मुलगा वयात येताना

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

fathersday1.jpg

'राहुल वयात येतोय' हे लक्षात आल्यावर राहुलचे आई-बाबा काय करतात? त्याची मानसीताई जशी त्यावेळी जरा बावरली होती तश्या राहुललापण काही शंका, प्रश्न असतील का असा विचार एका मुलाचे पालक म्हणून त्याचे आई-बाबा करतात का ?

आपल्या सगळ्यात जास्त जवळच्या, हक्काच्या माणसांना 'मला आजकाल असं का होतंय?' हे विचारायचा मोकळेपणा, विश्वास आपल्या किशोरवयीन मुलाच्या मनात निर्माण करणं ही प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे या वयात मुलांची एकूण विचारप्रक्रिया विकसित होत असते, ठाम मतं तयार होत असतात अन दुसरीकडे हळूहळू होणारे शारीरिक बदल, घडामोडी गोंधळात टाकत असतात. या अडनिड्या वयात असलेल्या मुलांना आपल्या शरीरात घडणार्‍या बदलांबाबत थोडीफार माहिती असली तरी या बदलांना, त्याबद्दलच्या उत्सुकतेला कसं सामोरं जावं याबाबत बर्‍याचदा खात्री नसते. या काळात काय काळजी घ्यावी, सावधगिरी बाळगावी, मित्रमैत्रिणींमध्ये निर्माण होणार्‍या आकर्षणाला नक्की कसं हाताळावं या सगळ्या नाजूक गोष्टींबद्दल सकारात्मकरीत्या आपल्याला पालकांच्या भूमिकेतून समजून घेता आलं तर नंतर पश्चात्ताप करायला लागण्याची शक्यता कमीच.

योग्य वेळी योग्य ते प्रश्न विचारणं, चर्चा करणं, मन मोकळं करणं याकरता जे अवकाश लागतं ते एक पालक म्हणून आपण कसं निर्माण करू शकतो? कसोटीच्या क्षणी मुलांना आपला आधार वाटावा म्हणून मुलांना मानसिक अन नैतिक बळ देणारा सुसंवाद कसा साधू शकतो? प्रत्येक कुटुंबासाठी ही वाटचाल वेगवेगळी असणार. काहींना मुलासोबत प्रत्यक्ष बसून गप्पांमधून समजावणं पटेल तर काही ठिकाणी माहितीपट, पुस्तकांचा आधार घेतला जाईल. कदाचित एखादी विश्वासातली त्रयस्थ व्यक्ती अथवा कौंसेलरची मदतही योग्य ठरेल. पद्धत कोणतीही असो, शेवटी मुलाच्या मनात नैसर्गिक प्रक्रिया सुस्पष्ट झाली तर शरीरसंबंधांबद्दलचे चुकीचे समज, दिवास्वप्नांचे इमले, स्वतःचे 'पौरुषत्व' सिद्ध करण्याची धडपड, मित्रमैत्रिणींमध्ये स्वीकारले जाण्याविषयीची चिंता, 'पियर प्रेशर' ह्या भरकटवणार्‍या गोष्टी आपोआपच कमी होतील.

मुलाचा अभ्यास, आवडी, छंद हे जसे आपण इतके दिवस जोपासले, मिरवले तसेच मुलाचे वयात येणे समंजसपणे, आश्वासकपणे हाताळले तर त्याच्या आयुष्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा त्याच्याकरता नक्की सुलभ होईल. त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची योग्य जपणूक होईल. म्हणूनच आज पितृदिनाच्या निमित्ताने आपण या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहितीची देवाण-घेवाण करणार आहोत. मायबोलीकरांना स्वतःच्या बाबतीत आलेले किंवा मुलांना, नात्यातल्या लहानग्यांना वाढवताना, मित्रपरिवारातील अडनिड्या वयाच्या मुलांना मार्ग दाखवताना आलेले अनुभव या धाग्यावर लिहिणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टींबाबत आपण चर्चा सुद्धा करू शकतो. तेव्हा चला एका महत्त्वाच्या विषयावरील उपक्रमात भाग घेऊन आपले योगदान देऊयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम व समयोचित विषय.
चर्चा पुढे जाईल तसे कदाचित अधिक लिहीन.

