भाकरीचे प्रकार

Submitted by दिनेश. on 30 August, 2012 - 00:26

मागे मी वरणाचे प्रकार लिहिले होते आणि त्यावर प्रतिसादांचे एक छान संकलन तयार झाले,
तसेच भाकरीच्या प्रकारांचे व्हावे, या हेतूने लिहित आहे. ( मी आधीही हे प्रकार, इतर चर्चेच्या
ओघात लिहिले असतील, तरी परत संकलन करतोय. काही नवे प्रकारही लिहितोय.)

भाकरी करणे हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यातील अनेक स्त्रियांच्या हातचा मळ
आहे. सांजसकाळ भाकऱ्या थापून त्यांच्या हाताला इतकी सवय झालेली असते, कि हातासरशी
त्या भाकऱ्यांबरोबर, इतर दोनचार प्रकारही करुन टाकतात.

पण तरी ते तंत्र सोपे नाही. नवीन शिकणाऱ्या व्यक्तीस, ते जमणे जरा कठिणच आहे. मायबोलीवर
भरपूर चर्चा आहे, व्हीडिओ पण आहे, तरी ते काम सोपे नाहीच.

आपल्याकडे भाकरीसाठी ज्वारी, बाजरी, मका, पटणी, नाचणी, तांदूळ अशी धान्ये वापरली जातात.
या सर्व धान्यात ग्लुटेन अगदीच कमी असल्याने, या पिठाला चिकटपणा असा नसतोच, त्यामूळे
उकड काढली तरच या भाकऱ्या लाटता येतात, नाहीतर त्या थापूनच कराव्या लागतात. त्यापुर्वी
पिठ चांगले मळून घ्यावे लागते, तसेच तव्यावरच्या भाकरीवर नेमक्या वेळी आणि नेमकेच पाणी,
फिरवावे लागते. त्यात अजिबात चूक होऊन चालत नाही. त्यामानाने मी इथे लिहितोय, ते
प्रकार सोपे आहेत.

भाकरीच्या पिठात थोडे उडीद पिठ किंवा कणीक मिसळून, थोडाफ़ार चिकटपणा आणता येतो,
या युक्तीप्रमाणेच आणखी काही उपाय योजले जातात, यातले काही पारंपारीक आहेत.

भाकरी करताना नवी व्यक्ती, पुर्ण आकाराची भाकरी करायला जाते. आणि तिथे अनेकदा फसते.
८/९ इंच व्यासाची भाकरी करण्यापेचा ३/४ इंचाची भाकरी करणे, जास्त सोपे जाते. तवा मोठा
असेल, अशा २/३ भाकऱ्या एकाचवेळी भाजता येतात.

१) ओतलेली भाकरी

हा करायला अगदी सोपा प्रकार आहे. गोव्यात यासाठी तांदळाचे पिठ वापरतात. पण कणीक
वा इतर पिठे वापरुनही करता येते.
एक कांदा व एक भोपळी मिरची अगदी बारीक चिरून घ्या. त्यात मीठ घाला. भोपळी मिरची
(सिमला मिरची) जरा तिखट असतेच पण हवी तर यात एखादी हिरवी मिरची चिरून घाला.
थोड्या वेळाने हे चुरुन त्यात तांदळाचे (किंवा इतर ) पिठ घालून सरसरीत भिजवा. कणीक
सोडून इतर पिठे वापरायची असतील तर नावाप्रमाणेच ओतता येईल, इतपत पाणी घाला.
(कणकेसाठी थोडे वेगळे तंत्र वापरावे लागेल, ते लिहितोच)
गावठी तांदळाचे किंवा मोदकासाठी खास मिळते ते पिठ वापरले तर जास्त चांगले. आता पिठात
चमचाभर तेल टाकून ढवळा. मग बिडाचा किंवा नॉन स्टीक तवा तापत ठेवा. त्यावर तेलाचा
पुसटसा थर द्या आणि मग हे पिठ ओता. साधारण अर्धा सेमी जाड असू द्या. झाकण न ठेवता
मंद आचेवर दोन्ही बाजूने गुलाबी भाजा.
कणीक वापरल्यास, थालिपिठापेक्षा थोडे सैल भिजवा. फॉइलचा एक तूकडा घ्या. त्याला तेलाचा
पुसटसा हात लावून, त्यावर पाण्याच्या हाताने हे मिश्रण थापा. मग फ़ॉइलसकट पण भाकरी
तव्यावर आणि फ़ॉइल वर येईल, अशी टाका. थोड्याच वेळात फ़ॉइल सुटी होईल, ती काढून
घ्या आणि भाकरी भाजा. याच फ़ॉइलवर दुसरी भाकरी थापता येईल. पुढच्या सर्वच प्रकारासाठी
हे तंत्र वापरता येईल.

