घटस्फोट

Submitted by सौ. वंदना बर्वे on 1 December, 2012 - 12:45

माझा आणि आपल्यापैकी बहुतांशी स्त्रियांचा विश्वास आजही कुटुंबव्यवस्थेवर टिकून आहे. मतभेद, मनभेदांचं प्रमाणही कमी नसेल, पण ते कुटुंबव्यवस्था संपुष्टात यायला लागली आहे ह्या विचाराप्रत येण्याएवढं नाही. संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.

"स्त्री" हा केंद्रबिंदू मानून शोधनिबंध व तत्संबंधी लेखाची तयारी करीत असताना, एका वाढत चाललेल्या समस्येने माझे लक्ष वेधले. माझ्या स्वत:च्या काही पूर्वग्रहांना, विचारांना प्रचंड धक्काच बसला. अजुनही त्यावर शोध सुरूच आहे. काही अडचणी आहेत. ज्या ह्या लेखमालेच्या निमित्ताने चर्चेस येऊन त्यापध्दतीने जागृती होईल असे वाटते. प्राप्त माहितीचे आकडे चक्रावून टाकणारे होते. होते. घटस्फोटांची प्रकरणं जी न्यायालयासमोर आली त्यांचं प्रमाण गोव्यात २००८ साली ७५० होतं. तेच २००९ साली ७७० झालं, २०१० साली ७९३ आणि २०११ साली ११८९. त्यातही घटस्फोट मिळण्याच्या प्रमाणात झालेली ५०% ते ७०% एवढी वृध्दीसुध्दा अशीच चक्रावणारी आहे.

बदलते सामाजिक जीवन. त्या अनुषंगाने बदलती कुटुंब व्यवस्था हे आपल्या समाजाला कुठे घेवून चाललय? ह्या सगळ्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती तशी तोकडी आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण अशा प्रकारे ह्या समस्येचा विचार अजुनही करत नाही. घटस्फोटीतांचे जिल्हावार प्रमाण देण्यापलिकडे फारसं काही हाती लागत नाही. इतर देशामध्ये माहितीची साठवणूक अभ्यासात्मक दृष्टीकोनातून केली जाते. उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर घटस्फोटांची कारणे, वयोगट, लग्न होऊन किती वर्षांनी घटस्फोट, मुलांची भुमिका, घटस्फोटाआधीचि दंपतीची परिस्थिती व नंतरची परिस्थिती, इत्यादी अनेक कोनातून ह्या समस्येविषयी माहिती गोळा केली जाते व एकत्रितपणे त्याचा वापर तौलनीक विचार करून विवेकाने मार्ग काढण्यासाठी होतो. मग ते समुपदेशन असेल किंवा सामाजिक संस्थांनी घेतलेला पुढाकार असेल.

परंपरेने आलेली व शास्त्रिय बैठकीवर आधारलेल्या भारतीय कौटुंबिक व्यवस्थेत कालाप्रमाणे अनेक बदल झाले. त्यांची कारणे अनेक आहेत. भारतावर झालेली सततची आक्रमणं, आक्रमणातून निर्मित निर्नायकी व्यवस्था, भौगोलिक व वैचारीक गुलामगिरी आणि बदलत्या सामाजिक संवेदनांची संक्रमणावस्था ही कौटुंबिक जीवनात झालेल्या बदलांची काही प्रमुख कारणं आहेत. आश्रमव्यवस्थेवर आधारलेली कौटुंबिक समाजव्यवस्था आपण बदलली. एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली. समृध्द असलेली कुटुंबे चौकोनी झाली. घर भर अनेकविध नात्यांनी बांधलेली माणसं दिसेनाशी झाली. स्वत:च्याच जन्मदात्यांना भाऊ, काका, अण्णा व जन्मदात्रीला वहिनी, आक्का, काकू म्हणणारी पिढी संपत चालली आहे. ही एकत्र कुटुंबाची नामाभिधानाची गंमत नावापुरतीही आता दिसेनाशी झाली. काका, मामा आत्ते ही सख्खी नाती सोडल्यास आमच्या मुलांना इतर नाती माहितीही नाही अशी परिस्थिती झालीय. मग त्यातला गोडवा तो कुठून येणार. "आई"ची मॉम व "बाबांचा" डॅड झालाय. मुलांना आईव्यतिरिक्त संभाळणारी काकू, आज्जी, आत्ते, मामी ह्यांची जागा आयांनी घेतली. आया मिळणे दुरापास्त होऊ लागले तेंव्हा पाळणाघरे विकसित झाली, बोर्डींग शाळा सुरू झाल्या. कुंटुंब चालवण्यासाठी आम्ही कुटुंबापासूनच दूर गेलो. आज नातेवाईकांचं सोडा, नवराबायकोमधले संवाद, एकमेकांना भेटणं कमी झालय. एकमेकांना भेटायला वेळ नाही. चिमणा चिमणीचा चिवचिवाट हरवलाय. घरटी मोडताहेत.

मी बालविवाहाचं समर्थन करीत नाही फक्त माझा मुद्दा मांडण्यासाठी व फरक दाखविण्यासाठी उल्लेख करतेय. आधीच्या काळी लहानपणीच लग्न व्हायची, त्या कारणाने ती वधू नवीन घरात रुजायची. त्या घरच्या चालीरिती, संस्कार, नातेसंबंध, उठबस त्या मुलीला लहानपणापासूनच शिकविली जायची. आजच्या परिस्थितीमध्ये मुलगी एका विचारात, संस्कारात व नातेसंबंधात जवळपास पंचवीस वर्षे वाढते. तिचे विचार, आचार पक्के होतात. एक सक्षम व्यक्ती म्हणून ती परिपक्व होते. मग लग्न करून जेंव्हा ती सासरी जाते तेंव्हा तिथले संस्कार, तिथली नाती, तिथले आचार विचार ह्यात ती रुजावी, तिनं जुळवून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा करणं विपर्यस्त ठरतं. माहेरी व सासरी साधारण समानता असेल तर तेवढं कठीण जात नाही. पण असं प्रत्येक ठीकाणी असतच असं नाही. इथेच कुरुबुरींना सुरुवात होते. तिचं देणंघेणं हे वैचारिक व भावनिक दृष्ट्या फक्त पतीपुरतच मर्यादित राहतं. ह्याचा दोष त्या मुलीच्या व तिच्या माहेरच्यांच्या माथी मारला जातो. शिकली सवरली असेल तर शिक्षणावर मारला जातो. ह्यावर उपाय म्हणून "लहानपणीच मुलीचा विवाह करावा" हे अत्यंत हिणकस व आक्रस्ताळेपणाचे ठरेल. त्यावेळच्या परिस्थितीशी अनुकूल बालविवाह होता. आजची परिस्थिती वेगळी आहे व समस्याही वेगळ्या आहेत. म्हणूनच उपायही वेगळे हवेत.

बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माझ्या संसारात विनाकारण लुडबूड नको असते. मग ती सासरच्या मंडळींची असो अथवा माहेरच्या. घटस्फोटांच्या कारणं विषद करताना वक्त्याने सांगितलेली हकीकत आठवते, घटस्फोटाचं कारण एका ठिकाणी मुलीच्या आईची प्रचंड ढवळाढवळ हे होतं. सकाळी उठल्या उठल्या फोन, "शोन्या उठला माझा, बोर्न्व्हिटा पिला?". ते रात्री साडेदहा अकराला शेवटचा फोन. मधे २०-२५ फोन. जरा काही बिनसलं नवऱ्याबरोबर की लगेच मम्मीकडे तक्रार. मग मम्मीचे सल्ले आणि तिने तिच्या नवऱ्यावर केलेले प्रयोग. मुलीला जर स्वत:च्या संसारात कसं खंबीर रहावं, नवराबायकोंचे लहानसहान प्रश्न नाही सोडवता येत, तर उपयोग काय त्या इंजिनियरींगच्या डिग्रीचा आणि ६५,०००/- रुपये पगारांचा. नवऱ्यामुलाला शिकवताना आम्ही हाडाची काडं केली आहेत. त्याला शिकता कमावता केला. आज इंजिनियर झालाय, ६५,०००/- रुपये पगार आहे, त्यामागे आम्ही त्याला लहानाचा मोठा केला आणि मग तुला, सुनबाईला मिरवत घरी आणलं. आम्ही एकत्र राहतो, म्हणून आम्हाला मुलाच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे नाही चालायचं. नवरा बायकोचे संसारातले प्रोब्लेम्स त्यांचे त्यानीच सोडवायचे असतात. नवरा बायकोला संवाद साधू दे एकमेकांशी. एकमेकांना समजून घेवू देत ना. नाही सुटली समस्या आणि ते दोघं आपणहून आले सल्ला मागायला तर आणि तेवढाच सल्ला द्यावा. सक्ती नको. खरतर वडिलधाऱ्यांची नसती लुडबूड ही समस्या सोडवण्याऐवजी समस्या बिघडवूनच अधिक ठेवतात. एकत्र कुटुंब असणे म्हणजे संसारात लुडबूड करण्याचं अलिखित प्रमाणपत्र नव्हे.

आपली नाती, आपलं कुटुंब हे आपणच जपायचं असतं. नवरा बायकोचं नातं हे वरवर पाहता खूप सोपं पण तितकच गुंतागुंतीचं असतं. ते दोन शरीरांचं अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा भागवण्याची सोय म्हणून एकत्र येणं नाही. नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. संस्कारांची बीजं रोवणं आणि पर्यायानं चांगला समाज घडवणे हे विवाहसंस्थेचे कार्य आहे. आम्ही आमच्याच मुळावर उठलोय. संस्कारांच्या वळचणीतली ही काड्या काड्या जमवून बांधलेली घरटी कायद्याच्या काठीनं अशी नका पाडू. घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख ठिकच वाटला.

घटस्फोटाचं कारण एका ठिकाणी मुलीच्या आईची प्रचंड ढवळाढवळ हे होतं. सकाळी उठल्या उठल्या फोन, "शोन्या उठला माझा, बोर्न्व्हिटा पिला?". <<<
हे असं करणारी नवर्‍याची आई पण असते मात्र हे तिचे मुलावरचे प्रेम मानले जाते.

नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. <<<
सुपर असहमत. लग्नाचे उदीष्ट मुले जन्माला घालून त्यांच्यावर संस्कार करणे हे असू शकत नाही. दोन माणसे एकमेकांची उत्तम साथ आयुष्यभर असावी म्हणूनही लग्न करू शकतात. हा विचार करून, ठरवूनही अत्यंत सुखाने जगणारी अनेक जोडपी माहिती आहेत.

ठराविक वयाला लग्न आणि लग्न झाल्यावर मूल हे दोन्हीही कंपलसरी मानले जाते आपल्याकडे. त्याबद्दल दुनियेभरचे लोक भोचकपणे विचारणा करत असतात.

या दोन्हीमधले कंपल्शन काढून टाकले तरच लग्न करताना आणि मूल जन्माला घालायचा निर्णय घेताना जास्त परिपक्वतेने विचार केला जाईल.

