संयुक्ता मुलाखत : अश्विनी कुलकर्णी, प्रगती अभियान, नाशिक

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 March, 2013 - 09:54

आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.

आपल्या संस्थेद्वारे नाशिक जिल्ह्यातील पन्नास-साठ आदिवासी गावांमध्ये गरिबांसाठीची रोजगार हमी योजना यशस्वीपणे राबविणे, रेशन कार्डानुसार तेथील लोकांना धान्य मिळवून देणे व माहिती अधिकाराखाली आवश्यक माहिती मिळवून त्याचा गावाच्या विकासासाठी वापर करण्यात साहाय्य करणे हे कार्य प्रामुख्याने करण्यात अश्विनीताईंचा सिंहाचा वाटा आहे.

ashwini kulkarni1.jpg

अश्विनी कुलकर्णी, प्रगती अभियान

समाजसेवेचा वसा घेऊन गेली वीस वर्षे या क्षेत्रात अव्याहतपणे आणि प्रभावीपणे काम करणार्‍या या विदुषींशी परिचय करून घेऊन त्यांची मुलाखत घेण्याचा योग मला मायबोलीकरीण वत्सला हिच्यामुळे प्राप्त झाला. अगोदर वेळ ठरवून एका दुपारी त्यांच्याशी संवाद साधला आणि एका विलक्षण तळमळीने, ध्येयाने झपाटलेल्या अश्विनीताईंच्या कार्याचे व व्यक्तिमत्त्वाचे जे दर्शन मला झाले तेच तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.

तुम्ही समाजसेवा या क्षेत्राकडे कशा काय वळलात? प्रगती अभियान संस्था सुरू करण्याअगोदर तुम्ही काय करत होतात?

या क्षेत्राची मला मुळात आवड होती. आपल्या देशात असलेली विषमता, गरिबी ही अन्यायकारक आहे आणि ती दूर झाल्याशिवाय आपल्या देशाचा विकास होणार नाही, आपला समाज सुसंस्कृत होणार नाही हे माझ्या मनावर खूप आधीपासून ठसलेले होते. सुसंस्कृत समाजात गरिबी नको असेल, ही सर्वत्र जाणवणारी गंभीर विषमता दूर करायची असेल तर त्यासाठी आपणच काहीतरी केले पाहिजे, उपाय शोधले पाहिजेत असे विचार मनात यायचे. त्याच विचारांमधून हैदराबादेत पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर मी पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम. ए. केले.

एम. ए. पूर्ण केल्यावर एका रिसर्च फाऊंडेशन मध्ये मी विकासात्मक कार्यासंदर्भातील काम हाताळू लागले. त्या अंतर्गत पर्यावरणासंबंधी काही अभ्यास केले. त्यानंतर 'वचन' नावाच्या संस्थेत मी जवळ जवळ दहा वर्षे काम केले. त्या मार्फत जवळपास पंचवीस-तीस गावांमध्ये बचतगट, आरोग्य, शिक्षण, शेती, विकासात्मक कामे अशा प्रकारच्या ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासाच्या रचनात्मक कार्यात मला सहभाग घेता आला. प्रत्यक्ष अनुभव मिळत गेला.

मग त्यानंतर तुम्ही प्रगती अभियान संस्थेची स्थापना केलीत?

हो, बरोबर. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी इ.स. २००६ मध्ये स्वतःची संस्था सुरू केली. त्या अगोदर मी 'वचन' मध्ये काम करत होते. तेव्हा २००१ मध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक, पेठ या भागांतील काही गावांमध्येच तीव्र दुष्काळ पडला. ऐन शेतीच्या हंगामात पीक घेता न आल्यामुळे तेथील लोक हवालदिल झाले होते. राज्यात इतर ठिकाणी पाऊसपाणी व्यवस्थित झाल्यामुळे शासनाने येथील दुष्काळाची दखल घेतली नव्हती. पण दुष्काळामुळे या भागातील शेतकर्‍याच्या तोंडचे पाणी पळाले होते हेही वास्तव होते. त्याच वेळेला आम्हाला रोजगार हमी योजनेबद्दल (रोहयो) माहिती समजली. दुष्काळाने ग्रस्त लोकांना दिलासा देणार्‍या या योजनेला आम्ही नीट समजावून घेतले. आणि त्या योजनेची उपयुक्तता जाणवल्यावर आम्ही ती लगेच उचलली. त्या दरम्यान मी श्रमजीवी संघटनेचे कार्यही करत होते. रोहयोबद्दल माहिती देण्याचे कामी आम्ही दुष्काळग्रस्त गावांमधील तरुण कार्यकर्त्यांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेऊन त्यांची नियुक्ती केली. या प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी मग गावागावांत जाऊन गावकर्‍यांना रोहयोची माहिती नीट समजावून सांगितली आणि लगेच कामाची मागणीही केली. सरकारतर्फे त्यांना काम मिळाले, मजुरीही मिळाली आणि दुष्काळासारख्या बिकट काळातून त्यांना सावरता आले.

