पुण्यात मायबोलीकरांशी भेट

Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता: 
सध्या तरी मल्टिस्पाईस. 46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052

****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंदार,

तुम्ही स्वतःच्या वर्तनाला उद्देशून भाबडे हे विशेषण वापरणे हा अजरामर विनोद ठरेल

गेल्या दहा हजार वर्षात असा भाबडा माणूस झाला नाही Lol

(जो अ‍ॅडमीनना तक्रारीच्या विपू सर्वाधिक पाठवतो पण प्रत्यक्ष अ‍ॅडमीन येणार म्हंटल्यावर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देतो) Lol (दिवे)

अर्धा म्हणजे वरून नाकापर्यंत का? तसे करू नका, कारण चेहरा व्हर्टिकली डिव्हाईडेड दिसतोय फोटोत

किंवा मग मी माझ्या चेहर्‍यावर अर्ध्या भागावर काही चिकटवून येऊ का?

अर्धवट कादंबरी मिळेल ह्याची हमी तुम्ही सर्वोत्तम देऊ शकता ह्यात वादच नाही..

आणि बुरखा मी व्हर्टिकली (फक्त चेहऱ्याला) अर्धा कापून घेईन!

म्हणजे चेहर्‍याचा जो भाग माबोवर दाखवत नाही आहात तो दाखवणार का?

(फारच जास्ती प्रश्न विचारतोय असे वाटले तर दिवा घ्या, अजून मला नीट दिवे देता येत नाहीत)

याच वेळेस नेमका आमचा वार्षिक कार्यक्रम असल्याने येउ शकत नाही. समीर तसेच इतर मायबोलीकरांना भेटण्यास आवडले असते. मायबोलीकर संमेलनास शुभेच्छा.

जबरी धमाल आली काल! समीरला बर्‍याच दिवसांनी भेटून आनंद झाला.

मी ज्या गटगांना गेलेलो आहे त्यात हेच सर्वात मोठे गटग असेल. ३५-४० लोक, ४ रेस्टॉरंट्स, अनेकांच्या झालेल्या नवीन ओळखी. तसेच सोलकढी देताना रेस्टॉ वाल्याने केलेली कंपूबाजी, एका टेबलवर योग्य 'राईस' ना आल्याने झालेले तर दुसर्‍या टेबल वर राईसच न आल्याने थोडावेळ झालेले "फर्स्ट वर्ल्ड-थर्ड वर्ल्ड" वाद, काही लोकांनी आयुष्यभराचा कोटा खाल्लेले आणि तरीही सगळे झाल्यावर टेबलवर शिल्लक राहिलेले मांचुरियन. प्लेटवर केळीची पाने नक्की कोणाकोणाला आणि का मिळालीत याबद्दलचे संभ्रम, लोकांचे इतरांची नजर चुकवून पुण्याची आयपीएल मॅच पाहणे (तसे आम्ही बरेच सज्जन. नजर चुकवूनही मॅचच पाहतो), 'मसाला' च्या माध्यम प्रायोजकत्वामुळे काही लोकांना सगळीकडेच मसाला दिसू लागल्याने आईसक्रीमही मसाल्याचे खाणे ("जायका"). आधीच्या रेस्टॉ चे नावही मल्टि'स्पाईस'.

मल्टिस्पाईसमधे मी पोहोचून लोकांशी जरा गप्पा मारू लागलो तर एकदम सगळेच उठले आणि निघून जातात की काय असे वाटू लागले. बर्‍याच लोकांना पुपुवर येतात त्या अनुभवासारखे काही होते की काय असे वाटले. तेवढ्यात खुलासा झाला की समोरच्या हार्वेस्ट क्लब मधे चाललो आहे. पण तिकडे एकतर एवढी जागा नव्हती व एक सार्वजनिक कार्यक्रम चालू असल्याने, त्यातही प्रचंड मोठ्या आवाजात 'ढाक-चिक' गाणी चालू असल्याने आपले आपल्याला ऐकू येइल की नाही असे वातावरण (त्यांचीच पोस्ट त्यांनातरी कळाली का अशी शंका येण्यासारखे लिहीतातही काहीजण, पण निदान इतरांना) चालणार नव्हते. त्यामुळे तेथून 'कलिंगा' येथे गेलो. तेथे मात्र भरपूर जागा मिळाली. तेथे गेल्यागेल्या कोणत्यातरी विषयावर प्रचंड गहन चर्चा झाली. ती "पुरेशी" झाल्यावर बाजूलाच बसलेले अ‍ॅडमिन ती बंद करतात की काय अशी शंका आली Happy

पण तसे काही झाले नाही. इतरांना विनंती करतो अजून वॄ लिहीण्याची Happy

मस्त झाले कालचे गटग. घरी पाहुणे मंडळी असल्याने लवकर जावे लागले तरीही जितका वेळ होते, तितका वेळ मजा आली. समीरला पहिल्यांदाच भेटले.

