मुलगा वयात येताना

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

fathersday1.jpg

'राहुल वयात येतोय' हे लक्षात आल्यावर राहुलचे आई-बाबा काय करतात? त्याची मानसीताई जशी त्यावेळी जरा बावरली होती तश्या राहुललापण काही शंका, प्रश्न असतील का असा विचार एका मुलाचे पालक म्हणून त्याचे आई-बाबा करतात का ?

आपल्या सगळ्यात जास्त जवळच्या, हक्काच्या माणसांना 'मला आजकाल असं का होतंय?' हे विचारायचा मोकळेपणा, विश्वास आपल्या किशोरवयीन मुलाच्या मनात निर्माण करणं ही प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे या वयात मुलांची एकूण विचारप्रक्रिया विकसित होत असते, ठाम मतं तयार होत असतात अन दुसरीकडे हळूहळू होणारे शारीरिक बदल, घडामोडी गोंधळात टाकत असतात. या अडनिड्या वयात असलेल्या मुलांना आपल्या शरीरात घडणार्‍या बदलांबाबत थोडीफार माहिती असली तरी या बदलांना, त्याबद्दलच्या उत्सुकतेला कसं सामोरं जावं याबाबत बर्‍याचदा खात्री नसते. या काळात काय काळजी घ्यावी, सावधगिरी बाळगावी, मित्रमैत्रिणींमध्ये निर्माण होणार्‍या आकर्षणाला नक्की कसं हाताळावं या सगळ्या नाजूक गोष्टींबद्दल सकारात्मकरीत्या आपल्याला पालकांच्या भूमिकेतून समजून घेता आलं तर नंतर पश्चात्ताप करायला लागण्याची शक्यता कमीच.

योग्य वेळी योग्य ते प्रश्न विचारणं, चर्चा करणं, मन मोकळं करणं याकरता जे अवकाश लागतं ते एक पालक म्हणून आपण कसं निर्माण करू शकतो? कसोटीच्या क्षणी मुलांना आपला आधार वाटावा म्हणून मुलांना मानसिक अन नैतिक बळ देणारा सुसंवाद कसा साधू शकतो? प्रत्येक कुटुंबासाठी ही वाटचाल वेगवेगळी असणार. काहींना मुलासोबत प्रत्यक्ष बसून गप्पांमधून समजावणं पटेल तर काही ठिकाणी माहितीपट, पुस्तकांचा आधार घेतला जाईल. कदाचित एखादी विश्वासातली त्रयस्थ व्यक्ती अथवा कौंसेलरची मदतही योग्य ठरेल. पद्धत कोणतीही असो, शेवटी मुलाच्या मनात नैसर्गिक प्रक्रिया सुस्पष्ट झाली तर शरीरसंबंधांबद्दलचे चुकीचे समज, दिवास्वप्नांचे इमले, स्वतःचे 'पौरुषत्व' सिद्ध करण्याची धडपड, मित्रमैत्रिणींमध्ये स्वीकारले जाण्याविषयीची चिंता, 'पियर प्रेशर' ह्या भरकटवणार्‍या गोष्टी आपोआपच कमी होतील.

