दहीवडे फॅन क्लब

Submitted by मंजूडी on 1 August, 2012 - 01:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. उडदाची डाळ - १ वाटी
२. अर्धा लिटर दूध
३. तळणीसाठी तेल
३. मीठ, साखर चवीनुसार
४. दहीवड्यावर वरून घेण्यासाठी मीरपूड, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर इत्यादी आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. उडदाची डाळ स्वच्छ धुवून साधारण सात ते आठ तास भरपूर पाण्यात भिजत घालावी.

२. दूध तापवून विरजण लावून ठेवावे.

३. सात - आठ तासांनंतर उडदाची डाळ भिजली की पाणी उपसून टाकावे. मिक्सरमध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी. डाळ वाटताना पाणी आवश्यक तेवढेच घालावे. आवडत असल्यास डाळीमध्ये जिरे/ हिरवी मिरची वाटताना घालू शकता. वाटलेले पीठ मेदूवड्यांपेक्षा किंचीतच सैल हवे. पीठ चमच्यात घेऊन वरून सोडले असता एकसंध गोळा पडायला हवा. पीठाची कन्सिस्टन्सी भज्यांप्रमाणे, केकप्रमाणे, इडलीप्रमाणे असायला नको. डोश्याप्रमाणे तर अजिबातच नको. दहीवडे/ मेदूवडे करण्यामधे पीठ वाटणे एवढे एकच कौशल्याचे काम आहे. त्यात तुमचा मिक्सर पॉवरबाज असेल तर काम अगदीच सोपं होऊन जातं.

४. वाटलेल्या पीठात चवीप्रमाणे मीठ घालून साधारण अर्ध्या-पाऊण तासासाठी झाकून ठेवून द्या.

५. विरजणाच्या दह्यात चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मीठ, साखर आणि भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून दही व्यवस्थित गुळगुळीत होईपर्यंत घुसळून घ्या. किंचीत आल्याचा रस घातल्यास दह्याला मस्त चव येते. दह्यात बहुतेकवेळा पाणी घालावे लागत नाही. विरजणाचे अंगचे पाणी आणि मीठ साखरेमुळे सुटलेल्या पाण्यामुळे दही सैल होईल तेवढेच पुरेसे होते. पण तयार झालेले दही खूपच घट्ट वाटले तर पाणी मिसळून दही फ्रिजमधे थंडगार व्हायला ठेवून द्या.

६. अर्ध्या-पाऊण तासानंतर उडदाच्या डाळीचे वाटलेले पीठ चमच्याने व्यवस्थित आणि भरपूर फेटून घ्या. तळणीसाठी तेल तापवून आपल्याला आवडतील तेवढ्या आकाराचे वडे किंचीत चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढून घ्या.

७. तळलेले सगळे वडे एका पसरट भांड्यात किंवा परातीत घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात किंचीत मीठ आणि हिंग मिसळून घ्या. आणि हे पाणी वड्यांवर घाला. साधारण दहा मिनिटे वड्यांमधे पाणी राहू द्या.

८. मग एकेक वडा हातात घेऊन हलक्या हलक्या हाताने पाणी पिळून घ्या. वडा मोडता कामा नये. हे वडे घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमधे ठेवले तर (मुंबईच्या हवेत) दोन दिवस चांगले राहतात. पण नंतर मात्र खराब (म्हणजे वड्यांना बुळबुळीतपणा येतो) व्हायला सुरूवात होते.

९. दहीवडे देताना प्लेटमधे वडे घेऊन त्यावर तयार केलेले थंडगार दही घालून आवडीप्रमाणे मिरपूड, लाल तिखट, कोथिंबीर भुरभुरवून द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी उडदाच्या डाळीच्या पीठाचे एक टेबलस्पून मापाचे साधारण १२ ते १५ वडे होतात.
अधिक टिपा: 

१. पूर्ण उडदाची डाळ घ्यायची नसेल तर मुगाची आणि उडदाची डाळ निम्मी निम्मी घेता येते. मुगाच्या डाळीमुळे वड्यांना छान रंगही येतो.

