शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांनीच तयार केले, पक्षी पाणवठे
दुष्काळात सगळा महाराष्ट्र होरपळतोय. थेंब थेंब पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. अशा वेळी फक्त आपल्या तहानेचा विचार न करता काही मुलं पुढे सरसावली आहेत, पक्ष्यांची तहान भागवायला. बुलढाण्यातील शेलसूर या गावातल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आगळ्यवेगळया प्रयोगाविषयी- लोकप्रभा मधली एक बातमी
http://www.lokprabha.com/20130412/upakaram.htm

महाराष्ट्रात आज सर्वदूर कोरडे झालेले जलाशय आणि पाण्यासाठी दाहोदिशा फिरणारे नागरिक हे चित्र सर्वत्र दिसत आहे. यावर्षीच्या दुष्काळामुळे मनुष्य, पशु-पक्षी हैराण आहेत. पाण्याच्या शोधात जंगलातील पशु आता मनुष्यवस्तीचा आसरा घेताना दिसत आहेत. कित्येक पशु-पक्षी पाण्याअभावी तडफडून मरण पावल्याच्या घटना विदर्भ- मराठवाडय़ात घडत आहेत. ज्या ठिकाणी माणसांना पाण्याच्या शोधार्थ वणवण भटकंती करावी लागत आहे, तेथे पशु-पक्ष्यांचे काय हाल? मानवी वस्तीसाठी केंद्र शासनाने भरपूर मोठय़ा प्रमाणात निधी दिला व टँकरच्या माध्यमातून वाडय़ा-वस्त्यांची तहान भागविण्याचे प्रयत्न केले जातील. पशूंसाठी चारा छावण्यांद्वारे विविध उपाययोजना केल्या जातील, परंतु पक्ष्यांचे काय? दुष्काळी परिस्थितीमुळे पक्ष्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकलेला असताना बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली तालुक्यातील शेलसूर गावात वेगळंच आक्रीत घडतंय. इथल्या श्रीशिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालयील राष्ट्रीय सेवा योजनाच्या पथकाने कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. आर. घ्याळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मैत्री पक्ष्यांशी’ या उपक्रमात शाळकरी मुलांच्या साह्य़ाने ‘पक्षी पाणवठे’ लावले आहे.
चिखली-खामगाव रस्त्यावर चिखलीपासून १४ कि.मी. अंतरावर असलेले शेलसूर या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात नेहमी पाण्याचा दुष्काळ. आजमितीस गावातील एकाही विहिरीला किंवा पाणवठय़ाला पाणी नाही. दिवाळीपासूनच इथे टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. मात्र शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिसरातील वृक्षावर ‘पक्षी पाणवठे’ लावल्यामुळे आजमितीस या ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट दिसेल.
शेलसूर, धोडक, पळसखेड सपकाळ, धोत्रा, वनगोजी, शेलोडी, आंधई, चांदई या गावात आजमितीस पाचशे ‘पक्षी पाणवठे’ झाडावर मुलांनी लावले असून त्यात मुले दररोज सकाळ-संध्याकाळ न विसरता पाणी पुरवतात.
या उपक्रमाविषयी बोलताना प्रा. विजय घ्याळ सांगतात की, दिवाळीच्या सुट्टय़ांनंतर बारावीच्या वर्गात इंग्रजी या विषयाचा जॉन पॉवर यांचा ‘ही मेड अ ड्रीम कम्स ट्र’ हा पाठ शिकवित होतो. या पाठात एका गावात एक गरुड पक्षी येतो तो त्याठिकाणी उंदराचे मांस खातो. जॉन पॉवर त्या ठिकाणी रीप्लान्टेशन करून त्या गरुडाला त्याच गावात ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो हे सविस्तर वर्णन आहे. यावरच आधारित मी मुलांना महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता, असा प्रश्न विचारला. एकाही मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही. यानंतर मी मुलांना विविध पक्ष्यांची माहिती गोळा करायला सांगितले. यात त्याचा अधिवास, प्रजनन यांसह अन्य बाबींचा समावेश होता. मुलांनी जवळपास शंभरपेक्षा जास्त पोस्टर्स तयार केली. यातूनच आपण दुष्काळात आपल्या परिसरात येणाऱ्या पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात आला. त्यांनीच ‘पक्षी पाणवठे’ ही संकल्पना साकारायला सुरुवात केली.
या उपक्रमांतर्गत सुरुवातीला शाळेच्या परिसरात ५० पाणवठे वृक्षांवर लावण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात पक्ष्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. मात्र हळूहळू परिसरातील नैसर्गिक पाणीसाठे संपायला सुरुवात झाली आणि पक्षी या पाणवठय़ाकडे आकर्षित झाले. आजमितीस शेकडो विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी येतात, पाणी पितात व आनंदाने राहतात.
