मुलगा वयात येताना

Submitted by संयोजक_संयुक्ता on 16 June, 2013 - 00:47

fathersday1.jpg

'राहुल वयात येतोय' हे लक्षात आल्यावर राहुलचे आई-बाबा काय करतात? त्याची मानसीताई जशी त्यावेळी जरा बावरली होती तश्या राहुललापण काही शंका, प्रश्न असतील का असा विचार एका मुलाचे पालक म्हणून त्याचे आई-बाबा करतात का ?

आपल्या सगळ्यात जास्त जवळच्या, हक्काच्या माणसांना 'मला आजकाल असं का होतंय?' हे विचारायचा मोकळेपणा, विश्वास आपल्या किशोरवयीन मुलाच्या मनात निर्माण करणं ही प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे या वयात मुलांची एकूण विचारप्रक्रिया विकसित होत असते, ठाम मतं तयार होत असतात अन दुसरीकडे हळूहळू होणारे शारीरिक बदल, घडामोडी गोंधळात टाकत असतात. या अडनिड्या वयात असलेल्या मुलांना आपल्या शरीरात घडणार्‍या बदलांबाबत थोडीफार माहिती असली तरी या बदलांना, त्याबद्दलच्या उत्सुकतेला कसं सामोरं जावं याबाबत बर्‍याचदा खात्री नसते. या काळात काय काळजी घ्यावी, सावधगिरी बाळगावी, मित्रमैत्रिणींमध्ये निर्माण होणार्‍या आकर्षणाला नक्की कसं हाताळावं या सगळ्या नाजूक गोष्टींबद्दल सकारात्मकरीत्या आपल्याला पालकांच्या भूमिकेतून समजून घेता आलं तर नंतर पश्चात्ताप करायला लागण्याची शक्यता कमीच.

योग्य वेळी योग्य ते प्रश्न विचारणं, चर्चा करणं, मन मोकळं करणं याकरता जे अवकाश लागतं ते एक पालक म्हणून आपण कसं निर्माण करू शकतो? कसोटीच्या क्षणी मुलांना आपला आधार वाटावा म्हणून मुलांना मानसिक अन नैतिक बळ देणारा सुसंवाद कसा साधू शकतो? प्रत्येक कुटुंबासाठी ही वाटचाल वेगवेगळी असणार. काहींना मुलासोबत प्रत्यक्ष बसून गप्पांमधून समजावणं पटेल तर काही ठिकाणी माहितीपट, पुस्तकांचा आधार घेतला जाईल. कदाचित एखादी विश्वासातली त्रयस्थ व्यक्ती अथवा कौंसेलरची मदतही योग्य ठरेल. पद्धत कोणतीही असो, शेवटी मुलाच्या मनात नैसर्गिक प्रक्रिया सुस्पष्ट झाली तर शरीरसंबंधांबद्दलचे चुकीचे समज, दिवास्वप्नांचे इमले, स्वतःचे 'पौरुषत्व' सिद्ध करण्याची धडपड, मित्रमैत्रिणींमध्ये स्वीकारले जाण्याविषयीची चिंता, 'पियर प्रेशर' ह्या भरकटवणार्‍या गोष्टी आपोआपच कमी होतील.

मुलाचा अभ्यास, आवडी, छंद हे जसे आपण इतके दिवस जोपासले, मिरवले तसेच मुलाचे वयात येणे समंजसपणे, आश्वासकपणे हाताळले तर त्याच्या आयुष्यातला हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा त्याच्याकरता नक्की सुलभ होईल. त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची योग्य जपणूक होईल. म्हणूनच आज पितृदिनाच्या निमित्ताने आपण या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहितीची देवाण-घेवाण करणार आहोत. मायबोलीकरांना स्वतःच्या बाबतीत आलेले किंवा मुलांना, नात्यातल्या लहानग्यांना वाढवताना, मित्रपरिवारातील अडनिड्या वयाच्या मुलांना मार्ग दाखवताना आलेले अनुभव या धाग्यावर लिहिणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टींबाबत आपण चर्चा सुद्धा करू शकतो. तेव्हा चला एका महत्त्वाच्या विषयावरील उपक्रमात भाग घेऊन आपले योगदान देऊयात.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> अशा परिस्थितीत त्याला ह्या गोष्टीचे विशेष ज्ञान नसताना उगाच करुन देणे म्हणजे थोडे तरी लज्जास्पद नाही काय?.
>> आजच्या मोबाईल / ईंटरनेटच्या युगात तरी अशी जाणीव करुन देण्याची फार काही आवश्यकता नाही. आहे.

