माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.
मनावर मळभ आणणार्या बातम्यांचे प्रमाण इतके जास्त असते की समज व्हावा या जगात चांगले काही घडतच नाहीये. खरेतर आपल्या अवती भवती अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात, ज्या कधी वर्तमानपत्रात छापून पण येतात, पण बहुदा इतर बातम्यांच्या तुलनेत खमंगपणात कमी पडल्याने त्यांची जास्त चर्चा होत नाही. अशाच काही चांगल्या बातम्यांना आपण एकाच ठिकाणी धाग्यात ओवून ठेवल्या तर त्या घटनांचा घेतलेला मागोवा / धांडोळा हा येणार्या काळात अँटी-डिप्रेसंट म्हणून काम करेल असे वाटते. कवी सुधांशु कुलकर्णी यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे "अंधार खूप झाला पणती जपायला हवी"
http://vishesh.maayboli.com/node/1120
चला तर मग अशा काही आनंददायी / सुखद घटनांबद्द्ल समस्त मायबोलीकरांना अवगत करवूयात.
सुहास्य, डॉ. वंदना गायकवाड,
सुहास्य, डॉ. वंदना गायकवाड, यांचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आता आणखी संशोधकांना व्हावा.
बरोबर आहे स्वाती, परिस्थिती
बरोबर आहे स्वाती, परिस्थिती एवढी दारुण आहे आणि त्यात काहीही इम्प्रूव्हमेंट होत नाहीये हे रोज बातम्या वाचून कळतय, त्या पार्श्वभूमीवर ही चांगली वाटली.
हो हो. नक्कीच.
हो हो. नक्कीच.
बीडचे नाव सार्या
बीडचे नाव सार्या महाराष्ट्रातच नव्हे तर जवळपास सार्या देशात झाले ते अंगावर शहारे आणणार्या भ्रूणहत्या संदर्भात....पण आता मो यानी दिलेली काळे दांपत्याची बातमी मनाला सुखद गारवा देणारीच म्हटली पाहिजे.... योगायोगही असाच की अशी स्वागतार्ह बातमी बीडमधील असावी.
अशोक पाटील
अशोक. माफ करा पण मला तुम्हि
अशोक. माफ करा पण मला तुम्हि दिलेल्या या बातमीमधे काहिहि आदर्शवत असे वाटत नाहिये. तुम्हि जे दिलेले विचार आहेत बातमी मागे ते थोडे खटकले. पण या बाफ चा विषय वेगळा आहे त्यामुळे मी इथेच थांबवते.
प्रिया.... अगदीच आणि एकमेव
प्रिया....
अगदीच आणि एकमेव आदर्शवत आहे त्या डॉक्टर दांपत्याची बातमी {म्हणजे तुम्ही त्याबद्दलच लिहिले असेल तर....} असे मी देखील म्हणत नाही, पण बीडच्या काळे दांपत्याच्या बातमीला अनुसरून तो एक विचार माझ्या मनी आला इतकाच. शिवाय वर म्हटल्याप्रमाणे ही बातमी तशी फार जुनी आहे.....आता त्या दोन्ही मुली दहावीला आल्या आहेत.
[कोणताही आडपडदा न ठेवता तुम्ही आपला विचार स्पष्ट मांडला ते मला नक्कीच भावले, हेही सांगतो.]
असो.... तुम्हाला [तसेच इतरांनाही] ते खटकले असल्यास तेवढा भाग काढून टाकणे योग्य.....[तसे केले आहे.].
अशोक पाटील
प्रिया....>>>> अशोक
प्रिया....>>>> अशोक पाटील>>>
सुखद अनुभव या सदरात ते योग्यच होत, तुम्ही डिलीट केलत
ते विचार सकारत्मकच होते ..........
अरे वा ! मस्त धागा सगळ्याच
अरे वा ! मस्त धागा

सगळ्याच कित्ती सकारात्मक बातम्या. आता रोज आधी इथे भेट द्यावी
धन्यवाद हर्पेन !
थॅन्क्स दादाश्री... वर्णन
थॅन्क्स दादाश्री...
वर्णन केलेला 'तो' प्रतिसाद माझ्यादृष्टीने सुखद आणि सकारात्मकच होता; पण प्रिया यांची प्रतिक्रिया वाचल्यावर ते जोडपे आदर्श ठरू शकेल का नाही याबद्दल मग माझाही काहीसा गोंधळ झाल्याने प्रतिसादातील तेवढाच भाग मी काढून टाकला.
अशोक पाटील
खुपच चांगला धागा ! अशोक यांची
खुपच चांगला धागा ! अशोक यांची बातमीही मनाला भिडणारी आहे. बाकी हळूहळू वाचतोच आहे. !
अरे वा, रुजला की हा
अरे वा, रुजला की हा धागा....
हा धागा मुख्यपृष्ठावर आणल्याबद्द्ल अॅड्मीन यांचे आभार! तसेच वेळोवेळी हा धागा आवडल्याचे कळवणार्या, या शुभ्-वार्तासंग्रहात मोलाची भर टाकणार्या व हा धागा काढण्यापाठच्या भुमिकेची जाण ठेवून प्रतिसाद देणार्या (आजवरच्या व आगामी) सर्व प्रतिसादकांचे आभार!
ही माझी शेवटची
आभारप्रदर्शक पोस्ट....:)
माधवी यादव-पाटील ः सकाळ
माधवी यादव-पाटील ः सकाळ वृत्तसेवा
Friday, February 01, 2013 AT 03:30 AM (IST)
मुंबई- सासू-सून या नात्याला एक वेगळाच पदर आहे. साधारणतः हे नाते तिढ्याचे असते. ते सुटता सुटत नाही. वंशाच्या दिव्यासाठी सुनांचा छळ करणाऱ्या किंवा सून नोकरी करते म्हणून तिचा पाणउतारा करणाऱ्या, तिला लहान-सहान गोष्टींवरून त्रास देणाऱ्या सासवा समाजात जागोजागी बघायला मिळतात. मात्र कजाग सासूच्या प्रतिमेला छेद देणारी, अवघ्या चारच इयत्ता शिकलेली, शिक्षणाने अशिक्षित, मात्र विचाराने सुशिक्षित सासू, झिंगुबाई श्रावणजी बोलके आज "सकाळ' आणि "साम'च्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानात भेटली.
भरगच्च मेकप, डिझायनर साड्या, दागिन्यांचा साज चढवून नटून-थटून आलेल्या शहरी महिलांमध्येही नऊवारीत ठसठशीत कुंकू लावलेली झिंगुबाई उठून दिसत होती. आपली सून राजश्री व नाती यांच्यासह निंभा (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) या ग्रामीण भागातून आलेल्या झिंगुबाईंची कहाणी सासू-सुनांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.
महिलांसाठी काम करणाऱ्या झिंगुबाई एका पायाने अपंग आहेत. त्यांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले असून समाजकार्याच्या वेडाने त्यांना झपाटले आहे. त्याच आवडीतून आज त्या अभियानासाठी एवढ्या लांबून आल्या होत्या. मात्र घरची स्त्री विचाराने समृद्ध झाली तरच कुटुंबाचा उद्धार होईल, याची पुरेपूर जाणीव असणाऱ्या झिंगुबाईंनी आपल्या सुनेला आणि नातीलाही सोबत आणले होते. महिलांविषयीचे प्रश्न, समस्या समजाव्यात, सुनेची वैचारिक पातळी वाढावी, असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्याशी व त्यांच्या सुनेशी गप्पांच्या ओघात चर्चा केल्यावर त्यांच्यातील मायेच्या नात्याचे पदर हळूहळू सुटत गेले.