मूळ लेखातील मुद्द्याबाबत लिहिण्या अगोदर वर नीरजा यानी प्रकटलेले "...दोन माणसे एकमेकांची उत्तम साथ आयुष्यभर असावी म्हणूनही लग्न करू शकतात...." हे मत मला चिंतनीय वाटले हे नमूद करीत आहे. खूप चांगली उदाहरणे आहेत माझ्या पाहाण्यात अशा जोडप्यांची { शहरीच नव्हे तर अगदी ग्रामीण म्हटल्या जाणार्‍या तालुका पातळीवरील गावातीलही} ज्यानी एका विशिष्ट वयापर्यंत अपत्याची वाट पाहिली आणि ते सुख {सुखच असेल तर....} आपल्या ललाटी नाही हे विनातक्रार मान्य करून समाधानाने आयुष्य अन्य उपक्रमात गुंतविले आहे. अपत्यहीन अशा काही दांपत्यांनी वेळीच 'दत्तक' प्रकरणही करून सुखी संसाराचा मध्यम मार्ग स्वीकारला आहे. मानसशास्त्र विषयात डॉक्टरेट असलेली एक प्राध्यापिका आणि चक्क एम.डी. असलेला तिचा नवरा यानी आपल्याला मेडिकल कारणास्तव अपत्य होणार नाही हे पक्के झाल्यावर मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यातही त्यांच्या पैपाहुण्यातील मूल नव्हे तर कोल्हापूरातील शासकीय अनाथाश्रम येथील अपत्य त्यानी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, अनाथालयात असलेल्या बाळांच्या धर्मजात, आईवडिलांविषयी काहीही माहिती ठेवली जात नाही, ठेवली असल्यास दत्तक घेणार्‍या दांपत्यास सांगितली जात नाही....वैशिष्ट्य म्हणजे दत्तक घेताना त्यानी 'मुलगी' दत्तक घेतली.....ही बाब निश्चित्तच अभिनंदनीय आहे. [दोघेही माझ्या परिचयाचे आहेत.....दत्तक कागदपत्रकावर माझी साक्षीदार म्हणून सहीही आहे.]

सांगायचा मुद्दा असा की दोन्ही बाजू अपत्याच्या बाबतीत समंजस असतील तर मग घटस्फोटाचा प्रश्न [त्या कारणास्तव] समोर येणार नाही. खरे हर्डल असते ते आईबाप, सासूसासरे यांचेच.... हीच मंडळी 'कुलदीपक' साठी नवपरिणित जोडप्यांचा मस्तकशूळ उठवित असतात. "लग्नाला तीन वर्षे होऊन गेली की... अजून दिवस गेले नाहीत ???.... काय देवबिव करायचे राहिले असल्यात ते तरी तुम्ही दोघांनी जाऊन करून टाका.....पत्कींच्या दवाखान्यात तिला अ‍ॅडमिट करून चेकअप करून घे तिचे सारे....!"

अशा सल्ल्यात "तिचे चेकअप करून घे....' हा सल्ला तिडिक आणणारा असतो. आपल्या मुलात काही दोष वा व्यंग असू शकेल ही शक्यता मुलाचे आईवडील गृहित धरतच नाहीत....अ‍ॅण्ड धिस व्हेरी अ‍ॅटिट्यूड लीड्स द ग्रूम टु द रोड ऑफ डायव्होर्स.

~ अजूनही लिहिता येईल. पण पुढे पाहू.

बाकी 'सुप्रजा' संदर्भात नीरजा यानी व्यक्त केलेल्या असहमतीशी मीही सहमत आहे. वंदना बर्वे याना 'सुप्रजा' म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे हे अस्पष्ट आहे. 'नवराबायकोतील चांगले गुण...." याचीही व्याख्या सापेक्ष होऊ शकते. 'सुधाकर' आणि 'सिंधू' दोघेही मुळात चांगलेच होते ना !!. पण त्यांच्याही संसाराची धूळदाण झाली.... पुढेमागे सिंधूचे अपत्य मोठे झाले असते आणि तेही बापाप्रमाणे वाया गेले असते तर मग त्याच्यावर सिंधूमधील चांगल्या गुणांचा काहीच परिणाम झाला नाही असेच म्हणावे लागेल.

अशोक पाटील

अशोककाका, मूल होऊ शकत नाही, दत्तक नको किंवा मिळत नाही यातून नाईलाजाने मूल नसले तरी चालेल या गोष्टीचा स्वीकार असण्यापेक्षा लग्नाआधीच कींवा मूल होऊ शकते का नाही या मुद्द्यापर्यंत पोचण्याआधीच आम्हाला मूल नको आहे असे ठरवलेली निदान २-३ भारतीय जोडपी आहेत माझ्या ओळखीची. खूप सुखात आहेत आणि त्यांना निर्णयाचा अजिबात पश्चात्ताप नाहीये.
त्यांच्याबद्दल म्हणत होते मी.

"....या मुद्द्यापर्यंत पोचण्याआधीच आम्हाला मूल नको आहे असे ठरवलेली ...."

~ ग्रेट रीअली. माझ्या माहितीत ही एक चांगली भर पडली, नीरजा. धाडसी म्हणावा असा [तसेच प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याचा....] निर्णय घेऊन संसारयात्रा चालू ठेवणार्‍या 'त्या' २-३ भारतीय जोडप्यांचे मी या क्षणी का होईना अभिनंदन करीत आहे.

घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही. >>> हे प्रत्येक लग्नाला लागू पडत का? लोक फक्त सासर-माहेरचे ज्येष्ठ नागरिक ह्या कारणांनी घटस्फोट घेतात का? तुम्ही शोधनिबंध लिहिताय तो फक्त ६५००० रु मिळवणाऱ्या लोकांभोवती गुंफलेला आहे का? असो... तुम्हाला अगणित शुभेच्छा!!

घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही. >>>

लग्नाचा पर्याय कितवा असावा असाच प्रश्न आला मनात. नाही म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीने लग्न केलेच पाहिजे का? त्यातूनही उद्याच्या पीढीची कशाला चिंता करताय काकू .
घटस्फोट होण्यासाठी त्यांचे आधी लग्न तर झाले पाहिजे ना Happy
कोणास ठाऊक शेकडा ८०% लोकांची तरी लग्ने होतील की नाही ते.
तुमच्या शोधनिबंधात 'स्त्री भ्रूणहत्या' कुठे आली नाही , तो आकडा सांगतोय की १००० मागे ८०० - ९०० मुलीच आहेत. म्हणजे हजारी १०० पुरुष बिनल्ग्नाचेच रहाणार की २०-३० वर्षानी.
बाकी , लीव्हिंग रीलेशन शिप , समलिंगी संबंध , विवाहबाह्या संबंध अशा अनेक गोष्टी आहेत की कुटुम्ब संस्थेला धक्का द्यायला.

