पुरुषांनी पुरुषांकरिता लिहिलेल्या पाककृती

Submitted by विजय देशमुख on 29 June, 2013 - 04:10

आजकाल बरेचदा पुरुष मंडळी पाककृती लिहितात, पण त्यात एक विशेष भाषा असते, जी नेहमी पाककृती करणाऱ्या पुरुषांना आणि सर्वच स्त्रियांना कळते. पण वर्षातून एकदा किंवा मैत्रिणीवर किंवा नव्यानेच लग्न झालेल्या / किंवा लग्न होवून बरेच वर्षात जिला चहाही करून न दिलेल्या (स्वतःच्या) बायकोवर छाप पाडायची असेल, तर अश्या पाककृतींचा विशेष उपयोग नसतो. म्हणून आम्ही (म्हणजे मी) पुरुषांनी पुरुषांकरिता लिहिलेल्या पाककृती हे (अनियमित) सदर सुरू करत आहोत. असो, नमनाला घडाभर तेल नको. (ही म्हण आहे, कृती नाही).

तर आजची पाककृती आहे, पालक कबाब. मूळ पाककृती तुम्हाला खालील दुव्यावर बघता येईल.

http://www.maayboli.com/node/35220

साहित्य - जसे या दुव्यावर दिले आहे तसे.
+ कांदे,
कमी जास्त करू नका, गोत्यात याल.

कृती :-
एक दिवस आधी
१. घरी बायकोला एक वाटी मूग डाळ आदल्या दिवशी भिजवायला सांगणे. का, कशासाठी ते सीक्रेट आहे असे सांगणे. हे काम शक्यतो स्वतः करू नये, नाहीतर मुगाच्या ऐवजी उडद किंवा तस्तम डाळीचे कबाब बनतील. {तेही बनवायला हरकत नाही, पण चव वेगळी येईल}.
२. आदल्या दिवशी घरी जाताना पालक, ४ मध्यम आकाराचे बटाटे आणि थोडेसे कांदे घेऊन जावे. {वेळेवर कांदे नाही या तक्रारीची जागाच ठेवू नये}. सोबत उरलेले साहित्य विकत घ्यावे. जिरे, धणे पावडर, तिखट, हळद घ्यायची गरज नाही ते घरी असतेच. सोबत कंपनीतून सेफ्टी गॉगल न्यायला विसरू नये.
पाककृतीच्या दिवशी
१. एक स्वच्छ नॅपकीन किचनमधे टांगावा. यासाठी खिळा मारण्याची गरज नाही. कुठेही अडकवता येईल. प्रत्येकवेळी हात ओले झाल्यावर याच नॅपकिनने पुसावे. त्यासाठी बनियन, पँट वापरू नये.
२. गॅसच्या वर एक्झॉस्ट असल्यास चालु करावा.
३. ४ बटाटे पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये टाकावे. त्यात बटाटे बुडतील इतके पाणी टाकावे. कुकरला रिंग आणि शिट्टी लावून तो गॅसवर ठेवावा आणि गॅस सुरू करावा. किमान ४ शिट्ट्या होवू द्याव्या, नंतर गॅस बंद करावा. व कुकर थंड होवू द्यावा. दरम्यान कुकरकडे बघत बसू नसे, तर बाकीची कामे आटपावी. (खाली लिहिलेली).
४. आधी डोळ्यावर सेफ्टी गॉगल लावावा. गॉगल विसरले असल्यास रडण्याची तयारी ठेवावी. २ मध्यम आकाराचे (किंवा ३ लहान - अंड्याच्या आकाराचे) कांदे आधी साले काढून मग बारीक चिरावे. (हे कसे, माहिती नसल्यास संजिव कपुरचा कोणत्याही भाजीचा व्हीडीओ पाहावा.
५. त्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व पुदिना बारीक चिरावा. कोथिंबीरीचे मूळ व मिरच्याचे देठ कापून फेकून द्यावे.
६. सुमारे १ इंच आले (स्केल शोधत बसू नये, बोटाच्या एका पेराइतके+/-) आणि ४-६ लसुणाच्या पाकळ्या मिक्सरमधून बारीक कराव्या. मिक्सर कसा चालवतात हे माहीती नसेल तर सौ. ची मदत घ्यावी, उगाच प्रयोग करू नये. ते घरचे यंत्र आहे, कंपनीचे नव्हे. बिधडले तर स्वतःला हेलपाटे मारावे लागतील. अश्याच प्रकारे डाळही बारीक करून घ्यावी.
७. पालक पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. थोडसं पाणी झटकून घ्यावं. शक्य तितका कोरडा करावा. सौ. घरी नसेल तर हेअर-ड्रायरने कोरडा करावा. मुळं कापून फेकावी देठं पाहिजे तर ठेवावी नाहीतर कापून फेकावी. हा कोरडा पालक फुड-प्रोसेसर मधून बारीक करावा. (मिक्सर आणि फुड-प्रोसेसर वेगळे उपकरणं आहेत, त्यासाठी गुगल इमेज बघाव्या, वेळेवर नाही तर आदल्या दिवशी).
८. दरम्यान उकडलेला बटाटा थंड झाला असेल, तर कुकरमधून बाहेर काढावा, (चमच्याने, तो गरम असतो, बटाटा- चमचा नव्हे). त्याला थंड पाण्यात ठेवावे आणि थंड झाल्यावर साले काढुन फेकावी. स्वच्छ झालेला बटाटा किसणीने (पुन्हा गुगल इमेज) किसावा.
९. आता बटाटा, पालक, कांदे, व इतर सर्व बारीक केलेले पदार्थ एका मोठ्या भांड्यात टाकावे. त्यात मीठ (आधी चाखून बघावे आणि मगच टाकावे), धणे व जीरे पावडर (ह्या वेगवेगळ्या असतात, एकत्र मिळत नाही), गरम मसाला ( हे नाव आहे, मसाला गरम करायची गरज नाही), थोडीशी (म्हणजे ५-६ चिमिट) साखर टाकावी आणि मिश्रण हाताने जशी कणिक भिजवतात तसे एकत्र करावे. {वि‌सु. पाणी टाकू नये}. हे मिश्रण थोडेसे चाखून बघावे. त्यानुसार मीठ, मसाला, तिखट कमी असेल तर ते टाकावे. मिश्रण चविष्ट तर कबाबही चविष्ट.
१०. मग हात धुऊन घ्यावे, आणि वरच्या नॅपकिनला पुसावे. एका वाटित खायचे तेल (उदा. सोयाबीन, फल्ली, सुर्यफुल) घ्यावे. सौ. ला चुकून डोक्याला लावायचे तेल कुठेही ठेवायची सवय असेल तर सावधान! . त्यातील थोडेसे तेल हाताला लावावे (म्हणजे तळहाताला - हे मसाजचे तेल नव्हे). केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावे आणि त्याला हातानेच हलकेच दाबून चपटे करावे. शक्यतो गोल (म्हणजे वर्तुळाकार) आकार यावा असा प्रयत्न करावा. {होळीच्या आधी गावाकडे बनवलेल्या शेणाच्या छोट्या गोवऱ्यांची आठवण झाली का? तोच आकार}. असे बनवलेले गोळे एका तेल लावलेल्या ताटात ठेवावे, म्हणजे चिकटून बसणार नाही.
११. आता एक सपाट पॅन घ्यावे आणि एक सराटा. {म्हणजे काय ते सौ. ना विचारले तर १० सेकंदात मिळेल}. प्रत्येकाच्या घरी कबाब असलं तरी कबाब पॅन असेलच असं नाही, तरी शक्यतो सपाट पॅन बघावे. त्यात एक छोटा चमचा तेल टाकावे आणि त्याला गॅसवर मंद आचेवर ठेवावे {म्हणजे गॅसचा नॉब सिमवर ठेवावा}. तेल पॅनमध्ये फिरवावे, त्यासाठी चमचा फिरवू नये, पॅन उचलून फिरवावे. मग त्यात हे गोळे सोडावे आणि शिजू द्यावे. अधून मधून होमात जसे (थोडेसे) तुप टाकतात तसे तेल टाकायला हरकत नाही. थोड्या थोड्या वेळाने हे चपटे गोळे (म्हणजे कबाब) सराट्याला तेलात बुडवून (म्हनजे फक्त टोकाला) पलटवावे, म्हणजे चिकटणार नाही.

