शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या

Submitted by हर्पेन on 23 January, 2013 - 07:40

माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"

खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.

मनावर मळभ आणणार्‍या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्‍या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"

http://vishesh.maayboli.com/node/1120

चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्माशीलाची बातमी खरंच खूप चांगली आहे. असे विचार असणारे पती पत्नी समाजात अजून आले तर नक्कीच सुधारणा होतील.

पवन आणि पद्मशीला दोघांना सलाम, कौतुक आणि अभिनंदन असेच एकमेकांच्या साथीने आयुष्यातील पुढील स्वप्ने साकार करा, त्यासाठी शुभेच्छा.

लोकहो,

डॉ. अमोल दिघे यांना डॉ. शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक जाहीर :
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/--/articleshow/23124760.cms

मी अमोल दिघेस ओळखत असे. ठाण्याला त्याचं घर आमच्या जवळच होतं. अतिशय हुशार, निगर्वी आणि साधा मुलगा. १० वी आणि १२ वी (विज्ञान) दोन्ही वर्षी गुणवत्ता यादीत चमकलेला. दोन्ही वर्षी गुणवत्ता यादीत येणं तसं बर्‍यापैकी अवघड आहे. पुढे त्याने आयायटीत (पवई) प्रवेश घेतला.

अगदी राहवत नाही म्हणून एक किस्सा सांगावासा वाटतो. आयायटी मॅथ्स ऑलिम्पियाड या अत्यंत प्रतिष्ठेच्या गणिताच्या परीक्षेस हे साहेब बसायचे. बसण्यास किमान पात्रता १० वी पास होती. ११ वी आणि १२ वीच्या वर्षी यांनी चक्क पहिला क्रमांक पटकावला. १३ वी च्या वर्षी महाशय आयायटीत शिकायला होते. एके दिवशी नाक्यावर नेहमीप्रमाणे कंपू जमलेला असतांना आम्हाला दिसले. साहजिकच विचारणा झाली. म्हंटलं,

" यंदा पण स्पर्धा जिंकणार का? "

" नाही रे. यंदा मी बसत नाहीये! "

" पण का? बस की, हॅटट्रिक होऊन जाईल. "

" अरे, मी यंदाची प्रश्नपत्रिका काढलीये! "

किमान पात्रता १० वी पास नसती, तर या साहेबांनी शालेय वयातच स्पर्धा जिंकली असती.

आ.न.,
-गा.पै.

श्री.गा.पै....

फार अभिमानास्पद अशी बातमी तुम्ही इथे दिली आहे. तुमचे
आणि डॉ.अमोल दिघे यांचे योगायोगाने बोलणे झालेच या दरम्यान, तर माझ्याकडून त्याना हार्दिक शुभेच्छा जरूर कळवाव्यात. खूप मोठे पारितोषिक त्यानी मिळविले आहे.

अशोक पाटील

डॉलर वि. रुपया, वटहुकूम फाडून टाकायची भाषा, खेडूत स्त्री, चारा, २जी, कोलगेट आणि तत्सम घोटाळे, महिला सबलीकरणाचे नारे या सगळ्या पार्श्वभूमीवर खालची मटातली बातमी इथे द्यावीशी वाटली...