मलकापूरजवळील तळणी येथून पक्षी पाणवठय़ासाठी खास कुंडय़ा आणल्या गेल्या. सुरुवातीच्या ५० कुंडय़ासाठी विद्यार्थ्यांनी आपापले पॉकेटमनी दिले. पक्ष्यांचा वाढता प्रतिसाद पाहता आणखी कुंडय़ांची गरज भासू लागली. अशावेळी विजय घ्याळ व घनश्याम कापसे यांनी ही बाब संस्थाध्यक्ष सुनील देशमुख यांच्या कानावर घातली. त्यांनी लगेचच पाच हजार रुपये दिले. स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेने पाच हजारांची मदत केली. पंचवीस रुपयाला एक कुंडी याप्रमाणे ३०० कुंडय़ा मागवल्या गेल्या. गावातील ज्या विद्यार्थ्यांच्या घरासमोर झाडे आहेत, त्यांना या कुंडय़ा विनामूल्य देण्यात आल्या. गावातील तसेच परिसरातील मुलांनादेखील कुंडय़ांचे वाटप करण्यात आले. मुलांनी आनंदाने कुंडय़ा झाडावर लावल्या. शाळेच्या व्हॅनमधून दररोज सकाळी पाणी आणले जाते व विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक पाणवठय़ात सोडले जाते. परीणामी गावातील इतर मंडळींनीही आपापल्या घरासमोर तसेच शेतात नेऊन कुंडय़ा लावल्या आहेत. आता यिेथे चिमणी, लालगुडय़ा बुलबुल, व्हलगी, साळुंकी, कुरकुंण्या, कावळे, बगळे, खारुताई विहरत असतात. गावात सहसा न येणारे सुतारपक्षी, जंगलाव्यतिरिक्त इतरत्र न दिसणारा बहिऱ्या नावाचा पक्षी या ठिकाणी उंबराच्या झाडावर ठाण मांडून बसलेला आहे.
इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणारे ५५० विद्यार्थी आजमितीस दररोज आपल्या घरून येताना पक्ष्यांसाठी ज्वारीचा कोंडा, तांदळाचा कोंडा, बिस्किट यांसह अन्य पदार्थ आवर्जून खायला आणताहेत. सभोवताली पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून शाळेतील मुलेही आता उत्स्फूर्तपणे कविता करत आहेत. नुकताच ‘मैत्री पक्ष्यांशी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘चिवचिवाट’ हा पक्षी विशेषांक काढला असून यात -
१) ‘कोयल करते कुहू-कुहू, मुले मुली शाळेत जाऊ।
शाळेत करूया खूप खूप मस्ती,
अन् पक्ष्यांशीही करू या दोस्ती।।
२) चला पक्ष्यांना करू येथे गोळा,
अन् त्यांचीच आता भरवूया शाळा.
३) भारद्वाज येई अंगणात,
त्याला बघून फुलतो पारिजात,
पारिजात देईल सुगंध छान,
गजबजून जाईल सर्व रान।।
४) पक्ष्यांसाठी घरोघरी लटकवू पाणवठे,
भरारी घेण्यास त्यांना आकाश होईल थिटे!!
यांसह अनेक स्वरचित कवितांचा विद्यार्थ्यांनी समावेश केला आहे.
मैत्री पक्ष्यांशी या उपक्रमाची प्रेरणा घेऊन शेलसूर गावातील युवकांनी परिसरात वृक्षलागवड केली आहे. त्या वृक्षांना ते दररोज पाणी घालतात. यासाठी गावात एक मोफत टँकर येतो तो केवळ या वृक्षांना पाणी घालण्यासाठी वापरला जातो.
मुलांनी पक्षिगणनाही केली आहे. त्यानुसार पक्षी संख्या- चिमणी ६००-८००, लालगुडय़ा बुलबुल ४००-५००, व्हलगी ४००-५००, साळुंखी ३००-४००, खारुताई ५०, सुतारपक्षी ४ ते ५, कुरकुण्या २५०-३००, कावळे ५००-६००, बगळे ४००- ५००, बहिऱ्या एक असे पक्षी या ठिकाणी नियमित येत आहेत.
पाणी दुर्भिक्षाच्या या काळात गावात सगळीकडे बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा होत असताना शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष सुनील देशमुख, संचालक अरविंद देशमुख, सभापती माधुरी देशमुख, मुख्याध्यापक एस. ए. देशमुख, हरित सेना शिक्षक घनश्याम कापसे यांच्यासह शाळेतील ३० शिक्षक, कर्मचारी, गावकरी या उपक्रमाच्या माध्यमातून जूनपर्यंत कुठूनही पाणी आणून अगदी सुट्टीतसुद्धा पक्ष्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहेत तसेच अजून काही ठिकाणी पाणवठे बसविणार आहेत.
प्रतिक्रिया- १) सुनील देशमुख (संस्थाध्यक्ष)- आम्ही पक्ष्यांविषयी जनजागृती तसेच दुष्काळात आसरा देण्याचे काम करत आहोत. त्याची व्याप्ती अजून वाढविणार आहोत. २) प्रा. विजय घ्याळ - पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे परिसरात नवचैतन्य आले आहे. ३) गौरी राजपूत, इयत्ता ११वी- आम्हाला यातून पक्ष्यांविषयी जास्तीची माहिती मिळाली. त्यांना आम्ही पाणी पुरवतो याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. ४) नंदकिशोर काळे- इयत्ता- ११वी- दुष्काळात रडत न बसता पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देत आम्ही आदर्श निर्माण केला आहे. ५) पांडुरंग धुंदळे, नागरिक- गावात पक्ष्यांविषयी जाणीवजागृती निर्माण झाली. केवळ भुतदया म्हणून नव्हे तर सामाजिक बांधिलकी म्हणून गावागावात असे उपक्रम उभे राहात असतील तर सर्वानीच मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

