दहीवडे फॅन क्लब

Submitted by मंजूडी on 1 August, 2012 - 01:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. उडदाची डाळ - १ वाटी
२. अर्धा लिटर दूध
३. तळणीसाठी तेल
३. मीठ, साखर चवीनुसार
४. दहीवड्यावर वरून घेण्यासाठी मीरपूड, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर इत्यादी आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. उडदाची डाळ स्वच्छ धुवून साधारण सात ते आठ तास भरपूर पाण्यात भिजत घालावी.

२. दूध तापवून विरजण लावून ठेवावे.

३. सात - आठ तासांनंतर उडदाची डाळ भिजली की पाणी उपसून टाकावे. मिक्सरमध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी. डाळ वाटताना पाणी आवश्यक तेवढेच घालावे. आवडत असल्यास डाळीमध्ये जिरे/ हिरवी मिरची वाटताना घालू शकता. वाटलेले पीठ मेदूवड्यांपेक्षा किंचीतच सैल हवे. पीठ चमच्यात घेऊन वरून सोडले असता एकसंध गोळा पडायला हवा. पीठाची कन्सिस्टन्सी भज्यांप्रमाणे, केकप्रमाणे, इडलीप्रमाणे असायला नको. डोश्याप्रमाणे तर अजिबातच नको. दहीवडे/ मेदूवडे करण्यामधे पीठ वाटणे एवढे एकच कौशल्याचे काम आहे. त्यात तुमचा मिक्सर पॉवरबाज असेल तर काम अगदीच सोपं होऊन जातं.

४. वाटलेल्या पीठात चवीप्रमाणे मीठ घालून साधारण अर्ध्या-पाऊण तासासाठी झाकून ठेवून द्या.

५. विरजणाच्या दह्यात चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मीठ, साखर आणि भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून दही व्यवस्थित गुळगुळीत होईपर्यंत घुसळून घ्या. किंचीत आल्याचा रस घातल्यास दह्याला मस्त चव येते. दह्यात बहुतेकवेळा पाणी घालावे लागत नाही. विरजणाचे अंगचे पाणी आणि मीठ साखरेमुळे सुटलेल्या पाण्यामुळे दही सैल होईल तेवढेच पुरेसे होते. पण तयार झालेले दही खूपच घट्ट वाटले तर पाणी मिसळून दही फ्रिजमधे थंडगार व्हायला ठेवून द्या.

६. अर्ध्या-पाऊण तासानंतर उडदाच्या डाळीचे वाटलेले पीठ चमच्याने व्यवस्थित आणि भरपूर फेटून घ्या. तळणीसाठी तेल तापवून आपल्याला आवडतील तेवढ्या आकाराचे वडे किंचीत चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढून घ्या.

७. तळलेले सगळे वडे एका पसरट भांड्यात किंवा परातीत घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात किंचीत मीठ आणि हिंग मिसळून घ्या. आणि हे पाणी वड्यांवर घाला. साधारण दहा मिनिटे वड्यांमधे पाणी राहू द्या.

८. मग एकेक वडा हातात घेऊन हलक्या हलक्या हाताने पाणी पिळून घ्या. वडा मोडता कामा नये. हे वडे घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमधे ठेवले तर (मुंबईच्या हवेत) दोन दिवस चांगले राहतात. पण नंतर मात्र खराब (म्हणजे वड्यांना बुळबुळीतपणा येतो) व्हायला सुरूवात होते.

९. दहीवडे देताना प्लेटमधे वडे घेऊन त्यावर तयार केलेले थंडगार दही घालून आवडीप्रमाणे मिरपूड, लाल तिखट, कोथिंबीर भुरभुरवून द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी उडदाच्या डाळीच्या पीठाचे एक टेबलस्पून मापाचे साधारण १२ ते १५ वडे होतात.
अधिक टिपा: 

१. पूर्ण उडदाची डाळ घ्यायची नसेल तर मुगाची आणि उडदाची डाळ निम्मी निम्मी घेता येते. मुगाच्या डाळीमुळे वड्यांना छान रंगही येतो.

२. एक वाटी डाळीसाठी अर्धा लिटर दुधाचे विरजलेले दही जास्त होते. अर्ध्या लिटरमधले साधारण कपभर (चहाचा कप) दूध वगळले तरी चालेल.

३. दहीवडे करायला घेण्याआधी हा अख्खा बाफ पूर्णपणे वाचून काढा. प्रतिसादांत जास्त आणि मस्त टीपा आहेत. Happy

माहितीचा स्रोत: 
आजी-आईपासून वर्षानुवर्षे चालत आलेली कृती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ, मस्त आयडीया आहे. दहीवडे प्रचंड आवडतात, पण तळण असल्याने फार कमी केले जायचे. या पद्धतीनं करून बघेन आता.

मृण्मयी, मस्त पाकृ. करुन बघणार.

ही पाकृ इथे चौथ्या पानावर आहे. शोधायला वेळ लागेल. "तळणाशिवाय दहीवडे" असा काहीतरी धागा काढणार का?

धन्यवाद! खरंच सही आयडिया आहे. क्रेडिट तरला दलाल!

शुगोल, जे टाळत होते तेच करायला सांगितलंत. Happy जरा वेळात वेगळा धागा काढते.

वा भारी आहे यार!
मी ते दीप चे तयार दहीवड्याचे पाकिट आणले होते.त्यावर दहीवड्याचे सुंदर चित्र छापलेले आहे.
अतिशय उत्सुकतेने एकदिवस रात्री उघडले.
कल्पनेने तोंडाला पाणी सुटले होते. फ्रिजर मधून काढून उघडले आणि...

इतका मोठा भ्रमनिरास झाला, कारण आत फक्त तळलेले वडे होते. चिंचेची चटणी, दही वगैरे काहीच नाही!
उशीर झाला असल्याने दुकाने ही बंद होती.

मग मावे मध्ये गरम करून
ते नुसतेच वडेच खाऊन टाकले रागारागात!
Proud

इथे स्वातीचा फोटो पाहून आठवलं की गेल्या महिन्यात इथे टाकायचा म्हणून खास काढून ठेवलेला फोटो अपलोड केलाच नाही तेव्हा आता करते. थोडे शिळे झालेत वडे पण हे आप्पेपात्रातले आहेत.
Dahiwada.jpg

Pages