मुक्तेश्वर, म्हणजे मुलांना ज्ञान असतं की नसतं? मला ही विधानं परस्परविरोधी वाटत आहेत.

तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे.>> +१ अश्विनीमामी
लिंबू टिंबू ,पोस्ट चांगली. १०० % सहमत.

तिथल्या मुलांचे बाबा त्यांच्या आइचे ओष्ठचुंबन त्यांच्यासमोरच घेत असतात..>>>>
काही वर्षांपूर्वी भारतातले पुरूष रोमँटीक नसतात असा काहीसा सर्वेचा (बहुतेक इंडीया टुडे ) निष्कर्ष प्रकाशित झाला होता (तरीदेखील आपण लोकसंख्येत एक नंबर आहोत). ओष्ठ्यचुंबनाचा क्रायटेरिया लावायचा झाल्यास आपल्याला केव्हएज पासून सुरुवात करावी लागेल. किंवा योग्य त्या सवयी अंगी बाणवेपर्यंत पुरुषांनी ब्रह्मचर्य पाळावे.

आज इतकेच पुरे, ऑफिस सुटलय. >>>>एलटी Lol

आजच ओपिडीत एक गरीबसे साधेसुधे बाबा आपल्या मुलाला ओपिडीत दाखवायला घेऊन आले होते. कारण- धातू जातो.
मुलाला शाळेत सगळ्या विद्यार्थ्यांनी आता तू मरणार म्हणून घाबरवलेले.
मुलाला सगळे एक्सप्लेन केल्यावर वडिलांना म्हटले ,काका तुम्हीच हे सगळे नॉर्मल आहे हे त्याला सांगू शकला असतात. काका म्हणाले ,'मॅडम, या विषयावर इतकं मोकळं बापाला थोडीच बोलता येतंय? त्यात पोरांनी घाबरवल्यापासून पोरगं सतत रडतंय. त्याविद्यार्थ्यांपैकी एक तुमचा पेशंट होता त्याचि तर अजून ट्रीटमेंट चालू आहे तुमच्याकडे. (वास्तविक हा दुसरा मुलगा ज्युवेनाईल डायबेटिस आहे आणि त्याला लघवीतून जे पांढरं जात होतं ते धातू नसून पस होतं)
असो, पण आमच्या गावंढ्या गावातही मुलाच्या लैंगिक प्रश्नाबाबत डॉक्टरकडे ते ही लेडी फिजीशीयनकडे घेऊन जाणार्या त्या गरीब बापाचे मला फार कौतुक वाटले.

बाकी लिंबू,स्वाती आणि इब्लिस, तुमच्या पोस्टस मस्तं आहेत.

मुक्तेश्वर्,तुम्ही संकोच सोडून मुलाशी अजून डिटेल बोललं पाहिजे.
तुम्हाला भीड वाटत असेल तर एखाद्या डॉक्टरकडे नेवून सगळे समजावा.

सकाळी नीट झोपत जा असे व्हेगली एखाद्या मुलालासांगितल्यास नॉक्चर्नल इरेक्शन्,नॉक्चर्नल फॉल या काहितरी अनैसर्गिक, लाजिरवाण्या गोष्टी आहेत असा एखाद्या मुलाचा समज होऊ शकतो.

तसेच जागेची अडचण असेल तर ठीक आहे पण १३-१४ वर्षांच्या मुला/मुलींनी रात्री आईबाबांजवळ नेहमीच झोपणे ठिक नव्हे.
यातून ना आई बाबाना प्रायवसी मिळत ,ना मुलामुलींना.