परंतु हे काम करत असताना दुष्काळ किती खोलवर परिणाम करत जातो हे पाहिले. कुपोषण, गरिबी, उपासमार यांमुळे त्या भागातील अख्खी एक पिढीच दुबळी होते. गरीब आणखी गरीब होतात. त्याचे परिणाम पुढची अनेक वर्षे भोगायला लागतात. एक दुष्काळ कुटुंबाला किमान ३-४ वर्षे मागे लोटतो. त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. हे सर्व पाहिल्यावर मी या विषयाचा पुरता अभ्यास करायचा या ध्यासाने झपाटून गेले. रोहयोचा मार्ग तर सापडला होता. मग त्याबद्दल जे जे मिळेल ते ते वाचायला सुरुवात केली. शासनाचे अहवाल, लेख, शासनाचे निर्णय, संशोधकांनी केलेले लेखन, वृत्तपत्रांमधील स्तंभ... जे मिळेल ते! शिवाय या योजनेचा अनुभव असणार्‍या लोकांच्या भेटीगाठी, मुलाखती, ज्या ज्या गावांमधून रोहयोचे काम झाले आहे त्या गावांना व ग्रामस्थांना भेटी देणे हेही सुरूच होते. या सर्वांमधून नक्की काय करायला पाहिजे, कशा प्रकारे ही योजना यशस्वीपणे राबविता येऊ शकते, कसा मार्ग काढायला पाहिजे यांचे एक चित्रच नजरेसमोर तयार होत गेले.

आणि हे सर्व करताना त्याच जोडीला गरजू गावांमधून रोहयोची मागणी, त्यासंबंधी सरकारी पाठपुरावा, तहसीलदारांकडे खेटे, संघर्ष हेही चालूच होते. प्रत्येक टप्प्याला या योजनेतील बारकावे, कायद्याने केलेल्या तरतुदींमधील खाचाखोचा हे अभ्यासातून, अनुभवातून कळत होते.

यावर सखोल कार्य करता यावे या उद्देशातून इ.स. २००६ मध्ये आम्ही काही मित्र-मैत्रिणींनी मिळून नाशिक येथे प्रगती अभियान ही संस्था सुरू केली. त्या अगोदर २००५ मध्ये केंद्राने रोहयोच्या धर्तीवर भारतातील संपूर्ण ग्रामीण भागासाठी एक कायदा करावा असा विचार पुढे आला आणि बर्‍याच संस्था संघटनांनी त्याला उचलून धरले. या कायद्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली. त्या वेळी मी पुण्याच्या एनसीएस संस्थेच्या जर्नलसाठी केंद्राचा प्रस्तावित कायदा व महाराष्ट्रातील रोजगार हमी कायदा यांचा तौलनिक अभ्यास करणारा एक लेख लिहिला होता. या नव्या कायद्यामुळे रोहयोचे पुनरुज्जीवन होईल, राष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व नियमांमुळे त्याची कार्यक्षमता वाढेल हे तर निश्चित वाटत होते. परंतु त्या वेळी महाराष्ट्रात त्याकडे म्हणावे तितके लक्ष दिले गेले नाही. हा कायदा आपल्याला नवा नाही या समजुतीत हे दुर्लक्ष झाले खरे! या काळात मी नवीन राष्ट्रीय कायद्याचा अभ्यास करणे, त्यातील नियम - तरतुदी - बारकावे समजावून घेणे हे तर केलेच, शिवाय या कायद्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचावी म्हणून महाराष्ट्रात फिरून अनेक स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांचे त्याबद्दल प्रशिक्षण घेतले.

प्रगती अभियान तर्फे आम्ही इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ भागांतील दहा गावांमध्ये राष्ट्रीय कायद्यांतर्गत नवीन तरतुदी सांगून रोहयोची मागणी करू लागलो. पण मग लक्षात आले की सरकारी अधिकारीच याबद्दल फारसे काही जाणत नव्हते. मग या योजनेवर आधारित अशी सोप्या, सहज कळू शकेल अशा भाषेत मी एक पुस्तिका लिहिली. 'मागेल तिला, त्याला काम', नरेगा (नॅशनल रुरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी अ‍ॅक्ट) ही ती पुस्तिका जनहितार्थ आदिवासी संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आली.

संस्थेतर्फे तुम्ही नक्की काय काय प्रकारचे काम करता?

आम्ही मुख्यत्वे तीन प्रकारची कामे करतो. ती म्हणजे गरजू गावांमधील लोकांना रोहयोद्वारे काम व मजुरी मिळवून देण्यास साहाय्य करणे, त्यांना रेशनकार्डावर धान्याचा नियमित पुरवठा होईल यासाठी प्रयत्न आणि वेळोवेळी माहिती अधिकार वापरून त्या त्या गावाच्या विकासात येणार्‍या अडचणींचे निवारण. माहिती अधिकाराचा वापर आम्ही मुख्यत्वे झालेल्या कामांची माहिती, अंमलबजावणी प्रक्रिया सुकर व्हावी, त्यात दिरंगाई होऊ नये यासाठी करतो.

