सर्वच काम इन काईंड करन्याकरीता पुरेसे मनुष्यबळ आपल्याकडे नाही. कारण बहुतांश लोक ऐकतर बाहेरच्या देशात आहेत वा व्यस्त आहेत, त्यामूळे ज्या संस्थाना आर्थीक मदत लागनार आहे त्यांना आत्ता मदत करन्याचे ठरविले आहे. पुढे नक्कीच तू म्हणतोस तसेही बदल करन्याची मनिषा आहे.

ह्यावरुन मला एक सुचवावस वाटतय, अजुन साधारण एका वर्षानि मी स्वत: तीन एक महिन्यांसाठि भारतात जाउन अश्या प्रकारच काम दरवर्षि करु शकेन. ज्यांना शक्य आहे अश्यांनि वर्षाकाठि महिना पंधरा दिवस ह्या कामासाठि दिल्यास चाफा म्हणतोय तस कामहि आपण सुरु करु शकु. अर्थात हा फक्त एक विचार आहे, ह्या प्रकारचि कमिटमेंट सदस्याना नियमितपणे शक्य होणार नाहि ह्याचि जाणिव आहे पण आधिपासुन व्यवस्थित योजना तर असेल तर प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट करुन बघता येइल.

माझा प्रत्येक शनिवार ह्या कामासाठी.. जिथे वस्तुरुपात मदतीची आवश्यकता आहे तिथे त्यासंदर्भातली कामं मी करु शकेन.

मी ग्रुप जॉईन केला आहे..

मी देखील (देशाबाहेर असल्यामुळे) आर्थिक मदत करायला तयार आहे.

केदार, रश्मी आणी उपास - स्तुत्य उपक्रम.
तुमचे अभिनंदन! Happy

मी join करु शकेल असे आत्ता तरी वाटत नाही. [आधिच अनेक संस्थांशी असल्याने] पण चांगल्या संस्थांची नावे सुचवु शकते.

पर्यावरण, आदिवासी - health and education, प्राणि-पक्षी या संबंधी काम करणार्‍या संस्थांच्या बाबतीत काय भुमीका असेल ?? त्या प्रमाणे filter लावता येइल.

Pages