कोलंबी पुलाव

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 April, 2013 - 14:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाटे कोलंबी सोलून.
२-३ कांदे उभे चिरुन
३ टोमॅटोंची मिस्करमधून काढलेली प्युरी
१ बटाट्याच्या किंवा गरजेनुसार बटाट्याच्या फोडी
बासमती किंवा कोणताही जुना तांदूळ ४ वाट्या.
२ चमचे आल लसुण पेस्ट
१ चमचा मिरची कोथिंबीर पेस्ट
३-४ दालचीनीचे तुकडे
४-५ लवंगा
७-८ मिरी
२-३ वेलच्या
३-४ तमालपत्र
पाव चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

(फोटोतील प्रमाण थोड्याफार फरकाने वेगळे आहे कृपया कोणी मिरीदाणे, लवंगा वगैरे मोजू नका :हाहा:)

क्रमवार पाककृती: 

१) तांदुळ धुवुन निथळून ठेवा. (जमल्यास १ तास आधी)

२) कोलंबीला आल्,लसुण, मिरची,कोथिंबीर पेस्ट लावून घ्या.

३) भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यात प्रथम दालचीनी, वेलची, तमालपत्र, मिरी, लवंग टाकून त्यावर कांदा टाका व कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजू द्या. कांदा कुरकुरीत झाल्यास अजून चविष्ट लागतो पण त्यासाठी थोडे जास्त तेल वापरावे लागते.

४) शिजलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला, कोलंबी व बटाटे घाला व चांगली एक वाफ येऊ द्या. (जर कुकर मध्ये करणार असाल तर बाकीचे सगळे एकत्र टाकले तरी चालते वाफ न आणता)

५) आता टोमॅटो प्युरी, घाला व जरा परतवा.

६) ह्या मिश्रणावर तांदूळ, मिठ घाला भात शिजवण्यासाठी लागते तेवढे पाणी घाला व ढवळून मध्यम आचेवर पुलाव शिजत ठेवा.

७) ७-८ मिनीटांनी ढवळा व पुन्हा शिजू द्या पाणी आटले की गॅस मंद करुन झाकण ठेवून पुलाव वाफेवर ठेवा. ( हे सगळी भात शिजवण्याचीच प्रोसेस करायची आहे.)

हा झाला आहे कोलंबी पुलाव तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांसाठी
अधिक टिपा: 

कुकरमध्ये अजुन सोपा पडतो फक्त पाण्याचे प्रमाण थोडे कमी करायचे.

बटाटे नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतात.

काजू घातले तरी अजुन छान लागतो. व्हेज वाल्यांनी कोलंबी ऐवजी काजू पुलाव करुन खाल्ला तरी चालेल काजू कोलंबीसारखेच दिसतात Lol

मी साधा तांदूळ वापरला आहे. तुम्हाला आवडेल तो तांदूळ वापरा. फक्त नवीन नको.

माहितीचा स्रोत: 
आईने शिकवलेला पण थोडाफार फरक मी केलेला.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव! फोटो मस्तच .. रेसिपीही झणझणीत वाटतेय ..

आता अमेय ह्यांची रेसिपी आणि ही रेसिपी कम्पेअर करायला हवी .. Wink

जागू, भारी ! तोंपासु फोटो Happy
हा मी चाखलेला पहिला सामिष पदार्थ. तेव्हा फक्त कोलंब्या वेचून खाल्या होत्या पुलावातल्या Wink

मस्त! तोंपासु. कोलंबीची सर्व चव त्या भातात उतरते, त्यामुळे कोलंबी भात केला कि दुसरे काहीही करायला नको. कोलंबी पेक्षा करंदी ची जास्त छान चव येते ना जागू?

मस्त दिसतोय पुलाव Happy

नवर्‍याला सीकेपी पद्धतीची कोलंबीची खिचडी जाम आवडते. नेक्स्ट टईम हा पुलाव करायला सांगेन...

