चिंचभात (टॅमरिंड राईस)

Submitted by नंदिनी on 14 March, 2013 - 04:58
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. भात: २ कप (शक्यतो बासमती अथवा कुठलाही मोकळा शिजणारा भात)
२. अर्धा कप चिंच पाण्यत भिजवून ठेवावी. पाणी जरा जास्त असावे.
३. १ चमचा मेथीदाणे
४. डाळीएवढा हिंगाचा खडा
५. हळद, मोहरी,
६. गुळाचा एक छोटा खडा.
७. एक चमचा चणाडाळ
८. सहा लाल छोट्या मद्रासी सुक्या मिरच्या (नसतील तर नेहमीच्या सिक्या मिरच्या)
९. तिळाचे तेल (पारंपारिक रीत्या तिळाचे वापरतात, हवं असल्यास नेहमीचे रीफाईन्ड तेल वापरले तरी चालेल.)
१०. थोडे काजू आणि शेंगदाणे. (हवे असल्यास)- तळून घ्या. अथवा नंतर फोडणीत घालून परता.
११. ताजा कढीपत्ता.
मीठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

भात शिजवून एका परातीत मोकळा करून घ्या.
एका पॅनमधे मेथीदाणे आणि हिंग कोरडेच परता. नंतर हे कुटून पावडर करून घ्या.
चिंचेच्या कोळामधे मीठ हळद, गूळ, आणि मेथी हिंगाची पावडर घालून मिक्स करा.
तेलाची फोडणी करून त्यामधे मोहरी, चणाडाळ (आवडत असल्यास उडीद डाळ पण घालू शकता) मिरच्या, (घालायचे असतील तर काजू-शेन्गदाणे ) व कढीपत्ता घाला.
आता यामधे चिंचेचा कोळ घालून उकळा. कोळ चांगला घट्टसर झाला पाहिजे. कन्सिस्टन्सी साधारण घट्ट पिठल्याइतकी आली पाहिजे.
हा कोळ नंतर भातामधे व्यवस्थित मिक्स करा. काजू शेंगदाणे तळून घेतले अस्तील तर तेही मिक्स करा,

टॅमरिंड राईस-पुळिसादम-चिंच भात तय्यार. Happy

वाढणी/प्रमाण: 
दोघातिघांना पुरेल.
अधिक टिपा: 

हा भात अतिमसालेदार/जळजळीत होत नाही.
चिंचेचा आंबटपणा जितका हवा असेल त्याप्रमाणे चव अ‍ॅडजस्ट करा.

हा भात दोन तीन दिवस टिकू शकतो त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी उत्तम!

याच्यासोबत मिरचीचे लोणचे आणि तळलेले पापड झकास लागतात.

माहितीचा स्रोत: 
सेल्व्ही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच एका तमिळ मैत्रीणीकडे हा प्रकार खाल्ला! एकदम सही लागतो! शिवाय कोकोनट राईस, लेमन राईस, कर्ड राईस, टोमॅटो राईस असे अजुन चार भाताचेच प्रकार होते. आधी वाटले कसे काय बुवा हे लोक एव्हढ्या प्रकारचे भात एकाचवेळी खाऊ शकतात? पण आम्हीही यन्जॉय केल कालचं डिनर!

वत्सला, सेल्व्ही- म्हणजे आमच्याकडे जी स्वयंपाकाला येते तिला आम्ही रोजच्यारोज पोळाभाजीभातआमटी कसे काय जेवू शकतो हा प्रश्न पडतो. तिच्यामते, पोळी हा नाश्त्याचा प्रकार आहे!!

फोटू डकवावा की ताई! Happy

एखाद दोन वेळा खाल्लाय पण मुळात मला हा चिंचभात हे प्रकरण फारसं झेपलं नाही. दहीभाताला पर्याय नाही त्याखालोखाल टोमॅटो राईस. Happy पण हे तमिळ लोकं बाकी आंबटशौकिन हं ... जमतील तेवढ्या आंबट चवी भाताबरोबर एकत्र करून खातात.

मामी, पुढच्यावेळेस केला की फोटो डकवेन.

पण हे तमिळ लोकं बाकी आंबटशौकिन हं ... जमतील तेवढ्या आंबट चवी भाताबरोबर एकत्र करून खातात.>> Lol

Biggrin भारीये तुमची सेल्व्ही! रोज भाताचेच प्रकार करते का?

