सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट

Submitted by केदार on 17 November, 2008 - 10:18

'भारतात हे नेहमी असेच असते'! 'भ्रष्टाचार खूपच झालाय!' 'काहीनाही रे, ह्यांना पैसे हवे वर प्रसिध्दीही!'. 'राजकारणी काSSSही करत नाहीत, ही सिस्टीमच बदलायला पाहीजे!' 'गोळ्या घाला साल्यांना!' 'शिका, शिका म्हणावं काही तरी प्रगत देशांकडून ...'अशी वाक्य आपण अनेक ठिकाणी ऐकली आहेत. बरेचदा ते बोलणारेही आपणच असतो, जोशात चार वाक्य फेकली की किती बरं वाटतं. भारत बदललेला सर्वांनाच हवाय, पण कृती करायची म्हटली की होतेच असे नाही. 'करणारे करोत रे, समाजात चार पाच अभय बंग, अवचट,पोद्दार, आमटे, सकपाळ निर्माण होतील आणि जातील आपल्याला काय त्याचे?', अशी आपल्या समाजाची मनोभूमिका झालेय. विचार करा यातून बाहेर पडायला हवय ना! काही करायचं तर आहेच मग आपला मार्ग आपणच शोधायला लागूयात, काय म्हणता? आपण एकत्र येऊन काही तरी नक्कीच करु शकतो. आपला देश बदलायला आपण हातभार लावणार नाहीतर कोण, युनो? नक्कीच नाही. ह्यावर विचार करायला हवा. देश बदललेला सर्वांना हवाय पण वेळ व पैसा द्यायची किती लोकांची तयारी असते? आपण चार लोकं एकत्र आल्यावर सर्व काही बदलेल, आलबेल होईल अशा भ्रमात राहून चालणार नाही, पण निदान चार गरजू लोकांच्या आयुष्यात आपण नक्कीच बदल घडवू शकतो, त्यांना त्यांचे जीवन घडविण्यासाठी आपण खारीचा वाटा नक्कीच देऊ शकतो. ती चार लोक अजून दहाजणांचे जीवन घडवू शकतील आणि ती दहा अजून वीस .. आणि हा क्रम अव्याहत चालू राहू शकेल.

आपल्यापैकी बरेच सुस्थितीत आहेत, त्यांच्या सामाजिक जाणीवा अजून जिवंत आहेत, काहीतरी करायची तळमळ आहे पण परिस्थिती, व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदार्या,परदेशातील वास्तव्यामुळे येणार्या भौगोलिक मर्यादा अशा अनेक कारणांमुळे इच्छा असूनही आपण कुठलीही मदत करु शकत नाही. भारतात रहाणार्या कित्येकांची प्रत्यक्ष तसेच आर्थिक योगदान देण्याची तर परदेशातील लोकांची आर्थिक मदत करण्याची क्षमता असते आणि इच्छाही. दरवेळी जेव्हा मदत करण्याचे आवाहन केले जाते तेव्हा हे लोक पुढे होऊन मदत देखील करतात, पण पुढे त्या पैशांचे काय होते, कुठल्या संस्थेला ते पैसे जातात त्यांचा विनियोग कशाप्रकारे केला जातो? असे बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. ह्यामुळे बरेच जण तर 'मी दुसर्यांना पैसे देणार नाही कारण पुढे त्याचे काय होते हे मला माहिती नाही, कदाचित लोक मदतीच्या नावाखाली फसवत देखील असतील, सत्पात्री दान होणार नाही म्हणून मी मदत करणार नाही' ह्या मताचे बनतात. अनेकजण सुरुवात तर जोरात करतात पण पुढे कालौघात ह्या गोष्टींचा विसर पडतो कारण आपण स्वत: अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असतो. ह्यावर उपाय शोधायला हवा. आजच्या इंटरनेटच्या काळात आपल्या सर्वांच्या ओळखी ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जास्त होतात, त्यामुळे आम्हीही ह्याच माध्यमातून एका अनोख्या मदत गटाची, फंडाची रचना करु पाहतोय. ह्या संकल्पनेचे स्वरूप पुढे ठेवायचा हा प्रयत्न.