एक सांग जागू, कोलम्बी एव्हढी शिजवली तर वातड नाही का होत? मी खात नाही पण कोलंबी जास्त शिजवायला लागत नाही एव्हढं माहितीये Happy

नवर्‍याला सीकेपी पद्धतीची कोलंबीची खिचडी जाम आवडते. नेक्स्ट टईम हा पुलाव करायला सांगेन...>>>>>>>>>>>>> कोणाला नवर्याला????? Wink

पण जागु ताइ पुलाव दिसतोय लै भारी........... भूक लागली

काजू कोलंबीसारखेच दिसतात हाहा>>>>>>> Lol
बाकी फोटो मस्तय. एका दीराचे केळवण आहे घरी वीकेंडला त्याच्यावर करीन हा प्रयोग Wink
लाजो कोलंबी फार नाहीच शिजवावी लागत, आणि फार शिजलीच तरी वातड नाही होत.म्हणूनच नुसती वाफेवर शिजवली आहे ना जागूच्या रेशिपीत Happy
जागू पुलाव अगदी तोंपासू दिसतो आहे. तुमच्या रेश्प्यांचे फोटो बाकी झक्कास अस्तात...नयनसुख घेता येते अगदी Happy हपिसात बसून रेसिपी चाखल्याचा आनंद दिल्याबद्दल धन्यवाद Happy

कोलंबी कुठल्याही रुपात मला तितकीच आवडते. आणि हा पुलाव तर खुपच लाडका आहे. माझी आई एकदम मस्त बनवते, वर तुझ्या फोटोत दिसतोय तसाच...

कोलंबीचे पदार्थ खायला आधी त्याची टेस्ट डेवलप करावी लागते. घरच्या मंडळींमध्ये याचा अभाव असल्याने ब-याच वर्षात मी बनवलाच नाहीय हा पुलाव. या रविवारीच शुभस्य शीघ्रम करते Happy

जागुले तु एक हॉटेल काढ. मी तिथे काम करिन. Proud
कुफेहेपा? इतके सुंदर पदार्थ करतेस. मला तुझाही हेवा वाटतो.. (हे वाक्य दिनेशना टाकून झालय परवा)

फोटो मस्त!! Happy
पण फोटोच बघणार नुसता Proud

जागू, मी कुठलाही पुलाव/ बिर्याणी तुपात करते. खूप स्वादिष्ट लागतो भाताचा तो प्रकार.

माझी आई असाच करते फक्त टोमँटो प्युरी नाही घालत. आता असा करुन बघते.
बाकी हॉटेलबद्दल म्हणाल तर खरच मनावर घ्या (फुकटचे सल्ले देणं किती सोप्प असतं नै ;-)) मीही मासे साफ करण्याचे काम बर्यापैकी करते. (I'll improve under your training :-)) पुण्यात शाखा काढल्यास मी जॉईन करेन.

जागुटले, संध्याकाळच्या स्वयंपाकात काय करावे असा विचार भुकेल्या पोटी करत होते आणि ही रेसिपी!
पण पुर्वतयारी काहीच नाहीये! वीकांताला करणेत येइल!

मोबाईल हँग झाला आणि द्विरुक्ती (कुण्या माबोकराचा ढापलेला शब्द ;-)) झाली

जागू, मस्त दिसतोय हा पुलाव.

काजू कोलंबीसारखे दिसतात Happy पण चवीला जास्त चांगले असतात बरं Wink

सगळ्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

लाजो कोलंबी ताजी असेल तर वातड नाही होणार. जेव्हा जाड्या कोलंब्या तळाव्या लागतात तेंव्हा जास्त वेळ शिजवाव्या लागतात. पण त्याही वातड नाही होत.

दिनेशदा तुमची पोस्ट पाहीली आणि गंमत म्हणून हा फोटो काढला. ह्या फोटोत सांगा काय चविष्ट आहे ते Lol पण दिवा घेऊन हं.

दिनेशदांसाठी काजूच चविष्ट असावेत, कारण ते व्हेजी आहेत (ना?)
त्या कोलंब्या पाहून पाणी सुटलं तोंडाला Happy

Pages