खुप दिवसांनी इथे आले. वरील सगळ्या बातम्या वाचुन छान वाटले.

बर्‍याचदा इसकाळच्या मुक्तपीठ या सदरातील लेख हास्यास्पद असतात पण आज वाचलेला 'भरारी सातासमुद्रापार' हा श्री यल्लपा सोनवणे या अपंग व्यक्तिचा अनुभव वाचुन खुप बरें वाटले. त्यांच्याच भाषेत वाचा:
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx

विद्यार्थ्यांना वाजवी दरात घरगुती जेवण मिळणार - डबा उपक्रमा बद्दल आलेली सकाळ मधील बातमी खालीलप्रमाणे

पुणे - शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरच्याप्रमाणे जेवण मिळावे, यासाठी विविध शाखांमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन "पुण्याचा डबा' हा उपक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना केवळ 950 रुपयांमध्ये दोन्ही वेळेस जेवण पुरविण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांनी घेतली आहे, त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना कमी पैशात उत्तम जेवण मिळणार आहे.

पुण्यामध्ये दर वर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. मात्र राहण्याचा व जेवणाचा प्रश्‍न उभा राहतो. घरगुती मेस किंवा मोठ्या खानावळीसारख्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली, तरी ते पोषक असेलच याची शाश्‍वती नसते, त्यामुळे विद्यार्थ्यांची उपासमारही होते. परिणामी, बहुतांश विद्यार्थी एक वेळच खानावळ लावतात. याची दखल घेऊन विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन "स्टुडंट्‌स ग्रुप'ची स्थापना केली. त्याद्वारे "पुण्याचा डबा' हा उपक्रम केला आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार विद्यार्थ्यांपर्यंत डबा पोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

या उपक्रमांतर्गत २१ मे पासून विद्यार्थ्यांना डबा पुरविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी 950 रुपये, तर एका वेळेसाठी 550 रुपये आकारण्यात येणार आहेत. याबाबत "पुण्याचा डबा' उपक्रमाचे शेखर नांदखिले व समन्वयक महेश देशपांडे म्हणाले, "शहरामध्ये दोन्ही वेळेच्या जेवणासाठी 1500 ते 2200 रुपये आकारले जातात; परंतु परिस्थितीमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना इतके पैसे देणे शक्‍य होत नाही, त्यामुळेच हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सकाळी व रात्रीच्या वेळी थेट वसतिगृह किंवा त्यांच्या खोलीवर डबा पोचविण्यात येणार आहे. डब्याच्या नोंदणीसाठी 020-25394488, 9763354173 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

... अशी आहे व्यवस्था
- रविवारीही "पुण्याचा डबा' सुरू असणार.
- डबा पोचविण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था.
- डब्यामध्ये चार चपाती, ओली-सुकी भाजी, वरण-भात व लोणचे.
- संपूर्ण जेवण शाकाहारी असून दर्जा-चव उत्तम असणार आहे
- कर्वेनगर, कोथरूड, सहकारनगर, सेनापती बापट रस्ता येथे स्वयंपाकघराची व्यवस्था.

आजच्या TOI मधील बातमी....

सुमीत डागर यांनी आंधळ्या व्यक्तिंसाठिच्या स्मार्टफोनची निर्मिति केली आहे. डागर यांनी ३ वर्षापूर्वी या प्रोजेक्टची सुरुवात केली.त्यांची ६ लोकांची क्रिएट डिझाईन सोल्युशन नावाची टीम आहे..
रोलेक्स अवॉर्ड च्या अंतर्गत दर २ वर्षांनी जगातील ५ लोकांना यंग लॉरेट्स प्रोग्रॅमसाठी निवडण्यात येते आणि त्यांच्या संशोधनाला मदत करण्यात येते.. त्यामधे या ह्या उपक्रमाची निवड होऊन त्याला आर्थिक मदत मिळाली आहे.,
भारतियांच्यसाठी अभिमानाच्या ह्या बातमीला पहिल्या पानावर जागा मिळाली असति तर अजुन आनंद झाला असता...

दुवा >
http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-04-19/gadgets-special/3...

कोल्हापूर - कधी वीजपुरवठा खंडित झाला, पाणी उपसा बंद..., कधी पाईपलाईन फुटली, पाणीपुरवठा बंद..., कधी पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळले, काविळीच्या भीतीमुळे पाण्याचा वापर बंद... पाण्याचा हा खेळखंडोबा कोल्हापूरकरांनी गेल्या दहा-बारा वर्षांत अनेकवेळा अनुभवला आहे. स्वच्छ पाणी, मुबलक पाणी ही तर केवळ स्वप्न वाटण्यासारखी स्थिती झाली आहे; पण कोल्हापुरातले एक कुटुंब असे आहे, की त्यांच्या घरात बाराही महिने चक्क पावसाचे पाणी आहे. हे घर सोडून सगळ्या कोल्हापूरला स्वच्छ, नितळ पाण्याची टंचाई आहे; पण आजही या घरात आपण गेलो तर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुरेल एवढे स्वच्छ पाणी शिल्लक आहे. एस.एस.सी. बोर्डाजवळ यांच्या घरातले हे चित्र आहे. याचप्रकारे प्रयत्न केल्यास कोल्हापुरातल्या बहुतेक घरांत पाणी राहू शकेल, असा श्री. रक्तवान यांचा दावा आहे.

श्री. रक्तवान यांनी आज नव्हे, काल नव्हे तर 1964 पासून पावसाच्या पाण्याची साठवणूक केली आहे. थोडक्‍यात सांगायचं झालं, तर 1964 पासून ते व त्यांच्या कुटुंबीयांनी पिण्यासाठी, जेवणासाठी फक्त पावसाच्याच साठवलेल्या पाण्याचा वापर केला आहे.

श्री. रक्तवान एअर फोर्समध्ये टेक्‍निकल सार्जंट होते. आसाममध्ये ते असताना तेथील पिण्याच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे त्यांचेच नव्हे, तर सर्वांचेच पोट वारंवार बिघडत होते, पण नोकरीमुळे या परिस्थितीला तोंड द्यावेच लागत होते. यातून मार्ग म्हणून श्री. रक्तवान यांनी एका पावसाळ्यात लहान-मोठ्या पावसाचे पाणी गोळा करून ठेवले व त्या पाण्याचा ते पिण्यासाठी वापर करू लागल्याने त्यांचे पोटाचे विकार थांबले. हळूहळू त्यांच्या युनिटमध्ये पावसाचे साठवलेले पाणी सर्वजण पिऊ लागले.

1964 मध्ये श्री. रक्तवान निवृत्त झाले. कोल्हापुरात अरिहंत पार्क येथे त्यांनी घर बांधले; पण पावसाचे पाणी साठवायचे व त्याचाच वापर करायचा हे त्यांनी ठरवले. बंगल्याच्या आवारात एक कूपनलिका खोदली व पावसाचे वाहून जाणारे पाणी त्यात सोडले. इतर पाणी आठशे ते नऊसे चौरस फुटांच्या टेरेस, पत्र्यावरून किती प्रमाणात एकत्र करता येईल याचा अंदाज घेऊन सात टाक्‍यांत हे पाणी भरले. जमिनीला स्पर्श होण्याआधीचे हे पावसाचे पाणी असल्याने ते पूर्ण शुद्ध राहिले.