मदतगटाच्या निर्मितीचे उद्देश:
१. ज्या लहान सेवाभावी संस्था अपुर्या निधीसह तळागाळातील लोकांसाठी मदतकार्य करत आहेत परंतु पुरेश्या संसाधनांच्या अभावामुळे आपल्यापर्यन्त पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी नियमित स्वरुपाचा आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.
२. सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सुस्थितील व्यक्तींना ह्या कार्यात मदत करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि मासिक योजनेद्वारे नियमित मदतकार्याचा ओघ निर्माण करणे.

मदतगट कसा ऒळखला जावा?
गरजूंसाठी वाहून घेतलेल्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करणारी आणि त्या मदतीचा सुयोग्य उपयोग होतो आहे ह्याची नियमित पणे चाचणी करणारी संस्था.

फंडाच्या स्वरुपाविषयी--
१. ह्या मदत गटाची वाटचाल पूर्णपणे एकमेकांच्या विश्वासावर आधारीत आहे. पुरेश्या आणि नियमित आर्थिक पाठबळाची खात्री होई पर्यन्त ह्या फंडाची कुठल्याही सरकारी कार्यालयात नोंदणी केली जाणार नाही. भविष्यात नोंदणी भारतात केली जाईल.
२. सर्व पैसे हे एका वैयक्तिक बचत खात्यात जमा होतील (नोंदणीकृत नाही).
३. आर्थिक मदत ही रोखस्वरुपात स्विकारली जाणार नाही. त्या खात्यात पैसे जमा करण्याकरता ई- ट्रान्सफर वा चेक द्यावा लागेल.
४. हे खाते ऑनलाईन असल्यामूळे दरमहा ECH/ACH पध्दतीने देखील मदत देता येईल.
५. संस्थेच्या मदत निधीशिवाय इतर कुठल्याही प्रकारचा खर्च ह्या खात्यामधून केला जाणार नाही. उदा. संस्थेला भेट द्यायला येणारा खर्च हा संबधित सहकारी स्वतःच करेल.
६. दर महिन्याच्या महिन्याला एका ठराविक दिवशी सर्व सहभागी मदतकर्त्यांसाठी त्या खात्याचे सगळे व्यवहार(जमा आणि खर्च) प्रकाशित केले जातील. तसेच ज्या संस्थांना देणगी देण्यात येईल त्यांच्याकडून सगळ्या देणग्यांच्या पावत्या घेऊन त्या दर महा प्रकाशित करण्यात येतील. मदतगट नोंदणीकृत झाल्यावर प्रत्येक देणगीची पावती दिली जाईल.
७. संस्थेला मदत देण्याआधी त्या संस्थेचे कार्य माहिती करुन घेणे अतिशय आवश्यक ठरेल, त्या शिवाय कुठल्याही संस्थेला मदत देण्यात येणार नाही. त्यासाठी काही निकष पुढीलप्रमाणे --
अ. अशा संस्थेची कायदेशीर नोंदणी झाली आहे का?
ब. एखाद्या मोठ्या समाज सेवकाने तिला चांगली संस्था म्हणून घोषित केले आहे काय?
क. त्या संस्थेचे लाभार्थी कॊण आहेत?
कोणत्या संस्थाना कधी, किती आणि कशी मदत करायची ह्यासाठी सभासदांची मते विचारात घेतली जातील, अंतिम निर्णय मदत गट चालवणाया विश्वस्त समितीचा असेल
८. सामाजिक शिक्षण, आरोग्यसुविधा, बालसुधार, अपंग मदत,अनाथ सेवा अशा कोणत्याही विषयात सामाजिक काम करणाया संस्थांचा विचार करण्यात येईल.
९. तळमळीने काम करणाया सामाजिक संस्थेस मदत हा मुख्य उद्देश असून प्रसंगानुरुप एखाद्या गरजू व्यक्तिचा(विद्यार्थी,आर्थिक पाठबळ नसलेले रुग्ण) मदतीसाठी विचार करण्यात येईल.
१०. मुख्यत्वे सभासदांकडून नियमित मासिक देणगी घेण्याचा ह्या योजनेचाउद्देश आहे, तरीही एक रकमी,एकावेळी देणगी स्वरुपातील रक्कमही स्विकारली जाईल. कोणताही सभासद मासिक देणगी देणे कधीही सुरु करू अथवा बंद करु शकेल.

