माझा आणि आपल्यापैकी बहुतांशी स्त्रियांचा विश्वास आजही कुटुंबव्यवस्थेवर टिकून आहे. मतभेद, मनभेदांचं प्रमाणही कमी नसेल, पण ते कुटुंबव्यवस्था संपुष्टात यायला लागली आहे ह्या विचाराप्रत येण्याएवढं नाही. संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.
"स्त्री" हा केंद्रबिंदू मानून शोधनिबंध व तत्संबंधी लेखाची तयारी करीत असताना, एका वाढत चाललेल्या समस्येने माझे लक्ष वेधले. माझ्या स्वत:च्या काही पूर्वग्रहांना, विचारांना प्रचंड धक्काच बसला. अजुनही त्यावर शोध सुरूच आहे. काही अडचणी आहेत. ज्या ह्या लेखमालेच्या निमित्ताने चर्चेस येऊन त्यापध्दतीने जागृती होईल असे वाटते. प्राप्त माहितीचे आकडे चक्रावून टाकणारे होते. होते. घटस्फोटांची प्रकरणं जी न्यायालयासमोर आली त्यांचं प्रमाण गोव्यात २००८ साली ७५० होतं. तेच २००९ साली ७७० झालं, २०१० साली ७९३ आणि २०११ साली ११८९. त्यातही घटस्फोट मिळण्याच्या प्रमाणात झालेली ५०% ते ७०% एवढी वृध्दीसुध्दा अशीच चक्रावणारी आहे.
बदलते सामाजिक जीवन. त्या अनुषंगाने बदलती कुटुंब व्यवस्था हे आपल्या समाजाला कुठे घेवून चाललय? ह्या सगळ्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती तशी तोकडी आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण अशा प्रकारे ह्या समस्येचा विचार अजुनही करत नाही. घटस्फोटीतांचे जिल्हावार प्रमाण देण्यापलिकडे फारसं काही हाती लागत नाही. इतर देशामध्ये माहितीची साठवणूक अभ्यासात्मक दृष्टीकोनातून केली जाते. उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर घटस्फोटांची कारणे, वयोगट, लग्न होऊन किती वर्षांनी घटस्फोट, मुलांची भुमिका, घटस्फोटाआधीचि दंपतीची परिस्थिती व नंतरची परिस्थिती, इत्यादी अनेक कोनातून ह्या समस्येविषयी माहिती गोळा केली जाते व एकत्रितपणे त्याचा वापर तौलनीक विचार करून विवेकाने मार्ग काढण्यासाठी होतो. मग ते समुपदेशन असेल किंवा सामाजिक संस्थांनी घेतलेला पुढाकार असेल.
परंपरेने आलेली व शास्त्रिय बैठकीवर आधारलेल्या भारतीय कौटुंबिक व्यवस्थेत कालाप्रमाणे अनेक बदल झाले. त्यांची कारणे अनेक आहेत. भारतावर झालेली सततची आक्रमणं, आक्रमणातून निर्मित निर्नायकी व्यवस्था, भौगोलिक व वैचारीक गुलामगिरी आणि बदलत्या सामाजिक संवेदनांची संक्रमणावस्था ही कौटुंबिक जीवनात झालेल्या बदलांची काही प्रमुख कारणं आहेत. आश्रमव्यवस्थेवर आधारलेली कौटुंबिक समाजव्यवस्था आपण बदलली. एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली. समृध्द असलेली कुटुंबे चौकोनी झाली. घर भर अनेकविध नात्यांनी बांधलेली माणसं दिसेनाशी झाली. स्वत:च्याच जन्मदात्यांना भाऊ, काका, अण्णा व जन्मदात्रीला वहिनी, आक्का, काकू म्हणणारी पिढी संपत चालली आहे. ही एकत्र कुटुंबाची नामाभिधानाची गंमत नावापुरतीही आता दिसेनाशी झाली. काका, मामा आत्ते ही सख्खी नाती सोडल्यास आमच्या मुलांना इतर नाती माहितीही नाही अशी परिस्थिती झालीय. मग त्यातला गोडवा तो कुठून येणार. "आई"ची मॉम व "बाबांचा" डॅड झालाय. मुलांना आईव्यतिरिक्त संभाळणारी काकू, आज्जी, आत्ते, मामी ह्यांची जागा आयांनी घेतली. आया मिळणे दुरापास्त होऊ लागले तेंव्हा पाळणाघरे विकसित झाली, बोर्डींग शाळा सुरू झाल्या. कुंटुंब चालवण्यासाठी आम्ही कुटुंबापासूनच दूर गेलो. आज नातेवाईकांचं सोडा, नवराबायकोमधले संवाद, एकमेकांना भेटणं कमी झालय. एकमेकांना भेटायला वेळ नाही. चिमणा चिमणीचा चिवचिवाट हरवलाय. घरटी मोडताहेत.