गजांतलक्ष्मीचा फोटो येऊदेत Proud Happy

शनिवारची सकाळ

मी रजा घेतली होती. साहेबांना सांगितले होए की शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असलीच तरीही मी शनिवारीही काम करतो पण या शनिवारी करणार नाही आहे. साहेबांनी कारण विचारताच मी बाणेदारपणे उत्तर दिले की ज्या नोकरीतील काम कसेबसे संपवून मी मायबोलीवर सामाजिक जाणिवा उलथ्यापालथ्या करणारे लेखन करतो त्या नोकरीतून मला त्या मायबोलीच्या प्रशासकांना भेटण्यासाठी वेळ मिळणे हा माझा 'प्र'सिद्ध हक्क आहे. भुईमुगाच्या शेंगांची टरफले कोठेच न दिसल्याने साहेबांनी मोठ्या मनाने परवानगी दिली.

शनिवारी मला पहाटे तीन वाजताच जाग आली. शुक्रवारी रात्री मी अडीच वाजता झोपलो होतो कारण उद्या कसे वागायचे हे ठरवण्यात व त्या तालमीत वेळ गेला. अर्ध्या तासाच्या मानसिक विश्रांतीनंतर मी ताजातवाना झालो व दात घासले. आमच्याकडे अ‍ॅमवेची एक पेस्ट आहे हे सांगायची संधी या निमित्ताने मिळाली म्हणून मल्टीस्पाईसचे आभार. शुभदिनी सिगारेटचे आरंभ होऊ नये म्हणून मी रोज पहाटे अडीच वाजता उठून धार्मिक कृत्ये करणार्‍या माझ्या बाबांशी माझ्या काही नातेवाईकांच्या घोडचुकांवार बोलून त्यांना प्रसन्न केले.

मग मात्र राहवेना म्हणून कर्वे रोडला गेलो व दोन कटिंग व दोन बिड्या असे उरकून घरी आलो. व्यायाम करून आपण थोडे तडफदार दिसू असे वाटल्याने प्राणायाम केला. शारिरीक व्यायामात उर्जा खर्च करणे मला संयुक्तिक वाटले नाही. बायको झोपलेल्या अवस्थेत मधेच डोळे उघडून फुत्कार सोडून तिचा निषेध व्यक्त करत होती. मी ते फुलाप्रमाणे झेलत प्रसन्न चेहरा करून वावरत होतो.

मग मी एका खोलीत अ‍ॅडमीनना भेटण्याच्या प्रसंगाची तालीम केली. मी असा उभा असेन, अ‍ॅडमीन मला पाहून एकदम सुखद धक्क्याने हात पुढे करतील. सर्वांच्या नजरांमधील असूया झेलत मी माझी मान तेरा अंशात कलवून आणि जेमतेम ( फक्त न किडलेल्या) दातांची एक पुसट रेषा दिसेल इतकेच स्मितहास्य करून स्थानापन्न होईन. मग अ‍ॅडमीन मला सर्वांसमक्ष म्हणतील की तुमच्यासारखा लेखक व कवी मायबोलीवर आहे हे आमचे भाग्यच. मग मी नम्रतेने कसचे कसचे म्हणेन व एरवी माझा वाहत्या पानांवर सहजी व हमखास अनुल्लेख करणारे माझ्या त्या दबदब्याने हादरून माझ्याशी एक शब्द बोलायला मिळावा म्हणून झटू लागतील.

मग मी मायबोली ऑन करून काही जुन्या व अ‍ॅडमीनशी सतत संपर्कात असणार्‍या (तक्रारींसाठी) सदस्यांच्या गाडल्या गेलेल्या धाग्यांना वर आणून 'अप्रतिम, तोडलंत' असे प्रतिसाद दिले व माझ्याबाबत एक मुळातच सहानुभुतीची भावना निर्माण होईल याची खातरजमा केली.

