रसमलई

Submitted by प्रज्ञा९ on 28 June, 2012 - 14:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

गाईचं दूध ३ लिटर
व्हिनिगर/ लिंबू रस २ टेबलस्पून
साखर अंदाजे ४ वाट्या
पाणी ३ वाट्या
खडीसाखर चौकोनी दाणे पाव वाटी (ऐच्छिक)
बदामाचे काप, वेलचीपूड, केशर, पिस्ते सजावटीसाठी.

क्रमवार पाककृती: 

--गाईचं २ लिटर दूध आटवायला ठेवा. बासुंदीइतकं दाट नाही, पण घट्ट्पणा येईल एवढं आटवायचं आहे. आटवतानाच केशर घातलं मी, त्यामुळे रंग फार छान आला होता.
--गाईचं १ लिटर दूध तापवायला ठेवा. उकळी आली की व्हिनिगर/ लिंबाचा रस घालून दूध फाटू द्या. एकदम सगळं २ चमचे घालू नका, दूध-पाणी वेगळं होईपर्यंत घाला.
--दूध-पाणी वेगळं झाल्यावर पातळ फडक्यात/ पंचा घेऊन त्यात हे गाळून घ्या. गाळलेलं पाणी ठेवून द्या. पंचात साठलेलं पनीर अर्धा तास चक्क्यासारखं टांगून ठेवा.
-- पनीर पूर्ण कोरडं झाल्यावर ते पूर्ण मऊ होईपर्यंत मळून घ्या. मी सगळं मिळून १- १.५ मिनिटासाठी फुप्रोच्या तिन्ही स्पीड्सवर फिरवलं. हाताने जरा वेळ लागेल. मळून झाल्यावर त्याचे लहान पेढ्याएवढे गोळे करून घ्या.
--खडीसाखर वापरायची असेल तर गोळे करताना त्यात एकेक दाणा खडीसाखर घाला.
--प्रेशर कुकरमधे ३ वाट्या पाण्यात २ वाट्या साखर विरघळवून घ्या. कुकर गॅसवर ठेवा.
--आधण आलं की त्यात तयार केलेले गोळे सोडा.
--मोठ्या आंचेवर १ शिटी झाली की गॅस मध्यम आंचेवर करा.
--७-८ मिनिटांनी गॅस बंद करा. कुकर उघडला की तयार रसगुल्ले पूर्ण निथळून घ्या. थोडे दाबून पाणी काढा.
--आटवायला ठेवलेल्या दुधात अंदाजे २ वाट्या साखर घाला. साखर घालून शेवटची उकळी आणा, त्यात रसगुल्ले सोडा.
--वरून सुकामेवा घाला.

मला फार छान फोटो काढता येत नाहीत. जो आहे तो गोड मानून घ्या Happy

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

वरच्या प्रमाणात अंदाजे ३० रसगुल्ले होती. मी लहान करवंदाएवढे गोळे केले ते ४० झाले.
खडीसाखर घातल्यावर पाक पूर्ण मुरतो रसगुल्ल्यात. मी एकदा घातली, एकदा नव्हती म्हणून तसेच केले, थोडे अगोड वाटले.
कुकर मध्य आंचेवर केल्यावर जर शिटी झाली तर पूर्ण मंद आंचेवर ५ मिनिटं ठेवून पुरेल. तिसरी शिटि शक्यतो होऊ नये.
एका वेळी मोठ्या ७ लिटरच्या कुकरमधे साधारण १५ गोळे सोडले तर ते शिजल्यावर न चिकटता सहज काढता येतात. चिकटले तर वेगळे करायला व्याप होतो.
पनीर खूप मळलं गेलं तर तयार रसगुल्ल्याला भेगा पडू शकतात, अनुभव नाही मला.
पनीर गाळून उरलेलं पाणी कणीक मळायला/ भात शिजवताना घालायला उपयोगी येईल. असा भात सुरेख लागतो चवीला, मऊ पण मोकळा होतो.

माहितीचा स्रोत: 
मैत्रीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> पनीरच्या गोळ्यात खडीसाखर ठेवण्याचं प्रयोजन काय? कधी ऐकलेलं नाही म्हणून विचारतेय.

बहुतेक पाकाचा आतून पण एक सोर्स हेच प्रयोजन असेल असं वाटतंय ..

सायो, लिहिलंय की वर... पाक पूर्ण मुरतो. हेच गुलाबजाम करतानाही करतात. (इति सुगरणीचा सल्ला हे पुस्तक)

छान रेसीपी... Happy
खडीसाखर आत विरघ्ळत असल्यामुळे रसगुल्ल्यात पाक शेवट्पर्यन्त आणि लवकर मुरतो...

