जगातल्या लोकांच्या पसंतीचा आहार

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 21 July, 2013 - 12:03

जग फिरल्याने विशाल दृष्टी येते असे म्हणतात. आंतरजालाच्या जगात प्रत्यक्ष त्या देशी न जाताही त्या देशातील लोकांविषयी बरेच काही जाणून घेता येते. ह्या इतरांविषयी जाणण्याच्या कुतूहलातून आणि खाद्यविषयक जिव्हाळ्याच्या भावनेतून मी एका अन्नविषयक आंतरजालीय कोर्स साठी नाव नोंदविले.

वेगवेगळ्या देशांमधील अन्न-प्रणाली, अन्नधान्याचे नियोजन, लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घेणे, त्यांचा त्या देशाच्या भौगोलिक - सामाजिक - राजकीय - आर्थिक व पर्यावरणाच्या स्थितीशी ताळमेळ लावणे आणि त्यांतून त्या परिस्थितीतील लोक आपला आहार अधिक संतुलित कशा प्रकारे करू शकतात, निसर्गाशी समतोल कसा साधू शकतात आणि आपले अन्नविषयक जीवनमान कशा पद्धतीने सुधारू शकतात यांचा एकत्रित अभ्यास करायचा हे प्रकरण मला सुरुवातीस वाटले त्यापेक्षाही बरेच व्यापक होते. ऑनलाईन कोर्सेसच्या जगात त्यातल्या त्यात एक बरे असते की तुमची शर्यत स्वतःशीच असते. त्यामुळे इतर कोण कसा अभ्यास करतंय, कोणी किती नोट्स काढल्या आणि किती अवांतर वाचन केले याच्याशी तुम्हाला तसे देणेघेणे अजिबात नसते. लेक्चरचा एक व्हिडियो कितीही वेळा पाहा... समजले नाही तर पुन्हा पुन्हा पाहा... आणि तरी काही समजले नाही तर कोर्स फोरमवर विचारा... ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही कोर्ससंबंधित कोणताही प्रश्न बिनधास्त विचारू शकता...

...आणि येथेच रंगल्या आमच्या खाण्यापिण्याविषयीच्या गप्पा...!!

जगातले लोक कोणत्या निकषांच्या आधारे आपला आहार निवडतात असा प्रश्न आम्हाला कोर्स इन्स्ट्रक्टरने विचारला आणि त्याच जोडीला आपल्या परिचयाच्या, माहितीतल्या किंवा नात्यातल्या दोघा-तिघांना त्यांची आहारविषयक निवड कशावर अवलंबून आहे हेही विचारायला सांगितले. त्या अनुषंगाने मी येथे हा धागाही काढला होता, ज्यावर अनेकांनी आपल्या आहाराच्या निवड व निकषांबद्दल मोकळेपणाने माहिती दिली.

मात्र जगाच्या पाठीवरच्या लोकांना त्यांच्या आहाराबद्दल विचारायला गेल्यावर आमची जी कल्पना होती त्यापेक्षा कित्येकदा अतिशय वेगळे आणि कुतूहलपूर्ण असे निकष अनेक देशांमध्ये विखुरलेल्या लोकांनी सांगितले. त्या निकषांमागे फक्त त्या देशाचा किंवा भागाचा इतिहास नव्हता, तर त्या व्यक्तीचाही इतिहास होता. त्यांच्या पिढीचा इतिहास होता.

नॉर्वेची मध्यमवयीन रेनेट सांगत होती की तिच्या आईच्या पिढीच्या काळात त्यांच्या स्थानिक बाजारात ठराविक प्रकारचे व पद्धतींचेच अन्नधान्य व पदार्थ विकत मिळायचे. त्यांमध्ये तोच तो पणा असायचा. शिवाय खर्च होणार्‍या पैशांतून जास्तीत जास्त प्रमाणात अन्न कसे मिळेल हे खास करून बघितले जायचे. आता जागतिकीकरणाच्या काळात नॉर्वेतल्या बाजारपेठांमध्ये जगाच्या वेगवेगळ्या भागांतले, मोठमोठ्या फूड ब्रँड्सचे पदार्थ लीलया मिळू लागले आहेत. पण त्याचा परिणाम असा झालाय की रेनेटची आई आणि तिच्या वयाचे इतर लोक बाजारातून वेगवेगळ्या प्रकारचे, कमी पैशांत जास्तीत जास्त मिळू शकणारे, मोठ्या फूड ब्रँड्सचे - चेन स्टोअर्सचे आणि तुलनेने निकृष्ट असे पदार्थ - अन्नधान्य विकत घेतात. त्यांना अन्नाच्या गुणवत्तेशी मतलब नसतो तर त्या किमतीत मिळणार्‍या अन्नाचे प्रमाण (क्वांटिटी) व विविधतेबद्दल ते आग्रही असतात. आणि गेली काही वर्षे सातत्याने अशा प्रकारचे निकृष्ट अन्न खाऊन कंटाळलेली तरुण पिढी मात्र काही प्रमाणात आपल्या अन्नविषयक सवयी सुधारण्याबद्दल अधिक जागरूक होत आहे.

२३ वर्षाच्या फेलवनची आजी तिच्या आहाराबद्दल विचारताच पटकन उत्तर देते - ''मला पोटभर होईल असं कोणतंही जेवण आवडतं. मग त्याची चव कशी आहे, ते सकस आहे की निकस, इत्यादी गोष्टींचा मला फारसा फरक पडत नाही. भरपेट जेवता आलं म्हणजे झालं!'' चीनमध्ये राहणार्‍या फेलवनच्या आजीचा तारुण्याचा काळ खूप खडतर गेला. १९५० च्या दरम्यान चीनमध्ये तिच्यासारखे अनेकजण दोन वेळच्या जेवणालाही चैन समजायचे! फेलवन सांगतो की त्या काळात खायचे इतके वांधे होते की कित्येक लोकांनी अन्नासाठी त्यांची नवजात अर्भके विकली. त्यामुळे फेलवनच्या आजीला अन्नाची चव-ढव, त्यातली पोषणमूल्ये, सकसपणा, विविधता वगैरेंशी काही एक कर्तव्य नसते. आता तिची परिस्थिती पालटली आहे. घरात सुबत्ता आहे. पण आजीची मानसिकता बदललेली नाही. पोटभर खायला मिळाले की ती सुखात असते. बस्स, हाच तिचा आहाराचा निकष! आणि त्याचवेळी फेलवनची कॉलेजवयीन बहीण अगदी टिपीकल त्या वयातील जीवनशैली जगते - रोज मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर भटकणे, बाहेरच खाणे-पिणे इत्यादी. तिच्या लेखी ती जे काही खाईल ते ट्रेंडी पाहिजे, रुचकर पाहिजे आणि मुख्य म्हणजे तिला तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर खाण्यात मजा येते. ती एका वेळी धड जेवत नाही. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने ती तिच्या आवडीचे पदार्थ चरत असते.