त्यातुनही या शोधनिबंधातील घटस्फोटाची कारणेही अगदीच बाळबोध दिसतायेत , विवाहबाह्य संबंधाचा उल्लेखही नाही आला कुठे. घटस्फोटाबरोबरच अजुनही कीती बायकांचे हुंडाबळी जातायेत त्याचाही उल्लेख नाही तुमच्या निबंधात. व्यसने, विवाहबाह्या संबंध, स्त्रीचा शारीरिक , मानसिक छळ अशी प्रकरणे तुम्हाला दिसली नाहीत की काय अशी शंका येतेय.

घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही <<<
कोणी गंमत म्हणून घेतं का घटस्फोट? जेव्हा एखादा घटस्फोट होतो तेव्हा मारहाणीच्या, बाहेर अफेअर्स असण्याच्या किंवा तत्सम एक्स्ट्रीम केसेस सोडल्या तर नक्की घटस्फोटापर्यंत कसं पोचलं सगळं हे केवळ आणि केवळ त्या नवरा बायकोलाच माहित असतं. बाहेरच्यांच्यासमोर संपूर्ण चित्र येऊच शकत नाही.
तुम्हाला दिसलेल्या ओळखीच्या केसेसमधे तुमच्यादृष्टीने विनाकारण घटस्फोट झालेला असला तरी त्या त्या लोकांच्या दृष्टीने ती गरज असू शकते हा विचार केलाय का?

नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. >> Biggrin

दोघातले दुर्गुणच घेऊन पोर जन्माला आले तर काय करावे? Proud

जोक्स अपार्ट , पण हे वाक्य विशेषकरून 'सुप्रजा' हा शब्द अतिशय आक्षेपार्ह आहे. ( pure blood ची आठवण आली)

रच्याकने, जोडप्याला जर मुले नसतील तरीही घटस्फोट म्हण्जे 'वाईटच' असे का वाटते सगळ्यांना ? मुले नसताना घटस्फोट झाला , तर इतरांना घटस्फोटाचे वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. move on ...
नाही जमले झाले वेगळे , शोधतील आपापले मार्ग. होतील सुखी नाहीतर दु:खी.
इतरांनी इतकी डोकेफोड का करून घ्यावी त्यामागे?

इतके कष्ट करून लग्न केलेले असते, ते सहजी तोडून टाकू नये. म्हणून घटस्फोट वाईट असे मत असावे कदाचित..

डेलिया....

"... जोडप्याला जर मुले नसतील तरीही घटस्फोट म्हण्जे 'वाईटच' असे का वाटते सगळ्यांना ?...."

~ तुमच्या वरील वाक्यातील 'सगळ्यांना' या सर्वनामाबद्दल थोडेसे.

आपल्या मुलाला/मुलीला लग्नानंतर 'अपत्य' होणे क्रमप्राप्त आहे ही खूणगाठ प्राधान्याने आपल्या मनी बांधलेले दोनच घटक असू शकतात.....१. मुलाचे आईवडील, २. मुलीचे आईवडील. पतीपत्नीच्या भावाबहिणींना त्याबद्दल तितकी तीव्रता वाटत असेलच असे नाही. बाकी राहिले सगेसोबती....मित्रपरिवार. मी सोदाहरणदेखील सांगू शकतो की, आपल्या मित्र म्हट्ल्या गेलेल्या जोडप्याला लग्नानंतर अपत्य झाले नाही म्हणून कधीच वाईट वाटलेले नाही....इतका समंजसपणा जर घेतलेल्या शिक्षणामुळे आमच्यात येत नसेल तर मग ते शिक्षण पूर्णतः कुचकामी ठरले असेच मी म्हणेन.

जरूर मी अगदी जवळ म्हटल्या जाणार्‍या नातेसंबंधात आणि एकदोन मित्रातही घटस्फोटाची उदाहरणे पाहिली आहेत. पण यातील एकही 'अपत्य नाही' म्हणून घडलेले नाही.

घटस्फोट ही काही म्हणलं तरी पडझड असते ना नात्यांची आणि व्यक्तिमत्वाचीही? कितीही म्युच्युअल किंवा गरजेचं असं म्हणालं तरी त्याचे साइड इफेक्टस कमी नसतात.
ज्याला जोडीदार मानला तो योग्य नव्हता/ त्याने आपल्याला नाकारले या आणि अश्या अनेक गोष्टी घडत असणार ना मनात व्यक्तीमत्व खच्ची करून टाकणार्‍या...
त्यामुळे घटस्फोट वाईट मानला जातो असं मला वाटतं.
म्हणजे ह्या मार्गाला जाऊच नये इत्यादी नाही. कितीही वाईट किंवा दु:खदायक असलं तरी ते गँगरीन मुळे कराव्या लागणार्‍या अ‍ॅम्प्युटेशन सारखे आहे. (हात/पाय अ‍ॅम्प्युटेट करावा लागल्याने निर्माण होणार्‍या कमतरतेच्या तोडीची कमतरता घटस्फोटाने निर्माण होते असे म्हणायचे नाहीये)

नीरजा....

घटस्फोट जरूर वाईट मानला जातो....पण आपल्या समाजात हा वाईटपणाचा पंखा प्रामुख्याने फिरविला जातो तो मुलीच्या दिशेने. म्हणजे सुरेश आणि सुनीता या सुविद्य जोडप्याच्या विवाहाची परिणती घटस्फोटात झाली तर समाज त्याबाबत सुनीतालाच दोष देण्यास तत्पर असतो. दुसरे असे की, घटस्फोटानंतर 'तो' मोकळा वावरू शकतो, 'ती' मात्र कमावती असली तरी खाली मान घालूनच आपली दिनचर्या पार पाडते. त्यात दुसरी एक वाईट गोष्ट म्हणजे ही सुनीता माहेरकडील थोरली असेल आणि तिला धाकटी बहीण असेल तर तिच्या लग्नाच्या वेळी सुनीताचा 'घटस्फोट' हा मध्यस्थाकडून कळीचा मुद्दा बनू शकतो.

