शैव मत

Submitted by अंबरीष फडणवीस on 22 May, 2012 - 06:03

शिवशंकराची उपासना भारतात अनादी कालापासून सुरु आहे. महादेव म्हणजे सृष्टीचा संहारक नवीन सृष्टीसाठी platform तयार करणारी शक्ती.. आदीगुरु.. कलाकारांचा आणि सर्व कलांचा उद्गाता.. तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा प्रणेता. योगेश्वर.. विष्णू balance दर्शवतो तर शिव extreme. ज्योतिषात शनी या ग्रहाचा स्वामी.. वेदांच्याहि आधी पासून शत्रूचे प्राण हरण करताना भारतीय रुद्राचे आवाहन करीत आलेले आहेत. असे म्हणता येईल कि भारतातला सर्वात लिबरल दैवत म्हणजे शिव. साक्षात काळ म्हणजे शिव. महाकालेश्वर आणि महाकाळ म्हणून पौराणिक वैदिक आणि बौद्धमत शंकरास संबोधते. बौद्धमतात शंकरास अवलोकितेश्वर देखील म्हंटले आहे.

भारतात सर्वात आधी शंकराचा उल्लेख वेदांत येतो. रुद्र (रडवणारा) हे अतिप्रचालीत नाव वेदातले आहे. शिव (शुभ) हे विशेषण पण वेदांत आढळते. सत्यं शिवं सुंदरम हे तिथलेच प्रसिद्ध वाक्य आहे. याच बरोबर योग या भारतीय दर्शनात ईश्वर म्हणून जो धरतात तो देखील शिव आहे. शिव आणि योगाचा प्राचीन संबंध मोहनजोदारो च्या उत्खननात सापडलेल्या पशुपतीच्या मुद्रेत दिसतो. जालंधरबंध धरून ध्यानमुद्रेत बसलेला आणि प्राण्यांनी वेढलेला पशुपतीनाथ चटकन सिंधूसंस्कृती च्या continuity ची साक्ष देतो. म्हणजे जवळपास ७००० वर्षे तरी उत्खननशास्त्रानुसार भारतात शिवपूजा होत आहे. आपल्या ऐतिहासिक पुराव्यांवर दृष्टी टाकली तर भरपूर आधी पासून रुद्रपुजा होत आहे. विष्णूची पण तशीच गोष्ट आहे. हि दैवते वेदकाळात पुजली जायची यांच्या नावाने अनेक यज्ञ आहेत. परंतु त्या काळात इंद्र-वरुण-अग्नी वगैरे देवतांना अधिक प्राधान्य होते. विष्णूस वेदांत "उपेंद्र" (इंद्राचा deputy) म्हंटले आहे. रुद्र देखील देवागणात होता.

इसपू १५००-२००० च्या सुमारास बदल घडू लागला. २५०० ते १९०० मध्ये राजस्थानातून वाहणारी सरस्वती नदी आटली. भारतीय परंपरेनुसार ३१०१ इसपू साली भारतीय युद्ध कुरुक्षेत्री झाले. आणि सरस्वती-सिंधू खोऱ्यातून गंगेकडे सत्ता आणि लोक स्थलांतर करू लागली. यमुना आणि शतुद्रू (सतलज) नद्या ज्या सरस्वतीला मिळायच्या त्यांनी दिशा बदलून अनुक्रमे गंगा आणि सिंधू नद्यांत आपल्या पाण्याचा निचरा करू लागल्या.

नागरी सभ्यता नाहीशी होऊन सप्तसिंधूतले वैदिक लोक परत बराच काळ (म्हणजे ६००-१००० वर्षे) टोळीवाले बनले असावेत. पंजाबचा परिसर कोरडा आहे. पाणी नद्यांच्या नेटवर्क मुळे मिळत राहते. परंतु खूप पाउस पडत नाही. त्यामुळे घनदाट जंगले नसत. grasslands सारखी जंगले पंजाब-सिंध-राजस्थान-गुजरात मध्ये आजही दिसतात. या उलट गंगेच्याखोरे हे घनदाट जंगलांचे म्हणून प्रसिद्ध होते. गंगेच्या खोऱ्यात वैदिक लोक अगदी रामायणाच्याच्या आधीच्या कालापासून राहत आलेली आहेत. पण भारतीय युद्धानंतर आणि सरस्वतीच्या आटल्यानंतर भारताचे सत्ताकेंद्र खऱ्या अर्थाने गंगेच्या खोऱ्यात आले. आणि विष्णू शिव ब्रह्मदेव वगैरे दैवते प्रचलित होऊ लागली.

आजकाल बरेच इतिहासतज्ञ बुद्धाचा काळ इसपू १५०० मानतात. कलिंग जिंकणारा व त्यानंतर धम्म स्वीकारणारा अशोक आणि स्तुपे बांधणारा अशोक वेगळे होते असे म्हणतात. अलक्षेन्द्राच्या स्वारीच्या वेळेस गुप्तवंश होता कारण मेगास्थिनीस नावाचा ग्रीक इतिहासकार जो भारतात राहिला तो चंद्रगुप्ताच्या पोराचे नाव समुद्रगुप्त काहीसे सांगतो. चाणक्याचा शिष्य मौर्यकुलीन चंद्रगुप्तच्या पोराचे नाव बिन्दुसार होते. चाणक्य आणि अशोक कधीही झाले असो. मुद्दा हा कि चाणक्य अर्थशास्त्रात वासुदेव आणि रुद्र या दोन देवतांबद्दल बोलतो. यापैकी विष्णुगुप्त चाणक्य म्हणतो कि रुद्रोपासना खूप दिवसांपासून चालत आलेली आहे पण हल्ली वासुदेव पंथ देखील वेगात प्रसरण पावतोय. म्हणजे कृष्ण हा देवत्व चाणक्याच्या थोड्या आधीपासून पावू लागला. विष्णू देव आधीपासूनच होता. पण ऐतिहासिक पुरुषास देवत्व बहाल करणे कृष्णापासून सुरु झाले कि काय असे वाटते. असो.

शैवमत हे असे हळूहळू प्रचलित झाले. या मताच्या अनेक शाखा प्रचलित झाल्या. याच २७०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात. (इसपू १७००-इस १०००). त्यातल्या काही शाखा आणि त्यांचे भौगोलिक प्रचलन खालील प्रमाणे..

मूळ उद्गम - वैदिक रुद्रउपासना

श्वेताश्वर उपनिषदात सर्वप्रथम शंकरास महादेव आणि ईश्वर हि विशेषणे दिली आहेत. हे उपनिषद कृष्ण-यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेचा भाग आहे. हि संहिता पांचाल देशात (आजचा पश्चिम उत्तर प्रदेश - आग्रा वगैरे परिसर) लिहिली गेली.

या पंथाच्या तीन मुख्य शाखा..

१. पौराणिक शैव मत..
२. योगिक शैव मत..
३. अपौराणिक शैव मत.

१. पौराणिक शैवमत तेच जे आपण आज मुख्यत्वे ऐकतो. मुख्य सोर्सेस - शिवमहापुराण लिंगपुराण स्कंदपुराण शिवरहस्यपुराण इत्यादी. याबद्दल मी जास्त लिहीत नाही. कारण हे सर्वश्रुत आहे.

शिवाच्या गोष्टी, लिंगपूजा, नटराज शंकर, आद्यगुरु दक्षिणमूर्ती शिव, कैलासपती शिव, तांडव करणारा आद्यनर्तक शिव, शास्त्रीय संगीताचा प्रणेता आणि पालक शिव, त्रिनेत्रधारी शिव, मदनाला भस्मसात करणारा शिव, सतीशी आणि नंतर पार्वतीशी रतीक्रीडेत रममाण होणारा शिव, कार्तिकेयाचा आणि गणेशाचा पिता शिव, नंदिवाहन शिव, अर्जुनाला पाशुपतास्त्र देणारा शिव, हनुमानरूपात अवतरित होणारा रुद्र, शत्रूचे प्राण हरणारा शिव (हर हर महादेव या घोषणेत हर म्हणजे हरण करणे, हिसकावणे. या घोषणेत आपण शंकराला आवाहन करतो कि मी शत्रूला मारतोय आता तू याचे प्राण हरण कर. महादेवा हरण कर रे), अधार्मिक शत्रूच्या आप्तांना आणि स्त्रियांना रडवणारा रुद्र.

