माझा आणि आपल्यापैकी बहुतांशी स्त्रियांचा विश्वास आजही कुटुंबव्यवस्थेवर टिकून आहे. मतभेद, मनभेदांचं प्रमाणही कमी नसेल, पण ते कुटुंबव्यवस्था संपुष्टात यायला लागली आहे ह्या विचाराप्रत येण्याएवढं नाही. संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.
"स्त्री" हा केंद्रबिंदू मानून शोधनिबंध व तत्संबंधी लेखाची तयारी करीत असताना, एका वाढत चाललेल्या समस्येने माझे लक्ष वेधले. माझ्या स्वत:च्या काही पूर्वग्रहांना, विचारांना प्रचंड धक्काच बसला. अजुनही त्यावर शोध सुरूच आहे. काही अडचणी आहेत. ज्या ह्या लेखमालेच्या निमित्ताने चर्चेस येऊन त्यापध्दतीने जागृती होईल असे वाटते. प्राप्त माहितीचे आकडे चक्रावून टाकणारे होते. होते. घटस्फोटांची प्रकरणं जी न्यायालयासमोर आली त्यांचं प्रमाण गोव्यात २००८ साली ७५० होतं. तेच २००९ साली ७७० झालं, २०१० साली ७९३ आणि २०११ साली ११८९. त्यातही घटस्फोट मिळण्याच्या प्रमाणात झालेली ५०% ते ७०% एवढी वृध्दीसुध्दा अशीच चक्रावणारी आहे.
बदलते सामाजिक जीवन. त्या अनुषंगाने बदलती कुटुंब व्यवस्था हे आपल्या समाजाला कुठे घेवून चाललय? ह्या सगळ्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती तशी तोकडी आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण अशा प्रकारे ह्या समस्येचा विचार अजुनही करत नाही. घटस्फोटीतांचे जिल्हावार प्रमाण देण्यापलिकडे फारसं काही हाती लागत नाही. इतर देशामध्ये माहितीची साठवणूक अभ्यासात्मक दृष्टीकोनातून केली जाते. उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर घटस्फोटांची कारणे, वयोगट, लग्न होऊन किती वर्षांनी घटस्फोट, मुलांची भुमिका, घटस्फोटाआधीचि दंपतीची परिस्थिती व नंतरची परिस्थिती, इत्यादी अनेक कोनातून ह्या समस्येविषयी माहिती गोळा केली जाते व एकत्रितपणे त्याचा वापर तौलनीक विचार करून विवेकाने मार्ग काढण्यासाठी होतो. मग ते समुपदेशन असेल किंवा सामाजिक संस्थांनी घेतलेला पुढाकार असेल.
परंपरेने आलेली व शास्त्रिय बैठकीवर आधारलेल्या भारतीय कौटुंबिक व्यवस्थेत कालाप्रमाणे अनेक बदल झाले. त्यांची कारणे अनेक आहेत. भारतावर झालेली सततची आक्रमणं, आक्रमणातून निर्मित निर्नायकी व्यवस्था, भौगोलिक व वैचारीक गुलामगिरी आणि बदलत्या सामाजिक संवेदनांची संक्रमणावस्था ही कौटुंबिक जीवनात झालेल्या बदलांची काही प्रमुख कारणं आहेत. आश्रमव्यवस्थेवर आधारलेली कौटुंबिक समाजव्यवस्था आपण बदलली. एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली. समृध्द असलेली कुटुंबे चौकोनी झाली. घर भर अनेकविध नात्यांनी बांधलेली माणसं दिसेनाशी झाली. स्वत:च्याच जन्मदात्यांना भाऊ, काका, अण्णा व जन्मदात्रीला वहिनी, आक्का, काकू म्हणणारी पिढी संपत चालली आहे. ही एकत्र कुटुंबाची नामाभिधानाची गंमत नावापुरतीही आता दिसेनाशी झाली. काका, मामा आत्ते ही सख्खी नाती सोडल्यास आमच्या मुलांना इतर नाती माहितीही नाही अशी परिस्थिती झालीय. मग त्यातला गोडवा तो कुठून येणार. "आई"ची मॉम व "बाबांचा" डॅड झालाय. मुलांना आईव्यतिरिक्त संभाळणारी काकू, आज्जी, आत्ते, मामी ह्यांची जागा आयांनी घेतली. आया मिळणे दुरापास्त होऊ लागले तेंव्हा पाळणाघरे विकसित झाली, बोर्डींग शाळा सुरू झाल्या. कुंटुंब चालवण्यासाठी आम्ही कुटुंबापासूनच दूर गेलो. आज नातेवाईकांचं सोडा, नवराबायकोमधले संवाद, एकमेकांना भेटणं कमी झालय. एकमेकांना भेटायला वेळ नाही. चिमणा चिमणीचा चिवचिवाट हरवलाय. घरटी मोडताहेत.
