मागे मी वरणाचे प्रकार लिहिले होते आणि त्यावर प्रतिसादांचे एक छान संकलन तयार झाले,
तसेच भाकरीच्या प्रकारांचे व्हावे, या हेतूने लिहित आहे. ( मी आधीही हे प्रकार, इतर चर्चेच्या
ओघात लिहिले असतील, तरी परत संकलन करतोय. काही नवे प्रकारही लिहितोय.)
भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ
आहे. सांजसकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, कि हातासरशी
त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोनचार प्रकारही करुन टाकतात.
पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. मायबोलीवर
भरपूर चर्चा आहे, व्हीडिओ पण आहे, तरी ते काम सोपे नाहीच.
आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात.
या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे
उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी
पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी,
फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने मी इथे लिहितोय, ते
प्रकार सोपे आहेत.
भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो,
या युक्तीप्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत.
भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते.
८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा
असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.
१) ओतलेली भाकरी
हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक
वा इतर पिठे वापरुनही करता येते.
एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची
(सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला.
थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक
सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला.
(कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल, ते लिहितोच)
गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात
चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा
पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता
मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा.
कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा
पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी
तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून
घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी
हे तंत्र वापरता येईल.
२) गाजराची भाकरी
गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे
कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या.
एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका,
त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमीजास्त लागेल
पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा.
आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले
चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.
३) कांदा भाकरी
मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग
त्यात पिठ भिजवा.
आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी,
फ़क्कड बेत जमतो.
४) बटाटा भाकरी
बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही.
मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि
आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.)
त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा.
या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)
हि भाकरी कुरकुरीत होते.
५) वांग्याची भाकरी
भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी
मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून
त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात.) मिसळा.
हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात.
लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.
६) लसणाच्या पातीची भाकरी
मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी
या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच.
अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी
करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात.
यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती
कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि
एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका.
झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती
(त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून
घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.
७) फ़णसाची भाकरी
८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर
मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात
मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.
मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.
८) शेपूची भाकरी
वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी
बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते.
या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.
९) उसाच्या रसातली भाकरी (दशमी)
उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र
करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच
भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान
ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.
जाड फॉइल वापरुनही करता येते.
१०) गुळाची भाकरी
अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे.
त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या
जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात.
या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.
११ ) सोया चंक्सची भाकरी
एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,
मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा
बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा.
मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट
व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले कि त्यात कणीक घालून मळावे.
याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण
देता येतील.
१२) केळ्याची भाकरी
जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच
भाकरी करता येते.
तर मंडळी, चला तूमचेही प्रकार येऊ द्यात.
आर्यातै धन्स गं आता प्रयत्न
आर्यातै धन्स गं आता प्रयत्न करुन तुला कळवेण
इकडच्या इंडिअन स्टोअर्स मधे
इकडच्या इंडिअन स्टोअर्स मधे मिळणार्या ज्वारी, बाजरी ह्या पिठांच्या भाकर्या कधिच चांगल्या होत नव्हत्या.... तुकडे पडायचे. पण आता मी त्यात गरम पाणी आणि गव्हाचे पिठ घालते. त्यामुळे मस्त भाकर्या खायला मिळतात.
वेगळी पालेभाजी करण्यापेक्षा त्यातच पालेभाज्या चिरुन टाकुन त्याची भाकरी करण्याची आयडिया एकदम मस्त. फॉईल ची आयडियाही छान आहे.
याच सगळ्या प्रकारांमधे
याच सगळ्या प्रकारांमधे पोह्यांचं थालीपीठ सुद्धा गणलं जाऊ शकेल...
ही निंबुडा ची पाक्रु -
http://www.maayboli.com/node/33418
आणि माबोवर शोधतांना भुंगा यांनी सांगीतलेल - शिळ्या पोळ्यांचे थालीपीठ
http://www.maayboli.com/node/33651
आमच्या घरचा हिट प्रकार..
