चायनीज व्हेज फ़्राईड राईस

Submitted by दिनेश. on 9 September, 2008 - 00:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खाली पाककृतीत पहा

क्रमवार पाककृती: 

चायनीज फ़्राईड राईसची हि माझी ट्राईड आणि टेस्टेड रेसिपी.

तयार स्टॉक क्युब्ज वापरणार असाल तर ठिकच, पण घरी स्टॉक करण्यासाठी. कोबी फ़्लॉवरचा मधला दांडा, फ़रसबी, गाजर, कांदा अश्या भाज्या, लाल भोपळा दुधी भोपळा यांची साले. पालक माठ वैगरे भाज्यांचे ठेचुन घेतलेले देठ वैगरे एकत्र करुन ऊकळावे. त्यात एकादे तमालपत्र व मिरिपुड घालावी. हे सगळे कुकरमधे एकत्र शिजवले तरी चालेल. मग यातले फक्त पाणी गाळुन घ्यायचे.
दोन वाट्या तांदुळ घेतला तर सहा वाट्या पातळ स्टॉक लागेल. दोन वाट्या तांदुळ धुवुन निथळुन घ्यावे. मग हा स्टॉक ऊकळत ठेवावा. त्यात तांदुळ घालावेत. अधुन मधुन तळापासुन ढवळावे. तांदुळ एकमेकाना चिकटणार नाहीत ईतपत स्टॉक असावा. त्यात एखादा चमचा व्हिनीगर पण घालावे. थोड्या थोड्या वेळाने भाताचे शीत शिजले का ते बघावे. हा तांदुळ पुर्ण शिजवायचा नाही. किंचीत कणी ठेवायची.
मग लगेच सगळे एका मोठ्या गाळणीत ओतावे. गाळणी वरखाली करुन पुर्ण पाणी निथळु द्यावे. अर्धा चमचा कच्चे तेल भातला अलगद हाताने चोळावे. हा भात आधी करुन फ़्रीजमधे ठेवला तर चांगले.
आता यात घालायच्या भाज्यांसाठी, कोबी, कोवळी फ़रसबी, केशरी गाजर, सिमला मिरची, लीक, कांदे व त्याची पात, बेबी कॉर्न. मश्रुम असे जितके जमेल तितके बारिक कापुन ठेवावे. या सगळ्या भाज्या मिळुन, शिजलेला भात जेवढा असेल, म्हणजे साधारण चार वाट्या एवढे असावे. वेगळ्या चवीसाठी, मुगाचे कोंब, वांग्याचे तुकडे, सोया मीन्स, टोफु, पनीर हे पण घेता येईल.
अर्धा ईंच आले, व चार पाच लसुण पाकळ्याहि बारिक चिरुन घ्याव्यात.
एका पसरट भांड्यात तेल गरम करुन त्यात हिंग घालावा. मग त्यात आले लसुण, परतावा. आवडत असेल तर एखादी लाल व हिरवी मिरचीदेखील परतावी. मग क्रमाक्रमाने भाज्या घालाव्यात. वांगी, पनीर, सोया मीन्स, टोफु वैगरे वेगळे परतुन घ्यावे लागेल. सर्व भाज्या मध्यम जाळावर भराभर परताव्या. मग त्या आधी तयार केलेल्या भातात काट्याने मिसळुन घ्याव्यात. भातात त्या नीट मिसळल्या कि एका वेळेस थोडे थोडे करत हे मिश्रण परत गरम करावे. मीठ घालावे.
वरुन सोया सॉस, व्हीनीगरमधली मिरची, चिली ऑईल वैगरे घ्यावे. हे प्रत्येकाने आपापल्या चवीप्रमाणे घ्यावे.

माझा आवडता एक सॉस. दोन मोठे चमचे भरुन होईल एवढी लसणाची पेस्ट, एक मोठा चमचा लाल तिखट, चमचाभर सोया सॉस, दोन मोठे चमचे व्हीनीगर तयार ठेवावे. खोल कढईत दोन चमचे तेल गरम करुन त्यात चमचाभर साखर घालायची. साखर विरघळुन सगळ्या मिश्रणाला सोनेरी रंग आला कि तिखट घालावे, लगेल व्हीनीगर घालुन ऊकळु द्यावे. व्हीनीगरचा वास जाऊन, तिखटाचा वास येऊ लागला कि गॅसवरुन ऊतरावे. व जरा वेळाने लसणीची पेस्ट घालावी. सोया सॉस घालावा व नीट ढवळुन घ्यावे. हा प्रकार भात, स्प्रिं रोल, दिम सुम सगळ्याबरोबर चांगला लागतो. तिखटाचे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे वाढवायला हरकत नाही.

माहितीचा स्रोत: 
दिनेश यांनी जुन्या हितगुजवर दिलेली पाककृती
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा फ्राईड राईस चिकट झाला पांढरी भाज्या घातलेली खिचडी दिसावी तसा दिसत होता. प्रमाण वर दिलेलेच वापरले. तरीही असे झाले, काय चुकले असावे

दावत बासमती वापरला होता. दुसरा कुठला तांदुळ वापरायला हवा का?

प्रिन्सेस,

फ्राईड राईस करायचा असेल तर मी आधी भात करून घेते आणि ताटात पसरून ठेवते. काट्याने मोकळा करून घेते. जेणे करून वाफ निघून जाऊन भात मोकळा होतो आणि मग फ्राईड राईस करताना चिकट गोळा होत नाही. तसेच शिजवताना भातात थोड तेल/तूप घालून बघ.

धन्यवाद लाजो आणि प्राची. मी भातातली वाफ जाउ दिली नाही तेच चुकले असावे. आजच श्रद्धाने सुद्धा फोनवरुन हेच मार्गदर्शन केले

पुढच्या वेळी सांगेन कसा झाला ते

-प्रिन्सेस...

आपण पास्ता शिजवताना जसा अल देन्त शिजवतो तसाच हा भात शिजवायचा. आता थोडी कणी राहिली पाहिजे.
तांदळाच्या तीन चार पट पाणी घेतले पाहिजे. म्हणजे तांदूळ पाण्यात सहज फिरतात, पाणी कमी झाले तर भात चिकट होतो.

आत्ताच करुन खाल्ला आणि लगेच पोस्टते आहे. मस्तच झाला होता. सोया सॉस आणि हॉट सॉस बरोबर अगदी भारतातल्या चायनीज रेस्टॉरंटमधे खाल्ल्यासारखा लागत होता.

दिनेशदा, मस्त झाला फ्राईड राईस. भाज्या परततांना मीरपूड आणि थोडा सोया सॉस आणि वूस्टर सॉस घातला. छान चव आली. सोया चंक्स मॅरिनेट करून घातले. तुम्ही दिलेला सॉसपण करून पाहीन. थँक यू!

वूस्टर शब्द आहे की वूर्सेस्टरशायर्‍ की अजून कुठला? गूगल केलं तर दोन्ही म्हणतंय... Uhoh