Picture 026.jpg

संस्थेतर्फे कार्यशाळा आयोजन

गरजू गावांना अगोदर आम्ही भेट देऊन त्यांना रोहयोबद्दल सांगतो. गावातील तरुण उत्साही कार्यकर्त्यांचे त्यानंतर आम्ही प्रशिक्षण शिबिर घेतो. त्यात त्यांना अगदी मूलभूत स्वरूपाची माहिती दिली जाते. तलाठी, ग्रामसेवक यांचे काम काय, तहसीलदार - गटविकास अधिकारी यांचे काम काय, ग्रामपंचायत म्हणजे काय, कशा प्रकारे रोहयोसाठी अर्ज करायचा, काय लिहायचे, कसे लिहायचे, पत्र कसे लिहायचे, कोणत्या कार्यालयात जायचे, कोणत्या टेबलावर आपले काम होते, तेथील कर्मचारी किंवा अधिकार्‍यांशी कसे बोलायचे, आपले म्हणणे कसे मांडायचे, काय प्रश्न विचारायचे इथपर्यंत अगदी इत्थंभूत तयारी करून घेतली जाते. त्यानुसार मग हे कार्यकर्ते गावातील लोकांशी संवाद साधतात, सरकारी कार्यालयांना भेटी देऊन - आपले म्हणणे व्यवस्थित मांडून - योग्य प्रकारे पाठपुरावा करून रोहयोचे काम गावासाठी मिळवू लागतात. एकदा त्यांना हे काम कसे करायचे ते कळले म्हणजे त्यांच्यासोबत इतर तरुणही तयार होत जातात. आपले म्हणणे, प्रश्न समोरच्या अधिकार्‍यांपुढे मांडता आल्यावर त्यांच्यातील आत्मविश्वास दुणावतो. रोहयोमुळे मजुरीची हमी मिळते, काम मिळते, गावातही हळूहळू बदल दिसायला लागतात. आणि हे बदल शाश्वत प्रकारचे असतात. या शिवाय कायद्यातील नवीन नियम, बदल, नवीन सरकारी अधिनियम यांबद्दल आम्ही या लोकांना सातत्याने माहिती देत असतो. त्यांच्यापर्यंत हे सारे पोचविणेही तितकेच गरजेचे असते.

IMG_5995.jpg

हे सर्व करत असताना आम्हाला त्या त्या ठिकाणी योजना राबविण्यात येणार्‍या अडचणी, पॉलिसीत आवश्यक असलेल्या सुधारणा, अंमलबजावणी यंत्रणेतले कमकुवत दुवे ह्या सर्व गोष्टीही लक्षात येत असतात. या गोष्टी शासनापर्यंत पोचविणे, निर्णय घेणार्‍या यंत्रणांना किंवा समित्यांना याबद्दल फीडबॅक देणे, त्यांना त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी विनंती करणे हेही बरोबरीने चालू असते. थोडक्यात सरकारच्या योजनांना गरजू ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे आणि त्या योजनांसंदर्भात येणार्‍या अडचणी, त्रुटी दूर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे अशा दुहेरी साखळीत आमचे काम चालते.

IMG_5874.jpg

इगतपुरी, चिंचाळे येथील शेततळ्याचे काम चालू असताना

igatpuri-chinchale-farmpond-jan2010-5.jpg

त्याच जोडीला कमी पाण्यात घेता येणार्‍या फायदेशीर पिकांबद्दल, फळशेतीबद्दल गावकर्‍यांना त्या क्षेत्रातील जाणकारांकरवी मार्गदर्शन देणे, त्यांची व्याख्याने आयोजित करणे हेही चालू असते. सध्या अशा प्रकारे डाळिंबाची शेती करण्यासाठी आम्ही सटाणा (नाशिक), संगमनेर (अहमदनगर) आणि मोहोळ (सोलापूर) येथे शेतकर्‍यांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत.

ही कामे करताना कशा प्रकारच्या अडचणींना, आव्हानांना तोंड द्यावे लागते? त्यांना तुम्ही कशा प्रकारे उत्तरे शोधता?

सरकार दफ़्तरी कामे करून घेणे हे सोपे काम नाही. त्यासाठी कमालीचा पेशन्स, चिवटपणा लागतो. कधी कधी कितीही प्रयत्न केला तरी सरकार कडून प्रतिसाद येत नाही. अशा वेळी नैराश्य येऊ शकते. आपले प्रयत्न फोल जात आहेत की काय असे वाटू शकते. पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो.

काही वेळा तुम्ही तुमच्या अडचणी, शासनाकडून झालेली दिरंगाईची तक्रार घेऊन सरकार दरबारी जाता. पण तेथील अधिकारी ते मान्य करतीलच असे नाही. अशा वेळी जरा वेगळा विचार करून ती समस्या कशी सोडविता येईल हे पाहावे लागते. मग आम्ही छोटे छोटे अभ्यास करतो. उदाहरणार्थ, एका ठिकाणच्या विहिरींचे पेमेंट शासनाकडून होत नव्हते. अधिकारी सांगत होते की आमच्याकडून आम्ही पेमेंट केले आहे. पण प्रत्यक्ष त्या लोकांच्या हाती पैसा आलाच नव्हता. तक्रार घेऊन जाणार्‍यांचे म्हणणे धुडकावून लावले जात होते. मग आम्ही एक झटपट सर्व्हे केला. जवळपास पन्नास-साठ विहीरमालकांची नाव-गाव-पत्त्यासहित यादी तयार केली. त्यात त्यांना विहिरीचे पेमेंट मिळाले अथवा नाही याचे तपशील लिहिले, आणि त्यांच्या अंगठे-सह्यांसकट हा रिपोर्ट त्या अधिकार्‍यांना सादर केला. शिवाय एका संस्थेने हा सर्व्हे केला आहे म्हटल्यावर त्यांना लक्ष घालायलाच लागले. यथावकाश ते काम झाले. पण अशा परिस्थितीत पेशन्स हारून चालत नाही.

