मलाईबहार ( बंगाली मिठाई )

Submitted by अगो on 7 March, 2012 - 09:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पेढ्यासाठी:
२५० ग्रॅ. रिकोटा चीज
१/४ कप साखर
वेलदोड्याची पूड आवडीनुसार
दोन चिमूट बेकिंगपावडर

मलाईसाठी :
एक छोटा डबा मास्करपोने चीज ( mascarpone cheese )
चवीनुसार एक-दोन चमचे साखर
केशर
वेलदोडा पावडर आवडीनुसार
सजावटीसाठी बदाम,पिस्ते किंवा साखरेची फुलं,मणी इत्यादी.

क्रमवार पाककृती: 

अवन १८० डिग्री से. किंवा ३५० फॅ ला तापायला ठेवावा.
एका भांड्यात रिकोटा चीज, साखर, वेलचीपूड आणि बेकिंगपावडर एकत्र करुन घ्यावे.
मफिन पॅनमध्ये एकेक मोठा चमचा मिश्रण घालून अवनमध्ये ३० ते ३५ मिनिटे बेक करावे.

Ricotta cheese baked.jpg

पेढे बाजूने सोनेरी तांबूस दिसू लागले की सुरी घालून पाहावी. ती कोरडी बाहेर आली तर पेढे तयार आहेत.
आता हे पेढे गार करत ठेवावे ( फ्रीजमध्ये नव्हे. )

मलाई बनवण्यासाठी एका भांड्यात मास्करपोने चीज, आवडीनुसार एखाददोन चमचे साखर ( मी थोडे अगोडच ठेवले होते. ) वेलचीपूड, केशर असे सगळे एकत्र ढवळून घ्यावे.

पेढे गार झाले की त्यावर हे मलाईचे मिश्रण लावावे.
वरुन बदाम-पिस्त्याचे काप किंवा दुसरी आवडीची सजावट करावी.
मलाईबहार तयार आहे Happy

Malai bahar.jpg

वाढणी/प्रमाण: 
२५० ग्रॅ. रिकोटा चीजमध्ये साधारण ८-९ होतील.
अधिक टिपा: 

मला बंगाली मिठाई अतिप्रिय आहे. मध्ये नेटवर रिकोटा चीजच्या रसगुल्ल्याची रेसिपी मिळाली पण केल्यावर लक्षात आलं की हा प्रकार रसगुल्ल्यासारखा लागत नाही. मग विचार केला ह्याची रसमलाई करुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा बंगाली मिठाईचाच वेगळा प्रकार करता येईल. त्यातून तयार झाली ही मिठाई 'मलाईबहार' Happy
बेक केलेले असल्यामुळे काही पेढे तांबूस होतात पण त्याने चवीत काहीही फरक पडत नाही. उलट ते छानच लागतात.
मास्करपोने चीज गोडसर सायीसारखे लागते. ते ह्या रेसिपीसाठी वापरायची कल्पना सुचली. ही कॄती करुन उरले तर सायीसारखे भाज्या, डिप्स ह्यात वापरता येते.
करायला एकदम सोपा, झटपट आणि तोंडात विरघळणारा हा पदार्थ करुन बघाच.
हा रिकोटा चीजचा रसगुल्ला नव्हे. बंगाली मिठाईचाच हायब्रिड प्रकार म्हणायला हरकत नाही.
भारतातल्या लोकांनी घरी करायच्या फंदात पडू नये. त्यापेक्षा हलवायाकडून बंगाली मिठाई आणून चापावी Proud

माहितीचा स्रोत: 
नेटवरची रिकोटा चीज रसगुल्ल्याची रेसिपी + स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगो, भन्नाट फोटो आहे. लगेच तुकडा तोंडात टाकावासा वाटतोय.कृती पण फार अवघड वाटत नाहीये. नक्की करुन पाहणार.