शंकराचे हे स्वरूप आपल्याला माहिती आहेच. वैदिक, पुराणिक आणि काही अपौराणिक शैवसंप्रदायांचे संमिश्रण होऊन बनलेले हे स्वरूप आहे. यातले बहुतांश मत पुराणकाळात (इसपू १००० ते इस ५००) आणि नंतर श्री. जगद्गुरू आदी शंकराचार्य (इस ७००-८००) यांच्या कृपेने बनले आहे. मतानुमतात विभागलेला भारतीय समाजाला इस्लामच्या आक्रमणाच्या उंबरठ्यावर एक करणारा हा युगपुरुष. स्मार्त संप्रदाय यांनी सुरु केला. भक्ती आणि ज्ञानमार्ग एकमेकांचे विरोधक नाहीत हे लोकांना पटवून दिले.

प्रमुख सेश्वरवादी असे शैव-वैष्णव-शाक्त-सूर्य-गाणपत्य हे पाच संप्रदाय एक करून पंचायतन पूजा सांगितली. यांची आपसात वादविवाद करण्यात खर्ची पडणारी शक्ती येणाऱ्या काळासाठी एक केली. सांख्य, बौद्ध, मीमांसा, न्याय, वैशेषिक, चार्वाक, जैन इत्यादी निरीश्वरवादी मतांना विवादात हरवून काही मठात सीमित केले. यामुळे हि मते टिकून राहिली व स्वातंत्र्यानंतर परत वर आली.

पुढले हजार-बाराशे वर्षे हे सगळे टिकले कारण शंकराचार्यांनी केलेले मतांचे आणि लोकांचे एकीकरण. त्यांना नमस्कार करून पुढे जाऊया.

२. योगिक शैवमत हे अपौराणिक शैव मतासोबतच प्रचलित व प्रसारित होत होते.

३. अपौराणिक शैवमत - अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

पण या आधी द्वैतवादी एकेश्वरवाद (monotheism) आणि अद्वैतवादी एकेश्वरवाद (Monism) यातला फरक लक्षात घ्यायला हवा. Monotheism मध्ये एकच ईश्वर असतो जो सृष्टीचा नियंता आणि कर्ता असतो. ईश्वर आणि त्याची सृष्टी वेगळी असते. याचे दोन प्रकार आहेत - कडक आणि सौम्य (हि नावे मी दिली आहेत). कडक (strong monotheism) म्हणजे इस्लाम, ख्रिस्तपंथ यहुदी पंथ यासारखा. सौम्य Monotheism म्हणजे हरे कृष्ण वाले, इस्कॉन वाले, वैष्णव वारकरी संप्रदाय वगैरे सारखा. Monism म्हणजेच अद्वैत. सृष्टी आणि ईश्वरात द्वैतभाव नाही. सृष्टीच ईश्वर (सर्वं खलु इदं ब्रह्म).

अपौराणिक शैव मताचे दोन प्रमुख उपप्रकार आहेत.

I. मंत्रमार्ग
II. अतिमार्ग

I. मंत्रमार्ग

मंत्रमार्गाचे खालील उपप्रकार

अ. कपालिक शैवमत - यास काश्मिरी शैवमत देखील म्हणतात. हे एकेश्वर अद्वैतवादी मत मत. हा घरघुती गृहस्थाश्रमात असणाऱ्या लोकांसाठी असलेला पंथ आहे (होता). या मताचे शिवसूत्र आणि भैरवसूत्र हे प्रमुख ग्रंथ (आगम) आहेत. वसुगुप्त, सोमानंद, अभिनवगुप्त, क्षेमराज, उत्पलदेव आदी ऋषी या संप्रदायाचे प्रमुख आणि प्रसिद्ध आचार्य व उद्गाते आहेत. अभिनवगुप्त नाट्यशास्त्राचेपण खूप प्रसिद्ध आचार्य होते.

कापालिक शैवमत हे खुपसे शंकराचार्यांच्या अद्वैतवादासारखे आहे. शंकराचार्य आणि एका कापालिकाचा वाद शंकर-विजयं या ग्रंथात नमूद आहे. पण शंकराचार्यप्रणीत अद्वैतासारखे संन्यासप्रधान नसून गृहस्थप्रधान आहे.

या मताचा गोषवारा असा.

१. चिती - वैश्विक उर्जा/चेतना. हिलाच कापालिक शिव म्हणतात.
२. मल - चेतना जेव्हा लहानश्या भागात केंद्रित होते त्यास जीव म्हणतात. जीव स्वतःला शिवापेक्षा (वैश्विक चेतनेपेक्षा) वेगळा समजायला लागतो तीन प्रकारच्या मलांमुळे (मळ). आणव मळ (अहंकार), मायीय मळ (मायेमुळे उत्पन्न झालेला आणि मनापुरता सीमित असलेला), कर्ममळ (शरीरापुरता सीमित असलेला).
३. उपाय - तीन मलात अडकलेला जीव शिवाशी एकरूप व्हायला तडफडत असतो. त्या साठी लागणारी साधना यात सांगितलेली आहे.
४. मोक्ष - जीवाचे शिवाशी एकरूपत्व.

काश्मिरी कापालिक शैवसंप्रदायातल्या अन्य काही संकल्पना म्हणजे - अनुत्तर, अहं, प्रत्याभिज्ञ, कौल आणि स्वातंत्र्य..

काश्मिरी कापालिक शैव पंथ परत तीन उपप्रकारात विभागलेला आहे -
त्रिक (संन्यासी लोकांसाठी), कौल (सामान्य गृहस्थ लोकांसाठी) आणि अघोरी (तांत्रिक लोकांसाठी).

ब. शैव सिद्धांत - यास तांत्रिक शैवमत देखील म्हणतात. हे मत समस्त भारतभर प्रचलित होते. हे भारतातच नव्हे तर श्रीलंका, दक्षिणपूर्व आशिया मध्येही पसरले होते. इस्लामी आक्रमणानंतर हे दक्षिणेतच राहिले. दक्षिणेत नयनार संतांचे काव्य शैवसिद्धांतात मिसळले. याची सरमिसळ होऊन पेरियपुराण आणि तीरुमुराई या दक्षिणी शैवमताची रचना ६३ नयनार संतांनी मिळून केली.

मुळात हा संप्रदाय द्वैतवादी आहे. सांख्यतत्वज्ञान हे याचा कणा आहे. शिव आणि शक्ती यांच्या द्वैताद्वैत फॉर्म ची उपासना या मतात होते. कापालिक संप्रदायात आणि शैवसिद्धांतात भरपूर आदानप्रदान झाले आहे. अधिक योगमार्ग आणि तंत्रमार्ग हे देखील मंत्रमार्गातील सर्व शैवसंप्रदायांना जवळचे आहेत.

मुळात हा संप्रदाय ज्ञानमार्ग होता. तामिळनाडूमध्ये नयनार संतांनी त्याचे भक्तीमार्गात रुपांतरण केले. मूळ शैव सिद्धांत याचे आणखी एक Monist अद्वैतवादी अपत्य म्हणजे नाथसंप्रदाय. (गोरक्षनाथादी नवनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, चांगदेव वगैरे या शाखेचे). हा संप्रदाय मध्यभारतात, बंगाल आणि समस्त गंगेच्या खोऱ्यात प्रचलित होता व आहे.

असे म्हणता येईल कि मूळ शैवसिद्धांत काश्मिरात कापालिक बनला, मध्य भारतात नाथसंप्रदाय, राजपुतांच्या प्रदेशात तंत्रमार्ग आणि शाक्तमार्गाशी संलग्न झाला, दक्षिणेत नयनार संतांनी त्यास भक्तीमार्गाचे रूप दिले. योगाशी आणि तंत्राशी संलग्न होऊन हठयोग प्रदीपिका सारखे ग्रंथ निर्माण झाले. पुढे तामिळी शैवमताचे विशिष्टद्वैत वेदांताशी लग्न होऊन त्याचे पर्यावसान बसवण्णा यांच्या लिंगायत संप्रदायात झाले. त्याची गोष्ट पुढे आहे.