२) गाजराची भाकरी

गाजराचे तूकडे करुन कूकरमधे उकडून मऊ करुन घ्या. त्यातले पाणी बाजूला करुन, गाजरे
कुस्करून घ्या. कुसकरून गुठळ्या मोडल्या नाहीत तर एकदा ब्लेंड करुन घ्या.
एक वाटी गर झाला तर त्यात लाल मिरच्यांचे बारीक तुकडे (फ़्लेक्स) अर्धा टिस्पून टाका,
त्यात मीठ टाका आणि साधारण वाटीभर कुठलेही पिठ मिसळा. पिठ थोडे कमीजास्त लागेल
पण पिठ सैलसरच असू द्या. लागल्यास बाजूला ठेवलेले पाणी वापरा.

आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. या भाकरीला अप्रतिम रंग येतो, त्यातले
चिली फ़्लेक्सही सुंदर दिसतात.

३) कांदा भाकरी

मोठा कांदा किसून घ्या. त्यात थोडे मीठ मिसळा. थोडी जिरेपूड टाका. आणि मग
त्यात पिठ भिजवा.

आता वरच्या फ़ॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. कवडी दही, मिरची आणि हि भाकरी,
फ़क्कड बेत जमतो.

४) बटाटा भाकरी

बटाटा बारीक किसणीने किसून घ्या. त्यात मीठ मिसळा, म्हणजे काळा पडणार नाही.
मग एका बटाट्याला, एक टेबलस्पून घट्ट पण आंबट दही, एक टिस्पून जिरे आणि
आवडीप्रमाणे हिरवी वा लाल मिरची टाका. (मिरचीचे लोणचे वापरल्यास जास्त चांगले.)
त्यात तांदळाचे पिठ मिसळून, सैलसर भिजवा.

या पिठाची भाकरी तव्यावर डावेने पिठ पसरुन करता येते. (तितपत पिठ पातळ ठेवा)
हि भाकरी कुरकुरीत होते.

५) वांग्याची भाकरी

भरताचे वांगे, भरतासाठी भाजतो तसेच भाजून घ्या. मग ते सोलून त्या गरात हिरवी
मिरची, एखादा कांदा घालून, मिक्सरमधून एकजीव करुन घ्या. मीठ व तेल घालून
त्यात पिठ ( ज्वारीच्या पिठाने चांगली चव येते, पण बाकीची पिठे चालतात.) मिसळा.

हे पिठ मात्र चपातीच्या पिठाप्रमाणे घट्टसर हवे. याच्या लाटूनही भाकऱ्या करता येतात.
लसणाच्या चटणीसोबत सुंदर लागतात.

६) लसणाच्या पातीची भाकरी

मुंबईत थंडीत पातीचा लसूण मिळतो, पण तो घरी करणे अगदी सोपे आहे. नाहीतरी
या दिवसात घरातल्या साठवणीच्या लसणाला कोंब येतातच.
अशा पाकळ्या सुट्या करुन मातीत खोचल्या, कि ते कोंब वाढू लागतात. या साठी अगदी
करवंटीचा उपयोग केला, तरी चालतो. १०/१५ दिवसात वीतभर पाती वाढतात.

