एक किनारा ओलसरसा...

Submitted by Kiran.. on 18 July, 2012 - 12:29

खरं सांगायचं तर खूप कंटाळा आलाय. खूप काही सांगायचंय, बोलावंसं वाटतंय खरं.... पण एक अक्षरही लिहवत नाही. भयंकर कंटाळा आलाय.

काय सांगायचं ते उगीचच्या उगीच ? ते रात्र रात्र जागवणं, भारल्यासारखं जगणं... अखंड बोलत राहणं ..छे ! मेजावर अर्धवट पडलेल्या कागदांकडे तटस्थतेने पाहतो. पूर्ण होईल का हे कधी ? कथा, कादंब-या लिहाव्याशा वाटलेल्या असतात.. सगळंच काल्पनिक ! बेगडी !! उर्मी असेतो लिहीलेल्या, आणि ती उर्मी नाहीशी झाली कि अडगळीत पडलेली ही अपूर्ण चित्रं केविलवाणं होऊन पाहत असतात माझ्याकडे. तेव्हां मी मात्र व्यवहारी जगात व्यस्तसा ..कडक इस्त्रीचे कपडे अंगावर चढवून अवघडलेपण घेऊन वावरणारा, मलाच अनोळखीसा एक तडजोडवादी विक्रेता असतो. स्वतःला क्षणोक्षणी विकणारा ! काडी काडी जमवून संध्याकाळी चारा घेऊन येणारा चिमणा, कधी आवर्जून गजरा आणणारा प्रियकर तर कधी प्रचंड ताण झेलणारं धरण !!

अशक्त हात आणि मणामणांची आव्हाने ! काय काय पेलायचंय याची कल्पनाही नसताना पेलणारा.. एक उबदारसं विश्व छोटुसं, पंखावरती तोलणारा !

त्या हातांच्या शक्तीवर विश्वास ठेवून निर्धास्त होणारी चिवचिव एक अखंड विश्व पेलण्याची प्रचंड ताकद देते. असंख्य हिग्ज बोसॉन झेलणारी प्रचंड उर्जा या चिवचिवमधे असते. या टप्प्यावर "स्व" ला काही स्थान नसतं. ते नकोही असतं. स्वप्नात दंगणारा गोष्टीतला चिमणा नको वाटतो आताशा. चिमणीच्या स्वप्नांची राख होऊ नये म्हणून दमलेल्या पंखांमधे वारा भरणारा चिमणा आता भावतो. फाटकातून आत शिरताना धावत येणा-या कच्च्याबच्च्यांच्या विश्वातला सुपरहीरो असणं हे कुठल्याश्या स्वप्नील डोळ्यांचा राजकुमार होण्यापेक्षा जास्त आनंददायी असतं. मनस्वी असण्यापेक्षा मनं सांभाळण्यातला हर्ष आता हवासा वाटत असतो.

एक आखून घेतलेलं वर्तुळ किती सुरक्षित, किती उबदार. एक वर्तुळ आतलं.. धूसरसं आणि एक भोवतालचं.. सत्यातलं ! ही वर्तुळं एकमेकांत मिसळून जाताना परीघाबाहेरच्या जगाचा विसर पडत असतो. आत आलं कि बाहेर पाऊल टाकवत नाही. रस्ता ओलांडताना अंगावर येणारं बेफाट जग घाबरवून टाकतं. विम्याची पॉलिसी चिमणीच्या हातात देताना तिच्या डोळ्यांत उमटलेली वेदना आणि कृतज्ञताही चिमण्याचं बळ बनत असते.

मात्र, जाणीवपूर्वक उभारलेल्या या वर्तुळांच्या भिंती अभेद्य नाहीत. भक्कम तर नाहीतच नाहीत. कांद्याचे पापुद्रे असावेत तशा बनल्यात त्या. एकेक पापुद्रा सोलावा तसं जाणवतं बरंच काही आहे, बरंच काही आहे. कांद्याचे पापुद्रे डोळ्यांतून पाणी काढायला समर्थ असतात. सवय नसेल तर कांदे सोलू नयेत ! हाती तर काहीच लागत नाही ,डोळे मात्र रडून रडून सुजतात. कांदा कापताना रडणा-या आईला हसलं नाही असं कुणी असेल का या जगात ?