कापालिक मताच्या सर्व उपप्रकारांचे शैवसिद्धांतातील सर्व उपप्रकारांशी आणि इतर भारतीय आस्तिक आणि नास्तिक मतांशी विचारांचे आदानप्रदान आणि वादविवाद चालू असतच. त्यामुळे हे सतत गतिमान असे Dynamic चित्र होते. बौद्धमतात तंत्र खूप प्रख्यात आहे. वज्रयान बौद्धमत आणि कापालिक मत यांच्यात तर कल्पनांची खूप exchange आढळते.तीच गोष्ट तिबेटीय बौद्धमताची. अवलोकितेश्वर हे बुद्धाचे "शिवस्वरूप" म्हणून वज्रयानात प्रसिद्ध आहे.

कालमुख वीर-शैव हा संप्रदाय विशिष्टद्वैत वेदांत, सांख्य आणि शैवसिद्धांत यांचे मिश्रण आहे. शिव-शक्ती जोडी यांच्यातील अचिंत्य भेदाभेद (एक आहे आणि नाहीही) निरुपण करणारे हे मत आहे. सेश्वरवादी सांख्यमत या पंथासोबत थोडे साधर्म्य दाखवते.

अघोरी लोक देखील मंत्रमार्गात येतात.

II. अतिमार्ग

अ. पाशुपत शैवमत - हे सर्वात जुने शैवमत आहे असे मानण्यात येते. हे प्रामुख्याने मुलतान, पंजाब, गांधार, नेपाळ, गुजरात आणि तामिळनाडू मध्ये प्रचलित होते. मोहनजोदारो येथील पशुपातीनाथाचे योगमुद्रेतले चित्र याच संप्रदायातले. ऋषी लकुलीष या संप्रदायाचे उद्गाते होते. यांचा आणि या पंथाचा रेफरन्स महाभारतात देखील आहे. म्हणजे इसपू ३००० च्या आधी पासून हे मत नक्कीच भारतात प्रचलित आहे.

हा प्रामुख्याने संन्यस्त शैव भक्ती मार्ग आहे. हा मार्ग स्वीकारावयास लागणारे व्रत पाशुपतव्रत म्हणवते आणि याची विधी अथर्ववेदातल्या अथर्वशिरस उपनिषदात आढळते. या संप्रदायाची प्रमुख ग्रंथे आहेत - गणकारिका, पंचार्थ भाष्यदीपिका, राशीकर भाष्य. या मताला कालमुख असेही म्हणतात.

पाशुपातीय लोक वैष्णव मताचे कट्टर विरोधक होते. हे द्वैत एकेश्वरवादी आहे. वास्तविक हे खूप strong monotheism सांगतात. पण इस्लाम आणि मध्यपूर्वेतील सम्प्रदायांसमोर यांची कट्टरता क्षुल्लक भासते. त्यामुळे सौम्य एकेश्वरवाद हे म्हणणे योग्य राहील.

कापालिक आणि पाशुपत शैवमतांविरुद्ध काही इतर शैवमतांनी उपहास आणि टीकात्मक साहित्य लिहिले आहे. मत्तविलासप्रहसन नावाचे पल्लवकालीन संस्कृत एकपात्री नाटक या दोन्ही मतांची यथेच्छ खिल्ली उडवते. पशुपातीय शैवमत आता फारसे प्रचलित नाही.

बसवण्णा यांचे लिंगायत वीरशैव मत यांनी भक्तीमार्गी तामिळी शैवसिद्धांत आणि पाशुपातीय अतिमार्गी मत एकत्र करून नवीन पंथ सुरु केला. तो आजतागायत व्यवस्थित सुरु आहे. मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्र प्रांतात हा शैवसंप्रदाय पसरलेला आहे. जरी यात मंत्रमार्गाचे अनेक influences आहेत तरी हा अतिमार्गात गणल्या जातो कारण लकुलीष ऋषींची परंपरा आणि कालमुख परंपरा या पंथात सुरु असल्याचे म्हणतात.

उपसंहार

गांधार, पंजाब प्रांतातून आता अपौराणिक शैवमत काय तर समस्त भारतीय संस्कृतीच पुसल्या गेली आहे. १९८५ नंतर (काश्मिरी पंडितांचे शिरकाण झाल्यानंतर) तिथूनही शैवमत नाहीसे झाले आहे. बहुतांश भारतात पौराणिक शैवमत प्रचलित आहे. या मताने अनेक अपौराणिक मते आपल्यात धारण करून टिकवून ठेवली आहेत. बाकी तांत्रिक, लिंगायत आणि काही तामिळी कुळे वगळता शुद्ध अपौराणिक शैवमत फारसे शिल्लक नाही. ग्रंथ आहेत, कल्पना आहेत, त्याचे पालन हि होते आणि या परंपरांच्या आचार्यांचा आदरही होतो. पण फक्त हि मते आचरणारी एक डेडीकेटेड जनसंख्या नाही.

एका अर्थी चांगलेच आहे. भारतास असलेला धोका अजून पूर्ण टळला नाहीये. जेव्हा ते होईल तेव्हा हि मते देखील कालसुसंगत होऊन कुणीतरी reinvent करेल आणि भारतात प्रचलित करेल याची खात्री मला आहे.

http://agphadnavis.blogspot.com/2012/05/blog-post_19.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसले फोटो? तिथे तर कृष्णाचे आणि कुठलए तरी फोटो आहेत.. नेमक्या कोणत्या फोटोबाबत बोलता आहात? स्क्रीन शॉट घेऊन इथे टाकाल काय?

vijaykulkarni | 28 May, 2012 - 21:35 नवीन

Stephen Knapp हे इंग्रजीतून लिहिनारे ओक आहेत. त्यांचा पुरावा (उत्साही शिशु स्वयंसेवक वगळता) कुणीही गंभीरपणे घेत नाही.
<<
अनुमोदन.

बाकी उत्साही शिशु स्वयंसेवक मंजो यांनी गांभीर्याने 'घेतलेले' दिसते. बरेच दुखले असे दिसते.. दमाने घेत जा मंजोजी.

शिवाला मानणारे बहुसंख्य लोक वैदीक जीवनपद्धतीशी अनभिज्ञ आहेत.

हे कुठून ठरवले? असे किती शैव आहेत ज्यांना यज्ञ ही संकल्पना माहिती नाही? ते करतात कि नाही हा वेगळा मुद्दा. यज्ञ या विधीशी अनभिज्ञ (म्हणजे ज्यांनी हे कधी ऐकलेच अगर बघितलेच नाही असे) असणारे किती लोक आहेत. बहुसंख्य भारतीयांना गाय आदरणीय आहे. बहुसंख्य भारतीयांना यज्ञ म्हणजे काय, हे ऐकून आणि बघून माहिती आहे. इतर ही अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे शैव काय, जवळपास सगळेच भारतीय वैदिक जीवनपद्धती बद्दल माहिती बाळगून आहेत.

म्हणजे पुन्हा जीवनपद्धती बळीराजाची अभिप्रेत आहे कि वामनाची ?

याचा इथे संबंध काय? आणि बळीराजा आणि वामनाची संस्कृती वेगळी होती, याला पुरावा काय?

बळीराजा आणि वामनाची संस्कृती वेगळी होती, याला पुरावा काय?

पुरावा मागण्यामागचं लॉजिकच समजलेलं नाही. याला पुरावा काय म्हणजे काय हे नीट समजावून सांगा. बळीराजा कुणाचा वंशज ? वामन कुणाचा ? नीट वाचा अभ्यास करा आणि अभिनिवेशात पुरावे मागा. काही च्या काही चाललंय.... मी आधीचे कौतुकाचे शब्द नाईलाजाने मागे घेत आहे.