तिसरा डाव

राजकीय नेता कसा असावा , याचं कुणी गाईड लिहायला घेतलं तर तो कसा असू नये याचं अँजेला मर्केल हे उत्कृष्ट उदाहरण ठरावं . एक तर मर्केल बाई मिडीयापासून चार हात दूर असतात . त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ना कसला करिष्मा आहे , ना त्या देखण्या वगैरे आहेत ... त्यांच्या कपड्यांची निवडही अशीतशीच . ... त्यांच्या प्रचार मोहिमेत नवं असं काहीच नव्हतं . मर्केल बाईंच्या वैयक्तिक आयुष्यातही फार चवीने चघळण्यासारखे नाही , अगदीच साधं सरळ आहे ते ! ... आणि त्या पटापट धाडसी निर्णय घेतात म्हणाल तर अजिबातच नाही , गळ्याशी आल्याशिवाय बाई ढिम्म हलत नाहीत ...' वॉशिंग्टन पोस्ट ' च्या अॅन अप्लेबाम यांनी अँजेला मर्केल बाईंचं चित्र हे असं रंगवलंय . ते तंतोतंत खरं असूनही जर्मनीच्या जनतेनं देशाची सूत्र त्यांच्याकडे सोपवलीत , आणि तीही सलग तिसऱ्यांदा . कारण युरोपियन समुदायातील इतर देश युरोच्या संकटात गळ्यापर्यंत बुडत असताना त्यांनी जर्मनीला या संकटाची झळ लागू दिली नाहीच , उलट ग्रीससारख्या देशाला दिवाळखोरीतून बाहेर काढण्यासाठी हात दिला . युरोपचं नेतृत्व समर्थपणे सांभाळत जर्मनीला सगळ्यात अग्रभागी ठेवण्याचं अवघड काम मर्केल बाईंनी चॅन्सलर म्हणून करून दाखवलं आणि जर्मनांनी त्यांना पुन्हा कौल दिला .

' द युरो इज अवर कॉमन फेथ अँड युरोप इज अवर कॉमन फ्युचर ,' असं म्हणणारी जगातली ही सर्वांत शक्तिमान महिला . जर्मनीच्या पहिल्या युरोच्या संकटातून जर्मनीला सुरक्षित ठेवण्याचं फळ त्यांना मिळालंच . पण त्यांच्या विजयाची एक आणखी वेगळी थिअरीही मांडली जाते . ती आहे जर्मन माणसाच्या सरासरी वयाची . सध्या जर्मनीची लोकसंख्या आहे , ८ कोटी २० लाख . आणि देशाचं सरासरी वय आहे ४५ . मतदान करणाऱ्या जर्मन माणसाचं वय त्याहूनही अधिक आहे ... ते आहे ५० वर्षे . कोणताही नवा धोका न घेता हातात आहे ते दीर्घ काळासाठी स्थिर राहील , असा सुरक्षित विचार करणाऱ्या मध्यमवयीन जर्मनीने सत्ता ५९ वर्षांच्या मर्केल बाईंच्या हातात देणं साहजिक होतं . आयुष्यभर कष्ट करून जर्मन माणसानं कमावलेला पैसा कर्जबाजारी ग्रीस आणि इटलीच्या फाटलेल्या अर्थव्यवस्थेला ठिगळ लावण्यासाठी वाया जाणार नाही याची काळजी घेणारी आणि त्याच वेळी कर्जापायी युरोप रसातळाला जाणार नाही याची काळजी घेणारी ' अँजी ' त्यांना विश्वासार्ह वाटली .

युरोपीय समुदाय आणि युरो बुडाल्यातच जमा आहे , अशी भाकितं वर्तवणाऱ्यांना ते दोन्हीही अजून शाबूत आहेत आणि रखडत का होईना युरोची स्थिती सुधारते आहे हे मान्य करावं लागतं . आणि हे श्रेय मर्केल बाईंचं आहे .

त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या हा योगायोग नाही . त्यांचे निर्णय उशिराने घेतलेले असले तरी पक्के असतात . त्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या शिरावर घेतलेली असते . ग्रीक युरो संकटाचं उदाहरण घेतलं तर हे स्पष्ट होईल . सगळी माध्यमं ग्रीक राज्यकर्त्यांचे वाभाडे काढत असताना शक्य असूनही मर्केल बाई नि ग्रीक नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं नाही . उलट युरोपीय समुदायाचे अधिकारी अथेन्सला पाठवले , संकटातून बाहेर पाडण्यासाठी मार्ग शोधला , सरकारी सुट्ट्यांना कात्री लावली , मनोरंजनावरचा कर वाढवला , सरकारी घरांच्या योजनेवरचा खर्च आवरता घेतला ... आणि ग्रीसने पुन्हा श्वास घेतला . हे सगळं बिनबोभाट ... खुद्द ग्रीसमधून त्यांच्यावर नाझी म्हणून टीका झाली पण बाई स्थितप्रज्ञाचा अवतार . प्रत्येक शब्द तोलून मापून आणि ठाम . मग तो अणुप्रश्न असो की ' जी 8' देशांच्या परिषदेतील वादग्रस्त विषयावरील चर्चा . कोणी काहीही म्हणो , त्यांचे निर्णय बदलत नाहीत . म्हणूनच मर्केल यांच्या शब्दाला जागतिक राजकारणात प्रचंड वजन आहे . यामागे मर्केल यांची जडणघडण आहे ... त्यांच्या पूर्व जर्मनीतल्या बालपणाशी हे थेट जोडलंय .