२. एक वाटी डाळीसाठी अर्धा लिटर दुधाचे विरजलेले दही जास्त होते. अर्ध्या लिटरमधले साधारण कपभर (चहाचा कप) दूध वगळले तरी चालेल.

३. दहीवडे करायला घेण्याआधी हा अख्खा बाफ पूर्णपणे वाचून काढा. प्रतिसादांत जास्त आणि मस्त टीपा आहेत. Happy

माहितीचा स्रोत: 
आजी-आईपासून वर्षानुवर्षे चालत आलेली कृती.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं दही वड्यांचं व्हॅरिएशन :
पीठात भिजवलेले काजुचे तुकडे, मिरपुड, हिरव्या मिर्चीचे तुकडे,किसलेलं आलं, कढीपत्ता बारीक चिरून आणि किंचित हिंग मिक्स करायचं :).
गार्निश करताना जिरेपुड-मिरपुड-लाल तिखट-कोथिंबीर आणि डाळींबाचे दाणे मस्ट !
dahiwada1.jpg

दीपांजली, डाळिंबाचे दाणे पाहून तोंपासु.
मंजूडी, फोटु ?

(मला स्वतःला दहीवड्याचे वडे आणि दही वेगवेगळं खायला आवडतं. एकत्र करून खाल्लं की मला ताप येतो असा माझाच ठाम समज आहे :अओ:)

रुणुझुणु मी ही आहे तुझ्या बरोबर..मी ही २ही वेगळे खाते नाहितर मला पोटात कसेतरी व्हायला लागते..असा माझा समज आहे Happy

रूणु, मृनिश मी पण तुमच्याच बोटीत. मला का कोणास ठाउक ते वडे मस्त कुरकुरीत असतानाच खायला आवडतात. पाण्यातुन पिळलेले वडे बिचारे वाटतात. दही पण नुसत वेगळ खायला आवडत.
पण तरीही मंजू ही पाकृ करून बघेन कारण साबा आणि आई दोघी फॅन आहेत द.वड्याच्या.

लई भारी.
माझी आई गोड दही आणि जिरेपूड्वालं दही वेगवेगळं बनवायची. आणि वरून लाल मिरचीपूड आणि कोथिंबीर पेरायची वाढताना. Happy

वडे तळणे नको असेल तर बेकरीत मिळणारे बटर्स आणून तेही वापरता येतात वड्यांऐवजी. बटर्सना मध्यभागी चमच्याने जरा टोचायचे आणि मग ते गरम पाण्यातून काढायचे. बाकी कृती दहीवड्यांसारखीच. हे दही बटर एकदम यम्मी लागते. Happy

मस्त. करतेच. बरं आमची मारवाडी शेजारीण बरोबरीने हिरवी पुदिना चटणी व चिंचेची चटणी वरून घालतात. शिवाय आवडत असल्यास खारी बुंदी पण घालता येते.

डिजे, लई भारी फोटो! तों. पा. सु. Happy

रुणू, मग तू एक तुकडा कोरड्या वड्याचा आणि एक चमचा दह्याचा असं खातेस का? Wink
(सॉरी हां, पण तुझ्या पोस्टी वाचून मलाही असं विनोदी काहीतरी सुचायला लागतं.)

मंजुडे, तोंपासु .दहीवडे एकदम फेवरिटच.... मी वडे तळून झाल्यावर पाण्यात वगैरे टाकतच नाही, डायरेक्ट दह्यात टाकते टिश्यूपेपरवर ठेऊन, पाण्यात टाकले की जो पचपचीतपणा येतो वड्याला एक प्रकारचा तो येत नाही. Happy

छान, मी ही थोड्या फार फरकाने असेच करते. फक्त डाळ २-२.३० तास भिजवून, वाटून लगेच करते. एकदम हलके आणि कुरकूरीत बनतात वडे आणि बटरचेही छानच लागतात.

डायरेक्ट दह्यात टाकते टिश्यूपेपरवर ठेऊन>> पण मग दही तेलकट होत नाही का? कारण टिश्यूवर ठेवूनही वडे पाण्यातून काढल्यावर राहिलेल्या पाण्यात तेलाचे भरपूर बुंदके असतातच.