इब्लिस, साती, अश्विनीमामी, योग्य पोस्ट्स.
मुलींपेक्षा मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधणे जास्त गरजेचे असे मला कधीकधी वाटते कारण 'मैत्रीण' हा घराबाहेरचा निरपेक्ष प्रेम-स्रोत मुलींना सहसा भरपूर मिळतो, मुलांची मैत्री त्या खोलीला जात नसावी, ही मोठीच उणीव.

जाते हो भारतीताई, मुलांची मैत्रीपण फार खोल जाते.
उलट मैत्री टिकवण्यात मुले मुलींपेक्षा जास्तं पर्टिक्युलर असतात.

खूपच चांगला विषय आहे.

आमच्याघरी मी सर्व भाच्यांन्ना हेच सांगतो की झोपेत नीत झोपा. अंगावर पांघरुन असू द्या. खाली वाकताना स्वतःकडे लक्ष असू द्या. आपण कसे वाकतो, बसतो, पसरतो ह्याची काळजी घ्या. पाहुण्यांकडे जाताना जर मुक्काम करायची वेळ आली तर सतर्क रहा.

जेंव्हा माझा आवाज बदलला ९ व्या वर्गात असताना तेंव्हा तो मलाच ऐकायला कसासा वाटायचा. नंतर कळले हा आवाज ह्या वयात बदलतो. सुरवातीला तो कर्शश वाटतो! स्वप्नदोष वगैरे व्हायच्या वयात मी सकाळी पाचला लवकर उठून स्नान करुन स्वतःचे कपडे स्वतःच धुवून टाकायचो.

खूप काही लिहिता येईल पण हे सर्व लिहायला संकोच होतो.

बी,
थोडे बळ मजकडून घ्या, पण लिहाच.

पौगंडावस्थेत (इंग्रजीत टीनेज.१३-१९ वर्षे वय.) शरीरात बदल होऊन मुलाचा पुरुष अन मुलीची स्त्री होण्याचे वय. हे बदलणे नुसतेच लैंगिक, शारिरिक नसते. होणारे बदल सामाजिक व मानसिक देखिल असतात. याला मोठे होणे, किंवा 'वयात येणे' असे म्हणू या आपण.

प्राण्यांत निसर्ग याची काळजी घेतो. अन याचाच दाखला देत रुढीप्रिय वा संस्कृतीरक्षक (म्हणून ज्यांना हिणविले जाते,) ते लोक म्हणतात, 'की आपोआप अक्कल येईलच! किंवा, गेली ३ लाख वर्षे माणसाला कुणी शिकविले? किंवा, प्राण्यांना कोण शिकविते? ही अशी पाचकळ प्रकरणे मुलांना सांगायची गरजच काय??'

- ते लोक त्यांच्या जागी बरोबर आहेत. Everyone is correct in his/her own point of view.

पण, आज माणूस त्या टिपिकल नैसर्गिक अवस्थेत ना रहात, ना जगत. एकूण मानवी जीवनात गेल्या ५० वर्षात जितके बदल झाले, तितके त्या आधीच्या ५०० वर्षांत झाले नसावेत. हे त्या आधीच्या ५-५शे वर्षांबद्दलही कदाचित खरे असावे.

आजच्या घडीला, निसर्गाने योजिलेल्या गोष्टींतून ज्ञान मिळणे दुरापस्त आहे. नुसते निसर्गातून, वा निसर्गनिरिक्षणातून मिळालेले ज्ञान जगण्यासाठी कुचकामी, अपुरे, निरुपयोगी आहे. मानवी प्रगतीचा वेग इतका आहे, की सो कॉल्ड नैसर्गिक जगणे, व त्यातून मिळणारी रिव्हिलिशन्स आज आपल्या पिल्लांना पंख देण्यास पुरेशी नाहीत. जगणेच आर्टिफिशियल अन वेगवान आहे, तर शिक्षणही तितकेच डायनॅमिक व्हायला हवे.