मुलाचा अभ्यास, आवडी, छंद हे जसे आपण इतके दिवस जोपासले, मिरवले तसेच मुलाचे वयात येणे समंजसपणे, आश्वासकपणे हाताळले तर त्याच्या आयुष्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा त्याच्याकरता नक्की सुलभ होईल. त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची योग्य जपणूक होईल. म्हणूनच आज पितृदिनाच्या निमित्ताने आपण या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहितीची देवाण-घेवाण करणार आहोत. मायबोलीकरांना स्वतःच्या बाबतीत आलेले किंवा मुलांना, नात्यातल्या लहानग्यांना वाढवताना, मित्रपरिवारातील अडनिड्या वयाच्या मुलांना मार्ग दाखवताना आलेले अनुभव या धाग्यावर लिहिणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टींबाबत आपण चर्चा सुद्धा करू शकतो. तेव्हा चला एका महत्त्वाच्या विषयावरील उपक्रमात भाग घेऊन आपले योगदान देऊयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस साहेब
आपला जबाब आवडला. काही गोष्टी मी येथे नमूद करू इच्छितो.
१) साधारण १० ते ११ वर्षा च्या सुमारास आपण आपल्या मुलास लैंगिक शिक्षण देण्यासाठी आपल्या फामिली डॉक्टर कडे घेऊन जावे. कारण आजही बहुसंख्य घरात मुलगा आणी बाप यात एवढा मोकळा संवाद नाही आणी मग त्यात चोरटे पण येण्यापेक्षा तिसर्या पण ओळखीतल्या तज्ञ माणसा कडे जाऊन गोष्टी स्पष्ट झाल्या तर त्या जास्त चांगल्या. शिवाय त्यानंतर काही अनुत्तरीत प्रश्न असतील तर ते बाप मुलाला सांगू शकेल किंवा परत आपल्या घरच्या डॉक्टर कडे नेऊ शकेल. वयाचा नियम काटेकोर नसावा. मुलाची उंची एकदम वाढू लागली किंवा आवाज फुटू लागला कि हि एक भेट घरच्या डॉक्टरला देता येईल. त्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरला आपली काय अपेक्षा आहे ते स्पष्ट पणे सांगितले तर आपले काम जास्त चागले होईल
२) मुलाला स्वतःच्या शरीराची स्वच्छता कशी ठेवायची हे सुद्धा व्यवस्थित सांगावे. काखेत आणी जांघेत केस येतात तेथे रोज साबण लावून धुणे आवश्यक आहे आणी शिवाय एखादी नायसील किंवा सिन्थोल सारखी पावडर लावून तो भाग कोरडा ठेवणे जेणेकरून त्याच्या घामाचा वास येणार नाही
३) पायात मोजे घातल्यामुळे येणारा वास हा अशाच तर्हेने टाळता येईल. त्याबरोबरच बुटात सुद्धा अशी जंतुनाशक पावडर रात्री टाकून ठेवली तर हा त्रास वाचेल
४) चेहेरा साबणाने दिवसात ५ -६ वेळा धुवावा जेणेकरून तो तेलकट होणार नाही आणी नंतर येणाऱ्या तारुण्य पितीकांचा त्रास हा बराच कमी होईल. हि सवय याच वयात लावली तर पुढे त्रास होत नाही
५) मुलाला जवळ घेऊन इतर मुलींबद्दल वाटणारे आकर्षण नैसर्गिक आहे पण ते विकृत होणार नाही अशा तर्हेने समुपदेशन करणे आवश्यक आहे. उगाच तुझी "गर्ल फ्रेंड" वगैरे वरून चिडव ण्य़ापेक्षा त्याच्या भावना समजून घेणे जास्त महत्वाचे आहे आणी या वेळेत "गर्ल फ्रेंड" पेक्षा आपल्या करियर ला जास्त महत्व देणे आवश्यक आहे हे सहज जाता जाता सांगितल्या सारखे सांगावे
६) इतर मुलींच्या मानसिक/ शारीरिक स्थिती बद्दल मुलाचे समुपदेशन केल्यास मुलींबद्दल असणारे नैसर्गिक आकर्षण विकृत होणार नाही. घरात त्याची बहिण ( सक्खी/चुलत वगैरे) असेल तर तिचे उदाहरण घेऊन वरील गोष्टी सांगता येतील.
क्रमशः

ही कविता मिळून सार्‍याजणीच्या एका अंकात आली होती बहुतेक.

>> हो. पण थोपुवर सापडली मला.. खुप जणांनी शेअर केली होती..

ह्या बाफच्या विषयाला ती अगदीच रिलिव्हंट आहे नाही?

लिंबुटिंबु, इब्लिस, सुबोध - आवडले.