मी बालविवाहाचं समर्थन करीत नाही फक्त माझा मुद्दा मांडण्यासाठी व फरक दाखविण्यासाठी उल्लेख करतेय. आधीच्या काळी लहानपणीच लग्न व्हायची, त्या कारणाने ती वधू नवीन घरात रुजायची. त्या घरच्या चालीरिती, संस्कार, नातेसंबंध, उठबस त्या मुलीला लहानपणापासूनच शिकविली जायची. आजच्या परिस्थितीमध्ये मुलगी एका विचारात, संस्कारात व नातेसंबंधात जवळपास पंचवीस वर्षे वाढते. तिचे विचार, आचार पक्के होतात. एक सक्षम व्यक्ती म्हणून ती परिपक्व होते. मग लग्न करून जेंव्हा ती सासरी जाते तेंव्हा तिथले संस्कार, तिथली नाती, तिथले आचार विचार ह्यात ती रुजावी, तिनं जुळवून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा करणं विपर्यस्त ठरतं. माहेरी व सासरी साधारण समानता असेल तर तेवढं कठीण जात नाही. पण असं प्रत्येक ठीकाणी असतच असं नाही. इथेच कुरुबुरींना सुरुवात होते. तिचं देणंघेणं हे वैचारिक व भावनिक दृष्ट्या फक्त पतीपुरतच मर्यादित राहतं. ह्याचा दोष त्या मुलीच्या व तिच्या माहेरच्यांच्या माथी मारला जातो. शिकली सवरली असेल तर शिक्षणावर मारला जातो. ह्यावर उपाय म्हणून "लहानपणीच मुलीचा विवाह करावा" हे अत्यंत हिणकस व आक्रस्ताळेपणाचे ठरेल. त्यावेळच्या परिस्थितीशी अनुकूल बालविवाह होता. आजची परिस्थिती वेगळी आहे व समस्याही वेगळ्या आहेत. म्हणूनच उपायही वेगळे हवेत.
बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माझ्या संसारात विनाकारण लुडबूड नको असते. मग ती सासरच्या मंडळींची असो अथवा माहेरच्या. घटस्फोटांच्या कारणं विषद करताना वक्त्याने सांगितलेली हकीकत आठवते, घटस्फोटाचं कारण एका ठिकाणी मुलीच्या आईची प्रचंड ढवळाढवळ हे होतं. सकाळी उठल्या उठल्या फोन, "शोन्या उठला माझा, बोर्न्व्हिटा पिला?". ते रात्री साडेदहा अकराला शेवटचा फोन. मधे २०-२५ फोन. जरा काही बिनसलं नवऱ्याबरोबर की लगेच मम्मीकडे तक्रार. मग मम्मीचे सल्ले आणि तिने तिच्या नवऱ्यावर केलेले प्रयोग. मुलीला जर स्वत:च्या संसारात कसं खंबीर रहावं, नवराबायकोंचे लहानसहान प्रश्न नाही सोडवता येत, तर उपयोग काय त्या इंजिनियरींगच्या डिग्रीचा आणि ६५,०००/- रुपये पगारांचा. नवऱ्यामुलाला शिकवताना आम्ही हाडाची काडं केली आहेत. त्याला शिकता कमावता केला. आज इंजिनियर झालाय, ६५,०००/- रुपये पगार आहे, त्यामागे आम्ही त्याला लहानाचा मोठा केला आणि मग तुला, सुनबाईला मिरवत घरी आणलं. आम्ही एकत्र राहतो, म्हणून आम्हाला मुलाच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे नाही चालायचं. नवरा बायकोचे संसारातले प्रोब्लेम्स त्यांचे त्यानीच सोडवायचे असतात. नवरा बायकोला संवाद साधू दे एकमेकांशी. एकमेकांना समजून घेवू देत ना. नाही सुटली समस्या आणि ते दोघं आपणहून आले सल्ला मागायला तर आणि तेवढाच सल्ला द्यावा. सक्ती नको. खरतर वडिलधाऱ्यांची नसती लुडबूड ही समस्या सोडवण्याऐवजी समस्या बिघडवूनच अधिक ठेवतात. एकत्र कुटुंब असणे म्हणजे संसारात लुडबूड करण्याचं अलिखित प्रमाणपत्र नव्हे.
आपली नाती, आपलं कुटुंब हे आपणच जपायचं असतं. नवरा बायकोचं नातं हे वरवर पाहता खूप सोपं पण तितकच गुंतागुंतीचं असतं. ते दोन शरीरांचं अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा भागवण्याची सोय म्हणून एकत्र येणं नाही. नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. संस्कारांची बीजं रोवणं आणि पर्यायानं चांगला समाज घडवणे हे विवाहसंस्थेचे कार्य आहे. आम्ही आमच्याच मुळावर उठलोय. संस्कारांच्या वळचणीतली ही काड्या काड्या जमवून बांधलेली घरटी कायद्याच्या काठीनं अशी नका पाडू. घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही.