जितके लोक अनुभव लिहितील, तितका जास्त ब्रॉड स्पेक्ट्रम चर्चेत येईल, अन आपणा सगळ्यांनाच जास्त खोलात व खरी उत्तरे सापडतील. म्हणून बी, लिहा. तुमचे लिहिणे निरागस व मूलगामी असते.

***

सर्व वडील- बाबा- पित्यांना माझी विनंती, की, आपण मुलाचा पुरुष झालो, तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम्स आले होते ते आठवा, अन आपल्या मुलाला ते ट्रान्झिशन पार करायला मदत होण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याचा विचार करून इथे सुचवा. इट्स इम्पॉर्टंट. जीवनाचा वेग (पेस ऑफ लाईफ) प्रचण्ड वाढला आहे. तुम्हाला नाही वाटत, आपल्या मुलाला मदत करावीशी?

.

मंजूडी,
जनरलायझेशन करताना कुणाच्या नाकाला जीभ लावावी लागते ही नवी माहिती समजली.>>>

त्याबद्दल माझे धन्यवाद माना Proud

कला, वाणिज्य आणि बायॉलॉजी विषय सोडून विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थी शरीरशास्त्राच्या बाबतीत 'अज्ञानी' असतात हे सरळसरळ जनरलायझेशन आहे. त्याआधीच्या वाक्यांत नाकाला जीभ लावली आहे. तुमच्याकडे पुस्तके उपलब्ध होती, ती तुम्ही वाचलीत आणि ज्ञानी झालात. वाचलेल्या विषयांच्या बाबतीत पालकांशी चर्चा झाली का? नाही तर का झाली नाही? चर्चा झाली तर कश्याप्रकारे झाली? यांबद्द्ल काहीही लिहिलेले नाही, जे बाफच्या विषयाप्रमाणे लिहिणे गरजेचे होते असे मला वाटते.

how would you control the hormones flooding in ur childs blood?
temperament is largely depends on ur biological make up ,where autonomic and central nervous system controls all main functions including sexuality.

मंजूडी, पण त्यांनी एमबीबीएस शिकायला आलेल्या मुलांचे प्रातिनिधिक अनुभव लिहिलेत ना. त्यावरून मांडलेला धोका आहे तो (बाकायदा बायलॉजी शिकलेल्यांची ही अवस्था तर न शिकलेल्यांचं काय असेल - असं). जनरलायझेशन काय त्यात!

>> वाचलेल्या विषयांच्या बाबतीत पालकांशी चर्चा झाली का? नाही तर का झाली नाही? चर्चा झाली तर कश्याप्रकारे झाली?
>>>>>> लहानपणी घरात कोणतेही प्रश्न विचारायला मुभा होती, व सेन्सिबल उत्तरे देखिल मिळत* असं (आणि पुढे * बराच विस्तारित करूनही) लिहिलंय की. नेमकं काय बोलले ते संवाद लिहायचे आहेत का? Proud

how would you control the hormones flooding in ur childs blood?
<<
who is talking about controlling it? we are supposed to be discussing about letting those hormones express themselves in a healthy way. and NOT suppressing them, OR letting them be exposed to abnormal channels, like they will be, by for example : watching too much porn.

about your second point, sir,
genetic built up, vs. upbringing, is an age old topic. i wish u read up on it, and start a different thread, and we shall discuss it there.

शाळेत लैंगिक शिक्षण देवून तसा विशेष फायदा होवु शकत नाही कारण आपल्या देशात अजूनही लैंगिक
चर्चेला महत्व दिले जात नाही. कारण शाळेत चर्चा जरी केली तरी घरात चोरटेपणाच... किंवा उदासीनता. उदासीनता ह्या साठी की किती आई- वडील खरोखर चर्चा करु शकतात? कारण ते मागच्या पिढीतले आहेत.