"सुरेश" च्या धाकट्या भावाच्या लग्नाच्यावेळी हा मुद्दा उपटेल का ? शक्यता फार अंधुक. कारण शेवटी धाकट्या भावाची लग्नाबाबतची अ‍ॅबिलिटी आणि अप्लिकेशन हेच वधुकडील मंडळीना अभिप्रेत असते. शिवाय ते 'मध्यस्थराव' म्हणून जे प्रकरण असते, ते लग्न ठरविताना सुरेशच्या पत्नीविषयी काय वाट्टेल ते गरळ ओकत असतात....म्हणजे जे झाले ते मुलीमधील वैगुण्यामुळेच असाच रबरी स्टॅम्प तयार ठेवलेलाच असतो.

वाईट हेच की, आज २१ व्या शतकातही घटस्फोट प्रकरणी झळ बसते ती मुलीला. सामाजिक पातळीवर कर्तबगार समजल्या गेलेल्या स्त्रीच्या बाबतीतही तुम्ही म्हणता तशी ही बाब तिच्या व्यक्तिमत्वाला खच्ची करून टाकणारी असते.

अशोक पाटील

मगाशी घाईत असल्याने नीट टायपता आले नाही. वाईट वाटण्यापेक्षा मला नक्की असे म्हणायचे होते की इतर लोक ( आई वडीले नव्हे, बाकीचे बघे ) घटस्फोट झाला असे कळताच , प्रत्येक वेळी का झाला, क्शाने झाला , मग कोण बरोबर कोण चूक असे जज करायला का जातात ?
समजा एखाद्या जोडप्याचे लग्न अहंकारामुळेच मोडले हे जरी गृहित धरले तरी तो 'सामाजिक' प्रॉब्लेम का व्हावा? इतरांनी त्यांना दुषणे देणे का सुरू करावे? आम्ही बघा , पटल नाही तरी कसे जमवून घेतो की नाही मग यांना का जमवता येत असा सूर हे इतर सगळे लावायला लगतातच.

अता हा लेख बघा , घटस्फोटांचे प्रमाण वाढतेय आणि ते का वढतेय याचे संशोधन करण्याचा प्रयत्न आहे.
<< बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. >>
ही कारणे यांना सापडली आहेत. ( यावरून यांचे संशोधन फक्त उ.मध्यमवर्गीयापर्यंत्च मर्यादित असणार हे माझे मत) बरं मग पुढे काय? तर या बाई बालविवाहापर्यंत पोचल्या आहेत. त्यातले चांगले काय ते सांगताहेत. नशीब पण बालविवाह करा म्हणत नाहीयेत.
यांचा अभ्यास - उद्दीष्ट अगदी ठराविक चौकटी मधेच आहे. लग्न करून शेवटपर्यंत जोडप्याने एकत्रच रहावे हा आग्रह आहे. आणि जे हे करू शकत नाहीयेत त्यांना वरील पैकी एक लेबल लावून कसे काय व्हायचे समाजाचे अशी चिंता व्यक्त होत आहे.

डेलिया, पहिल्या परिच्छेदाबद्दल सहमत.
मुळात अमुक एक व्यक्ती सिंगल/ इन अ रिलेशनशिप/ मॅरिड/ डिव्होर्सी असणे हा एक तपशील आहे फक्त आणि त्या व्यक्तीच्या अगदी जवळची माणसे सोडल्यास बाकीच्यांनी हा तपशील खणायलाही जायची गरज नाही. कारणे तर फारच लांबची गोष्ट.

घटस्फोट का वाईट असा विचार करताना फक्त ' माझा घटस्फोट झाला तर..' एवढाच विचार करून बघावा.

अगदी प्रामाणिकपणे विचार करा आणि उत्तर स्वतःच्या मनातच टॅली करा Happy

याचा अर्थ असा नव्हे की गँगरीन झाल्यावर हात कापू नये. हात जरूर कापावा.
गँगरीन होऊच नये म्हणून प्रयत्न करणे उत्तम.
आणि झालंच अँप्युटेशन तर उरलेल्या देहाविषयी फ्रस्ट्रेशन येऊ देऊ नये.

>>ठराविक वयाला लग्न आणि लग्न झाल्यावर मूल हे दोन्हीही कंपलसरी मानले जाते आपल्याकडे. त्याबद्दल दुनियेभरचे लोक भोचकपणे विचारणा करत असतात.

<< +१

मूल कधी व्हावे हा निर्णय पण कधी कधी प्रेशर मूळे घेताना कपल्स पाहिलीत.

घटस्पोट हा त्रासदायक असतोच, तो खोलवर जखम करतो व ती जखम कशी भरून निघते ह्या वर वर्‍याच गोष्टींवर पुढचे जीवन अवलंबून असते.
(भारतात जरा ज्यास्तच होतो एकट्या बाईला जरा आणखी काही मानसिकतेमूळे.. हे वाक्य नीट वाचा. ह्याचा अर्थ इतर देशाची तुलना नाही तर भारतीयांची घटस्पोटीत बाईकडे बघण्याचा कल ह्या दृष्टीने. ) जे अशोक ह्यांनी लिहीलेय वर,
>>वाईट हेच की, आज २१ व्या शतकातही घटस्फोट प्रकरणी झळ बसते ती मुलीला. सामाजिक पातळीवर कर्तबगार समजल्या गेलेल्या स्त्रीच्या बाबतीतही तुम्ही म्हणता तशी ही बाब तिच्या व्यक्तिमत्वाला खच्ची करून टाकणारी अस>><<

>>लग्नाला तीन वर्षे होऊन गेली की... अजून दिवस गेले नाहीत ???.... काय देवबिव करायचे राहिले असल्यात ते तरी तुम्ही दोघांनी जाऊन करून टाका...>><<
हे ज्यास्त डोक्यात जाणारे डायलॉग आहेत.

