पुरुषांनी पुरुषांकरिता लिहिलेल्या पाककृती

Submitted by विजय देशमुख on 29 June, 2013 - 04:10

आजकाल बरेचदा पुरुष मंडळी पाककृती लिहितात, पण त्यात एक विशेष भाषा असते, जी नेहमी पाककृती करणाऱ्या पुरुषांना आणि सर्वच स्त्रियांना कळते. पण वर्षातून एकदा किंवा मैत्रिणीवर किंवा नव्यानेच लग्न झालेल्या / किंवा लग्न होवून बरेच वर्षात जिला चहाही करून न दिलेल्या (स्वतःच्या) बायकोवर छाप पाडायची असेल, तर अश्या पाककृतींचा विशेष उपयोग नसतो. म्हणून आम्ही (म्हणजे मी) पुरुषांनी पुरुषांकरिता लिहिलेल्या पाककृती हे (अनियमित) सदर सुरू करत आहोत. असो, नमनाला घडाभर तेल नको. (ही म्हण आहे, कृती नाही).

तर आजची पाककृती आहे, पालक कबाब. मूळ पाककृती तुम्हाला खालील दुव्यावर बघता येईल.

http://www.maayboli.com/node/35220

साहित्य - जसे या दुव्यावर दिले आहे तसे.
+ कांदे,
कमी जास्त करू नका, गोत्यात याल.

कृती :-
एक दिवस आधी
१. घरी बायकोला एक वाटी मूग डाळ आदल्या दिवशी भिजवायला सांगणे. का, कशासाठी ते सीक्रेट आहे असे सांगणे. हे काम शक्यतो स्वतः करू नये, नाहीतर मुगाच्या ऐवजी उडद किंवा तस्तम डाळीचे कबाब बनतील. {तेही बनवायला हरकत नाही, पण चव वेगळी येईल}.
२. आदल्या दिवशी घरी जाताना पालक, ४ मध्यम आकाराचे बटाटे आणि थोडेसे कांदे घेऊन जावे. {वेळेवर कांदे नाही या तक्रारीची जागाच ठेवू नये}. सोबत उरलेले साहित्य विकत घ्यावे. जिरे, धणे पावडर, तिखट, हळद घ्यायची गरज नाही ते घरी असतेच. सोबत कंपनीतून सेफ्टी गॉगल न्यायला विसरू नये.
पाककृतीच्या दिवशी
१. एक स्वच्छ नॅपकीन किचनमधे टांगावा. यासाठी खिळा मारण्याची गरज नाही. कुठेही अडकवता येईल. प्रत्येकवेळी हात ओले झाल्यावर याच नॅपकिनने पुसावे. त्यासाठी बनियन, पँट वापरू नये.
२. गॅसच्या वर एक्झॉस्ट असल्यास चालु करावा.
३. ४ बटाटे पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये टाकावे. त्यात बटाटे बुडतील इतके पाणी टाकावे. कुकरला रिंग आणि शिट्टी लावून तो गॅसवर ठेवावा आणि गॅस सुरू करावा. किमान ४ शिट्ट्या होवू द्याव्या, नंतर गॅस बंद करावा. व कुकर थंड होवू द्यावा. दरम्यान कुकरकडे बघत बसू नसे, तर बाकीची कामे आटपावी. (खाली लिहिलेली).
४. आधी डोळ्यावर सेफ्टी गॉगल लावावा. गॉगल विसरले असल्यास रडण्याची तयारी ठेवावी. २ मध्यम आकाराचे (किंवा ३ लहान - अंड्याच्या आकाराचे) कांदे आधी साले काढून मग बारीक चिरावे. (हे कसे, माहिती नसल्यास संजिव कपुरचा कोणत्याही भाजीचा व्हीडीओ पाहावा.
५. त्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व पुदिना बारीक चिरावा. कोथिंबीरीचे मूळ व मिरच्याचे देठ कापून फेकून द्यावे.
६. सुमारे १ इंच आले (स्केल शोधत बसू नये, बोटाच्या एका पेराइतके+/-) आणि ४-६ लसुणाच्या पाकळ्या मिक्सरमधून बारीक कराव्या. मिक्सर कसा चालवतात हे माहीती नसेल तर सौ. ची मदत घ्यावी, उगाच प्रयोग करू नये. ते घरचे यंत्र आहे, कंपनीचे नव्हे. बिधडले तर स्वतःला हेलपाटे मारावे लागतील. अश्याच प्रकारे डाळही बारीक करून घ्यावी.
७. पालक पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. थोडसं पाणी झटकून घ्यावं. शक्य तितका कोरडा करावा. सौ. घरी नसेल तर हेअर-ड्रायरने कोरडा करावा. मुळं कापून फेकावी देठं पाहिजे तर ठेवावी नाहीतर कापून फेकावी. हा कोरडा पालक फुड-प्रोसेसर मधून बारीक करावा. (मिक्सर आणि फुड-प्रोसेसर वेगळे उपकरणं आहेत, त्यासाठी गुगल इमेज बघाव्या, वेळेवर नाही तर आदल्या दिवशी).
८. दरम्यान उकडलेला बटाटा थंड झाला असेल, तर कुकरमधून बाहेर काढावा, (चमच्याने, तो गरम असतो, बटाटा- चमचा नव्हे). त्याला थंड पाण्यात ठेवावे आणि थंड झाल्यावर साले काढुन फेकावी. स्वच्छ झालेला बटाटा किसणीने (पुन्हा गुगल इमेज) किसावा.
९. आता बटाटा, पालक, कांदे, व इतर सर्व बारीक केलेले पदार्थ एका मोठ्या भांड्यात टाकावे. त्यात मीठ (आधी चाखून बघावे आणि मगच टाकावे), धणे व जीरे पावडर (ह्या वेगवेगळ्या असतात, एकत्र मिळत नाही), गरम मसाला ( हे नाव आहे, मसाला गरम करायची गरज नाही), थोडीशी (म्हणजे ५-६ चिमिट) साखर टाकावी आणि मिश्रण हाताने जशी कणिक भिजवतात तसे एकत्र करावे. {वि‌सु. पाणी टाकू नये}. हे मिश्रण थोडेसे चाखून बघावे. त्यानुसार मीठ, मसाला, तिखट कमी असेल तर ते टाकावे. मिश्रण चविष्ट तर कबाबही चविष्ट.
१०. मग हात धुऊन घ्यावे, आणि वरच्या नॅपकिनला पुसावे. एका वाटित खायचे तेल (उदा. सोयाबीन, फल्ली, सुर्यफुल) घ्यावे. सौ. ला चुकून डोक्याला लावायचे तेल कुठेही ठेवायची सवय असेल तर सावधान! . त्यातील थोडेसे तेल हाताला लावावे (म्हणजे तळहाताला - हे मसाजचे तेल नव्हे). केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावे आणि त्याला हातानेच हलकेच दाबून चपटे करावे. शक्यतो गोल (म्हणजे वर्तुळाकार) आकार यावा असा प्रयत्न करावा. {होळीच्या आधी गावाकडे बनवलेल्या शेणाच्या छोट्या गोवऱ्यांची आठवण झाली का? तोच आकार}. असे बनवलेले गोळे एका तेल लावलेल्या ताटात ठेवावे, म्हणजे चिकटून बसणार नाही.
११. आता एक सपाट पॅन घ्यावे आणि एक सराटा. {म्हणजे काय ते सौ. ना विचारले तर १० सेकंदात मिळेल}. प्रत्येकाच्या घरी कबाब असलं तरी कबाब पॅन असेलच असं नाही, तरी शक्यतो सपाट पॅन बघावे. त्यात एक छोटा चमचा तेल टाकावे आणि त्याला गॅसवर मंद आचेवर ठेवावे {म्हणजे गॅसचा नॉब सिमवर ठेवावा}. तेल पॅनमध्ये फिरवावे, त्यासाठी चमचा फिरवू नये, पॅन उचलून फिरवावे. मग त्यात हे गोळे सोडावे आणि शिजू द्यावे. अधून मधून होमात जसे (थोडेसे) तुप टाकतात तसे तेल टाकायला हरकत नाही. थोड्या थोड्या वेळाने हे चपटे गोळे (म्हणजे कबाब) सराट्याला तेलात बुडवून (म्हनजे फक्त टोकाला) पलटवावे, म्हणजे चिकटणार नाही.