त्यानंतर मी माझा अत्यंत आवडता शर्ट कपाटातून काढून पाहिला तर त्याची तीन बटणे तुटलेली होती. इतक्या पहाटे शिंपी कुठे मिळणार म्हणून मी बायकोला एक नाजूक स्पर्श करून ती जागी होते का हे पाहिले. जे घडले त्यापेक्षा शिंपी शोधणे सोपे आहे हे मला लक्षात आले. आई गेल्यापासून शर्टची बटने तुटू नयेत म्हणून मी जीवापाड प्रयत्न करत असतो.

मग मी एकदा यादी पाहिली, कोण कोण येणार आहेत ते समजून घेतले. त्यांच्या सदस्यत्वाला किती युगे लोटली ते पाहिले. आपल्यावर अ‍ॅडमीननी कारवाई केलेले धागे कोणकोणते आहेत त्यांची यादी करून ते अप्रकाशित केले. येणार असलेल्या बहुतांशी सदस्यांशी माझ्या प्रचंड लेखन कारकीर्दीत माझी कधी ना कधी चकमक उडालेली आहे हे ध्यानात आल्यानंतर मी प्रार्थनेस बसलो. मी झोपलो आहे असे वाटून वडील म्हणाले देवघरासमोर झोपण्यापेक्षा आत जाऊन झोप. मी त्यांची कीव करून प्रार्थना उरकून उठलो.

खास मॉलमधून आणलेला एक पस्तीस रुपयांचा साबण काढून मी एखादी सिनेनटी लाजेल अशी भारदस्त आंघोळ केली. आरश्यात अजूनही माझे व्यक्तीमत्व मला भुरळ पाडेल असे वाटत नसल्याने मी पुन्हा आंघोळीस गेलो.

आंघोळ उरकल्यावर मी देवाला व वडिलांना वाकून नमस्कार केला व कपाळाला अंगारा लावला. वडिलांनी आशीर्वाद देताना 'सुखी राहा व तुझ्यावर अ‍ॅडमीनची कायम मेहेरनजर असो' असा दिला. ते ऐकून मी भारावून जात वडिलांना मिठी मारली व गदगदून रडलो. वडिलांनी पाठ थोपटून माझे सांत्वन केले.

उजाडल्यावर काही स्थानिक देवळे व ग्रामदेवता (यात तांबडी जोगेश्वरी व कसबा गणपती यांचा समावेश प्रामुख्याने आहे) नमस्कार करून आलो. घरी आलो तर अबोल्याची जातिवंत मूर्ती म्हणजे बायको खुनशी नजरेने चहा टाकत होती.

ती ऑफीसला जाईपर्यंत मी शालीन सुनेसारखा वावरत होतो. ती गेल्या गेल्या मी एक टाळी वाजवून जोरात उडी मारली.

त्यानंतरचा काळ हा मिस वर्ल्ड स्पर्धेचा विजेता किंवा झी सिने अ‍ॅवॉर्ड्सचा विजेता ठरायला जसा जातो तसा गेला.

मीही त्यातील स्पर्धकांप्रमाणे 'अ‍ॅन्ड द विनर इज' म्हंटल्यावर जसे दोन्ही हात चेहर्‍यावर दाबून जमीनीकडे पाहात प्रार्थना करतात तसेच करत घालवला.

शेवटी एकदाचे चार वाजले. माझ्या मुखावर आता 'आंतरजातीय विवाह सोहळा' आयोजीत करणार्‍यासारखे भाव आलेले होते. काय होईल ते सांगता येत नाही असे काहीसे! बाबा मला अधूनमधून धीर देत होते.

पाच वाजता मी 'आवरायला' घेतले. तोवर ही (शनिवार असल्यामुळे लवकर येते - दुसर्‍या व चौथ्या शनिवारी ) परतली. हिचे परतणे हे एखादा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत येण्यासारखे असते. सर्वत्र भयाची वादळे उठतात. लॅपटॉप असेल त्या परिस्थितीत मेन स्वीच दाबून बंद केला जातो. 'मी तुझी केव्हाची वाट पाहात होतो' असे सात्विक भाव हुकुमी रीतीने तोंडावर आणले जातात.

माझा अभिनिवेश (शब्दार्थ या धाग्यात या शब्दाचा अर्थ पाहण्याचे साहस माझ्यात नाही) पाहून तिने सोडलेला सुस्कारा डॉक्टरांनी आता पेशंटची आशा नाही असे म्हंटल्यावर सोडलेल्या सुस्कार्‍यासारखा होता.