यासाठी तांदळाची उकड काढावी लागते. एक वाटी पिठ मोजून तयार ठेवावे. वरच्या पाती
कात्रीने बारीक कापून घ्या. एक वाटी पाणी उकळत ठेवा, त्यात मीठ, थोडा हिंग आणि
एक टिस्पून तेल टाका. पाण्याला उकळी आली कि त्यात तांदळाचे पिठ पसरुन टाका.
झाकण ठेवून एक वाफ़ येऊ द्या. मग गॅस बंद करा. दोन मिनिटाने त्यात लसणाच्या पाती
(त्या कमी असल्या तर, थोडा लसूण बारीक चिरुन) टाका. पाण्याचा हात लावून मळून
घ्या. मग फॉइलच्या तंत्राने भाकऱ्या करा. साजूक तूपासोबत छान लागतात.

७) फ़णसाची भाकरी

८/१० फ़णसाच्या गऱ्यातील बिया काढून घ्या. रसाळ (बरका) फ़णस असेल तर गरे मिक्सर
मधून काढा, कापा असेल तर गरे वाफ़वून घ्या आणि मग मिक्सरमधून काढा. मग त्यात
मिठाचा कण आणि तांदळाचे पिठ मिसळा. यात थोडे नारळाचे दूध घातले तर छान.
मग वरच्या तंत्रानेच भाकऱ्या करा.

८) शेपूची भाकरी

वरच्या लसणाच्या पातीच्या तंत्राने शेपूच्या भाजीच्या भाकऱ्या चांगल्या होतात. भाजी अगदी
बारीक कापायची नाही, म्हणजे भाकरीवर छान नक्षी दिसते.
या भाकरीवर कच्चे तेल घालून खाल्ले तर चांगले लागते.

९) उसाच्या रसातली भाकरी (दशमी)

उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र
करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच
भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात. खालीवर केळीचे पान
ठेवून तव्यावर ठेवायची. थोड्या वेळाने परतायची. दशमी तयार झाली, कि पान सुटे होते.
जाड फॉइल वापरुनही करता येते.

१०) गुळाची भाकरी

अर्धी वाटी गूळ, पाऊण वाटी पाण्यात कुस्करून विरघळवून घ्यावा. मग ते पाणी गाळून घ्यावे.
त्यात थोडे तेल टाकून, नाचणीचे किंवा बाजरीचे पिठ भिजवावे. या भाकऱ्या थापायला सोप्या
जातात, पण भाजताना काळजी घ्यावी लागते, कारण त्या लवकर करपतात.

या भाकरीसोबत साजूक तूप चांगले लागते.

११ ) सोया चंक्सची भाकरी

एक वाटी सोया चंक्स किंवा मीन्स कोमट पाण्यात अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घालावेत,
मग ते पिळून घ्यावेत. त्याला १ टिस्पून आले लसूण पेस्ट लावावी. थोड्या तेलावर एक कांदा
बारीक चिरून परतून घ्यावा. त्यावर १ टिस्पून टोमॅटो प्यूरे किंवा २ टिस्पून केचप टाकावा.
मग त्यावर मिन्स किंवा चंक्स बारीक करून घालावेत व वाफ़ येऊ द्यावी. आवडीप्रमाणे, तिखट
व गरम मसाला घालावा. मग ते मिश्रण थंड झाले कि त्यात कणीक घालून मळावे.

याच्या छोट्या छोट्या भाकऱ्या कराव्यात. डब्यात न्यायला या सोयीच्या आहेत. मुलांना पण
देता येतील.

१२) केळ्याची भाकरी

जास्त पिकलेले केळे किंवा उकडलेले राजेळी केळे यांचा गर वापरुन, फ़णसाच्या भाकरीप्रमाणेच
भाकरी करता येते.