मी बालविवाहाचं समर्थन करीत नाही फक्त माझा मुद्दा मांडण्यासाठी व फरक दाखविण्यासाठी उल्लेख करतेय. आधीच्या काळी लहानपणीच लग्न व्हायची, त्या कारणाने ती वधू नवीन घरात रुजायची. त्या घरच्या चालीरिती, संस्कार, नातेसंबंध, उठबस त्या मुलीला लहानपणापासूनच शिकविली जायची. आजच्या परिस्थितीमध्ये मुलगी एका विचारात, संस्कारात व नातेसंबंधात जवळपास पंचवीस वर्षे वाढते. तिचे विचार, आचार पक्के होतात. एक सक्षम व्यक्ती म्हणून ती परिपक्व होते. मग लग्न करून जेंव्हा ती सासरी जाते तेंव्हा तिथले संस्कार, तिथली नाती, तिथले आचार विचार ह्यात ती रुजावी, तिनं जुळवून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा करणं विपर्यस्त ठरतं. माहेरी व सासरी साधारण समानता असेल तर तेवढं कठीण जात नाही. पण असं प्रत्येक ठीकाणी असतच असं नाही. इथेच कुरुबुरींना सुरुवात होते. तिचं देणंघेणं हे वैचारिक व भावनिक दृष्ट्या फक्त पतीपुरतच मर्यादित राहतं. ह्याचा दोष त्या मुलीच्या व तिच्या माहेरच्यांच्या माथी मारला जातो. शिकली सवरली असेल तर शिक्षणावर मारला जातो. ह्यावर उपाय म्हणून "लहानपणीच मुलीचा विवाह करावा" हे अत्यंत हिणकस व आक्रस्ताळेपणाचे ठरेल. त्यावेळच्या परिस्थितीशी अनुकूल बालविवाह होता. आजची परिस्थिती वेगळी आहे व समस्याही वेगळ्या आहेत. म्हणूनच उपायही वेगळे हवेत.
बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माझ्या संसारात विनाकारण लुडबूड नको असते. मग ती सासरच्या मंडळींची असो अथवा माहेरच्या. घटस्फोटांच्या कारणं विषद करताना वक्त्याने सांगितलेली हकीकत आठवते, घटस्फोटाचं कारण एका ठिकाणी मुलीच्या आईची प्रचंड ढवळाढवळ हे होतं. सकाळी उठल्या उठल्या फोन, "शोन्या उठला माझा, बोर्न्व्हिटा पिला?". ते रात्री साडेदहा अकराला शेवटचा फोन. मधे २०-२५ फोन. जरा काही बिनसलं नवऱ्याबरोबर की लगेच मम्मीकडे तक्रार. मग मम्मीचे सल्ले आणि तिने तिच्या नवऱ्यावर केलेले प्रयोग. मुलीला जर स्वत:च्या संसारात कसं खंबीर रहावं, नवराबायकोंचे लहानसहान प्रश्न नाही सोडवता येत, तर उपयोग काय त्या इंजिनियरींगच्या डिग्रीचा आणि ६५,०००/- रुपये पगारांचा. नवऱ्यामुलाला शिकवताना आम्ही हाडाची काडं केली आहेत. त्याला शिकता कमावता केला. आज इंजिनियर झालाय, ६५,०००/- रुपये पगार आहे, त्यामागे आम्ही त्याला लहानाचा मोठा केला आणि मग तुला, सुनबाईला मिरवत घरी आणलं. आम्ही एकत्र राहतो, म्हणून आम्हाला मुलाच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे नाही चालायचं. नवरा बायकोचे संसारातले प्रोब्लेम्स त्यांचे त्यानीच सोडवायचे असतात. नवरा बायकोला संवाद साधू दे एकमेकांशी. एकमेकांना समजून घेवू देत ना. नाही सुटली समस्या आणि ते दोघं आपणहून आले सल्ला मागायला तर आणि तेवढाच सल्ला द्यावा. सक्ती नको. खरतर वडिलधाऱ्यांची नसती लुडबूड ही समस्या सोडवण्याऐवजी समस्या बिघडवूनच अधिक ठेवतात. एकत्र कुटुंब असणे म्हणजे संसारात लुडबूड करण्याचं अलिखित प्रमाणपत्र नव्हे.
आपली नाती, आपलं कुटुंब हे आपणच जपायचं असतं. नवरा बायकोचं नातं हे वरवर पाहता खूप सोपं पण तितकच गुंतागुंतीचं असतं. ते दोन शरीरांचं अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा भागवण्याची सोय म्हणून एकत्र येणं नाही. नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. संस्कारांची बीजं रोवणं आणि पर्यायानं चांगला समाज घडवणे हे विवाहसंस्थेचे कार्य आहे. आम्ही आमच्याच मुळावर उठलोय. संस्कारांच्या वळचणीतली ही काड्या काड्या जमवून बांधलेली घरटी कायद्याच्या काठीनं अशी नका पाडू. घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही.
वंदनाजी, तुमच्या संशोधनातून
वंदनाजी, तुमच्या संशोधनातून काय निष्पन्न झाले महित नाही पण लोकांशी सतत येणार्या संपर्कातून माज्ग्या लक्षात आलेल्या गोष्टी-
१. शहरातील गरीब किंवा खेड्यातील सर्वसाधारण लोकांत शक्यतो कोर्टात जाऊन डिवोर्स घेतले जात नाहीत. आवडलेल्या दुसर्या बाईबरोबर सरळ राहायला सुरूवात करणे , पळून जाणे , पहिलीला धाकटदपशा करून घराबाहेर हाकलणे हे मार्ग सर्रस वापरले जातात. कारण हुंडा, मुलं किंवा मुलगा न होणं , पहिली बायको न आवडणं किंवा दुसरी अधिक जास्त आवडणं .
स्त्रीयांकडून दिले जाणारे घटस्फोट नपुंसकत्व, लपवलेले आजार , बाहेरख्यालीपणा व्यसनाधिनता जुगार.
२. मध्यमवर्गात बाहेर्ख्यालीपणा व्यसने मुले न होणे याबरोबरच सध्या इनकंपॅटिबिलिटी हा मोठा इश्यू आहे.