आमच्या घरचा हिट प्रकार.. भाताचे थालीपीठ
आदल्या दिवशीचा उरलेला भात, असली तर आमटी / गोड वरण (याने खुसखुशीत आणि कुरकुरीत पण येतो.. मस्ट नाही) , बारीक चिरलेला कांदा, थोडी हळद, मीठ, बारीक हिरव्या मिरच्याचे तुकडे, जाडसर ओवा, दही/ ताक आणि घरात मिळतील ती पीठ (ज्वारी, तांदूळ, थोडा बेसन पण चालेल) पाण्यात कालवायची. तव्यावर वर सांगितल्या प्रमाणे थोडा तेल लावून घायचं आणि थालीपीठ (भाकरी) थापायच. आमची आजी भोक पाडते आणि त्या भोकात आणि बाजूला तेल सोडते. याने हवा कोंडून राहत नाही आणि जास्त भाग मोकळा राहिल्याने कुरकुरीत भागाचे % वाढते.
आणि एक ... पीठ भिजवताना थोडं तेल टाकल आणि झाकण ठेवून शिजवल तर dry होत नाही.
यात भाता ऐवजी कोबी किसून/ बारीक चिरून कोबीची थालीपीठ पण छान होतात. गरम गरम तुपाबरोबर छान लागतात.
मस्त आणि उपयुक्त लेख! खूप छान
मस्त आणि उपयुक्त लेख! खूप छान प्रकार आहेत एकेक. असेच एकदा भाताचे, एकदा कोशिंबिरींचे पण संकलन करा ना!
पाण्यावरची भाकरी तांदुळाच्या
पाण्यावरची भाकरी
तांदुळाच्या पिठाची उकड करून त्याच्या भाकरी करतात. या भाकरी पाण्यावर थाप्तात, म्हणून करायला कठीण पण खायला तितक्याच माऊ लुसलुशीत. मला वाटत कोळी लोक अशा भाकर्या करतात.
अप्रतीम धागा ध्न्स दी दा
अप्रतीम धागा
ध्न्स दी दा
दिनेशदा, तुमची फ़ॉइलच्या
दिनेशदा, तुमची फ़ॉइलच्या तंत्रानी भाकरी करन्याची पध्दत एकदम मस्त आहे, काल ह्या पध्दतीनी भाकरी करुन पहिली. एकही भाकरी न तुटली नाही.
Hats off to your Idea.
व्वा! दिनेशदा कित्ती प्रकार
व्वा! दिनेशदा कित्ती प्रकार भाकरीचे!
बाजरीची भाकरीही पिठात गुळाचे पाणी घालून आणि तव्यावर टाकल्यावरही तेच गुळाचे पाणी फिरवून करतात. मात्र ही भाजताना काळजी घ्यावी लागते...(लवकर करपते)
नाहीतर कुणीकुणी तव्यावरच भाजतात. डायरेक्ट गॅसवर भाजण्याऐवजी.
अगदी गरम गरम खाल्ली तर खमंग , किंचित गुळचट अशी मस्त लागते. लोण्याबरोबर.
वा दिनेशदा ! मस्त आहेत
वा दिनेशदा ! मस्त आहेत भाकरीचे प्रकार !
मला पुर्वी तर पोळीपेक्षा भाकरी करायलाच जास्त सोपे वाटायचे ! आता पोळी-भाकरी दोन्ही प्रकार सोपे वाटतात.
फॉईलचे तंत्र सुरेख. मी
फॉईलचे तंत्र सुरेख. मी जेंव्हा आईकडून भाकरी करायला शिकलो तेंव्हा आईला भाकरी उचलून टाकायला सांगायचो. तेंव्हा फॉईल हा प्रकार माहीत नव्हता.