पुरावा मागण्यामागचं लॉजिकच समजलेलं नाही. याला पुरावा काय म्हणजे काय हे नीट समजावून सांगा. बळीराजा कुणाचा वंशज ? वामन कुणाचा ?

किरणजी,

पुरावा मागण्याचे लॉजिक हे कि या दोन व्यक्तिरेखा जर अस्तित्वात होत्या तर त्या वेगळ्या संस्कृतीतल्या होत्या हे कसे समजले?

दोघांना एकच भाषा समजली. दान मागावे आणि राजाने दान मागण्यास आलेल्या बटूला नाकारू नये, ही पद्धत बळीराजादेखील पाळत होता. बळीराजाचा गुरु तो शुक्राचार्य त्याची "संस्कृती" वेगळी का बृहस्पती पेक्षा? अश्वमेध यज्ञ करून तीनही लोक जिंकणारा बळीराजा कुठल्या हो संस्कृतीचा? कुठल्या संस्कृतीत अश्वमेध यज्ञ होतो? केरळच्या ओणम नावाच्या सणाच्या लोककथेत देखील हीच गोष्ट सांगण्यात येते (अश्वमेध यज्ञाची). सावत्र भावांची प्रगती बघून आदित्यांना भीती वाटली आणि म्हणून अदिती च्या आज्ञेने तिचा त्रिविक्रम विष्णू वामनाच्या रूपात "यज्ञ समाप्तीच्या दिवशी" भिक्षा मागायला आला. असे ही लोककथा सांगते.

अभिनिवेश नाही. इथे संस्कृती या शब्दाचा गैरवापर होतो आहे हा. बळीराजा हा प्रल्हादाचा नातू आणि शिष्य आणि विरोचनाचा मुलगा. प्रल्हाद विष्णूचा भक्त आणि हिरण्यकश्यपू चा मुलगा. वामन आदित्य. हिरण्याक्ष-हिरण्यकश्यपू ही भावंडे दैत्य (म्हणजे दितीची मुलं).. दिती आणि आदिती या दोघी सवती. म्हणजे आदित्य आणि दैत्य हे सावत्र भावंड वंशे. दोन्ही वंशांचा मूळपुरुष एकच (काश्यप ऋषी). म्हणजे आदित्य आणि दैत्य दोघेही एकाच वंशाचे.. मग संस्कृती वेगळी होती हे कसे म्हणता?

पुराणातील गोष्ट हीच आहे. आता तुम्हास नवीन पुराण भेटले आहे तर तसे सांगा.. मी वाचलेल्या गोष्टींमध्ये दैत्य आणि आदित्य सावत्र भावंडे होती एकच वंशाची. म्हणून तुम्हास मागील पोस्टात म्हणालो होतो कि संस्कृती आणि "सिविलायझेशन" या वेगळ्या गोष्टी आहेत.

अधिक बळीच्या अनेक गोष्टी आहेत. योगवाशिष्ठ म्हणते कि महाबली राजयोगाचा उपासक (पातंजल योग) होता. ब्रह्मवैवर्तपुराण म्हणते त्रिविक्रम विष्णूने बळीराजास स्वर्ग जिंकावयास आणि आपल्या भावाचे म्हणजेच पुरंदराचे (इंद्राचे) गर्वहरण करावयास मदत केली. भागवत पुराण देखील हेच म्हणते.

हे लॉजिक वापरले तर कौरवांची आणि पांडवांची संस्कृती देखील वेगळी म्हणावी लागेल मग.. मग नवीन पुराणच लिहावे. त्यात हवे ते म्हणावे.

शंकर आणि स्मशान या दोन गोष्टी सहसा एकमेकांसोबत उल्लेखित होतात.

विश्वेश्वर (काशी), त्र्यंबकेश्वर (नाशिक जवळ), महाकालेश्वर (उज्जैन) आणि श्रीकालहस्ती (तिरुपती जवळ) येथील स्मशाने प्रसिद्ध आहेत. पंचवटी (पाच वडाची झाडे असलेले स्मशान) हे शंकराच्या "कालभैरव" या स्वरूपाचे स्थान म्हणतात.. या ४ ठिकाणी शैवमताचे अघोरी आणि तांत्रिक लोक व त्यांचे आखाडे सहज सापडतात. ज्या व्यक्तींना हे मार्ग भावतात त्यांस देखील ही ठिकाणे विशेष लाभी असतात, असे म्हणतात..

मित्रा

पुराणातल्या गोष्टी पाहताना त्यातलं काव्य बाजूला ठेवावं लागतं. जर ही भावंडं होती तर हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, बळीराजा दानव आणि वामन, विष्णू हे देव कसे ? ते सूर तर हे असूर कसे ?
बळीराजाच्या लोकप्रियतेने इंद्राचे आसन डळमळू लागते म्हणजे काय ? हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू आणि बळी या एकाचं वंशासाठी तीन अवतार खर्ची पडले ते का ? ही गोष्ट कोणत्या साली घडली ? पुराणं या घटनेनंतर किती वर्षांनी लिहीली गेली ( आठवा आपले इंडीकासंबंधीचे विधान..)

या सर्वांचा विचार केला तर आदितीचे पुत्र वगैरे हा नंतरचा प्रक्षेप असावा. मूळ कथा आहेत त्या अवतारांबद्दल ज्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याच वंशाच्या नाशासाठी तीन तीन अवतार घेण्याचं कारण दिसत नाही. एकच कारण दिसतं जे स्पष्ट आहे. जनमेजय आणि परीक्षिताने ज्याप्रमाणे नागांचा नाश केला ( या नागांना सरपटणारे असं म्हटलं गेलं पुराणात ) त्याच नागांप्रमाणे हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू आणि बळी हे भूमिपुत्र असावेत. बळीला इतकं फसवून मारण्यामागे आपलं राज्य प्रस्थापित करणे हा एकमेव अजेंडा दिसतो. तीन पावलं दान हे देखील प्रतिकात्मक असून त्याचा अर्थ वेगळा असू शकतो.

पुराणातील गोष्ट हीच आहे. आता तुम्हास नवीन पुराण भेटले आहे तर तसे सांगा..

तुम्हाला या पद्धतीने सांगितले तर लवकर समजेल का ? प्लीजच कळवा.

शिवाची पूजा करणारे लोक हे परंपरेने गावातले शूद्र आहेत. अतिशूद्र हे गावाबाहेरचे असल्याने त्यांना गृहीत धरत नाही. पण त्यांच्यातही शिवाचीच पूजा करतात. याउलट उच्चवर्णियांचे देव, विधी हे सर्वस्वी भिन्न आहेत. सीमान्तपूजन विशिष्ट वर्गातच केले जाते. यज्ञ कसा करावा याबद्दल शूद्रांना ज्ञान नाही याचे कारण तो त्यांचा विधीच नाही.

ही संस्कृती भिन्न आहे यात मला आणि गावात राहीलेल्या, गावं हिंडलेल्या कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. गावाचे देव दोनच.. एक ग्रामदैवत आणि दुसरे गावाबाहेरचे महादेवाचे मंदिर. इतर देवळं कालाच्या ओघात आली. पण यांचे महत्व हे वेगळेच आहे.

भाषेचा मुद्दा हास्यास्पद वाटतो.
इंग्रज इथं आले. इथं राहीले, इथल्या लोकांशी युद्धही केली आणि व्यवहारही. मग त्यांची संस्कृती, भाषा एकच का ? मुघल आले आणि इतर अनेक आले.

असो.

मायबोलीवर या प्रकारच्या चर्चात यापूर्वी अजिबात भाग घेतला नव्हता. काही कारणाने मुद्दाम हजेरी नोंदवली. माझं ते काम झालेलं आहे. यापुढे अशा चर्चांत पुन्हा सहभागी होईन याची शक्यता वाटत नाही.

इथे तर बळी हा परकीय होता असे दिले आहे. लिहिणारा हिंदुत्ववादी म्हणवतो स्वतःला.. त्याचे खोटे तरी कसे म्हणायचे? Proud http://hindutwawadi.blogspot.in/2011/04/blog-post_10.html

असे किती शैव आहेत ज्यांना यज्ञ ही संकल्पना माहिती नाही? ते करतात कि नाही हा वेगळा मुद्दा.