आमची काम करायची पद्धतही वेगळी आहे. पूर्वी श्रमजीवीबरोबर काम करताना तहसील कचेरी किंवा जिल्हाधिकार्‍यांकडे मोर्चे घेऊन जाणे व त्यांना आपले निवेदन सादर करणे हे प्रकार अनेकदा केले. मजुरी मिळण्यात दिरंगाई, मजुरीच्या रकमेत हिशेबाच्या चुका, मोजमाप नीट न होणे इत्यादी तक्रारी नेहमीच्याच असत. या निवेदन-मोर्चा-तक्रारींमुळे दबावापोटी आमचे काम होत असे, पण नंतर परत स्थिती पूर्वपदाला येत असे. यंत्रणेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर होत नव्हत्या. मग वेगळ्या प्रकारे हे काम करायचे ठरविले.
शासनाच्या अधिकार्‍यांना भेटून योजनेच्या अंमलबजावणीतले बारीक-सारीक टप्पे, त्यातील प्रक्रिया समजावून घ्यायला सुरुवात केली. त्यानुसार योजना कशी राबविली जायला पाहिजे व प्रत्यक्षात ती कशी राबविली जात आहे याचा अभ्यास सुरू झाला. योजनेसाठीच्या निधीचा प्रवास कसा होतो, विनियोग कसा होतो, शासकीय नियमांचे आदेश व त्या नियमांचे अन्वयार्थ, नियमांचे पालन करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, त्यांच्याकडे आवश्यक असणारी कौशल्ये, संसाधने हे समजू लागल्यावर चित्र अधिक स्पष्ट होऊ लागले.

मग प्रत्येक अडचणीची तक्रार घेऊन जाताना, तिचा चिकाटीने पाठपुरावा करताना आम्ही शासन दरबारी ''आमची अडचण सोडवा,'' असे म्हणण्या ऐवजी ''अंमलबजावणीतील ही त्रुटी अशी दूर करा,'' असे मागायला लागलो. अधिकार्‍यांशी, कर्मचार्‍यांशी संवाद साधायला लागलो. त्यांच्यासमोर न चिडता आपले म्हणणे मांडायचे, त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्यायचा व तो कसा दूर करता येईल हे पाहायचे अशा पद्धतीने काम चालू असते. शेवटी ''सरकार सरकार'' म्हणजे कोण? आपणच निवडून दिलेले लोक असतात. आम्ही न चिडता त्यांना प्रश्न विचारतो. ''का बुवा पेमेंट नाही करत? काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय?'' भरपूर पेशन्स, समजूतदारपणा दाखवूनही आमचे काम होण्यात जर दिरंगाई होत असेल, अडचण येत असेल तर मग आम्ही माहिती अधिकाराखाली आवश्यक माहिती मागवून घेतो. गावाचे मस्टरच मागवून घेतो. त्या माहितीचे त्या गावातील लोकांपुढे जाहीर वाचन करतो. त्याला आम्ही ''चावडी वाचन'' असे म्हणतो. त्यातून नक्की कोठे प्रश्न येतोय हे गावकर्‍यांना कळते आणि मग त्याप्रमाणे पुढील कृतीची आखणी होते.

कधी कधी हे सर्व करूनही जर दाद मिळाली नाही तर मग प्रसारमाध्यमांकडे, वृत्तपत्रांकडे जावे लागते.

या शिवाय मराठी - इंग्रजी वृत्तपत्रे, ऑनलाईन मिडिया, जर्नल्स, मासिकांमधून या विषयावर मी सातत्याने लिहीत आले आहे. माझे विचार, अनुभव, निरीक्षणे, अडचणी, अभ्यास मांडत आले आहे. त्यानेही फरक पडतोच! मिडिया अ‍ॅडव्होकसी हे या बाबतीत प्रभावी शस्त्र म्हणून वापरता येते हा माझा अनुभव आहे.

तुमच्या टीमची रचना कशी आहे? कशा प्रकारे तुम्ही काम करता?

नाशिक मध्ये आमच्या संस्थेचे कार्यालय आहे. तिथे काम करणारी आमची एक टीम आहे. अतिशय अनौपचारिक असे वातावरण ठेवले आहे. आणि काम करणारी सर्वच मंडळी अत्यंत निष्ठेने, तळमळीने काम करणारी आहेत. या शिवाय आमची फील्ड वर्क करणारीही एक टीम आहे. प्रत्येक गावात १-१ कार्यकर्ता आहे. अशा इगतपुरी, त्र्यंबक, पेठ येथील पन्नास गावांमध्ये आमचे काम चालते. ही सर्व टीम गेल्या ५-६ वर्षांमध्ये उभी राहिली आहे.