माझा स्वत:चा अनुभव म्हणजे लहानपणी घरात कोणतेही प्रश्न विचारायला मुभा होती, व सेन्सिबल उत्तरे देखिल मिळत.* त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे वाचनाची गोडी लागेल असे वातावरण घरात असल्याने वाचन भरपूर व चौफेर झालेच, तसेच पुस्तकात उत्तरे शोधता येतात ही जाणीव व ती कशी शोधायची हे देखिल शिकवले गेले होते. योग्य वयात त्या त्या प्रकारची पुस्तके हाती पडली. ती हाती यावीत अशी व्यवस्था केली गेली असेल हे उघड आहे.

८-९वीत असताना "कशी मी? अशी मी" व त्याच्याच आगे मागे "निरामय कामजीवन" अशी पुस्तके, इझिली अ‍ॅक्सेसिबल अशी बुककेसमधे होती, व ती उघडून पहाण्याबद्दल कुणीही डोळे वटारले नाहीत. त्या नंतरच्या ११-१२वीत शाळेचाच अभ्यास पुरून उरला, अन मग नंतर तर सरळ वैद्यकीय शिक्षण घेतले, त्यामुळे संपूर्ण शास्त्रीय ज्ञान आपोआपच पदरी पडले.

पण १२वी करून एम्बीबीएसला प्रवेश घेतलेल्या मुलांनी 'रॅगिंग' मधे 'मूल आईच्या पोटातून बाहेर कसे येते?' या प्रश्नाला 'बेंबीतून बाहेर येते' असे उत्तर दिले होते.** यावरून एकंदरच त्या काळी माझ्या वयाच्या मुलांना या संबंधी असलेले अज्ञान अधोरेखित होते, असे मला वाटते. आजकाल ११-१२वीला मानवी शरीरशास्त्र, शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना जरा जास्त खोलात शिकविले जाते, त्यामुळे तितके घोर अज्ञान नसले तरी कला व वाणिज्य शाखेच्या व शास्त्रातही बायोलॉजी सोडून दिलेल्या मोठ्या परसेंटेजचे काय? हा प्रश्न आहेच.

मुलांच्या बाबतीत मी काय करेन याबद्दल व्यक्तिगत अनुभवातून बोलणे शक्य नाही, कारण माबोवर पूर्वी सांगितल्याप्रमाणे मी (ठरवून) एकुलत्या कन्येचा पिता आहे. माझ्या वैद्यकीय ज्ञान व अनुभवातून नक्कीच सांगू शकेन, पण ते नंतर पुन्हा..

-----
अवांतर:
*
सेन्सिबल उत्तरे : येथे 'वयात येताना' ही चर्चा लैंगिकतेच्या रोखाने मांडली आहे, तरीही, प्रतिसाद लिहिताना, त्या कालखंडातल्या आठवणी आल्या, त्यात घरातील चर्चांतून, वातावरणातून, एकंदरीतच घरातल्यांच्या वागण्यातून, अ‍ॅडल्ट होण्याच्या प्रक्रियेत हातभार लावणार्‍या अनेक बाबी आठवल्या. घर कसे चालते. पैसे येतात किती, कसे, त्यांचा विनिमय कसा होतो. बजेट कसे करून सांभाळले जाते, इथपासून मोठे होण्यात स्वातंत्र्ये कोणती मिळतात त्यासोबत जबाबदारी कोणती येते, व ती का स्वीकारावी लागते? इ. अनेक बाबी निकोपपणे समोर आल्या, व सहज आत्मसात झाल्या असे मागे वळून पहाताना जाणवले. विषयाशी अवांतर होईल, पण वयात येताना हे देखिल शिकले पाहिजे असे वाटते.