बापरे. आशिषने फोटो टाकला?
आशिष, तुम्ही केली का? Proud

सिंडी आणि आशिष- फोटो मस्तच. उरक !! Happy

मनःपूर्वक धन्यवाद सर्वांना. एवढ्या प्रतिक्रिया पाहून मूठभर मलई चढली Wink
प्रॅडी, मास्करपोने चीज केकमध्ये वापरायची आयडिया छान. ट्रायफल पुडिंगमध्ये वापरले आहे मी. मस्तच लागते.
सीमा, हा प्रकार चुकायची शक्यता नाहीच एवढा सोपा आहे. नक्की करुन बघ.
झंपी, रिकोटाचीज घातलेल्या पुरणपोळ्यांची आयडिया वेगळीच आहे. एक स्वतंत्र रेसिपी म्हणून टाका ना इथे.
सिंडी आणि आश्चिग खरंच उरक सॉलिड आहे. मस्त दिसतेय मिठाई Happy आश्चिगनी बहुतेक थोडी जास्त बेक केली असावी म्हणून केशरी रंग आलाय.

शूम्पी आणि झंपी, तुमच्या सजवायच्या आयडिया सही आहेत. ही मिठाई वेगवेगळ्या साच्यात घालून तसेच वरची मलाई आयसिंग गनमधून वेगवेगळ्या नक्षीत पाडून एकदम प्रोफेशनल दिसेल तसंच वेगळे रंग, फ्लेवर्स, प्रयोगाला खूपच वाव आहे. इथल्या कलाकार लोकांनी टाका असे वेगवेगळे छान छान फोटोज Happy

वुमन्स डे असल्याने लिंगनिरपेक्ष भाषेत आमचे (अनु, मी, जय) लेबर डिव्हीजन सांगतो. एकाने केली, एकाने फोटो काढला, एकाने फोटो टाकला - खाल्ली (चवीने) सगळ्यांनी.

साइझ कमी करुन बघितली का ? पेंट ब्रशमध्ये फाइल ओपन करुन रिसाइझ करा आणि सेव्ह अ‍ॅज जेपेग करा.

सुरेख फोटोसह चविष्ट पाककृती लिहायची आणि वरून लिहायचं की भारतातल्या लोकांनी घरी करायच्या फंदात पडू नये. This is not fair!!

सिंडी आणि aschig चा उरक भारी आहे. मस्त दिसताहेत तुमच्याही मलईबहार Happy

थँक्स अगो इतकी छान आणि सोपी रेसिपी दिल्याबद्दल. माझ्या दोन्ही मुलींनी (अगदी कधी चीज न खाणारीनेसुध्दा) चट्टामट्टा केला.

DSC_0165-2.JPG

प्राजक्ता३०, मस्तच झालीय मिठाई. त्या वरच्या आख्ख्या बदामामुळे अगदी हलवायाच्या दुकानात मांडून ठेवलेली असते तशी दिसतेय Happy

मंजूडी, अगं भारतातल्या मिठाया इथे मिस करतो म्हणून तर अशा हायब्रिड मिठाया शोधून काढायचा अट्टहास Happy

हे बघा.. आमचं मलाई बहार ! रंगसंगती गंडली जरा.. पण चव चांगली होती..

आकार पाहून घरी ह्याचं 'मलाई बॉम्ब' असं नामकरण झालं.. Proud

अगो.. तुझ्या डेजर्टच्या रेसिप्या भारी असतात ! मागे मँगो पायची रेसिपीपण सही होती..

पग्या, ते बदामाचे काप सुतळी बॉम्बसारखे वरून लावले आहेत, नामकरण योग्यच आहे Proud
पण एकदम सही दिसतेय मलईबहार! एकदम उचलून तोंडात टाकावी असं वाटतंय.

>>एकदम उचलून तोंडात टाकावी असं वाटत>><<

अरे बापरे! अहो वजनाचा विचार करा की जरा..( अहो तुमच्या नाही, बर्फीच्या..) Proud

व्वा! अगो..........अरुषची मज्जाच असणार मग.....एवढी सुगरण आई.............!
असो भारतातल्या लोकांसाठीची सजेशन मान्य......आता नगरातला बंगाल्या शोधते.........मिठाईवाला गं(गो)!
लेकीला मात्र पाठवलीच ही रेसिपी!

Pages