दक्षिणाजी, <पण कित्येक जोडपी
दक्षिणाजी,
<पण कित्येक जोडपी वरिल सर्व आणि इतर बर्याच कारणांमुळे 'मनाने' कधीच वेगळी झाली होती. फक्त एका घरात राहणे म्हणजे लग्न संस्कृती टिकली... असं मानणं हे मुर्खपणाचं आहे.>
एक्दम मान्य. घटस्फोटाहूनदेखिल ही गंभीर समस्या आहे.
असे धुमसत असलेले अनेक संसार आहेत. त्यांना घटस्फोट हा एकच पर्याय आहे का? जर आपण असे म्हणू की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचा निर्णय घ्यायला दोघेही सक्षम आहेत, तर मग ही घुसमट का होते?
< काहीजणांवर ही लादलेली संस्कृती ते परतवून लावून नव्याने सुरूवात करतायत ही समस्या होऊ शकत नाही. नविन पालवी फुटण्या अगोदर पानगळ ही होतेच. त्याला समस्या म्हणू नये.>
हा वेगळा व चांगला विचार आहे. (इथे हसरी बाहुली)
मला जशी वाटते तशी ती समस्या नसेल तर खूपच चांगलं आहे. अपेक्षाही आहे ती होऊ नये.
<भारतातच नव्हे जगभरात काही ना काही कारणाने घटस्फोट न घेऊ शकणारी/घेणारी पण मनाने एकमेकांपासून शेकडो मैल दूर असणारी जोडपी आहेत त्यांच्या विकासासाठी काय करू शकतो आपण?>
ही चर्चा हा एक चांगला पर्याय आहे. (इथे हसरी बाहुली)
थोडासा बालिश प्रश्न. तुम्ही सर्वजणी ह्या बाहुल्या कशा काढता?
<कदाचित एखाद्या जोडप्याच्या
<कदाचित एखाद्या जोडप्याच्या मते मुले (मग ती स्वत:ची असोत किंवा दत्तक) शून्य महत्वाची असू शकतात. किंवा मुल होऊच न देणे हा निर्णय आधीच घेऊन लग्न करणारी पण जोडपी असू शकतात.>
किती? <<<
किती हा मुद्दा आहे का? मुळात भारतामधे लग्न झाल्यावर मूल होणे कंपलसरी असल्यासारखा भोचकपणा चालू असतो. किती जण आपल्याला खरंच मूल हवंय म्हणून जन्म देतात आणि कितीजण लग्न झाल्यावर मूल होणे ही जनरीत आहे असं समजत मुलांना जन्माला घालतात? केलात याचा अभ्यास?
आणि मूल नकोच हे ठरवलेले असे हजारात एखादे जरी जोडपे असेल तरी त्यांच्या निर्णयाचा रिस्पेक्ट होणे महत्वाचे.
जर आपण असे म्हणू की तो
जर आपण असे म्हणू की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचा निर्णय घ्यायला दोघेही सक्षम आहेत, तर मग ही घुसमट का होते? <<<
जे लोक त्यांच्या समस्यांना ’साध्या साध्या गोष्टी’ म्हणत त्यांनी घटस्फोट घेऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात.
असे लोक जे घटस्फोटीतांना गुन्हेगार असल्यासारखे वागवतात.
असे लोक ज्यांना दुसर्यांच्या आयुष्यात नको इतके नाक खुपसून चिवडा करायची घाणेरडी सवय असते.
हे सगळे समाजाचाच भाग असतात पण किडका आणि घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येण्याइतके त्रासलेल्या व्यक्तीमधे प्रत्येक वेळेला या सगळ्या किडक्या भागाला फाट्यावर मारायची हिंमत, क्षमता, ताकद उरलेली नसते.
निधपजी, <किती हा मुद्दा आहे
निधपजी,
<किती हा मुद्दा आहे का? मुळात भारतामधे लग्न झाल्यावर मूल होणे कंपलसरी असल्यासारखा भोचकपणा चालू असतो. किती जण आपल्याला खरंच मूल हवंय म्हणून जन्म देतात आणि कितीजण लग्न झाल्यावर मूल होणे ही जनरीत आहे असं समजत मुलांना जन्माला घालतात? केलात याचा अभ्यास?>
जनरीत म्हणून?? हे नाही पटत. मला तरी मूल हवं होतं म्हणून ते झालं. लग्नाच्या सुरुवातीची दोन वर्षे व्यक्तिशः मला नको होतं म्हणून आम्ही काळजी घेतली.
तुमचा रोख "वंशाचा दिवा" या दिशेने असेल तर आजही गोव्यात ग्रामीण भागात अशा पध्दतीची अपेक्षा खूप प्रमाणात आहे. त्यातही "सासू" ह्या स्त्रीकडूनच अधिक प्रमाणात आहे. शहरी भागात अशा प्रकारच्या गोष्टीत बदल होतायत. जे निश्चितच स्वागतार्ह आहेत. पण एकूण प्रमाण कमी आहे हे सत्य आहे.
मला तरी मूल हवं होतं म्हणून
मला तरी मूल हवं होतं म्हणून ते झालं. <<<
तुमच्यासारखेच सगळे असतात का? असायला हवे का?