**
हे बेंबीवाले उत्तर सांगणारे पुढे सिझेरिअन सेक्शन पाहिल्यानंतर आपले उत्तर कसे बरोबर होते, हे हिरिरीने पटवून देण्याचा प्रयत्न करीत Wink

धागा प्रस्तावक्/संयोजकांस विनंती, प्रतिसादातील अवांतर नको असल्यास संपादित करणे, वा मला सांगा, मी उडवतो.

उत्तम व समयोचित विषय.<<<<+११११
शिवाय माझ्यासारख्या लवकरच ह्या गोष्टीला सामोर जाव लागणार ह्या स्टेजमध्ये असणार्यांसाठी अतिशय गरजेचा.

उपक्रम छान आहे.
इब्लिस तुमची पोस्ट मस्तं आहे.

इतरांचे अनुभव वाचण्यास उत्सुक.

मात्रं 'मुलगा वयात येताना' पितृ दिनाच्या निमित्ताने घेण्याचे नेमके कारण समजले नाही.
म्हणजे हे वयात येणारे मुलगे भावी पिते आहेत म्हणून पितृदिनादिवशी घेतलाय का हा विषय?

की वयात येणार्या मुलाबद्दल बाबाची(च) जबाबदारी आहे हे अधोरेखित करायचेय?

एकंदर विषय आवडला तरी पितृदिनादिवशीचा संदर्भ कळला नाही.

बाबाची(च) असे नसावे, साती.

पण भारतात तरी, (जिथे सिंगल पेरेंट्स अजूनही विरळाच आहेत -१३० कोटीं मधे-) मुलींना वयात येताना जे ज्ञान दिले जाते व द्यावेच लागते, त्यात आई, वा वयस्क स्त्रीचाच सहभाग बहुतांश वेळा असतो. या उलट मुलग्यांना कोणत्याही प्रकारचे ऑथेंटिक ज्ञान सहसा मिळत नाही. जे काय मिळते ते थोडे वयस्क असलेल्या मित्रांकडून. मोठे भाऊ देखिल यात बहुदा सहभागी नसतात, असे निरिक्षण व पुस्तके/वर्तमानपत्रे/मेडिया इ.तून मिळालेल्या माहितीतून माझे मत झालेले आहे.

यात, बाबाने सहभागी व्हावे, व काही सकारात्मक बदल किमान सुरू व्हावेत, असा उद्देश चर्चेच्या प्रस्तावकांचा असावा.

बाबाने पौगंडावस्थेत येणार्‍या/असलेल्या मुलग्यांशी सुसंवाद साधावा, तोदेखिल इतक्या जवळीकीच्या पातळीने ही अपेक्षा थोडी भाबडी असली, (मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून) तरी मुलांना लैंगिक शिक्षण मिळण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करायला हवी असे पिता म्हणून डोक्यात आले तरी पुरे, असे असावे.

इब्लिस, दोन्ही पोस्टी आवडल्या.

माझ्या वैद्यकीय ज्ञान व अनुभवातून नक्कीच सांगू शकेन >>> नक्की लिहा.

माझे सासरे फार सुजाण आणि सगज पालक म्हणता येतील. पण या विषयावर मात्र मुलांशी कधी बोलले नाहीत असे समजते. जी काही माहिती मिळाली होती ती पुस्तकं आणि मित्रा़कडूनच असे नवर्‍याने सांगितले. त्याच्यात आणि दिरात खूप अंतर आहे. दिरासाठी मोठा भाऊ म्हणजे वडिलांसमान आहे. पण भावाशी तू तरी बोललास का ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आले. माझ्या भावाशी पण बाबा कधी काही बोलले नसणार खात्री आहे. इब्लिस म्हणतात तसे घराघरांतून मुलांना लैंगिक शिक्षण मिळण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करायला हवी असे पिता म्हणून डोक्यात आले तरी पुरे.

Iblis, vadyakiya drushtikoNatun liha please!

इब्लिस, पोस्ट आवडल्या.

