संगम लस्सी

Submitted by प्रिंसेस on 21 January, 2013 - 04:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सिंगापुरातल्या आमच्या एका बंगाली मैत्रिणीचा नवरा कोणे एके काळी आमच्या खानदेशात कामानिमित्त गेला होता.
इथे ओळख झाली अन त्यांना कळले की "मी खानदेशी" तर त्यादिवशीच धुळ्याच्या संगम लस्सीची अन जळगांवच्या आमच्या प्रभातच्या बदाम मिल्क शेकची तोंड दुखेपर्यंत तारीफ करुन झाली.

गेल्या आठवड्यात त्यांच्यासाठी आणि आमच्या इतर मित्रांसाठी संगम लस्सी बनवली होती. फोटो काढता आले नाही क्षमस्व. पुन्हा केली तर नक्की डकवेन. किंवा तुम्ही कुणी ट्राय केली तर जरुर टाका.

तर सादर आहे संगम लस्सी...

लस्सी साठी :
दही - पाव किलो - २५० ग्रॅम
साखर - अर्धी वाटी
मीठ - एक छोटा चमचा
आणि अर्थातच पाणी - लस्सी घट्टच राहिल इतपत.
बर्फ - प्रत्येक ग्लासला एक दोन क्युब्ज

आईस्क्रीम साठी:
फूल क्रीम दूध : १ लिटर
साखर : १ वाटी
कॉर्न फ्लोअर : १ मोठा चमचा
हेवी क्रीम : १- १.५ वाटी
अर्धी वाटी दूध उकळुन थंड केलेले : कॉर्न्फ्लोअर विरघळुन घेण्यासाठी

क्रमवार पाककृती: 

लस्सी :
१. प्रथम घट्ट दही रवीने व्यवस्थित घुसळुन घ्यायचे. पाणी मुळीच टाकायचे नाही
२. आता त्यात साखर आणि मीठ मिसळुन पुन्हा घुसळावे. दह्याला अगदी मऊसुत पोत आला की ब्लेंडर/ मिक्सर मध्ये पुन्हा थोडे फिरवुन घ्यावे.
३. आता त्यात हळुहळू पाणी मिक्स करा. मिल्कशेक सारखी कन्सिस्टन्सी हवी.
४. लस्सी तयार आहे. ती थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवा.

आईस्क्रीम :
१. एक लिटर दूध मंद आचेवर उकळत ठेवणे.
२. सतत हलवत रहा जेणेकरुन तळाला चिकटणार नाही. आता यात साखर घाला. ढवळत रहा.
३. अर्धी वाटी दूध, जे आपण आधीच वेगळे काढले आहे त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करुन घ्या. गुठळ्या रहायला नको.
४. उकळत ठेवलेले दूध साधारण पाऊण लिटर किंवा त्यापेक्षा किंचित कमी झाले की गॅस बंद करुन त्यात कॉर्नफ्लोअर विरघळलेले दूध हळुहळु ओता. एका हाताने ढवळणे सुरु ठेवा.
५. गॅस पुन्हा मंद आचेवर सुरु करुन १-२ मिनिट सुरु ठेवा.
६. गॅस बंद करुन दूध पूर्ण थंड होऊ द्या.
७. आता हे दूध फ्रीजर मध्ये ठेवा.
८. पूर्ण सेट झाल्यानतर मोठे मोठे तुकडे करा.
९. आता हे तुकडे पुन्हा ब्लेंडर मध्ये टाका , फिरवा.
१०. आता त्यात क्रीम टाका. पुन्हा फिरवा.
११. इथे तुम्ही चव चाखुन बघु शकता. साखर कमी वाटल्यास साखर/ मध टाकुन पुन्हा ब्लेंडर फिरवा.
१२. मिश्रण आता दुप्पट झाल्यासारखे वाटेल एवढा वेळ ब्लेंडर मध्ये फिरवा. मिश्रण फ्लफी होण्यासाठी इतके अधिक क्रीम घालाल तितके चांगले.
१३. आता हे मिश्रण पुन्हा फ्रीजर मध्ये ठेवायचे आहे.
१४. सेट झाले की बाहेर काढा. आईस्क्रीम तय्यार !

संगम लस्सी :

लस्सी ग्लास मध्ये ओता.
त्यात एक दोन आईस क्युब्ज टाका
वरुन एक भला मोठा आईस्क्रीमचा गोळा टाका.
अमिताभ बच्चन चमचा (लंबु चमचा) ग्लासमध्ये ठेवा.
आस्वाद घ्या.