वरची रेसिपी एकदा ट्राय करणार. ज्या मैत्रीणीकडे काल जेवण होतं तिच्याकडे सध्या तिची आई, सासु अशा दोघीजणी आलेल्या आहेत. त्यांना रेसिपी विचारली तर म्हणे एव्हढ इंग्रजीत सांगण्यापेक्षा तू कधीही ये तुला कोणताही प्रकार खावासा वाटला की! ते लोकं हिंदी बोलत नाहीत आणि इंग्रजी अगदी थोडं.

पण हे तमिळ लोकं बाकी आंबटशौकिन हं ... जमतील तेवढ्या आंबट चवी भाताबरोबर एकत्र करून खातात.>>> Biggrin काही नाही तर लोणचं तरी घेतीलच भाताबरोबर!

वत्सला, नाही. मी एकदा बसवून तिला आपल्या सैपाकाचा फॉर्मॅट समजवलाय. त्यासाठी शेजारच्या घरातील (इयत्ता आठवी इंग्रजी माध्यम) कन्यकेला ट्रान्स्लेटर म्हणून बोलावलं होतं. Happy
मग रोज कोशिंबीर, दोन भाज्या, पोळी/फुलके, भात आणि आमटी हे सर्व (रेसिपीसकट) शिकवावं लागलं. त्यानिमित्ताने माझं तमिळ सुधारलं. तिला काही मराठी आलं नाही. तेव्हा डम्ब शराड्स खेळल्यागत आम्ही एकमेकींशी बोलायचो. फारच विनोदी कार्यक्रम व्हायचा.

आता हळूहळू तिला बर्‍यापैकी जमतं कधीतरी अधेमधे मीच तिला आज काहीतरी तामिळ स्पेशल बनव म्हणून सांगते. स्पेशली नॉनव्हेज काही असेल तर "घाल काय गोंधळ घालायचा तो" असं स्पष्ट (मराठीतून) सांगून मी किचनबाहेर येते. हे पुळिसादम तिचं फेवरेट आहे. पंधरा दिवसातून एकदा होतंच आमच्याकडे.

अरे! ये तो भोत सिंपले. मी इतके दिवस उगाच घोळ घालायचे या प्रकरणासाठी. या मेथडने करते आता.
मामी Lol

अरे काल ट्रेनमधे दोघींची चर्चा ऐकली या भाताबद्दल. नि रेसिपी पण. तेव्हा लक्षात राहिली नव्हती. धन्स!!

नंदिनी, सॉरी हं. तुझ्या धाग्यावर माझी रिक्षा फिरवते आहे.

http://www.maayboli.com/node/4166

टॅमरिंड राइस हा आमच्या घरात एकदम आवडता प्रकार आहे. (आशूसे पुछो. :)) बर्‍यांच दिवसांत केला नाही. केला पाहिजे एकदा.

छान लागतो आणि टिकतोही.. डाळ पण भरड वाटली तर आणखी चांगला लागतो ( इति आमच्या शेजारी पार्थसारथी मामी Happy )

आमच्या ऑफीसमधील तमीळ मुलगी आणायची बर्‍याचदा.. हा आणि लेमन राईस अगदी हिट्ट!!! आणि हो कर्ड राईसही!! मस्त लाल मिरच्या, कढीपत्ता, जिरे मोहरी ची झणझणीत फोडणी दिलेला... तिने रेसिपी पण लिहून दिलेली... पण "ती चव" काही नाहीच आली... त्यामुळे या राईसच्या वेळेला डब्बा एक्सचेंज Happy

मेथड तर सेम आहे... बघूया... आता तरी करायला जमतंय का ते... Happy

पण हे तमिळ लोकं बाकी आंबटशौकिन हं ... जमतील तेवढ्या आंबट चवी भाताबरोबर एकत्र करून खातात. Happy ह्म्म ती मैत्रीण इडलीसोबत टोमॅटो चटणी नावाचं भन्नाट आंबट तिखट मिश्रण आणायची.. अगदी तोंपासू...

रोजच्यारोज पोळाभाजीभातआमटी कसे काय जेवू शकतो..>> Happy अगदी अगदी...
आमच्या कडे उलटी गंगा...
मला साऊथ डिशेस फार आवडतात. बर्‍याचदा शनि-रवि डाळ्-तांदूळ भिजत घालून... इडली, वडे, डोसे, उतप्पे प्रकार चालूच असतात... पण मुंबईतल्या रेस्तराँनी सवय केल्यामुळे हे नाष्ता प्रकार जेवणाऐवजी... हे काही नवरोजींना झेपतच नाही... त्यातले इन मिन दोन नग खाऊन मग आता जेवायला काय? हा त्याचा प्रश्न आला की पसारा, मेहनत, आता उरलेले इतके कोण खाणार वगैरे वैताग तोंडातच दाबत... "हेच जेवण" असं शांतपणे सांगताना फार कष्ट पडतात Proud

अह्हाहा... मस्त! कॉलेजात मैत्रिणीच्या डब्ब्यातला नेहमी खायचे Happy

पुलिओगरे/पुलिओगारे म्हणजे हाच का? MTR चा मसाला वापरून मी करते बर्‍याचवेळेस.. सोबत दही आणि पापड.. मस्त लागतं Happy

पुलिओगरे/पुलिओगारे म्हणजे हाच का?<< हो. हाच भात. याला बंगलोरकडे पुळिओगरे आणि तमिळमधे पुळिसादम म्हणतात.