तुम्ही आजवर किती यज्ञ केलेत हो? Proud वैदिक संस्कृती आज केवळ प्रतिकात्मक रुपातच आहे.. उलट अवैदिक शैव गाणपत्य याच प्रथानी आज हिंदु धर्म तोलून धरला आहे.

पुराणातल्या गोष्टी पाहताना त्यातलं काव्य बाजूला ठेवावं लागतं. जर ही भावंडं होती तर हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, बळीराजा दानव आणि वामन, विष्णू हे देव कसे ? ते सूर तर हे असूर कसे ?
बळीराजाच्या लोकप्रियतेने इंद्राचे आसन डळमळू लागते म्हणजे काय ? हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू आणि बळी या एकाचं वंशासाठी तीन अवतार खर्ची पडले ते का ? ही गोष्ट कोणत्या साली घडली ? पुराणं या घटनेनंतर किती वर्षांनी लिहीली गेली..

किरणजी,

पुराणे आणि इंडिका मध्ये मुख्य फरक हा कि चाणक्य, मौर्यवंश वास्तवात घडून गेले आहेत याचे इतर पुरावे देखील आहेत. अर्थशास्त्र आहे आणि त्यात त्याच्या लेखकाने स्वपरिचय दिला असून तो नंदवंशाचा विनाशक म्हणून स्वतःला म्हणवतो. काही शतके नंतर लिहिल्या गेलेले मुद्राराक्षस देखील हे सांगते. असो. हे विषयांतर आहे.

पुराणात लिहिलेल्या घटना खरंच घडल्या आहेत कि केवळ गोष्टी आहेत, हे कसे सांगणार. काव्य बाजूला ठेऊनच मी बघायचा प्रयत्न करतो आहे. बळी देखील याच परंपरांचा आदर करीत होता, म्हणून वामन बटू रूपात गेला. अन्यथा वराह आणि नरसिंह वगैरे काही रूपात जाऊन जे करायचे ते करून आला, अशी गोष्ट सांगितल्या गेली असती. अर्थात परत हे इंटरप्रिटेशन हे गृहीत धरते कि बळी आणि वामन होता.. जे मुळातच खूप कमकुवत गृहीतक आहे (चाणक्य आणि इंडिकाहून शतपटीने कमकुवत)..

या सर्वांचा विचार केला तर आदितीचे पुत्र वगैरे हा नंतरचा प्रक्षेप असावा. मूळ कथा आहेत त्या अवतारांबद्दल ज्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याच वंशाच्या नाशासाठी तीन तीन अवतार घेण्याचं कारण दिसत नाही. एकच कारण दिसतं जे स्पष्ट आहे. जनमेजय आणि परीक्षिताने ज्याप्रमाणे नागांचा नाश केला ( या नागांना सरपटणारे असं म्हटलं गेलं पुराणात ) त्याच नागांप्रमाणे हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू आणि बळी हे भूमिपुत्र असावेत. बळीला इतकं फसवून मारण्यामागे आपलं राज्य प्रस्थापित करणे हा एकमेव अजेंडा दिसतो. तीन पावलं दान हे देखील प्रतिकात्मक असून त्याचा अर्थ वेगळा असू शकतो.

आदितीचे पुत्र वगैरे ऋग्वेदातल्या गोष्टी आहेत. याचे खूप उत्कृष इंटरप्रिटेशन वि.का.राजवाड्यांनी "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात दिले आहे. भारतात एका काळात बरीच कुळे मातृसतात्क झाली होती. आई वरून व्यक्तीची ओळख आणि कुल ठरे. आदित्य, दैत्य, दानव, वैनतेय वगैरे लोक हे त्या त्या मातृसत्ताक वंशांचे लोक होते. आदित्य-दानव, आदित्य-दैत्य वगैरे मंडळींचा लढा म्हणजे या दोन मातृसत्ताक कुळांचा लढा म्हणता येईल.

असुर हे वेगळे कारण त्या वृत्ती आहेत, कुल नाही. वेदांत इंद्र, वरुण, सूर्य, मित्र, अग्नी वगैरे आदित्यांना असुर म्हंटलेले आहे. वेदातला आद्य व्हिलन "वृत्र" हा देखील ब्राह्मण आणि असुर असा वर्णिलेला आहे. वृत्राचे एक इंटरप्रिटेशन म्हणजे सर्पकृती ग्लेशियर. हिमालयात सर्पकृती ग्लेशियर मध्ये अडकलेले पाणी इंद्राने सोडवून आणले, म्हणून त्यास देवराज व प्रमुख आदित्य ही पदवी मिळाली. हिमयुगाच्या अंताची ही गोष्ट असू शकते.

असो. नागांना कुठेही सरपटणारे म्हंटलेले नाही. महाभारतात नागांना एक प्रगत जमात दाखवले आहे. भीमाला औषधी पाजणारे, त्याचा जीव वाचवणारे, अर्जुनाचे सोयरे म्हणून नागांचे वर्णन आहे. जर फक्त महाभारत हा रेफरन्स घेतला तर खांडववनाच्या दहनापर्यंत पांडव आणि नाग यांचे संबंध चांगले होते. कृष्णाचे संबंध नागांशी आधीपासूनच बिनसलेले होते (कालियादमन).. नंतर अर्जुन-उलूपी जोडीने हे ठीक करायचा प्रयत्न केला पण तक्षकाने खांडवप्रस्थाचा वचपा परीक्षितास मारून काढला आणि नंतर जनमेजयाने सर्पसत्र केले. त्या सर्पसत्रामध्ये तक्षकास मदत करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे इंद्र. हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

या सगळ्यात भूमिपुत्र ही संकल्पना खूप भीतीदायक आणि मिसलीडिंग आहे. दैत्य भूमिपुत्र आणि आदित्य बाहेरचे हे कशावरून ठरवले? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू (ही दैत्य भावंडे होती) यांना मारावयास विष्णूस दोन अवतार घ्यावे लागले हे बरोबर आहे. पण यावरून विष्णू देखील भूमिपुत्र नाही, हे कुठून आले? यावरून हेच कळते कि आदित्य आणि दैत्य या पिढ्यानुपिढ्या चालणाऱ्या लढाईत आदित्य साम-दान-दंड-भेद वापरून टिकले आणि जिंकले. पण ते जिंकले म्हणून ते बाहेरचे असा कांगावा का? उलट दैत्य बाहेरचे आणि त्यांनी भारत जिंकायचा प्रयत्न केला आणि भूमिपुत्र आदित्यांनी त्यांना सरतेशेवटी पराभूत केले, ही गोष्ट तितकीच खरी असू शकते.

दैत्य शिवाचे उपासक होते आणि आदित्य नव्हते, हे देखील चूक आहे. कारण शिवाची उपासना सगळे करीत. वेदरचणारे लोक सुद्धा. वैदिक लोकांव्यतिरिक्त इतर ही लोक होते. भारत हा सदैव असंख्य वेगवेगळ्या जाती, पद्धती, संप्रदाय आणि भाषेच्या लोकांना धारण करणारा देश राहिला आहे.

शिवाची पूजा करणारे लोक हे परंपरेने गावातले शूद्र आहेत. अतिशूद्र हे गावाबाहेरचे असल्याने त्यांना गृहीत धरत नाही. पण त्यांच्यातही शिवाचीच पूजा करतात. याउलट उच्चवर्णियांचे देव, विधी हे सर्वस्वी भिन्न आहेत. सीमान्तपूजन विशिष्ट वर्गातच केले जाते. यज्ञ कसा करावा याबद्दल शूद्रांना ज्ञान नाही याचे कारण तो त्यांचा विधीच नाही.