मदतगट काय करणार नाही--
१. पुरेसा पैसा किंवा स्त्रोत असलेल्या सामाजिक संस्थांचा विचार करण्यात येणार नाही (उदा. क्राय,गीव्हइंडिया)
२. कुठल्याही धार्मिकप्रचारासाठी अथवा धार्मिक कार्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला आर्थिक मदत केली जाणार नाही.

पुढे काय?
हे जितक्या सहज लिहीले तितक्या सहज होणार नाही ह्याची जाणीव आहेच. ह्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणूनच ह्यात आम्हाला तुमचा सहभाग हवाय. ज्यांना ज्यांना ह्या मासिक योजनेत सहभागी व्हावेसे वाटते आहे त्यांनी केदार जोशी, प्रशांत उपासनी वा रश्मी ओक यांच्याशी संपर्क साधावा. ह्या गटाची नोंदणी गुगलगृप्स वर केलेली आहे. सहभागी होण्यासाठी http://groups.google.com/groups/search?q=supanth&sitesearch= वर क्लिक करा वा http://groups.google.com वर जाऊन supanth असा सर्च मारा. तिथे जॉइन अशी लिंक असेल.
ज्यांना काही करायची तळमळ आहे अशा समविचारी लोकांसाठी आम्ही हा एक विचार मांडतोय. आम्ही तिघांनी सुरुवात तर केलीये पण तुम्ही सहभागी झालात तर ही योजना अजून पुढे नेता येऊ शकते. गरज आहे ती फक्त काही पैशांची व थोड्या वेळाची. आपल्या धकाधकीच्या आयुष्यातील केवळ ह्या कामासाठी म्हणून वेगळे काढलेले १ ते २ तास प्रति महिना बरच काही घडवून आणू शकतील.

तळटीप.
आम्ही हे जे काम करत आहोत त्यात मायबोली बॅनरचा काही संबध नाही. हे आपण सगळे मिळून करणार आहोत, फक्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवात इथून करत आहोत इतकच.

धन्यवाद!

प्रशांत उपासनी (upas)
रश्मी ओक (marhatmoli)
केदार जोशी (kedarjoshi)

मायबोली प्रशासनाची हा गट स्थापण व्हायला खुप मदत झाली. त्यांनी मी विचारलेल्या प्रश्नाला माझ्यावर विश्वास टाकून "हो" असे उत्तर दिले. त्याबद्दल हा गृप त्यांचा सदैव ऋणी राहील.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, फारच सुरेख उपक्रम. माझे नाव add करा प्लीज.

फार सखोल विचार केला आहे. यात आणखी add करता येईल ते म्हणजे, ज्यांना मदत करू ते त्या रकमेचा कसा विनियोग करणार आणि नंतर त्या प्रकारे केला का ते त्यांनी आपल्याला कळविणे.

माझ्या पण मनात असे काहीसे चालू करावे असे होते. सगळे विश्वासावर चालते हे जरी खरे असले तरी व्यवहाराच्या बाबतीत चोख असावे अशा दृष्टीने मी असा विचार केला होता की जे लोक चेक पाठवतील ते कुठेतरी पब्लीक प्लेसवर, उदा. मायबोली किंवा याहू ग्रूप इ. वर प्रसिद्ध करावे e.g., पाठवणार्‍याचे नाव, रक्कम, आणी कुठला प्रॉजेक्ट त्यांना सपोर्ट करायचा आहे ते. सगळे उघड असल्याने आपली रक्कम योग्य ठिकाणी पोहोचली का ते लोकांना लगेच कळू शकेल.
तुम्हाला जर हे योग्य वाटले तर आपण या गोष्टीचा अंतर्भाव करू शकतो.

