विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

Submitted by बस्के on 11 September, 2012 - 06:49

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय.. 
ओके, ये परत वर्तमानकाळात. कॉफी आणली करून. आता वाचू. अंहं.. नाही लक्ष लागत आहे.. जरा मायबोलीवर चक्कर टाकून येऊ.. मग तिकडे अर्धा तास.. मग आपोआप रूटीन असल्यासारखे फेसबुक. तिथे मिनिमम २० मिनिट्स. कोणी ऑनलाईन भेटले की झालंच. पुस्तक(आयपॅड) बाजूला..

मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे मायबोलीवर, फेसबुकवर. गप बसून वाचलं असतंस तर मार्क झुकरबर्ग शिक्षा करणार होता का? का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल? इतकं कसं या गोष्टींमध्ये वाहवून जायचे. इतकं कसं टेक्नॉलॉजीचे अ‍ॅडीक्शन? कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या दिसतोय ना? अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर होण्याइतपत मन घुटमळतंय इथेतिथे! घुसमट. घुसमट नुसती! का कशाला कोण जाणे. हा जो उगीच ताण जाणावतो कधी कधी, तो काय आहे? कशाचा आहे.. काही लोकं नक्कीच सुख बोचते वगैरे टर्म्स वापरू शकतात. Happy पण खरंच मला माहितीच्या विस्फोटाचा ताण खूप जाणवतो.

आमच्या पिढीने(80s) प्रचंड प्रमाणात काळाचा वेग अनुभवला. आमचं लहानपण बरंचसं सिधेसाधे गेले. शाळा,अभ्यास, खेळ, दंगा मस्ती.. अधून मधून घरच्या आईसक्रिमपार्ट्या, कधीतरी सिनेमा. भाषा कळत नसताना बघितलेल्या स्मॉल वंडर, डिफरंट स्ट्रोक्स सारख्या सिरीयल्स. दूरदर्शन फक्त होते तेही दिवस आठवतायत मला. इतकंच काय, खूप पूर्वी एक जैन टीव्ही म्हणून चॅनल असायचा केबलवर. तोही आठवतोय मला.. काहीही गोष्टी. इतक्या साध्या व सुंदर होत्या ना. आणि तितक्याच खूप क्षुल्लक. इतक्या क्षुल्लक की आणखी ४-५ वर्षात कदाचित मी पार विसरून जाईन त्यांना - जर त्या आठवणी जागत्या ठेवल्या नाहीत तर. कारण. काळ. मागच्या पिढीत काळ ज्या वेगाने धावला त्यापेक्षा प्रचंड फास्ट काळ धावतोय आता. वर्ष दोन वर्षात सगळ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी गोष्टींचे नवीन मॉडेल्स/अपग्रेड होऊन आपल्याकडची गोष्ट मागे पडते. ५ वर्षापूर्वी आम्ही डिजिटल कॅमेरा घेतला. खूप सर्च करून, डिल्स मिळवून. १५०डॉ ला ८मेगापिक्सलचा ६एक्स ऑप्टीकलझूमचा कॅनन. पुढील २ वर्षात कॅमेरा म्हणजे खेळणं होणं बाकी होतं. लॅपटॉप बद्दल बोलायलाच नको.

किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत? भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला? गुगल पूर्वीचे दिवस काय होते ते आठवले तर our version of Arabian nights असावे इतकी सुरस वाटेल. एखादी गोष्ट माहीत नसेल तर चक्क आपण त्या तश्या अज्ञानात झोपायचो? झोप लागायची आणि? हो हो ! कितीतरी शांत लागायची.
मग आता काय अडलंय .. नाही कळलं अर्धाच घसा का दुखतोय. नाही कळले थायरॉईड, फॉर दॅट मॅटर जगातल्या प्रत्येक कंडीशनचे सिम्प्टम्स आणि मी नाही स्वत:ला त्यात बसवून पाहीले. नाही कळते पोटातल्या बाळाचे प्रत्येक दिवसाचे माईलस्टोन्स. नाही मी शोधली घरातील यच्चयावत प्लंबिंग/कुकींग/फायनान्स-बजेटींग आणि व्हॉट नॉट अडचणींवरची उत्तरं.. नाही कळ्लं ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं ..   नाही आत्ताच्या आत्ता कळलं आत्ता झालेला भूकंप किती रिश्च्टर स्केलचा होता. काय बिघडतं? नाही.. खरंच माणसाने क्युरिअस असावे किंवा ज्ञान मिळवावे वगैरे सगळं ठिक आहे. पण खरंच किती गोष्टी आपण वाचतो/वाचायला जातो ज्याची खरंच गरज असते. की आपण डोक्यात अनावश्यक कचरा निर्माण करतोय. कारण ती प्रत्येक गोष्ट कधीनाकधीतरी डोकं वर काढून आपलं (आपल्या डोक्यातले) अस्तित्व दाखवून देतेच. ताण ! ताण येतो मला माझ्या मनातल्या विचारांचा. माहितीच्या स्फोटाचा ताण येतो. आई बाबा पिढीचे बरं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगातले बर्‍याच टेक्निकल गोष्टी टेक्निकली चॅलेंज्ड असल्यास स्किपच होतात. आपलं नाही ना तसं. मुद्दमहून शिक्षण घेतलंय या सगळ्याचं..कळतंच बरचसं. नाही कळलं तर कळून घेण्याची धडपड सुरू. कधी कधी वाटतं कम्प्लेसंट असावं ब्वॉ माणसाने. निदान आपल्याला आपल्या जिज्ञासेचा त्रास होतोय हे जाणवलं तरी कम्प्लेसंट व्हायला शिकावे. पैसा काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काय नि ज्ञान काय. किती हवंय, झेपतंय हे पाहूनच झोळीत घ्यावं.

अमेझॉन किंडलवर खूप मस्त पुस्तकं फ्री किंवा अगदी मामुली किंमतीत मिळतात. आयट्युन यु मध्ये अनेक उत्तम युनिव्हर्सिटीजमधले कोर्सेस फुकटात मिळतात. सुरवातीला मी एक पुस्तक/कोर्स घ्यायचे, वाचून काढायचे. आता तसं नाही. किंडलवर अधून मधून चेक करत राहीले की पुस्तकं फ्री मिळतात अगदी १५डॉ. ची सुद्धा! त्यामुळे सतत डील्स पाहणे सुरू. अरे खरंच हवी आहेत का पण. Happy
पुस्तकं जाऊद्या! ती निदान प्रत्यक्ष दिसतात तरी! या आठवणींचे काय करायचे? कधी कधी त्या उगीचच दातात अडकलेल्या कणासारख्या डोक्यात फिट्ट बसलेल्या असतात. त्यांचे काय काम ? त्या आठवून दोन क्षण आनंदात जाऊन तुम्ही परत जोमाने कामाला लागता का? नाही! बर्‍याचदा त्या आठवणी आपल्या खिन्न्च करून टाकतात. ते जुने दिवस आठवतात. मन पण असं येडचॅप असते, त्याच्यासाठी जुने  सगळे सोनेच! मग कसं त्या मेमरीज वाईप आउट करणार. राहूदे मग.. कपड्यांच्या कप्प्यासारखे  मन आवरायला काढता आले पाहीजे. आज फक्त शाळेचा कप्पा आवरायचा मनातला. जे जे काही आठवतंय त्यातले उपयोगाचे ठेवायचे. ही मात्र अवघड स्टेप. मन हे जात्याच होर्डर प्रवृत्तीचे. सगळं ठेवू पाहणार. नो वेज! हे नाही केले तर मग कपाट ओसंडून वाहणार. आत्ता रिसेंट साईझ ८ असताना साईझ ४ ची जीन्स समोर येणार. मग मी कशी साईझ ४ची जीन्स वापरू शकत होते म्हणून सॅड व्हायचे.. हेच सगळं मनातील आठवणींबरोबर. डिमेन्शिया झालेला ब्रेन जसा कुठल्या तरी भलत्याच काळात रमतो, तीच गत. मनाने गपचुप वर्तमानकाळात राहणे का बरं इतकं अवघड? आहे म्हणा अवघड. जिवंत असण्याचे प्रतीक म्हणजे श्वासोच्छ्वास. आपण बाळ असताना श्वास नीट पोटापासून घेत असतो. आता तसा श्वास घ्यायला योगा/ध्यान करावे लागते! :।  कधी वरच्यावर श्वास घेणे सुरू झाले? मला वाटते जेव्हा मागे तो अदृश्य वाघ मागे लावून घेतला आपण तेव्हाच. डॉ. बंगाच्या पुस्तकातील क्षणस्थ होणे म्हणजे .. डोक्यावरून पाणी. मला तरी वाटतेय की ते शक्यच होत नाही. निदान पूर्वीच्या काळात शक्य असावे. या आताच्या गुगलच्या जमान्यात ? nope, nada!!   Happy