श्री. रक्तवान यांच्या अनुभवावरून पावसाचे पाणी कधीही शिळे होत नाही. ते पाणी कधीच कुजत नाही किंवा त्यात कसलीही बुरशी धरत नाही व रोज पाच माणसांच्या कुटुंबासाठी जेवण व पिण्यासाठी 10 लिटर पाणी लागते. साठवलेले हे पाणी वर्षभर पुरते. आंघोळ व कपडे धुण्यासाठी ते बोअरचे म्हणजेच त्यांनीच बोअरमध्ये सोडलेले पाणी ते वापरतात.

ते म्हणाले, ""मी पाणी साठवायचे हे तंत्र सर्वांना शिकवण्यास तयार आहे. फक्त मला तुमच्या घराच्या प्रांगणात न्या व मी सांगेन तसे पाण्याचे नियोजन करा. वर्षभर तुम्हाला शुद्ध पाणी पुरेल. सगळे शहर प्रदूषित पाण्याने वेढलेले असेल; पण तुमच्या घरी शुद्ध शुद्ध आणि शुद्धच पावसाचे पाणी मिळेल. हे सहज सोपे आहे. फार अवघड अजिबात नाही; पण फक्त इच्छाशक्‍तीची गरज आहे.

श्री. रक्तवान यांचा संपर्क क्रमांक : 0231-2696227

http://online1.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5238342790678874086&Se...

निळू फुले आणि उपेंद्र लिमये 'फोर्ब्स'च्या यादीत

मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त "फोर्ब्स' मासिकाने भारतातील काही कलाकारांच्या संस्मरणीय भूमिकांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीत दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले (सामना) आणि अभिनेता उपेंद्र लिमये (जोगवा) यांचा समावेश आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत आनंद व्यक्त केला जात आहे.

"सामना' (1974) चित्रपटात निळू फुले यांनी "हिंदूराव पाटील' ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. उपेंद्र लिमये यांनी "जोगवा' (2009) चित्रपटात साकारलेल्या तायप्पाच्या व्यक्तिरेखेचीही प्रशंसा झाली होती. या दोन्ही व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. याबाबत उपेंद्र लिमये म्हणाले, ""भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षानिमित्त "फोर्ब्स'च्या यादीत नाव येणे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. "जोगवा' हा माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. तायप्पाच्या भूमिकेने मला बरेच शिकवले. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडली.''
जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या "सामना' चित्रपटाला 25 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाले होते. उत्कृष्ट अभिनयासाठी राज्य सरकारने निळू फुले यांचा गौरव केला होता. "जोगवा'ने राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवली. उपेंद्र लिमये यांना राष्ट्रीय पुरस्कारासह इतर पुरस्कार मिळाले होते.

पुणेकरांचा एव्हरेस्टवर तिरंगा आणि वैयक्तिक स्वप्नापेक्षा सहकारी, संस्थेला महत्त्व देणारा संघनायक उमेश झिरपे....

वाचताना मन आनंदाने भरून यावे अशी बातमी खूप म्हणजे खूप दिवसांनी वाचायला मिळाली.

मटा मधल्या बातमीचा हा दुवा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20114306.cms

भूषण हर्षे , आनंद माळी आणि गणेश मोरे यांनी केले सर्वोच्च शिखर सर

वेगाने वाहणारे वारे , उणे अंश सेल्सियस तापमान , क्षणाक्षणाला बदलणारा निसर्ग या सर्वांवर मात करून पुण्यातील गिरीप्रेमी या संस्थेच्या तीन गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर ' एव्हरेस्ट ' शुक्रवारी सर केले .

सकाळी आठ वाजता भूषण हर्षे , आनंद माळी आणि गणेश मोरे या मावळ्यांनी आठ हजार ८४८ मीटर उंचीच्या ' एव्हरेस्ट ' वर तिरंगा फडकवून नवा इतिहास रचला . गेल्या वर्षी ' गिरीप्रेमी ' च्या आठ गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम केला होता . या अनुभवाच्या जोरावर गिरीप्रेमींनी यंदा ल्होत्से - एव्हरेस्ट या पहिल्या नागरी जोडमोहिमेचे आयोजन केले होते . उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली हर्षे , माळी आणि मोरे यांच्यासह आशिष माने आणि टेकराज अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते . टेकराज अधिकारीला गेल्या वर्षी एव्हरेस्टला झालेला ' फ्रॉस्टबाइट ' बरा झाला नव्हता . त्यामुळे त्याला आशिषसह ल्होत्सेला जाता आले नाही . गुरुवारी आशिष माने या एकट्या एव्हरेस्टवीराने जगातील चौथ्या क्रमांकाचे ल्होत्से शिखर सर केले होते . त्यानंतर शुक्रवारी हर्षे , माळी आणि मोरे यांनी एव्हरेस्ट सर करून ही जोड मोहीम यशस्वी करून दाखवली . खराब हवामानामुळे या टीमला गुरुवारी ' समिट अटेम्प्ट ' साठी जाता आले नव्हते . त्यामुळे त्यांना ' साउथ कोल ' लाच मुक्काम करावा लागला . एक दिवस अतिरिक्त वाया गेल्याने संघाला ऑक्सिजन सिलिंडरचा तुडवडा जाणवला . म्हणूनच मोहिमेचा नेता उमेश झिरपे याने बेस कॅम्पला परतण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या तीन सहकाऱ्यांना एव्हरेस्ट सर करण्याची संधी दिली . अखेर हर्षे , माळी आणि मोरे यांनीही आपल्या नेत्याला निराश न करता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली . गिरीप्रेमींची ही सत्तर दिवसांची मोहीम यशस्वी झाली , म्हणून पुण्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

घटस्फोटानंतर मुलाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीमुळे त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला खरा... मात्र , कोर्टकचेरीच्या कचाट्यामुळे नको ते कोर्ट अशी मानसिकता झालेल्या त्या दोघांना एकत्र येण्यास अडचण वाटत होती... फॅमिली कोर्टातील समुपदेशकांनी त्यांना सहा महिने लिव्ह इन मध्ये राहण्याचा पर्याय सुचविला... त्यामुळे तब्ब्ल चार वर्षांनी ते पुन्हा एकत्र येणार आहेत.

सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळावी तसेच लग्नाचा ठाम निर्णय घेता यावा म्हणून हा पर्याय सुचविण्यात आला आहे. त्यांनी तो मान्य करून नंतरच लग्न करण्याचे ठरविले आहे.

अरुण आणि नेहा (दोघांची नावे बदलली आहेत). अरुण पुण्यात आयटीमध्ये कामाला होता. तर नेहा मुंबईला सरकारी नोकरीत चांगल्या पदावर होती. लग्नानंतर त्याने तिला नोकरी सोडून घरी राहावे म्हणून तगादा लावला. चांगली नोकरी असल्यामुळे नेहा ती सोडण्यास तयार नव्हती. या कारणावरून त्यांच्यात खटके उडू लागले. त्यांच्या या वादात दोघांच्या घरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. आणि त्यांचे एकमेकांशी पटेनासे झाल्यामुळे त्यांनी कोर्टात घटस्फोटसाठी केस दाखल केली.

घटस्फोट घेताना कोर्टाने मुलाचा ताबा त्याच्याकडे दिला. तिला मुलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली. मात्र , काहीतरी कारणे काढून तो मुलाची भेट नाकारत असे. तिने कोर्टात मुलाला भेटण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज दाखल केला होता. कोर्टाने तो मान्य करून पंधरा दिवसातून एकदा मुलाला भेटण्याची दिली होती.

मुलाच्या निमित्ताने त्या दोघांची भेट होत होती. घटस्फोटानंतर त्या दोघांना आपल्या चुका लक्षात आल्या आणि मुलासाठी पुन्हा एकत्र येण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मात्र , भूतकाळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती झाल्यास काय होईल या विचारामुळे त्यांचा निर्णय ठरत नव्हता.

फॅमिली कोर्टातील समुपदेशकांनी त्या दोघांचे समुपदेशन केले. लग्न करण्यापूर्वी त्यांना सहा महिने एकत्र राहण्याचा सल्ला देण्यात आला. या काळात त्यांना पुन्हा एकमेकांना समजावून घेता येईल , असे सुचविण्यात आले. त्या दोघांनी हा पर्याय मान्य करून केला. सहा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ते दोघे पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

मोबाइल चार्जिंग फक्त २० सेकंदात!

मटा मधली बातमी

मोबाइल फोन जास्त वापर करणाऱ्यांसाठी किंवा सतत फिरतीवर असलेल्यांसाठी खूषखबर असून केवळ २० ते ३० सेकंदात मोबाइल पूर्णपणे चार्ज करू शकेल, अशा सुपर-कॅपॅसिटर उपकरणाचा शोध एका १८ वर्षीय भारतीय-अमेरिकन मुलीने लावला आहे. कॉलिफोर्नियात राहणा - या ईशा खरे हिने ही कामगिरी केली असून त्यासाठी तिला इंटेल फाऊंडेशनच्या ' यंग सायंटिस्ट अॅवॉर्ड ' ने गौरवण्यात आले आहे.

या कामगिरीबद्दल ईशाला इंटेलकडून ५० हजार डॉलर्सचे पारितोषिक मिळाले आहे. त्याशिवाय टेक्नॉलॉजी क्षेत्रातील बडी कंपनी ' गूगल ' नेही तिच्या या क्रांतिकारी संशोधनाची दखल घेतली आहे. ईशाच्या या उपकरणाचे आयुष्य १० हजार चार्ज-रिचार्ज सायकलएवढे आहे. मोबाइलच्या सामान्य बॅटरीचे आयुष्य एक हजार सायकल्स असते. त्यामुळे ईशाने बनवलेले उपकरण मोबाइल चार्जिंगसाठी फारच क्रांतिकारी ठरणार आहे.

ईशाच्या या सुपर-कॅपॅसिटरची चाचणी सध्या फक्त एलईडी दिव्यांवरच करण्यात आली आहे. मात्र, मोबाइल फोन व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही हे उपकरण वापरता येणार आहे. ' हा सुपर-कॅपॅसिटर लवचिक असल्याने कपड्यांमध्ये क‌िंवा गुंडाळता येणाऱ्या डिस्प्लेमध्येही त्याचा वापर करता येऊ शकेल. बॅटरीच्या तुलनेत त्याचे अनेक वापर आणि उपयोग आहेत, ' असे ईशाने सांगितले. ईशाच्या संशोधनाचा कारच्या बॅटरीमध्येही वापर करता येऊ शकतो, असे इंटेलचेही म्हणणे आहे.

कसा आहे सुपर-कॅपॅसिटर?

अत्यंत लहान आकाराचा हा सुपर-कॅपॅसिटर एनर्जी स्टोरेज डिव्हाइस असून तो मोबाइलच्या बॅटरीमध्ये बसवता येतो. अत्यंत कमी जागेत भरपूर ऊर्जा साठवून ठेवण्याची, चटकन चार्ज करण्याची क्षमता ही या सुपर-कॅपॅसिटरची वैशिष्ट्ये आहेत.