मी 'जातीच्या कलाकाराला घरातून विरोध होतोच' हे बटाट्याच्या चाळीतले कोणाचेतरी विधान घोळवत बाहेर पडलो.

मल्टीस्पाईस हे उपहार गृह बंद करणार आहेत असे समजते. एकेकाचा चॉईस, आपण काय करणार! आतल्या गोटातून असे माहीत झाले आहे की 'एक' पेक्षा कमी जण गटगला येणार असतील तरच जागा देऊ असे त्यांचे नवीन रिव्हाईस्ड धोरण आहे जे अजून मान्य होत नाही आहे.

तर तेथे पोचलो तर साक्षात भारतातील अ‍ॅडमीन बसलेले होते. आरंभालाच तोफ उडणार समजल्यावर माझी मान मुळातच तेरापेक्षा अधिक अंशानी कलून माझ्या उजव्या खांद्यावर लटकायच्या बेतात आली. भारतातील अ‍ॅडमीन एकटेच असल्याने त्यांना मला झापण्याचा आनंद मिळणार नाही हे त्यांच्या व माझ्या लक्षात आल्यावर आमच्या गप्पांना 'नैमित्तीक कराराचे'स्वरूप प्राप्त झाले.

क्राईम पेट्रोलमध्ये बव्हंशी चाणाक्ष इन्स्पेक्टरचे व आवश्यकता भासल्यास किलरचे काम करण्यास शोभेल अशी एक व्यक्ती तेवढ्यात तेथे हजर झाली व 'हे बेफिकीर' अशी भारतातल्या प्रशासकांनी ओळख केल्याकेल्याच म्हणाली की 'मला माहितीय'! मला (खोटे का बोलू?) आनंद झाला. त्या व्यक्तीचे नांव मयुरेश असल्याचे अंतर समजले.

तोवर कैवल्य नावाचे एक सदस्य आले व त्यांनी या दोघांदेखत मला 'भुक्कड छान रंगतीय' असे सांगीतले. मी भीतीने गोरामोरा झालो व त्यांना ' असुदे असुदे' अशी मान हालवून 'त्यावर नंतर बोलू' असे सुचवायचा प्रयत्न केला. पण त्यातच त्यांनी आणखीन ज्वालाग्रही विधान केले. 'तुम्ही आता कादंबरी लेखन बंद केलेते की काय' असे ते विधान होते. अर्थातच मला 'अहो कसले लेखन बिखन. काहीतरी लिहितो आपला' असे म्हणावेच लागले.

माझी सुटका झाली ती प्रत्यक्ष सर्वेसर्वांना घेऊन चिनूक्स अवतरल्यावर! अ‍ॅडमीन आले ते सरळ माझ्याच शेजारी बसल्याने (पुन्हा खोटे का बोलू?) मला मी उपाध्यक्ष असल्याप्रमाणे वाटू लागले. त्यांच्या चेहर्‍यावर 'असूदेत रे, आमची पॉलिसी क्षमाशील असल्याने तू काहीही लिहीत असलास तरी घाबरू नकोस' असे भाव होते. ते स्थानापन्न होईपर्यंत शैलजा व संघमित्रा आल्या. मी तेथे दिसल्याने त्या बोलत नव्हत्या हे अत्यंत संयुक्तिक होते.

तोवर काही पिशव्या घेऊन व लिंबू यांना घेऊन लिंबी यांचा प्रवेश झाला. लिंबूभौंनी सर्वांसाठी 'लिंबीच्या शेतातील तांदूळ - ईंडम' असे लिहिलेल्या (कोकणस्थ आकाराच्या) पिशव्या आणलेल्या होत्या. त्यांचे वाटप झाले तेव्हा अ‍ॅडमीनना चुकून लहानशी पिशवी गेल्याचे समजल्यावर लिंबूभौ फडफडत उठले व मोठी पिशवी अ‍ॅडमीनच्या हातात दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. लिंबूभौंना मी 'शेंडी ठेवण्यामागे माझी जानवे गझल कारणीभूत आहे का' असे विचारून विनोद करण्याचा क्षीण प्रयत्न केला व मी एकटाच खदखदून हासलो. मला एकटे हसायची सवय आहे.

किंचित तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले असताना (हे फक्त लिहायचे असते म्हणून लिहीत आहे) एका तरुणाचा प्रवेश झाला. या तरुणाच्या चेहर्‍यावरील हासरे भाव पाहून व मला भेटल्याचा (कसा काय कोणास ठाऊक) आनंद झालेला पाहून आपल्या करोडो फॅन्सपैकी एक आल्याचे मला तातडीने जाणवले. मात्र पुढच्याच क्षणी माझा भ्रमनिरास झाला. (भ्रमनिरास हा शब्द गझलेत वापरायचा राहूनच गेला आहे - अरेरे चा स्मायली).