आई वडील बर्‍यापैकी शिकलेले असून सुद्धा कुठे इतका मोकळे पणा असतो? अजूनही असे चित्र आहेच.
मी आई -मुलीत बर्‍यापैकी मोकळेपणा पाहिलाय पण मुलगा व बापात खूपच तूटकपणा पाहिलाय किंवा संवाद हा प्रकार नसतोच अगदी अलीकडच्या पिता-मुलगा नात्यात सुद्धा, ते ही शिकलेल्या बाप- मुलगा नात्यात.
लंगिक प्रश्ण आपले मित्रच सोडवू शकतात असा अगदी विश्वासच असतो मुलांमध्ये. कारण आई-बाबाच जबाबदार असतो अशी भावना निर्माण करायला.

अशिक्षित लोक तर मैलो दूर आहेत. समाजात इतका दुटप्पीपणा आहे की लोकं अजूनही नुसतं से* असे उच्चारले की काय चावट चर्चा असे प्रतिसाद दिसतात.

शेवटी आई वडीलांनीच योग्य ती दिशा दाखवली पाहिजे.

@स्वाती२ ताई ....
असे काहीबाही मुलाच्या कानावर पडण्यापेक्षा त्याला योग्य माहीती निदान फॅमिली डॉक्टरकडून मिळाली तर ते त्याच्या हिताचेच नाही का? मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात मुलांपर्यंत जे काही पोहोचते त्यातले योग्य काय आणि अयोग्य काय हे मुलांनी कसे ओळखावे. पोर्न क्लिप्स मधून चुकीचा संदेश मुलापर्यंत पोहोचल्यावर काय ? तुमचा मुलगा याबाबत आईशी बोलतोय, मदत मागतोय अशावेळी तुम्ही आवश्यकता नाही म्हणताय. >> >>>> त्याने माझ्या देखत आईला सांगीतले होते आणि ते एवढे अश्लील होते की त्यावर लक्षा देऊ नको एवढेच सांगावे लागले.

@स्वाती आंबोळे ताई
मुक्तेश्वर, म्हणजे मुलांना ज्ञान असतं की नसतं? मला ही विधानं परस्परविरोधी वाटत आहेत.>>> काही अंशीतरी मुलांना त्याचे ज्ञान येतेच. जेव्हा आम्ही सहकुटूंब टीव्ही पाहतो तेव्हा जेव्हा केव्हा प्रणय दॄष्य टीव्हीवर येते तेव्हा तो आपसुक चॅनेल बदलतोच. एकटा पहात असलेतर बाँडपट देखील पहातो. ते बिंधास्त चॅनेलही पाहतो. मी त्याला नाही म्हणत नाही.

@सातीताई -----
मुक्तेश्वर्,तुम्ही संकोच सोडून मुलाशी अजून डिटेल बोललं पाहिजे.
तुम्हाला भीड वाटत असेल तर एखाद्या डॉक्टरकडे नेवून सगळे समजावा.>>> सध्यातरी एवढी आवश्यकता नाही असे वाटते अजुन तो १२ वर्षाचाच होत आहे. शिवाय चोरून कुठलाही प्रकार करीत नसल्याने मलातरी वाटते की अजुन त्याला डॉक्टरकडे नेऊन त्या विषयीचे ज्ञान द्यावे.

तात्पर्य तुमच्या मुलाचे प्रॉपर वयात येणे व त्याने मॅच्युअर असणे, हे लोकांच्या मुलीबाळींसाठी फार महत्त्वाचे आहे >>>>>>>>+१

इब्लिस, छान पोस्ट्स.

लहान कुटुंब पद्धती सुरु झाल्यापासून याबाबतची गरज जास्त जाणवू लागलीय. पुर्वी मोठ्या कुटुंबात नवीन लग्न झालेला एखादा चुलत भाऊ, अशी माहिती देत असे. आणि त्या मुलांना अशी चर्चा करण्यासाठी मोकळ्या जागाही होत्या.