१२. असे करून ४-६ कबाब एकावेळी तयार होतील. मग ते सौ. ला किंवा मैत्रीणीला खायला द्यावे आणि मग भरपुर शिव्या खायची तयारी ठेवावी. अर्थातच तुम्हाला चांगली कॉमेंट मिळेल. {आयतं खायला प्रत्येकालाच आवडतं अन पहिल्यांदाच केलं असेल तर पुन्हा मिळावं म्हणून स्तुतीतर होईलच. }

शेवटी, रॉयल्टी म्हणून या पाककृतीवर धन्यवाद टाकावा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे पाककृती...
पण काही सूचना.. गॉगल लावून कांद्यापासून संरक्षण मिळत नाही. त्यासाठी वेगळे उपाय असतात.
आणि बटाटे बुडतील एवढे पाणी कूकरमधे घालायची गरज नसते. १ कप पाणी पुरते. आणि बटाटे ५/७ मिनिटात
उकडतात. तूकडे केलेले असतील तर, आणखी कमी वेळ लागेल.

हुश्श... पुरुषांसाठी लिहायचे म्हणजे सगळे बेसिक लिहावे लागते. Happy

दिनेशदा -धन्यवाद... सध्या शिकतोय. तुमची प्रतिक्रिया म्हणजे माझ्यासाथी खूप मोठी गोष्ट आहे. खरच खूप धन्यवाद.