मझ्याबद्दल बोलायचे झाले तर
- मी आठवीमधे असताना आम्ही नवीन घरामधे रहायला गेलो. नविन घरामधे प्रथमच न्हाणीघर वेगळे म्हणजे, बन्द करता येणारा दरवाजा असलेले होते. बाबांनी मला त्यावेळी स्पष्ट शब्दामधे सांगितले की आता संपूर्ण शरीर (लघवी, शौच अवयवे) स्वच्छ ठेवायचे पाण्याने/साबणाने धुवायचे. त्याचा पूर्ण अर्थ उशिरा पण योग्यवेळी कळला...
- अगदी पूर्ण लैंगिक ज्ञान हे खूपच उशिरा आले. घरी आणि मित्रांमधेही नीट माहिती मिळाली नाही. पण पुस्तके वाचण्याची आवड असल्याने शास्त्रीय पुस्तके वाचल्याने या विषयीचे ज्ञान आले. ११-१२ मधेच असताना मला शाळेच्या मित्रान्च्या स्नेह-संएलनामधे "AIDS" विषयीची माहिती देणे आवश्यक वाटले होते; आणि ते न करता आल्यामुळे जी चिड्चिड झाली ती दैनंदिनीमधे लिहून ठेवली आहे.
- आम्ही सर्व जण घरी एकाच खोलीमधे झोपायचो.

काही मुख्य मुद्दे

१ - लैंगिक ज्ञान मिळाल्यामुळे वर्तणूक सुधारेल अशी अशा बाळगणे मला तरी भाबडेपणाचे वाटते. हे म्हणजे कायदा शिकवला तर गुन्हे कमी होतील असे म्हणण्यासारखे आहे. वर्तणूक सुधारण्यासाठी केवळ ज्ञान नाही तर संस्कारही हवे. (लिंबुटिंबु यांचेच मत वेगळ्या शब्दात मांडले आहे) मुलाचा जन्म कसा होतो हे माहीत असण्यावर वर्तणूक ठरणार नाही. लैंगिक ज्ञान नसल्यामुळे अत्याचार वाढतात असे संशोधन सांगत असेल तर मला कृपया अधिक माहिती द्या. पण प्राणी-जगतातही अत्याचार आढळतात.

२ - <<तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे.>> ह्यासाठी असहमत कारण या वाक्यामधे मुलांवर अन्याय आहे. यामधे असे गृहित आहे की मुलींमुळे मुलांचे नुकसान होत नाही. मुलींचेही नीट वयात येणे यासाठी महत्वाचे आहे. मुलीसुद्धा ह्या वयामधेसुद्धा मुलांना "manage/handle" करतात आणि त्याचे नुकसान वेगळ्या प्रकारे करतात. - मुलांना लैंगिक ज्ञान देण्याचा मुख्य उद्देश असा की त्यामुळे (काही) मुलांचेच जे नुकसान होते ते टाळता येईल.

३- वडीलांनीच (वा आईनेच) मुलांना शिकवावे असा अट्ट्हास धरणे योग्य नाही. माझे मत असे आहे की त्याएवजी त्रयस्थ व्यक्तीने ज्ञान दिले तर अधिक चांगले. प्रश्न मात्र विचारल्यास वडीलांनी उत्तर द्यावे अथवा उत्तर मिळण्याची तरतूद करावी.

४ - वयात येताना आईवडीलांना खूप काही करता येउ शकते. लैंगिक ज्ञान देणे ही त्यातील एक गोष्ट आहे.

५ - एकाच खोलीमधे झोपण्यामुळे मुलांना आणि पालकांना "privacy" मिळत नाही ह्या मताच्या टोकाच्या अर्थाशी "interpretation" शी मी सहमत नाही.

चांगला विषय आहे. धागा वाचते आहे.
एक सुचवावसं वाटतं आहे, ते असं की इथे बरेच जणांनी या विषयावर 'शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके' मुलांना दिली किंवा आम्ही वाचली असं लिहिलं आहे. तर आपण अशी कोणती पुस्तके वाचली किंवा पाल्याला वाचायला दिली, किंवा आपल्याला या विषयावरची कोणती पुस्तकं आवडली, त्याची नावं आणि (लक्षात असेल तर) लेखक आणि प्रकाशनाची नावही लिहिलीत तर ही पुस्तके नव पालकांना माहिती होतील आणि उपयोगी पडतील.