झिंगुबाई बाराव्या वर्षापासून कविता करतात. समाजकार्यात हिरिरीने भाग घेणाऱ्या झिंगुबाईंची धडाडी पाहून श्रावणजी यांनी त्यांच्याशी विवाह केला. मात्र अपंग सून घरी आल्याने सासूने त्यांना घराबाहेर काढले. जिद्दी झिंगुबाईंनी त्यावरही मार्ग काढत वेगळे बिऱ्हाड थाटले. त्यांच्या संसारवेलीवर मुलांच्या रूपाने दोन फुलेही उमलली. एकीकडे संसाराचा गाडा हाकतानाच त्या आपले समाजकार्यही तितक्याच आवडीने जोपासत होत्या. आता त्यांच्या दोन्हीही मुलांचे विवाह झाले असून आपल्याला दोन हक्काच्या मुली मिळाल्याचे त्या आनंदाने सांगतात. त्या स्वतः हुंडाविरोधी असल्याने त्यांनी दोन्ही मुलांच्या लग्नात हुंडा घेतला नाहीच. मात्र स्वतः हिमतीवर दोन्ही लग्ने केली. सुना घरात आल्यापासून त्यांना मुलींची माया दिली. झिंगुबाईंनी मुलगा व्हावा याचा कधीच आग्रह धरला नाही, याउलट त्यांनी सुनांना "भ्रूणहत्या करू नका, गर्भातच मुलींना मारू नका' अशी शिकवण दिली. त्यांना दोन नाती आणि एक नातू आहे. त्यांना मात्र नातींविषयी प्रचंड अभिमान आहे. त्या नातींना गायनाचे धडे देत आहेत.
सुनांनीही आपल्याप्रमाणे महिलांसाठी काम करावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यातूनच लग्नानंतर मोठी सून राजश्रीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सध्या त्या पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी पुढे शिकावे, समाजकार्यात यावे अशीच झिंगुबाईंची इच्छा आहे. सुनेला "घडविण्या'साठी त्यांनी कंबर कसली आहे.
विविध महिला मेळावे, कार्यक्रमांमध्ये त्या सुनेला आवर्जून घेऊन जातात. त्यांना बोलण्यासाठी, पुढे येण्यासाठी स्वतः प्रोत्साहन देतात. आपल्या सुनेने चारचौघीत मिसळावे, आत्मविश्वासाने बोलावे म्हणून वेळप्रसंगी गुरू होऊन त्यांना मार्गदर्शनही करतात. सूनही सासूच्या या प्रोत्साहनामुळे अगदी उत्साहाने अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्यांना प्रतिसाद देते. एवढेच नव्हे तर सावित्रीबाई फुले महिला विकास संस्थेच्या माध्यमातून त्या स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी काम करतात. त्यातील नाटिकेत सुनेने मुख्य भूमिका केली आहे. ठिकठिकाणी मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी त्या कार्यक्रम करतात.
सासू-सुनेच्या नात्यातील हा सकारात्मक बदल, हेच वेगळेपण "स्त्री प्रतिष्ठा अभियानात' पाहायला मिळाले. त्यांच्याप्रमाणेच इतर सासू-सुनांमध्ये हेच नाते निर्माण झाल्यास "स्त्रीच स्त्रीचा शत्रू असते' या विधानाला पूर्णविराम मिळेल. त्याबरोबर महिलांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्याचा या अभियानाचा उद्देशही खऱ्या अर्थाने सफल होईल.
....
नवतरुणींनो उठा, हुंडा घेणाऱ्याला पिटा
आपल्या सासूने आपल्याला आईपेक्षाही जास्त प्रेम दिल्याचे झिंगुबाईंची सून राजश्री यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ""आज लग्नाला सहा वर्षे झाली, पण सासूरवास म्हणजे काय हेच माहीत नाही. सासूकडून सामाजिक कार्याचेच धडे मिळाले. सासूबाई अपंगांसाठी कार्यशाळा घेतात. त्यांनी सुमारे सहाशे गरीब-गरजू मुला-मुलींचे विवाह करून दिले आहेत. प्रौढसाक्षरतेतही त्यांचे योगदान मोठे आहे. "नवतरुणींनो कंबर कसून उठा गं, हुंडा जो घेईल त्याला धरून पिटा गं' हा त्यांचा संदेश सर्वत्र पोहचविण्यासाठी त्यांच्याबरोबरीने काम करणार आहे.''
...
कार्याची पुरस्कारांमधून नोंद
झिंगुबाईंना त्यांच्या कार्याबद्दल अनेक राज्य व देश पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना प्रौढ साक्षरता अभियानासाठी राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार 2002 ला मिळाला आहे. देशातील पहिला स्त्री शक्ती पुरस्कार तसेच व्यसनमुक्तीसाठीचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. 2008 ला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांना तीन लाखांचा हा पुरस्कार मिळाला. मात्र या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी अपंगांसाठी शाळा सुरू केली आहे. यातून अपंगांना शिवणकाम, ब्युटीपार्लर, संगणक यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते.
सापडला चिरतारुण्याचा
सापडला चिरतारुण्याचा फॉर्म्युला
Feb 1, 2013, 04.59AM IST
आर्टिकल
प्रतिक्रिया (1)
1
समीर कर्वे , मुंबई
माणसाला चिरतरुण ठेवणारा कुठला जादूगार जीन आहे का ? जादूच्या गोष्टी सोडून देऊ , पण , वार्धक्याला दूर ठेवण्यात मात्र ' सर - २ ' या जनुकाचाच वाटा असून विशिष्ट कॅलरींवर नियंत्रण ठेवल्यास मधुमेह , लठ्ठपणा , कर्करोग , पार्किन्सन्स , हृदरोग , स्मृतिभंश अशा वार्धक्याच्या आजारांनाही दूर ठेवता येऊ शकते , असे पूर्वीच्या संशोधनावर शिक्कामोर्तब करणारे निष्कर्ष ' टाटा मूलभूत संशोधन संस्थे ' तील भारतीय शास्त्रज्ञांनी काढले आहेत .
गेल्या दोन वर्षांपासून शास्त्रज्ञांच्या वर्तुळात ' सर - २ ' जनुकाच्या क्षमतेविषयीच मूलभूत शंका उपस्थित केल्या गेल्याने औषधनिर्मिती उद्योगांच्या अब्जावधी डॉलर्सच्या संशोधनाचे भवितव्यही दोलायमान झाले असतानाच , भारतीय शास्त्रज्ञ डॉ . उल्हास कोल्थूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ' सर - २ ' जनुकाविषयीचे भ्रम दूर करण्यात यश मिळविले आहे .
सन १९३५मध्ये मॅकगे नावाच्या शास्त्रज्ञाने उष्मांकांचे नियमन आणि आयुर्मर्यादेची वाढ यांचा संबंध प्रथम दाखवून दिला होता . उंदरांना दिल्या जाणाऱ्या आहारातील उष्मांक कमी केल्यावर त्यांच्या आयुर्मर्यादेत ६० टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांना दिसले . पुढील ६५ वर्षे या प्रयोगाचे परिणाम सर्वच प्राण्यांवर असल्याचे सिद्ध झाले . पुढे सन २०००च्या सुमारास एमआयटी विद्यापीठाचे प्रा . लिओनार्डो ग्वारेन्टी यांच्या समुहाने ' सर - २ ' या जनुकाचा शोध लावला आणि आहार किंवा उष्मांक नियमनामुळे आयुर्मर्यादा वाढीच्या सूत्रात ' सर - २ ' जनुकाची भूमिका महत्त्वाची असते , असे निदान केले .