अँजेला यांचा जन्म प . जर्मनीतला . पण त्या वाढल्या पूर्व जर्मनीत . वडील धर्मगुरू . पण राजकीयदृष्ट्या सजग . सोशालिस्ट विचारांचे . ते चर्चमध्ये राजकीय बैठका घ्यायचे . जेवणाच्या टेबलावरही वादळी चर्चा व्हायच्या . पण पोलादी पडद्याच्या त्या वातावरणात कोणी मोकळेपणाने जाहीर मत मांडेल अशी परिस्थितीच नव्हती ... न जाणो कुणी ' स्तासी ' म्हणजे गुप्त पोलिस ऐकायचा ... योग्य वेळ आल्याशिवाय आपले पत्ते उघड न करण्याची सवय अँजेलामध्ये मुरली ती अशी .

अँजेलाने विज्ञान शाखा निवडली . क्वांटम केमिस्ट्रीत तिने पीएच . डी . मिळवली आणि संशोधकाची नोकरी सुरू केली . या साध्या सरळ आयुष्याला कलाटणी मिळाली ती पूर्व आणि पश्चिम जर्मनीला विभागणारी बर्लिनची भिंत कोसळली तेव्हा ... १९८९ च्या नोव्हेंबर महिन्यात ही घटना जर्मन माणसाच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ घडवणारी घटना होती ! पस्तीस वर्षांच्या कम्युनिझममध्ये वाढलेल्या अँजेलाने राजकारणात यायचं ठरवलं ते याच काळात . पुरुषधार्जिण्या ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाचा पर्याय तिने निवडला हेही आश्चर्यच . हेल्मुट कोल तेव्हाचे चॅन्सलर . अँजेलाचे राजकीय गुरू . ते तिला ' मेडशन ' म्हणजे बेबी म्हणायचे . ती कोल यांच्या मंत्रिमंडळात महिला विभागाची मंत्री झाली . पुढे एका आर्थिक प्रकरणात अडकलेल्या कोल यांना अँजेलाने जाहीरपणे राजीनामा देण्यास सुचवण्याचे धारिष्ट्य दाखवले . पक्षात हा धक्का होता पण सामान्य जर्मनांच्या मनातली तिची प्रतिमा उजळली . २०००मध्ये पक्षाचं अध्यक्षपद तिच्याकडे चालून आलं आणि त्यानंतर पाचच वर्षांनी जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सलर होण्याचा मान तिला मिळाला . त्यानंतर सतत आठ वर्षे त्या सत्तेत आहेत .