अमेरिकेतल्या डोनाचा नवरा आणि त्याचे वडील व्यवसायाने रँच-चालक आहे. त्यांना त्यांच्या जेवणात फक्त आणि फक्त प्राण्यांचे मांस (रेड मीट), ब्रेड आणि बटाटे एवढे आणि एवढेच आवडतात. बाकीच्या अन्नाला ते तुच्छ समजतात. भाज्यांची चव तर त्यांना मुळीच आवडत नाही. आपण जे खात आहोत ते तितके आरोग्यकारक नाही हे त्यांना व्यवस्थित माहीत आहे. परंतु त्यांची त्यानुसार आपल्या आहारात बदल करण्याची अजिबात तयारी नाही. त्यांच्या मते भाजीपाला-फळे वगैरे गोष्टी या बायकांना जास्त करून आवडतात. पण खर्‍या मर्दांना फक्त रेड मीट व बटाटे एवढेच अन्न आवडते!! डोनाची सासू निमूटपणे आपल्या नवर्‍याला त्याच्या आवडीचे अन्न बनवून खायला घालते. तिला स्वतःला भाज्या व फळे खायला खूप आवडतात. पण नवर्‍याच्या आवडीपुढे तिचे जास्त काही चालत नाही. मग ती स्वतःपुरत्या थोड्याशा भाज्या कधीमधी बनवून खात असते. याउलट डोनाची अठरा वर्षांची मुलगी पूर्णपणे शाकाहारी आहे. ती मांस व मासे अजिबात खात नाही. तिच्या जेवणात ती अंडी, प्रोटीन बार्स, नट्स, अव्होकॅडो इत्यादींचा समावेश आवर्जून करते. ती आपल्या खाण्याच्या बाबतीत त्यातली पोषणमूल्ये, उष्मांक, आरोग्यकारकता यांचा विचार जास्त करते. अर्थात चवही तिच्यासाठी महत्त्वाची आहे!

जर्मनीच्या कार्सेनची बहीण जिम इन्स्ट्रक्टर आहे. तिच्या खाण्यात ती भरपूर प्रोटीन व इतर मॅक्रोन्युट्रिअंट्सना महत्त्व देते. त्या अन्नाची चव चांगली हवीच, शिवाय ते खाऊन पोट भरलं पाहिजे असा तिचा आग्रह. त्याउलट कार्सेनची आई! कार्सेनच्या भाषेत सांगायचं झालं तर तिची आई 'फूडी' आहे. तिला अन्नाच्या बाबतीत फक्त आणि फक्त चव हाच सर्वात महत्त्वाचा निकष वाटतो. त्यानंतर ती त्या पदार्थाची पोषणमूल्ये, उष्मांक वगैरे गोष्टींचा विचार करते. पण त्याचबरोबर तिला जर खूपच भूक लागली असेल तर ती त्यावेळी समोर जे आणि जसे अन्न असेल तसे खाते, हेही सांगायला विसरत नाही!

अटलांटात राहणार्‍या व व्यवसायाने नर्स असलेल्या 'ली' ची मावशी ८७ वर्षांची आहे तर दुसर्‍या देशात राहणारा तिच्या भाचीचा मुलगा ९ वर्षांचा आहे. आपल्या आहाराच्या बाबतीत ते दोघे कोणकोणते निकष लावतात हा प्रश्न त्यांना विचारल्यावर दोघांनी खूपच वेगवेगळी उत्तरे दिली.

ली ची मावशी अगदी पारंपरिक घरातली... आयुष्यभर कुकिंग आणि कुकिंग... तोच तिचा व्यवसाय आणि तोच तिचा छंदही! लोकांना अतिशय प्रेमाने, आग्रहाने भरपूर तर्‍हेतर्‍हेचे पदार्थ बनवून भरपेट खिलवायचे ही तिची आवड! आपलं प्रेम आपण स्वहस्ते बनविलेल्या पदार्थांतून व्यक्त होतं आणि आपल्या प्रिय व्यक्तींना असे पदार्थ खाऊ घालून आपण आपलं त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त करत असतो अशा विचारांच्या पठडीतली ही मावशी. तिला जेव्हा विचारलं, की तू जेवायचे पदार्थ कसे निवडतेस, त्यावर तिने दिलेलं उत्तर ली साठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. ती म्हणाली, ''माझ्या तिन्ही पाळीव कुत्र्यांना जे जे पदार्थ आवडतात ते ते पदार्थ मी माझ्यासाठीपण बनविते. त्यांना जे आवडतं तेच मीही खाते!!'' ली च्या या मावशीने आयुष्यभर, अगदी अलीकडे तिचे पती निवर्तण्या अगोदर पर्यंत आपल्या पतीच्या आवडीचा स्वैपाक केला, त्यांना खाऊ घातले व स्वतःही तेच खाल्ले. त्यांना ती तर्‍हेतर्‍हेचे कॅसरोल्स, केक्स, पाय, डोनट्स, स्ट्यूज, स्पघेटी, पास्ता, मॅ़क अँड चीज, डंपलिंग्ज वगैरे स्वहस्ते बनवून खाऊ घालायची. तसेच त्यांना फळे व भाज्या आवडायच्या म्हणून तिने बनविलेल्या पदार्थांमध्ये वैविध्यपूर्ण भाज्या व फळांचा समावेश असायचा. ते गेल्यावर तिचे तिन्ही कुत्रे हेच तिचे सखेसोबती आहेत. तिचे तिन्ही कुत्रे नेहमीचे डॉग फूड खात नाहीत म्हणे! ते स्पघेटी-सॉस, पास्ता, बर्गर, मॅक अँड चीझ, भात, पोर्क, बीफ रोस्ट, मॅश्ड पोटॅटोज यांसारखे पदार्थ खातात. मग ली च्या मावशीबाईही तेच पदार्थ स्वतःसाठीही बनवितात! आणि कधी त्यांना भाज्या-फळे खावीशी वाटली की तेवढ्यापुरती ती आणून खातात. आपल्याकडे पैसा आहे आणि म्हणून आपण चांगले पदार्थ खाऊ शकतो याची मावशीबाईंना उत्तम जाण आहे. पण आपण जे अन्न खात आहोत ते आपल्या तब्येतीसाठी चांगले आहे अथवा नाही, याच्याशी त्यांना तितकेसे देणेघेणे नाही.