अतीशय चांगला उपक्रम! माझा सहभाग नक्की!

अश्विनीला अनुमोदन!

धन्यवाद अश्विनी, मॄ .
तुम्ही दिलेल्या सुचनांचे स्वागत. आणि त्याचा विचार केला आहे. वर लिहील्याप्रमाने दर महिन्याला किती पैसे जमले, किती देनगी रुपाने दिले हे सर्व त्या गृपच्या पानावर प्रकाशित केले जाईल. होता होईतो त्या मदत निधी दिलेल्या पावत्या स्कॅन करुन ते पण प्रकाशित केले जाइल. म्हणजे आपण जे पैसे देतो त्याचा विनीयोग कसा होतो आहे हे प्रत्येकाला कळेल. ( मुद्दा वा नियम क्रं ६ प्रमाने)

सहभागी होण्यासाठी मला kedarj@gmail.com वर मेल करा वा गृप आयडी supanth चा शोध गुगलगॄप वर घेउन तिथे ही सहभागी होण्यासाठी http://groups.google.com/groups/search?q=supanth&sitesearch= इथे क्लिक केलेत की सहभागी होण्यासाठी जॉईन वर क्लीक करता येईल.

ऐवढेच नव्हे तर आपल्यापैकी काही जणांना अनेक गरजु संस्था आधीच माहीती असतील त्या देखील तूम्ही सुचवू शकता. (त्या साठी ह्या मदत गृप मध्ये सामील व्हायलाच पाहिजे असे काही नाही.)

मेल पाठवलीय.

स्तुत्य उपक्रम. मी घरी जाऊन गृपमधे येते Happy

केदार, तुला गुगल्गृप्सला पाठवलेली मेल परत आलीय. हे असं उत्तर आलंय...

We're writing to let you know that the group that you tried to contact
(supanth) either doesn't exist, or you don't have permission to post to it.
There are a few possible reasons why this happened:

* You might have spelled or formatted the group name incorrectly.
* The owner of the group removed this group, so there's nobody there to
contact.
* You may need to join the group before being allowed to post.
* This group may not be open to posting.

If you have questions about this or any other group, please visit the Google
Groups Help Center at http://groups.google.com/support.

Thanks, and we hope you'll continue to enjoy Google Groups.

The Google Groups Team

मृ मेल पाठविता येनार नाही असे माझ्या नंतर लक्षात आले. Happy

http://groups.google.com/groups/search?q=supanth&sitesearch=

इथे जॉईन होता येईल. वा http://groups.google.com वर जाउन supanth असा सर्च मारला तरी जॉईन होता येईल.

बरं तसं करते. थँक्यु!

गूगल ग्रूप्सला जाऊन (वरच्या लिंकनुसार) जॉईन होता येतय.

.

केदार,
मलाही तसंच उत्तर आलं.. पण मी तुलाही ईमेल पाठवला होता.. तो मिळाला का?

हो चिन्मय. तूला ऍड केलय. आणि वर तो ऍड्रेस काढून टाकून तिथे लिंक दिलीय.

केदार, उत्तम.. मी पण टाकले आहे स्वतःला गृपमधे.
माझ्या तेलगु मैत्रिणीचा हा गृप आहे असेच संदर्भासाठी वाचायला हवे असेल तर,
www.tomakeadifference.net

सुनिधी लिंक साठी पण धन्यवाद Happy अगदी अश्याच टाईपची माहीती आपण देखील पुरवनार आहोत. त्यासाठी लवकरच ऐक ब्लॉग देखील करन्यात येईल. तिथे व गृपवर ही माहीती साठविली जाणार आहे. आधीपासुनच हा गृप जास्तीत जास्त पारदर्शी ( ट्रान्सपरंट) करन्यासाठी आपण प्रयत्नशिल राहू.

ह्या मदतगटात सहभागि झाल्याबद्दल सगळ्यांना मनःपुर्वक धन्यवाद. सध्याच्या आर्थिक मंदिच्या काळात एकुणच समाजसेवि संस्थांकडे जाणारा मदतिचा ओघ बर्‍याच अंशि आटण्याचि शक्यता आहे. आपण सगळे एकत्र आलोत तर निदान चार दोन लोकांच्या आयुष्यात काहि सकारात्मक बदल घडवुन आणु शकु.