...................................
चिरतारुण्याचा तिढा सुटला
सस्तन प्राण्यांमध्ये मधुमेह , लठ्ठपणा , कर्करोग , स्मृतिभ्रंश आदी वार्धक्याशी संबंधित रोगांदरम्यान चयापचयातील संतुलन बिघडते , तेव्हा ' सर - २ ' जनूक महत्त्वाची भूमिका बजावते , हे अनेक प्रयोगांमधून असे सिद्ध झाले आहे . त्यामुळेच ' सर - २ ' हा घटक चिरतारुण्याचा झरा आहे का , असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला होता . मात्र , आयुर्मर्यादा वाढीमध्ये ' सर - २ ' जनुकाच्या क्षमतेवर शास्त्रज्ञांच्या दुसऱ्या गटाने मात्र शंका उपस्थित केल्या . या तिढ्याचे नेमके स्पष्टीकरण शास्त्रज्ञ समुदायाला हवे होते . शिवाय , औषधनिर्मिती उद्योगात या गुणधर्मांचा वापर करून किंवा त्यानुसार ' सर - २ ' भोवती इलाज केंद्रित करून औषध तयार करण्याच्या संशोधनालाही चालना मिळाली होती . औषधशास्त्रातील हे संशोधन मात्र शास्त्रज्ञांच्या आक्षेपांमुळे शंकेच्या गर्तेत अडकले .
डॉ . उल्हास कोल्थूर आणि त्यांचे सहकारी कुशल बॅनर्जी , चंपाकली अयुब , विनेश मांदोत , झिशान अली खान , एनजी प्रसाद यांचा चमू मात्र गेल्या दोन वर्षांपासून झपाटल्यासारखा ' सर - २ ' चे अस्तित्व शोधण्यात व्यग्र होता . त्यांनी मधमाशांना आहार देऊन संशोधन केले व त्यांच्यातील यकृतासमान पेशीवर होणारे परिणाम रेण्वीय निदर्शकांनी तपासले . त्यांना मिळालेल्या सकारात्मक निष्कर्षांचा शोधनिबंध सेल रिपोर्ट्स या जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित झाला . एखाद्या पेशीवर जरी उष्मांक कमी करण्याचे प्रयोग केले , तरी त्याचे परिणाम संपूर्ण अवयवांवर दिसून येतात , याचाच अर्थ एखाद्या पेशीवर दिलेल्या औषधाचा लाभ संपूर्ण अवयवाला मिळू शकतो , हा आणखी एक महत्त्वपूर्ण निष्कर्षही त्यांच्या हाती आला आहे .
एकूण प्रतिक्रिया (1) अन्य वाचकांच्या प्रतिक्रिया वाचा आणि आपली प्रतिक्रिया टाइप करा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18282555.cms
आपल्याला भ्रष्टाचाराची एवढी
आपल्याला भ्रष्टाचाराची एवढी सवय झालीय कि आपण मनाची पूर्ण तयारी करुनच असतो. त्यामूळे मला
आलेला अनुभव, तसा शुभ म्हणता येणार नाही. पण तरीपण इथे नोंदवावासा वाटतो. ( कारण ऊघड आहे, अशाच प्रसंगातला भारतातला अनुभव, अतिभयानक होता.)
मी दुबईहून लुआंडा ( अंगोलाची राजधानी ) ला आलो तर बेल्ट वर माझी बॅग आली होती पण एक बॉक्स नव्हता.
त्याबद्दल एक स्त्री मला माहिती देत होती, कि तो बॉक्स मला नंतर एका वेगळ्या खात्यातून घ्यावा लागेल.
आणि तेसुद्धा दुसर्या दिवशी येऊन.
त्याप्रमाणे मी दुसर्या दिवशी विमानतळावर गेलो तर तिथे एक वेगळी रुम दिसली. पण तिथे माझा बॉक्स नव्हता. मी विमानकंपनीकडे तक्रार केली तर त्यांनी खात्रीपुर्वक सांगितले कि माझा बॉक्स त्याच विमानाने,
लुआंडाला पोहोचला आहे. आता परत विमानतळावर जावे लागणार होते. पण यापुढचे मात्र सगळे सुखदच होते.
मला विमानतळावरुनच फोन आला कि माझा बॉक्स आलेला आहे. मी विचारुन घेतले कि ते ऑफिस रविवारी
ऊघडे असते का ? तर होकारार्थी उत्तर मिळाले.
मी गेल्या रविवारी विमानतळावर गेलो, त्यावेळी कळले कि एक आठवडा झाल्याने माझा बॉक्स दुसर्या
ऑफिसमधे नेलेला आहे. तिथला पत्ता व्यवस्थित सांगितलाच पण तिथे मिळाला नाही तर परत विमानतळावर ये असेही सांगितले.
मला तिथे पोहोचायला जरा उशीरच झाला होता. १२ वाजता ते ऑफिस बंद होते. गेटवर तसे लिहिलेच होते.
पण मी माझ्या घड्याळ्यात ११.५८ झाल्याचे दाखवताच, हसून मला आत सोडले.
आतमधे विमान कंपनी च्या नावानुसार सर्व सामान नीट लावलेले होते. तिथे
आपले सामान ताब्यात घेताना, कष्टम अधिकार्यापुढे ऊघडावे लागते. त्यासाठी बरीच मोठी लाईन होती.
प्रत्येकाचे सामान तपासण्यात अर्थातच वेळ जात होता. माझा नंबर शेवटचा होता.
माझा बॉक्स तसा अगदीच छोटा होता. मी तिथल्या अधिकार्याला विनंती केली तर त्याने मला पुढे बोलावले.
स्वतः चाकू देऊन माझा बॉक्स मला ऊघडायला लावला. आत काही विशेष नव्हतेच.
मग त्याने मला पॅक करण्यासाठी तिथलीच सेलो टेप दिली. इतकेच नव्हे तर परत पॅक
करताना काही अडचण आली तर असावी म्हणून एक मोठी प्लॅस्टीकची पिशवी पण दिली.
तिथल्याच कॉपिंग मशीनवर माझ्या पासपोर्टची कॉपी त्याने स्वतः काढली. त्यावर शेरा लिहून मला जाऊ दिले. ती जागा गोडाऊन सारखी असली तरी हवेशीर होती. पिण्याचे पाणी, टॉयलेट, बसायला सोफा अशा सर्व सोयी होत्या.
आणि सर्वात महत्वाचे कि यासाठी मला कुठेही एकही क्वांझा ( अंगोलाचे चलन ) द्यावा लागला नाही.
इतरही कुणी पैसे देताना दिसत नव्हते. माझा बॉक्स छोटा असल्याने मला खास तपासणी मिळाली,
याबद्दल कुणीही हरकत घेतली नाही.
मुद्दाम काही शब्द ठळक केलेत कारण मुंबईतला पर्सनल कार्गोचा तसा अनुभव आता लिहावासा वाटत नाही.
"...मुंबईतला पर्सनल कार्गोचा
"...मुंबईतला पर्सनल कार्गोचा तसा अनुभव आता लिहावासा वाटत नाही...."