एक किनारा ओलसरसा, हजार लाटा साहणारा
सह्याद्रीचा कठीण कडा मी , वादळवारा थोपविणारा

मात्र, आताशा या पंखांमधे पूर्वीसारखा विश्वास नाही. पूर्वीसारख्या भरा-या घेण्याचं धाडस उरलेलं नाही. भीती वाटते झेप चुकण्याची. वारं आता वादळात रूपांतरीत झालंय. बघता बघता उन्मळून पडणारी ओळखीची झाडं काळजाचा ठोका चुकवतात. उघडे बोडके माळ आणि घरट्याची चिंता पंखातलं बळ कमी करतेय. कुठे कुठे आणि काय काय थोपवून धरायचं ? येणा-या काळाच्या उदरातलं चक्रीवादळ धडकी भरवतंय.

कुठल्याशा हॉलमधे धरणफुटीच्या प्रदर्शनाचे फोटो पाहत रांगेत पुढं सरकत असतो. समोर एक ओळखीचा चेहरा, खिन्नसा. भिवयांमधली रिकामी जागा आणि भकास मोकळा गळा सगळं सांगून जातो ! विचारावं कि विचारू नये हा नेहमीचा गोंधळ चालू असताना जुन्या ओळखीच्या विश्वासाने मोकळं होण्याची अपेक्षा बाळगणारे डोळे ते अवघडलेपण संपवतात. तिच्या गोष्टीतला चिमणा आता एक भयप्रद आरसा दाखवत असतो. एक अनामिक भीती गडद होत चारी बाजूंनी घेरते. दिवसाढवळ्या अंधारून येतं आणि छायाचित्रातून असंख्य धरणं फुटत राहतात. त्या महाविनाशकारी लाटांमधे मन गटांगळ्या खात कधी खोल खोल गुदमरतं तर कधी वर येऊन वेगाने मागे पडणारा किनारा पाहत राहतं. आत्ता जाणवतं.. आतलं ते वर्तुळ आता एकटंच आहे. खूप एकटं.. ! असुरक्षित, भिंती फुटलेलं धरण ! त्या अवस्थेत रस्त्यावर दामटलेली गाडी... आणि तिथं शून्य होत जाणा-या आठवणी.

गप्पागोंगाट कानावर पडत असतो. लोक काही बाही बोलत असतात. कुणीतरी कुणाला तरी उडवलेलं असतं. कुठल्याशा हॉस्पिटलमधे वर दिसणारं छत आणि त्यामधे डोकावणारे काही चेहरे. हा सीन ओळखीचा खरा, कुठल्याशा सिनेमातला. पण आता इतका खरा कसा ? छे.. ! खराच तर आहे. डोक्याला एक तीव्र कळ जाणवते, मग कुणीतरी सुई टोचल्याची जाणीव आणि अंधार... सेकंद, मिनिट, तास, दिवस, तारीख कशालाच अर्थ नसतो आता. जाग येते तेव्हां किलबिलाट चालू असतो. पुन्हा डोळे उघडले जातात. नसते उघडले गेले तरी काहीच समजणारं नसतं. रोजच सकाळी झोपेतून उठताना जाणवत नाही कधी. जडावलेले असले तरी डोळ्यांना पिल्लं दिसतात. वेदनेवर मात करणारी एक संवेदना मेंदूत जन्म घेत जाते. ओठात हसू फुलतं .. आणि डॉक्टरांना नकोसा दंगा ट्रकभर औषधांचं काम करून जातो. डोळे उघडताना झालेली संधीची जाणीव थंडपणे रक्तातून वाहत राहते.

अर्ध उन्मिलित पापण्यांना
जाग दिली कुणी पुन्हा पुन्हा
सैलसरशा या धाग्यांची ही
वीण ओवली कुणी पुन्हा..

खूप खूप बोलावंसं वाटत राहतं पण कंटाळा दाटलाय.. खरंच. आतल्या वर्तुळाला जागवायचा ..प्रचंड कंटाळा !

असंख्य वर्तुळं फेर धरून नाचत असतात. मी मात्र पाठ फिरवून मागे वळताना अर्धवट पडलेल्या लिखाणाला गोंजारून घेतो. त्या केविलवाण्या चित्रांना थोपटत समोरच्या आव्हानांत्मक चलचित्राकडे बोट दाखवताना.. आश्वासक वाटतं आणि मग कंटाळ्याचाही कंटाळा येतो.