धन्यवाद सुनिधी लिंकबद्दल..
एखाद्या ग्रासरुट संस्थेसारखं तळापासून काम करायचय.. आपल्या खारीच्या वाट्याने एखाद्या आयुष्याला दिशा मिळू शकते, एखाद्याचे प्राण वाचू शकतात, एखादा संसार कोसळण्यापासून वाचू शकतो.. ह्या मदतगटात सगळं पारदर्शक असेल.. एक एक पाऊल पुढे जाऊया.. लवकरच ब्लॉग काढू आपण, पहिलं पाऊल घेणं महत्त्वाच होतं... ते घेतलय आता, जेवढे जमतिल तेवढे जण पुढे जात राहू..

सही !
चेक कुठल्या कुठल्या करन्सीमध्ये स्विकारणार ?

  ***
  comfortably numb

  चेक भारतीय चलनात दिला तर लवकर खात्यात जमा होइल. पण कुठल्याही चलनात स्विकारायची तयारी आहे.
  पण तूझा प्रश्न खरच चांगला आहे. इथे एक मुद्दा नमुद करावा वाटतोय की बर्‍याच भारतीय सेवाभावी संस्थांनी फॉरेन ऐक्स्झेंज क्लिअरन्स घेतलेला नाही, त्यामूळे इच्छा असुनही इतर देशातून त्यांना सरळ पैसे प्राप्त होत नाहीत त्यामूळे आपण भारतातच अकाऊंट ठेवायचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरुन भारतातील चेक त्यांना दिला जाईल. आपण वैयक्तीक सेव्हिंग खाते काढत असल्यामूळे कुठलेही चेक्स वा इ क्लिअरंस व्हायला अडचन येनार नाही. अमेरिकेतून वा इतर देशांतून ह्या खात्यात रक्कम सहज जमा करता येईल.

  तुम्ही पुढाकार घेवुन हे काम सुरु केल्याबद्दल अभिनंदन!! मी गुगलच्या सुपंथ गृप मध्ये सामील झालेय. यासाठी (इथे यु एस मध्ये) काही काम करायचे असेल तर वेळ द्यायलापण मी तयार आहे.

  केदार,

  आपण NGO म्हणून नोंद केली तर जे लोक डोनेशन देतील त्यांना टॅक्स ब्रेक मिळू शकेल. It will work as incentive. शक्य आहे का तसे करणे?

  lumpsum amount द्यायची असेल तर चेक कुठल्या पत्त्यावर पाठवायचा?

  अश्विनी चांगली सुचना, ह्यावर मी बराच विचार केला होता आधी तो लिहीतो.

  ८० जी खाली आपण सद्या भारतीय सहकार्‍यांना टॅक्स् ब्रेक देउ शकनार नाहीत कारण नोंदनी नाही. (अमेरिकेत नोंदनी करता येइल का त्याची विचारना चालू करतो.)

  पण NGO म्हणून नोंद करन्यासाठी भारतात खुप मोठे पेपर वर्क करावे लागेल. त्यात अनेक गोष्टी आल्या, जसे संस्था नोंदनीकृत करने, काही क्लिअरंस मिळवने वैगरे. ते जर आपण आता करायाला गेलो तर खुप वेळ लागेल व भारतात एक दोन कार्यकर्त्यांना ह्या पाठीमागे धावावे लागेल, त्यामूळे सध्या हे करायचा विचार केला नाही. आपण रजिस्ट्रेशन साठी थांबलो तर त्यात एखादे वर्ष जाण्याची भिती. (मी हा पैसे उभे करन्याचा विचार गेले १ १/२ वर्ष करत आहे, व पोस्ट आत्ता केले) म्हणून सुरुवात ही साधीच, त्यात आपली कमीटमेंट पण दिसुन येईल आणी हा गट मोठा करन्याचे प्रयत्न सुरु राहतील असा विचार करुन न रजिस्टर करता सुरुवात करायची ठरवीले.
  पण मी भारतात गेल्यावर सर्व दृष्टीने चौकशी करेन व आपण आवश्यक ती पावले नक्कीच उचलू. नोंदनी करायचीच आहे पण ती व्हायला थोडा वेळ लागेल.
  माझे भारतात काही व्यक्तींशी बोलने सुरु आहे ह्याबाबतीत, त्याची प्रगती पण मी गृपला देतच राहील.