भारतात तर खूपच मानसिकता आहे की लग्न झाले की पुढची पायरी मूल झालेच पाहिजे. वर्षं झाली की "दुनियेभरची " लोकं मग कधी करणार? किती पगार घेता तरी मूलाला का उशीर? अशी वाक्या फेकणारी फालतू लोक पाहिली आहेत.

नीधपजी,

"सुप्रजा घडवणे" म्हणजे मुले जन्माला घालणे नाही.

उदाहरणच देऊन सांगायचं स्वत:च मूल नसलेलं जोडपं दत्तक घेऊन त्याच्यावर स्वत:मधल्या चांगल्या गुणांचे, संस्कार करून त्याचे आयुष्य घडवणे म्हणजे सुप्रजा. माझ्या नणंदेने मुलगी दत्तक घेऊन तिच्यावर दोघांच्यातले चांगले गुण वाचन, लेखन, ज्ञानसाधना व संस्कार तिच्यावर घडवले. ती एक चांगली नागरीक बनेल यात शंका नाही. पुण्याजवळच्या रिजोर्टमध्ये जवळपास ७०० शाळकरी मुले मुली दारूपार्टीत रंगली होती ही "सुप्रजा" म्हणायची का?

सिमंतीनीजी,

हो प्रत्येक लग्नाला तो शेवटचाच पर्याय असावा. कुणालाही मनापासून घटस्फोट हवा असतो असे नव्हे. पण तो होऊ नये यासाठी शास्त्रशुध्द प्रयत्न होत नाहीत. दुर्दैवाने अहेतुक वा सहेतुक असो, जवळची मंडळी ढवळाढवळ करून प्रकरण वाढवून ठेवतात. माझा शोधनिबंध खरे तर घटस्फोट हा नव्हता. स्त्रीभ्रूणहत्येविषयी होता जो वर्तमानपत्रात प्रसिध्दही झाला. त्या अनुषंगाने आकडेवारी पाहताना आणखीन बरीच माहिती मिळाली त्यात घटस्फोटाचे प्रमाण मला धक्का देणारे होते. घटस्फोट या विषयी अधिक माहिती मिळवताना खूपच निराशा झाली. संख्येव्यतिरिक्त हाती काही लागले नाही. आपण जो कमाईशी त्याचा संबंध जोडलाय तो अप्रस्तुत आहे, कारण एका व्याख्यानातले उदाहरण मी माझ्या "लुडबूड होते" या मुद्यासाठी घेतले. तो माझ्या संशोधनातला वर्ग नव्हता. अजुनही काही सामाजिक संस्थांशी संपर्क साधून माहिती गोळा करण्याचा प्रयास सुरूच आहे. तेंव्हा समाजातल्या अमुक एका वर्गासाठी वगैरे असा बिलकूल नाही.

डेलियाजी,

स्त्रीभ्रूणहत्येवर शोध करीत असताना ही माहिती समोर आली त्याचा उल्लेख केला. अजून शोध सुरू आहे व त्यावर चर्चा व्हावी अशीच माझी इच्छा आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इतर अनेक कारणे आहेत. पण त्याची जशी डेटाबेस तयार व्हायला हवी तशी होत नाही. लग्न ही सामाजिक घटना आहे व घटस्फोट ही सामाजिक दुर्घटना. लग्न कुणी करावं, कुणाशी करावं, कसं करावं, का करावं हे वैयक्तिकच असतं. पण लग्न ही घटना सामाजिक आहे. घटस्फोट झाला की त्याचे परिणाम हे फक्त वैयक्तिकच असतात का? त्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. घटस्फोटाच्या कारणांचा शास्त्रशुध्द अभ्यास व्हायलाच हवा. जेणेकरून होणारे घटस्फोट टाळता येतील. मग ते समुपदेशन असेल किंवा जवळच्या नातेवाईकांनी सामंजस्याने घेतलेला पुढाकार असेल. समस्या सोडवायची असेल तर त्याच्या मुळाशी जायला हवे. काही घटस्फोट हे समुपदेशाने टळू शकतात आणि टळले तर वैयक्तिक दृष्ट्या ते उभयतांना चांगलच आहे. स्वत: त्या दोघांना घटस्फोटच घ्यायचा आहे व इतर कुणाचीही तिढा सुटण्यासाठी मदत नकोच असेल तर भाग वेगळा. इतरांना काय वाटते किंवा वाटत नाही यासाठी त्यांचा सहभाग मुळीच अपेक्षित नाही.

माझ्या लग्नाआधी माझ्या नणंदेचा घटस्फोट झाला होता. दोघेही सुशिक्षित, सुसंस्कारीत होती. दोनही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती एकत्र बसून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघेही दोघांना अनुरूप वाटत नव्हते या कारणास्तव घटस्फोट झाला व दोनही बाजुना पटला. नंतर दोघांचेही पुनर्विवाह होऊन दोघेही सुखी आहेत. दोघांनीही एकत्रच राहिले पाहिजे असे माझे म्हणणे मुळीच नाही. पण दुराग्रहाने, हट्टाग्रहाने दोघेही वेगळे होत असतील तर एरव्ही नको त्या गोष्टीत नको तेवढे नाक खुपसणाऱ्या पालकांनी, सामंजस्याने एकत्र बसून विचार करणे चुकीचे ठरते का?