चेरी, मला मुलासाठी उपयोगी पडलेले पुस्तक - Asking about sex and growing up.
तो तेव्हा १०-११ वर्षांचा होता. प्रीटीन्स साठी छान आहे. या वयातील मुलांमुलींना पडणार्‍या बहुतेक प्रश्नांची सोप्या भाषेत टु द पॉइंट उत्तरे दिली आहेत. दुसरे म्हणजे हस्तमैथुन, समलैगिकता हे विषयही चांगल्या पद्धतीने हाताळलेत.

१०-११ वर्षाच्या पुतण्यांकडे (पुतण्या आणि पुतणी) जस्ट फॉर बॉइज आणि जस्ट फोर गर्ल्स अशी दोन पुस्तकं सुरवातीला दिली होती. त्यांनी दोघांनी आपापली पुस्तकं वाचून नंतर एकमेकांना वाचायला दिली होती.

चेरी, पुस्तकांची नावे मी लिहिली आहेतच.
निरामय कामजीवन च्या हिंदी अनुवादाची झटकन सापडलेली ही गूगलवरील कॉपी.
मी डायरेक्ट (इतर, प्रताधिकार मुक्त) पुस्तकं पण देऊ शकतो Happy विपु करा.
*
डॉ. सुबोध खरे, हे संरक्षण दलातून (आर्मी मेडीकल कोर) निवृत्त झालेले वैद्यकिय अधिकारी आहेत. इतर एका सणसणीत संस्थळावर त्यांचे लेखन लोकप्रिय असते. मायबोलीवर सुस्वागतम.
*
सुसुकु,
>>१ - लैंगिक ज्ञान मिळाल्यामुळे वर्तणूक सुधारेल अशी अशा बाळगणे मला तरी भाबडेपणाचे वाटते. हे म्हणजे कायदा शिकवला तर गुन्हे कमी होतील असे म्हणण्यासारखे आहे<<
इग्नरन्स ऑफ लॉ इज नॉट अ‍ॅन एक्स्क्यूज.
कायदा ठाऊक असला, तर "गुन्हे" नक्कीच कमी होतात. लैंगिक ज्ञान म्हणजे केवळ संभोगक्रियेचे वर्णन असे नव्हे, हे ध्यानी घेतले पाहिजे. अधिक नंतर..

ही कविता मिळून सार्‍याजणीच्या एका अंकात आली होती बहुतेक.

>> हो. पण थोपुवर सापडली मला.. खुप जणांनी शेअर केली होती.. >>

ती कविता काढून मूळ दुवा दिला आहे.

नमस्कार, धागा खूपच छान आहे.
माझा लहान मुलगा साडेसहा वर्षांचा आहे. तो दररोज पालथे झोपून त्याच्या ***शी (कसे लिहावे? काही शब्द लिहिण्याचेहि धाडस होत नाही. ) चाळा करीत असतो. त्याला दटावले कि सरळ झोपतो आणि कुणी नसले कि पुन्हा चालू. कधी कधी तर त्याच्या *** चा आकार वाढलेला मी पहिला आहे. एवढ्या लहान वयात हे कसे शक्य आहे? मोठा मुलगा ८ वर्षांचा आहे पण तो असे काही करीत नाही. त्याला बर्याच गोष्टी समजतात. त्याने लहान असतानाही असे केले नाही. मग याच्याच बाबतीत असे का ? हि बाब नॉर्मल असते असे मी अनेक ठिकाणी वाचले आहे. पण त्याला हे बंद करण्यासाठी कसे समजवावे? बर दिवसा खेळायला पाठवू शकतो पण रात्रीचे काय? रात्री झोपेत तो सारखे तसेच करीत असतो. जाणकारांनी यावर काही मार्ग सांगावा.

हि बाब नॉर्मल असते असे मी अनेक ठिकाणी वाचले आहे.>>>>>>>>> माझ्या ओळखीतल्या एका मुलाला पण अशीच सवय होती. त्याचे आई-वडील सतत सांगत असायचे. जाणकार योग्य ते सांगतीलच.

http://www.babycenter.com/400_when-do-you-know-to-start-worring-about-yo...