एकदम व्यवस्थित पाकृ. Happy शंका कमीच येतील वाचणार्‍यांना. Happy दीपांजलीचा वडेफोटो तोंपासू आहे. Happy
मी ४-५ तास डाळ भिजवून वाटले की लगेच तळते. ठेवले म्हण्जे ते तेल तळताना जास्त पितात असे एक काकू म्हणे. खरच मलापण फरक जाणवला.

मंजुडी ,मस्त रेसीपी आहे.आता पर्यत दही वडे फक्त खाल्ले आहेत केले कधी ही नाही..रविवारी चा बे.फा दही वडे..
दिपांजली, फोटु मस्त आही.

अनघा., डाळ वाटून लगेच वडे तळले की ते आतून गिच्च आणि जड होतात असा माझा अनुभव Happy

जागू, फोटो मी नाही, दिपांजलीने टाकलाय गं.

मस्तय रेसिपी. वडे तळून झाल्यावर पाण्यातून काढण्याआधी त्या पाण्यात हिंग-मीठ घालायची आयडिया जामच आवडली. Happy

मीसुध्दा या फॅन क्लबची मेंबर. माझी एक मैत्रिण अप्रतिम दहीवडे बनवते. त्याकरता ती एक खास गोड चटणीही बनवते.

आता मीही मनावर घेऊन करूनच बघेन. Happy

डीजेचे दहिवडे कसले टेंप्टिंग दिसतायत. Happy

दही वड्यांवर माझी पोस्ट म्हणजे जरा विनोदच झाला. पण असो.

तर आमची (?) पद्धत: पीठात काहीच घालायचं नाही. हलकं मीठ फक्त. दह्यात किसलेलं आलं, हिरवी मिरची बाssssरीक चिरुन, कोथिंबीर बाssssरीक चिरुन, मीठ, साखर आणि भाजलेल्या जिर्‍यांची पूड हे जिन्नस घालायचे. खायला देताना ताटलीत दही वडे ठेवून त्यावर तिखट, मिरी पूड, खजूराची गोड चटणी आणि पुदिना-कोथिंबीर हिरवी चटणी घालून द्यायचं.

डिज्जेची (?) दही-इडलीची आयड्या पण ह्याच प्रकारच्या दह्यात भारी लागते (असे ऐकण्यात आले आहे).

मृनिश, ऑर्किड.....माझ्यासारखंच आणखी कोणाला तरी होतंय हे वाचल्यावर कित्ती बरं वाटलं. आत्तापर्यंत अनेक तु क झेलले आहेत ह्या गोष्टीवरून.

मंजूडी, सॉरी कशाला ? बर्‍याच जणांना विनोदी वाटतं हे वाक्य. पण दुर्दैवाने खरं आहे.
मी वडा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाते आणि दही नुसतंच खाते Happy

दही इडली माझी नाही आयडीआ.

अजुन एक,
लो फॅट दही वडे हवे असतील तर आप्पे पात्रात करायचे, अर्थात डीप फ्राइड इतके हलके होत नाहीत पण चांगले लागतात :).

एक इब्लिस रेसिपी:
पाव बटर म्हणून साधारणतः असा दिसणारा -> _tp.jpg
अन वड्याच्या साईझचा प्रकार आपल्याकडे बेकरीत मिळतो. (छोटे बनपाव टोस्ट केल्यासारखा प्रकार असतो, ओव्याची चव त्यात असते)

उडिदवड्या ऐवजी हे बटर पाण्यात/ताकात भिजवून अन मग दही + चिंचेची चटणी इ. सरंजाम करून बनवले तर बेमालूम दहिवडे तयार होतात. चव वेगळी आहे असे (चटकन) कळत नाही. होलसेल प्रमाणात बनवायचे असल्यास सोपी शॉर्टकट पद्धत.

मंजूडी , मस्त रेसिपी.... पण वडे तेलकट होउ नये म्हणुन काही टिपा आहेत का?
दिपांजली फोटो एकदम मस्त्...पार्टीसाठी मस्त डिश.

Pages