मी काही माहीती तंत्रद्न्द्यानाच्या/गुगलच्या विरोधात नाहीये. मी माणसाच्या जिद्न्यासेमुळे त्या  असमाधानीपणाकडे झुकणार्‍या मनस्थितीबद्दल बोलत आहे. कधी कधी मला वाटतं, मला जास्तच उगीच प्रश्न पडत आहेत. (हीच बरं ती जास्तीची , खरं म्हणजे नकोच असलेली जिद्न्यासा!) आता काय करायचे? सगळ्या मटेरिअलिस्टीक जगाची हाव सोडून, मिनिमलिस्ट लाईफस्टाईल जरी तुम्ही एक्झिबिट केलीत तरी त्यानंतर तुम्हाला निर्गुणत्वाचा, मी म्हणजे काय, माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय इत्यादी विचारांची हाव पडली तर काय?! ती हाव तर फारच वाईट हो. प्रश्नांच्या गराड्यात पडू, त्या मार्‍यात थपडा खाऊ पण उत्तरं मिळत नाहीतच वरून स्पिरिचुअल असमाधान. थोडक्यात अवघड आहे! कदाचित अती तिथे माती हेच खरं. असतील अशा असामी ज्यांना मटेरिअलिस्टीक व स्पिरिचुअल जग याचा पर्फेक्ट तोल साधता आला असेल. तीच खरी सुखी लोकं! माझ्यासारख्यांनी काय करायचे? जाऊदे अवघड आहे हा शोध!  गुगलच करावे. मिळेल उत्तर! Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस्के ची तगमग पोचली.
पण बस्केला जो ' बाळपणीचा काळ सुखाचा ' वाटतोय तो सुद्धा काही लोकांना - अबब, किती ते टिव्ही चॅनेल्स. किती ते सिनेमे, किती ती थेटरं असा वाटू शकेल. म्हणजे ही तगमग एका टप्प्यावर प्रत्येक जनरेशनला वाटू शकेल का ?

फेसबुक आणि सोशल मिडिया हा एक वेगळाच चर्चेचा विषय आहे. चाळीतून आधी घरात कोणी डोकावणार नाही अश्या बंद वातावरणात यायचं आणि मग चाळीतच राहात असल्यासारखं 'स्वयंपाकापासून ते मुलं, कपडे, चपला, बूट ते विचार, हौस, यश अपयश, दिनचर्या' वाट्टेल ते लोकांना दाखवत राहायचं... >> हे काही पटलं नाही.

चाळीतून बंद वातावरणात आलेले + फेसबूक वर 'वाट्टेल ते' दाखवणारे असे कितीसे लोक असतील ? हे विधान सरसकट सोशल मिडियाबद्दल कसं करता येईल. चाळीतून रहाणार्‍यांना इतरांना काय दाखवावे काय दाखवू नये याचं फारसं स्वातंत्र्य नसेल ( असं समजते मी , कारण माझा अनुभव नाही ) . याउलट सोशल मिडियामधे हा चॉइस नक्कीच आहे .