आणि हा दुवा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20164009.cms

अजून एक, नुसती शुभ / चांगलीच नाही तर स्फुर्तीदायक बातमी म्हणजे आपल्या मराठी वीरांपाठोपाठ एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा सिन्हा.... पंगूम लंघयते एव्हरेस्टम्

मटामधली बातमी खालील प्रमाणे

आकांक्षापुढती एव्हरेस्ट ठेंगणे !

चोरट्यांनी धावत्या ट्रेनमध्ये फेकून दिल्याने पाय गमावलेली राष्ट्रीय स्तरावरील माजी व्हॉलीबॉलपटू अरुनिमा सिन्हा हिने मंगळवारी इतिहास घडवला . पाय गमावल्यानंतर खेळावर पाणी सोडव्या लागलेल्या अरुनिमाने जिद्द न हरता , अथक प्रयत्नांनी मंगळवारी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आणि जगातील या सर्वोच्च शिखरावर गवसणी घालणारी पाय नसलेली पहिली भारतीय गिर्यारोहक ठरण्याचा मान मिळवला .

२५ वर्षीय अरुनिमाने टाटा ग्रुपच्या इको एव्हरेस्ट पथकातून मंगळवारी सकाळी १० . ५५ वाजता एव्हरेस्टवर पाऊल ठेवले , अशी माहिती नेपाळच्या पर्यटन खात्याने दिली .

उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरची रहिवासी असलेली अरुनिमा १२ एप्रिल २०११ रोजी पद्मावती एक्स्प्रेसने लखनऊहून दिल्लीला जात असताना , सोनसाखळी चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोध केल्यानंतर चोरट्यांनी तिला धावत्या ट्रेनबाहेर फेकले . त्यावेळी बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या ट्रेनची धडक बसल्याने ती गंभीर जखमी झाली . तिचा जीव वाचवण्यासाठी तिचा डावा पाय काढून टाकावा लागला .

मात्र लोकांनी आपल्याकडे दयेच्या नजरेने बघू नये , यावर ती ठाम होती . त्याच वेळी एव्हरेस्ट मोहिमांबद्दल वाचून तिने हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा निश्चय केला . गेल्या वर्षी उत्तरकाशी येथील टाटा स्टील अॅडव्हेंचर फाउंडेशनच्या शिबिरात पहिली भारतीय महिला एव्हरेस्टवीर बच्छेंद्री पाल हिच्या मार्गदर्शनाखाली अरुनिमाने प्रशिक्षणाला सुरुवात केली . गेल्या वर्षी तिने लडाखमधील ६ हजार ६२२ मीटर उंचीचे माउंट चमसेर कांग्री शिखर सर केले . तिचे एव्हरेस्ट गाठण्याचे स्वप्न अखेर मंगळवारी प्रत्यक्षात आले .

आणि हा दुवा

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20175648.cms

आजच्या 'लोकसत्ता'मधील पहिल्या पानावरील ठळक मथळा-

देशी 'भीम'टोल्याने मिकी माऊस चीतपट !

'डिझने'च्या कित्येक दशकं जगभर गाजत असलेल्या मिकी माऊस सारख्या अ‍ॅनिमेशन कॅरेक्टर्सना लोकप्रियतेत आतां भारतीय 'भीमा'सारख्या अ‍ॅनिमेशन व्यक्तिरेखा अव्हान देताहेत व याची गंभीर दखल डिझने इंडियाला घ्यावी लागावी, ही भारतीय 'क्रिएटीव्हीटी'ची कमालच म्हणायला हवी !!
लगे रहो !!

सोळा आणे खरी गोष्ट भाऊ, आमच्या घरात देखिल त्याचा प्रत्यय घेत असतो. मुलांच्या व त्यांच्या मित्रमंडळींच्या वह्या, दप्तरे, टी-शर्ट यांना भीम-स्पर्श झालाच पाहिजे असा अगदी आग्रह असतो.

खोल दरीत कोसळलेल्या तरुणाची १९ तासांनंतर सुटका. छायाचित्र काढताना तोल जाऊन दरीत कोसळलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले..

सविस्तर बातमी खालच्या सकाळच्या लिंक मधे:
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5690725955692643169&Se...ताज्या बातम्या&NewsDate=20130607&Provider=सुधाकर काशीद ः सकाळ वृत्तसेवा&NewsTitle=खोल दरीत कोसळलेला तरुण 19 तासांनी बाहेर

महाभारत ही सत्यघटना आहे की महाकाव्य , तो इतिहास आहे की पुराणकथा याबाबत मतभेद असले , तरी त्याचा प्रभाव भारतीयांवर अद्यापही तितकाच घट्ट आहे याबाबत दुमत नसावं. कानपूरची विजया कुमारी नावाची एक गरीब , सामान्य महिलाही त्याला अपवाद नसणं स्वाभाविक आहे. त्यामुळं तिनं तुरुंगात जन्म दिलेल्या आपल्या मुलाचं नाव कन्हैय्या असं ठेवणं तर्कसंगतच म्हणायला हवं. विशेष म्हणजे या कन्हैय्यानंही मोठं मोल मोजून आपल्या आईचा कारावास संपवला आहे. हा कन्हैय्या आणि त्याची आई विजया कुमारी यांची ही लढाई म्हणजे भारतीय लोकशाहीतील आधुनिक महाभारताचा एक अध्यायच म्हणावा लागेल.

