खांडवी

Submitted by मंजूडी on 24 February, 2012 - 02:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळाचा रवा - २ वाट्या
बारीक चिरलेला गूळ - २ वाट्या
ओलं खोबरं - १ वाटी शीगोशीग भरून
पाणी - चार वाट्या
दोन मोठे चमचे साजूक तूप
किंचीत मीठ
जायफळपूड किंवा सूंठपूड - अर्धा चमचा
बदाम/ काजू/ आक्रोड इत्यादी सुकामेवा सजावटीसाठी आवडीनुसार

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत पूर्ण वाळवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रवा काढतात. असा रवा दोन वाट्या घ्यावा. किंवा असा घरी रवा काढायच्या ऐवजी इडली रवा दोन वाट्या घ्यावा. इडली रवा वापरणार असाल तर तर तो मोजून घेऊन स्वच्छ धुवून पूर्ण वाळवून घ्यावा.
रवा कढईत मंद आचेवर कोरडाच खमंग भाजावा.
२. चार वाट्या पाणी मोजून घेऊन उकळण्यास ठेवावे.
३. रवा खमंग भाजला गेला की त्यावर उकळते पाणी सावकाश ओतत नीट ढवळून घ्यावे.
४. आच मंद ठेवून रव्यावर झाकण ठेवून द्यावे.
५. एक दणदणीत वाफ आली की झाकण काढून त्यात गूळ घालावा. साधारण पाव चमच्यापेक्षा किंचीत कमी मीठ घालावं. एकदा नीट ढवळून ओलं खोबरं आणि जायफळ किंवा सूंठपूड घालावी. सगळं मिश्रण व्यवस्थित ढवळून त्यावर झाकण ठेवून द्यावं.
६. आवश्यक वाटल्यास रवा शिजण्यासाठी पाण्याचा हबका मारावा. चांगल्या दणदणीत वाफा आल्या की मिश्रणाच्या कडेने तूप सोडावं.
७. एका ताटाला थोडं तूप लावून त्यावर तो सांजा थापावा. साधारण पाव इंच जाडी असू द्यावी. गरम असतानाच त्यावर सजावटीसाठी आवडीप्रमाणे सुकामेवा किंवा ओलं खोबरं पेरून दाबावं. गार झाल्यावर आवडीच्या आकारात वड्या कापाव्यात.

वाढणी/प्रमाण: 
दोन वाट्या रव्याच्या साधारण २५ ते ३० वड्या होतील.
अधिक टिपा: 

नारळाचा सढळ वापर केलेलं हे खास कोकणातील पक्वान्न आहे.
खायला देताना खांडवीवर पातळ साजूक तूप घालून देतात.

माहितीचा स्रोत: 
आजी, आई, मावश्या, माम्या
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा आवडता पदार्थ आहे. ट्रीपला न्यायच्या ड्ब्यात खांडवी किंवा गूळ्पोळी ठरलेली असायची. Happy

मंजूडे, अग गेले चार-पाच दिवसांपासून मला खांडव्यांची आठवण येत होती. आणि कालच मी आस्वादमध्ये दुधी हलवा घ्यायला गेले होते तर तिथे खांडवीही होती ती घेतली. आणि आज तु ही रेसिपी टाकलीस. काय योगायोग! Happy

सोपी आहे की रेसिपी. तांदळाचा रवा मिळतो का बाजारात?

याच घटक पदार्थांना घेऊन फक्त खोबर्‍याच्या जागी नारळाचं दूध घालून केली तर सांदणी बनतात (बहुधा). पण ते पीठ एकत्र करून आडव्या ताटल्यांत ओतून वाफवतात.

इडली रवा घे मामी. Happy

सांदणं बरक्या फणसाची करतात. बरक्या फणसाचे गरे चाळणीवर फिरवून त्याचा रस काढतात आणि त्यात तांदुळाचा रवा मिसळून इडलीसारखे वाफवतात आणि ती सांदणं नारळाच्या दुधात बुडवून खातात, जोडीला घरच्या कैरीचं ताजं लोणचं.. स्लर्र्रर्र्र्र्प!! Happy

सोप्पी वाटतेय करायला. चव बघण्यासाठी तरी करुन बघावीच लागेल आता. सगळे जिन्नस पण मिळू शकतिल.

सोप्पी आणि चवदार प्रकार आहे हा.
आमच्याकडे आधी पाण्यात गूळ/खोबरे घालतात आणि मग वरुन रवा घालतात.
तांदळाचाच रवा वापरावा लागतो. गव्हाच्या रव्याची चिकट होतात.

सह्ही.

पुर्वी नागपंचमीला नेहमी करायची आई. नागपंचमीला जी काही स्वैंपाकाची कामे करायची नसतात ती वगळून होणारा गोडाधोडाचा पदार्थ म्हणून आई करायची. एकदा मी आगाऊपणे विचारले होते, "नागाची शेपटी भाजू नयेत म्हणून पोळ्या नाही करायच्या पण खांडवी करताना पण तू गॅस पेटवतेसच ना? मग नागाची शेपटी भाजेल ना." "मग नको करू का खांडवी?" या पाच शब्दीय प्रश्नानेच आईने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. मग तो प्रश्न मनाच्या जितक्या खोल जाता येईल तितक्या खोलवर पुरून टाकला मी Happy

इडली रवा वापरणार असाल तर तर तो मोजून घेऊन स्वच्छ धुवून पूर्ण वाळवून घ्यावा. -

धुतला नाही तर चालेल का.? सध्याच्या हवेत वाळणार नाही.आणि वाळेपर्यंत माझा उत्साह टिकला नाही तर काय घ्या !