या कामाला लागणारा निधी, पैसा कसा उभा करता?

आम्हाला वेगवेगळ्या संस्थांकडून फंडिंग मिळत असते. आम्ही सातत्याने काही प्रोजेक्ट्स करत असतो. त्यांसाठी मिळणार्‍या निधीतून कामासाठी लागणारा पैसा उभा राहतो. कॅनडाची एक संस्था - कॅनडा इंडिया व्हिलेज एड, ही आम्हाला आतापर्यंत सदोदित अर्थसाहाय्य करत आली आहे. त्या शिवाय आम्ही अनेक संशोधनात्मक प्रोजेक्ट्स करत असतो. रिसर्च साठी अर्थसाहाय्य मिळवत असतो. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, अ‍ॅक्शन एड इंडिया वगैरेंच्या माध्यमातून आवश्यक निधी पुरविला जातो.

काम करताना कशा प्रकारचे अनुभव येतात? काही संस्मरणीय अनुभव?

तसे सर्वच प्रकारचे अनुभव येत असतात. पण काही अनुभव आपले काम योग्य दिशेने चालू आहे याची पोचपावती देऊन जातात. सुरुवातीला रोहयोत काम करणार्‍या गावकर्‍यांना 'मजुरीचे काय केले', असे विचारले की त्यांचे उत्तर असायचे, मीठमिरचीसाठी पैसे खर्च केले. नंतर उत्तरे बदलू लागली. कोणाच्या घरावर कौले नव्हती त्याने कौले चढवली, कोणी पक्के घर बांधले, कोणी घरात कपाट घेतले... एका म्हातार्‍या मजुराने सांगितले की केवळ रोहयोमुळे तो गेली पाच-सहा वर्षे मजुरी करून पैसे कमावू शकला, त्याला व त्याच्या कुटुंबाला पोटासाठी स्थलांतर करावे लागले नाही, भले तो अडाणी - निरक्षर मनुष्य असेल, गरिबीमुळे त्याने कधी शाळेचे तोंड पाहिले नसेल... पण त्याने मिळवलेल्या पैशांमुळे व रोहयोच्या कामामुळे त्याची नातवंडे गावातील शाळेत शिकू शकत आहेत. असे अनुभव समाधान देऊन जातात. शेततळे, पाणलोट अशी कामे केल्यामुळे शेतकरी आता पावसाळ्यानंतरचे पीकही घेऊ लागलेत. अशा मूलभूत सुविधा (बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर) मिळाल्या तर शेतकर्‍यांचा आणि गावाचा विकास नक्की शक्य आहे.

तुमच्या कामात घरच्यांची कशा प्रकारे साथ मिळाली? वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांचा समतोल कशा प्रकारे सांभाळता?

मी अगोदर म्हटल्याप्रमाणे आमच्या संस्थेच्या कार्यालयातील वातावरण आम्ही मुद्दामच अनौपचारिक ठेवले आहे. काम करणारी मंडळी अगदी घरच्यासारखी आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन अ‍ॅडजस्ट करतो. कामात खंड पडणार नाही याची काळजी घेतो. मात्र अनौपचारिकता व व्यावसायिकता दोन्ही ठेवावी लागते.

घरात माझे सासू-सासरे अत्यंत सपोर्टिव्ह होते. त्यांना मुळात सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती व त्यांनी या क्षेत्रात कामही केले आहे. आमच्या घरात समाजकार्य हा सर्वांच्या जीवनाचा एक भाग आहे असेच म्हणता येईल. त्यामुळे त्यांनी मला कायमच सपोर्ट केले. आमच्या घरात कायमच या क्षेत्रासंबंधाने विविध प्रश्नांची मोकळी चर्चा चाललेली असते. आणि एकमेकांना सांभाळून घ्यायचे वातावरण असल्यामुळे ते शक्य झाले आहे.

तुमची राज्यस्तरीय व केंद्रीय शासन समित्यांमध्येही नियुक्ती झाली आहे ना?

हो. माझे गेल्या वीस वर्षांमधील काम, अनुभव आणि वेगवेगळ्या प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध केलेले लिखाण - अभ्यास - संशोधन यांमुळे मला या दोन्ही समित्यांमध्ये आमंत्रित करण्यात आले आणि त्या पातळीवर कसे काम चालते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. वेगळा अनुभव होता तो!

आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही तुमच्या कामात कशा प्रकारे वापर करता?

वेगवेगळ्या ऑनलाईन माध्यमांद्वारे आपले लिखाण - अनुभव - निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचविणे, संकेतस्थळाद्वारे माहिती प्रसार हे तर मी करतच असते. त्याखेरीज रोहयोसंदर्भात काम करणार्‍या संघटनांना एकत्र करून त्यांचा आम्ही गूगल ग्रुप बनविला असून रोहयोसंदर्भातील अपडेट्स एकमेकांबरोबर शेअर करण्याचे काम त्याद्वारे केले जाते.