अशा एखाद्या साइटवर शोध घ्या. फार बाउ न करता हळुहळु त्याला समजावून सांगता येइल. डॉक्टरला भेटून डॉ करवे योग्य माहिती देता येइल.

हिम्सकूल, स्वाती२, इब्लिस,
धन्यवाद.

यौवन ते विवाह - विठ्ठल प्रभू हे चांगलं पुस्तक आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी दोहोंनी वाचण्यासारखं आहे.
आणि निरामय कामजीवन - विठ्ठल प्रभू हेही वाचल्यासारखं वाटतं आहे.
'Asking about sex and growing up' हे अजून वाचलं नाही. वाचायला हवं.

अजून एक पुस्तकं 'कळी उमलताना..' का असचं काहितरी नावं होतं. आता नीट आठवतं नाही. ते मुलींसाठी खूप चांगल, माहितीपूर्ण होतं. नेटवर शोधल्यास या नावाची २-३ पुस्तकं येत आहेतं त्यातलं कुठल्याचं मुखपृष्ठ पाहिल्याचं आठवतं नाही. कोणाला मुलींसाठीच्या पुस्तकांचीही नावं माहिती असल्यास तीही इथे द्यावी.

ही काही पुस्तके :

अथातो कामजिज्ञासा : लेखक डॉ. राजन भोसले.

हे सारं मला माहीत हवं! : लेखक डॉ अनंत साठे, डॉ. शांता साठे

लैंगिक शिक्षण : लेखक डॉ जगन्नाथ दिक्षित, डॉ अंजली दिक्षित

मुलगा वयात येताना या विषयावर इब्लिसांनी काय अपेक्षित आहे हे पहिल्या पोस्टमधे लिहीलंय. हा धागा मुलगा वयात येताना लोकांच्या मुलींना काय त्रास होतो याची जाणीव व्हावी या दृष्टीने मुलाचं शिक्षण व्हावं या दिशेला झुकत चालला आहे का ? तसंच निव्वळ लैंगिक शिक्षण हाच निकष वयात येताना लावायचाय का ? इतर अनेक गोष्टी आहेत ज्यांची अपेक्षा करतोय. इतरांची काळजी घेणं, संभाषणपटुत्व, जबाबदा-या अंगावर घेण्याची सवय बाणवणं, समस्येला भिडण्यासाठी कणखरपणा कसा येईल हे पाहणं, प्रतिकूल परिस्थितीला तोंड कसं द्यावं हे कसं शिकवावं इ. इ. इ. चा विचार या बाफवर होणार आहे का ? लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत सुसुकु यांची पोस्ट विचारात पाडणारी आहे

माझा मुलगा पाच वर्षाचाच आहे, घाई नाही. पण मुलाचा विकास होण्यासाठी आत्तापासून काय करता येईल याचीही उत्सुकता आहे. अशा परिसंवादात नेहमीच्याच यशस्वी लेखकांबरोबर जे कधीही चर्चेत सहभागी होत नाहीत अशा सदस्यांच्या / रोमातल्या वाचकांच्या पोस्टस वाचायला आवडतील. अशा वाचकांना लिहीते होण्याचं आवाहन करावंसं वाटतंय... अगदी मनापासून. आपले अस्सल अनुभव अगदी बिनधास्त लिहा मंडळी. त्यावर कोण काय प्रतिक्रिया देईल याचा विचार न करता लिहा..

मुलगा वयात येताना लोकांच्या मुलींना काय त्रास होतो याची जाणीव व्हावी या दृष्टीने मुलाचं शिक्षण व्हावं या दिशेला झुकत चालला आहे का >>> असं तुम्हाला का वाटलं ? एक पोस्ट तशी आली आणि त्यावर काही अनुमोदनं. या व्यतिरिक्त सगळी चर्चा ठराविक वयात होणार्‍या मानसिक आणि शारीरिक बदलांबद्दलच आहे. तोच या बाफचा विषय आहे.