~ लिहूही नका दिनेश, इतक्या चांगल्या धाग्यावर तिथला कटु अनुभव. शिवाय 'सारांश" मधील निवृत्त शिक्षक बी.व्ही.प्रधान याना मुलाच्या अस्थीचा बॉक्स मुंबई विमानतळावरील कस्टमकडून मिळविताना आलेल्या कडवट अनुभवाचे चित्र नजरेसमोर आहे, जे पुरते बोलके आणि प्रातिनिधीक होतेच....आजही तिच स्थिती असेल यात शंका नाही.
ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आलेला अंगोला अनुभव सुखद धक्का देणारे आहे यात शंका नाही.
अशोक पाटील
झिंगूबाईंना सलाम.., त्यांची
झिंगूबाईंना सलाम.., त्यांची सून व नात पण त्यांच्या कार्यात साथ देत आहेत वाचून खुप आनंद झाला..अनेकांना प्रेरणादायी असणार त्यांचे हे काम.. शुभेच्छा....
व्वा मस्तच धागा
व्वा मस्तच धागा
झिंगुबाईंच कार्य प्रचंड आवडलं
झिंगुबाईंच कार्य प्रचंड आवडलं .
कोणी त्यांचा माबोसाठी इंटर्व्यु घेऊ शकतं का ?
माणदेशी महिला बँक. कष्टकरी
माणदेशी महिला बँक.
कष्टकरी महिलेलाही अगदी कमीतकमी रकमेची बचत करता यावी म्हणून सुरू झालेली माणदेशी महिला बँक.
चेतना गाला सिन्हा यांनी मुंबईहून थेट ग्रामीण भारताकडेच आपला मोर्चा वळवला आणि ही बँक स्थापन केली. महिलांना आत्मविश्वास मिळवून देत त्यांना 'बिझनेस वूमन' बनवणाऱ्या चेतनांचा हा यशस्वी प्रवास त्यांच्याच शब्दांत ...
दूष्काळी भाग माणदेशामधील कोणती बँक रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या महिलेला सावली देईल का ? होय. म्हसवडमधील अशी एक बँक आहे, 'माणदेशी महिला सहकारी बँक ' या बँकेने हे पाऊल उचललेले आहे! या बॅंकेने या महिलेला केवळ सावलीच दिली नाही तर जगण्याचा आत्मविश्वास मिळवून दिला. 'माणदेशी महिला बँके'ची स्थापना १९९७ मध्ये झाली. याची सुरुवात ज्या निमित्ताने झाली त्याची कहाणी रंजक आहे. १९९२ मध्ये माझ्याकडे एक महिला आली आणि म्हणाली, ''मला बचत करायची आहे. थोडे पैसे साठवायचे आहेत, कारण पाऊस पडायच्या आधी मला घर दुरुस्त करायचे आहे.'' बचत खातं उघडण्यासाठी मी त्या महिलेला गावातल्या एकूण एक बँकेत पाठविले पण कुठलीही बँक तिचे खाते उघडायला तयार नव्हती. मला प्रश्न पडला, ही महिला प्रत्येक बँकेला बचत खातं उघडण्यासाठी विनंत्या करते आहे. ती काही कर्ज मागत नाही तरीही तिला नकार मिळतो आहे. अर्थात त्याचं उत्तर बँकेला एवढी कमी बचतीची खाती चालू करायला परवडत नाहीत हे होतं. त्या दिवशी मी ठरविले महिलांसाठी महिलांची बँक उभी करायची. आणि त्या दृष्टीने मी कामाला लागले.
बँकेची स्थापना कशी करावी याच्या योग्य मार्गदर्शनासाठी मी 'इलाबेन भट्ट सेवा' संस्थेच्या संस्थापिकांची गाठ घेतली. त्या वेळी लक्षात आले की महिला बँँकेची स्थापना करायची असेल तर एकच मार्ग.. सहकारी बँक स्थापना करावी, मी धाव घेतली त्या वेळी सातारा येथे जिल्हा निबंधक दिनेश ओऊळकर यांच्याकडे. त्यांनी माझ्या स्वागतच केले. ते म्हणाले. ''तुम्ही बँक चालू करत असाल तर मी पूर्ण मदत करेन. म्हसवडसारख्या भागात महिला बँक सुरू करायची तर त्या वेळी ६ लाख रुपये भागभांडवल लागत असे. आम्ही परत कष्टकरी महिलांचे शेअर्स गोळा करायला लागलो. शेअर्स गोळा करताना सुरुवातीला अडचण आलीच. महिला म्हणायच्या, ''आत्तापर्यंत खूप लोकांनी शेअर्स गोळा केले, पण काही संस्था स्थापन झाल्या नाहीत.'' अर्थात आम्ही निराश झालो नाही. उलट जिद्दीने शेअर्स गोळा करून सहकार खात्याकडे प्रस्ताव दिला. तिथून रिझव्र्ह बँकेत प्रस्ताव जाणार होता. हा प्रस्ताव देताना गरज होती बँकेच्या प्रमोटिंग सदस्यांच्या विस्तृत माहितीची. सभासदाचे नाव, गाव, व्यवसाय, शिक्षण. जिथे शिक्षणाची माहिती द्यायची तिथे सर्व महिलांचे अंगठे होते. ते अंगठे बघून प्रश्न उपस्थित केले गेले की ''ज्या महिलांना लिहिता वाचता येत नाही त्या महिला एका बँकेच्या प्रमोटिंग सदस्य कशा काय असू शकतात? प्रोमोटिंग मेंबरच अशिक्षित असतील तर लायसन्स कसे देता येईल? बँक कशी चालणार?' अनेक आक्षेप घेत रिझव्र्ह बँकेने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि सर्व महिलांची तीन वर्षांची मेहनत पाण्यात गेली. पण निराशा होऊन हट्ट सोडतील, तर त्या माणदेशी महिला कसल्या?
या तीन वर्षांच्या तयारीमुळे त्यांच्यात मोठा आत्मविश्वास आला होता. आपल्या निरक्षरतेमुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला याचे त्यांना अतीव दु:ख झाले. ''प्रस्ताव फेटाळण्यामागे एवढेच कारण असेल तर आम्ही लिहायला-वाचायला शिकू,'' त्यांनी तयारी दाखविली आणि माझे पुढचे प्रयत्न सुरू झाले, त्यांना सुशिक्षित करण्याचे..
या महिलांचे शिकण्याचे वर्ग सुरू झाले. त्यांना लिहिता-वाचता येऊ लागले. आपली सही त्या स्वत: करू लागल्या. पुन्हा एकदा प्रस्ताव तयार झाला. या साऱ्या काळात माझ्या असे लक्षात आले की, या महिला अशिक्षित असल्या तरी त्यांना खूप काही कळते. त्यांच्या जाणिवा समृद्ध आहेत. त्यांच्यात जिद्द आहे. स्वत:ला सिद्ध करण्याची मानसिकता आहे. त्यांच्यातील ही ताकद नव्याने प्रस्ताव सादर होताना वापरता येणार होती.