फार पूर्वी घरातल्या लग्ना मुंजीबद्दल अन जन्म मृत्यूबद्दल पत्रे लिहून परगावातील नातेवाईकांना कळवण्याची पध्दत होती. गेल्या ५० एक वर्षात अशी काही बातमी नसताना सुद्धा पत्रे लिहायची पद्धत अगदी प्रचलित होती. अलिकडच्या काळात सुनिताबाई / जीए सुद्धा एकमेकांच्या पत्रात साहित्येतर खाजगी संदर्भ / विषय कितीतरी आहेत. एखाद्यालाच पत्रातून काही लिहिले तर ते चालेल अन एका 'पोस्ट' बटणावर क्लिक करून जगभरातल्या आप्तेष्टांना काही कळवले तर ते इगो मसाजिंग ? मला तरी हा युक्तीवाद पटत नाही.

बस्के, छान लिहिलंयस. आत्मचिंतनपर, प्रकटन, खूप काही डेस्परेटली वाटतंय त्याबद्दल, त्यातलं काही करू नये असं वाटतंय आणि तरीही केलं जातंय त्याबद्दल.

स्वतःलाच फटकारणं हे नेहमी फायदेशीर असतं असं माझं मत आणि अनुभव, दोन्ही.

एखाद्या गोष्टीच्या आपण आहारी जातोय हे कळलं, (आणि ते योग्य नाहीय हे लक्षात आलं) की हे आत्मचिंतन व्हायलाच हवं, रैना म्हणाली तसं प्रश्न पडायलाच हवेत. त्या गोष्टीपासून स्वतःला निग्रहपूर्वक दूर ठेवण्याच्या प्रक्रियेची ही सुरूवात आहे.

मनाची आवराआवरी >>> ही संकल्पना फार्फार आवडली.

मस्त!

सांभाळुन बर्का!
ते मायबोली नेते सेडीशनचा आरोप करतील.
(लोकांच्या कॉमेण्ट्स वाचल्या नाहीत - हे आधीच कोणी लिहिले असल्यास प्रताधीकार भंगाचा आरोप नका लादु).

लेख अतिशय आवडला. rar च्या प्रतिसादाशीही सहमत.

रोजच्या रोज इतकी चित्रं, प्रतिमा, शब्द, व्हिडिओ, इतर अनेक गोष्टी आपल्या मेंदूवर आदळत असतात की कधीकधी इंटरनेट किंवा माहितीच्या (इन्फॉर्मेशन, नॉलेज/ज्ञान नव्हे) स्रोतांपासून दूर असं एखादं विपश्यना शिबीर राबवायला हवं, असं वाटून जातं Proud

छानच लिहिलंय. अगदी जेन्युईन गोंधळ डोक्याचा. इतक्या करण्यासारख्या गोष्टी असतात अन निरुद्देश जातात दिवस माहितीच्या महापुरात वाहवत प्रवाहपतित होऊन. आपणही आत्मछळ केल्यासारखे फुकट घालवतो वेळ.. मला वाटतं त्या-त्या शॉर्ट टर्ममध्ये एक छोटंसं ध्येय जमेल तसं, अट्टाहास न करता, पण निराशही न होता साध्य केलं पाहिजे..

रार, नंतरची पोस्टही आवडली.

<< अलिकडच्या काळात सुनिताबाई / जीए सुद्धा एकमेकांच्या पत्रात साहित्येतर खाजगी संदर्भ / विषय कितीतरी आहेत. एखाद्यालाच पत्रातून काही लिहिले तर ते चालेल अन एका 'पोस्ट' बटणावर क्लिक करून जगभरातल्या आप्तेष्टांना काही कळवले तर ते इगो मसाजिंग ? मला तरी हा युक्तीवाद पटत नाही.>>

पण सुनिताबाई/जीए खाजगी गोष्टी लिहीत असतील तरी त्या तशा लिहिण्याइतकं त्यांचं नातं तयार झालं असाव. फेबु/ऑर्कुटवर जेव्हा एखादी गोष्ट शेअर होते तेव्हा ती ज्यांच्यापर्यंत पोहोचते त्यांना त्याचा रेलेव्हन्स किती ??