आता पुन्हां त्या सामायिक वर्तुळात परतताना तीच ऊब, तीच सुरक्षितता अनुभवताना डोळ्यातून धारा वाहत असतात. धरणफुटीनंतर आलेल्या प्रलयाने थांबून चालत नसतं. लोणी कापावं तसं कापलेले कातळ पाहून धीर सुटू द्यायचा नसतो. पुन्हा एकदा जमवा जमव आणि पुनश्च हरी ओम ! नाजूक जागा आता समजलेल्या असतात. योग्य त्या ठिकाणी लिंपन लावून चुकार भेगा बुजवताना विस्कटलेल्या पंखात देखील कुठूनसं बळ येत जातं.. आता अमर्याद क्षितीज खुणावत असतं.. पुन्हा भरारी घ्यायला !

- Kiran..

गुलमोहर: 

..

किरण, तुफान सुंदर आहे हे. मी आताच लॉग इन केलं आणि लकीली सापडलं.
एकाच वेळी इतक्या सार्‍या भावना दाटुन आल्या आहेत. वाचताना असं व्हायला मी टीनएजरही नाही आणि एवढी इमोशनल ही. पण आज डोळे नम झाले आहेत वाचताना. अतिशय तरल लिखाण. हळुवार भावना शब्दात मांडायला जमणं इतकं अवघड. छान झेपलं आहे तुला.

आहाहा!
मस्त!
मला आधी अजिबात समजलं नव्हतं हे
पण तुझी ललित नेहमीच ग्रेट असतात म्हणुन माझ्याकडून एक छान साहित्य मिसलं जाऊ नये यासाठी पुन्हा पुन्हा वाचलं.
आणि आता समजल्यावर वाटतय वाचल्याचं सार्थक झालं !

आवडलंच किरण..
अस्वस्थता, रिकामपण, न सोसवणारा ताण, सगळ्याची आलेली कंटाळ्यारूपी उबग सारं सारं पोहोचलंय, तं तो तं त!

बघता बघता उन्मळून पडणारी ओळखीची झाडं>> हे वाचून कमालीची अस्वस्थ झाले, नुकतंच असं काहीसं चाटून गेलंय, म्हणून कदाचित.

भारतीजी, भुंगा, रीया, शोभा १२३, बागेश्री, विनय परांजपे, माधवी, झकास
आभारी आहे.

रीया
कधी कधी आपण व्यक्त होत जातो, समोरच्याला समजतंय किंवा आवडतंय याचा विचार न करता..

सुरेख आहे हे !

वेदनेवर मात करणारी एक संवेदना मेंदूत जन्म घेत जाते. ओठात हसू फुलतं .. हे असं अनुभवल्याशिवाय लिहिता येतच नाही.
फार आवडले ललित.

शुभेच्छा !! Happy

सुप्पर्ब किरण..
' वाचताना वाचकांना गुदमरल्यासारखं झालं असेल, गळ्याशी आलेला आंवढा गिळताना घसा दुखला असेल..,डोळे ओले झाले असतील..
आणी हे सर्व लिहिताना तुझी काय अवस्था झाली असेल्..ती कल्पना करणं फार कठीण नाही....
असंच लिहीत राहा.. सुंदर सुंदर!!!

आता मलाही काही स्फुरतंय,' जर माझे नाव किरण असते'.... Happy

__/\__

विम्याची पॉलिसी चिमणीच्या हातात देताना तिच्या डोळ्यांत उमटलेली वेदना आणि कृतज्ञताही चिमण्याचं बळ बनत असते.>>>> खल्लास दोस्त... बहोत खुब!
तोडलस लेका..... जबरदस्त!!!

इथल्या सर्व दर्दी/जाणकार वाचकांनी अशा प्रकारे लिहीण्यासाठी प्रोत्साहीत केल्यावर का नाही लिहावंसं वाटणार ? आभार Happy

सर्वच दर्दी आणि जाणकार लोकांनी नेहमीच माझ्या लिखाणाला प्रोत्साहन दिलंय. ज्ञानेश सारख्या कमालीच्या बिझी आणि प्रथितयश साहीत्यिकाने देखील वेळ काढला. सार्थक झालं लिखाणाचं... ज्ञानेश यू सेड इट.. जीवघेण्या अपघातातून वाचल्यावर मनात जी दाटी झालेली, तो अनुभव विसरू म्हणता विसरता आलेला नाही अद्याप !

एक नाही दोन नाही, तब्बल सहा सहा अपघातातून वाचलो, याला काय म्हणावं समजत नाही.