बँकेसाठी नव्याने प्रस्ताव तयार झाला. या वेळी हा प्रस्ताव सादर करण्यासाठी सगळ्या १७ जणी मिळून रिझव्र्ह बँकेकडे गेलो. परत तोच प्रस्ताव आल्याचे पाहून वरिष्ठांनी त्यांना बाहेरच्या बाहेरूनच टाळण्याचा प्रयत्न केला. पण चिकाटीने त्यांनी आत प्रवेश मिळविला. आपली भूमिका त्यांनी अतिशय संयमीपणे अधिकाऱ्यांपुढे मांडली. ''आमचा हा प्रस्ताव फेटाळला तरी चालेल पण आमची बाजू समजावून तरी घ्या. आम्ही मोठे होत होतो तेव्हा आमच्या गावात शाळा नव्हती ही आमची चूक आहे का? पण आमच्याकडे व्यवहारज्ञान आहे. आम्हाला मुद्दल रकमेचे व्याज मोजायला सांगा. तुमच्या अधिकाऱ्यांना कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने तेच काम सांगा. त्यांच्या आधी आम्ही हे काम करून दाखवू. आमच्या गावात शाळा नसल्यामुळे आम्ही मागे पडलो, पण म्हणून आम्हाला व्यवहार जमत नाही,असे नाही ना.'' आमच्या महिलांनी थेट आव्हानच दिलं आणि खरोखरच त्यांनी तिथल्या तिथे हिशेब करून दाखविले. या महिला जिद्दीने साक्षर झाल्याचे प्रत्यंतर संबंधित अधिकाऱ्यांना आले. परिणामस्वरूप ९ ऑगस्ट १९९७ मध्ये 'माणदेशी महिला बँके'ला रिझव्र्ह बँकेकडून लायसन्स मिळाले. आज माणदेशी महिला बँकेचे एक लाख पासष्ट हजार खातेदार आहेत.
माझी पाश्र्वभूमी सांगायची तर मी चेतना गाला. मूळची मुंबईची. माझे वडील मगनलाल खिमजी गाला यांचे नळबाजार - भेंडीबाजार भागात एक दुकान आहे. कुमकुमबेन आणि मदनलाल यांच्या कुटुंबात २१ मार्च १९५८ रोजी जन्मलेली मी तिसरी मुलगी. मी मुलगी म्हणून जन्माला आले पण माझ्यावर कुठलीही परंपरागत बंधने नव्हती. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच झाले. बाहेरच्या जगाचे 'एक्सपोजर' मिळत गेले. मास्टर्स टय़ुटोरियल हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करत साधारण १९७५ मध्ये मुंबईच्या लाला लजपतराय कॉलेजात कॉमर्स शाळेत दाखल झाली. त्याच काळात इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. त्याविरोधात देशभर सुरू झालेल्या चळवळीचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांच्याकडे आले. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन देशभरात लक्षावधी युवक रस्त्यावर उतरले. मीही त्यापैकी एक होते. आणीबाणीविरोधी आंदोलनातून संघटना बांधली गेली. ग्रामीण भागात काम करण्यासाठी या गटाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. देश बदलायचा तर ग्रामीण भागात काम उभे राहिले पाहिजे, या जिद्दीतूनच माझे लक्ष ग्रामीण भागाकडे वेधले गेले. त्यातूनच या बँकेची स्थापना झाली.
बँकेची स्थापना तर झाली पण नंतर माझ्या लक्षात आले की या महिलांना बँकेत येण्यासाठी वेळच नाही. मग ठरवले की बँकेने त्यांच्याकडे गेले पाहिजे. या महिला आपल्या रोजच्या कमाईतून काही वाटा बाजूला काढू शकतात, पण रोजच्या रोज बँकेत भरणा करणे त्यांना शक्य होत नव्हते ही वस्तुस्थिती होती. मग, त्यांच्या घरी वा सोयीच्या ठिकाणी जाऊन पैसे गोळा करणे व बँकेत आणून त्यांच्या खात्यात जमा करणे हा मार्ग समोर आला. 'डेली बँकिंग', 'डोअरस्टेप बॅंकिंग' म्हणजेच घरपोच सेवाच्या संकल्पना त्यातून समोर येत गेल्या. ही नावे मोठी वाटली तरी त्यांच्या बचतींचे आकडे खूप छोटे छोटे होते. ही रक्कम जमविण्यासाठी मी महिला प्रतिनिधीची नियुक्ती केली. यातून किमान बचतीची सुरुवात झाली. छोटी छोटी पावलं टाकत का होईना सुरुवात तरी झाली होती.
अर्थात नाव बँकेचे असले तरी त्यातून काही रचनात्मक काम उभे राहिले पाहिजे, याची जाणीव मला सुरुवातीपासूनच होती. कारण माझा मूळ िपड चळवळीचा.. महिलांना आत्मविश्वास देणे, त्यांना मालकी हक्काची जाणीव देणे, त्यांच्या गरजेच्या वेळी पाठीशी उभे राहणे या साऱ्या भूमिका मला व बँकेला पार पाडायच्या होत्या. पण माझ्यापेक्षा महिलांच्याच अपेक्षा वाढत गेल्या. एक प्रस्ताव आला की, आपल्या वस्तीतील दारूचे दुकान बंद करायचे तर यासाठीही बँकेने मदत केली पाहिजे. त्यातील भावना लक्षात घेऊन मी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्या लढय़ातही सहभाग घेतला! कर्मचाऱ्यांनी अशा सहभागाला विरोध दर्शविला तेव्हा मी समजावून सांगितले, 'जोवर घरातील पुरुष दारू पिणार तोवर बाईचा पैसा बाजूला पडणार नाही. आणि हा पैसा बाजूला पडला नाही तर मग त्या बॅकेत कसा भरणार?' मग हा युक्तिवाद कार्मचाऱ्यांनाही पटला. तेही या चळवळीत सहभागी झाले. या चळवळीत आणखी एक व्यक्ती माझ्याबरोबर सहभागी झाली ती म्हणजे माझे पती विजय सिन्हा. चळवळीच्या माध्यमातून आमची ओळख झाली. व आम्ही लग्न करण्याचे ठरविले. मी मुंबई सोडून म्हसवडला राहायला आले. हळूहळू बँकेच्या कामाला वेग येऊ लागला. पहिल्या वर्षी ६ लाखांचे शेअर आणि ६६ लाखांचे डिपॉझिट जमा झाले. नियमाप्रमाणे भागभांडवल तसेच डिपॉझिट वर ७५ टक्के कर्जवाटपही झाले. पहिले वर्ष सुरळीतपणे पार पडल्यानंतर सर्वाचाच आत्मविश्वास वाढला. बँकेच्या व्यवहारांना आता चळवळीचे रूप येऊ लागले होते. ग्रामीण भागातील महिलांना बचतीसाठी प्रोत्साहित करायचे तर त्यांच्यातील उद्योजकवृत्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. यातूनच वेगवेगळ्या संकल्पना जन्म घेऊ लागल्या. महिलांना कर्ज देताना तो पैसा अंतिमत: महिलांच्याच नियंत्रणात राहिला पाहिजे या दृष्टीने मी दूरगामी निर्णय घेतले. उदाहरणार्थ 'कोंबडयां'साठी कर्ज दिले जाते, पण पोल्ट्रीफार्मसाठी नाही! गायी-म्हशी घेण्यासाठी कर्ज दिले जाते, पण डेअरी सुरू करण्यासाठी नाही! रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्या महिलांसाठी विविध योजना आणल्या त्यापैकी एक 'छत्रीसाठी बिनव्याजी कर्जा'ची योजना. उन्हापावसात राबणाऱ्या या महिलांना दिलासा मिळावा म्हणून ही योजना अमलात आणली. सारा स्टॉल झाकला जाईल अशा आकाराच्या छत्र्या महिलांनी बॅकेतर्फे खरेदी केल्या आणि बिनव्याजी कर्जाच्या योजनेत वितरित झाल्या. महिलांच्या गरजांतूनही काही योजनांचा जन्म झाला.