>>खटपट भारी म्हणून एरवी असे पदार्थ करायचा घाट घालवत नाही पण ही तशी सोपी वाटतेय. ++ सायो

मस्तच फोटो टाकलास ते बरं केलं......आता कदाचीत करणुयाची शक्यता जास्त वाढलीय.....................मस्त रेसिपी.....:)

छान आहे रेसिपी. सोपी वाटत्येय Happy

शंका... नुसत्या पनीरचेच गोळे करायचे का? बाईंडींगला काही लागत नाही का? काही रेसिपीज मधे थोडा मैदा/कॉर्न फ्लार वापरलेले वाचलय.

नुसत्या पनीरचेच गोळे करायचे का? बाईंडींगला काही लागत नाही का? काही रेसिपीज मधे थोडा मैदा/कॉर्न फ्लार वापरलेले वाचलय.>>> मी सुद्धा वाचले होते. ते आरारुट का ऑरोरुट सुद्धा घालतात वाट्ट. पण परवाच मैत्रिणीच्या घरी रसगुल्ले केले. काहीही न घालता छान झाले होते. पनीर चांगले मळायचे(पण एका मर्यादेपर्यंतच). अजुन छान व्हावे म्हणुन मी जास्तच मळले तर गोळे केल्यावर त्यावर चीरा दिसायला लागल्या. Sad

जसा घरचा ढोकळा व बाजारचा ढोकळा ह्यात कितीही आणि काहीही केले तरी फरक रहातो तसाच घरच्या व बाजारच्या रसगुल्ल्यातही रहातो असा माझा अनुभव आहे. मी एका कुकींग क्लासलाही गेले होते ऑथेन्टीक रसगुल्ला शिकायला. पण त्यांचाही नाही झाला बाजारसारखा स्पॉन्जी...कुणाला परफेक्ट रसगुल्ला येत असेल तर कृती सांगु शकाल का?

प्र९, माझीपण हीच पद्धत. ती खडीसाखरेची टीप मस्तय. आता घालेन. थँक्स.

कोणी केसीदासांची खास पाकृ टाकणार असेल तर मी येते पाय धरायला.

मी क्लास केला नाहीये पण पंजाबी डिश चा क्लास करायला गेले असताना त्या बाईंनी सांगितले की बाहेरच्यासारखे रसगुल्ले होण्यासाठी त्यात रीठ्याचे पाणी घालतात.

-- पनीर पूर्ण कोरडं झाल्यावर त्याचे लहान पेढ्याएवढे गोळे करून घ्या.>>> पनीर खूप मळून घ्यावं लागतं ना? त्यासाठीच्या टीपा लिही ना प्रज्ञा..

बंगाली गोड पदार्थ खूप आवडतात, पण घरी करून बघायचे म्हणजे दडपण येते. दोनदा बिघडवलेले आहेत रसगुल्ले तेव्हापासून करून बघायला भितीच वाटते.

मी जेव्हा जेव्ह रसगुल्ले केले तेव्हा तेव्हा केल्यावर... "आज पिठलं पांढरं का दिसतय?" असा प्रश्नं.
गुल्ल्यांना रसात मुरून एकजीव झाल्यशिवाय चैन पडत नाही बहुतेक...

माझीही रेसिपी सोप्पी आहे.. पाहिजे तर देते Wink

पण मी ही करून बघणारय, सोप्पी दिसतेय..

वा मस्तच ग. मी करुन बघेन आता.

मला फार छान फोटो काढता येत नाहीत. जो आहे तो गोड मानून घ्या
फोटो काय खायचे आहेत ? Lol पदार्थ एवढा छान बनवलायस !

नुसत्या पनीरचेच गोळे करायचे का? बाईंडींगला काही लागत नाही का? >>>> मीपण वाचलं होतं बरेच ठिकाणी म्हणूनच कधी केली नाही. पण मैत्रिणीकडे तिच्या हाताखाली मदत करताना ही रेसिपी मिळाली. यात खरं काहीच बाईंडिंग लागत नाही Happy त्यामुळे मैदा/ आरारूट घालून माझ्या हातून प्रकरण बिघडायची शक्यता कमी झाली. ४-५ वेळा केली, या पद्धतीने, अजूनतरी बिघडली नाहिये Happy

मंजूडी, वर बदल केलाय पनीर मळून घेण्याबद्दल. आधी विसरले होते. थँक्स! Happy
लाजो, टाकते तिथेपण ही लिंक.

पदार्थ आवडता आहे. रेसिपीसुद्धा छानच आहे. पण मला जमणार नाही ह्याची खात्री आहे Proud Sad
त्यामुळे देशात जाईपर्यंत कंट्रोल.