तर मंडळी, चला तूमचेही प्रकार येऊ द्यात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, कालच उकडीची भाकरी आणि वांग्याच भरीत केल होत. भाकरी लाटली आणि उचलताना त्याचे तीन तुकडे पडले. Sad कशातरी भाजून काढल्या.
काल दोन भाकर्‍या लाटताना अक्षरशः रडू आल होत.
पुन्हा भाकरी प्रकाराकडे जायच नाही अस ठरवल आणि आज तुमचा लेख आला. Happy
भाकरी थापन तर मला कधी जमेल अस वाटत नाही. आपला ईडली डोसा बरा अस वाटल.
ज्यांना हाताने थापून पुरी सारखी भाकरी फुगवता येते ते खरच महान आहेत. ____/\_____

व्वा दिनेशदा, कित्ती प्रकारच्या भाकर्‍या दिल्या आहेत तुम्ही.

कळणाची भाकरी:

१/२ कि ज्वारी
१/४ कि अख्खे उडीद दळून आणाय्चे आणि मीठ घालून नेहमीसारखी भाकरी करावी. या भाकरीला आधण घालावे लागत नाही.

लाल भोपळा किंवा वांग्याच्या भाजीची भाकरी: ही भाकरी जळगावचे लोकं हमखास करतात. त्यात जर पंगतीतली वांग्याची भाजी असेल तर मस्तच. जर गावात लग्न असेल आणि दुपारची पंगत असेल तर ही भाजी घरी घेउन येतात आणि रात्री त्याच्या भाकरी जेवणात अस्तात. Happy

लाल भोपळ किंवा वांग्याची भाजी + मीठ + लागल्यास तिखट आणि कळणाचे पीठ किंवा ज्वारी+ गहू मिक्स
सगळं मिक्स करून भाकरी बनवावी आणि तेल घेउन दाण्याच्या चटणीसोबत खावी.

बापरे! किती हे वेगवेगळे प्रकार. एका वेळि एक वाचुनच करावा लागनार बहुतेक Happy
मी बाजरी च्या पिठात जरा जास्तच कणिक टाकुन, लाटुन भाकरी करण्याचा प्रयत्न केला आहे. थोडे मीठ आणि तुप गरम करुन टाकले पिठ भिजवताना तर खुपच छान चव लागते.

दिनेशदा,

जबरदस्तच एकसे एक प्रकार !!

आमच्या सारख्याना, करायचे कष्ट न पडता खायला मिळाले तर .....,

मस्त मस्त!! भाकरीचे प्रकार वाचतांना खमंग चुलीवरच्या भाकरीचा वास आला.

कळण्याची भाकरी एकदम तोंपासु.:)

भाकरीचे पीठ मळण्यावर/ रगडण्यावरच सगळं अवलंबुन असतं. जितकं जास्त रगडलं तेवढं एकजीव होउन भाकरीचे तुकडे पडत नाहीत.
मयुरे...ज्वारीची पीठ जुने झाले की वाक नसल्याने तुकडे पडतात, थोडं कोमट पाणी वापरुन मळुन बघ. पीठाला थोडा वाक येण्यासाठी, आम्ही कधी कधी मग गव्हाचे पीठ मिक्स करुन वापरतो.

वा जबरदस्तच आहेत........ Happy

आमची सासरची नगरी लोक बाजरीची भाकरी खाने पसंत करतात म्हणुन शिकले पण आता अकरा वर्षात मला छान भाकरी थापुन करता येते आणि फुगतेही........ Happy

यातले बरेच प्रकार केले नाहीयेत आता करते....... Happy

आमच्या कोल्हापूरला सकाळी डब्याला चपाती रात्री ज्वारीची गरम गरम भाकरी असायची . त्यामुळे पहि ल्यांदा भाकरीच शिकलो. आता तर मुद्दाम वाफ फोडावी लागते येवढी फुगते.

मस्त टम्म फुगलेल्या ज्वारीच्या भाकरीचे पदर वेगळे करुन आत मध्ये मोहरी + लसणाची फोड्णी पसरावायची आणि मीठ घालायचे..... आहाहाहा....
आजारपणात जेव्हा तोंडाला चव नसते तेव्हा हमखास आम्ही करतो.