डोक्यात बटाटे असल्याने बटाटे शिजायला किती वेळ लागतो ते विसरलो लिहायला Happy

सोरी हा पुरुषबाफावर अक्रमण केल्याबोद्दल्.:फिदी:

दिनेशजी आम्ही बटाटे पाणी न घालता ( म्हणजे ते पाण्यात न बुडवता ) कुकरमध्ये वाफवतो. नुसतेच धुवुन आणी चार तुकडे करुन कुकरच्या भांड्यात ठेवले म्हणजे बास! म्हणजे ते चिकट किंवा पाणचट पण होत नाहीत.:स्मित:

बाय द वे डॉक्टरसाहेब टिप्स छान आहेत्.:स्मित:

हेअर ड्रायरची आयडिया भारी. तसेच पापड/पोळी भाजण्यासाठी किंवा कबाबच भाजण्यासाठी ... इस्त्री वापरली तर? Happy

इतका बारीक सारीक विचार करून आणि इतके चांगले लिहीले आहे की (पुरुषांसाठी ठीक आहे; पण) पुरुषांनी लिहीलेले न वाटता, कर्त्या-सवरत्या, जाणत्या स्त्रीने लिहील्यासारखे वाटते आहे.

अजून येऊद्या...:)

(स्केल शोधत बसू नये, बोटाच्या एका पेराइतके)
(चमच्याने, तो गरम असतो, बटाटा- चमचा नव्हे)
गरम मसाला ( हे नाव आहे, मसाला गरम करायची गरज नाही), >>> व्वा मस्त मजा आली वाचताना

केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावे आणि त्याला हातानेच हलकेच दाबून चपटे करावे. शक्यतो गोल (म्हणजे वर्तुळाकार) आकार यावा असा प्रयत्न करावा. {होळीच्या आधी गावाकडे बनवलेल्या शेणाच्या छोट्या गोवऱ्यांची आठवण झाली का? तोच आकार

म्हणजे श्रावणीच्या दिवशी गोमया ऐवजी हे कबाब खावेत! तेव्हढेच पुण्य लागेल.

शिवाय श्रावणी नंतर पार्टी असेल तर ड्रिंक्स बरोबर खायलाहि होतील. कमी पडले तर दारू जरा जास्त पाजावी नि मग खर्‍या शेणाचे कबाबहि चालतील.

Light 1

कबाब करुन झाल्यावर कांद्याची, बटाट्याची, लसणीची सालं, पालकाची देठं हे सगळं उचलून कचर्‍यात टाकावं. मसाले सांडले असतील तर ते पुसून ओटा स्वच्छ करावा. भांडी शक्य असल्यास हातासरशी घासूनच टाकावीत किंवा कबाब खाऊन ताजंतवानं झाल्यावर घासावीत. बायको/मैत्रीण हे सगळं करतील म्हणून गृहित धरु नये Wink

सगळे कंस आवडले.
कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या धुतल्या नाहीत. लसणालाही कांद्यासारखं साल असतं. ते काढावं लागेल. आलं धुऊन तासून घ्यावं लागेल. कांदाही सालं काढून चार तुकडे करून धुऊन घ्यावा ही मला मिळालेली शिकवण आहे.

मिक्सर आणि फुड प्रोसेसर कोणता हे नुसतं गुगल इमेजवरून पाहून भागणार नाही. मिक्सरच्या जारपैकी ओल्या वाटणाचा, कोरड्या दळणाचा कोणता, फुड प्रोसेसरची कोणती पाती वापरायची, ती कुठे असतात? ती बसवताना, चिरलेला पालक काढून घेताना कोणते संरक्षकसाधन वापरावे हे ही जोडा.

कबाब करुन झाल्यावर कांद्याची, बटाट्याची, लसणीची सालं, पालकाची देठं हे सगळं उचलून कचर्‍यात टाकावं. मसाले सांडले असतील तर ते पुसून ओटा स्वच्छ करावा. भांडी शक्य असल्यास हातासरशी घासूनच टाकावीत किंवा कबाब खाऊन ताजंतवानं झाल्यावर घासावीत. बायको/मैत्रीण हे सगळं करतील म्हणून गृहित धरु नये >>>>>>>> घ्या...... महिला वर्ग बोलला..... Biggrin
.
.
नवरा इतक्या मेहनतीने काही नविन पाककृती शिकुन तुम्हाला खायला घालतोय त्याचे कौतुक राहिले बाजुला .. Wink

गॅस सिलेंडर चालु करा..नॉब वर करायचा... मुख्य म्हणजे सिलेंडर कुठे असतो ते आधी शोधावे...आजकाल मॉड्युलर किचन मधे सगळे कप्पे समान दिसतात...

हे महत्वाचे राहिले ओ.........

लिखाण खमंग , खुसखुशीत आहे ! आवडलं.
[ कबाब खायला नाही तरी पहायला जरी मिळाले असते तर ... !!]
<< हा धागा फक्त पुरुषच नव्हे तर काही महिलांसाठीही उपयोगी आहे.>> पण बर्‍याच महिलांसाठीं आपल्यापुढें काय वाढून ठेवलं जाऊं शकतं याची ही धोक्याची सूचनाही आहे ! -
Aaj -teevee_0.JPG

:))

शीर्षकात "विवाहित पुरुषांकरिता" असा बदल करा<<< हो नाहीतर साहीत्यामधल्या बरयाचश्या गोष्टी मीळ्णारच नाहीत स्वयंपाकघरात. Happy

Pages