आता परदेशात घरी विस्तव नाही, वीजशेगडीच आहे त्यामुळे भाकरी नीट होत नाही. त्यावर काही उपाय? भाकरीचा रोट होतो पण भाकरी खाण्याचे समाधान नाही मिळत.
फ़ॉइल वापरून मी परवा आणि आज
फ़ॉइल वापरून मी परवा आणि आज भाकरी केली. परवा छान झाली म्ह्णून आज परत केली. धन्स दिनेशदा. आयडीया भारी आहे. आता हळूह्ळू अक्की रोटी ट्राय करेन.
तांदळाची भाकरी आवडते पण लाटल्यावर तुकडे पडायचे म्ह्णून बनवायच टाळत होते.
आरती, मलाही आधी तांदळाची
आरती, मलाही आधी तांदळाची भाकरी जमायची नाही. पण
http://www.maayboli.com/node/16360 ह्या रेसिपीने मस्त जमते. फक्त त्यात सांगितल्याप्रमाणे पाणी उकळताना १ चमचा तेल्/तूप घालायचं. लाटताना काहीही प्रॉब्लेम होत नाही.
सायो धन्स, अशा पदधतीने करुन
सायो धन्स, अशा पदधतीने करुन पाहीन.
केळ्याचं पीठ आणलं होतं, बहुधा
केळ्याचं पीठ आणलं होतं, बहुधा कच्च्या केळ्याचं असावं. त्यात मीठ, हि.मी., लसूण, कोथिंबीर ठेचून घालून थालीपीठ केलं होतं .......अप्रतिम लागलं.
ते पातळ प्लस्टीक वर ठेऊन लाटता येत होते पण ते लाटताना तुटणार नाही असे वाटले होते कारण केळ्याचा मुलभूत चिकटपणा असताना त्याचे तुकडे पडणार नाही असा अन्दाज होता. पण ते पीठही इतर भाकरी पिठांसारखेच भुरभुरीत होते.
रुचिरामधे के़ळ्याचे पिठ कसे
रुचिरामधे के़ळ्याचे पिठ कसे करायचे ते लिहिले आहे, पण तयार मिळते का ते माहीत नव्हते.
इथे आफ्रिकेत, केळे, रताळे, कसावा व इतर कंद यांची पिठे करुन ठेवायची पद्धत आहे. आयत्यावेळी त्यात फक्त गरम पाणी घातले कि ते शिजते.
मी, पिठात पीनट बटर घालून सुद्धा भाकर्या करतो. त्याही छान लागतात.
दिनेशदा, कुठल्या पिठात घालता
दिनेशदा, कुठल्या पिठात घालता पीनट बटर?
लाटलेल्या व ओतलेल्या भाकरी का
लाटलेल्या व ओतलेल्या भाकरी का म्हणायचे हा प्रश्ण पडलाय?
भाकरी हा पदार्थ थापून करतात किंवा बदवून करतात हेच पाहिलेय.
दिनेशदा बल्ल्वाचार्य, आपले
दिनेशदा बल्ल्वाचार्य,
आपले अभिनंदन. खाद्यपदार्थ या बाबतीतले नुसतेच ज्ञान नाही तर ते बनवण्याचे कौशल्य सुध्दा आपण आत्मसात करुन आहात. तुसी ग्रेट हो.... ( तोफा नको )
दिनेशदा आमच्याकडे रामनवमीला
दिनेशदा आमच्याकडे रामनवमीला ऊसाच्या रसातली पोळी करतात पण भाकरी पहिल्यांदाच ऐकली. आता करून बघेन. आमचं सोलापूरी धपाट राहिलं की राव ज्वारीच्या पीठात कांदा किसून(ऑप्शनल) लसून ठेचून, ओवा , हिंग, जिर्याची पूड, मीठ , लाल तिखट घालून पातळ भाकरी थापतात. त्या थापण्याचा(बडवण्याचा) आवाज तीन घर लांब जातो ते वेगळं पण ही धपाटी प्रवासात ७/८ दिवस आरामात टिकतात फक्त एकदम पातळ हवीत. त्याच्याबरोबर लसूण घातलेली सोलापूरी शेंगाचटणी आणि दही स्वर्गसुख
मी तांदळाच्या, मक्याच्या
मी तांदळाच्या, मक्याच्या किंवा कणकेतही पीनट बटर घालतो.