विजया कुमारीला १९९०मध्ये एका खुनाच्या खटल्यात जन्मठेपेची सजा सुनावली गेली होती. तिची रवानगी लखनौ तुरुंगात केली गेली. याच तुरुंगाच्या चार भिंतींत तिनं आपल्या बाळाला , कन्हैय्याला , जन्म दिला. सासर-माहेरच्यांनी पाठ फिरवलेली , कोणाचा सहारा नाही , अशा स्थितीत हे बाळ हाच तिच्या आनंदाचा ठेवा होता. दरम्यान , १९९४मध्ये पुढे आलेल्या पुराव्यांच्या आधारे कोर्टाने तिला जामीन मंजूर केला. सुटकेचा मार्ग दिसत असला तरी त्यावरून चालणं अशक्य होतं ; कारण जामिनाचे पाच हजार रुपये भरायचे कुठून , हा प्रश्न होता. विजया कुमारी ही रक्कम भरू शकली नाही. पुढं दोन वर्षांनी नियमाप्रमाणं कन्हैय्या सहा वर्षांचा झाल्यानं त्याला सरकारी बालगृहात पाठवलं गेलं. तिथं तो शिकला. मोठा झाला. तो १८ वर्षांचा झाल्यानंतर तुरुंग , बालगृह या साऱ्याशीच त्याचा नियमानुसार काही संबंध उरला नाही. या उघड्या जगात एकट्यानं जगताना तुरुंगात जखडलेल्या आईची याद त्याच्यामागं सावलीसारखी होती.

छोटी-मोठी कामं करता करता त्याला एका तयार कपड्यांच्या कारखान्यात काम मिळालं. त्याचा मालक एक भला माणूस होता. तो सांगतो , ' जुलै २०१२मध्ये हा मुलगा काम मागायला माझ्याकडे आला. तेव्हापासून मी पाहतो आहे , तो झपाटल्यासारखा कामच करतो. थोडे पैसे जमले की तो आईला भेटायला जायचा. परत आला की पुन्हा कामाला जुंपून घ्यायचा. ' तिथं दिवसरात्र काम करून त्यानं पै नि पै जमवली. गेल्या वर्षी त्यानं लखनौ हायकोर्टात आईच्या सुटकेसाठी अर्ज केला. जामिनाचे पाच हजार रुपये देऊ केले. त्याने दिलेले तपशील पाहून न्यायाधीशही हेलावले. विजया कुमारीप्रमाणेच अन्य असे किती कैदी अशा प्रकारे तुरुंगात बंदिवान आहेत , त्याचे तपशील त्यांनी आता सरकारकडून मागवले आहेत.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात , तब्बल १९ वर्षांनंतर , विजया कुमारीनं लेकाचा हात धरून तुरुंगाच्या बाहेर पाऊल टाकलं तेव्हा तिच्या डोळ्यांत आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. या माय-लेकरांच्यासाठी पाच हजार रुपयांची किंमत १९ वर्षांचा बंदिवास , परस्परांपासून १३ वर्षांची ताटातूट , एकटेपणाचं भयाण जीणं , वंचना आणि दिवसरात्र जीवतोड मेहनत इतकी प्रचंड होती. ही किंमत मोजणारा कन्हैय्या म्हणतो , ' माझ्या आईला माझ्याशिवाय कोणी नाही आणि मला तिच्याशिवाय कोणी नाही. मला खूप वाईट वाटायचं. रडू यायचं. पण आता आई माझ्याजवळ आहे. मी खूप खुश आहे..

सौ.महाराष्ट्र टाइम्सः

कार मेकॅनिकने उभारले हॉस्पीटल

खरं तर, असा 'शिवाजी' आजच्या काळात प्रत्यक्षात भेटणं महाकर्मकठीणच आहे. पण गुजरातमधील साणंदजवळ तेलाव गावात राहणा-या मोमीन हुसेन यांची गोष्ट ऐकली की रजनीकांतच्या या 'शिवाजी'ची आठवण आल्याशिवाय आणि ऊर अभिमानानं भरल्याशिवाय राहत नाही. त्यांनी १५ वर्षांपूर्वी शून्यातून सुरुवात केली... कष्ट करुन पैसा कमवला... स्वत:चा संसार थाटला... आणि जेव्हा समाजऋण फेडायची वेळ आली, तेव्हा सारं काही हसत हसत समाजसेवेसाठी देऊन टाकलं... वडिलोपार्जित जमिनीचे १० कोटी रुपये द्यायला बिल्डर तयार असतानाही, ते नाकारून, या जागेवर स्वतःच्या कमाईतून हॉस्पिटल बांधण्याची त्यांनी केलेली किमया सा-यांसाठीच प्रेरणादायी आहे.

वयाच्या २०व्या वर्षी, म्हणजेच आजपासून ३५ वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी मोमीन हुसेन घराबाहेर पडले. शिक्षण झालेलं नसल्यानं नोकरी मिळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मग मिळेल ते काम करण्यावाचून दुसरा काही पर्यायच नव्हता. काही महिने इकडे-तिकडे कामं केल्यानंतर गांधीनगरमधील एका गॅरेजमध्ये त्यांना काम मिळालं. गाड्या दुरुस्तीचं काम शिकवायला मेकॅनिक तयार होते आणि ते शिकायची मोमीन यांचीही इच्छा होती. त्यामुळे सगळं जमून आलं आणि बघता-बघता मोमीन हुसेन एकदम एक्स्पर्ट मेकॅनिक होऊन गेले.

या गॅरेजमध्ये १५ वर्षं काम केल्यानंतर मोमीन यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत गावी परतायचं ठरवलं. सात लाख रुपयांची पुंजी घेऊन ते स्वगृही परतले आणि गावातच त्यांनी गॅरेज सुरू केलं. या व्यवसायातही त्यांचा चांगलाच जम बसला. पण, तरीही मोमीन अस्वस्थ होते. कारण, गावात एक उत्तम हॉस्पिटल बांधण्याचा विचार त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून घोळत होता.

मोमीन यांच्याकडे वडिलोपार्जित जमीनीचा तुकडा होता. ही जमीन अगदी मोक्याच्या ठिकाणी होती आणि त्यावर अनेक बिल्डरांचा डोळा होता. अनेकांनी तर या जागेसाठी दहा कोटी रुपये द्यायची तयारीही दाखवली होती. म्हणजेच, मोमीन यांच्या पुढच्या दोन पिढ्यांना पुरेल एवढा पैसा त्यातून त्यांना मिळाला असता. पण, या सर्व ऑफर धुडकावून मोमीन यांनी या जागेवर दोन वर्षांपूर्वी 'आदर्श हॉस्पिटल' उभारलं आणि आजपर्यंत या हॉस्पिटलनं हजारो रुग्णांना जीवनदान दिलं आहे. विशेष म्हणजे, या हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून त्यांना परवडेल इतकंच शुल्क आकारलं जातं. त्यांच्यावर कुठलाही दबाव आणला जात नाही.