आगामी आकर्षण : जळगावच्या प्रभातचा बदाम मिल्क शेक Happy

वाढणी/प्रमाण: 
सांगता येणार नाही. तुमच्या आवडीवर अवलंबुन आहे.
अधिक टिपा: 

लस्सी घट्ट हवी. पंजाबी लस्सी प्रमाणे पातळ नको. त्यामुळे पाणी बेताने घाला.
मिश्रण इतके जास्त फ्लफी तितके जास्त आईस्क्रीम मऊ अन टेस्टी. कॅलरीज चा विचार करत नसाल तर क्रीमचे प्रमाण वाढवल्यास हरकत नाही. त्याच प्रमाणात साखरही वाढवा.
आईस्क्रीम मध्ये इसेन्स, फ्रुट पल्प , चॉकलेट/ कोको काहीही घालु नये. मूळ संगम लस्सी मध्ये मलई आईस्कीमच असते. कुठलाही फ्लेवर एवढेच काय अगदी ड्राय फ्रुट्स सुद्धा नसतात्. त्यामुळे अशी नटवलेली संगम लस्सी कशी लागेल महिती नाही. Uhoh
नुसतीच लस्सी (आईस्क्रीम न टाकता) संगम लस्सी नसते. Proud
वर लिहिलेला २० मिनिटे वेळ लस्सी अन आईस्क्रीम तयार झाल्यानंतरचा आहे. Proud पूर्ण वेळ सांगायचा तर एक आख्खा दिवस लागतो. पण ग्लास तोंडाला लावल्यावर खरे समाधान मिळेल.

माहितीचा स्रोत: 
मातोश्रींचे प्रयोग , खांदेशातल्या लस्सीच्या टपर्‍या, दुकाने, हाटेल्स ;) ई.ई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दही/लस्सी आणि आइसक्रीम एकत्र ????
कल्पना करायला जरा अवघड जातंय. पण आयती बनवून मिळाली तर ट्राय करायला हरकत नाही Wink कधी येऊ ?

अर्रे व्वा! काय आठवण करुन दिलीस!! डीट्टो धुळ्याची संगम लस्सी! Happy
पाचव्या गल्लीच्या कॉर्नरवरचा 'सांवरीया' वाला किंवा.. गोपाल टी हाऊस इथे मिळणारी.
अजुनही धुळ्याला गेलो तर आवर्जुन ही लस्सी घेतोच.

भारीच आहे हा प्रकार Happy

दही/लस्सी आणि आइसक्रीम एकत्र ???? >>> मलाईदार आणि बिना फ्लेवरचे आईस्क्रीम असल्याने छान लागेल. तसेही आपण स्ट्रॉबेरी / व्हॅनिला फ्लेवरचे दही खातो की Happy

स्स्स्स्स! काय आठवण करुन दिलीस! नंदुरबारलाही ही संगम लस्सी मिळायची.

सध्या आमच्याकडे उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे ही लस्सी बर्‍याचदा होतेय. फक्त रेडीमेड वॅनिला आईस्क्रिम वापरुन. मस्त लागते तशी पण संगम लस्सी फार भारी लागायची.

<नगरच्या दुर्गासिंग लस्सीची आठवण आली > +१
नगर हे लग्नाच्या बस्त्यासाठी खुप फेमस आहे. लग्नसराईच्या आधी मार्च ऐप्रिलमधे बस्त्याला आलेल्या लोकांसाठी थंड काहीतरी म्हनुन दुर्गासिंग/द्वारकासिंग यांची लस्सी खुप फेमस आहे. तिथली व्हॅनिला , आंबा , ड्रायफ्रुट्स , अंजीर लस्सी खुप मस्त असते.
कापडबाजारात चार आण्याची जरी खरेदी केली की लस्सी पिलिच पाहीजे असा आमचा नियम होता.

आहा छानच.
रुपया दोन रुपये गोळा करून तर कधी ढापून वीस पंचवीस रुपये जमा झाले की मित्रांबरोबर
श्रीरामपूरच्या पारिजातमधे चार रुपयात मिळणार्‍या र्मँगो आणि पिस्ता लस्सी हादडण्याची मजा काही औरच असायची.
त्याची याद ताझा झाली.

धन्यवाद सगळ्यांना !
खरच खूप भारी लागते ही लस्सी . आवर्जुन करुन बघा. दही अन आईस्क्रीम काँबो ज ब र द स्त लागते
रुणु कधी येतेस बोल Happy
आर्या अरे कित्ती दिवसापासून आठवतेय - सावरिया आठवत नव्हते . धन्यवाद.
श्यामली तू कुठे खाल्लीस ?
चिन्नु Happy
साक्षात दिनेशदा आणि जागु Happy लस्सी धन्य झाली !
सुशांत , वर्षा आणि प्रचारक Happy श्रीरामपूरच्या आमच्या मामींकडुन खूप ऐकलय तिथल्या आणि नगरच्या लस्सीबद्दल.
धन्यवाद !

वेगळाच प्रकार दिसतोय हा! कधी चाखला नाही. प्रिंसेस कृतीत साखर कधी घालायची ते बहुतेक नजरचुकीने घालायचं राहिलंय, तेवढं घालशील का? उन्हाळ्यात ही पा कृ करून बघणार!

दही/लस्सी आणि आइसक्रीम एकत्र ????
कल्पना करायला जरा अवघड जातंय.>>>
आम्हा नगरकरांना काहीच वेगळं नाही...............मी तेच लिहिणार होते जे सुशांतने वर लिहिलं आहे.
आमचा सुप्रसिद्ध दुर्गासिंग लस्सीवाला!
पण प्रिन्सेस................ मस्त आहे लस्सी!

मस्त रेसिपी प्रिंन्सेस. पन फोटोशिवाय "ती" मजा नाही. लस्सी +आईस्क्रीम कृतीनुसार सचित्र दर्शन कधी होणार?

Pages