घुटं - एक मराठमोळा प्रकार - फोटोसह

Submitted by दिनेश. on 13 May, 2012 - 13:04
Ghuta
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१) १ वाटी उडीद डाळ
२) अर्धा टिस्पून हळद
३) चार पाच हिरव्या मिरच्या
४) एक इंच आले
५) चार पाच लसूण पाकळ्या
६) मूठभर कोथिंबीर
७) साजूक तूप एक टेबलस्पून
८) एक टिस्पून जिरे
९) अर्धा टिस्पून हिंग
१०) मीठ

क्रमवार पाककृती: 

१) उडदाची डाळ कोरडीच गुलाबी रंगावर भाजून घ्या.
२) त्यात पाणी घालून, अर्धा तास भिजत ठेवा.
३) त्यात हळद घालून, ती शिजवून घ्या. आवडीप्रमाणे कमी जास्त शिजवा, व जरा घोटून घ्या.
४) आले, लसूण, मिरच्या व कोथिंबीर वाटून घ्या.
५) तूप तापवून त्यात हिंग जिर्‍याची फोडणी करा.
६) त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण टाका व परता
७) मग त्यात शिजलेली डाळ व मीठ टाकून उकळा

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

ghuta2.JPG
बाजरीची भाकरी, घुटं, ठेचा आणि दही.. मस्त बेत जमतो.
(मी मक्याची भाकरी केलीय.)
घुटं पातळसर करतात. मी फोटोसाठी घट्ट ठेवलेय.
हा मराठमोळा प्रकार आहे पण सहसा हॉटेलमधे मिळणार नाही. थंडीच्या दिवसात मस्तच लागते.
गावरान तूप असेल तर आणखीनच छान.
मिरच्या वगैरे आपल्या आवडीप्रमाणे घ्या.
ह्यात काही ठिकाणी कांदा, खोबरे घालतात पण चिंच, गूळ नसतोच,

माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, साहित्य वाचायच्या आधी नुसता फोटो बघून मला ती चवळी वाटली होती. मी फारशी स्वयंपाकघरात रमणारी नाही तरी हे फार इन्टरेस्टिंग आणि तरी करायला सोपं दिसतंय. उडदाच्या डाळीला स्वतःची अशी खास चव असल्यामुळे नक्कीच चविष्ट लागत असणार. नवर्‍यावर एक-दोन दिवसात प्रयोग करायला हरकत नाही. Happy

आमच्याकडे आईने कधी हा प्रकार केला नाही, पण काकू दर शनिवारी हौसेने करते! तिला आवडतो हा प्रकार अतिशय आणि ती करतेही अप्रतिम! शनीचे केवळ निमित्त! Happy

दिनेशदा आमच्याकडे घुट्यासाठी सालीवालीच उडिदडाळ वापरतात आणि हो फोडणीत थोड सुक खोबर आणि जिर बोबड ठेचून घालतात. बाकी सेम रेसिपी.
गरमागरम घूट , भाकरीवर घरच्या ताज्या लोण्याचा गोळा आणि गावाकडे करतात ते खडे मीठ घालून केलेल कमी खाराच लोणच. स्वर्गसूखच जणू!

हं................! आई करायची हे घुटं. यात भरपूर ओलं खोबरं घालायची ती.
पण मी नाही कधी केलं! पण आता करावंच लागेल.

दिनेशदा मी रविवारी घुट केल होत मी सातारचीच आहे मजा वाटली रेसिपी पाहुन मी सुक खोबरे आणि सालीसहित

दाल वापरली तुम्हि सातारचे अहात का?............

रीया, मस्त दिसतय.
आमच्याकडे लाल चवळीचे कढण करतात ते असे दिसते. मसाला हाच असतो.

सस्मिता, माझे आजोळ मलकापूर. पण आजोळी नाही हा प्रकार करत. मी पुस्तकातच वाचला होता.

थंडीच्या काळात मी उडदाचे वरण अशा पद्धतीने करते फक्त डाळ भाजुन घेत नाही. आता भाजुन करुन बघते!
धन्यवाद दिनेशदा!

दिनेश, बरोब्बर, माझ्या मामेभावचं अजोळ सातारा आहे. त्यामुळेच तो पदार्थ करून घातला त्याने. तुम्ही म्हणालात तसं त्याने उडदाच्या डाळिची भरड वापरली होती.

दिनेशदा दिनेशदा.. साक्षात दंडवत तुम्हाला. आताच पाहिली ही रेसिपी. आजीची आठवण आली हो. Sad मला घुटं आवडायचे म्हणुन कितीही आजारी असेल तरी फक्त लाडक्या नातीसाठी हा प्रकार करायची ती. ती गेल्यावर घुटं खाणे सोडले ते कायमचेच Sad
अवांतराबद्दल क्षमस्व . खुपच छान लागतो हा प्रकार

आम्ही लहानपणी 'घुटं घ्या घुटं - सांगु नगा कुटं" असं म्हणत घुटं ओरपायचो स्मित
पण खूप पातळ असतं घुटं आमच्याकडे आणि रंगही हिरवा..>>> नानबा अगदी अगदी

सर्वांचे आभार परत एकदा.

स्नेहनिल.... फोटोत डाळ दिसावी म्हणून मी घट्ट केलं. खरं तर मी इतर कुणाच्या हातचं कधी खाल्ले नाही !

मस्त !

किश... बहुतेक लिहिला होता मी इथेच. या मिरच्या फक्त रंगाला चांगल्या. तिखट नसतात. ( मला तश्याच चालतात / लागतात Happy )

मी आज हिरव्या मुगाचं केलं होतं. छान झालं. इतकी साधी रेसिपी आणि तरीही बेस्ट टेस्ट. धन्यवाद दिनेशदा.

मागच्याच आठवड्यात आठवण झाली होती. लहान असताना आई करायची. पण बरेच वर्षात खाल्ले नाहीये. तुमची रेसिपी आणि फोटो पाहून जेवणानंतरही भूक लागलीय. Happy खूप छान रेसिपी आणि फोटोही.

घुटं हे नाव ही सातारीच >>
आम्ही लहानपणी 'घुटं घ्या घुटं - सांगु नगा कुटं" असं म्हणत घुटं ओरपायचो >>>>>>>> १ Happy

Pages