माझ्या नवर्‍याच्या बाबतीत तो घरातील शेंडेफळ. एकतर जनरेशन गॅप आणि वडीलांचा स्वभावही काहीसा तापट. त्यामुळे दोघांत नेहमीच एक प्रकारचे अंतर होते. या विषयावर कधीच बोलणे झाले नाही. त्याच्या मोठ्या मेव्हण्यांनी मात्र अतिशय समजुदारपणे त्याला याबाबत मार्गदर्शन केले. आमच्या घरी अतिशय मोकळे वातावरण होते. बरीचशी मंडळी वैद्यकीय व्यवसायात असल्याने अज्ञानातून, गैरसमजातून होणारे नुकसान व्यवसायाच्या निमित्ताने पहात होती. त्यामुळे मामे-मावस भावंडांना त्यांच्या आईबाबांनी योग्य वयात योग्य पुस्तके दिली.
माझा मुलगा आता मोठा झालाय. मात्र तो वयात येत असताना त्याला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी एकट्या बाबाची कधीच नव्हती. मुलगा प्रीस्कूलमधे असल्यापसून आम्ही दोघेही त्याच्याशी अतिशय मोकळेपणाने बोलायचो, त्याच्या प्रश्नांना त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्यायचो. त्यामुळे तो वयात येताना त्याच्याशी संवाद साधायला अडचण आली नाही. घरातील वातावरण मोकळे असल्याने कुठलाच विषय वर्ज नव्हता. जसे त्याला त्याच्या शरीरात होणार्‍या बदलांबद्दल समजावून सांगितले तसेच त्याच्या मैत्रीणीच्या शरीरात होणार्‍या बदलांबद्दलही समजावून सांगितले. साहाजिकच चोरटे कुतुहल वगैरे प्रकार टाळता आले. आजूबाजूला घडणार्‍या घटनांवर आमच्याशी होणारी चर्चा, शाळेतील लैगिक शिक्षण, पुस्तके आणि फॅमिली डॉकशी गप्पा यासगळ्याच गोष्टींची त्याला मोठे होताना मदत झाली. हेल्दी रिलेशनशिपबद्दल संवाद आजही सुरु आहे.

मुलांना योग्य वयात लैंगिकतेची योग्य माहिती मिळणे गरजेचं आहे. मुलगा आणि वडिल यांचे परस्परांमधले नाते एरवी जरी मोकळेपणाचे असले तरी या बाबतीत विषयाला योग्य तोंड फुटेलच असे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सुरुवात कशी आणि कोणी करावी याबाबतीत दोघेही अवघडलेल्या मनःस्थितीत असू शकतात. याचे कारण समोरच्याची (वडलांची किंवा मुलाची) प्रतिक्रिया नेमकी कशी असेल, ही भिती. इब्लिसांनी म्हटल्याप्रमाणे हल्ली विज्ञान शाखेतल्या अकरावी-बारावीच्या अभ्यासातच मानवी प्रजननसंस्थेची चांगली आणि मूलभूत माहिती समाविष्ट केलेली आहे. हे खरेच स्तुत्य आहे. पण विज्ञानशाखेकडे न वळणार्‍या मुलांचे काय? अशा मुलांमध्ये लैंगिकता आणि प्रजननाविषयी अनेक हास्यास्पद गैरसमज असतात.

वयात येणार्‍या मुलांशी संवाद साधणे पालकांना अवघड वाटत असेल तर या विषयावरची योग्य शास्त्रोक्त माहिती देण्यासाठी फॅमिली डॉक्टर हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. पालक स्वतः याबाबतीत स्वतंत्ररित्या डॉक्टरांशी बोलून सल्ला घेऊ शकतात किंवा/आणि डॉक्टरांना मुलाशी स्वतंत्र बोलण्याविषयी सुचवू शकतात. फॅमिली डॉक्टरांच्या अनेक वर्षांच्या अनौपचारीक, खेळीमेळीच्या नात्यामुळे आणि डॉक्टरांवरील विश्वासामुळे मुलांना आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी डॉक्टर हा एक सुरक्षित (सेफ) मार्ग ठरू शकतो.