ही तर थालिपिठं ना? >> +१
दिनेशदा, ह्यातील काही प्रकार मी थालिपीठ म्हणून करते. उदा. - गाजर घालून वगैरे.
भाकरी करायला जमत नाही. पण तुम्ही नवशिक्यांसाठी सांगितलेली आयडिया (लहान आकाराची भाकरी) वापरून करून बघीन.

आमच्या कोल्हापूरला सकाळी डब्याला चपाती रात्री ज्वारीची गरम गरम भाकरी असायची >>> +१ ... मी पण आधि भाकरी शिकले ... कोणतीहि पालेभाजी आणी भाकरी .... मस्त मस्त!!

महाराष्ट्रात थालिपिठ म्हणजे, भाजणीचे पिठ वापरुन केलेला प्रकार मानतात. असो, नावात काय आहे ?

साधारण पहिली भाकरी बिघडली कि लगेच वरचे उपाय ( कणीक, आकार, फॉइल ) योजायचे. सहसा बिघडत नाहीत.
.

केरळमधे पण भाकरी करायची प्रथा आहे. त्याला ते पथरी (पतली ?!) म्हणतात. गुजराथमधे खास करुन बाजरीची
भाकरी करतात. सोबत गूळ आणि तूप, घेतात.

मस्कत (ओमान) मधे पण भाकर्‍या करतात. त्यासाठी मैदा भिजवून, थोडा आंबवून तव्यावरच थेट हाताने पसरतात. अगदी पातळ अशा या भाकर्‍या, ३ फूट व्यासाच्या असतात.

दिनेशदा ह्या प्रकारात फक्त कणिक मिसळून जर लाटले तर परोठे होतात ना. सगळी पिठं मिसळून जेंव्हा हे तव्यावर थापतो तेंव्हा त्याला थालपीठच म्हणतो. मला तशी भाकरी छन जमते. पण आंम्ही फक्त ज्वारी, बाजरी, कधीतरी मक्याची करतो. तुम्ही भरपुर प्रकार सांगितले आहेत. आता ते करून पहाते.

फॉइल आयडिया मस्त आहे. करून बघेन. ज्वारी पीठ आहे घरी. दुसरे म्हणजे भाकरीच्या पिठात पालेभाजी मिसळून तश्या एक नाहीतर दोन भाकर्‍या करून ठेवायच्या आणि जेवायला घ्यायच्या, वेट लॉस डाएट साठी फार उपयुक्त ठरते. बरोबर सलाद आणि ताक. पोट खूप वेळ भरून राहते. भुकेची भावना होत नाही.

ओतलेली भाकरी तेल न सोडता होते का?
ज्वारी,बाजरी (दोन्हीच्या गोड), मका, तांदुळ केल्यात पण ओतून नाही. तस वरणाभाजीची भाकरी करते मी. पण मळून.

अनघा, नॉन स्टीक पॅनवर होते, पण पिठात थोडे तेल घालावे लागते.

अश्विनी, हे माझे वेळ आणि भांडी वाचवायचे शॉर्टकट आहेत.

सुलेखा, पराठे खुपदा जास्त तेल वापरुन करतात. वरच्या बहुतेक प्रकारात, तेल अगदी कमी लागते. शिवाय कणकेच्या भाकर्‍या करायची पद्धत महाराष्ट्रात होती. महाराष्ट्रात तशी भाकरीचीच परंपरा जास्त होती. गव्हाचे पिक नंतर आले. त्यामूळे नव्याने जेव्हा हे धान्य उपलब्ध झाले त्यावेळी पहिल्यांदा थापूनच भाकर्‍या केल्या, गेल्या
असतील. पुरणपोळी वगैरे नंतर.

बर. ओतून करून पाहिन. पॅन फिरवण्याचे कसब पाहिजे पण किंवा धिरड्यासारखे पळीने घालता यइईल. Happy

Pages