आज मुली शिकल्यात, आत्मनिर्भर झालयात आणी समानतेचा विचर करण्याच्या प्रक्रियेत फार पुढे निघून गेल्यात . याउलट बहुसंख्य पुरूष मात्र अजून टिपीकल जुनाट मानसिकतेतून बाहेर आले नाहीत. मग कायम प्रत्येक लहानमोठ्या इश्यूवर तूतू मीमी सुरू होऊन कटुता साचत जातेय जी केव्हातरी उद्रेक होऊन बाहेर पडून घटस्फोट होतो.
लोक याला शिकलेल्या मुलींचा आगाऊपणा असमंजसपणा म्हणतात तर मी याला स्वसमर्थतेची जाणीव म्हणेन. पूर्वी नवरा सोडला किंवा नवर्याने सोडीन दिले तर माहेरच्या आधारावर आणि कधीकधी अपमानास्पदही जगावे लागत होते तर आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा ऑप्शन आहे म्हणूनही घटस्फोट सहजरीत्या होतात.
सडलेल्या सहजीवनापेक्षा असे घटस्फोटित आयुष्य नक्कीच बरे.
किरणजी, अवश्य करा. पण हा माझा
किरणजी,
अवश्य करा. पण हा माझा शोधनिबंध वगैरे काही नाही. मला हवा असलेला डेटाबेज उपलब्ध नाहीय.इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार शोध करीत असताना मला घटस्फोटांचे वाढते प्रमाण सापडले व त्याची कारणमिमांसा माझ्या पध्दतीने केली.
लग्न कुणी करावं, कुणाशी
लग्न कुणी करावं, कुणाशी करावं, कसं करावं, का करावं हे वैयक्तिकच असतं. पण लग्न ही घटना सामाजिक आहे. घटस्फोट झाला की त्याचे परिणाम हे फक्त वैयक्तिकच असतात का? त्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात.>>
लग्नाप्रमाणेच घटस्फोट हाही अतिशय वैयक्तिक निर्णयच आहे. इतरांना कीतीही चुकीचा वाटत असला तरी त्या २ व्यक्तिंच्या मताप्रमाणे तो योग्य असू शकतो. उलटपक्षी इतरांना अतिशय चुकीच्या वाटणार्या जोड्याही लग्न करून जन्मभर एकत्र रहाताना दिसतात तसेच.
स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊ शकणार्या व्यक्तिंचा घटस्फोट हा 'सामाजिक प्रश्न' कसा काय होऊ शकतो ?
माझ्या एका मैत्रीणीचा २ दा घटास्फोट झालेला आहे. त्यानंतर अता एका मुलीला दत्तक घेऊन ती आनंदाने जगते आहे. अजुनही २-३ जणी आहेत घटस्फोट झालेल्या. त्यापैकी कोणीही 'सामाजिक प्रश्न' , समजावर ओझे बनलेल्या आहेत असे मलातरी अजीबात् वाटत नाही. उलट त्याच कोणतेना कोणते समाज कार्य करून सामाजिक प्रश्नात आपला खारीचा वाटा उचलत आहेत. विनाकारण त्यांना सामाजिक प्रश्न ठरवणे हा त्यांचा अपमान आहे.
उलटप्क्षी, परीत्यक्तान, निराधार स्त्रिया या सामाजिक प्रश्न असू शकतीलही. पण त्यांना तरी समाज काय अधार देतोय ? कुठले ओझे उचलतोय ?
अहो पण मी तरी कुठं म्हटलय तेच
अहो पण मी तरी कुठं म्हटलय तेच एक उद्दीष्ट असतं. विवाहाची परीपूर्तीही तीच आहे असंही माझं म्हणणं नाही. तो महत्वाचा भाग आहे, खरं उद्दीष्ट आहे.
>>>मुळीच नाही. तो महत्वाचा भाग आहे कि नाही पूर्णपणे व्यक्तीसापेक्ष असू शकत...
कदाचित एखाद्या जोडप्याच्या मते मुले (मग ती स्वत:ची असोत किंवा दत्तक) शून्य महत्वाची असू शकतात. किंवा मुल होऊच न देणे हा निर्णय आधीच घेऊन लग्न करणारी पण जोडपी असू शकतात.
त्यामुळे ते खरे उद्दिष्ट कसे?
पण दुराग्रहाने, हट्टाग्रहाने दोघेही वेगळे होत असतील तर एरव्ही नको त्या गोष्टीत नको तेवढे नाक खुपसणाऱ्या पालकांनी, सामंजस्याने एकत्र बसून विचार करणे चुकीचे ठरते का?
>>>नीधप म्हणाली तसे जी गोष्ट नाक खुपसणाऱ्या लोकांना हट्टाची आणि दुराग्रहाची वाटत असेल ती कदाचित त्या जोडप्यासाठी कळीचा मुद्दा असू शकतो.
आणि ९९% वेळा वडिलधाऱ्यांचा सल्ला जोडप्यातल्या मुलीला/बाईला "तू जरा त्याच्या कलाने घे, थोड adjust करायला शिक" असे सांगणे हाच असेल (एकत्र कुटुंबात बहुतेक वेळा असतोच) तर तिने तरी प्रत्येक वेळी तो का आणि कसा ऐकायचा??
लेख अगदीच ढोबळ वाटला. त्यातही
लेख अगदीच ढोबळ वाटला. त्यातही पुर्वी असे नव्हते आता असे होते आहे. वगैरे वाचुन कंटाळा आला. तेच तेच आणि तेच्तेच उगाळण्या पेक्षा, आपण असं का होतं ? ह्याचा विचार केला तर जास्त बरं होइल.
घटस्पोटाची जी कारणं दिलेली आहेत ती फारच वर वरची आहेत. त्या पेक्षा अशोक मामा, नीधप आणि डेलियाने ह्या वर जास्त विचार केलेला दिसुन येतो.