आपला समाज तितकासा मोकळ्या विचारसरणीचा आहे का?
जिथे हे लैंगिक शिक्षणाचे खुळ आहे तिथल्या मुलांचे बाबा त्यांच्या आइचे ओष्ठचुंबन त्यांच्यासमोरच घेत असतात(ऐकिव माहीती, पण खरी असावी)

इतका मोकळेपणा असेल तरच व्यवस्थित लैंगिक देता येऊ शकते, फक्त रीप्रॉडक्टीव संस्थेच्या आकृत्या दाखवणे व चार दोन चोरटी वाक्ये मुलांसमोर फेकून 'चला भोज्ज्याला तर शिवुन आलो' असे म्हणत स्वतःची जबाबदारी पार पाडल्याचा फुका आनंद मिळवण्यात काय हाशिल आहे?

एक लैंगिक शिक्षण हे खूळ आहे आणि दुसरे आपल्या मुलांसमोर पालकांनी ओष्ठचुंबन सादर करण्याचा मोकळेपणा (?) आल्याशिवाय हे शक्य नाही, असे तुम्हाला का वाटतेय?

चार दोन चोरटी वाक्ये मुलांसमोर फेकून मुलांना अर्धवट माहिती मिळणे चुकीचे आहे, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. यासाठी काय करता येईल, यावर तुमचे विचार वाचायला आवडतील.

खरेतर विषयावर लिहायची ईच्छाच नव्हती ! पूर्वापार परंपरेनुसार पुरूषांच्या बाबतीत तरी असे कोणीही आपल्या मुलाला या गोष्टीबद्दल सांगितले असेल (जाणिव करुन दिली असेल) असे वाटत नाही. बर्‍याच कुटूंबात मुले १३, १४ वर्षा पर्यंत आई, वडीलांजवळ झोपतात. किंवा दोघांच्या मधे झोपतात. अशा परिस्थितीत त्याला ह्या गोष्टीचे विशेष ज्ञान नसताना उगाच करुन देणे म्हणजे थोडे तरी लज्जास्पद नाही काय?.
मुलांना वयात आल्याबरोबर आजुबाजुच्या वातावरणानुसार कमी जास्त प्रमाणत लौकर किंवा उशीरा आपोआप कळते. माझा मुलगा ७ वीत आहे त्याला सकाळी सकाळी थोडे निट झोप म्हणुन सांगतो एवढेच. उलट त्याने आईला सांगितले शा़ळेतील मुले काही बाही बोलतात.
आजच्या मोबाईल / ईंटरनेटच्या युगात तरी अशी जाणीव करुन देण्याची फार काही आवश्यकता नाही. आहे.

विषय चांगला आहे. पण साती म्हणते त्याप्रमाणे पितृदिनाच्या निमित्ताने या विषयाची चर्चा घडवून आणण्याचं प्रयोजन कळलं नाही.

आजकाल ११-१२वीला मानवी शरीरशास्त्र, शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना जरा जास्त खोलात शिकविले जाते, त्यामुळे तितके घोर अज्ञान नसले तरी कला व वाणिज्य शाखेच्या व शास्त्रातही बायोलॉजी सोडून दिलेल्या मोठ्या परसेंटेजचे काय? हा प्रश्न आहेच.>>> इब्लिस यांच्या पोस्टीतल्या ह्या वाक्यांचेही प्रयोजन कळले नाही. त्यांनी स्वतःच्याच नाकाला जीभ लावत केलेले जनरलायझेशन वाटले.

मुलगा वयात येण्याचे वय आता ९ - १० ते १२ ह्या रेंज मध्ये आहे. माझ्या मुलीच्या क्लासात १५- १६ वयाची मुले आहेत त्यापैकी काही इतकी पोचलेली आहेत की भीतीच वाटते. त्यांचा एक मुलामुलींचा मिश्र गट आहे. एक अगदी वायागेलेला मुलगा चरस सिगरेट दारू इत्यादी करतो व ही सर्व मुले फेसबुक वर असली पोस्टे टाकतात. त्याच्या बर्थडे केक वर असेच आयसिंग असून चरसी असे प्रेमाने?! लिहीलेले होते. हा केक आम्ही फेसबुक वर पाहिला. पब्लिक अ‍ॅक्सेस आहे ह्या अकाउंट्ला. ह्यावयाचे मुलगे अनभिज्ञ कोवळॅ असतात असे समजायची चूक करू नये. त्यांना सर्व माहीत असते. व इंटरनेट वर व डाउनलोड करून स्मार्ट फोन वर आंबट शौकिन क्लिप्स बघणार्‍यात हा गट प्रामुख्याने आहे.