जर्मनीत मर्केल यांना ' मुट्टी ' म्हणतात . मुट्टी म्हणजे आई . कठीण प्रसंगात जिच्या हाती आपण
सुरक्षित आहोत अशी आश्वासक भावना जिच्याविषयी वाटते ती मुट्टी . जर्मन माणसाला त्यांच्याविषयी नेमकं हेच वाटतं . सध्या राहणीतून , सामान्य जीवनशैलीतून त्यांनी ही प्रतिमा जपलीय . मंत्रिमंडळाची लांबलचक बैठक संपवून त्याच बिझनेस सुटात त्या सुपर मार्केटमध्ये जातात . संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाज्या विकत घेतात . संपलेलं वाणसामान बास्केटमध्ये टाकून मग घरी येतात . मर्केलबाईंचे पती संशोधक आहेत . पण त्यांनी स्वतःला राजकीय झगमगाटापासून दूर ठेवलंय . एरवी शांत असणाऱ्या मर्केलबाई फुटबॉलचे सामने बघताना मात्र आमूलाग्र बदलून जातात . त्यातही जर्मनीची टीम खेळत असेल तर त्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो . महत्त्वाचे सामने त्या कधीही चुकवत नाहीत . जर्मनी जिंकली तर कसलीही औपचारिकता न पाळता थेट ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन खेळाडूंचे अभिनंदन करण्याइतका त्यांचा उत्साह दांडगा असतो . ब्रास्टीअन श्वाइनस्टाइगर या फूटबॉलपटूच्या त्या खास फॅन आहेत !
अँजेला मर्केल बोलताना हातांच्या बोटांची विशिष्ट मुद्रा करतात . दोन्ही अंगठे आणि इतर बोटं एकमेकांशी जुळवून तयार होणारा हा ' डायमंड ट्रँगल ' म्हणजे त्यांची सिग्नेचर स्टाइल आहे . या मजबूत त्रिकोणात जर्मनी सुरक्षित आहे , हा ठाम विश्वास मर्केलबाईंनी तमाम जर्मनवासीयांना दिलाय .

इतर युरोपीय उद्योगांना टाळं लागत असताना आजही जगभरातले लोक जर्मन उत्पादनावर विश्वास ठेवतात . कारण ती मजबूत , टिकाऊ आणि विश्वासार्ह असतात ... मर्केलबाईही अगदी तशाच आहेत !

मित....

"चॅन्सेलर" अँजेला मर्केल यांच्याविषयी त्या तिसर्‍यांदा निवडून आल्यानंतर बरेचसे वाचले गेले होते. त्यांची तिथली प्रतिमा बिनडागाचीच कशी आहे शिवाय "जर्मनी" म्हणजे काम करणार्‍यांचा देश असे जे चित्र त्यानी जगासमोर ठेवण्यात यश मिळविले आहे त्याचेच प्रत्यंतर तुमच्या वरील वर्णनात येते....ते खूप भावण्यासारखे आहे.

"......हा ' डायमंड ट्रँगल ' म्हणजे त्यांची सिग्नेचर स्टाइल आहे....." ~ बीबीसी वरील चर्चेत हे वाक्य वापरले गेले होते, त्याची आठवण आली....जर्मनी खरोखरीच मजबूत त्रिकोणात सुरक्षित आहे.

अशोक पाटील

मेडिकल जियॉलॉजी या विषयातले तत्ज्ञ डॉ. कीर्तिकुमार रणदिवे यांचं अभिनंदन! अधिक माहीतीसाठी : http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/marathi-mudra/medical...

वरील लेखात डॉ. रणदिव्यांनी मेडिकल जियॉलॉजी क्षेत्रातले जगातले पहिले पुस्तक लिहिल्याचं म्हंटलं आहे. हा दावा कितपत खरा आहे हे तत्ज्ञ माबोकरांनी कृपया सांगावे.

-गा.पै.

भारताचे मंगळ अभियान यशस्वी.. भारतीय शास्त्रज्ञांचे मनःपुर्वक अभिनंदन.
----- एक महत्वाचा टप्पा यशस्वी झालेला आहे, अजुन मोठा पल्ला गाठायचा आहे. शास्त्रज्ञान्च्या अथक परिश्रमाचे कौतुक आणि अभिनन्दन जरुर करायला हवे.

शंकराचार्यांची निर्दोष सुटका : कांची कामकोटि पीठाचे व्यवस्थापक शंकररमन यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्यासह अन्य सर्व आरोपींची पद्दुचरी न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. शंकराचार्यांवर खुनाचा आरोप लावून २००४ साली ऐन दिवाळीत ते त्रिकाळ पूजेत मग्न असतांना अटक करण्यात आली. दोन महिने त्यांना सर्वसाधारण गुन्हेगारांसोबत तुरुंगात ठेवण्यात आले. याची भरपाई कोण करणार? शंकररामन यांच्या खुन्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असतांना परत शंकराचार्यांना अटक करायची गरज का पडावी? असो. या निवाड्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास बसण्यास मदत होईल.