माबो वरची वैचारीक पातळी खुप वरची आहे. अनेक चांगले लेखक इथे आहेत. त्या मुळे वंदना जी प्रत्येक उत्तराला "तुम्हाला केलेला विरोध" असे समजु नका. त्याच मुळे त्याला "सफाइ" द्यायचा प्रयत्न ही करु नका. उलट इथले पर्याय आणि प्रतिसाद वाचलेत तर तुमच्या संशोधनाला फायदाच होइल.
एका चांगल्या विषयाला सुरुवात केलीत म्हणुन अभिनंदन
घटस्पोटा संबंधी माझं मत.
लग्न आपण का करतो? तर जोडीदार आवडला म्हणुन, समाजात मान्य असलेला संबंध म्हणुन, सगळे करतात म्हणुन, कुटुंब हवं म्हणुन, सुरक्षितता हवी म्हणुन, वगैरे, वगैरे....
नीवड चुकु शकत नाही का? शकते की. जेंव्हा एखादा संबंध आपण आपला निर्णय घेवुन बनवतो, तेंव्हा तो निर्णय चुकु सुध्धा शकतो. एखादं नातं जेंव्हा उगाचच खेचलं जातं तेंव्हा त्याचे समाजावर उलट वाईट परीणाम होतात. एखादा निर्णय चुकला तर तो बरोबर करायची संधी त्या माणसाला का नाकारायची? उलट वेळीच निर्णय नाही घेतला तर त्याचा नायटा व्हायचा संभव असतो.
घटस्पोट समाज मान्य नक्कीच नाही. का नाही? कारण घटस्पोटा मुळे फक्त नवरा बायको नाही तर दोन कुटुंब दूर होतात. मुले असतिल तर त्यांच्या भावनिक आयुष्यात प्रचंड उलथा पालथ होते. एक व्यक्ती सुध्धा आपल्या परीने नाती टिकवायचा प्रयत्न करतेच. त्यामुळे भावनीक प्रश्ण निर्माण होतात.
आज काल कुटुंब न्यायालय सुध्धा, घटस्पोट घेणार्या जोडप्यांना आधी सामुपदेशका कडे पाठवतात. ( माझ्या माहितितील ३/४ केसेस मध्ये ह्या सामुपदेशकांनी खुपच चांगली कामगीरी केलेली आहे). म्हणजेच काय ते नातं तुटु नये अशी सगळ्यांचीच इछ्छा असते. तरीही जर नातं तोडावं असं वाटत असेल तर मात्र त्या बंधनाला काहीच अर्थ नसतो.
वरील लेखात कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, विक्रुती, विवाहबाह्य संबंध, हुंडा, सामाजिक हिंसाचार ह्या सगळ्या कारणांवर काहीच भाष्य नाही. ही जास्त गंभीर कारणे आहेत.
नीधपच्या सर्व पोस्टींना
नीधपच्या सर्व पोस्टींना अनुमोदन.
साती,
लोक याला शिकलेल्या मुलींचा आगाऊपणा असमंजसपणा म्हणतात तर मी याला स्वसमर्थतेची जाणीव म्हणेन. >>> एकदम पटेश
>>हल्ली त्याला DINC (Double
>>हल्ली त्याला DINC (Double Income No kids) असं म्हटलं जा>><<
हे "हल्ली" वगैरे मुळीच नाही आले हो. हा शब्द भारतातच ३० वर्षापुर्वी पण लोकं वापरायचे.
निधप आणि डेलियाच्या पोस्टस
निधप आणि डेलियाच्या पोस्टस सही आहेत. विचार अगदी पटले.
<<<<"सुप्रजा घडवणे" म्हणजे मुले जन्माला घालणे नाही.
उदाहरणच देऊन सांगायचं स्वत:च मूल नसलेलं जोडपं दत्तक घेऊन त्याच्यावर स्वत:मधल्या चांगल्या गुणांचे, संस्कार करून त्याचे आयुष्य घडवणे म्हणजे सुप्रजा. >>>>
वंदना, म्हणजे तुम्हाला लग्न मुलं जन्माला घालण्यासाठी असतं हा चुकीचा विचार आहे हे मान्य आहे का? पण तुमच्या व्याख्येच्या सुप्रजेसाठी लग्नच करायला हवं मला पटलं नाही. हे तर सिंगल पेरेंट किंवा लिव्-इन्-रिलेशनमधलं कपलही करु शकतील. शिवाय लग्न सुप्रजेसाठी असेल तर मग कधी कधी घटस्फोट समर्थनीयच असेल. कारण दोन्हीपैकी एका पालकाचं चारित्र्यं ( व्यसन, स्वभाव, विबासं, मानसिक आजार) असेल तर उलट त्या मुला/मुलीला अशा पालकापासुन दुर ठेवणंच योग्य असेल.
तुमच्या लेखातली काही वाक्यं आवडली आणि पटली, पण एकुण लेख नाही.
परंपरेने आलेली व शास्त्रिय
परंपरेने आलेली व शास्त्रिय बैठकीवर आधारलेल्या भारतीय कौटुंबिक व्यवस्थेत>>
भारतावर झालेली सततची आक्रमणं, आक्रमणातून निर्मित निर्नायकी व्यवस्था, भौगोलिक व वैचारीक गुलामगिरी >>
"आई"ची मॉम व "बाबांचा" डॅड झालाय.>>
त्या घरच्या चालीरिती, संस्कार, नातेसंबंध, उठबस त्या मुलीला लहानपणापासूनच शिकविली जायची.>>
नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. >>
ह्या सर्व वाक्यांची टोटल लावली तर हा लेख कोणत्या गृहितकांवर आणि विचारसरणीवर आधारीत आहे हे स्पष्ट्च आहे.