योग्य वयात योग्य जडणघडण झाली नाही तर केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर सगळ्या समाजालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे चर्चेत ते वळण अपरिहार्य आहेच. पण तुम्ही तुम्हाला जो महत्त्वाचा आस्पेक्ट वाटत असेल तो मांडू शकताच की. Happy

पुर्वी आजी अगदी वयाने वाढलेल्या नातवांना पण अंघोळ घालत असे. त्यावेळच्या आजीच्या काही सूचना, संध्या गोखले यांच्या कथेत वाचल्या.

पाटाखाली गोम नाही ना ते बघावे, पाण्यात विसवण घालावे..... पुरुषोत्तमाची काळजी घ्यावी.
आडून आडून अशा सूचना येतच असत. आईला / बाबांना पण ही जबाबदारी घेता येईल आता.

पुर्वी शाळेतूनही वार्षिक तपासणी असे, त्यावेळी डॉक्टर सुचना देत असत. सध्या असतात का माहित नाही. असाव्यात.

स्वाती आंबोळेजी

जडणघडण हा संस्कारांचा भाग आहे आणि हा बाफ लैंगिक शिक्षणावर येऊन स्थिरावला आहे असं मला वाटलं. चुभूदेघे. लैंगिक शिक्षणाचं महत्व हा विषय इतर अनेक बाफवर हाताळला गेलाय ज्यावर अनेकांची सहमती आहेच कि... इतर गोष्टी ज्या महत्वाच्या वाटतात त्या येतील का इतकीच पृच्छा केलीय.

मुलगा वयात येताना लोकांच्या मुलींना काय त्रास होतो याची जाणीव व्हावी या दृष्टीने मुलाचं शिक्षण व्हावं या दिशेला झुकत चालला आहे का >> hmm.. mudda ha aahe ki jevha lokanchya mulina traas hoto tevha mulga tyatun sutvang rahil hyachi shashwati naste. Tyachi agadi "abru" nahi geli tari tyachi pratishtha, tyacha vel, tyachi energy, tyachya bhavna etc etc vaya jatil ase prasang ghadu shaktat. Tyamule he donhi ekmekat guntalelya goshti aahet. Swatachya development karavi, lokachya mulina tras devu naye he tya vayat nahi kalat kahi mulana. Aai-babani ekda sangun tar baghave.

आजच एक बातमी वाचनात आली. अभ्यासात उत्तम असलेल्या १६ वयाच्या मुलाने त्याचा पे ट कुत्रा आजारी पडून गेल्या चे दु:ख सहन न होउन आत्महत्या केली. असेच काँप्ला न पिऊन उंची न वाढल्याने, किंवा पीअर प्रेशर सहन न करता आल्याने, घरातून सपोर्ट मिळू न शकल्याने मुले जीव देता त

मुद्दा असा कि मुलगे ही ह्या वयात फार संवेदन शील असतात, हार्मोन्स म्ह णा, वाढीचे चॅलेंज म्हणा काही ही पण सहन करता आले नाही तर मुलांची परिस्थिती अवघड होते. मुली बोलून, कधी रडून आपले प्रेशर कमी करतात शेअर करतात पण मुलग्याला वाट्णारी भी ती , अस्वस्थता तो बोलून दाखवेल च असे नाही. मुलग्याच्या शिक्षण, खेळ यावर आपण जसे लक्ष ठेवतो तसेच त्याच्या भावनिक अवस्थेवर ही लक्ष ठेवले पाहिजे. आपण जे प्रश्न सहज सोडवू शकतो ते ह्या वयात अगदी फारच अवघड वाट्तात,

उंची न वाढ्णे मैत्रीण नसणे, नवा मोबाईल फोन नसणे, मित्रांबरोबर ट्रिपला जायला परवानगी न मिळणे,
नव्या जीन्स, जोडे, महागाची बाईक नसणे अश्या कारणाने डिप्रेशन ट्रिगर हो ऊ शकते. त्यांना मानसिक आधार मिळाला पाहिजे.

Pages