या उलट 'ली' चा ९ वर्षांचा भाचे-नातू - तो खाण्याच्या पदार्थांची निवड त्यांचे रूप, वास आणि चव यांवरून करतो! त्याला बुरशी आल्यासारखं दिसणारं, मऊ - चिकट दिसणारं अन्न आवडत नाही. विचित्र वासाचे पदार्थही त्याला आवडत नाहीत. त्यामुळे तो खूप ठराविक पदार्थच खातो! तो प्लेन पास्ता, कच्चं गाजर, लेट्यूस, सीरियल्स, पिझ्झा, दूध, टर्की, चिकन व भाजलेले मांस हेच पदार्थ खातो. कधी कधी फळांचा रस पितो. त्याच्या मते जगातले लोक अन्न कसं दिसतंय, ते खराब झालं नाहीये ना, किंवा शिळं नाहीये ना, त्याची चव कशी आहे यावरून तो पदार्थ खायचा किंवा नाही हे ठरवत असणार! शिवाय म्हातार्‍या लोकांना मऊ मऊ पदार्थ खायला बरे पडत असणार - कारण त्यांना अन्न चावण्यासाठी दात नसतात ना! आणि हो, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही चांगलेचुंगले पदार्थ खाऊ शकता (चिकन, भाजलेले मांस इ.)... नाहीतर त्याच्या मते तुम्हाला परसबागेतले गाजर आणि लेट्यूस खाऊन दिवस काढावे लागतात!!

जेरोडिमोचे आईवडील दोघेही ग्रीसमध्ये आपले निवृत्त आयुष्य सुखाने जगत आहेत. साठीच्या घरातली आई तब्येतीने धडधाकट आहे, तर अडुसष्ट वयाच्या वडिलांना मधुमेह असल्यामुळे आताशा ते स्वतःला जपून असतात. वडील स्वतः रोज बाजारहाट करतात व बाजारातून ताजी फळे, भाज्या, मांस इत्यादी घेऊन घरी येऊन बायकोच्या हातात सोपवतात. त्यांचा भर मेदकारक अन्न टाळण्यावर असतो. चांगल्या प्रतीचे स्थानिक पदार्थ किंवा अन्नधान्य वाजवी किमतीत विकत घेण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्याउलट जेरोडिमोच्या आईला आपल्या आहाराबद्दल फारशी आवड-निवड अशी काही नाही. नवर्‍याला जे आवडते तेच ती मुख्यतः: बनविते व स्वतःही तेच खाते. तिच्या मते तिचा नवरा आपल्या खाण्यापिण्याविषयी अधिक दक्ष झाल्यापासून तिचाही आहार सुधारला आहे. नाहीतर ती स्वतःच्या आहाराबद्दल अगोदर कधीच दक्ष नव्हती. पण तरी या दोघांना ग्रीसमधील बेकार, स्थलांतरित तरुणाईबद्दल काळजी वाटते. कारण हे लोक सुपरमार्केट्स, मॉल्समध्ये जाऊन स्वस्त, निकृष्ट दर्जाचे व जेनेटिकली मॉडिफाईड, माहीत नसलेल्या ब्रॅड्सचे अन्नपदार्थ विकत घेऊन खाताना दिसतात.

मेरीच्या भावाला टर्मिनल कॅन्सर आहे. कॅन्सरचे निदान झाल्यापासून भावाच्या खाण्यापिण्याच्या सवयी, दृष्टिकोन कमालीचे बदलले आहेत! त्याच्या मते आहार हा ''औषध'' आहे. त्याने ठराविक पद्धतीचा आहार घेतल्यावर त्याचा कॅन्सर आटोक्यात राहतो असे लक्षात आल्यावर व तसा वैद्यकीय सल्ला मिळाल्यावर तो त्यानुसारच आहार घेतो. त्याला आवडो न आवडो, तो सकस व आरोग्यपूर्ण असणारे पदार्थच आपल्या आहारात निवडतो! कोणी ''अमका पदार्थ तब्येतीला किती जरी चांगला असला तरी मला आवडत नाही,'' असे म्हटले की हा त्या व्यक्तीला सरळ विचारतो, ''तू काय सात वर्षांचा आहेस का अशी तक्रार करायला?'' त्याच्या मते जगभरच्या सुशिक्षित, सुखवस्तू लोकांना आपल्या अन्नात जाणीवपूर्वक निवड करण्याची संधी असते. आणि त्यांनी त्या संधीचा फायदा घेऊन आरोग्यकारक आहार निवडला पाहिजे. जगात कित्येकांना इच्छा असली तरी संधी नसते आणि संधी असली तरी जाणीव नसते. आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा व आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन आपण सुयोग्य व संतुलित आहार करायची फार गरज आहे हे तो ठासून सांगतो.