सध्याच्या हवेत वाळणार नाही.>> धुवून टाकल्यावर साधारण तासाभरात जितका वाळेल तितक पुरेल... नंतर तो रवा कढईत खमंग भाजायचा आहेच.

फोटो हवा होता, नेमके समजले असते, कोणाकडे असेल तर टाका ..

कारण मी आधी गुजराती खांडवी समजून धाग्यात शिरलेलो..

https://www.google.co.in/search?q=khandvi&biw=1366&bih=663&source=lnms&t...

फोटोसाठी धन्यवाद .. मस्त तोपासूच आहे

खोबर्‍याच्या वड्या म्हणजे पण हेच ना .. की असेच काहीसे ना.. त्याही अश्याच पांढर्‍या वड्या असतात.. म्हणजे गूळ नाही साखर असावी.. आणि रवा असतो की नाही.. बरेच दिवस आईने केल्या नाहीत तर कन्फ्यूज झालोय..

मी जो फोटो पाठवला आहे ती नारळाचं दुध घालुन केलेली आहे. ताजा फोडुन लगेच खरवडलेल्या नारळाचं दुध काढायचं, अगदी दाटसर असलं पाहिजे आणि गुळ घालताना ते घालुन चांगल मिक्स करायचं.
आमच्या वाडीतल्या नारळाला पण छान चव आहे, त्यामुळे घरी पाहुणे असतील तर त्यांची हीच फर्माईश असते.

माझी रिक्षा. http://www.maayboli.com/node/44580 Happy

केश्वे, त्या धाग्यावरही नागपंचमीची आठवण काढली आहेस Lol नागपंचमी आलीच. कर बरं आता यंदा खांडवी.

Srd काजूचे तुकडे ,खोबय्राचे हळदिचे पान/ओली हळद , तुकडे घालून काकडीचे खांडस कसे करतात?>>>>>>>

काकडी सोलुन, किसुन घ्यायची त्यात भाजलेल्या जीर्‍याची पुड, ओलं खोबरं, थोडा गुळ, मीठ, आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा, काजुचे बारीक तुकडे, सगळं कालवुन घ्यायचं, बाईंडीग साठी थोडं तांदुळाचं पीठ घालायचं आणि हळदीच्या पानावर थापुन वरुन पुन्हा एक हळदीचं पान ठेवायचं आणि मोदकासारखं वाफवायचं.
याला आम्ही पातोळे म्हणतो. गरम गरम पातोळे तुप घालुन खायचे.....तोपासू
यात पण हळदीच्या पानाचा खुप स्ट्रॉंग वास असतो, मला तो आवडतो. पण माझ्या बहीणीला एवढा स्ट्रॉंग आवडत नाही मग आई त्याच पानावर पुन्हा लावायची आणि मग तिला द्यायची.
लहानपणीची आठवण झाली. तेव्हा खुप वेळा आई करायची.

मंजूडी, मस्त रेसिपी, मुग्धा फोटो बघून तोंपासु. Happy
अंजू, उपवासवाली खांडवी आई मला कधी कधी डब्यात द्यायची त्याची आठवण झाली. Happy

काजूचे तुकडे ,खोबय्राचे हळदिचे पान/ओली हळद , तुकडे घालून काकडीचे खांडस कसे करतात? <<< Srd, तांदूळाचा रवा सेम वरील पद्धतीनेच पण ह्यात जेवढा रवा त्याच्या डबल काकडीच पाणी मोजून घेतात आणि किसलेली काकडी + गूळ + काजू तुपात तळून+ हळद. ह्यात ओल खोबर नाही घातल तरी चालत. आई नाही घालत. पिकलेली मोठी काकडी असते आणि बाहेरसुद्धा खूप महिने राहते, साध्या काकड्या नाही वापरत. मिश्रण टोपात ओतताना त्यात तळाला तूप लावलेली हळदीची पान लावतात, तसेच टोपाच्या साईडलाही पान लावतात आणि त्यात्य मिश्रण ओततात. मिश्रण ओतल्यावर वरून सेट करून त्यावर पुन्हा तूप लावलेली ह.पा. लावतात. ही खांडवी होत असतान घरभर मस्त वास दरवळतो. आताच तोंडाला पाणी सुटले. ह्या काकडीची खांडवी आणि पातोळ्या खायची ईच्छा होत आहे. Uhoh

मुग्धा, तुमची तिखट पातोळीची रेसिपी मस्त आहे. आमच्याकडे पातोळ्या गोडच असतात. तांदूळाच्या पिठाची उकड हळदीच्या पानावर पसरवतात आणि त्यावर मोदकासाठी जे ओल्या खोबर्‍याच सारण बनवतात ते एका साईडवर पसरवतात आणि फोल्ड करून वाफवतात. Srd, तुमच्यामूळे ह.पा.च्या पदार्थांची आठवण झाली आणि आता खावेस वाटतात. Happy
सॉरी, मंजूडी थोड अवांतर लिहिल. वडाळ्याच्या जीसबी गणपतीच्या बाहेर जे स्नॅक्स कांऊटर असतात तिथे ह्या वरील पद्धतीच्या पातोळ्या मिळतात. पातोळ्या आई घरी बनवते त्यामूळे तिकडचा कधी खाल्ला नाही. मला तिथला पट्टी समोसा खूप आवडतो.

काकडीचे 'धोंडस' असतात, गोड आणि तिखट दोन्ही Happy
'खांडस'मार्गे भीमाशंकरला जातात Proud

पातोळ्या हे गुळचुनाचं पक्वान्न आहे म्हणजे ओलं खोबरं आणि गुळाचं सारण असलेलं पक्वान्न, जे आरतीने लिहिलंय त्याप्रमाणेच करतात.

Pages