बेफिकीर, तुमची मूळ पोस्ट वाचलेली नाही. पण नंतरच्या पोस्टींमधल्या त्राग्याचा उद्देश कळला नाही. ज्याला लेख आवडतो ते तसं सांगतात. लेख, कविता, कथा किंवा कुठलीही कला ह्याबाबत स्टँडर्डायझेशन कसं चालेल ?

रार आणि चमन यांची चर्चा आवडली.
माझ्या डोक्यात नक्की कप्पे आहेत की नाहीत असा विचार करते आहे. (आहेत असे आधी वाटत होते. पण आता शंका निर्माण झाली आहे. :-)) इन्फर्मेशन ओवर्लोड होतो आहे असे मला आत्तापर्यंत कधी वाटलेले नाही. बहुधा याचे कारण म्हणजे मुळात आळशी स्वभाव असल्याने जे हवे तेव्हढेच जाऊन बघणे होते.

नानबाने लिहिले ते आहे त्या परिस्थितीतून / ताणातून सुटका म्हणून सोशल नेटवर्किंगकडे बघणे हेही बरोबर वाटते. ७, ८ वर्षांपूर्वी अतिशय ताणाच्या परिस्थितीत मी हॅरी पॉटरची पुस्तके वाचायचे असे लक्षात आहे. Happy एकदम दुसरेच जग. तसेच हे आभासी सोशल नेटवर्कचेही असणार असे वाटते.

>>जगभरातल्या आप्तेष्टांना काही कळवले तर
मेधा, मला वाटते, मुद्दा असा आहे की सोशल 'नेटवर्क' मध्ये आप्तेष्टांहून वेगळे, दूरचे, काही ओळखदेखही नसलेले असे लोक असू शकतात. असतात. बस्केने मूळ लेखात लिहिल्याप्रमाणे :
>> ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं
अशी कनेक्शन्स.

बेफिकीर, तुमची मूळ पोस्ट वाचलेली नाही. <<<

कशी वाचाल? उडवली मी ती.

पण नंतरच्या पोस्टींमधल्या त्राग्याचा उद्देश कळला नाही. <<<

त्रागा मी सुरू केला नाही. एकाचवेळी इथे आणि वाहत्या पानावर मला उद्देशून काही विचारणा करण्यात आल्या. त्यावर दिलेले एकत्रीत प्रतिसाद शेवटी दिसताना त्रागायुक्त दिसले.

ज्याला लेख आवडतो ते तसं सांगतात. <<<

नाही आवडते ते तसे सांगतात, मीही तसेच सांगितले होते, पण माझे सांगणे तीव्र असल्याने ते मीच उडवले होते. त्यानंतर त्यातला काही भाग वगळून बाकीचे पुनर्प्रकाशित करा अशी सुचवणी सशलने केली. त्यावर मी ठीकठाकच प्रतिसाद दिला. माझा त्रागा यासाठी होता की बस्केंच्या फक्त भावनाच गौरवल्या गेल्या व त्यावर सांगोपांग व चांगली चर्चा झाली. बस्केंचा मूळ विचारच भरकटलेल्या मनस्थितीमुळे आलेला आहे यावर काही लिहिले गेले नाही. मी माझे म्हणणे संयत शब्दात लिहू शकलो असतो. पण मी काही गोष्टी अतीच सिरियसली घेत असल्याने व तो माझ्यातील एक मोठा मानसिक प्रॉब्लेम असल्याने मी भडकून लिहिले. मला कोणी वेडा म्हणाले तर मला उलट आनंदच होईल. का वरवर घेतात काही लोक लेख? बस्केंचा लेख अनेकांनी फार वरवर घेतला. बस्केंच्या कित्येक वाक्यांमध्ये स्वतंत्र लेखाचे पोटेन्शिअल जाणवले. त्यांनी मन वितळून त्याची शाई करून पेनात भरून कागदावर लिहावे तसा लेख लिहून टाकला. असत्याकडून सत्याकडे जाणीवपूर्वक प्रवास हा कोन त्या लेखात महत्वाचा मानला नाही त्यांनी. उताराकडे पाणी वाहते तशी मी सत्याकडे पोचत राहिले असा कोन महत्वाचा मानला. आपले मन हातात घेऊन त्याचे चूर्ण करून प्रत्येक कणाची चव कशी हे लिहिले नाही (नसेल या व्याप्तीत, पण जे लिहिले तेही ब्रीफ).