माझ्या वयातील मुलांची मात्र कुचंबणा झाली. कारण विभक्त कुटुंबव्यवस्था नुकतीच सुरु झाली होती आणि बाबांचा मुलांशी तितकासा संवाद नव्हता. एका परिचयातल्या इन्फर्टीलिटी क्लीनीक चालवणार्‍या डॉक्टरने
असे सांगितले कि एका विशिष्ठ समाजातील मूलांना तर अगदी बेसिक ज्ञान नसण्याच्या केसेस त्यांच्याकडे
येत असत.

अशी शास्त्रीय माहिती देणारी पुस्तके बाजारात नुकतीच येऊ लागली होती, त्यांच्या जाहिरातीदेखील वर्तमान
पत्रात येत अस्त, पण ती पुस्तके विकत आणून वाचायची मोकळीक मात्र नव्हती.

त्या काळात द डेली नावाचे एक वर्तमानपत्र निघत असे. त्यात मात्र या विषयावर सविस्तर साप्ताहिक लेखमाला आली होती. ती मी वाचली होती.

कदाचित काही जणांना हे गैरलागू वाटेल, पण त्या काळात प्रसारमाध्यमे ( खास करुन टिव्ही ) जास्त काळ
उपलब्ध नसल्याने या विषयावर विचार करणे भाग पडेल असे वातावरणच नव्हते. दहावी / बारावी / पुढचे शिक्षण लवकर पूर्ण करुन कायमची नोकरी मिळवण्याचे प्रेशर जास्त होते.

मी शाळेत असताना मुलींसाठी लैंगिक शिक्षण यासाठी सिव्हील हाॅस्पिटल मधून नर्स मॅडम आल्या होत्या. पण त्या वेळी मुलांना खेळायला सोडले होते. त्यांच्यासाठीही वर्ग घ्यायला हवा होता हे आता काही मुलांचे 'ज्ञान' ऐकून वाटतेय.

दिनेशदा पोस्ट आवडली.
माझे वडील अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून वर आले. स्थिरस्थावर होणे, गावचे नातेवाईक, अडले नडले यांचं पाहण्यात (प्रथेप्रमाणे) उमेदीची वर्षं गेली. त्यातून आम्हाला कसं शिकवलं याचा विचार केला तर अंगावर शहारा येतो. या सर्व धबडग्यात मुलांना काही गोष्टी शिकवायच्या राहून गेल्या तर मी अगदी समजू शकतो. त्या परिस्थितीचा साक्षीदार असल्याने आम्हाला इथपर्यंत आणलंच कसं याचंच नवल वाटतं. या परिस्थितीत तग धरणे हा एकमेव महत्वपूर्ण घटक असल्याने वर उल्लेखलेल्या बाबी त्यांच्या मनात होत्या किंवा कसे हे कळणे अवघड आहे. कळाले असले तरी आजूबाजूला, ऑफीसात एकूणच सर्वच संपर्कक्षेत्रात आनंदीआनंद होता.

परिस्थितीनुसार एकूणच माणसाच्या सर्वच विचारांत खूप फरक पडतो. अवघडलेल्या परिस्थितीत विचारातला खुलेपणा कमीच असतो. याचा परिणाम म्हणून मुलांना घरातून तरी काही ज्ञान मिळाले नाही. कॉलेजला एकेक ज्ञानचक्षू उघडायला सुरुवात झाली. तिथेही आपल्यासारखे बरेच असल्याचे जाणवले. काहीच माहीत नव्हतं असंही नाही. फक्त मिळण्याचे स्त्रोत हे आपल्याच अपरिपक्व वयाचे असल्याने ती कशाही स्वरुपात मिळत असे. त्यातल्या चुका समजण्यासाठी वाचन उपयोगी पडले.

तोपर्यंत इतर वाचन असल्याने आणि नशिबाने योग्य ते साहीत्य हाती पडल्याने फायदा झाला. जीवन मोहाडीकरांचे एक पुस्तक हाती आले होते. तसंच एका मुलाने लीना मोहाडीकरांच्या कुठल्याशा जुन्या लेखमालेचा त्याच्या आईबाबांनी बनवलेला अल्बम मला वाचायला दिला होता. एकंदर परिस्थिती पाहता मिळालं ते खूप होतं असं म्हणावं लागेल.