आणि याउलट मेरीची धाकटी बहीण मनाला जे येईल ते, जे आवडेल ते, जे रुचेल ते खाते. तिच्या स्वयंपाकघरात प्री-मिक्स पदार्थांच्या पुड्यांची कायम गर्दी असते. अमेरिकेत ज्याला ''ट्रेलर ट्रॅश'' पदार्थ समजतात, ते ती अतिशय आवडीने बनविते, खाते व खिलवते. ती सुखवस्तू घरातील आहे तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत आरोग्यकारक दृष्टिकोन बाळगत नाही याचे मेरीला वैषम्य वाटते. बहिणीच्या मते आपण जे खातो ते आपल्या आवडीचं असलं पाहिजे, चवीला छान असलं पाहिजे, आणि जमलं तर तब्येतीला फारच हानिकारक नसलं पाहिजे - पण तसा आग्रह नाही बरं का!

दोह्याला राहणार्‍या एम ने तिच्या घराजवळच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करणार्‍या दोन भारतीय तरुणांना ते त्यांच्या अन्नाची निवड कशी करतात हे विचारले. दोघांनी सांगितले की जे स्वस्त आहे, सहज उपलब्ध आहे आणि त्यातल्या त्यात चवीने बरे आहे असे अन्न व पदार्थ ते खाण्यासाठी निवडतात. जवळच्याच एका ठिकाणी स्वस्तात मिळणार्‍या चपात्या, सोबत डाळ, भाजी, रस्सा, मांस, चटण्या यांपैकी जे मिळेल व परवडेल ते, असा त्यांचा आहार असतो. अन्नात जास्त वैविध्य नसते. भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी, मांस यांच्या निवडीवर किमतीमुळे व उपलब्धतेमुळे बर्‍याच मर्यादा येतात. पण दोह्यात राहून या तरुणांना जास्तीत जास्त पैसे वाचवायचे आहेत. मग जेव्हा ते भरपूर पैसे कमावून घरी जातील तेव्हा रोज भरपेट आणि तर्‍हेतर्‍हेचे जेवण जेवतील अशी मनोराज्ये दोघेही रचू पाहतात. भारतात असतानाही त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांच्याकडे जेवणाच्या पदार्थांवर मर्यादा असायचीच! पण तरी खाण्यापिण्यात खूप विविधता होती, कमी पैशांतही खूप पदार्थ मिळायचे व खाता यायचे असे हे दोघे सांगतात. कधी कमी पैसे असले तरी इतर नातेवाईकांच्या आधारे, एकत्र जेवण बनवून मार्ग निघायचा. सणासुदीला सगळेजण स्वतःकडचे थोडे-थोडे पैसे घालून घाऊक दरांमध्ये धान्याची, भाजीपाल्याची व अन्नपदार्थांची खरेदी करायचे - गोडधोडाचा एकत्रितपणे स्वैपाक करायचे. त्यामुळे जवळ जास्त पैसे नसले तरी निभावून जायचे. दोह्यात त्यांना तसे जगता येत नाही याची या तरुणांना खंत वाटते.

सुझनने अन्नविषयक निकषाचा प्रश्न तीनजणांचे कुटुंब पोसणार्‍या एका बाईला, एका बॅचलर माणसाला व आणखी एका सिंगल - एकट्या राहणार्‍या बाईला विचारला. तिघांनी प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे दिली. कुटुंब असणार्‍या बाईने ती आहारातील पदार्थांची निवड त्यांचा ताजेपणा व किंमत पाहून करते असे सांगितले. एकट्या राहणार्‍या स्त्रीचा भर होता तो तिच्या आरोग्यास काय चांगले आहे ते निवडण्यावर, पदार्थाच्या गुणवत्तेवर व सर्वात शेवटी किमतीवर! ह्यात बदल घडून यायचा तो तिचे उत्पन्न कमी झाले की! मग ती अन्नाची खरेदी कमी प्रमाणात करायची आणि कपाटात जे काही अन्नपदार्थ असतील त्यांवर दिवस काढायची. एकटा राहणारा बॅचलर माणूस त्याच्या सवयीचे आणि बनवायला सोपे असे पदार्थ, अन्न-प्रकार निवडतो. त्याच्या या पद्धतीत बदल तो एखाद्या नव्या, अपरिचित ठिकाणी गेल्यावर होतो. तिथे तो इतर लोक काय मागवत आहेत व काय खात आहेत हे लक्षपूर्वक पाहतो आणि त्यानुसार काय खायचे ते ठरवितो. या लोकांच्या मते एखाद्या कुटुंबात सामान्यतः त्या घरातील बाई कुटुंबियांच्या आहाराचे निर्णय घेत असते. तसेच कुटुंबातील सदस्य जर जास्त असतील तर सेलवरील अन्नधान्य, पदार्थ घाऊक प्रमाणात घेऊन पैसे वाचविण्याकडे कल असतो. हेच जर कुटुंबसदस्य वृद्ध असतील तर कमी अन्नधान्य पुरते. आणि अन्नाची नासाडी टाळायची असेल तर मग जास्त पैसे मोजून छोट्या प्रमाणात खरेदी करायला लागते. त्याच वेळी जे लोक एकटे राहतात, त्यात स्त्रियांच्या मते पुरुष स्वतःसाठी अन्नपदार्थांची खरेदी करताना किमतीपेक्षा सवयीला जास्त महत्त्व देतात, गरीब लोक सेलवरचे पदार्थ विकत घेतात व कमी खातात आणि म्हातारे लोक हे तरुणांपेक्षा जास्त काटकसरीने राहतात. एकट्या राहणार्‍या पुरुषांच्या मते स्त्रियांनी अन्नपदार्थांची निवड करायचे कारण म्हणजे घरात स्वैपाकाशी व किचनशी संबंधित सर्वाधिक कामे महिलाच करतात, गरीब लोक इतरांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे आरोग्य राखतात - कारण ते कमी खातात आणि त्यामुळे स्थूलता टाळतात. जेव्हा त्यांच्याजवळ पैसा नसतो तेव्हा आजूबाजूच्या नैसर्गिक स्रोतांमधून ते अन्न मिळवू शकतात.