आपण पुस्तक कशासाठी वाचतो? आपली अभिरुची आपण कशी ठरवतो, सुधारतो, का बाळगतो, आपण कुठे असतो आणि कुठे जायचे ठरवत असतो आणि त्यात पुस्तकांचा हातभार खरंच किती असतो हा एक अतीप्रचंड विषय ठरेल.

(मनाच्या सूक्ष्म जाणिवांशी संबंधीत लेख वाचून मला जर काही भाग किंवा बराच भाग आवडला नाही - हे सापेक्षच,मान्य - तर चिडचिड होते. हाही माझ्यातील मानसिक रुग्णच असावा, हेही मान्यच).

लेख, कविता, कथा किंवा कुठलीही कला ह्याबाबत स्टँडर्डायझेशन कसं चालेल ? <<<< तुम्हालाही हा लेख फारच वरवर समजला असे खेदपूर्वक लिहीत आहे. क्षमस्व. तुम्ही विचारलेला हा प्रश्न आणी लेखाची ग्रॅव्हिटी यांच्यात लय भारी तफावत आहे.

-'बेफिकीर'!

बस्केंच्या लेखावरील सकारात्मक टीका उद्या स्वतंत्रपणे लिहीन. लेखन परत सुरू करण्यासाठी मुद्दाम निमित्त मिळवणारा स्वस्त लेखक म्हंटला जावो नाहीतर अती शहाणा (जो मी स्वतःला समजतो, हा माझा खरोखर प्रॉब्लेम आहे, व त्याबद्दल मी नेहमीच माफ्या मागत फिरत असतो आणि लोकही मोठ्या मनाने माफ करत राहतात) समजला जावो.

तुम्हालाही हा लेख फारच वरवर समजला असे खेदपूर्वक लिहीत आहे. क्षमस्व. तुम्ही विचारलेला हा प्रश्न आणी लेखाची ग्रॅव्हिटी यांच्यात लय भारी तफावत आहे. >>
हो, अशी शक्यता आहे की.
लेख वाचुन जे वाटलं ते वाटलं. तुम्हाला आणि मला एकसारखाच समजेल किंवा आवडेल हे कसं शक्य आहे ?

(घिसीपिटी उपमा - डोळे बांधून हत्तीला हात लावायला सांगितला तर मी सोंड म्हणजेच हत्ती समजेल, तर दुसरं कुणी त्याचं शेपूट म्हणजे हत्ती असं समजेल. ह्यावरून वाद घालण्यात काय अर्थ ?
आणि मी कुठे म्हणतेय की सोंड म्हणजेच हत्ती ? लेखाची ग्रॅव्हिटी मला समजली आहे त्यापेक्षा जास्त नक्कीच असू शकते :))

या लेखाशी मी मर्यादित प्रमाणात सहमत आहे. मर्यादित अशासाठी की आमच्या लहानपणी काँप्युटर या शब्दाची कल्पना पण नव्हती. आम्ही पुस्तकेच वाचत असू. त्यातहि बरीच वाईट पुस्तके वाचून, त्यातून चुकीचे धडे घेऊन वाईट मार्गाला लागलेल्या लोकांची संख्या कमी नाहीये.
अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा तरुण होतो, तेंव्हा जास्तीत जास्त शिकायला मिळावे म्हणून त्या काळी सर्वात प्रगत असलेल्या अमेरिकेत आलो. जमेल तेव्हढ्या जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकलो. अर्थार्जनास त्याची खूप मदत झाली नि मेंदूलाहि वाईट पुस्तकांपेक्षा तंत्रज्ञानाची पुस्तके वाचून समाधान झाले.
पण साधारण ४५ - ५० वर्षे झाल्यानंतर मलाहि नवीन गोष्टींची आवड नाहीशी झाली, गरजहि वाटेनाशी झाली, आहे तेव्हढ्या 'ज्ञाना'वर उत्तम चालले होते. साठाव्या वर्षानंतर तर मोठ्या प्रमाणावर फक्त आध्यात्मिक पुस्तके वाचू लागलो. पण ते कळेना. केवळ जुन्या आठवणी काढत बसलो तर कधी कधी डिप्रेशनच येते, काय काय चुका केल्या ते लक्षात येते, वगैरे. म्हणून मन नेहेमी वर्तमानात गुंतवावे. म्हणून मग आता शांतपणे रहस्यकथा, विनोदी कथा, मायबोली असे वाचत बसतो.