आगाऊ +१००
आगाऊ +१००
आगावा, मी हे लिहिता लिहिता
आगावा, मी हे लिहिता लिहिता कितीवेळा हात आवरलाय ते मलाच माहितेय
एकुणातच मला 'बौद्धिकांचा' कंटाळा असल्याने मी इथे काहीही प्रतिसाद द्यायचा नाही हे ठरवलं होतं, पण तुझ्या प्रतिसादाला अगदी जोरदार अनुमोदन द्यावंसं वाटतं म्हणून टंकतेय.
प्रश्न विशिष्ट गृहितकांचा किंवा विचारसरणीचाही नाही तर बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून प्रत्येक गोष्टीचा मुळापासून तर्कशुद्ध पुनर्विचार न करण्याचा आहे. पण हे पुनर्विचार प्रकरणच अनेकांना अकारण मूर्तीभंजन, विदेशी/डाव्यांचे अंधानुकरण, वगैरे बरंच काही वाटू शकतं त्यामुळे या संभाव्या वादातून मी आधीच टँप्लीज घेऊन निवृत्त. असो.
आगावाला हजार मोदकांचे ताट
आगावाला हजार मोदकांचे ताट द्यायला हवय. (इथे पण मी पहिल्याच पॅराला ओळखलं. घरी बसून वाचत असल्याचा फायदा.. :फिदी:)
मला शास्त्रशुद्ध म्हणजे काय ते नक्की समजलं नाही.
घटस्फोट हा सामाजिक प्रश्न अजिबात नाही. दोन व्यक्तींनी आपापसात राहणं शक्य नसेल तर कायदेशीररीत्या वेगळं होणं यामधे समाजाला त्रास करून घेण्यासारखं काय आहे? या व्यक्तींना आधीदेखील समाज पोसत नव्हता, घटस्फोटानंतर देखील पोसणार नाहीचे.
पण दोन व्यक्ती ज्यांना एकमेकांसोबत रहाण्याची इच्छा नाही, अशांनी एकत्र जीवन काढलेच पाहिजे असा समजूतीपायी कित्येकदा सामाजिक प्रश्न उभे राहतात. हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, (कित्येकवेळा) आत्महत्या या सर्वांमागे गुन्हेगार असते ती "लग्न" नावाची संस्था. आता या वर्षी हिचे लग्न हे झालेच पाहिजे. इस घरसे तुम्हारी डोली उठी, उस घरसे तेरी अर्थी उठेगी. मुलगी झाली म्हणजे हुंडा द्यावाच लागणार. मला मूल होत नाही म्हणून मी मरून जाते. अशा कित्येक समस्या उभ्या राहतात त्या या सो कॉल्ड "लग्न टिकवण्याच्या" भानगडीखाली. कित्येक स्त्रिया मन मारून जगत राहतात तेच मुळी या लग्न टिकवण्याच्या त्रासामधे. यापैकी काही स्त्रिया मानसिक रूग्ण बनतात, डिप्रेशनसारख्या आजारांना बळी पडतात. अशा वेळेला हे "लग्न टिकवणे" हा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न बनतो.
lekhatale vichar atyant
lekhatale vichar atyant avadale.
वसंत सुशीलकुमार... | 3
वसंत सुशीलकुमार... | 3 December, 2012 - 14:15 नवीन
lekhatale vichar atyant avadale.
<<
कसे काय आवडले? घटस्फोटामुळे भ्रमचर्य ऑपॉप प्राप्त होईल ना हो!
नीधप, >> इथेच तर आक्षेप आहे.
नीधप,
>> इथेच तर आक्षेप आहे. लग्न ही सामाजिक घटना आहे हे मान्यच होणं शक्य नाही. फारतर कौटुंबिक
>> आणि कायदेशीर असं काहीतरी म्हणता येईल. त्याच पद्धतीने घटस्फोट ही सुद्धा सामाजिक घटना नाही.
लग्न सामाजिक नाही म्हणजे समाजाने लग्नात लुडबूड करू नये या अर्थी आपल्याला अनुमोदन. मात्र विवाहविच्छेदाचा समजावर परिणाम होतोच. इथलं इंग्लंडमधलं उदाहरण देतो. पाश्चात्य देशांत विवाह हा करार मानला जातो. त्यामुळे नवरा बायकोला पैसे (पोटगी) देऊन हा करार संपुष्टात आणू शकतो. म्हणून इथे लोक लग्नंच करीत नाहीत. बहुतांश जोडपी समवासी (लिव्ह इन) राहतात. विवाहित स्त्रीपेक्षा समवासी स्त्री स्वत:ला जास्त असुरक्षित मानत असते.
आजून एक गोष्ट म्हणजे जर विवाहास केवळ कौटुंबिक किंवा कायदेशीर एव्हढंच मानलं तर विवाह आणि समवास यांत फरक तो काय राहिला? लग्न करावं तरी कशाला? विवाह ही घटना कौटुंबिक किंवा कायदेशीर यांच्यापेक्षा नक्कीच जास्त काहीतरी आहे.
त्या 'जास्त काहीतरी' चं मूळ माझ्या मते कशात आहे ते सांगतो. स्त्री आणि पुरूष एकमेकांशी वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करतात. हे माझ्या मते लग्नास वेगळा दर्जा प्राप्त करून देते. आपलं मत ऐकायला आवडेल.
अधिक चर्चा व्हावी!
असो.