सेलियाचा नवरा जे उपलब्ध असेल, स्वस्त असेल आणि बायको जे बनवून वाढेल ते खाणे पसंत करतो. तिचा मित्र वॉरन हा त्या दिवशीच्या मूडच्या - तमका पदार्थ खाण्याच्या इच्छेच्या आहारी जाऊन आपले अन्न निवडतो, पण तो स्वतःत सुधारणा घडवून आणायचा प्रयत्न करत आहे. कॅरोलायन लो-कार्ब्ज, व्हीट-फ्री, हाय-प्रोटीन अन्नपदार्थ निवडते आणि ते ते पदार्थ तयार करून फ्रीज करून गरजेप्रमाणे त्यांना गरम करून घेते. रिबेका जे अन्नपदार्थ स्पेशल ऑफरवर असतात आणि त्यातल्या त्यात आरोग्यकारक असतात ते विकत घेते.

जर्मनीतल्या मेलनीचे बाबा सर्वप्रथम त्या पदार्थाची गुणवत्ता बघतात आणि त्यानुसार तो पदार्थ घ्यायचा किंवा नाही ते ठरवितात. त्या खालोखाल त्यांना तो पदार्थ बनवायला कितपत सोपा आहे ही बाब महत्त्वाची वाटते. रोजच्या आहारात ते बनवायला सोपे पदार्थ आणि आरोग्याला चांगले पदार्थ अशी निवड आलटून पालटून करत असतात. मेलनीच्या मैत्रिणी कोणताही पदार्थ आरोग्याला कितपत चांगला आहे आणि त्याचे उत्पादन कसे, कोठे झाले याबद्दल जागरूक असतात. तसेच पदार्थाची चव आणि तो बनवायला लागणारा वेळ ह्या गोष्टीही त्यांच्या निर्णयांवर प्रभाव टाकतात.

अबखाझियातील असीदाची मैत्रीण लारिसा हिचा आहारविषयक निर्णय तिची दोन छोटी मुले घेतात. त्यांना जे जे खायला आवडते आणि बनवायला जे जे सोपे असते ते ती बनविते. ती स्वतःच्या आहाराच्या बाबतीत वेगळा निर्णय घेत नाही. त्याउलट असीदाची आजी तिला जे जे खायची इच्छा होते ते ते खाते, त्यासाठी आवश्यक शॉपिंग करते. त्यावेळी ती किमतीचा, पोषणमूल्ये व आरोग्याचा विचार करत नाही. अर्थातच तिच्या डॉक्टरने तिला जे पदार्थ खायला सक्त मनाई केली आहे ते पदार्थ ती क्वचित खाते. तिच्या वयाच्या लोकांनी खायला पाहिजेत असे घरी बनविलेले योगर्ट, ओट्स, दूध इत्यादी पदार्थ ती आताशा डॉक्टरांनी सांगितल्यापासून आहारात घेऊ लागली आहे.

रबियाच्या आई व बहिणीचे उत्तर अन्नाच्या निवडीसंबंधी एकसारखे होते - ते अन्न विकत घेण्याइतपत पैसा असणे आणि त्यांच्या धर्मात ते अन्न खाण्याची परवानगी असणे यावरून दोघी आपापला आहार - अन्नपदार्थ निवडतात.

कॅमरूनचा अपाझुई सांगतो, की तेथील बाजारात खरेदी-विक्रीचे काम करणारी, तीन मुलांची आई असलेली स्थानिक स्त्री आहाराची, पदार्थांची निवड करताना तिच्याजवळील पैशांत जास्तीत जास्त येणार्‍या पदार्थांची निवड करते. या उलट स्थानिक प्रशासनात काम करणारा, कमी पण नियमित पगार मिळणारा त्याचा मित्र असलेला स्थानिक माणूस जिथून गोरे लोक खरेदी करतात त्या जरा महागड्या दुकानातून अन्न पदार्थ खरेदी करतो. कारण त्याच्या मते जिथे गोरे लोक खरेदी करतात तिथे चांगल्या प्रतीचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी मिळत असणार! आणि त्याच्या या सवयीत व मानसिकतेत गेली अनेक वर्षे बदल नाही!

चिली देशातील सुझानाच्या मते अन्नाची चव आणि किंमत हे घटक महत्त्वाचे आहेत. शिवाय तिची आई जे अन्न बनविते तेच तिला खावे लागते. तिच्या मते जगातील बाकीचे लोकही अशाच प्रकारे आपल्या अन्नाची निवड करतात! कार्मेन ग्लोरिया आपल्या अन्नाची निवड त्याच्या रंगावरून व चवीवरून करते. त्याखालोखाल ते पदार्थ बनवायला लागणारा वेळ व त्यांची किंमत हे निकष येतात. काही पदार्थ व अन्नधान्य ती परवडत नाही म्हणून खरेदी करू शकत नाही. तिच्या मते जगातील लोकही असेच करत असणार!

ह्या सर्व निरनिराळ्या संस्कृती, भाषा, राष्ट्रीयत्व, धर्म, आर्थिक स्थिती, वयोगट व सामाजिक स्थितीतील लोकांचे अन्नपदार्थांच्या आवडीनिवडीचे, रोजच्या आहाराचे निकष वाचताना आपले अगोदर बांधलेले अंदाज कोसळतातच कोसळतात. कोणाच्या भौगोलिक - आर्थिक स्थितीवरून किंवा संस्कृतीवरून त्या त्या व्यक्तीचे खाण्यापिण्याबद्दलचे अंदाज ठरवायला जाल तर काही अंशी बरोबर असाल, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीचा इतिहास काय आहे, मानसिकता काय आहे हेही महत्त्वाचे ठरते. या निकषांबद्दल वाचताना कित्येकदा अख्खे जग फिरल्याचा आभास होतो. व्यक्ती तितक्या प्रकृती, तसे व्यक्ती तितक्या आहारपद्धती असे म्हणण्याचा मोह होतो.