२००३ मध्ये आस्मा तांबोळी नावाची एक मुलगी बँकेत काही काम मागण्यासाठी आली होती. सुट्टीच्या काळात काम करून मिळणाऱ्या पगारातून एक सायकल घेण्याची तिची इच्छा होती. कारण पुढील शिक्षणासाठी तिला दूर अंतरावर जावे लागणार होते आणि सायकल घेता येईल एवढे पैसे तिच्या पालकांकडे नव्हते. तिने सुट्टीत नोकरी केली आणि त्या आधारावर सायकल घेतली. यातूनच नव्या योजनेने जन्म घेतला. मुलींना सायकल खरेदीसाठी बँकेने बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली. मुलींच्या शाळेची सोय तर झालीच पण मुलांप्रमाणे सायकलवरून फिरताना,घरची कामे करताना त्यांचा आत्मविश्वासही लक्षणीयरीत्या वाढला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार होते त्यावेळची एक आठवण नक्की सांगण्यासारखी आहे. असे प्रसंगच तुम्हाला पुढे जायला ऊर्जा देत असतात. मला राष्ट्राध्यक्षाच्या कार्यालयातून इमेल आला की बराक ओबामांना तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही याल का़? सुरुवातीला तर मी या इमेलकडे कुणी तरी केलेली गंमत यादृष्टीनेच पाहिलं पण नंतर युएस एम्बसीतूनच थेट फोन आला आणि तुम्ही इमेलला उत्तर का पाठवलं नाही हे विचारलं गेले. मी त्यांना स्पष्टपणे जे वाटलं ते सांगितले. आणि मला भेटण्यामागचे कारणही विचारले. त्यावर ते म्हणाले, ओबामांना काही भारतीय आंत्रप्रनर्सना भेटायचे आहे ज्यांनी काही तरी वेगळे काम केले आहे. तुम्ही त्या यादीत आहात. मी होकार देऊन त्यांना भेटायच्या आदल्या दिवशीच इच्छित स्थळी पोहोचले. दुसऱ्या दिवशी साडे तीन वाजता राऊंड टेबल कॉन्फरन्स होती. उद्योग क्षेत्रात भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काय करु शकतो याविषयीची ती भेट होती. बॅंकिंग क्षेत्रातील मी एकटीच होते. विशेष म्हणजे माझ्या कामाची त्यांना पूर्ण माहिती होती. तुम्ही महिलांची बॅंक चालवता ना, असे म्हणून त्यांनी त्याविषयी चर्चाही केली. बँकेचे फोटो दाखवत माहिती देताना मी त्यांना सांगितले की बॅंकेची सुरुवात महिलांच्या बचतीपासून झाली. मात्र महिला बँकेतच पासबुक ठेवायच्या कारण घरी कळले तर तीही बचत शिल्लक रहाणार नाही. जेव्हा हे माझ्या लक्षात आले तेव्हा मी इलेक्ट्रॉनीक बँक बूक तयार केले जे या महिलाही ऑपरेट करु शकायच्या. ओबामा यांनी यावर आश्चर्य तर व्यक्त केलेच शिवाय या महिलांचे कौतुकही केले. हा अनुभव खरोखरच उत्साहवर्धक होता.
एक छोटं पाऊल उचललं गेलं पण या पावलाच्या बळावर लाखो महिलांना बळ मिळालं स्वप्न पाहण्याचं आणि ते पूर्ण करण्याचंही..संपर्क- चेतना सिन्हा
अध्यक्षा, माणदेशी महिला बँक व माणदेशी फाउंडेशन, म्हसवड, तालुका माण, जिल्हा पुणे, सातारा-४१५५०९ बॅंकेचा दूरध्वनी (०२३७३-२७०७८८)
Email: manndeshi.mahila@rediffmail.com
ही बातमी लोकसत्ता मधे पूर्वप्रकाशित आहे. त्याचा दुवा
http://www.loksatta.com/chaturang-news/chetna-gala-sinha-of-mann-deshi-m...
नोवाक जोकोविचनं सलग
नोवाक जोकोविचनं सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि टेनिसजगतानं उभं राहून टाळ्या वाजवत त्याला मानवंदना दिली. नोवाकनं गेल्या काही वर्षांत जे काही करून दाखवलं, त्यानं सगळे चकित झाले. पण तो ज्या परिस्थितीतून इथवर पोहोचला आहे हे फार कमी जणांना माहीत असेल.
हा आहे आजच्या 'सकाळ'च्या सप्तरंग मधे आलेला लेख.
दमेकरी बनला विश्वविजेता!
युद्धानं पोखरलेल्या युगोस्लाव्हिया या देशात 22 मे 1987 ला नोवाकचा जन्म झाला. त्या काळातली जुनी-जाणती महिला खेळाडू जेलेना जेनचिचनं जोकोविचमधली गुणवत्ता हेरली, तेव्हा तो होता केवळ पाच वर्षांचा! जेलेनानं नोवाकच्या पालकांना म्हणजे सडान आणि दीजाना यांना सांगितलं ः ""तुमचा मुलगा टेनिसमधला चमत्कार आहे. तो जर टेनिस मनापासून खेळला, तर तो विश्वविजेता बनेल, अशी मला खात्री आहे.''
जेलेनानं नोवाकला प्रशिक्षण देणं सुरू केलं. रोज चार तास दोघं सरावात रमू लागले. त्याच वेळी युगोस्लाव्हियामध्ये युद्धाला सुरवात झाली होती. तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू होतं. युद्धामुळं नोवाक आणि त्याच्या कुटुंबीयांची झोप अक्षरशः उडाली होती. विमानाची घरघर ऐकू आल्याचे किंवा बॉम्बहल्ले सुरू झाल्याचे आवाज ऐकू येऊ लागले, की सगळे तळघरात लपायचे. छोट्याशा तळघरात 35 ते 40 लोक कोंबलेले असायचे. नोवाक याविषयी एक आठवण सांगतो ः ""मी तो काळ कधीच विसरणार नाही. अडचणीच्या काळात आम्ही कुटुंबीय एकत्र राहिलो. एकमेकांना धीर दिला. शाळा बंद असल्यानं मला भरपूर टेनिस खेळता आले. युद्धाच्या धडाक्यानं टेनिस कोर्टवरचं सिमेंट काही जागी उडालं होतं; तरी जेलेनानं माझं प्रशिक्षण थांबवलं नाही. वयाच्या आठव्या वर्षी टेलिव्हिजनवर माझी पहिली मुलाखत झाली. तीत मला विचारण्यात आला होता ः "तुझं स्वप्न काय आहे?' उत्तर देताना मी आत्मविश्वासपूर्वक म्हणालो होतो ः "मला विम्बल्डन जिंकायचे आहे आणि जगातला नंबर एकचा खेळाडू व्हायचं आहे.' लोकांनी हे हसण्यावारी नेलं; पण मी ध्येयानं तेव्हापासूनच झपाटून गेलो होतो...''
2007 च्या अमेरिकी ओपन स्पर्धेत कार्लोस मोयाला पराभूत करताना नोवाकनं मरिया शारापोवा आणि राफेल नदालची अफलातून नक्कल करताना प्रेक्षकांना वेडं केलं! तेव्हापासून त्याला "जोकर' हे टोपणनाव पडलं.