तुम्ही म्हणत असाल की समाजाने नवराबायकोत लुडबूड करू नये, तर ते मला १००% मान्य आहे. तसेच विजोड विवाह लवकरात लवकर संपुष्टात यावा, असं मलाही वाटतं. पण याकरिता विवाहासंबंधी दृष्टीकोनात सरसकट बदल करावा का? खूपशी जोडपी अनुरूप आणि विजोड यांच्यामध्ये कुठेतरी लटकत असतात. पूर्ण अनुरूपही नसतात आणि पूर्ण विजोडही नसतात. अशी जोडपी नवीन दृष्टीकोनामुळे विच्छेदाकडे तर ढकलली जाणार नाहीत काय?
असो.
आजून एक प्रश्न : पुरूष आणि स्त्री विवाह वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. त्यामुळे काडीमोडही वेगवेगळ्या कारणासाठी होतात, असं म्हणता येईल काय?
आ.न.,
-गा.पै.
वंदना आपला लेख वाचून मला
वंदना आपला लेख वाचून मला पडलेला मुख्य प्रष्ण हा की घटस्पोट व त्याची वाढलेली संख्या आपल्याला "समस्या" का वाटली ?
<<<आधीच्या काळी लहानपणीच लग्न व्हायची... तिनं जुळवून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा करणं विपर्यस्त ठरतं. >> ह्याच्याशी पुर्ण सहमत. पुर्विच्या एकत्रकुटुंबाच्या व समाज रचनेच्या (पुरुषप्रधान) चौकटित "लवकर" लग्न हा उपाय त्या एकत्र कुटुंबासाठी कमी तणाव निर्माण करणारा म्हणुन समाजमान्य झाला असे मलाही वाटते. पण ह्या चौकटित स्त्रीला तिचे स्वतंत्र अस्तित्व असणे अपेक्षीत नव्हते. जेंव्हा हे मुळ गृहितक बदलते तेंव्हा नैसर्गीक आहे कि अशा प्रकारची पुरूषप्रधान (एकत्र कुटुंब) पद्धत ही अशा मुलीकरता विपर्यस्त ठरते. "मुलगी लग्न करून सासरी जाते" हे गृहीतक ह्याच एकत्र कुटुंब प्रणालिचा मागे राहिलेला व समाजमनात रुतलेला विचार आहे जो खूप सार्या लग्नप्श्चात समस्यांचे मुळ आहे.
कुठल्याही कारणाने जर सहजीवन शक्य नसेल तर घट्स्पोट घेऊन आपापले मार्ग अनुसरणे ही समस्य कशी होते?
कुठल्याही कारणाने जर सहजीवन
कुठल्याही कारणाने जर सहजीवन शक्य नसेल तर घट्स्पोट घेऊन आपापले मार्ग अनुसरणे ही समस्य कशी होते? >> आधी मूळात सहजीवन आहे का हे ठरवण्याची समज हवी ना रे ? इलाज मग घटस्फोट कि समुपदेशन कि अजून काही हे नंतरचे झाले.
आगाऊ , १०००००००+ बाकी ,
आगाऊ , १०००००००+
बाकी , संशोधनातून बसला नसेल इतका मोठ्टा धक्का वंदना ताईंना इथल्या प्रतिक्रिया वाचून बसणार हे नक्की!!
मुद्दा जर "समुपदेशनाची
मुद्दा जर "समुपदेशनाची आवश्यकता" हा मांडायचा होता तर "विवाहाची कारणमीमांसा" आणि "घटस्फोट शेवटचा पर्याय" हे विषय ह्याच लेखात हाताळणे गरजेचे होते का? समुपदेशनाबद्दल आकडेवारी कुठे न कुठे मिळू शकेल. सध्या भारतात कुठे कुठे समुपदेशन उपलब्ध आहे? घटस्फोट टाळण्यासाठी समुपदेशन मध्ये इतर कुठले कुठले समुपदेशन उदा - आर्थिक, व्यसनमुक्त,, मानसरोग लागू शकते? घटस्फोटानंतर समुपदेशनाची गरज संपते का किंवा घटस्फोट टाळला तर समुपदेशन परत लागेल का म्हणजे जसे एखादे औषध एखाद्या आजारावर अनिवार्य असते तसे समुपदेशन गरज बनेल का? कि समुपदेशक त्या दाम्पत्यास कुरबुरी हाताळण्यासाठी नियमावली देईल ? समुपदेशनमध्ये इतर नातेवाईक समाविष्ट होतात का? मला वाटते हा लेख आपण मुद्द्याला धरून मुद्द्याची माहिती देणारा (तुमची भूमिका सांगणारा नव्हे) लिहू शकाल. आपण उत्तम लेखिका आहात, परत प्रयत्न केलात तर वाचकांना नक्कीच काहीतरी हाती लागेल आणि ह्या प्रक्रियेत पूर्ण माहितीच्या आधारावर तुम्हालाही तुमची भूमिका परत तपासता येईल.
वंदनाताई मेल मिळाला कि नाही
वंदनाताई
मेल मिळाला कि नाही हे सांगितलं नाहीत. असो. जवळच्या मित्राची केस असल्याने फोरमवर लिहायचं टाळलं होतं.
लेखातून नक्की काय सांगायचं
लेखातून नक्की काय सांगायचं आहे ते कळलं नाही. फक्त चर्चा करून काय होणार आहे? पुर्वीच्या काळी फक्त कायद्याने जास्त प्रमाणात घटस्फोट होत नव्हते इतकंच. पण कित्येक जोडपी वरिल सर्व आणि इतर बर्याच कारणांमुळे 'मनाने' कधीच वेगळी झाली होती. फक्त एका घरात राहणे म्हणजे लग्न संस्कृती टिकली... असं मानणं हे मुर्खपणाचं आहे. उलट आता शिक्षण आणि एक्स्पोजरमुळे स्त्री आणि पुरूष स्वतंत्र विचारसरणीचे झाले, लग्नाची 'खरी व्याख्या' त्यांना समजली.. आणि ती ते जगू पाहतायत. काहीजणांवर ही लादलेली संस्कृती ते परतवून लावून नव्याने सुरूवात करतायत ही समस्या होऊ शकत नाही. नविन पालवी फुटण्या अगोदर पानगळ ही होतेच. त्याला समस्या म्हणू नये.