अचाट साहसे व आचरट पणे करून मुलींच्या नजरेत भरणे हा ही एक गोल ह्या वयात आहे. त्याचाच भाग म्हणून वरील गटातील मुलगा डिओ स्प्रे कपड्यावर/ डेस्क वर मारून लगेच त्याला काडी लावतात व कशी आग लागते ते बघतात. ह्यातून क्लासच्या बंद एसी खोलीत आग लागून ही सर्वच मुले अ‍ॅट रिस्क होउ शकतात हे मला त्या क्लास वाल्यांना सांगायचे आहे पण मुलीला तो गट त्रास देतील म्हणून गप्प आहे.

तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे.

तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे.
<<< अमा, सहमत!!!

तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे >>> + १

>>>> त्यांनी स्वतःच्याच नाकाला जीभ लावत केलेले जनरलायझेशन वाटले. <<<< Lol Lol Lol अफलातुन
असो, विषय गम्भिर आहे (किन्वा गम्भिरपणे हाताळावा असा आहे)
माझ्या मते,
१. स्त्री-पुरुष संबंध या संज्ञे ऐवजी, जर "नर-मादी" संबंध किती माहित असतात असे बघितले तर पाचदहा टक्के मुलेमुली सोडून बाकीच्यान्ना या संबंधाविषयी अनेक नैसर्गिक/अनैसर्गिक/कृत्रिम माहिती स्त्रोतातून माहिती मिळत रहाते. अन अर्थातच ही माहिती अर्धवट/अपुरी असतेच असते.
२. हीच माहिती जर परिपूर्णरित्या दहावीनन्तरच्या शिक्षणात अंतर्भुत केली, तर माझ्यामते, एकन्दरीतच पुरुषजातीचा स्त्रीकडे बघण्याचा भोगवादी दृष्टीकोन बदलू शकेल असे वाटते. हा भाबडा आशावाद नाही. कारण प्रत्येक स्त्रीपुरुषास, गर्भधारणेनन्तर मातेच्या उदरातुन त्यान्चा जन्म कसा झाला असेल, व त्यात किती यातना मातेस भोगावयास लागल्या असतील हे दृष्य रुपात दाखवले तर कोणता माईचा लाल त्यानन्तर कोणत्याही स्त्रीकडे केवळ "मादी" म्हणून बघेल?
३. आजचाच नव्हे तर सार्वकालिक प्रश्न हाच आहे की पुरुष शिक्षण/संस्कारांअभावी स्त्रीकडे केवळ मादी वा उपभोगाची वा शरिरसुखाचे साधन म्हणूनच बघतात/ किन्वा केवळ तसेच बघु शकतात. हे बदलण्याकरता त्यान्ना जे शिक्षण देणे आवश्यक आहे, ते केवळ "लैन्गिक" या सम्बोधनाखालती आणणे कठीण वाटते, कारण आजही "लैंगिक" म्हणल्यावर "संभोगविषयक" मर्यादित शिक्षण इतकीच कल्पना रुजून बसली आहे. तेव्हा काय शिक्षण द्यायचे याच बरोबर ते का द्यायचे याचे विश्लेषणही नीटपणे व्हायला हवे आहे.
४. यातही शहरी व ग्रामिण असा भेद होतोच होतो. व ग्रामिण भागातील मुलामुलिस परिसरात नैसर्गिक/कृत्रिमरित्या नर-मादी शरिर संबंधाच्या ज्याबाबी अन्य प्राणीजगतातून सहजगत्या अवगत होऊ शकतात त्या शहरी मुलामुलिस तितक्याश्या अवगत नसतात. अ‍ॅण्ड डोण्ट टेल मी अबाऊट पोर्न्स, ते सगळ्यान्च्या आवाक्यात नाही/नसते. तेव्हा जन्मामागिल शारिरिक रहस्य या सदराखाली जरी व्यक्तिस वेळीच हे ज्ञान अधिकृत रित्या प्राप्त करुन दिले तर बराच फरक सामाजिक परिस्थितीतही पडेल.
आज इतकेच पुरे, ऑफिस सुटलय.