आपल्याला मूल खरंच हवं की नको हाही विचार करायचा असतो हे माहितीच नव्हतं. लग्न करायलाच हवं आणि मूल व्हायलाच हवं हेच माहिती होतं असं म्हणणार्या य बायका माहिती आहेत.
लग्न करणे आणि मूल होणे हे भारताचा नागरिक म्हणून कंपलसरी नाहीये हेच गावी नसते कित्येकांच्या. आणि ते तसे विसरले जावे असेच समाजाचे कंडीशनिंग आहे. पण समाजाच्या कंडिशनिंगप्रमाणे माणसाचा गाभा बनत नाही.
एखादी व्यक्ती लग्न, मूल या सगळ्या व्यवस्थेत फिट व्हावी अश्या प्रकारे घडलेलीच नसते.
हे समजून घेणं इतकं अवघड आहे का?
<असे लोक जे घटस्फोटीतांना
<असे लोक जे घटस्फोटीतांना गुन्हेगार असल्यासारखे वागवतात.
असे लोक ज्यांना दुसर्यांच्या आयुष्यात नको इतके नाक खुपसून चिवडा करायची घाणेरडी सवय असते.>
अशी माणसं वेगळी आणि समुपदेशन करणारी वेगळी. नाक खुपसणारी (खूपदा "घरची") तुमच्या परवानगीची वाट पहात नाहीत. अशांना दंपतीच्या सुखाशी काही देणं घेणं नसतं. स्वतःचा कंडू शमविणे एवढाच हेतू असतो.
समुपदेशन हा पाश्चात्य देशात सकारात्मक सल्ला म्हणून मुद्दामुहून समस्याग्रस्त जोडपी जाउन घेतात. आपल्याकडे अजुनही तशी मानसिकता नाही. म्हणूनच उपटसुंभ नातेवाईकांचे फावते.
अशा समस्यांची डेटाबेस आपल्याकडे आहे अशी एकही सामाजिक समुपदेशन करणारी संस्था माझ्या पाहण्यात आली नाही. त्रयस्थपणे अशा समस्येकडे पाहणे आवश्यक आहे.
काहीही झाले तरी संसार टिकलाच पाहिजे व समस्या त्रयस्थपणे न सोडवता घटस्फोट घेणे दोनही टोकाच्या भूमिका व पर्यायाने चुकीच्या नाहीत का?
समस्या त्रयस्थपणे न सोडवता
समस्या त्रयस्थपणे न सोडवता घटस्फोट घेणे <<<
घेतलेला घटस्फोट असाच आहे हे तुम्हाला काय माहिती?
वरती काहींनी लिहिलंय की घटस्फोटाच्या केसेसमधे कोर्ट स्वतःहून काउन्सेलिंगसाठी आदेश देते सुरूवातीला.
उत्तम मॅरेज काउन्सेलर्स पुण्या-मुंबईत तरी आहेत.
मुद्दा हा असतो जर इतकं तुटलं असेल आणि जोडण्यात इंटरेस्टच उरला नसेल तर काउन्सेलर काय करणार? किंवा त्यात वेळ घालवून तरी काय उपयोग?
निधपजी, <हे समजून घेणं इतकं
निधपजी,
<हे समजून घेणं इतकं अवघड आहे का?>
असं समजून वागणारी जोडपी अत्यल्प आहेत. मूल असावं असं वाटणं ही निसर्गसुलभ भावना आहे. निसर्ग, समाज, कुठल्याही दृष्टीकोनातून पहा ती सहजतेकडेच झुकली पाहिजे. आपण पहिल्याच प्रतिसादात मांडल्याप्रमाणे कंपल्शन कडे नव्हे. मारूनमुटकून, मनाविरुध्द, इच्छेविरूध्द केवळ रूढी परंपरा म्हणून जन्मास आलेली अथवा घडवलेली प्रजा "सुप्रजा" कशी होईल ?
निधपजी, <घेतलेला घटस्फोट असाच
निधपजी,
<घेतलेला घटस्फोट असाच आहे हे तुम्हाला काय माहिती?
वरती काहींनी लिहिलंय की घटस्फोटाच्या केसेसमधे कोर्ट स्वतःहून काउन्सेलिंगसाठी आदेश देते सुरूवातीला.
उत्तम मॅरेज काउन्सेलर्स पुण्या-मुंबईत तरी आहेत.
मुद्दा हा असतो जर इतकं तुटलं असेल आणि जोडण्यात इंटरेस्टच उरला नसेल तर काउन्सेलर काय करणार? किंवा त्यात वेळ घालवून तरी काय उपयोग?>
नाही. मला कसे माहित असणार?
कोर्ट प्रक्रियेचा भाग म्हणून काउन्सिलिंगचा आदेश देते. जोडपी स्वतःहून नाही जात. घटस्फोटाचे अर्ज दाखल केले म्हणजे त्यांना इंटरेस्ट उरलेलाच नसतो किंवा तोपर्यंत समस्या विकोपाला गेलेली असते. समुपदेशन हे त्याआधी होणे आवश्यक असते. पण दुर्दैवाने नको ती माणसे नको तेवढे नाक खुपसून मोकळी झालेली असतात.