शासनाशी आम्ही संवाद साधतो तेव्हा त्यांना या योजनेसाठी आधुनिक तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरू शकतो ते आम्ही आवर्जून सांगतो. नरेगाच्या संकेतस्थळावर भारतातल्या प्रत्येक गावातील मजुराची माहिती मिळते. ही माहिती वाचत असताना मला आंध्र प्रदेशातील माहिती सर्वात व्यवस्थित असते, तिथे काम खूप नेटकेपणाने चालू आहे हे सातत्याने जाणवायचे. मग २००८-०९ साली मी हैदराबादेचे अनेक दौरे केले, तेथील शासनातील लोकांशी बोलले, गावां-गावांमधून लोकांच्या भेटी घेतल्या. तेथील संस्था-संघटनांमधून फिरले. तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत पारदर्शी पद्धतीने मजुरांची मजुरी थेट त्यांच्या खात्यात विनाविलंब कशी जमा होते त्याचा अभ्यास केला व तो अहवाल लेख स्वरूपात सादर केला.

नुकताच मी झारखंडाचा दौरा करून तिथे आधारकार्डावर आधारित मजुरीचे पेमेंट करण्याची योजना कशी चालते याचा अभ्यास केला. झारखंडातील रोहयो मजुरांची बँकेत खाती आहेत. बँक ऑफ इंडिया गावातील एका मुलाकडे काही हजारांचा ओव्हरड्राफ्ट देऊन ठेवते. त्या गावातील मजूर बाईच्या बोटांचे ठसे घेऊन तेथील यंत्र तिची ओळख पटविते व तिच्या खात्यात किती पैसे होते व किती रक्कम जमा झाली आहे हे सांगते. आपण किती दिवस मजुरी केली व मजुरीच्या रेटनुसार आपल्या खात्यात किती पैसे जमा व्हायला हवेत हे त्या बाईला ठाऊक असते. मग ती हिशेब करून जमा झालेली रक्कम बरोबर आहे ना, हे तपासून घेते. शिवाय तिच्या खात्यात किती पैसे शिल्लक आहेत त्यानुसार व तिच्या गरजेनुसार किती पैसे काढायचे ते ठरविते. सर्व व्यवहार तिच्या समक्ष व तिला कळेल असा होतो. यातून तिच्या हातात थेट पैसा जातो एवढेच नव्हे तर बँकच तिच्या दाराशी येते. पारदर्शी व्यवहार व दिरंगाई न होता हातात पैसा मिळणे या दोन महत्त्वाच्या गोष्टी या आधुनिक तंत्रज्ञानामुळे साध्य झाल्या आहेत. आम्ही याचे अहवाल वेळोवेळी स्थानिक शासनाकडे देत असतो, त्यांना अशा योजना राबविण्यासाठी सांगत असतो.

रोहयोसारख्या योजना ग्रामीण भागातील दारिद्र्याचे निर्मूलन करण्यासाठी अपुर्‍या आहेत असे एक मत व्यक्त केले जाते. तुमचे त्याविषयी काय मत आहे?

मी म्हणेन की अशी मते वास्तवाबद्दलच्या अज्ञानापोटी व्यक्त केली जातात. भारतातील ग्रामीण दारिद्र्याचा प्रश्न हा बराच गुंतागुंतीचा व अनेकपदरी आहे. रोहयो हा या प्रश्नावरच्या अनेक उपायांपैकी एक अडचण निवारण करणारा त्वरित उपाय आहे.

मुळात अनेकांचा असा समज असतो की रोहयोमार्फत फक्त रस्ते बनविणे व खड्डे खोदण्याची कामे होतात. मुळात हा समज अपुर्‍या माहितीवर आधारलेला आहे. रोहयोच्या माध्यमातून त्या त्या गावची विकासकामे हातात घेता येतात. जिथे रस्ताच नसतो किंवा कच्चा रस्ता असतो तिथे पक्का रस्ता बांधणे, जलसंधारण, मृदसंधारण, बंधारे बांधणे, पाण्याची तळी - विहिरी - साठे साफ करणे, पाण्याचा साठा करण्यासाठी बांधकाम करणे यांसारखी पाणलोटविकासाची कामे केली जातात. याचा त्या गावाला दीर्घकालीन फायदा होतो. विहिरी - शेततळ्यांच्या पाण्यावर पुढे त्यांना शेती करता येऊ लागते. ज्यांनी सुरुवातीला दुष्काळापायी रोहयोमध्ये काम केले त्यांना मजुरीचे पैसे तर मिळालेच, गाव सोडून अन्य ठिकाणी कामासाठी जावे लागले नाही आणि गावात झालेल्या पाण्याच्या विकासकामांमुळे पुढच्या काही वर्षांमध्ये त्यांना आपल्या शेतांत गहू, हरभरा अशी पिके घेता येऊ लागली. गावात लोकांच्या हातात जसा पैसा येऊ लागला तसे बदलही दिसू लागले. आणि हे बदल दीर्घकालीन आहेत, शाश्वत आहेत. शिवाय अशा योजनेमुळे खेड्यांमधून शहरांकडे स्थलांतर करण्याचा वेगही कमी होतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचे कारण जर लोकांना आपल्या गावात रोजगार मिळत असेल, गावात राहून थोडीफार शेती व मजुरी करून पैसे कमावता येत असतील तर शहरांकडे जाण्याचे त्यांचे प्रमाणही कमी होणार. गावात केलेल्या विकासकामांमुळे उन्हाळ्यात त्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य भासणार नाही.

