लसूण + कैरीच्या किसाचे लोणचे

Submitted by सारीका on 1 July, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन किलो घट्ट आंबट कैरी
२५० ग्रॅम (सोललेला) लसूण
२५० ग्रॅम मीठ
१२५ ग्रॅम लोणच्याचे तिखट (बेडगी किंवा चपाटा मिरचीचे)
५०० ग्रॅम शेंगदाणा तेल (रिफाईंड तेल हवे, मी फॉर्चून कंपनीचे वापरते)

फोडणीचे साहीत्यः

५०० ग्रॅम तेलातीलच एक वाटी तेल

३ चमचे मोहरी

१ चमचे जिरं

३ चमचे तिळ

१ चमचे मिरचीचे बी

खमंगपणासाठी:
एका मध्यम आकाराच्या हळकुंडाचे बारीक तुकडे करुन घ्यावेत सोबत २ चमचे मेथीदाणे घेऊन थोड्या तेलात हे दोन्ही जिन्नस तळावेत, थंड झाल्यावर बारीक पूड करावी. ( हळकुंडाच्या आकारानुसार मेथीदाणे किती घ्यायचे ते ठरते.)
हे मिश्रण कोणत्याही लोणच्यात वापरता येते त्याने खमंगपणा वाढतो.

क्रमवार पाककृती: 

१) कैरी धुवून पुसून चांगल्या कोरड्या करुन घेणे, नंतर कैरीची साले काढून किसून घेणे.
दोन किलो कैरीचा एक किलो किस होतो.

२) लसूण जाडसर ठेचून घेणे. ( मिक्सरमधे वाटू नये.) लसून ठेचून केवळ चपटा करायचा आहे.

३)गॅसवर कढई तापत ठेऊन त्यात वरील ५०० ग्रॅम तेलातील एक वाटी तेल टाकावे, तेल चांगले तापल्यावर आच कमी करुन मोहरी टाकावी, मोहरी तडतडल्यावर जिरे, मिरची बी आणि तिळ टाकून २५० ग्रॅम ठेचलेला लसूण टाकूण किंचीत गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून गॅस बंद करावा.
फोडणी पुर्ण थंड करुन घ्यावी.

४) एका पातेल्यात कैरीचा किस घेऊन त्यात मीठ, तिखट, उरलेले कच्चे तेल आणि एक चमचा मेथीदाणे हळकुंडाची पावडर टाकून चांगले कालवून घ्यावे.
या मिश्रणात वरील थंड झालेली फोडणी टाकून पुन्हा चांगले कालवावे.

५) तीन दिवसांनी काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

१) लसूण मिक्सरमधे वाटू नये, खुप बारीक व्हायची शक्यता असते, खाताना लसूण लागला पाहीजे.

२) कैरीत किती गर आहे त्यावरून प्रमाण कमी जास्त होते, त्यामुळे शक्य झाल्यास १ किलो किस मोजून घ्यावा.

३) हे लोणचे वर्ष दोन वर्ष सहज टिकते.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users