<<अता हा लेख बघा , घटस्फोटांचे प्रमाण वाढतेय आणि ते का वढतेय याचे संशोधन करण्याचा प्रयत्न आहे.
<< बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. >>
ही कारणे यांना सापडली आहेत. ( यावरून यांचे संशोधन फक्त उ.मध्यमवर्गीयापर्यंत्च मर्यादित असणार हे माझे मत) बरं मग पुढे काय? तर या बाई बालविवाहापर्यंत पोचल्या आहेत. त्यातले चांगले काय ते सांगताहेत. नशीब पण बालविवाह करा म्हणत नाहीयेत.
यांचा अभ्यास - उद्दीष्ट अगदी ठराविक चौकटी मधेच आहे. लग्न करून शेवटपर्यंत जोडप्याने एकत्रच रहावे हा आग्रह आहे. आणि जे हे करू शकत नाहीयेत त्यांना वरील पैकी एक लेबल लावून कसे काय व्हायचे समाजाचे अशी चिंता व्यक्त होत आहे.>>

मी बालविवाहाचे समर्थन मुळीच केले नाही व तसा स्पष्ट उल्लेखही मे केला आहे. आपण बहुधा पूर्वग्रह ठेवून अथवा लक्षपूर्वक न वाचल्याने तसे होणे संभवते. पूर्ण परिच्छेद पुन्हा वाचावा. विशेषत: परिच्छेदाचा शेवट.

सर्व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.

चर्चा अशीच सुरू ठेवा. लग्न व घटस्फोट हे वैयक्तीक की सामाजिक या भुमिकेवरून त्यातून निर्माण झालेली समस्या समाधानासाठी शेअर करावी की न करावी, इतरांनी त्यात हस्तक्षेप करावा, टाळावा हे ठरते. हेतु एवढाच आहे की एखादा संसार केवळ वैयक्तिक आकसापायी, चुकीच्या भुमिकेपायी तुटू नये.

उदाहरणच देऊन सांगायचं स्वत:च मूल नसलेलं जोडपं दत्तक घेऊन त्याच्यावर स्वत:मधल्या चांगल्या गुणांचे, संस्कार करून त्याचे आयुष्य घडवणे म्हणजे सुप्रजा. माझ्या नणंदेने मुलगी दत्तक घेऊन तिच्यावर दोघांच्यातले चांगले गुण वाचन, लेखन, ज्ञानसाधना व संस्कार तिच्यावर घडवले. ती एक चांगली नागरीक बनेल यात शंका नाही. पुण्याजवळच्या रिजोर्टमध्ये जवळपास ७०० शाळकरी मुले मुली दारूपार्टीत रंगली होती ही "सुप्रजा" म्हणायची का? <<<
सुप्रजा घडवणे हे विवाहाचे उद्दीष्ट आहे असं तुमचंच विधान आहे. मी त्याला असहमती दर्शवली आहे. विवाहाची परीपूर्ती मूल होणे/ दत्तक घेणे आणि त्याच्यावर संस्कार करणे हेच केवळ असत नाही. किंवा हे संपूर्णपणे ऑप्शनल असते. एवढंच सांगितलं आहे. सगळ्या पोस्टस व्यवस्थित वाचत चला हो. तुम्ही दिलेल्या या उदाहरणांचा या मुद्द्याशी काडीचाही संबंध नाहीये. दारू पार्टीत रमलेल्या ७०० शाळकरी मुलांचा विषय बाजूला राहूद्या. ज्या गोष्टींना उत्तम संस्कार म्हणून गणले गेलेय त्या सगळ्या गोष्टी देऊनही मुलांनी वाट्टेल ते गुन्हे केल्याच्या घटना आहेत अस्तित्वात. पण हा विषयच नाहीये इथे.

लग्न ही सामाजिक घटना आहे व घटस्फोट ही सामाजिक दुर्घटना. <<<
इथेच तर आक्षेप आहे. लग्न ही सामाजिक घटना आहे हे मान्यच होणं शक्य नाही. फारतर कौटुंबिक आणि कायदेशीर असं काहीतरी म्हणता येईल. त्याच पद्धतीने घटस्फोट ही सुद्धा सामाजिक घटना नाही. याबद्दलही वरती लिहिलं गेलंय. ते वाचत जा.

इतरांनी त्यात हस्तक्षेप करावा, टाळावा हे ठरते. <<<
इतरांनी का हस्तक्षेप करावा एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात. यात ठरण्या न ठरण्यासारखं काय आहे?

एखादा संसार केवळ वैयक्तिक आकसापायी, चुकीच्या भुमिकेपायी तुटू नये. <<
केवळ वैयक्तिक आकस, चुकीची भूमिका हे तुम्ही कसे ठरवणार? जो त्या लग्नात असतो त्याला जे झेलावं लागतं ते तोच समजू शकतो. आणि त्याने/ तिने किती झेलायचं वा किती नाही हे ज्याचं त्याने/ जिचं तिनेच ठरवायला हवं. परत एकदा कोणीही गंमत म्हणून, सणक डोक्यात आली म्हणून घटस्फोट घेत नाही.

दत्तक घ्यायचे तर सिंगल्स पण दत्तक घेऊ शकतातच. लग्नाचा संबंधच येत नाही. उदा: सुश्मिता सेन.

एखाद्या जोडप्यात नक्की काय घडते, काय जमते आणि कुठे बिनसते ते तिसर्‍या कोणालाही समजू शकत नाही. कुठे काय खुपते व कधी बाहेर पडावेसे वाट्ते हा सर्वस्वी त्या दोघांचाच निर्णय असतो. मध्ये पडू नये असा संकेत आहे.