भ्रमनिरास होण्याचे कारण हे की तो हासरा तरुण 'मास्तुरे' निघाला. माझी जामोप्या यांच्याशी (कशी काय माहीत) आंतरजालीय मैत्री झाल्याने मी त्या तरुणाला पाहून बिचकलो. पण त्यांचे (निदान त्यावेळेसचे) धोरण दिलदारतेवर आधारीत असावे.

यानंतर मी अ‍ॅडमीन कोठे असतात, भारत भेटीत ते काय करणार आहेत याची चौकशी केली. अ‍ॅडमीननी सर्व प्रश्नांना हासत उत्तरे दिली व नंतर मी त्यांची माफी मागून (व बायकोच्या सुस्कार्‍यांची आठवण येऊन) काढता पाय घेतला. अशा रीतीने माझ्यापुरते गटग छानपैकी झाले.

आता खोटा रिपोर्टः

==============================

साजिरा यांच्याशी मस्त गप्पा झाल्या. मी 'उद्योजक'या ग्रूपचे सदस्यत्व घेणार म्हणजे घेणार! मयुरेश आणि साजिरा यांनी मस्त माहिती दिली. अ‍ॅडमीन अत्यंत मिळून मिसळून आणि मस्त बोलत होते. मास्तुरे यांना पाहून खरच अतिशय आनंद झाला. ही इज यंग अ‍ॅन्ड व्हेरी व्हेरी प्लीझिंग पर्सनॅलिटी. लिंबूभौ व मिसेस लिंबू हे पार निगडीहून आले होते. नवल वाटले. लिंबूभौ स्वतःसाठी अतिशय वेगळे क्षेत्र निवडून त्यात कार्यरत आहेत. याची कमाल वाटली. कैवल्य हे सदस्य मला तरी कुठे दिसले नव्हते प्रतिसादात वगैरे पण ते मायबोलीवरील सर्व काही वाचत असतात असे म्हणाले. ते, मिल्या आणि हिम्सकूल बहुधा एकाच कंपनीत असावेत. चिनूक्स, शैलजा आणि संघमित्रा यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. हाय हॅलो झाले. थांबायची इच्छा होती, पण खरच एक कार्यक्रम ठरलेला होता.

अ‍ॅडमीन, खरंच मजा आली तुम्हाला भेटून! Happy

धन्यवाद

-'बेफिकीर'!

>>> भ्रमनिरास होण्याचे कारण हे की तो हासरा तरुण 'मास्तुरे' निघाला.
>>> मास्तुरे यांना पाहून खरच अतिशय आनंद झाला. ही इज यंग अ‍ॅन्ड व्हेरी व्हेरी प्लीझिंग पर्सनॅलिटी.

Biggrin

बेफिकीरमामा,

तुम्ही पहाटे अडीच ते तीन या दीर्घ कालावधीत निद्रेत असताना तुमच्या स्वप्नात साक्षात झक्की आले होते की काय? Rofl

असो. मी तुम्हाला पाहिल्यापाहिल्याच ओळखले (चेहर्‍यावरच्या अत्यंत "बेफिकीर" हावभावांवरून). पण मी आल्यावर केवळ २ मिनिटातच तुम्ही का प्रस्थान ठेवले? मी तुम्हाला गझल म्हणायची केलेली नम्र विनंती देखील तुम्ही झुरळ झटकावे तशी झटकून टाकली. 'मी तयारी करून आलो नाही' असे काहीतरी फुसके कारण तुम्ही देऊन गझल ऐकवायला नकार दिलात. तुमच्यासारख्या शीघ्रकवीला कशाला हवी तयारीबियारी! सरळ एक गझल चटकन रचून ऐकवायची. आम्ही तुमच्या गझलेचे कौतुकच केले असते. उगाचच कडक "पंढरपुरी" जर्दासारखी कडक टीका केली नसती. मी तुमच्यासाठी १०८ वेळा गायत्रीमंत्राचे पारायण करून मंत्राळलेले खास जानवे मखमली डबीतून आणले होते. पण तुम्ही लगेचच निघून गेल्यामुळे तुम्हाला पवित्र जानवे प्रदान करण्याचा समारंभ करता आला नाही. दुदैव तुमचं! Lol