स्वप्ना, मी खाल्लेत ते धपाटे आणि सोलापुरी भाकर्याही. पण करताना कधी बघितली नाही !
झंपी, प्रश्नाचे उत्तर दिले तर चालेल ना ?
गव्हाशिवाय बाकी धान्याची पोळी लाटणे अशक्य आहे कारण त्यात ग्लुटेन नसते. पण ओतलेली भाकरी काय आणि तांदळाची लाटून केलेली भाकरी काय, हे पारंपारीकच प्रकार आहेत. आणि त्यांना भाकरीच म्हणतात. म्हणजे तात्पर्य काय, तर नावं मी ठेवलेली नाहीत
भन्नाट...मस्त...
भन्नाट...मस्त...
मस्त लेख! बंगलोरला मी काही
मस्त लेख!
बंगलोरला मी काही उत्तर कर्नाटक फूड्स ही दुकानं पाहिली आहेत, तिथे, तयार भाज्या, तसेच मसाले, पापड, लोणचे, चटण्या असे बरेच प्रकार मिळतात. तिथे ज्वारीच्या भाकर्या इतक्या पातळ मिळतात, पोळी पेक्षाही पातळ असतात.
कशा करत असतील एवढ्या पातळ भाकर्या याचे मला बरेच कुतुहल आहे.
गरम दुधामध्ये पीठ मळुन/भिजवुन
गरम दुधामध्ये पीठ मळुन/भिजवुन केलेल्या भाकरीला पण दशमी म्हणतात ना? आणखी काही घालतात का पीठामध्ये?
(उस रसाची पण करुन बघणार
पण रविवारी!! उसाचा रस दादर् ला चांगला मिळतो.)
मानव, आपल्याकडे सोलापूरला अशा
मानव, आपल्याकडे सोलापूरला अशा भाकर्या मिळतात. त्या बरेच दिवस टिकतातही.
उषा,
दशमीत थोडे मीठ घालतात, मिरची वगैरे पण घालता येते. गोडाची करायची असेल तर लोणी आणि साखर.
हेच पिठ, केळीच्या पानावर थापून पानासकट भाजले कि तो होतो पानगा.
त्याला पानगी म्हणतात
त्याला पानगी म्हणतात
धन्यवाद दिनेशदा.... काय !
धन्यवाद दिनेशदा....
काय ! ......लोणी आणि साखर.... व्वा!!! परवाच काढले आहे लोणी, कढवत ठेवण्याआधी नेहमी वाटीभर लोणी काढून ठेवते... केळीची पानेही आहेत...
रविवारी संकष्टी होती, लक्षात आले नाही...नंतर श्रावणी सोमवार, आज मंगळ्वार म्हणून उद्या संध्याकाळी उसाच्या रसाची दशमी करायची आहे...
अं....
sorry दिनेशदा.... तुम्ही तर लगेच उत्तर दिलेले, आणी मी आत्ता वाचतेय....२३ तारखेला !
@सयो : भाकरी ची रेसिपी चे
@सयो : भाकरी ची रेसिपी चे page उघडत नाहीये , रेसिपी share कराल का प्लीज
आमचया कडे बाज रीची भाकरी
आमचया कडे बाज रीची भाकरी चे पीठ गुळाच्या पाण्यात भीजऊन त्याचि भाकरी करतात छान लागते
मस्त धागा!
मस्त धागा!
हे प्रकार भाकरीचे कि थालपिठाचे? :गोंधळलेली बाहुली:
पण आताशी कुठे मला भाकरी जमायला लागलीये.. त्यामुळे हळुहळु का होईना वरचे प्रकार करुन बघेल..
Pages