तळणीचे मोदक (रवा,मैदा वापरून)

Submitted by माधवी. on 9 July, 2013 - 17:22
लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

रवा १ १/२ (१.५) वाटी
मैदा १.५ वाटी

खोबरे (डेसिकेटेड कोकोनट) १.५ वाटी
पिठीसाखर १.५ वाटी
काजू, बदाम,पिस्ते ७-८
केशर २-३ काड्या

दुध १ कॉफी मग
तूप २-३ चमचे
तेल १/२ वाटी मोहन म्हणून आणि तळायला.

लागणारा वेळ डब्यांमधून साहित्य काढून शेवटचा मोदक तळून होईपर्यंत आहे. Happy

क्रमवार पाककृती: 

दुधामध्ये केशराच्या काड्या घालून ठेवाव्या किंवा केशर घालून एक उकळी आणावी.

प्रथम रवा व मैदा नीट एकत्र करुन घ्यावेत. त्यामध्ये १ वाटी मोहन घालावे. पुन्हा नीट एकत्र करून दुधात घट्ट भिजवावे. अर्धा कप दुध लागेल. झाकुन थोड्यावेळ ठेवून द्यावे. वेळ १५-२० मी.

आता एका भांड्यात चमचाभर तुप टाकून खोबरे ५ मी भाजून घ्यावे. मग त्यामध्ये साखर घालावी व पुन्हा ५ मी नीट हलवून भाजून घ्यावे. राहिलेल्या (१/२ कप) दुधापैकी निम्मे दुध घालून नंतर काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे घालावे. पुन्हा थोडे तूप घालून सारण थोडे गोळा होईपर्यंत हलवत रहावे. वेळ १५-२० मी.

आता पारीसाठी केलेले रवा-मैद्याचे मिश्रण छोट्या बत्त्याने चांगले कुटून घ्यावे. त्यामध्ये थोडे थोडे दुध घालून चांगले मळावे. जरा हात दुखतील पण मिश्रण जेवढे मळू तेवढे छान मऊ होते व पारी छान होते. वेळ १५-२० मी.

आता छोटे गोळे करून एकसारखे लाटावे. त्यामध्ये चमचाभर सारण भरून मोदक करावेत. पारीचे मिश्रण छान मऊ असेल तर पारी व्यवस्थित बंद करता येते व तळताना मोदक फुटत नाहीत. वाटल्यास दुधाचा हात लावून पारी नीट बंद करावी.

सगळे मोदक करून झाले की मंद आचेवर तळून घ्यावेत.

वाढणी/प्रमाण: 
३५ मोदक (माझ्या वाटीचा आकार साधारण वाटीपेक्षा मोठा असल्याने जास्त झाले. नेहेमीची वाटी वापरली तर २५ होतील बहुदा)
अधिक टिपा: 

केशरी दुध वापरल्याने सारणाची चव छान लागते आणि मोदकाचा रंग छान येतो.
हे मोदक खरे तर ओले नारळ वापरून करतात पण मी प्रथमच असे केले. ओले नारळ वापरून जास्त छान लागतात.
अनेक जण पारीसाठी केलेल्या मिश्रणात मीठ घालतात.

माहितीचा स्रोत: 
आई, सासुबाई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रर्र.. फोटो फारच छोटे दिसताहेत की!
एनीवे, आधी माबोवरच शोधत होते ही कृती पण मला सापडली नाही.
अजून काही सुचना असल्यास कळवाव्यात.

मस्तच की... गुळखोबर्‍याच्या मोदकात तो फुटण्याची भिती असते, ती इथे (त्याप्रमाणात) नसावी Happy

करुन बघतो. दुध १ कप (मग) म्हणजे साधारण २०० मिली का? की मोठा मग - अंदाजे ४०० -५०० मिली ?

मस्त... !

आमच्याकडे गणपतीला असेच मोदक असतात. रादर विदर्भात सगळीकडेच असावेत, त्याभागात उकडीचे मोदक मी तरी फार नाही पाहिलेत, ते ईकडेच मुं-पु-कोकणात... आणि मी तर दोंन्हिंचा पंखा Happy

भारी दिसताय !!! आमच्याकडेपण जवळपास ह्याच प्रकारे करतात. केशर+दुध वापरुन चतुर्थी ला करण्यात येतील Happy

अय्यो!! Happy एवढे प्रतिसाद!
धन्यवाद सगळ्यांना! मोहन १ वाटी लिहिले आहे, ते १/२ वाटी असावे बहुतेक. मला आठवत नाही आता. पण मिश्रण मस्त एकजीव होण्याइतपत घालावे!

विजय>>
१ मग म्हणजे २०० मिली असावे. ते कॉफीचे मोठे मग मिळतात ना तेवढा.
images.jpg

स्वाती
वाफवून म्हणजे कसे?करुन बघायला आवडतील लो फॅट ऑप्शन म्हणून.

फोटो मोठे दिसण्याकरता माझ्या पिकासा अल्बम मधे सेंटींग चेंज करावे लागतील का?

सुक्या खोबर्‍याच्या सुक्या सारणाचे खाल्ले आहेत. ही दुधात शिजवायची आयडिया मस्त आहे.
एक वाटी म्हणजे खूपच वाटतंय मोहन तीन वाट्या मिश्रणाला. अर्धी वाटी खूप झालं.

धन्यवाद भरत.
तुम्ही दिलेल्या लिंक मधले मोदक मी पाहिले होते पण तिथे कणीक वापरली आहे ना आणि सारण कसे करावे ते पण नाही सांगितले आहे. म्हणून! Happy

स्वाती
हो , अर्धी वाटीच असावे. मी बदल करते.

सुक्या खोबर्‍याच्या सुक्या सारणाचे खाल्ले आहेत. ही दुधात शिजवायची आयडिया मस्त आहे >>> +१

मोदक भारी दिसताहेत.

माझि पुन्याचि आत्या करायचि हे मोदक.हे तिकताहि खुप दिवस. चविलाहि खुप छान लागतात.आतवन करुन दिल्याब्द्द्ल धन्यवाद.

धन्यवाद दिनेशदा!
जमले म्हणायचे एवढेच. ते ११पाकळ्यांचे / २१ पाकळ्यांचे मोदक कसे करतात फार आश्चर्य वाटते.
इथे माबोवरच काही फार सुरेख प्रचि पाहिले आहेत.

माझ्या साबा हे मोदक अतिशय सुरेख करायच्या. सारण मात्र ओल्या खोबर्‍याचे असायचे.मी एकदा करण्याचा
प्रयत्न केला होता.पण जमले नाही. उकडीचे जमतात. त्यामुळे तळणीचे मोदक करणार्‍या सु.ग्रुनां ___/\___