१२. असे करून ४-६ कबाब एकावेळी तयार होतील. मग ते सौ. ला किंवा मैत्रीणीला खायला द्यावे आणि मग भरपुर शिव्या खायची तयारी ठेवावी. अर्थातच तुम्हाला चांगली कॉमेंट मिळेल. {आयतं खायला प्रत्येकालाच आवडतं अन पहिल्यांदाच केलं असेल तर पुन्हा मिळावं म्हणून स्तुतीतर होईलच. }

शेवटी, रॉयल्टी म्हणून या पाककृतीवर धन्यवाद टाकावा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन, हाच फोटो शोधत होतो, पण वेळेवर नाही मिळाला. धन्यवाद. व्यंगचित्रपण मस्त आहे.

सगळ्यांना धन्यवाद.

@मितः- .पुढील पाककृतीच्या प्रतिक्षेत >>>> कदचित नाहिच जमणार मला लिहायला. पण आलं एखाद्यावेळी मनात अन जोर मारला टायपिंगचा तर बघु.

मस्तच Proud

सायो + ११११११११११११११११११११११११११११११११११

भाऊ Lol

थंड झाल्यावर साले काढुन फेकावी. >> कुठे?? (जल्ला हे कोण लिहिणार? बेसिनचा पाईप चोकअप झाला ना...)

भाऊ :d

हे भाऊ काय प्रकरण आहे.... Sad आता लगेच ओवाळणी मागणार की काय Lol

सर्वांचे आभार. विशेष आभार मुळ पाककृतीकाराचे Happy

अहो भाऊ म्हणजे भाऊ नमसकर, आपले मायबोलीवरचे व्यंगचित्रकार्.:स्मित: तुम्हाला खरच नाही समजले की आमची व भाऊंची गम्मत करताय्?:अओ:

भाऊ तुम्हाला ओवाळणी मागतील ना. :फिदी:....................पुढच्या लेखाची.:खोखो:

<< भाऊ (नमनकर) सॉरी बरं का... >> अहो, सॉरी बिरी सोडा हो, असल्या गडबडी माझ्याकडून तर रोजच होत असतात; पण खरं सांगतो, ह्या मला चिकटलेल्या 'भाऊ'ने माझी तर पार गोची केलीय; माझं लग्न देखील त्यामुळे खूप उशीरां झालं ! Wink
शिवाय, माझ्या 'नमसकर'चा 'नमस्कार' बर्‍याच जणानी केला पण त्याचा 'नमन'कर करण्याचा मान मात्र तुम्ही पटकावला ! Wink
<< भाऊ तुम्हाला ओवाळणी मागतील ना. ....................पुढच्या लेखाची. >> याला १००% जोरदार अनुमति. आवडतं आपल्याला तुमच्या अशा शैलीत लिहिलेलं ! शुभेच्छा.

मस्त लेख !
भाऊ तुमचं व्यंगचित्र आणि हजरजबाबीपणा...... भारीच ! Happy
उदयन, मस्त फोटो !

Happy

Pages