अधिक माहीतीसाठी कृपया इथे टिचकी मारा.

-गा.पै.

शंकररामन यांच्या खुन्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असतांना परत शंकराचार्यांना अटक करायची गरज का पडावी? असो. या निवाड्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास बसण्यास मदत होई
------ पुराव्या अभावी त्याना निर्दोष सोडले. ८० साक्षीदार बदलले. खुन करणे, आणि खुनाचा कट रचणे पैकी कट रचल्याचा आरोप आहे.

http://news.oneindia.in/india/court-acquits-kanchi-seers-sankararaman-mu...

खाकी वर्दीतील संवेदनशीलतेमुळे वाचले मुलांचे प्राण

पुणे सकाळ मधील बातमी

"हे पैसे घ्या... पण, त्याच्यावर उपचार सुरू करा. त्याच्या बिलाला मी जबाबदार राहतो,' हे वाक्‍य आहे एका तरुण मुलाचे प्राण वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण पोलिसाचे. "या रुग्णाच्या बिलाची कोण जबाबदारी घेणार' नर्सच्या या प्रश्‍नाला क्षणाचाही विचार न करता दिलेले हे उत्तर आहे!

राजाराम पुलावर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती नागरिकांनी ताथवडे उद्यानाजवळ गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना दिली. गाडीला किक मारून मिनीटभरामध्ये हे दोन पोलिस घटनास्थळी पोचले. त्या वेळी पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती. पण, त्यापैकी एकही पुढे येऊन अपघातातील जखमीला रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न करीत नव्हता. रिक्षाचालकही घटनास्थळावरून पळ काढत होते. त्यातच हे दोन तरुण पोलिस राजाराम पुलावर पोचले. एक रिक्षाचालक या "कटकटीतून' सुटका करून घेण्यासाठी रिक्षा पुढे दामटत होता. त्याला पोलिसांनी थांबविले. त्यासाठी त्यांना थोडा पोलिसी खाक्‍याही वापरावा लागला. अखेर अपघातातील रुग्णाला रिक्षात टाकून त्यातील एका पोलिसाने थेट शाश्‍वत रुग्णालयाकडे धाव घेतली.

रुग्णावर उपचार सुरू करण्यापूर्वीच "त्याच्या डोक्‍याचा स्कॅन करावा लागेल. त्याच्या बिलाची जबाबदारी कोण घेणार,' असा प्रश्‍न तेथील परिचारिकेने केला. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता पोलिस म्हणाले, ""हे पैसे घ्या. पण, त्याच्यावर उपचार सुरू करा.'' त्यानंतर रुग्णावर उपचार सुरू झाले.

चैतन्य वझे (वय 17, रा. धायरी) अपघातात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. कॉन्स्टेबल सूचित कुचेकर या खाकी वर्दीतील संवेदनशील माणसाने दाखविलेले हे प्रसंगावधान आहे. त्यांच्या बरोबर कॉन्स्टेबल समीर माळवदकर होते. रुग्णालयात चैतन्यचा मोबाईल हातात घेताच त्याच्या मावशीचा फोन आला. त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. तोपर्यंत कुचेकर रुग्णालयात होते. त्यानंतर त्यांनी अपघाताचा तपास सुरू केला.

""कुचेकर यांनी स्वतःच्या घरातील व्यक्तीचा अपघात झाल्याप्रमाणे वेगाने हालचाल केली. वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने पुढील धोका टळला,'' अशा शब्दांत चैतन्यचे वडील श्रीपाद वझे यांनी भावना व्यक्त केल्या.

दीक्षांत समारंभास इंग्रजी गुलामगिरीचे निर्देशक असलेला झगा (गाऊन) घालण्यास ५ छात्रांचा नकार. सुमंतचंद्र पंत या विद्यार्थ्याने तर ९ सुवर्णपदके नाकारली. या पाचांचे अभिनंदन. त्यांनी दाखवलेल्या त्यागास आणि शौर्यास विनम्र अभिवादन.

