भोकराचे लोणचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 May, 2012 - 02:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो भोकरे
१ मध्यम आकाराची कैरी
२ चमचे लाल तिखट
३ चमचे मिठ
दिड चमचे मेथी
७-८ चमचे मोहरी पूड
३ चमचे हळद
१/२ छोटा चमचा हिंग
२ मोठ्या पळ्या तेल फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 

ही अशी आधी झाडावर लटकलेली कच्ची भोकरे काढून घ्या. Lol

* भोकरे व कैरी स्वच्छ धुवून पुसुन घ्यावीत. आता कैरीच्या फोडी कराव्यात. भोकरांचे सुरीने कापून दोन भाग करा.

हे मला शिंपल्यातल्या मोत्यासारख वाटत आहे Happy (कैच्याकै, मला काय वाटेल त्याचा भरवसा नाही :हाहा:)

* एका भागातली बी काढून टाका. हे खुप किचकट काम आहे. कारण बी इतकी चिकट असते. की आपली बोटे चिकट होतात. पण आपल्यामध्ये चिकाटी असू द्या. Lol

आता हात धुवताना कसोटी असते. २-३ वेळा साबण लावून हात धुतल्यावर एकदाचा चिकटपणा जातो.
मसाला तयार करायला घ्या. १ चमचा तेलावर मेथी तळून घ्या. गार करा व मिक्सरमध्ये पुड करा. मस्त वास येतो. (ही खटपट करायची नसेल तर सरळ मेथी पूड आणा पण चवीत थोडा फरक पडतो.)

आता मोहरीची डाळ सोडून बाकीचे जिन्नस म्हणजे हळद, मिठ, मिरची पूड हिंग एकत्र करा.

फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा चांगले गरम झाले की गॅस बंद करून भांडे खाली उतरवा आणि मग त्यात मोहरीची डाळ टाका म्हणजे ती जळणार नाही.

ही फोडणी थंड होऊ द्या. एकत्र केलेला मसाला आणि फोडणी एकत्र करून घ्या.

हा मसाला फिडींमध्ये चांगला मिसळा.

एका काचेच्या बरणीत हे लोणचे भरून ठेवा. जास्त दिवस ठेवायचे असेल तर अजुन १-२ पळ्या तेल गरम करून फोडी बुडे पर्यंत बरणीत ओता म्हणजे बुरशी चढत नाही.

हेहे झाले लोणचे तयार ७-८ दिवसांनी मुरेल मग खायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
लोणच्याच्या बाबतीत सांगणे कठीण.
अधिक टिपा: 

कैरी नाही टाकली तरी चालते पण कैरी मुळे खार चांगला होतो.

फोडणी द्यायची पद्धत वेगवेगळीही असते. कुणी हिंग, मोहरी डाळ हळद व मेथीपुडही टाकतात फोडणीत.

मसाल्याचा खटाटोप करायचा नसेल तर रेडीमेड आणला तरी चालेल पण त्यात बनवलेल्या चवीची मजा नसते.

इतर लोणची :
पारंपारीक पद्धतीने आंब्याचे लोणचे - http://www.maayboli.com/node/25660
चिंचेच्या रसातील मिरचीचे लोणचे - http://www.maayboli.com/node/29204

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु,
स्लर्प...................!
आता हे लोणचं खायला तुझ्याकडेच यायला हव,मुरल की सांग!

जास्त दिवस ठेवायचे असेल तर अजुन १-२ पळ्या तेल गरम करून फोडी बुडे पर्यंत बरणीत ओता म्हणजे बुरशी चढत नाही.>>>>

हे तेल गरम असतानाच ओतायचे की गरम करून थंड झाल्यावर मग ओतायचे गं जागू?

छान लागते. घरची भोकरे आहेत ना ?

गुजराथी आणि पंजाबी लोकांत करतात जास्त. पण कैरीशिवाय नाही होत हे.
मी यापेक्षा मोठी भोकरे बघितली आहेत. ती फोडून त्यात बेसन वगैरे भरून, परतून भाजी करतात.
याचा गर पाण्यात मिसळून त्यात लिंबू वा चिंच आणि गूळ मिसळून सरबत करतात. अल्सरसाठी ते चांगले.
भोकराचा गर, कोंडा आणि गूळ मिसळून, खापरात एक केक सारखा प्रकार पण करतात.

मस्त. करून पाहू. Happy इकडे मिळतात भोकरं

हे तेल गरम असतानाच ओतायचे की गरम करून थंड झाल्यावर मग ओतायचे गं जागू? >>> मी सांगू? कोणत्याही लोणच्यात तेल गरम तापवून थंड करूनच ओतावे. Happy

नितीन कच्या भोकरांचे लोणचे घालतात आणि पिकलेली भोकरे खातात. पिकलेली भोकरे खायला मजा येते. आम्ही पुर्वी झाडावरची काढूनच खायचो पिकलेली भोकरे.

मयुरी, उजू, बंडोपंत, अनघा धन्यवाद.

मंजूडी अनघा सांगते त्याप्रमाणे तेल गरम करून पुर्ण थंड झाल्यावरच लोणच्यावर ओतायचे.

दिनेशदा तुम्ही सांगितलेले प्रकार करून बघायला हवेत.

सहिच!!
प्रचंड आवडतं हे भोकराचं लोणचं. पद्धत वेगळी आहे. कैरी किसुन भोकरात भरायची आणि मग मसाला टाकायचा.

मला भोकरं म्हणजे मासे वाटले.>>> अगदी मला ही असचं वाटलं होतं.
जागू रेसीपी छान पण भोकर म्ह्णजे काय?

रचु अग वरती दाखवलेत ना भोकराची फळ.

प्रिती आयडीया चांगली आहे कैरीचा किस भोकरात भरण्याची.

दक्षे तू खुष होऊन धागा उघडलास ना माश्यांचा असेल म्हणून लब्बाड Lol

अनुसया, रैना, रावी धन्यवाद.

अहाहा. माझ्या जाऊबाई मस्त करतात हे लोणच. थोडी पद्ध्त वेगळी आहे. मसाला बहुधा सारखाच पण प्रत्येक भोकरातली बी अलगद काढून त्याजागी लसणाची एक पाकळी भरतात त्या. सुपर लागत एकदम.

जागू, या भारतवारीत जेवायला यायलाच पाहिजे तुझ्याकडे.

वा वा! फारच भारी दिस्तंय लोणचं!

घरातल्या जेष्ठ नागरिकांची पध्दतः भोकराचे दोन तुकडे केल्यानंतर त्यावर मीठ घालायचं. बी काढायला सोपी जाते.

मधुरीमा नक्की ये.

मृण्मयी धन्स पुढच्यावेळी मिठ टाकून काढेन बिया.

शांकली आईकडची आहेत ग.

लोला धन्स.