तुम्ही भूतकाळात कसे जाऊन बघितले ते माहिती नाही पण मी गावागावात पांडुरंग, मारुती, गणपती वगैरेंची मंदिरे बघितली आहेत. लाल दगडाला पूजतात लोक मारुती म्हणून. पांडुरंग उच्चवर्णीय लोकांचाच देव कधी पासून झाला? पांडुरंगावर आरक्षण कुणी आजवर लादले नाही. देवीची मंदिरे तर खूप पुरातन असतात. मदर गॉडेस (मातृरूपी देवी) हिची उपासना तर माणसात सर्वप्रथम सुरु झाली. भारतात तर ती अजूनही टिकून आहे. देवीमंदिरे गावोगावी असतात. तिथेही सुंदर मूर्ती वगैरे लागत नाही. पाषाणास लोक शेंदूर फासून पूजतात. आसाम मध्ये अनेक शतके चालणाऱ्या योनिपुजेत तर मूर्ती देखील लागत नाही. कामाख्या देवीचे मंदिर तर प्रसिद्ध आहे. अशी अनेक मंदिरे दक्षिणेत आणि मध्यप्रदेशात देखील प्रचुर आहेत. बिलासपुरचे जेठानी-देवरानी मंदिर देखील असेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे उगाच शुद्र वगैरे या टोपीक वर आणून हशील नाही. सर्वांना आपापल्या परीने आपापल्या आवडीच्या देवाची उपासना करायचा अधिकार आधीपासून भारतात होता. वादविवाद असंख्य झाले आहेत. पण स्वातंत्र्य देखील होते.

सीमांतपूजन महाराष्ट्राबाहेर देखील कुणी करत नाहीत (तथाकथित उच्चवर्णीय सुद्धा)... मग ते सगळे भूमिपुत्र आणि फक्त महाराष्ट्रातले तथाकथित उच्चवर्णीय हे उपरे असे म्हणायचे का तुम्हाला? पंजाबी मोहियाल ब्राह्मणास विचारा सीमांतपूजन काय असते ते.. अथवा पठाणी अरोरा ब्राह्मणास विचारा. उत्तर सापडेल. बंगाली मुखोपाध्याय ला देखील माहिती नसते आणि तामिळी ऐय्यर आणि केरळी नंबुद्री ला देखील. बहुतेक लोकांच्या लग्नात, जी लग्ने ब्राह्मणाच्या पौरोहित्याखाली होतात, त्यांत फक्त तीन विधी (शिलारोहण, लाजाहोम आणि सप्तपदी) बहुतांश भारतभर कॉमन आहेत. इतर काहीही कॉमन नाही. इतरही अनेक धार्मिक विवाह पद्धती आहेत. त्यांचात हे विधी होत नाहीत.

राहिली गोष्ट यज्ञाची, तर यज्ञ कसा करावा याचे ज्ञान श्रौत लोक सोडून अन्य कुणालाही नसते. मग तुमच्यामते श्रौत सोडून सगळे शुद्र का? हरकत काही नाही, पण क्लियर झालेले बरे.

ही संस्कृती भिन्न आहे यात मला आणि गावात राहीलेल्या, गावं हिंडलेल्या कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. गावाचे देव दोनच.. एक ग्रामदैवत आणि दुसरे गावाबाहेरचे महादेवाचे मंदिर. इतर देवळं कालाच्या ओघात आली. पण यांचे महत्व हे वेगळेच आहे.

बरोबर.. गाववाल्यांची आणि शहरी लोकांची सिविलायझेशन वेगळी आहे... समस्त शहरी उपरे. सगळे गाववाले भूमिपुत्र..

जर अमुक गावातील लोक अमुक प्रकारे अमुक देवाची पूजा करीत असतील आणि तमुक गावातील लोक तमुक प्रकारे, तर आपल्या आवडीचा देव आणि त्याचे उपासक म्हणजे भूमिपुत्र आणि इतर उपरे.. कारण माझी संस्कृती नेहमीच दुसऱ्यापेक्षा चांगली असते, नाही का?

असुर या शब्दाचा एक अर्थ शक्तीमान असा आहे.. त्या अर्थाने तो वेदात आला आहे.

असुर हे अवैदिक असे कुलही होते.. यदुवंश, बाणासुर ( कृष्णाचा पाहुणा ना? ), जरासंध हे सगळे असुर कुळातलेच. देवयानी असुर कुळातच जन्मलई होती. सांख्य तत्वज्ञान लिहिणारे कपिलमुनी असुर कुलीन प्रल्हादाचेच सुपुत्र. त्यावरच पुढे कृष्णाचे गीता तत्वज्ञान उभे राहिले.

देव हे देव लोकात रहातात असा उल्लेख आहे. देवलोक म्हणजे कुठेतरी हिमालयात आहे, असेही म्हणतात.

जर देव हे भारतातील मूल निवासी होते, तर असुराला मारल्यावर कोणत्याच देवाने त्याचे राज्य स्वतः का नाही चालवले? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपु मेले. पण नरसिह गादीवर बसला नाही.. बळीला घालवून वामनही गादीवर बसला नाही.. त्यामुळे देव / सुर इथले का परके हे माहीत नाही, पण असुर मूलनिवासीच होते, याला मात्र पुष्टी मिळते. आणि हे सगळे लोक शिवाचे भक्त होते. कृष्णाने इंद्र पुजा बंद केली.. समुद्र ओलांडून द्वारका वसवताना त्याने सोमनाथाची पूजा केली होती. भृगु वंश असुर कुलीनच . त्यानीच अवैदिक देवांची महती असलेले अथर्ववेद रचले. ज्याला पूर्वी तीन वेदांबरोबर मान्यता नव्हती.. परशुरामही याच कुळातला. त्यानेही शिवाची पूजा करुन अस्त्रे संपादली होती.

गीतेत मी कशात काय आहे, हे सांगताना कृष्ण शिवाशीच संबंध जोडतात.
महर्षींमध्ये मी भृगु आहे. भृगु हे यज्ञधर्माचे समर्थक नव्हते. शिवपूजक होते.
रुद्रांमध्ये शंकर आहे.
सेनानायकात स्कंद म्हणजे शिव पुत्र कार्तिकेय आहे.
सर्व तपाजपांमध्ये मी यज्ञापेक्षाही श्रेष्ठ असा नामजप आहे.

वैदिक लोक यज्ञात गाय, बैल खात असत, पण शैवादिकानी गाय, बैल पवित्र मानून शिवाला पशुपती मानले आहे.. हिंदु धर्मातील गोमातेची कल्पना अवैदिक आहे, वैदिक नाही. असे अनेक फरक वैदिक, अवैदिक यातले फरक दाखवुन पर्यायान्र वैदिक रुद्र व अवैदिक शिव यातले वेगळेपण दर्शवतात.. कालांतराने वदिकानीच शैव परंपरा आपल्या केल्या आणि वेदातल्या कुठल्या तरी दीड दोन ओळीशी यांची साम्येही जोडून दिली.

असुर कुळाचा इतिहास तपासत मागे मागे जा... हे लोक वैदिक विरोधी आणि शिवपूजक असल्याचे मिळेल. त्यामुळे वेदातील रुद्रापासून शिव आला, यातील फोलपणा समजेल.. शिवपूजा, शैव संस्कृती वैदिकांपेक्षा प्रचंड जुनी आहे.. यातूनच सांख्य, गीता, योग हे तत्वज्ञान जन्मले आणि आजही भारतीय - हिंदु तत्वज्ञानावर यांचाच पगडा आहे, ज्यांच्याशी वैदिकांचा खरं तर काडीमात्र संबंध नाही.
इथेही माहिती मिळेल.. http://www.maayboli.com/node/18221

>>देवलोक म्हणजे कुठेतरी हिमालयात आहे, असेही म्हणतात
हे सद्ध्याचे तिबेट असावे असा कयास आहे. रामायणात एके ठिकाणी राम सीतेला म्हणतो "हे देव लोक लवकर म्हातारे होत नाहीत"...इंद्र अनेक वर्ष जगला. त्या संदर्भात हे वाक्य असावं. अर्थात हा अंदाज फक्त.

अंबरीश
सोयीचे युक्तिवाद होत राहणार.

पुंडलिकाच्या आधी विठ्ठलाचा उल्लेख आढळत असल्यास सांगावा. वेद, पुराणे, महाभारत, रामायण इ. कुठल्याहि ग्रंथात त्याचा उल्लेख दाखवा.