आमची प्रश्नावली खूपच जनरल होती व एका ठराविक पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी तयार केली होती याची पूर्ण कल्पना असूनही या उत्तरांच्या वैविध्याने आम्हाला सर्वांनाच वेगवेगळ्या व्यक्तिवैशिष्ट्यांची एक झलक मिळाली व त्यासोबत एक वेगळी दृष्टीही आली असे म्हणायला हरकत नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!तुझा अभ्यास, लेखनशैली हे उत्तम आहे.

पण हा विषय निवडण्याचे कारण अधिक सखोलपणे लिहायला हवे होते. आत्ता हे 'री-इंव्हेन्तिंग द व्हील' असे वाटतय. ह्या विषयाची आवड असेल तर 'अरौंद द वर्ल्ड इन ८० डायटस' असे एक पुस्तक आहे. मोठे इन्साय्क्लोपिदिया सारखे आहे. मला आवडले होते.
शेवट 'अंदाज कोसळतात' असे आहे. आधी थोडे कुठले अंदाज होते आणि का होते ह्याचे विवेचन आले असते तर बरे झाले असते. तसेच सामान्यपणे असे अभ्यास करताना व्यक्ती तितक्या प्रकृती/आहार हे गृहीत असते. समूह म्हणून अभ्यास केल्यावर कुठला नवीन घटक (उदा: प्रगत देश/अप्रगत देश उष्मांक संख्या, एक पालक कुटुंब, अनेक मुले कुटुंब इ इ यांचे आहार) समोर आला हे सांगणे मला थोडेसे अपेक्षित होते.
तुझ्याकडून नेहमी उंचावलेल्या अपेक्षा असतात म्हणून जरा सविस्तर लिहिले. दुसर्या एखाद्या आय डी ला छान म्हणून सोडून दिले असते Wink Happy

मस्त लिहीलंय. मी तो आधीचा धागा मिस केला नाहीतर तुला अजून एक सँपल मिळाले असते. Wink
शेवटी जगात सगळीकडे सगळ्या प्रकारचे लोक असतात हेच खरं.

अरुंधती कुलकर्णी यांचे लिखाण नेहेमीच रोचक असते.

वर आपण लिहिलेत त्यात सुझन यांची निरिक्षणे सुयोग्य तसेच सामान्यतः लागू होतील अशी वाटली. बाकी सगळी 'बेल कर्व्ह' च्या दोन्ही एक्स्ट्रीम्सना जाणारी वाटली.

कुत्र्या ना डॉग फूडच द्यायला पाहीजे. ली बाई चे चुकते आहे. Pet obesity is endemic in the US. People use food as some kind of solution to their emotional vacuum and problems. which should not be so . and This is also one of the reasons for food selections.

Also you have selected only groups who dont have genuine money issues while selecting food.
एकदम भरल्या पोटीचा सर्व्हे आहे.

छान लिहिले आहे. इंटरेस्टींग सर्व्हे. व्यक्ती तितक्या प्रकृती असलं तरी अन्नासंदर्भातले समज, निकष यांच्यासंदर्भात जगात किती समान पातळीवर विचार केला जातो हे पाहून मजा वाटली. कमी किमतीत भरपूर अन्न आणि चांगली चव पण पोषणमूल्यांचा विचार नाही या दोन निकषांचा विचार जास्तीत जास्त जणांकडून होतो आहे का? स्थानिक उपलब्ध असणार्‍या अन्नाला प्राधान्य देणार्‍यांची संख्याही कमी आहे.

सिमंतिनीच्या सूचनांना अनुमोदन. लेख जास्त ठोस होऊ शकेल त्यामुळे असं वाटतं.

लेख मस्त झाला आहे अरुंधती. Happy
लेख थोडासा वरवरचा वाटतो कारण विषयच एवढा व्यापक आहे की अर्थातच यावर पुस्तक लिहिले जाऊ शकते आणि त्यावर तेवढे काम व्हावयाचे पोटेन्शियल आहेच.

""
त्याच्या मते जगभरच्या सुशिक्षित, सुखवस्तू लोकांना आपल्या अन्नात जाणीवपूर्वक निवड करण्याची संधी असते. आणि त्यांनी त्या संधीचा फायदा घेऊन आरोग्यकारक आहार निवडला पाहिजे. जगात कित्येकांना इच्छा असली तरी संधी नसते आणि संधी असली तरी जाणीव नसते. आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा व आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन आपण सुयोग्य व संतुलित आहार करायची फार गरज आहे हे तो ठासून सांगतो. "" >> मी हे तिनतिनदा वाचले. अजून पचनी पडत नाही. पण त्यादृष्टीने विचार केलाच नाही आपण हे जाणवले.

अजून एक मुद्दा
Locovores आणि ग्रीन थिंकिंग- याचाही उहापोह व्हायला हवा. कारण निसर्गाशी खाद्यपदार्थांची नाळ जोडलेली असते. जागतिकीकरणाच्या रेट्यात अन्न ही फक्त एक बाजारपेठ होऊन गेलेली आहे. त्याच्या दूरगामी दुष्परिणामांचा विचार एक तो या प्लॅनेटची काळजी घेणारा जगन्नियंता करतो का काय कोण जाणे...

गेल्याच आठवड्यात वडलांनी मीना नेरुरकरांचा ' शुद्ध कोकोनट ऑईल' चे भाग्य उजळवणारा एक लेख पाठवला होता वाचायला, तो आठवला.

लेख वाचायला मजा आली पण लेखातून ठोस असा काही निष्कर्ष निघत नाहीये. विविध देशातल्या एक दोन व्यक्तींच्या वैयक्तिक सवयींचे संकलन इतपतच व्याप्ती आहे. पण मूळ प्रवृत्ती जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात दिसू शकतात. त्यामुळे ही माहित कोणत्या देशातल्या व्यक्तीची आहे हा मुद्दाच गौण ठरतो.

फारतर असं म्हणता येईल की कोठेही जा पळसाला पाने तीनच! Happy

मला ह्या शोधात नवीन किंवा नाविन्य असे काहीच वाटले नाही..
हे आधीच केलेले/वाचलेले/पाहिलेले निरीक्षण आहे. सगळी उदाहरणं भारतात कोठेही मिळतीलच.