लग्न हे आयुष्याचं सार्थक नव्हे, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ही आपलं आयुष्य अत्यंत महत्वाचं आहे, त्याची नरिशमेंट नीट झाली नाही तर कोणत्याही नात्यात आपण आपलं योगदान देऊ शकणार नाही. त्यामुळे घटस्फोट ही काही फार मोठी 'बाऊ' करण्याजोगी बाब आहे हे मला पटत नाही. त्यात इतरांचा हस्तक्षेप तर मूळिच नको, कारण त्याने सुरळीत पार पडणार्या गोष्टी रक्तबंबाळ करून सोडतील. आणि हस्तक्षेपाने अगदी एखादं घर वाचलंच समजा तरि ते फक्त वरवरचं टिकणं असेल, मनाने ते लोक तसेही वेगळेच..
भारतातच नव्हे जगभरात काही ना काही कारणाने घटस्फोट न घेऊ शकणारी/घेणारी पण मनाने एकमेकांपासून शेकडो मैल दूर असणारी जोडपी आहेत त्यांच्या विकासासाठी काय करू शकतो आपण? चर्चा?
हे शेवटी 'कविन' च्या कवितेची आठवण करून देतय मला. की आत मध्ये रंग कितीही फिसकटलेले असले तरी चालेल, वरून फ्रेम्/चित्र सुरेखच दिसलं पाहिजे.
आय डोण्ट अॅग्री..
(( पुर्वीच्या काळी फक्त
(( पुर्वीच्या काळी फक्त कायद्याने जास्त प्रमाणात घटस्फोट होत नव्हते इतकंच. पण कित्येक जोडपी वरिल सर्व आणि इतर बर्याच कारणांमुळे 'मनाने' कधीच वेगळी झाली होती.)) +१
नीधप, डेलिया यांच्या पोस्टस
नीधप, डेलिया यांच्या पोस्टस अगदी पटणार्या आहेत.
दक्षिणा
तुझ्या पोस्ट्ला सुपर लाईक.
एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ही आपलं आयुष्य अत्यंत महत्वाचं आहे, त्याची नरिशमेंट नीट झाली नाही तर कोणत्याही नात्यात आपण आपलं योगदान देऊ शकणार नाही >>>
हे अगदी खरं आहे.
दक्षिणाच्या पोस्टला
दक्षिणाच्या पोस्टला एजोटाझापा.
खूपच चांगली पोस्ट, दक्षे.
आजून एक गोष्ट म्हणजे जर
आजून एक गोष्ट म्हणजे जर विवाहास केवळ कौटुंबिक किंवा कायदेशीर एव्हढंच मानलं तर विवाह आणि समवास यांत फरक तो काय राहिला? <<
येस्स.. माझ्यामते कायद्याचे शिक्कामोर्तब यापलिकडे काही नाही. पण अशी परिस्थिती नाही.
लग्न करावं तरी कशाला?<<<
प्रत्येकाच्या आपापल्या प्रायोरिटीज असतात हो.
विवाह ही घटना कौटुंबिक किंवा कायदेशीर यांच्यापेक्षा नक्कीच जास्त काहीतरी आहे. <<<
हे प्रत्येक विवाहानुसार बदलते असे मी मानते.
वरील सर्व उद्बोधक चर्चा ऐकुन
वरील सर्व उद्बोधक चर्चा ऐकुन मलाही लहान तोंडी मोठा घास घ्यावासा वाटु लागलाय. काही चुकल्यास माफी असावी.
घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही.>>> असे वंदनाताई म्हणतात. मला मान्य आहे. पण मग आत्महत्या हा सुद्धा काही पहीला पर्याय नसतो... तोही शेवटचाच पर्याय. पण काहीजण तोही निवडतातच ना? आत्महत्येचे समर्थन नाही करायचे मला इथे. फक्त एवढे सुचित करायचे आहे की असे टोकाचे निर्णय माणुस काही आनंदाने, आवडीने घेत नसतो. घटस्फोट म्हणजे फक्त एक नाते तुटणे हे दिसते समाजाला. पण त्याआधी कित्येक स्वप्न, भावना, कल्पना, समज, विचार, विश्वास, संयम वगैरेंचे तुटणे घडलेले असते जे कुणी लक्षातही घेत नाही....
आणि २५-२५, ३५-३५ वर्षे एकत्र रहाणे, एकाच घरात वावरणे, सारख्याच मुलांचे पालक म्हणवून घेणे म्हणजे संसार करणे होते का? पती-पत्नी म्हणुन दोघांनी एकमेकांशी मनाने कधीच फारकत घेतलेली असेल तर घटस्फोट ही फक्त एक कागदोपत्री 'फॉर्मेलिटी' राहून जाते. वर्षानुवर्ष असा पोकळ - दिखावू संसार करणारी अनेक जोडपी पाहिलीयेत मी. मुलांचे आई-वडील म्हणुन ही जोडपी एकत्र असतीलही... पण पती-पत्नी म्हणुन नाही. कारण मा़झ्या मते एकमेकांवरील प्रेमाचा आणि मुले जन्माला घालण्याचा अर्थाअर्थी काहिही संबंध नाही!!!