असो. मी उपस्थित असलेले हे पहिलेच गटग. बरेच आयडी याची देही याची डोळा पहिल्यांदाच पाहिले. दस्तुरखुद्द ह.भ.प. लिम्बूशास्त्री सहदारा उपस्थित होते. समीर, शामली, रामभाऊ, क्रिकेटवेडा फारएण्ड, मिल्या, मयूरेश, आमचा गाववाला पराग, अरभाट, आशूडी, शैलजा, आशुतोष, अरूण, कैवल्य, संघमित्रा, वरदा इ. अनेकांना पहिल्यांदाच भेटलो. ८ नंतर मला जावे लागले, पण अजून थांबलो असतो तर मजा झाली असती.

ज्यांनी फोटो घेतले असतील त्यांनी कृपया इथे टाकावेत. Happy

>>>> लिंबूभौंनी सर्वांसाठी 'लिंबीच्या शेतातील तांदूळ - ईंडम' असे लिहिलेल्या (कोकणस्थ आकाराच्या) पिशव्या आणलेल्या होत्या. <<<< Lol
"नुस्तेच लिहीलेल्या" आणल्या होत्या ना? आधीच कोकणस्थ आकाराच्या त्या, रिकाम्याच अस्तील बहुधा! नै का? Proud
[स्वगतः च्यामारी, आता यान्ना काय पूरग्रस्तान्ना हेलीकॉप्टरमधुन वरुन आभाळातुन खाली टाकून वाटतात त्या आकाराच्या सरकारी लेव्ही तान्दळाच्या पोत्यासम पिशव्या अपेक्षित होत्या का? Wink त्या पण दिल्या अस्त्या पण आधी पुर तर येऊदे Proud ]

मास्तुरे आले होते? कुठे होते? मला कसे दिसले नाही?
एवढ्या लोकांच्यात अर्ध्याहून अधिक लोकांशी बोलणं राहूनच गेलं म्हणा.

हायला!!! मला जरा उशीर झाला आणी माझी अर्ध्या मायबोलीशी भेट चुकली.. Happy अर्थात मला उशीर होण्यात त्यांचा हात नसला तरी त्यांचे जानवे कारणीभुत होते.. Happy
तरीही बाकीचे सगळे भेटले.. नवीन लोकात मास्तुरे, वरदा,कैवल्य आणी अ‍ॅडमीन याना पहिल्यांदाच भेटलो.. मास्तुरेंचे व्यक्तीमत्व आणी वागणे एकदम मनमोकळे आहे.. वरदा संशोधक वाटत नाही एवढी साधी आहे.. अ‍ॅडमीन खुप तरुण वाटतात.. Happy
लिंब्याने मला दिलेली तांदळाची पुडी आणी अ‍ॅडमीनने दिलेली चॉकलेट्स नंतर गायब झाली.. Sad
लिंब्याच्या हस्ते अ‍ॅडमीनना गजांतलक्ष्मी दिली तेंव्हा आयुश्यात पहिल्यांदाच लिंब्या स्वगत सोडुन दुसर्‍याने लिहलेले काही बोलला, हे बघुन भरुन पावलो..:)
मल्टीस्पाईस मधुन सगळे व्हाया हार्वेस्ट क्लब कलींगा ला पोहोचले तेंव्हा साजीरा, चिनुक्स, मयुरेश यानी माझी मुस्कटदाबी करुन फक्त जेवण मागवले.. त्याबद्दल निषेधाचा धागा लवकरच काढण्यात येईल.. बाकी बर्‍याच गोंधळानंतर अ‍ॅडमीनना वडापाव ऐवजी जेवण दिले याबद्दल समस्त पुणेकरांचे कौतुक Happy

>>> मास्तुरे आले होते? कुठे होते? मला कसे दिसले नाही?

मी ८ वाजताच खचकलो (जरा दुसरीकडे जायचे होते आणि ते पहिलीला माहिती नव्हते :डोमा:). तुम्ही बहुतेक ८ नंतर आलात.

मजा आली. मस्त वृत्तांत फारएण्डा. लिंब्याला तांदूळाबद्दल धन्यवाद.
तुडुंब जेवण हे ह्या गटगचे वैशिष्ट्य म्हणता येईल! Happy

'यापुढे निदान वर्षभर मंचुरियन खाणार नाही', ही अनेकांनी केलेली प्रतिज्ञा हेही या गटगचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

Pages