  जर रक्कम एकरकमी व तुलनेने खुप मोठी असेल व त्यांना टॅक्स ब्रेक हवाच असेल तर ती देणार्‍या कडुन आपण चेक घेऊन तो सरळ (डायरेक्ट) त्या संस्थेलाच देउन त्याची पावती घेता येईल, म्हणजे त्यांना ब्रेक मिळू शकेन. (पण परत ती रक्कम जर विदेशी चलनात असेल तर घेणारी संस्थेकडे फॉरेन ऐक्झेजं क्लिअरंस पाहीजेच.)

  अश्विनी_के, लवकरच पत्ता व अकाऊंट नंबर व इतर गोष्टी कळवीन्यात येतील. भारतातील सहकारी ह्यावर काम करत आहे.

  अश्विनी,
  आपलं खातं भारतात, बहुतेक पुण्यात असेल. अजून साधारण आठवडाभरात आपल्याला सगळं नक्की ठरवता येईल.

  या अनुषंगाने -

  १. कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा संघटनेशी संबंधित अशा संस्थेला आर्थिक मदत दिली जाऊ नये.

  २. आपण देणार असलेल्या आर्थिक मदतीमुळे शक्यतो थेट फायदा व्हावा. स्मारके, जाहिराती, लघुपट, उत्सव यांसारख्या उपक्रमांमध्ये आपला आर्थिक सहभाग नसावा.

  ३. वर्षभरात आपण जी आर्थिक मदत देऊ, त्यात अपंग, वृद्ध, लहान मुलं यांसाठी आरोग्य व शिक्षण या गोष्टींवर भर दिला जावा.

  ४. आर्थिक मदत केवळ संस्थेलाच केली जावी, असं नसावं. गरजू विद्यार्थी किंवा रुग्णांनाही आपण मदत करू शकतो.

  बरोबर चिन्मय. थेट फायद्याच्या विचारासाठीच ह्या गृपचा विचार केला. तू लिहीलेस ते मुद्दे देखील आपण नियमावलीत समाविष्ट करुयात. तूझा मुद्दा ४, रश्मी ने सुचवला होता तो आपण आधीच सामील केला आहे. धार्मीकचा विचार केला होता, पण राजकीय राहून गेल ते सामील करुयात.

  केदार, मेल केली आहे.. कृपया मला ऍड कर. ऑफिसमधुन गूगल ग्रुपचं साईट उघडता येत नाही..

  खूप चांगला उपक्रम.... सुपंथ गृपला join झालो...

  चांगलि गोष्ट म्हणजे आपण सगळे एकाच दिशेने विचार करतो आहोत. राजकिय पक्षांशि सलंग्न संस्था तसेच स्मारके, जाहिराती, लघुपट, उत्सव यांसारख्या उपक्रमांमध्ये आपला आर्थिक सहभाग नसावा दोन्हि सुचना उत्तम आहेत, मला वाटत सगळ्यांना मान्य व्हाव्यात. बाकि अपंग, वृद्ध, लहान मुलं यांसाठी आरोग्य व शिक्षण या क्षेत्रात काम करणार्या संस्थांवरच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत.

  केदार, ~३० मुलांचा सांभाळ करणार्‍या त्या बाइंच्या संस्थेच नाव काय आहे? त्या जर पुण्यातच असतिल तर यंदा सुटिमध्ये आपल्या ग्रुप च्या सदस्यांपैकि कोणि पुण्यात जाउ शकत असतिल तर त्यांना तिथे भेट देता येइल.

  केदार मला पण सामिल व्हायचे आहे.

  केदार तुम्हाला मी मेल केला आहे. चेक करा.

  Pages