शेवटी चार पदरी रस्ते आणि उड्डाणपूल बांधले म्हणजेच विकास होतो असे नाही. तर गावात राहणार्‍या गरीब माणसालाही रोजगार मिळवण्याचे साधन प्राप्त होणे, त्याच्या मुलाबाळांना शिकता येणे, त्याचे कुटुंब गरिबीतून वर येणे, त्याच बरोबर गावात सोयी-सुविधा होणे, पाण्याचे दुर्भिक्ष्य नसणे, पाणलोट क्षेत्र विकसित होणे हाही विकासच आहे. मात्र त्यासाठी रोहयोसारखी योजना अत्यंत पद्धतशीरपणे राबविता येणे, त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे हे महत्त्वाचे आहे.

शहरातल्या माणसाने गावाकडच्या गरिबीची किमान ओळख तरी करून घ्यावी, आठ-आठ दिवसांतून किंवा पंधरवड्यातून एकदा पाणी मिळणे म्हणजे काय असते ते पाहावे असे फार वाटते. आपल्या शहरापासून तीस-चाळीस किलोमीटर्स अंतरावर देखील कशा प्रकारची भीषण गरिबी, कुपोषण, उपासमार असू शकते याची अनेकांना कल्पनाच नसते. ती कल्पना करून घ्यावी. आपल्याला मिळणार्‍या सोयी-सुविधा, पाणी यांचा वापर काळजीपूर्वक जरी केला, रेनवॉटर हार्वेस्टिंग - पाण्याचा पुनर्वापर हे जरी केले तरी ते फार मोलाचे आहे.

निरनिराळ्या लोकांबरोबर काम करताना मतभेद होतात का? त्यांवर उपाय कसा शोधता?

मतभेद हे तर कायमच होत असतात. ऑफिसमध्ये आणि ऑफिसच्या बाहेरही! शेवटी मतभेद होणे म्हणजे विचार करत असण्याची खूण आहे ती! आणि मतभेद झाल्यावर त्यांवर चर्चा होणे महत्त्वाचे. एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर ती का पटली नाही हे सांगता येणे, पटवून देता येणे महत्त्वाचे. आणि किती का मतभेद असेनात, शेवटी सर्वांनी त्या त्या इश्यूसाठी काम करणे याला मी महत्त्व देते.

नवीन पिढीने या कामात रस घ्यावा म्हणून तुम्ही काही प्रयत्न करता का?

हो तर! दरवर्षी तरुण मुलामुलींचे वेगवेगळे गट आम्हाला आमच्या कामात जॉईन होतात. त्यांची विचार करण्याची पद्धत, आपले विचार मांडण्याची पद्धत, त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्यापाशी असलेली तंत्रज्ञान कुशलता, त्यांचा ताजेपणा यांमधून आम्हालाही बरेच शिकायला मिळते. त्यांनाही ग्रामीण भागातील प्रश्न, करत असलेले उपाय, चर्चा, काम यांमध्ये सहभाग घ्यायला मिळतो. ही मुलं आमच्याशी, ग्रामस्थांशी गप्पा मारतात. प्रश्न समजावून घेतात. खूप प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांमुळे तुम्हालाही वेगळा विचार करायला मिळतो, नवीन दिशा मिळते. त्यात आम्ही व ते, दोघेही एकमेकांकडून बरेच शिकतो.

या सर्व कार्यासाठी तुम्हाला प्रेरणा कोठून मिळते?

जसजसे वेगवेगळे प्रश्न समोर येतात तसतशी त्यांवर विचार करायची सुरुवात होते. त्या विचारांमधून नव्या गोष्टी सुचत जातात. प्रेरणा मिळत राहते. आणि माणसांचे म्हणाल तर भेटणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव, प्रत्येक परिस्थिती काही ना काहीतरी शिकवून जाते. आपली ओंजळ जेवढी मोठी तेवढे मिळत जाते.

या क्षेत्रात पुढे काय करायचा तुमचा विचार आहे?

जे कार्य करते आहे ते तर चालू ठेवायचेच आहे. परंतु त्या खेरीज केलेले काम थियराइझ (theorize) करता यावे, त्यावर अधिक चर्चा करता यावी असे फार वाटते. आपण केलेल्या कामाबद्दल इतरांचा फीडबॅक मिळावा, आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता यावे असे खूप वाटते.

तुमच्या कामाव्यतिरिक्त मिळणार्‍या वेळात तुम्ही कोणते छंद जोपासता?

मला वाचनाचा विलक्षण छंद आहे. सर्व प्रकारची पुस्तके वाचनात असतात. थ्रिलर्स वाचणे जास्त आवडते. तसेच नाटके, सिनेमे बघणे हेही मला आवडते व त्यासाठी जरूर वेळ काढते.

तुमच्या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या, काम करू इच्छिणार्‍या लोकांना काय सांगाल?

भरपूर अभ्यासाची तयारी ठेवा. इतरांचे म्हणणे ऐकून घ्यायला शिका. आऊट ऑफ बॉक्स विचार करायला शिका. Be curious. Be on your toes. तुम्हाला तुमचे काम एन्जॉय करता आले पाहिजे. स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन काम करता आले पाहिजे. You should be fully involved all the time.