प्राची, सॉरी काय त्यात? तुझ्या रेसिपीमधे धणे आहेत ना.. मी नेटवर रेसिपी बघत होते त्यामधे सर्वात धणेच होते. सेल्व्हीला विचारलं तू धणे का घालत नाहीस तर म्हणे टेस्ट याची जास्त चांगली येते. नेक्स्ट टाईम मी धणे घालून करायला सांगेन. Happy बघू डिफरन्स!

पण "ती चव" काही नाहीच आली... <<<या सर्व भाताच्या रेसिपीमधे फोडणीचं गणित परफेक्ट जमायला हवं. तिळाचं तेल हे बहुतेक सीक्रेट असावं कारण, मी कायम फॉर्च्युन आणते, सेल्व्ही एकदा स्वतःच तिळाचं तेल घेऊन आली. तेव्हापासून तमिळ फोडण्या (:फिदी:) तिळाच्या तेलातच करते. शिवाय कढीपत्ता ताजा असेल तर स्वाद छान येतो.

येमटीआरचा मसाला 'जौद्या झालं' आहे. मीपण वापरते कधीतरी शॉर्टकट म्हणून.
टॅमरिंड भाताची एक कीचकट पण हिट पाकृ होती. ती अति व्यवस्थित जपून ठेवल्यामुळे सापडत नाहीये. तेव्हापासून टॅरा केला नव्हता.
सेल्वीकाकुंची शिंपल दिसतेय पाकृ. करनार.
थॅंक्यु.

हा माझा फेव्हरिट आहे. मला कधीच माझ्या साउदी मैत्रिणींसारखा जमत नाही. म्हणून मग एक मैत्रिण माझ्या साबुदाणा खिचडी बरोबर डबा स्विच करते. Happy

मी पण एम.टी.आर.चा मसाला वापरून करते. आमच्या घरात हिट्ट आहे हा प्रकार... (पण त्यामुळे फोडणीचा भात केलाच जात नाही.)

लीना, डाळ फोडणीत लाल होईपर्यंत तळायची आहे. भिजवून वापरायची गरज नाही.

एमटीआरच्या सांबार मसाल्याखेरीज इतर कुठले मसाले वापरले नाहीत. एकदा छोले मसाला आणला होता, तो पण मला सांबार मसाल्यासारखाच लागला चवीला, तेव्हापासून एमटीआरच्या वाटेला जात नाही Happy इकडे मद्रासकडे सक्ती (आपल्या भाषेत शक्ती) आणि आची असे दोन ब्रँडचे चांगले मसाले मिळतात.

ओ रैनाताई, सेल्व्हीकाकू मत कहो ना. Happy

करून पहायला हवा अश्या पद्धतीने.

आची सर्व उत्पादने छान आहेत. मी वापरते. इथे(अमेरीकेत) मिळतात्.(आगाउ माहीती कोणाला वापरायची असल्यास.. विषय वर आला असल्याने. मी मार्केटींग मॅनेजर नाहीये आची ची). Happy

नंदिनी,

चिंचेचा जो कोळ भात मिसळायचा असतो त्यात पाणी घालून उकळी आणली की कोळंब तयार होतं का? माझा तामिळ मित्र मस्त तिखटजाळ कोळंब करायचा. तो आम्ही भातात कालवून खायचो. जरा सरबरीत असायचा पण चवीला मस्त आंबट-तिखट लागायचा.

आ.न.,
-गा.पै.

चिंचेचा जो कोळ भात मिसळायचा असतो त्यात पाणी घालून उकळी आणली की कोळंब तयार होतं का<<> कोळंब म्हणजे आमटीसारखीच चिंच, डाळ, मसाले घातलेली ग्रेव्ही, त्यामधे वेगवेगळ्या भाज्या घालून वगैरे वेगवेगळे कोळंब बनवतात. मला भेंडी आणि कच्चीकेळी घालून केलेले कोळंब आणि वत्थ कोळंब नावाचा एक प्रकार परिचयाचे झाले आहेत. Happy

Pages