पहिली चार वर्षं नोवाक छाप पाडत होता; पण नदालला किंवा फेडररला त्याला काही केल्या पराभूत करता येत नव्हतं. नोवाकला ऍलर्जीबरोबरच वेगळ्या प्रकारच्या दम्याचाही विकार होता. कित्येक वेळा छोट्या-मोठ्या आजारामुळे स्पर्धेतून त्याला माघार घ्यावी लागली होती. त्या वेळी काही पत्रकारांनी, "जोकोविच "जोकर' आहे...त्याला गंभीरपणे टेनिस खेळायचं आहे, असं वाटत नाही', अशी कडवट टिपण्णी केली. नोवाकला ती टीका झोंबली व त्या टीकेनं तो जागा झाला.
स्वतःमध्ये घडवून आणलेल्या बदलांबाबत नोवाक म्हणतो ः ""मला जर विम्बल्डन जिंकायचं स्वप्न साकारायचं असेल, तर मला नदालला आणि फेडररला पराभूत करावं लागेल. जर मला त्यांच्यासारख्या "दादा' खेळाडूंना पराभूत करायचं असेल, तर मला खेळातल्या सुधारणांबरोबर तंदुरुस्तीची वेगळी पातळी गाठणं गरजेचं आहे, हे जाणवलं. मग मी माझा खेळ गांभीर्यानं घ्यायला सुरवात केली. प्रशिक्षकाबरोबर फिटनेस ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ अशी सपोर्ट स्टाफची नेमणूक केली. सगळ्यांनी मला एक दिनक्रम आखून दिला.
निरीक्षण केल्यावर लक्षात आलं, की शरीरातले छोटे-मोठे विकार टाळायचे असतील तर खाण्याच्या सवयी बदलाव्या लागतील म्हणून मी पूर्णतः ग्लुटन-फ्री डाएट सुरू केलं; म्हणजे कणभरही दुग्धजन्य पदार्थ सेवन करायचे नाहीत. दूध, चीज, बटर, इतकंच काय, चॉकलेटवरही मी फुली मारली. व्यायामाची वेगळी आखणी करण्यात आली. टेनिसच्या सरावाबरोबरच मी भरपूर सुनियोजित व्यायाम, त्यानंतर मसाज आणि अत्याधुनिक रिकव्हरी टेक्निकचा वापर करू लागलो. परिणाम काही महिन्यांत दिसू लागला. माझा फिटनेस कमालीचा सुधारला. आजारही पळून गेले आणि दम्याचा त्रास, श्वसनातला अडथळा दूर झाला. कोर्टवर या सगळ्याचा सकारात्मक परिणाम मला जाणवू लागला.''
2008 मध्ये नोवाकच्या यशाची नांदी सुरू झाली. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात नोवाकनं फेडररला सरळ तीन सेटमध्ये पराभूत केलं, तेव्हा प्रेक्षक अवाक् झाले. ज्यो विल्फ्रेड सोंगाला अंतिम सामन्यात पराभूत करून नोवाकनं पहिलं ग्रॅंड स्लॅम जेतेपद पटकावलं. अशी कमाल करणारा तो पहिला सर्बियन खेळाडू ठरला. नोवाकच्या टेनिस-कारकीर्दीला खरी झळाळी आली ती 2011 मध्ये. तेव्हा त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकी ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. त्याच वर्षी तो जगातल्या अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू बनला.
जेलेनानं जिंकलेल्या ट्रॉफीज्मध्ये नोवाकनं विम्बल्डन चषकाची प्रतिकृती ठेवली, तेव्हा गुरू-शिष्य आनंदानं मनापासून रडले! जेलेनाचं अधुरं स्वप्न तिच्या शिष्यानं साकारलं होतं.
जेलेनाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना नोवाक म्हणतो ः ""जेलेना ही माझी केवळ टेनिसचीच प्रशिक्षक नव्हती; तर ती अन्य बाबतींतही माझी खरी गुरू होती. मला किमान दोन तरी भाषा बोलता यायलाच पाहिजेत, असा तिचा आग्रह होता. आज मी सर्बियन, इंग्लिशबरोबरच जर्मन आणि इटालियन या भाषाही बोलू शकतो. जेलेनानं मला शास्त्रीय संगीताचीही आवड लावली. सामन्याच्या दडपणातून किंवा प्रचंड मेहनतीनंतर थकावट जाणवत असताना हेच शास्त्रीय संगीत मला शांत करतं. एकंदरीत, जेलेनानं मला चांगल्या खेळाडूबरोबरच चांगला माणूस बनवायलाही खूप मदत केली. माझ्या जडणघडणीतलं जेलेनाचं ऋण मी कधीच विसरू शकणार नाही.''
सहा ग्रॅंड स्लॅम विजेतेपदं पटकावलेला नोवाक समाधानी नाहीये. नदाल दुखापतीनं बेजार असला तरी अँडी मरे आणि रॉजर फेडररबरोबरची त्याची "आकर्षक टेनिस खुन्नस' अबाधित आहे. ""लोक म्हणतात की जोकोविच, फेडरर, मरे आणि नदाल या चौघांनी पहिल्या चार जागा व्यापून टाकल्या आहेत. ते बाकी कुणाला आतल्या वर्तुळात येऊ देत नाहीत. त्यामुळे टेनिस काहीसं रटाळ किंवा अपेक्षा आहे तेच देणारं होत आहे; पण मी म्हणेन की ही आम्हा चौघांना दिलेली मानवंदना आहे. इतका काळ आम्ही चौघांनी चार जागा पकडून ठेवल्या आहेत, त्या केवळ सर्वोत्तम खेळ करूनच. जेव्हा आमच्यातले कुणीही दोन खेळाडू एकमेकांना भिडतात, तेव्हा हमखास सर्वोत्तम टेनिस लढत बघायला मिळते, हे मान्य करावंच लागेल. "ऑस्ट्रेलियन ओपन'च्या अंतिम सामन्यात माझी आणि नदालची पाच तास 53 मिनिटं चाललेली लढत प्रेक्षकांना खिळवून ठेवते ना? मग अजून काय पाहिजे? बोला...!'' नोवाक अभिमानानं विचारतो.
खेळातली चुरस आणि त्यातून येणारं दडपण काही खेळाडूंना सोसत नाही. नोवाकचे यासंदर्भातले विचार फार वेगळे आहेत.
तो म्हणतो ः ""प्रत्येक सामन्याकरता कोर्टवर उतरताना माझ्या पोटात खड्डा पडतो. ही भीती नसते; तर एक अनामिक हुरहूर असते. मला अशी हुरहूर, असं दडपण खूप आवडतं. दडपणाकडं लोक नकारात्मकदृष्ट्या का बघतात, हेच मला समजत नाही. दडपण नसेल तर माणूस अधिक परिश्रम घ्यायला तयार होईल का? सर्वोत्तमतेचा ध्यास दडपणाविना लागेल का? खेळात अशक्य ते शक्य करून दाखवणं हे सकारात्मक दडपणाविना खेळाडू करूच शकणार नाही. सामना सुरू असताना चांगली लय सापडल्यावर ती जास्त काळ टिकवून ठेवणं यावर जय-पराजय अवलंबून असतो. अगदी खरं सांगायचं तर वरच्या स्तरावर सगळे खेळाडू जवळपास त्याच गुणवत्तेचे असतात. जे खेळाडू दडपणाखाली किंवा मोठ्या सामन्यात नैसर्गिक खेळ करायची हिंमत दाखवतात, ते चॅम्पीयन बनतात''
भयानक युद्धाच्या काळात बालपण गेलेल्या नोवाकनं सर्बियाला क्रीडाजगतात मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. सर्बियातल्या बहुतेक कंपन्या नोवाकला आपल्या प्रॉडक्टचा ब्रॅंड ऍम्बॅसिडर करतात. युद्धाचे ओरखडे आत्ता आत्ता थोडे मिटू लागले आहेत आणि सर्बिया एक चांगला देश म्हणून पुढे येऊ पाहत आहे. या शुभघटनेचा खरा राजदूत नोवाक जोकोविच ठरतो आहे. अँडी मरे चिवट, फेडरर राजेशाही, आहे तर नदाल लढवय्या आहे; परंतु या सर्वांत नोवाक नक्कीच वेगळा आहे.