मला पुढल्या पिढीची मुळीच काळजी वाटत नाही - अहो ते जितके जास्त ज्ञान मिळवतील तितके कमीच. त्यातून त्यांना नक्कीच जग सुधारावे अशी तर प्रेरणा मिळेलच पण मुख्य म्हणजे ते कसे सुधारावे हेहि कळेल नि ते तसे करतील, पण त्यांना सतत नवीन गोष्टीं आत्मसात करून त्यातून शिकायला पाहिजे.

नाहीतर नुसतेच मायबोलीवर येऊन वाट्टेल त्या चर्चेत नुसते फुसकुल्या सोडणे, एकमेकांची उणि दुणी काढणे, इतर लोक वाईट म्हणून नुसते रडत बसायचे, पण काय करायचे ते माहितहि नाही म्हणून नुसतेच आपआपसातच भांडत बसायचे! असे करावे लागेल.

मला पुढल्या पिढीची मुळीच काळजी वाटत नाही - अहो ते जितके जास्त ज्ञान मिळवतील तितके कमीच. त्यातून त्यांना नक्कीच जग सुधारावे अशी तर प्रेरणा मिळेलच पण मुख्य म्हणजे ते कसे सुधारावे हेहि कळेल नि ते तसे करतील, पण त्यांना सतत नवीन गोष्टीं आत्मसात करून त्यातून शिकायला पाहिजे.

अगदी बरोबर.
या लेखाच्या अनुशंगाने काही चांगला विचार मिळाला तर हा.

इतका पसारा केलाच आहे मी नाहीतरी लेख कळला नसूनही मत देऊन.. त्यात अजून थोडी भर.
------
एक तर मी मायबोलीवर सगळ्या लिखाणाला प्रतिक्रीया देत नाही. त्यात इतक्या मोठ्या प्रतिक्रीयाही देत नाही. पण बस्के यांच्या लेखावर मी ती दिली. खरं तर माझ्या विचारप्रक्रीयेचं मी कोणाला समर्थन देऊ इच्छित नव्हते म्हणून तिथे 'रारला लेख कळला नाही' या वैयक्तीक टीकेवरही मी माझे मत व्यक्त केले नाही.
पण त्या लेखाचं रारचं इंटरप्रिटेशन काय, आणि तिला कसं लेख कळला नाहीये - यावर आता तिथेही नाही तर इथेही चर्चा होत आहे, त्यामुळे आता मला उत्तर देणं आवश्यक वाटतं.
नुसत्या भावनेच्या भरात समोरच्या लिखाणात नसेल त्या मुद्द्यावर चर्चा करण्याची परवानगी मला माझा मेंदू देत नाही.
भले त्या लिखाणातले सगळे मुद्दे मी माझ्या प्रतिक्रीयेत मांडीन असं नाही. पण मूळ लिखाण वाचल्याशिवाय आणि त्यावर विचार केल्याशिवाय मी सहसा मत देत नाही.
त्यामुळे 'मला लेखच कळला नाही' हे विधान हे माझ्या बुद्धीला आवाहन करणारे आहे...आणि त्यामुळेच कोणत्याही भावना वगैरे न ठेवता त्याला उत्तर दिले पाहिजे असं मला (माझ्या मेंदूला to be specific) वाटतं.
उदा. बस्केच्या लेखातला खालील भाग

का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल? इतकं कसं या गोष्टींमध्ये वाहवून जायचे. इतकं कसं टेक्नॉलॉजीचे अ‍ॅडीक्शन? कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या दिसतोय ना? अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर होण्याइतपत मन घुटमळतंय इथेतिथे! घुसमट. घुसमट नुसती! का कशाला कोण जाणे. हा जो उगीच ताण जाणावतो कधी कधी, तो काय आहे? कशाचा आहे..

किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत? भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला? गुगल पूर्वीचे दिवस काय होते ते आठवले तर our version of Arabian nights असावे इतकी सुरस वाटेल. एखादी गोष्ट माहीत नसेल तर चक्क आपण त्या तश्या अज्ञानात झोपायचो? झोप लागायची आणि? हो हो ! कितीतरी शांत लागायची.
मग आता काय अडलंय .. नाही कळलं अर्धाच घसा का दुखतोय. नाही कळले थायरॉईड, फॉर दॅट मॅटर जगातल्या प्रत्येक कंडीशनचे सिम्प्टम्स आणि मी नाही स्वत:ला त्यात बसवून पाहीले. नाही कळते पोटातल्या बाळाचे प्रत्येक दिवसाचे माईलस्टोन्स. नाही मी शोधली घरातील यच्चयावत प्लंबिंग/कुकींग/फायनान्स-बजेटींग आणि व्हॉट नॉट अडचणींवरची उत्तरं.. नाही कळ्लं ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं .. नाही आत्ताच्या आत्ता कळलं आत्ता झालेला भूकंप किती रिश्च्टर स्केलचा होता. काय बिघडतं? नाही.. खरंच माणसाने क्युरिअस असावे किंवा ज्ञान मिळवावे वगैरे सगळं ठिक आहे. पण खरंच किती गोष्टी आपण वाचतो/वाचायला जातो ज्याची खरंच गरज असते. की आपण डोक्यात अनावश्यक कचरा निर्माण करतोय. कारण ती प्रत्येक गोष्ट कधीनाकधीतरी डोकं वर काढून आपलं (आपल्या डोक्यातले) अस्तित्व दाखवून देतेच. ताण ! ताण येतो मला माझ्या मनातल्या विचारांचा. माहितीच्या स्फोटाचा ताण येतो. आई बाबा पिढीचे बरं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगातले बर्‍याच टेक्निकल गोष्टी टेक्निकली चॅलेंज्ड असल्यास स्किपच होतात. आपलं नाही ना तसं. मुद्दमहून शिक्षण घेतलंय या सगळ्याचं..कळतंच बरचसं. नाही कळलं तर कळून घेण्याची धडपड सुरू. कधी कधी वाटतं कम्प्लेसंट असावं ब्वॉ माणसाने. निदान आपल्याला आपल्या जिज्ञासेचा त्रास होतोय हे जाणवलं तरी कम्प्लेसंट व्हायला शिकावे. पैसा काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काय नि ज्ञान काय. किती हवंय, झेपतंय हे पाहूनच झोळीत घ्यावं.

हे टेक्नॉलॉजी, ओव्हरलोड ऑफ इनफॉरमेशन, वाह्वत जाणं, कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या ,माहितीच्या स्फोटाचा ताण येणं, मग आता काय अडलंय .. नाही कळली एखादी गोष्ट- हे मुद्दे बस्केच्या मूळ लेखात नसते तर मी माझ्या प्रतिक्रीयेत कधीही त्यांचा उल्लेख केला नसता. ह्या गोष्टी मूळ लेखात होत्या म्ह्णून आणि म्हणूनच मी त्यावर भाष्य केलं.

इतरांच्या प्रतिक्रीया आणि माझ्या, आणि माझ्यासारखं मत असणार्‍यांच्या प्रतिक्रीया सारख्या नसल्या म्हणजे लगेच 'कोणाला मूळ मुद्दाच कळला' नाही असं विधान करणं योग्य आहे का?
एकाच लेखाकडे पाहायचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात ना? इतकेही आपण लोकांच्या मताच्या, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या बुद्धीचा आदर करणार नाही का?

Pages