असं समजून वागणारी जोडपी
असं समजून वागणारी जोडपी अत्यल्प आहेत. <<<
पण आहेत ना? मग विवाहाचा खरा उद्देश सुप्रजा निर्माण करणे कसा असेल?
मूल असावं असं वाटणं ही निसर्गसुलभ भावना आहे. <<<
अहो नाही हो. निसर्गसुलभ भावना मूल असण्याची असतेच असे नाही.
जाऊदे. कंटाळा आला.. करा तुमचं प्रिचींग हवं तेवढं. आम्ही नरकात जायला तयार आहोत...
आणि मूल नकोच हे ठरवलेले असे
आणि मूल नकोच हे ठरवलेले असे हजारात एखादे जरी जोडपे असेल >>> खरच असेल कुणी? मुल पाहीजे म्हणून तडफडताना लोक बघितली आहेत. अशीही आहेत की झाल तर ठीक नाहीतर आपल अडत नाही, काही आपल्या life style ला झेपणार नाही म्हणून नको. ह्यान्च्या मधे strong motherhood instincts/feelings नसले तरी "मुल नकोच" असे टोकाचा विचार करणारे impossible!
माझ्या मते बाईच्या जातीला जसे sexual feelings normal आहेत, तसेच motherhood instincts पण. ह्म्म intensity मात्र प्रत्तेकाची कमी-जास्त प्रमाणात वेगळी असते पण "मुल नकोच" हे नाही पटत.
(मी स्त्री असल्याने, fatherhood/parenting न लिहीता motherhood लीहीले, जे मी जाणवू शकते)
खरच असेल कुणी? << माझ्या
खरच असेल कुणी? <<
माझ्या ओळखीत आहेत नक्की. ठेवायचा तर ठेवा विश्वास. नाहीतर बी एस समजा.
खरच असेल कुणी? << माझ्याही
खरच असेल कुणी? <<
माझ्याही ओळखीत ही "मूल नकोच" असे ठरवलेली अनेक जोडपी आहेत. नक्की किती आकडा संगितला तर विश्वास बसेल तुमचा?
प्रत्येक वेळॅस भांडणं
प्रत्येक वेळॅस भांडणं विकोपाला गेली तर फक्त घटस्फोट हाच पर्याय नसतो.
नवीन प्रेम ते भांडण्म हा प्रवास जसा हो ऊ शकतो तसाच भां ड्ण ते अॅक्सेप्टन्स आणि प्रेम हा प्रवासही हो ऊ शकतोच.
कसही करा पण एकत्र रहा हा विचार जसा चुकीचा आहे, तसच नाही पटत तर पटवून घ्यायचा प्रयत्नही करु नका हा विचारही घातक.
बाई आणि पुरुष एकत्र येण्यामागे ( आकर्षण प्रेम ह्या दृष्टीनं. ), निसर्गाच्या दृष्टीनं मुलं होणं हा एकमेव हेतू असतो. विवाहसंस्था त्याचच. एक्सटेन्क्श्न. होती.
लकिली आपल्याला विचार करायची शक्ती असल्यानं, आपण ह्यापे क्षा वेगळा विचार करून तो इम्प्लिमें ट करु शकतो मात्र.
वंदना, वेग ळ्या वातावरणात वाढूनही दुसरे विचार ऐ कायला ओपन असल्याबद्दल अभिनंदन!
ह्यान्च्या मधे strong
ह्यान्च्या मधे strong motherhood instincts/feelings नसले तरी "मुल नकोच" असे टोकाचा विचार करणारे impossible >> Having an instinct/feeling is one thing and acting on that instinct/feeling is all together different game.
नानबा पहिल्या प्याराग्राफशी
नानबा पहिल्या प्याराग्राफशी संपूर्ण सहमत. दुसराही पटणेबल.
वंदना, तुमचा लेख इतर
वंदना, तुमचा लेख इतर अनेकांप्रमाणेच पटला नाही. इथे अनेक लोक मुद्दाम इतरांना उचकवायला "जुने ते सारेच सोने" टाइप विचार मांडत असतात. पण तुमचा लेख खोडसाळपणा म्हणून लिहिलेला वाटत नाही. तुमच्यासारखे अनेक लोक मला माहीत आहेत, ज्यांना नवे काही (प्रश्न, प्रश्नांची complexity, सोल्युशन्स वगैरे) अॅक्सेप्ट करायचे नसतात असे नाही, पण त्यांना नव्याची (प्रश्न, प्रश्नांची complexity) बर्याचदा ओळखच नसते. टिपीकल परीटघडीची कुटुंबे.