लिंबाजीराव,
सर्व मुद्यांशी इथे सहमत.

>>कारण आजही "लैंगिक" म्हणल्यावर "संभोगविषयक" मर्यादित शिक्षण इतकीच कल्पना रुजून बसली आहे. तेव्हा काय शिक्षण द्यायचे याच बरोबर ते का द्यायचे याचे विश्लेषणही नीटपणे व्हायला हवे आहे.<<

स्पेशल या वाक्यासाठी टाळ्या!

***

मंजूडी,
जनरलायझेशन करताना कुणाच्या नाकाला जीभ लावावी लागते ही नवी माहिती समजली. Proud लिंबाजीराव म्हणतात तसा विषय गंभीर आहे, म्हणून मी इथे शक्यतो इब्लिसपणा करणार नाही.
असो.

नक्की काय जनरलायझेशन मी केलेले आहे, हे सांगाल का जरा??

इब्लिस, तुमच्या दोन्ही पोस्ट्स आवडल्या. Happy
लिंबू, मी तुझ्या पोस्टशी चक्क सहमत आहे. Proud
मानवी शरीराची निदान बेसिक शास्त्रीय माहिती सर्वांना असावीच. आणि ती माहिती म्हणूनच द्यावी. पुस्तकं, फॅमिली डॉक्टर वगैरे पर्याय असू शकतात. (व्यक्तिशः मला माझ्या मुलाशी संवाद साधायला थर्ड पार्टीची गरज भासणं पटत नाही, पण व्यक्ती तितक्या प्रकृती.)
लिंबू म्हणतो तशी नागरीकरणाचे बळी असलेल्या मुलांना डिस्कवरी चॅनल, डेव्हिड अ‍ॅटनबरासारख्यांच्या निसर्गावरच्या फिल्म्स दाखवून लैंगिकता ही किती नैसर्गिक बाब आहे हे नकळत ठसवणं हाही चांगला पर्याय आहे. त्या त्यांच्यासोबत बसून बघणं तर बेस्ट!
या विषयाचा बाऊ करायचा असतो हे मुलं आपल्याकडून शिकतात. आपणच बाऊ नाही केला तर तीही नाही करत. हा स्वानुभव आहे. आम्हा भावंडांचा आमच्या आईवडिलांशी आणि आम्हा उभयतांचा आमच्या मुलाशी अतिशय मोकळेपणाने संवाद होत असतो- कुठलाही विषय वर्ज्य नाही.

>>तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे >> +१

लिंबू, पोस्ट आवडली.

>>या विषयाचा बाऊ करायचा असतो हे मुलं आपल्याकडून शिकतात. आपणच बाऊ नाही केला तर तीही नाही करत. हा स्वानुभव आहे. +१०००

तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे. >>> +१

लिंबुटिंबु, चांगली पोस्ट.

मुक्तेश्वर कुलकर्णी,

>>उलट त्याने आईला सांगितले शा़ळेतील मुले काही बाही बोलतात.>>

असे काहीबाही मुलाच्या कानावर पडण्यापेक्षा त्याला योग्य माहीती निदान फॅमिली डॉक्टरकडून मिळाली तर ते त्याच्या हिताचेच नाही का? मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात मुलांपर्यंत जे काही पोहोचते त्यातले योग्य काय आणि अयोग्य काय हे मुलांनी कसे ओळखावे. पोर्न क्लिप्स मधून चुकीचा संदेश मुलापर्यंत पोहोचल्यावर काय ? तुमचा मुलगा याबाबत आईशी बोलतोय, मदत मागतोय अशावेळी तुम्ही आवश्यकता नाही म्हणताय. Sad

Pages