मारूतीची देवळे गावागावात कुणी बांधली ? मारूतीची उपासना करायला कुनी शिकवलं ? गावात दोन उत्सव असतात एक ग्रामदेवतेचा आणि दुसरा महाशिवरात्रीचा. तिसरं महत्वाचं दैवत म्हणजे कुलदैवत.

कालिया मर्दनामधे कालियास मनुष्य दाखवले आहे कि आठ फण्यांचा नाग ? परीक्षिता च्या कथेत नाग म्हणजे कुठले आहेत ? गरूडाच्या कथेतले नाग कुठले आहेत ?

पुराणांकडे मी संदर्भ म्हणून पाहतो. पुराणांचं लिखाण झालं समुद्रगुप्ताच्या काळात झालं.

बळीराजाची पूजा आजही शेतक-यांच्या घरी होते. बलिप्रतिपदेला बळीची प्रतिमा बनवून त्याची पूजा होते. सनातन प्रभात मधे बळी परकीय असल्याचं दाखवलं आहे पण त्याच अंकात बळीची पूजा होते हे ही लिहीले आहे हे विशेष. जर हिरण्यक्ष एक हजार वर्षे राज्य करीत होता आणि त्यानंतर अनेक वर्षे हिरण्यकश्यपू गादीवर बसला. त्यानंतर प्रल्हाद राज्य करीत होता तर त्याचा नातू हिंदुकुश पर्वतातून आला हे प्रतिपादन करायची गरज सनातन प्रभात वाल्यांना का वाटावी ?

वि का राजवाड्यांचे पुस्तक मी वाचले आहे. त्यांनी तो ट्री एका वेगळ्या उद्देशाने दिलेला आहे. सांगा बरं कुठल्या ? त्याच पुस्तकात यज्ञाचे काही विधी दिले आहेत. त्यातला श्लील अश्लील भाग टाळून

यज्ञाचे अधिकार कोणास होते ?
संस्कृत शिकण्याचे अधिकार कोणास होते ?
वेदाभ्यासाचे अधिकार कोणास होते ?
गुरुकुलात शिक्षंण घेण्याचे अधिकार कोणास होते ?

याशिवाय मनुस्म्रुतीमधे सांगितलेली व्यवस्था आणि शिक्षा पाहील्यानंतर आजच्या काळात त्याचा फटका कुणाला बसला हे खूप निरीक्षण करून सांगायची गरज नाही. तुमचे खुलासे या लेखाप्रमाणेच तुमच्या विचारसरनीशी प्रामाणिक राहत असल्याने खूप सर्कस होते आहे.

यापुढे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लिहावे. तार्किक उत्तराची अपेक्षा आता तुमच्याकडून ठेवून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

धन्यवाद.

जर देव हे भारतातील मूल निवासी होते, तर असुराला मारल्यावर कोणत्याच देवाने त्याचे राज्य स्वतः का नाही चालवले? हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपु मेले. पण नरसिह गादीवर बसला नाही.. बळीला घालवून वामनही गादीवर बसला नाही..

असुर या शब्दाचा अर्थ योग्य लावलाय आपण.. याचा एक राजकीय अर्थ आहे. अर्थात हे माझे डोके आहे. तो पुढील प्रमाणे..

असुर म्हणजे एक कंपल्सिव लीडर. थोडक्यात हुकुमशाह.. असुर हे असे राजकीय आणि सामाजिक मॉडेल आहे जिथे सत्ता एका शक्तिमान राजाकडे अथवा एका छोट्या समूहाकडे केंद्रित होते. मग तो राजा चांगला असू शकतो (जसे बळी) अथवा वाईट (अनेक आहेत, हिटलर पर्यंत आणि पुढेही)..

शक्तीच्या या केंद्रीकरण होण्याला धर्माचा विरोध आहे. धर्म्य या विशेषणातच न्याय आणि कर्तव्य हे अर्थ अभिप्रेत आहेत. धर्म म्हणजे सर्वांना साजेशी अशी एक न्याय्य आचारसंहिता. या देवासुर संग्रामाच्या गोष्टीतला राजकीय आणि सामाजिक अर्थ हा कि सत्तेच्या केंद्रीकरणाला सदैव विरोध झाला पाहिजे. मग तो राजा कितीही चांगला असला तरीही.

देव म्हणून जे वर्णिलेले आहेत (इंद्र वगैरे) त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य पुराणात फारसे चांगले नाही. पण अमुक एक देव सर्वशक्तिमान होऊन मातला, अशी गोष्ट कुठे आढळत नाही. देवाने अमरात्व मिळवायला तप केले, अगर असे काही केले असे कुठे लिहिलेले नाही. पौराणिक देव (आणि बव्हंशी वैदिक देव सुद्धा) सहसा "व्यवस्था टिकवण्यात" धन्यता मानतात. थोडक्यात आपापले काम करून फावल्या वेळात हवे ते करणे. असुर म्हणून जे कुणी दाखवले आहेत ते याच्या विपरीत आहेत.

देव हे नोकरशाह (ब्युरोक्रासी) वाले व असुर हे ऑटोक्रासी वाले दिसतात. अर्थात दोघांची आवश्यकता आहे. दोघांशिवाय समुद्रमंथन होऊ शकत नाही. पण अमृत शक्तीच्या केन्द्रीकरणाचे आग्रही असलेल्या असुरांकडे गेलेले सृष्टीला परवडणारे नाही. टिवल्याबावल्या करीत का होईना पण आपापली कामे चोख करणारे देव त्यातल्यात्यात बरे, ही विचारधारा यातून दिसून येते.

इतिहासातले सगळे भारतीय साम्राज्ये आणि भारतीय माणसाचा स्वभाव बघितला तर हे पटू लागते.

यज्ञाचे अधिकार कोणास होते ?
संस्कृत शिकण्याचे अधिकार कोणास होते ?
वेदाभ्यासाचे अधिकार कोणास होते ?
गुरुकुलात शिक्षंण घेण्याचे अधिकार कोणास होते ?

याशिवाय मनुस्म्रुतीमधे सांगितलेली व्यवस्था आणि शिक्षा पाहील्यानंतर आजच्या काळात त्याचा फटका कुणाला बसला हे खूप निरीक्षण करून सांगायची गरज नाही.

किरणजी,

विषयांतर होते आहे. पण या प्रश्नावर मी इंडल्ज होईन...

यज्ञाचे अधिकार द्विजांना... संस्कृत द्विज शिकत.. वेदाभ्यासाचे अधिकार द्विजांना होते. आणि गुरुकुलात देखील द्विज होत. द्विज म्हणजे तो ज्याची मुंज झाली आहे. आणि उपनयनामुळेच प्रत्येक मुल ब्रह्मचारी होते, अशी व्यवस्था होती. उपनयन संस्कार ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या वर्णत्रयींसाठी आहे असे म्हणतात. उपनिषदात बरीच उदाहरणे आहेत (सत्यकाम जाबाल, उदाहरणार्थ) जिथे मुलांचे कुल न बघता उपनयन करावे असे सांगितलेले आहे. व्यास आणि वाल्मिकी देखील याच श्रेणीत आले.

मनुस्मृती मधली व्यवस्था स्वातंत्र्यपूर्व काळात (१९व्या शतकात) ब्राह्मणेतरांना खूप जाचक होती.

पण यातून तुम्हाला काय सुचवायचे आहे. मनुस्मृती ही अल्टिमेट कधीच नव्हती. याज्ञवल्क्य, आपस्तंभ आणि इतर दंडनीती होत्या.

माझी विचारधारा तुम्ही काय गृहीत धरली आहे ते माहिती नाही. कदचित माहिती आहे ही. पण तुमचे ते गृहीतक ठार चुकीचे आहे हे तुम्हाला समजेल जर तुम्ही हा संवाद पुढे चालवला तर.