इथे तुम्हालाही घटस्फोटाची मर्यादित कारणं म्हणजे एकत्र राहायला विरोध, लुडबुड नको म्हणणारी सून एवढेच माहीत आहे. लग्न मोडण्याचे कारण समलिंगी संबंध हे कदाचित तुम्ही स्वप्नातही इमॅजिन केले नसेल. त्यात काही चुक आहे असे नाही. तुम्ही अर्थात तुमच्या किंवा तुमच्या आजुबाजुच्या लोकांकडे बघून मत बनवले असेल. पण मला वाटते, एखाद्या विषयावर अधिकारवाणीने मत मांडून निष्कर्ष काढण्याआधी जरा बाहेरच्या जगाकडे बघण्याची आवश्यकता आहे. इथे मायबोलीवर असे अनेक perspectives मिळतील. त्यामुळे तुम्ही खरंच शोधनिबंध वगैरे लिहिणार असाल तर इथे लिहित रहा अन तुमची मतं पडताळून बघत रहा.
नीधप, तुझ्या सगळ्या पोस्टना
नीधप, तुझ्या सगळ्या पोस्टना १००% अनुमोदन.
माझ्या जवळच्या ओळखीत ३ उदाहरणे अशी आहेत की जाणीवपूर्वक मुल न होऊ देण्याचा त्यांचा निर्णय आहे. तिन्ही मैत्रिणींची थोडक्यात ओळख देते
१. प्रेमविवाह - कलेच्या माध्यमातून जवळ आलेले जोडपे. दोन्ही घरून आधी विरोध मग स्वीकार टाईप लग्न. वय दोघेही २८-२९ च्या आसपास. ४-५ वर्षे झाली लग्न होऊन. अजुनतरी मुल नको हा निर्णय आहे. पण तिशीनंतर विचार बदलू शकेल अशी मनाची तयारी आहे त्यांच्या. खूप सुखी आहेत. घरचे प्रचंड बोलतात. पण हे दोघेही त्यांच्या मतावर ठाम आहेत आणि समाधानी आहेत.
२. हे जोडप मला जेव्हा जेव्हा भेटतं तेव्हा तेव्हा प्रचंड आश्चर्यचकीत करतं. काका-काकू दोघे ५०च्या जवळ आहेत. त्यांच्याकडूनच समजलेली ही माहिती - लग्न रितसर दाखवून ठरवून झालेले. दाखवण्याच्या कार्यक्रमातच काकांनी काकूला मला मुल नकोय असं सांगितले. त्यांनी मान्यदेखील केले. प्रचंड सुखी कपल. हायकिंग, भटकंती खूप करतात. दोघे आपआपल्या नोकरीत फार अगदी वरच्या पदावर नसले तरी जिथे आहेत तिथे छान आनंदात असतात. कधीही मुल या विषयावर उदास होऊन बोलत नाही. मुलं असलेल्यांमधे मिसळतात. आता तिची कुचंबणा, मन मारलं असेल इ. इ. बाबी बोलूच नका. कारण या काकू मनमोकळेपणी बोलतात. अतिशय स्पष्टवक्त्या आहेत. त्यामुळे
>>>मूल असावं असं वाटणं ही निसर्गसुलभ भावना आहे >>> अजिबात नाही हो.
लोक असा निर्णय घेऊ शकतात आणि त्यात सुखी देखील असतात हेच सांगायचंय मला.
तिसरं उदाहरण देखील अशाच पद्धतीचे आहे. पण घरच्यांच्या त्रासाने हैराण झालेले आहे. द्विधा मनस्थितीत आहे.
...
...
सिमन्तिनी, तुझ्या अनुभवाच्या
सिमन्तिनी, तुझ्या अनुभवाच्या विरुद्ध अनुभव अस्लेले लोकही चांगलेच माहिती आहेत. (अशा अंतरावर जिथून खरी मतं कळ तात )
म्हणूनच वरची पोस्ट आली.
वरच्या
नताशाच्या पोस्टालाही अनुमोदन. एस्पे पहिला पॅरा.
anudon, "मूल नकोच" असे
anudon, "मूल नकोच" असे ठरवलेली, >>> बरोबर आहे, कोणाच्या काय circumstances/priorities आसतील. माझ्या ओळखीतही आहेत अशी जोडपी.
पण "मूल नकोच" असे वाटणारी...कठीण आहेत सापडण.
नानबाच्या पोस्टला अनुमोदन.
नानबाच्या पोस्टला अनुमोदन.
पण "मूल नकोच" असे
पण "मूल नकोच" असे वाटणारी...कठीण आहेत सापडण. > अगं पण, कुणाला मूल व्हावंसं वाटलंच आहे/नाही हे आपण कसं ग्रुहित धरणार? दुसरं म्हणजे असं गृहीतक आपण कुठल्याही गोष्टीबाबत आपण मांडू शकतो, म्हणजे कुणावर हात उगारला नाही हे ठिक आहे पण तसे कधीतरी वाटले आहेच महत्वाचे. पण त्याने काय नक्की सिध्द होते? मुद्दा लग्नाचा उद्देश मुले होऊ देणे हा आहे की नाही, याबद्दल चा आहे.
>>>संसारीक चिंता, समस्या ह्या
>>>संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.
