छोले

Submitted by योकु on 16 June, 2013 - 02:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२५० ग्रॅम भिजवलेले काबुली चणे
१ मोठा + १ लहान कांदा, बारीक चिरून
२ मध्यम टोमॅटो, बारीक चिरून
थोडं आलं, किसून वा बारीक चिरून
४/५ लसूण पाकळ्या, ठेचून वा बा. चि.
२ तिखट हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या
१०/१२ कडीपत्त्याची पानं
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
१ ते १.५ मोठा चमचा (टे.स्पू) एवरेस्ट छोले मसाला
०.५ चमचा लाल तिखट (चवीप्रमाणे कमी जास्त, कारण छोले मसाल्यात असतंच)
०.५ चमचा हळद
मीठ
तेल ३ ते ४ टे. स्पू.

क्रमवार पाककृती: 

१. छोले धूवून कुकरला लावावेत, मऊ शिजवावेत. पुरेसं पाणी घालावं. नंतर हेच पाणी ग्रेवी ला वापरायचं आहे. शिजतांना ८-१० काळी मीरी, १ ते २ दालचिनीचे तुकडे, दोन चिमूट जीरं ही घालावं...
२. भाज्यांची चिराचिरी कुणाकडून करून घेता आली तर उत्तम!
३. आता तेल तापत टाकावं, त्यात क्रमानं, लसूण, आलं, कढीपत्ता, अर्धी कोथिंबीर, कांदा घालावा. आता न कंटाळता परतायला सुरवात करावी... कांदा जरा झाला की टोमॅटो घालावा... चांगलं परताव, न कंटाळता! टोमॅटो जरा झाला की डावेच्या मागच्या बाजूने मिश्रण जरा मॅश करावं...
४. तेल सुटायला लागलं की, हळद, लाल तिखट, छोले मसाला घालावा... परतावं. खूप कोरडं वाटत असेल तर छोल्यांच पाणी घालावं
५. आता डावेने १-१ डाव छोले या मिश्रणात घालावे. हवं तसं छोले शिजलेलं पाणी घालावं. हवी तशी ग्रेवी पातळ करावी पण खूप नकोच. मीठ घालावं. नंतर झाकण घालून मंद आचेवर ५ ते १० मिनिटं ठेवावं.
६. कोथिंबीर घालून डीश पूर्ण करावी.
७. हव असेल तर, २/३ उकड्लेल्या बटाट्यांच्या फोडिंना जरा तेलात छोले मसाल्यांच्या फोडणित परतून वरून घालावं... चवी करता...
८. चपाती, भाकरी, राईस बरोबर गरम गरम खावं!
अगदी मस्त लागतात हे छोले वाफाळत्या भाताबरोबर Happy

वाढणी/प्रमाण: 
लागेल तसं
अधिक टिपा: 

छोले शिजवल्यावर, दालचिनी काढून टाकावी. मिरे राहिलेत तर चालू शकतील पण तिखटपणा नको असेल तर काढून टाकावेत.

माहितीचा स्रोत: 
नक्की माहीत नाही पण जसं सुचेल तसं केलंय...
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लज्जतदार आहे छोले पा़कॄ योगेश. मला वाचतानाच मज्जा आली. मधुन मधुन छान विनोदाची फोडणी टाकली आहे. प्र.चि. चिटकवले असते तर खाल्यासारखे वाटले असते. पोट नाही तरी मन तृप्त होते प्र.चिने.