अधिक माहीतीसाठी (हिंदी दुवा) : http://aajtak.intoday.in/story/gold-medalist-refused-to-wear-gown-thrown...

-गा.पै.

सौजन्यः मटा

जीनिव्हात उसळले भारतीय जाज्वल्य...

मी केवळ आरोग्यविभागाचा प्रतिनिधी नाही, तर सर्वप्रथम भारतीय आहे. माझ्या देशाच्या नकाशावरून जम्मू-काश्मीर वगळणे मला कदापि मान्य नाही. भारताचा नकाशा हा जम्मू-काश्मीरसहच दाखवायला हवा, अशी जाज्वल्य भूमिका हाफकीन जीव-औषध महामंडळाचे कार्यकारी संचालक संभाजी झेंडे यांनी जीनिव्हातील आंतरराष्ट्रीय परिषदेत घेतली. यावेळी जगभरातून या परिषदेस आलेल्या प्रतिनिधींनीही त्यांच्या या भारतीय अस्मितेला दाद दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) परिषदेत पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यात जगापुढे कोणकोणती आव्हाने आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी कोणती रणनिती आखायला हवी, त्यात प्रत्येक देशाचा सहभाग कसा असेल आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पोलिओचे विविध देशांमधील प्रमाण व संबंधित देशाची सामाजिक-सांस्कृतिक रचना लक्षात यावी यासाठी या परिषदेत विविध देशांचे नकाशे वितरित करण्यात आले. यावेळी 'डब्ल्यूएचओ'ने भारताच्या सादर केलेल्या नकाशात जम्मू आणि काश्मीर पूर्णपणे वगळण्यात आले होते. ते पाहिल्यानंतर संभाजी झेंडे प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांनी तडक उठून ही चूक 'डब्ल्यूएचओ'चे सचिव ब्रूस अेल्वार्ड यांना दाखवून दिली. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांनीच असा नकाशा पाठवल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावरही झेंडे यांनी कोणताही भारतीय अधिकारी जम्मू-काश्मीरला वगळून असा नकाशा पाठवणारच नाही, असे प्रत्युत्तर दिले. इतकेच नव्हे, तर त्यांनी जम्मू-काश्मीरच्या एका छोट्या भागात सुरू असलेल्या वादामुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर भारतीयांचा नाही हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवालही त्यांना केला. भारताच्या नकाशातील ही चूक ताबडतोब दुरुस्त करायला हवी, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला असता, जीनिव्हातील आरोग्यसंघटनेच्या अधिकाऱ्यांनी ही चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन त्यांना दिले. भारतात परतल्यावरही झेंडे स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे कळवले आहे.

जीनिव्हात जागतिक आरोग्यसंघटनेची असंख्य कार्यालये आहेत. तेथे देशाचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असेल, तर ते निश्चितच गंभीर व अपमानकारक आहे. मी सरकारचा प्रतिनिधी आहेच, पण मी भारतीयही आहे. त्यामुळे अशी चूक कधैीही मान्य करणार नाही.

- संभाजी झेंडे, कार्यकारी संचालक, हाफकिन जीव-औषध महामंडळ

सिंधूने मारली बाजी

भारताच्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. मकाऊ ओपन स्पर्धेसाठी अव्वल मानांकन मिळवणा-या सिंधूने महिला एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत ३० व्या स्थानावर असलेल्या कॅनडाच्या ली मिचेल हिचा २१-१५, २१-१२ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.

सिंधूसाठी २०१३ हे वर्ष अतिशय चांगले ठरले. यंदा तिने मे महिन्यात मलेशिया ओपन बॅडमिटन स्पर्धा जिंकली. ऑगस्टमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ती ब्राँझ पदक मिळवण्यात यशस्वी झाली. या दोन यशस्वी कामगिरीनंतर सिंधूने आज मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकत वर्षभरात तीन मोठ्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.

Pages