"स्त्री" हा केंद्रबिंदू मानून शोधनिबंध व तत्संबंधी लेखाची तयारी करीत असताना, एका वाढत चाललेल्या समस्येने माझे लक्ष वेधले. माझ्या स्वत:च्या काही पूर्वग्रहांना, विचारांना प्रचंड धक्काच बसला. अजुनही त्यावर शोध सुरूच आहे. काही अडचणी आहेत. ज्या ह्या लेखमालेच्या निमित्ताने चर्चेस येऊन त्यापध्दतीने जागृती होईल असे वाटते.<<<
आदरणीय वंदना बर्वे!
मी फक्त लेख वाचला आहे. प्रतिसाद वाचण्याची कुवत माझ्यात सध्या नाही.
लेख पूर्ण वाचला आहे, वरील विधाने केवळ कोट केलेली आहेत इतकेच.
नैसर्गीक नियमांना विचारांच्या परिघात प्रवेशही न देणारा असा आत्मप्रौढीयुक्त, अज्ञानजन्य व बावळट विचारांचे हिरीरीने प्रतिनिधित्व करणारा लेख वाटला.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
तसच नाही पटत तर पटवून घ्यायचा
तसच नाही पटत तर पटवून घ्यायचा प्रयत्नही करु नका हा विचारही घातक. >> नानबा हे नाही पटले. घटस्पोट बद्दल आला कंटाळा घे घटस्पोट इतके सोपे असते का? लिगल प्रोसिजर असतेच की ज्यात कमित कमि ६-१२ महिने लागतात. जर अमिकेबल नसेल तर अजुन कटकटी. म्हणुन बरेच लोक लग्नच करत नाहीत. लिव्ह-इन स्विकारतात किंव प्रिनप करतात त्याचे काय?
घटस्पोट ही समस्या का वाटली ह्याचे उत्तर द्यायचे बर्वे बाईंनी टाळले आहे. ती समस्या नसेल तर तो का व कसा, कोणत्या परिस्थितीत घ्यावा, तो योग्य वा अयोग्य आहे हे जोडप्यागणित बदलते. त्याच्प्रमाणे सहजीवन कसे असावे हे देखील ... कोणला आपल्या जोडिदाराचे दुसर्याशी असलेले संबंध चालुन जातात कोणाला नाही. कोणला मुल असले तर आनंद कोणाला नसले तर आनंद... वगैरे...
नताशा, पेशवा +१. घटस्पोट ही
नताशा, पेशवा +१.
घटस्पोट ही समस्या का वाटली ह्याचे उत्तर द्यायचे बर्वे बाईंनी टाळले आहे.>>> पेशवा, ह्याचे उत्तर नताशाच्या पोस्ट मध्ये आहे.
काडीमोड होण्यामागे कारण जेव्हा "तुम्हाला" संवाद नसणे असं वाटतं तेव्हा तुम्ही थोडक्यात इतर लोक (काडीमोड घेणारे) हे संवाद साधायचा प्रयत्नच करत नाही किंवा त्यांना जमत नाही असं गृहित धरत आहात. इतरांची ढवळाढवळ हे कारण असेल तर मग ते नवरा बायको एक मेकांबरोबर किंवा इतर दुसर्या कोणी व्यक्तीबरोबर संसार करता येइल इतके परिपक्व झालेले नाही असच म्हणावे लागेल. आणि तसं असेल तर बळच बरोबर राहून उपयोग काय? बरोबर राहणेच एक समस्या होऊन बसेल आणि मग घटस्पोटाचा मार्ग उपलब्ध आहे तेच बरं नाही का?
>>तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न
>>तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचा निर्णय घ्यायला दोघेही सक्षम आहेत, तर मग ही घुसमट का होते?>><<
१. समाज, समाजाचे प्रेशर, लहानपणापासून झालेले कंडिशनिंग (समाजाने ठरवेलेले की घटपोस्ट म्हणजे वाईटच, लग्न एकदा झाले की मेल्यावरच सुटका, कसेही करून जमवून घ्या.), समाजाने घटस्पोटीत व्यक्तीला दिलेली वाईट वागणूक. ह्या सर्व बाबतींमूळे ती माणसं(दोन माणसे जी सक्षम आहेत, स्वालंबी आहेत पण एकमेकांना कोणत्य ना कोणत्या कारणाने "पूरक" नाहीत 'त्यांच्याच दृष्टीने व त्यांना वेगळं व्हायचय.) घुसमटत दिवस काढतात.
२. निर्णय घ्यायला कठिण जाते त्याचे दुसरे कारण बहुधा, त्या त्या वेळी त्या दोन व्यक्तींच्या समोर असलेले त्यांचे प्रश्ण वा काही जबाबदारी( मूलं वगैरे).
समूपदेशक दर वेळी मदत करतोच असे नाही. भारतात माहित नाही पण इथे "काही"(प्लीज नोट 'काही') समूपदेशक दर बाजार मांडल्याप्रमाणे सेशन्स घेतात कायच्या काय फी घेवून. हा एक वेगळा मुद्दा आहे पण मतितार्थ हा की समूपदेशक असला तरी मदत होतेच, मिळतेच असे नाही. हां, काही विचारांना नवी दिशा मिळू शकते पन त्यातून घटपोस्ट घेणं चांगल आहे हे तरी लक्षात येते किंवा जमवू शकतो का ह्याची चाचपडणी होवू शकते. पण तरीही हे सगळं खूपच probability वर अवलंबून आहे व ते दर जोडप्या गणिक बदलते व बदलू शकते.