अश्विनी ताईंच्या संस्थेची व कार्याची अधिक माहिती येथे मिळेल :

प्रगती अभियान,
अथर्व, अश्विन डुप्लेक्स
विशाखा कॉलनी, राजीव नगर,
नाशिक ४२२ ००९
फोन +९१२५३ २३७०३९७.
ईमेल : pragati.abhiyan@gmail.com

संकेतस्थळ : http://www.pragatiabhiyan.org/index.html

-------------------------------------------------------------------------

मुलाखतकार - अरुंधती कुलकर्णी

फोटो सौजन्य - अश्विनी कुलकर्णी

-------------------------------------------------------------------------

** संयुक्ताच्या माध्यमातून स्त्रियांसाठी व्यक्त होण्याचे एक वेगळे व्यासपीठ मायबोलीने उपलब्ध करून दिले आहे. व्यवसाय, करियर, आरोग्य, सल्ला-मार्गदर्शन, आधार, मदत, माहिती, संवादाच्या माध्यमातून स्त्रियांना व्यक्त होण्याचे, जाणिवा प्रगल्भ करण्याचे प्रयत्न संयुक्ताच्या माध्यमातून सातत्याने चालू असतात. आज तीनशेहून अधिक स्त्रिया संयुक्ताच्या सदस्या आहेत व या व्यासपीठाचा लाभ घेत आहेत. नव्या मैत्रिणी मिळवत आहेत. मायबोलीवरील कोणीही स्त्री सदस्या संयुक्ताचे सभासदत्व घेऊ शकते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाली आहे मुलाखत.

अशा धडाडीच्या बायांविषयी वाचून खूप भारी वाटतं. पण मला भारी वाटायला त्यात माझं काय काँट्रिब्युशन असं पण वाटतं. असो. अश्विनीताईंशी ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद अकु आणि वत्सला दोघींना Happy

अतिशय सुंदर मुलाखत.

अश्विनी कुलकर्णींचं व्यक्तिमत्व, काम, त्यांचा आजपर्यंतचा प्रवास, अभ्यास सगळंच फारच इंप्रेसिव्ह आहे. एवढी मजल मारण्याकरता समाजकार्याची आवड असणं जरी महत्वाचं असलं, तरी अतिशय इफेक्टिव्हली ते काम करुन जास्तीत जास्त गरजूंपर्यंत मदत पोहोचवू शकणं हे अश्विनीताईंनी फार चांगल्या प्रकारे साधलं आहे. त्यांचे विचारही खूप आवडले. हॅट्स ऑफ टू हर!

अकु, तू प्रश्नही छान विचारले आहेस.

अतिशय प्रेरक व्यक्तिमत्व.
आभार अरुंधती या मुलाखतीसाठी.

अश्विनी कुलकर्णींना काम करताना जवळुन बघितले आहे. ध्येयवेडी माणसं कशी असतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे अश्विनी!
अकु, तू त्यांचे विचार इतके छान शब्दबद्ध केले आहेत ना की अगदी त्या बोलताहेत असा भास होतो वाचताना!

मला धन्यवाद देण्यासारखे मी खरोखर काही विशेष केले नाहीये! Happy

खुपच प्रेरणादायी मुलाखत. नुसतेच आहे त्या परिस्थितीबद्द्ल तक्रार करण्यापेक्षा आपण काय करु शकतो हे जाणवले. अकु , तुझे खुप आभार अशा व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्द्ल.

बापरे! केव्हढं महत्वाचं काम कराताहेत या बाई. शासकीय यंत्रणा व योजना ज्यांच्यासाठी राबवल्या जातात पण ज्यांना त्यांचा पत्ताच नसतो अशा दोन गटांमधला दुवा. आणि वर शासकीय यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराबद्दल, त्रास देणार्‍या लोकांबद्दल कुरकुरीचा/नाराजीचा सूर नाही. त्यांना या गोष्टींचा नक्कीच त्रास होत असेल पण त्यांचा दॄष्टीकोन सकारात्मक वाटतोय. आहे हे असे आहे , त्यातुनच मार्ग काढायचाय असे काहीतरी..

<संपादित>

सुरेख मुलाखत.
जबरदस्त काम आहे हे! >>> +१०० ....

धन्यवाद अकु आणि वत्सला... भारी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल! >>>> अनुमोदन...

धन्यवाद सर्वांचे. मला अश्विनीताईंची मुलाखत घेताना खूप छान वाटले. त्यांच्या कार्याचा, विचारांचा परिचय तर करून घेता आलाच, शिवाय आपण ज्या विषयावर भरभरून चर्चा करतो त्या विषयावर प्रत्यक्ष कार्य करणार्‍या अश्विनीताईंचे खूप कौतुकही वाटले.

धन्यवाद ! खुपच प्रेरक,इंप्रेसिव्ह मुलाखत.
चिंगी +१

सुरेख झाली आहे मुलाखत. प्रेरणादायी कार्य ! धन्यवाद अकु आणि वत्सला. अश्विनीताईंना आणि त्यांच्या सहकार्‍यांना शुभेच्छा Happy

मो च्या पूर्ण पोस्टला + १.