'आदर्श हॉस्पिटल'च्या उभारणीत अहमदाबादमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक कार्तिक शुक्ला यांचंही मोलाचं योगदान आहे. कारण, वैद्यकीय सेवेसोबतच आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री पुरवण्याचं वचन त्यांनी मोमीन यांना दिलं आणि ते पाळलंही. शुक्ला यांच्यासोबतच इतर अनेक डॉक्टर मानधनाचा विचार न करता या हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. अनेक सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरही आठवड्यातून एकदा या हॉस्पिटलला आवर्जून भेट देतात आणि मोफत सेवा पुरवतात.

आजच्या काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे पळत असताना आणि स्वार्थाचाच विचार करत असताना मोमीन यांनी दाखवलेलं दातृत्व खरंच कौतुकास्पद आहे. तसंच, त्यांचं 'आदर्श हॉस्पिटल'ही अगदी नावाप्रमाणे 'आदर्श'च म्हणावं लागेल.

महमंद अली जिना यांचं बलुचिस्तानातलं घर उध्वस्त झालं आहे. बातमी वाचून मन प्रसन्न झालं. बलुची लोकांनी पाकी अत्याचार्‍यांविरुद्ध उभारलेल्या लढ्यास उत्तरोत्तर यश येवो.

बलुची लोकांना शेंड्या लावून पाकिस्तानात ढकलणार्‍या जिनाचं घर म्हणे राष्ट्रीय स्मारक! बलुची जनतेची मांडलेली उघड थट्टा आता इतिहासजमा झाली आहे.

-गा.पै.

दहावीत चांगले यश संपादन करण्यार्‍या मुलींना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले. {सकाळ}

अहमदनगरजवळच्या केडगांव येथील महिलानी वटपौर्णिमेला गांवातील विधवा महिलांची ओटी भरून त्यांच्या हस्तें वृक्षरोपणाचा कार्यक्रम केला ! 'तनिष्का' मार्फत झालेल्या या कार्यक्रमातील विधवा महिलांचा टीव्हीवर आत्तांच दाखवलेला प्रतिसाद हृदयस्पर्शी होता !

भाऊ, छान बातमी. मी या वर्षी ऑफिस मधील हाऊस किपींग च्या मुलींना संक्रांती चे वाण दिले होते त्यात दोन विधवा मुली ही होत्या.त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी मी कधीच विसरू शकणार नाही. त्या आधी तयारच न्हवत्या पण समजावून सांगीतल्यावर आणि वाण दिल्यावर कितीतरी वेळ माझा हात हातात धरून उभ्या होत्या.

क्रीडामंत्रालयाने मेजर ध्यानचंद यांचे नाव 'भारतरत्न' साठी सुचविले आहे. त्यामुळे क्रीडाक्षेत्रातील पहिल्या भारतरत्नाचा मान अत्यंत योग्य व्यक्तीला मिळणार आहे. खाशाबा जाध्व यांनाही हा बहुमान पुढच्या वर्षी मिळावा अशी शुभेच्छा करू.

उपवास करून कैद्यांची विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

बिहार माध्यान्ह भोजन विषबाधा प्रकरण
पाटणा- बिहारमधील बेऊर कारागृहातील कैद्यांनी एक दिवसाचा उपवास करून छपरा जिल्ह्यात माधान्ह भोजन विषबाधेतील मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महत्त्वाचे म्हणजे कैद्यांच्या भोजनासाठी खर्च केली जात असलेली एका दिवसाची रक्कम मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांना दिली जावी, अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाला केली आहे.

कारागृहातील सुमारे सतराशे कैद्यांनी आज एक दिवसाचा उपवास केला. त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून माध्यान्ह भोजनानंतर 23 चिमुरड्यांचा बळी गेल्याबद्दल दुःखही व्यक्त केले आहे. "दुःखाच्या या प्रसंगात तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. आम्ही सर्व मुलांच्या नातेवाइकांसोबत आहोत,' असा निरोपही मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांना कैद्यांनी दिला आहे.

अट्टल नक्षलवादी प्रमोद मिश्रा याच्यासह विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या अनेक कैद्यांची ही भावना आहे. बेऊर कारागृहातून नेहमी कैद्यांच्या हाणामारी किंवा अशाच स्वरूपाच्या इतर गंभीर बातम्या येत असतात. मात्र पहिल्यांदाच कैद्यांचे बदललेले स्वरूप अनुभवायला मिळत असल्याने सरकार व प्रशासकीय पातळीवरही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. विषबाधा प्रकरणात निष्पाप मुलांचा बळी जाण्याच्या प्रकाराने जनतेसह कैद्यांनीही संवेदना व्यक्त केल्याने राज्यावर भावनिक आघात झाल्याचे मानले जात आहे.

गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरून त्यांच्या शिक्षणातील मुख्य अडसर दूर करण्याचे काम शहरातील एक नगरसेविका गेल्या तीन वर्षांपासून करीत आहेत. प्रभागातील साडेपाचशे मुलांचे या शैक्षणिक वर्षाचे शुल्क त्यांनी भरले आहे. या उपक्रमात त्यांनी आतापर्यंत चौदाशे मुलांचे शुल्क भरले आहे.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5749614384201114590&Se...

अरे वा, खूप छान बातमी भरत मयेकर, मस्तच आहे वेबसाईट

बरेच दिवसांनी ह्या धाग्यावर आलोय, बाकीच्या पण बातम्या चांगल्या आहेत. Happy

Pages