उदाहरणं, नवरा नंपूसक असेल तर काय करणार समूपदेशक?
बायकोला मूलच होणार नाही(पण नवर्याला हवय) तर काय करणार एकत्र राहून?
किंवा मनानेच व विचारानेच दोन जोडपी पुर्ण 'वेगळी'च आहेत(compatibility) तर काहीच फायदा नाही.
ठरवून काय प्रेमविवाह काय, पण एकत्र राहिल्या लागल्यावर विचारांची दोन टोके व जीवनाबद्दलचे अॅप्रोच वेगळे असलेल्या व्यक्तींना एकत्र जगणे कठिण होते. अशी जोडपी पाहिली आहेत मी.
त्यामूळे खूपच घुसमटीत जगण्यापेक्षा व समाजाचा विचार करत आयुष्य घालवण्यापेक्षा मुक्त झालेले बरं.
बरं, वंदनाजी, तुम्ही इथे संयुक्ता तर्फी एक सर्वे झालेला वाचा. कुठला तो लक्षात येत नाही.
तसेच ज्या दोन चार जोडप्यांचा घटस्पोट झालाय त्यांना विचारा कसे वाटले घटस्पोट झाल्यावर्(खास करून नको असलेल्या नात्यातून सुटका झाल्यावर).
(घटस्पोट व त्यामागची अगतिकता काय असू असते ह्याचा एक प्रयत्न आहे माझ्या माहीती प्रमाणे)
एक प्रश्ण, वर्षानूवर्षे "लग्न" टिकवू ठेवायचेच असते ते कसेही असले तरी ह्या सामाजिक समजाला, घटस्पोट तडा देतो म्हणून का सामाजिक समस्या म्हणताहात? (हे समजले नाही म्हणून विचारते).
नीधप, आपला इथला प्रतिसाद
नीधप,
आपला इथला प्रतिसाद वाचला.
१.
>> येस्स.. माझ्यामते कायद्याचे शिक्कामोर्तब यापलिकडे काही नाही. पण अशी परिस्थिती नाही.
>> प्रत्येकाच्या आपापल्या प्रायोरिटीज असतात हो.
जर केवळ कायद्याचं शिक्कामोर्तब हाच अर्थ असेल, तर लग्न या गोष्टीस एव्हढे प्राधान्य द्यायची गरज का भासावी? केवळ नरमादी यांनी एकत्र यावं एव्हढाच हेतू आहे का लग्नाचा? की त्यापेक्षा काहीतरी अधिक आहे?
काहीतरी अधिक आहे हे गृहीत धरून पुढचा प्रतिसाद बघूया.
२.
>> हे प्रत्येक विवाहानुसार बदलते असे मी मानते.
अगदी बरोबर. मात्र तरीही या वेगळेपणांचा मसावि (कॉमन डिनोमिनेटर) काढता येऊ शकेल. पुरूष आणि स्त्री विवाह वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. त्यामुळे त्यांच्यात आदानप्रदान होतं. उदा. : स्त्री पुरुषाला कौटुंबिक नेतृत्व करू देते. याच्या बदल्यात पुरूष स्त्रीची काळजी घेतो, इत्यादि. हे आदानप्रदान वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. ते प्रत्येक विवाहानुसार बदलणार, हे आपलं मत पटलं.
मात्र आदानप्रदान होतं एव्हढं नक्की. हे ते आदानप्रदान विवाहाचा पाया असतं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. ही देवघेव संपुष्टात आली की समजावं की दूर व्हायची वेळ आली आहे.
आ.न.,
-गा.पै.
>>>झंपी | 5 December, 2012 -
>>>झंपी | 5 December, 2012 - 02:02
>>>बायकोला मूलच होणार नाही(पण नवर्याला हवय) तर काय करणार एकत्र राहून?
बापरे !!! आजच्या काळात असले स्वार्थी आणि बुरसटलेले विचार ? दत्तक घेता येउ शकते, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेट मदर.. कितीतरी पर्याय आहेत.
बायको हे काय फक्त मूल जन्माला घालण्याचे साधन आहे का? प्रेम, सहजीवन याला काहीच अर्थ नाही ?
>>बापरे !!! आजच्या काळात असले
>>बापरे !!! आजच्या काळात असले स्वार्थी आणि बुरसटलेले विचार ? दत्तक घेता येउ शकते, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेट मदर.. कितीतरी पर्याय आहेत.>><< तुम्हाला वाटले स्वार्थी, ज्यांना स्वतःचेच मूल हवेय व बायकोने केलेली फसवणूक असेल तर?(त्या मुलीला मूल होणार नाही हे माहित असताना तिने केलेले लग्न).
Pages