मुलगे वयात येतांना नक्की काय काय प्रॉब्लेम्सना तोंड देतात हे आयांना माहीती असते का?
मला तरी मुलांनाही काही समस्या भेडसावतात हे आत्ता कळतेय.

श्री कर्वे यांच्यानंतरचा तो काळ होता. त्यांनी काळाची गरज ओळखली होती पण त्यांच्यावरही टिकाच झाली.

गुप्त ग्यान हा डॉ काशिनाथ घाणेकर यांचा एक चित्रपट आला होता, पण तो प्रौढांसाठीच होता.
लालन सारंग / अमिता खोपकर / कमलाकर सारंग यांचे "खोल खोल पाणी" ( ले. रत्नाकर मतकरी ) आले होते.
त्यात हा विषय हाताळला होता. तरीपण त्याला अर्थातच मराठी नाटकात असतात त्या मर्यादा होत्याच.

माझ्या पिढीतील मुलांची घुसमट काही कथा / कादंबर्‍यांतूनही दिसली. मला वाटतं लंपन ( प्रकाश संत ) ची पण एक कथा आहे.

शालेय पाठ्यपुस्तकात जीवशास्त्रामधील ते धडे वरवरचेच होते. बी बी सी ची एक चांगली फिल्म आहे, (सिक्रेट्स ऑफ सेक्स ) पण तीदेखील अगदी लहान मुलांना समजेल अशी नाहीच.

पियु,
शरीरात बदल तर मुलांच्याही होतात. मानसिक बदलही होतात. त्यांची योग्य कारणे कळणे, हि त्यांचीही गरज असते. किमान त्या बदलांना घाबरण्याचे कारण नाही, एवढा तरी दिलासा मिळणे गरजेचे असते.

पियु परी मुलग्यांना समस्या नसतात हीच समस्या आहे. त्यामुळं आणि अप्रिपक्वतेमुळं हातून जे नाही ते आणि नको त्या वयात घडलं कि त्याचे परिणाम मात्र संपूर्ण घरादाराला भोगावे लागतात.. मुलाला समाज माफ करतो हे तितकसं खरं नाही. त्यासाठी ते कुटुंब भलतंच बदनाम तरी असायला हवं किंवा पॉवरफुल्ल, प्रतिष्ठीत तरी

लैंगिक प्रशिक्षण खूप लांबची गोष्ट आहे. मुलींचा नकार पचवण्यास सुद्धा मुलग्यांना शिकवले जात नाही. त्याचे गंभीर दुष्परिणाम पाहत असतोच आपण. वयात येताना डेव्हलप होणारा इगो, रग जिरवण्याची खुमखुमी आणि राग या गोष्टी कशा सांभाळाब्यात हे शिकवलं तरी खूप खूप झालं...

अगदी बरोबर किरण,
त्या वयात जर त्या अतिरिक्त एनर्जीला योग्य तो मार्ग मिळाला नाही, तर त्या शक्तीचा दुरुपयोगच होतो.
व्यसने लागायचाही नेमका हाच काळ असतो.

हो.. हे पटंतय.. पण मग आधी आयांना मार्गदर्शन कोण करणार?

रच्याकने एक कविता सापडली थोपुवर वाचलेली..

जगन रेप कर.

पूर्ण कविता इथे पहा: http://www.miloonsaryajani.com/node/1019

>>लैंगिक प्रशिक्षण खूप लांबची गोष्ट आहे. मुलींचा नकार पचवण्यास सुद्धा मुलग्यांना शिकवले जात नाही. त्याचे गंभीर दुष्परिणाम पाहत असतोच आपण. वयात येताना डेव्हलप होणारा इगो, रग जिरवण्याची खुमखुमी आणि राग या गोष्टी कशा सांभाळाब्यात हे शिकवलं तरी खूप खूप झालं...>>
इनफॅक्ट हे लैंगिक प्रशिक्षणाचा भाग म्हणूनच शिकवायला हवे.

Pages