घरच्यांची लुड्बुड हाही प्रश्न 'काश्मिर' प्रश्नासारखा कुटुंब पातळीवर मोठी उलाढाल करणारा. पण संसार जर दोघांचा असेल तर त्यात इतरांच्या लुडबुडीला किती आणि कसं स्थान द्यावं हे ठरवण्याचा समंजसपणा दोघांनी दाखवला तर त्या लुडबुडीचा जास्त त्रास होत नाही. पण मुळात ती 'लुड्बुड' आहे हे समजत नाही बरेचदा. 'माझ्या बाळा... माझ्या सोन्या' करत मुलाच्या आजुबाजुला डोलणारी आई मुलाच्या बायकोसाठी लुड्बुड करणारी ठरते पण मुलासाठी मात्र ती 'वात्सल्याचा झरा' असते. खरी अडचण सुरु होते ती इथे!!!
लग्न म्हणजे यापुढच्या सगळ्या आयुष्यात आपल्यासोबत असण्याची आपण एका तिसर्या व्यक्तीला दिलेली परवानगी. हे काही सोपे नव्हेच. त्यातुन मुलगी असेल तर नव्या नावापासून सर्व नव्या गोष्टींशी तडजोड करणे आले. यात ज्याची आणि ज्याला साथ करायची आहे त्याचे मनापासुन केलेले सहकार्य नसेल तर सहजीवन अवघड... कधी अशक्यही होणारच!!! बहुतेक ठिकाणी हे 'लुडलुड करणारे तिसरे कुणी नसतातच... ते असतात आपले स्वत।चेच विचार आणि पुर्वग्रह!!!
दक्षे! उत्तम पोस्ट. तू उल्लेख
दक्षे! उत्तम पोस्ट. तू उल्लेख केलेल्या << पण कित्येक जोडपी वरिल सर्व आणि इतर बर्याच कारणांमुळे 'मनाने' कधीच वेगळी झाली होती. >> अशा जोडप्यांना 'मॅरीड सिंगल्स' म्हणतात.
दक्षिणा व मुग्धमानसी << छान
दक्षिणा व मुग्धमानसी << छान मत.
व.पुं च्या एका पुस्तकातील
व.पुं च्या एका पुस्तकातील वाक्य (बहुधा काही खरं काही खोटं) ....
त्यातला शंकर पार्वतीला म्हणतो "लग्न ही कन्सेप्ट आहे तर माणूस ही रियालिटी आहे"
कन्सेप्टच्या आहारी जाऊन जिवंत माणसाने स्वतःचे हाल करून घेणे चुकीचे आहे.
लग्न ही संस्था सोयीची नसेल बदलत्या जीवनशैलीनुसार तर काळाच्या ओघात ती बदलणारच.....मग संस्क्रुतीरक्षक किती का गळे काढेनात.
पियुपरीजी, <आणि ९९% वेळा
पियुपरीजी,
<आणि ९९% वेळा वडिलधाऱ्यांचा सल्ला जोडप्यातल्या मुलीला/बाईला "तू जरा त्याच्या कलाने घे, थोड adjust करायला शिक" असे सांगणे हाच असेल (एकत्र कुटुंबात बहुतेक वेळा असतोच) तर तिने तरी प्रत्येक वेळी तो का आणि कसा ऐकायचा??>
एकदम मान्य..
<कदाचित एखाद्या जोडप्याच्या मते मुले (मग ती स्वत:ची असोत किंवा दत्तक) शून्य महत्वाची असू शकतात. किंवा मुल होऊच न देणे हा निर्णय आधीच घेऊन लग्न करणारी पण जोडपी असू शकतात.>
किती?
आगाऊजी,
<ह्या सर्व वाक्यांची टोटल लावली तर हा लेख कोणत्या गृहितकांवर आणि विचारसरणीवर आधारीत आहे हे स्पष्ट्च आहे>
आपल्याला "संस्कृती रक्षक", "पुराणमतवादी" किंवा कुठल्या तत्सम गृहितकात टाकायचे आहे ते अवश्य टाका. माझे विचार आपल्याला कदाचित जुने वाटले असतील किंवा आहेतच. मला माझ्या मतांचा पूर्ण आदर आहे. पण मी आपाल्या मताचाही अनादर करीत नाही. निधपजी, डेलियाजी, सिमंतिनीजी, आपण माझ्या विचारात भरच टाकत आहात. ज्या वातावरणात मी वाढले किंवा आहे तिथे आपले विचार खुपच प्रगत आहेत. त्याज्य नाहीत. आपण सर्वजणी जी मते मांडत आहात त्यामुळे मला धक्के वगैरे अजिबात बसत नाहीत. धक्के तेंव्हा बसतात जेंव्हा आपण आपल्या विचारांची कवाडेच बंद करतो. विचारांना लेबल लावतो.
संस्कृतीवाले (सो कॉल्ड) आपल्या संस्कृतीवर आक्रमण, पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण वगैरे तत्सम लेबल लावतात व विचार स्विकारणेच बंद करतात. प्रस्थापित विचार किंवा आतापर्यंत चालत आलेले विचार म्हणू, या पासून वेगळे विचार, मते असणारी माणसे, जुन्या विचारांना "बौध्दिक" ची लेबले लावतात.
एकुणच कुठल्याही कोषात बंद असणे घातक.
शेवटी विचार, समज हे सापेक्ष असतात. मी म्हणते तेच बरोबर हे चूक आहे. चर्चा खूपच सुंदर आणि चांगली चालली आहे. सर्व मैत्रिणिंना धन्यवाद. अपेक्षा हिच आहे की मतभेद असावे मनभेद असू नये.
Pages