शास्त्रशुध्द प्रयत्न म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? कौन्सेलिंग इ इ ??!!! कौसेलिंग किती काल चालत? त्याचे पैसे कोण देत? कोणा कोणाला ते परवडू शकत? सेवाभावी संस्था कौन्सेलिंग देत असल्या तर तिथे वेटिंग किती असत? बहुतेक आधार संस्था सांगतात विवाहात पिडीत व्यक्ती फक्त आम्हाला एक फोन करायचं धाडस दाखवते बाकी कुठलाही निर्णय घेण्याची त्या व्यक्तीची मानसिक स्थिती नसते, डिवोर्स तर फार दूरची गोष्ट. त्या व्यक्तीला तिच्या हितचिंतकामध्ये हलवून मग सर्व संमतीने निर्णय बर्याच वेळा होतो. कोण हितचिंतक आपल्या लाडक्या व्यक्तीचा रोजचा कोंडमारा रोजचा वनवास सहन करू शकेल? "आम्हाला डिवोर्स करायचं आहे" असे दोघे नवरा बायको जेव्हा निर्णय घेतात त्या मिनिटापासून ते डिवोर्स मिळेपर्यंत आव्हारेज किती काल जातो? ६ महिने हे कायदेशीर उत्तर असल तरी व्यवहारात 'खर' आव्हारेज काल काय दिसतो? ह्या सगळ्या गोंधळात आयुष्यातला जो बहुमूल्य वेळ वाया जातो, माणसाला त्याचे आयुष्य पूर्ण क्षमतेनुसार जगता येत नाही त्याचे काही मोल कधी कोणी करत? तुमचा लेख तात्विक दृष्ट्या आदर्श इ इ वाटला तरी व्यावहारिक पातळीवर इनसेन्सितीव आणि अपरिपूर्ण आहे. अर्थात तुमची अजून ह्या संशोधन क्षेत्रात सुरुवात आहे त्यामुळे हळू हळू हे सर्व कमी होईल आणि तुम्ही उत्तम लेखन कराल हि मला खात्री आहे.

"....या मुद्द्यापर्यंत पोचण्याआधीच आम्हाला मूल नको आहे असे ठरवलेली ...."
>>>>>>>>>>>>>>

अशोककाका, हल्ली त्याला DINC (Double Income No kids) असं म्हटलं जातं.
म्हणजे मराठीत "डिंकाचे लाडू" Happy

< विवाहाची परीपूर्ती मूल होणे/ दत्तक घेणे आणि त्याच्यावर संस्कार करणे हेच केवळ असत नाही. किंवा हे संपूर्णपणे ऑप्शनल असते. एवढंच सांगितलं आहे. सगळ्या पोस्टस व्यवस्थित वाचत चला हो. तुम्ही दिलेल्या या उदाहरणांचा या मुद्द्याशी काडीचाही संबंध नाहीये. दारू पार्टीत रमलेल्या ७०० शाळकरी मुलांचा विषय बाजूला राहूद्या. ज्या गोष्टींना उत्तम संस्कार म्हणून गणले गेलेय त्या सगळ्या गोष्टी देऊनही मुलांनी वाट्टेल ते गुन्हे केल्याच्या घटना आहेत अस्तित्वात. पण हा विषयच नाहीये इथे.>
नीधप,
अहो पण मी तरी कुठं म्हटलय तेच एक उद्दीष्ट असतं. विवाहाची परीपूर्तीही तीच आहे असंही माझं म्हणणं नाही. तो महत्वाचा भाग आहे, खरं उद्दीष्ट आहे. (बाकीची खोटी असतात असा कृपया अर्थ काढू नये)
उदाहरणाचा संबंध काडीचाही नाही कसा?
मी असं कुठही म्हटलं नव्हतं "मुल जन्माला घालणे, संस्कार करणे". मला अपेक्षित सुप्रजा या शब्दाचा अर्थ सांगताना ते उदाहरण दिलय. उत्तम संस्कार देउनही वाया जाणारी मुले असतात हा तुमचा मुद्दा मान्य. आपण दोघीही मांडत असलेल्या दोनही बाजू पाहिजेत. एकच एक गोष्ट हे उद्दीष्ट धरून लग्न होत नाही.

नीधप,

<इथेच तर आक्षेप आहे. लग्न ही सामाजिक घटना आहे हे मान्यच होणं शक्य नाही. फारतर कौटुंबिक आणि कायदेशीर असं काहीतरी म्हणता येईल. त्याच पद्धतीने घटस्फोट ही सुद्धा सामाजिक घटना नाही. याबद्दलही वरती लिहिलं गेलंय. ते वाचत जा>

हा विचारातला फरक आहे म्हणूनच तर वाद होत आहेत. वाद होणं चुकीचं नाही. या मंथनातूनच पूढे जाता येतं.

लग्न ही कौटुंबिक बाब फारतर असेल तर आपण लग्नाला कुटुंबाव्यतिरिक्त इतरांना आमंत्रण देतोच की. त्यांना काय करायचय आमच्या लग्नाशी असं नाही म्हणत. विवाहाची नोंद व्हावी लागते तशीच घटस्फोटाची देखिल नोंद व्हावी लागते. वकिलाला, न्यायाधिशाला नाही विचारत कुणी आमचा काडीमोड आहे, तुम्ही कोण ठरवणार?

वैयक्तिक आकस, चुकीची भुमिका हे त्या कुटुंबाचा घटक असलेले पालकही नाही ठरवू शकत? इथेही पुन्हा ती मक्तेदारी मी नाही घेतलेली. त्यामुळे ती भुमिका चुकीची आहे की नाही हे मी नाही ठरवत.

वंदनाताई
तुमच्या शोधनिबंधासंर्दभात तुम्हाला काही काळाने मेल केली तर चालेल का ?

सिमंतीनीजी,

तोच तर मुद्दा आहे. आपल्याकडे तशी व्यवस्थाच नाही. नको त्या नातलगांची लुडबूड खपवून घेतो. पण शास्त्रशुध्द पध्दतीने आपला निर्ण्यय योग्य आहे का हे तपासून पाहत नाही. कौन्सिलींग होण्यासाठी जी माहिती लागते किंवा मिळवावी लागते ती कुठेच नाही. अशी माहिती उपलब्ध असल्यास घटस्फोटही नाही आणि संसारही नाही अशा मधल्या अवस्थेत लोंबकळत असलेले संसार, समुपदेशनाच्या मार्गाने सुरळीत होऊ शकतील. घटस्फोटाची वाट कमी जोडपी स्विकारतील. एकक होत चाललेल्या कुटुंबव्यवस्थेत शास्त्रशुध्द समुपदेशनाची आवश्यकता आहे.

Pages