सर्वप्रथम प्रत्येक गोष्टीस योग्य नावाने हाक मारणे आवश्यक होते. मनु, याज्ञवल्क्य , आपस्तंभ, आधुनिक घटना, इतर नीती हे सगळे "धर्मशास्त्र" आहेत.
कौटिलीय, विदुर, नारद, भीष्म अन इतर हे सगळे "अर्थशास्त्र" आहेत..
वात्सायन, जयदेव, इतर बरेच यांनी "कामशास्त्रे" लिहिली..
शैव, बौद्ध, जैन, सांख्य, योग, मीमांसा, वैष्णव इत्यादी बरेच सगळे "मोक्ष अथवा अध्यात्ममार्ग" आहेत..

हे चार पुरुषार्थ झालेत..

ब्रह्मचर्य (विद्यार्थी), गृहस्थ (समाज), वानप्रस्थ (म्हातारे, निवृत्त लोक) आणि समाज त्यागून एकांतात राहणारे (संन्यासी) हे चार आश्रम झाले.

ब्राह्मण (बुद्धीजीवी), क्षत्रिय (सैनिक आणि राज्यकर्ते), वैश्य (व्यापारी), शुद्र (वेतन घेणारे कामगार) हे चार वर्ण झाले.

हे चार वर्ण फक्त गृहस्थाश्रमात मिळतात. ब्रह्मचाऱ्याला, वानप्रस्थीला नि संन्याशाला वर्ण नसतो.. ही झाली पुरुषार्थ-वर्णाश्रम बंधित व्यवस्था.

हे चारही पुरुषार्थ, चारही आश्रमाच्या आणि गृहस्थाश्रमातल्या चारही वर्णाच्या लोकांना (म्हणजे सगळेच आले) मिळवायचे असतात. ते मिळवणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. व ते मिळवायची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे, ही कल्पना घेऊन ही व्यवस्था इवोल्व झाली आहे.

भारताचे समग्र साहित्य (विशेषतः पहिल्या तीन पुरुषार्थासंबंधीचे - यात धर्मनीती अथवा दंडनीती, उपवेद, अर्थाशास्त्रे, कामशास्त्रे इत्यादी आले) ही व्यवस्था टिकवणे, सुदृढ करणे आणि सशक्त करणे हा हेतू सेंटर ला ठेऊन उत्क्रांत होत गेले आहेत. बौद्ध, जैन, वगैरे मतांचे "बंड" हे मोक्षमार्गासंबंधी होते. धर्मार्थकाम या पुरुषार्थत्रयींबद्दल नव्हते.

त्या काळातल्या लोकांना जे योग्य वाटले तसेतसे थोडीफार व्यवस्था बदलत लोकांनी नवीन नवीन मॉडेल दिले. मनु हे असेच एक मॉडेल.

मनूच्या मॉडेलला तपासताना, ते कुठल्या काळात आले, त्यावेळेसची समाजपरिस्थिती कशी होती, हे मॉडेल लागू झाल्यावर काही परिणाम झाला का, आणि इतर मॉडेल शी तुलना करताना, यात काय फरक आहे, हे तपासणे आवश्यक आहे.

The text was never universally followed or acclaimed by the vast majority of Indians in their history; it came to the world's attention through a late eighteenth-century translation by Sir William Jones, who mistakenly exaggerated both its antiquity and its importance. Today many of its ideas are popularised as the golden norm of classical Hindu law by Hindu universalists. They are, however, anathema to modern thinkers and particularly feminists

- Avari, Burjor. India, the ancient past: a history of the Indian subcontinent from c. 7000 BC to AD 1200. New York: Routledge, 2007. p. 142.

त्यामुळे फक्त मनुस्मृती ला फटके मारण्याऐवजी, मोठ्या चित्राकडे बघू.

इसपू २०० च्या सुमारास हा ग्रंथ लिहिल्या गेला असे म्हणतात. म्हणजे गुप्तकाळाच्या सुरुवातीला किंवा गुप्तांच्या उद्याच्या अगोदर. जर असे गृहीत धरले कि गुप्तांनी हिला भारताची तत्कालीन घटना (धर्मशास्त्र) घोषित केले (जे असत्य आहे, कारण समान नागरी कायदा हा भारतात कधीच नव्हता, प्रत्येकास आपापला नागरी कायदा बनवून तो आचरणे लीगल होते), तर मग चीनी प्रवाशांच्या वर्णनाप्रमाणे, भारतात तर नंदनवन होते.

भारताची अवदसा खूप उशिरा सुरु झाली (१२०० नंतर) असे इतिहास सांगतो. आणि त्या अवदसेला उत्तरदायी भारतीयांचे कर्म आणि त्यास मोठा हातभार हवामान बदल (क्लायमेट चेंज), मान्सून चे बदलते चक्र, परकीय आक्रमणे यांचा आहे.

एका मनुस्मृतीला शिव्या घालून फक्त निराशा दिसेल. १२०० च्या पूर्वीचे सर्व दंडनीती आणि धर्मशास्त्र (घटना) विषयक ग्रंथ तपासणे आवश्यक आहे.

ही जी चतुर्विधा व्यवस्था वर वर्णित केली आहे, त्याचा मेंटेनंस खूप मोठा आहे. जर आर्थिक सुबत्ता असेल तरच ही व्यवस्था टिकू शकते. म्हणूनच कौटिलीय अर्थशास्त्रात खूप चपखलपणे म्हंटले आहे कि धर्मस्य मुलं अर्थः

जेव्हा ही आर्थिक घडी विस्कटली, या व्यवस्थेतील प्रत्येक घटक आपापले कर्तव्य आणि "जागा" विसरून आपापला स्वार्थ पाहू लागला.. त्यातूनच जे सर्वात खाली अडकले ते वरच्या सर्वांच्या वजनाखाली भरडल्या जाऊ लागले.

तुमची खरंच यावर संवाद करण्याची इच्छा असेल तर पुढे बोलतो.. पण भारतात दलितांवर झालेल्या अन्यायाचे एक खूप मोठे कारण भारताचे बिघडलेले अर्थतंत्र आहे. जो पर्यंत ते अंतर्गत आणि परराष्ट्रीय अर्थतंत्र सुरळीत सुरु होते, तो पर्यंत अन्यायाचे स्वरूप दलितांच्या पोटापर्यंत आले नाही. हा एक खूप महत्वाचा पैलू आहे.

जर तुम्हाला माझ्या तथाकथित विचारधारेबद्दल टोमणे मारायचे असतील तर एका चांगल्या चर्चेस मी मुकेन आणि मला वाईट वाटेल.

अर्थात हे माझे डोके आहे.

तुमचे डोके हीच तर सर्वात मोठी डोकेदुखी आहे.

पुरावे काय सांगतात त्यातुन निष्कर्ष काढायचे असतात.

आधी निष्कर्ष ठरवून मग सोयीचे पुरावे शोधायचे नसतात.

यापुढे तुम्हाला आवडेल ते तुम्ही लिहावे. तार्किक उत्तराची अपेक्षा आता तुमच्याकडून ठेवून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

क्या बात है किरण.., देर आये दुरूस्त आये.
हाच विचार अगोदरच करायला हवा होता. Happy

आणि हाच विचार माबोवरच्या किंवा स्वतःच्या विचारसरणीच्या समर्थनार्थ निवडक पुस्तके वाचून विद्वान झालेल्या आंतर्जालावरिल सगळ्यांबरोबर असेच अन्याय न करता वागा. Happy

साती,

>> तार्किक उत्तराची अपेक्षा आता तुमच्याकडून ठेवून तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही.

आपल्याला एखादी गोष्ट पटत नसल्यास आपण शंका उपस्थित करू शकता. सरसकट विधाने करून फारसं काही हाती लागणार नाही. आपली प्रतिक्रिया अंबरीश यांच्या अगोदरच्या संदेशाला उद्देशून आहे हे गृहीत धरतो.

आ.न.,
-गा.पै.

गा पै, नाही.
ते किरण.. यांच्या प्रतिसादातील कॉपी पेस्ट केलेलं वाक्य आहे.
तुमच्या सोयीसाठी आता इटालिक करते म्हणजे ते माझे मत आहे असा गैरसमज होणार नाही.

Pages