काही उदाहरणावरून काय साध्य झाले कळले नाही.. जसे गरीबाला चवीची चिंता कशाला पडेल. लहानपणापासून दोन वेळच्या अन्नाला मुश्कील असलेली व्यक्तीचा मानसिक कल बदलत नाही जरी पैसा वा अन्न असो वा नसो नंतरच्या काळात.

>> विविध देशातल्या एक दोन व्यक्तींच्या वैयक्तिक सवयींचे संकलन इतपतच व्याप्ती आहे.<<
+१

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद!

सिमन्तिनी, तू सुचविलेल्या मुद्द्यांवर आणखी लिहायचा विचार आहे. मटेरियल देखील भरपूर आहे जवळ. पण हा लेख लिहितानाच ११००+ शब्द झाले म्हणून आटोक्यात आणला गं!

लेखात जास्त खोलवर जाऊन लिहिलेले नाही कारण जे निकष आहेत त्यांतील शास्त्रीय निकष (जसे उष्मांक, पोषणमूल्ये इ.) सोडले तर प्रत्येक व्यक्तीसाठीची बाकीच्या निकषांबद्दलच्या व्याख्याही वेगवेगळ्या आहेत हे लवकरच लक्षात आले. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या गोष्टीची 'उपलब्धता' हा निकष घेऊयात. कोणासाठी एखाद्या वस्तूची 'उपलब्धता' म्हणजे नेहमीच्या बाजारपेठेत विनासायास व नियमित स्वरूपात मिळणारी गोष्ट, तर कोणासाठी नेहमीपेक्षा जरा लांब अंतरावरच्या किंवा एक्स्क्लुझिव्ह दुकानात मिळणारी गोष्ट, तर कोणासाठी ती खास 'ऑर्डर देऊन घेता येण्यासारखी गोष्ट' तर कोणासाठी घरबसल्या मागवून घेता येईल अशी गोष्ट - अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत.

उदा. मला चकल्या आवडतात. त्या खाण्याची इच्छा झाल्यावर त्या घरी बनवून / घराजवळच्या दुकानात खरेदी करून / घरापासून लांबच्या दुकानात खरेदी करून / ऑर्डर देऊन / कूरियरने मागवून / इंटरनेटवर मागणी नोंदवून मी त्या चकल्या स्वतःसाठी 'उपलब्ध' करून देऊ शकते. जेव्हा मी म्हणते की 'उपलब्ध असतील ते ते अन्नपदार्थ मी निवडते', तेव्हा अशा रीतीने 'उपलब्ध' असलेल्या चकल्यांचा समावेशही मी माझ्या आहारात केलेला असतो.

निष्कर्ष काढायला अजून अवकाश आहे, कारण लोक अजून आपली उत्तरे फोरमवर लिहित आहेत. आणि तरी ह्या उत्तरांमधून काही ठोस निष्कर्ष काढू नयेत असे मला तरी वाटते. कारण ही उत्तरे म्हणजे केवळ जगातल्या वेगवेगळ्या लोकांच्या उत्तरांचे उदाहरणादाखल गोळा केलेले नमुने आहेत.

दिनेशदा, कॅमरून मधल्या दोघांनी दिलेली माहिती लिहिली आहे की! बाकी वर्गात फोरमवर आणखी दोन-तीन आफ्रिकन्सनी त्यांची निरीक्षणे लिहिली आहेत. पण मला त्यांची नावे उच्चारता, लिहिता येणं सध्या तरी शक्य नाहीये, आणि त्यांनी जे लिहिलंय ते इतक्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत आणि त्रोटक लिहिलंय की त्यातून नीट काहीच कळत नाहीये.

अमा, ली च्या मावशीबाई ८७ वर्षांच्या आहेत. त्यांना त्यांच्या कुत्र्यांसाठी कोणता आहार आरोग्यपूर्ण आहे अथवा नाही हे माहिती असावे. (असं मी गृहित धरते आहे! ;-)) पण त्यांचा आपल्या कुत्र्यांच्या सवयी बदलायचा (व पर्यायाने स्वतःच्या आहाराच्या सवयी बदलायचा) कोणताही मानस नाही.

जिथे आर्थिक सुबत्ता असेल तिथे माणसे सामान्यतः पोषक, आरोग्यकारक, सकस किंवा विविधतापूर्ण अन्न खात असावीत व असणार असे एक सर्वसामान्य गृहितक असते. तसेच जिथे आर्थिक स्वातंत्र्य आहे तिथे आपल्या स्वतःच्या आहाराबद्दलचा निर्णय ती व्यक्ती स्वतः घेत असणार असेही एक गृहितक आहे. सुशिक्षित, सधन घरातील लोक ''साहजिक''च स्वतःच्या आहाराबद्दल सजग असणे असेही गृहितक काहीजण मांडतात. आणि ब्रॉड स्पेक्ट्रमवर तसे चित्र दिसतही असेल. पण तुम्ही लोकांना जेव्हा व्यक्तिशः विचारता तेव्हा वेगळे चित्र दिसते. एकाच घरात खाण्यापिण्याच्या बाबतीत वेगवेगळ्या सवयी, निकष दिसतात. घरातल्या घरातच आहाराबद्दलची सजगता निरनिराळ्या प्रमाणात दिसून येते. आहाराच्या सवयी सुधारायच्या असतील तर सामूहिक पातळीवर सुरुवात करावी अथवा नाही, किंवा प्रत्येक व्यक्तीने सजग होणे गरजेचे आहे का, इत्यादी अनेक गोष्टी या सर्वेमधील उत्तरे वाचताना लक्षात येऊ लागतात.