लोकहो, ज्योकोव्हिचचा दमा कसा
लोकहो,
ज्योकोव्हिचचा दमा कसा आटोक्यात आला ते इथे पहा.
आ.न.,
-गा.पै.
एस टी कर्मचार्यांना चांगली
एस टी कर्मचार्यांना चांगली पगारवाढ मिळाल्याची बातमी वाचुन खरच खुप आनंद झाला!
ही लोकसत्तामधली लिंक
http://www.loksatta.com/mumbai-news/salary-increment-of-state-transport-...
वत्सला.... तुम्हाला खास
वत्सला....
तुम्हाला खास धन्यवाद.... अशी बातमी मायबोलीकर सदस्यांना आनंदित करू शकते असे तुम्हाला वाटले.... यातच सर्व काही आले.
असे मी अशासाठी म्हणत आहे की एरव्ही कर्मचार्यांना 'वेतनवाढ' म्हटली की आपल्या नजरेसमोर केवळ 'सरकारी कर्मचारी' उभा ठाकतो.... अन् त्याला होणारी वेतनवाढ ही कित्येकांच्या कपाळावर आठ्या वाढविणारी घटना असू शकते. पण एस.टी. त नोकरी करण्यार्या कर्मचार्यांसारखी खर्या अर्थाने "कष्टदायक" नोकरी क्वचितच अन्य सरकारी कर्मचार्यांची असू शकेल.
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे असो....दसरा असो वा दिवाळी.... उन्हाळा असो वा पावसाळा.... सेकंड फोर्थ सॅटरडे असो वा संडे..... एस.टी. चे चाक अथक धावत असते आणि वर वानगीदाखल दिलेल्या दिवशी तुम्ही आम्ही हक्काची सुट्टी भोगत असलो तरी एस.टी.त काम करणारे हे कर्मचारी 'आपल्याला काही फरक पडत नाही...' याच भावनेने ड्युटीवर हजर राहून "प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर' हे ब्रीदवाक्य स्मरत गाडीत चढतात.
अगदी "सबस्टॅन्शिअल अॅण्ड साईझेबल' म्हणावी अशी वेतनवाढ झाल्याचे कालच्या आकाशवाणीवरील बातम्या ऐकताना वाटत होते.... तसे असेल तर नक्कीच समस्त राज्य परिवहन मंडळाच्या कुटुंबात दिवाळी साजरी होत असेल.... आणि व्हावी देखील !!
अशोक पाटील
वत्सला, खूप चांगली बातमी,
वत्सला, खूप चांगली बातमी,
गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एस्-टी ह्या घोषणेमधला रस्ता (बर्याच वेळा) नावालाच असतो पण एस-टी मात्र खरीखूरी असते. वाचून आनंद झाला...(मला खात्री आहे सर्व ट्रेकर / भटक्या लोकांना पण नक्की होईल...:))
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे असो....दसरा असो वा दिवाळी.... उन्हाळा असो वा पावसाळा.... सेकंड फोर्थ सॅटरडे असो वा संडे..... एस.टी. चे चाक अथक धावत असते आणि वर वानगीदाखल दिलेल्या दिवशी तुम्ही आम्ही हक्काची सुट्टी भोगत असलो तरी एस.टी.त काम करणारे हे कर्मचारी 'आपल्याला काही फरक पडत नाही...' याच भावनेने ड्युटीवर हजर राहून "प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर' हे ब्रीदवाक्य स्मरत गाडीत चढतात.>>>>>>>>>>>>+१००००००००००००००.
काही वर्षांपुर्वी मी कोकणात चालले होते. रात्रीचा प्रवास होता. बसमधले बहुतेक सर्व प्रवासी झोपले होते. मी जागीच होते. त्यावेळी त्या अंधारातून, घाटातून, ड्रायव्हर व्यवस्थित गाडी चालवत होता. आणि मी मनोमन त्याला नमस्कार केला.
http://www.thehindu.com/news/
http://www.thehindu.com/news/national/sadhu-adopts-child/article4383117....
अशी सासू शतायुषी होवो - डॉ.
अशी सासू शतायुषी होवो - डॉ. सुनीता बागवडे
http://online3.esakal.com/esakal/20130206/5492080638944506839.htm
परंपरागत पूर्वग्रहानं आणि आता मालिकांच्या कृपेनं सासू-सुनेच्या नात्यात विळ्या-भोपळ्याचं सख्य मानलं जातं. पण वास्तव एवढं ढोबळ, काळं-पांढरं नसतं.
माझं माझ्या सासूवर मनापासून प्रेम आहे, हे जगाला ओरडून सांगावं, असं वाटतं; पण ते जगरहाटीच्या विरुद्ध आहे. भले मनातले हे भाव मी इतरांना पटवू शकणार नाही, पण ते खोटे नाहीत. त्यात स्वार्थ नाही. असला तर त्यांच्या कृतार्थ कष्टांना केलेला प्रणाम आहे. म्हणूनच "देवा, माझ्या सासूला "शतायुषी कर' एवढीच प्रार्थना करते.
व्वा! छान आहे हा धागा
व्वा! छान आहे हा धागा
ही बातमी कुठे लिहावी कळले
ही बातमी कुठे लिहावी कळले नाही म्हणून इथेच लिहितीये. 'शुभ' ह्या अर्थाने बातमीत काही नाही.
पण हौशी फोटोग्रफेर्स वा ज्यांना फोटोग्राफी मध्ये वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात त्यांच्यासाठी छान बातमी आहे.
शोध आनंदाचा - हाय स्पीड splash फोटोग्राफीचा
पुण्यातील एका सोफ्टवएर इंजीनियरने मायक्रोवेवचा pan, प्लास्टिकचा लंच बॉक्स, लाल रंगाचा ट्रे व साधा निकोन डी ३१०० वापरून उन्चावरून पडलेले पाण्याच्या थेंबाचे तुषार ह्याची छायाचित्रे काढली आहेत.
आजच्या सकाळ मध्ये हि detail बातमी आहे. सर्वांनी वाचवी. esakal मध्ये हे बातमी दिसली नाही. त्यामुळे लिंक देऊ शकले नाही.
अत्तिशय सुंदर धागा!
अत्तिशय सुंदर धागा! त्याबद्दल अभिनंदन! सध्याच्या जगण्यात आणि जगामध्ये सकारात्मक असं काहीतरी प्रकर्षाने समोर आणण्याची आणि त्याची आठवण ठेवण्याची फार गरज आहे...
अगदी अशाच प्रकारचा धागा काढावा असं माझ्याही मनात बरेच दिवसांपासून होतं, पण काही कारणास्तव काढला नाही....
Pages