काही लोकांना चवीमधे चांगलं/वाईट याचा फरकच कळत नाही, असं शक्य असेल का? म्हणजे जिभेवर Enough Sensor नसणे, असं शक्य आहे का?
हा प्रश्न मला गम्मत म्हणून पडला: मुळ शंका अशी.. की असे लोक बाहेर (म्हणजे खाद्यगृहात, मित्रांच्या घरी इत्यादी ) ठिकाणी चांगलं चांगलं खातात. पण त्यांच्याकडे काहीही खाल्लं तर त्याला 'चव' अजिबात नसते. आणि हे एकदा दोनदा नाही १० वेळा खाल्लं तरी तेच. त्याना चविष्ट आणि बेचव यात फरकच कळत नसावा... असं वाटू लागलंय..

>> काही लोकांना चवीमधे चांगलं/वाईट याचा फरकच कळत नाही, असं शक्य असेल का? म्हणजे जिभेवर Enough Sensor नसणे, असं शक्य आहे का?
हो. इथे वाचा.

लेखाबद्दल मामी +१

मी बघितलय काहींना जेवण म्हणजे फक्त पोट भरायची कृती असेच वाटते.. म्हणजे पदार्थाचा रंग, वास वगैरेशी काहीच देणे घेणे नाही. चव तर दूरची बात. इतकी का उदासीनता असेल बरे?
पुढ्यात ताट आले की खायचे उठायचे. तेव्हा मलाही प्रश्ण पडलेला की काहीच ,कधीच का प्रतिसाद नाही काय जेवण आहे पुढ्यात(हे गरीब लोकांच्या बाबतीतले निरिक्षण नाही, चांगले दूध दुभते, पैसा असलेल्या घरच्या लोकांचे आहे.)

तर काही जणं बेचव जेवण(विशेषतः हॉटेलचे) सुद्धा, वा काय छान आहे असे म्हणत खातात. Sad

छान लेख अरुंधती.
>> काही लोकांना चवीमधे चांगलं/वाईट याचा फरकच कळत नाही, असं शक्य असेल का? म्हणजे जिभेवर Enough Sensor नसणे, असं शक्य आहे का?
..
त्याना चविष्ट आणि बेचव यात फरकच कळत नसावा... असं वाटू लागलंय..

Lol no lessons learnt from previous failures! पण खरंच कळत नसेल का?
काही घरातल्या पदार्थांना नुस्ती विचित्र चव नाही वास पण funny येत अस्तात. especially तूप, दही वगैरे पदार्थांना. हे त्या घरातल्यांना सवयीनी कळत नसेल का? Sad

एका अपघातात वासाचा Sense गेलेली एक बाई मला माहीत आहे. तसं असेल.. न चवीचं ज्ञान न वास. गवत आणि श्रीखंड एकत्र खाऊ शकतील.. Happy

@पारिजाता.
वासावरून आठवलं म्हणून सांगते माझ्या सासरी अतिशय ताजं मधुर ताक प्यायची सवय. जरासं शिळं, किंचीत आंबट ताक असेल तर त्याला "पुंगुस" वास हे लेबल लावून टाकून द्यायचं ही पद्धत.
मला आंबट ताक आवडतं. कारण आईकडे ताक काहीसं आंबट्/अधमुरं असायचं.
इथे अमेरिकेत आल्यावर ब्लु चीज खाल्लं ते पण ह्या पुंगुस प्रकारातलं निघालं पण हे चीज चांगल्या दर्जाचं आहे, उत्तम समजलं जातं. तेव्हा चांगलं/वाईट हे खूप रिलेटिव्ह असतं हे मला पुरेपूर पटलं.
भाज्या कमी जास्त शिजवणे, भात गुरगुट्या/फडफडीत, पोळ्या पातळ/पराठे जाड, नुडल्स/ब्रेड चांगला की वाईट हे पण रिलेटिव्ह होत जातं.

थोडं अवांतर आहे पण तरी लिहिते.
मुलगी डे केअर मधे असताना (दिड वर्षाची असेल) एकदा तिला सर्दी-खोकला झाला. त्या टिचरने मला न विचारताच तिला दही दिले. संध्याकाळी पिकअप करताना हे समजल्यावर पहिला विचार होता की असं कसं हिला समजत नाही. खोकला झाल्यावर कधी दही देतात का? मग सौम्य शब्दात विचारले की चालतं दही लहान मुलांना खोकला असेल तर. Happy ती म्हणाली की का नाही? दह्यात प्रोबायोटिक असतात. सर्दी असताना लहान मुले नकळत शेंबूड गिळतात त्यामुळे जे पोट बिघडलेले असते ते ठीक व्हायला मदत होते. या दह्यात साखर असते, प्रोटिन असते त्यामुळे ताकद राहते, आणि गिळायला सोपे असल्याने मुले त्रास देत नाहीत. एकदम मला आपण लहानपणापासून जसे वाढलो त्याचा परिणाम कसा होतो हे दिसायला लागले. आणि आपणच अजून विचार करायला पाहिजे हे जाणवले.

धनश्री, रिलेटिवबद्दल अगदी अगदी.

कधी काळी आफ्रिकन मुलांचे होस्टेल असलेल्या इमारतीत मी त्यांच्याच मजल्यावर राहात होते. ती मुलंमुली बरेच पदार्थ अगदी आंबवल्यासारखे करून खायची. त्या मजल्यावर त्या पदार्थांचा आंबूस वास पसरलेला असायचा. मला तो वास अतिशय विचित्र वाटायचा. पण त्यांच्याकडून नंतर कळाले की त्यांना अशा प्रकारची चव व वास असलेले त्यांचे पारंपारिक पद्धतीचे पदार्थ करून खायला आवडायचे.

इथं europe मधे चीज या गोश्टीचं स्तोम खूप आहे...पहिल्यांदा आलो तेंव्हा काय try करू काय नी काय नको असं झालेलं...पण चीज च्या बाबतीत कानाला खडा... Happy ...एक दोन साधारण प्रकार सोडले तर कुठलेच चीज फार आवडलं नाही....विचित्रं चवी Happy

हो ना गोष्टी खूप रिलेटिव्ह असतात. बोंबला च्या वासाने एखाद्याची भूक चाळवते. अगदी लाळ गळण्याइतपत तर एखाद्याची भूक मरते. त्याला उलटी मळमळ ची भावना होते. म्हणजे वास तोच पण परिणाम भिन्न.