दह्यातली भाकरी

Submitted by अल्पना on 23 February, 2012 - 08:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ ज्वारीच्या शिळ्या भाकर्‍या, वाटीभर दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, चमचाभर दाण्याचे कुट, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, फोडणीसाठी तेल, जीरे, हिंग.

क्रमवार पाककृती: 

शिळ्या ज्वारीच्या भाकर्‍यां अगदी बारिक कुस्करुन घ्या. मिक्सरमधून बारिक केल्या तरी चालेल. एका भांड्यात कुस्करलेली भाकरी, दही, बारिक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर आणि दाण्याचं कुट एकत्र करा. त्यावर हिंग-जिर्‍याची फोडणी घाला.

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

एरवी फोडणीच्या पोळीसारखीच फो.ची भा. पण करतात. पण फोडणीची भाकरी बरीच कोरडी लागते म्हणून तोतरा बसू शकतो. म्हणून मग आई अश्या पद्धतीने भाकरीचा कुस्करा बनवते.
यात गाजर, बीट कीसून आणि कच्चे मटाराचे कोवळे दाणे घालून बदल करता येतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना, मस्त, मस्त!
आज्जी करायची हे. कितीतरी दिवस केलंच नाहीये हल्ली.
आता नक्की करणार. तसंच भाकरीवर तिखटाची पूड आणि तेल किंवा दही घालून खायचं. अहाहा!
किंवा ताजं खोवलेलं खोबरं + हिरवी मिरची बारीक कापून + मीठ हे हाताने चुरडून, त्याची चटणी आणि भाकरी!

वा वा! मी कच्चा कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर आणि दही असं एकत्र करते. फोडणी घालत नाही. भयंकर आवडता पदार्थ. ही करता यावी म्हणून दोन भाकर्‍या जास्त करून मुद्दाम शिळ्या करते. Happy

मस्त प्रकार. माझ्या अतिशय आवडीचा.

हेच सगळं पण कधी कधी मी ताक (अगदी पातळ नाही) घालते. सरसरीत पण छान लागतं खायला.

माझ्याही आवडीचा प्रकार. कच्चा कांदा बारीक चिरून घातला की अजून मस्त लागते दह्यातली भाकरी. वरून खमंग फोडणी. अहाहा!
सायो, भाकरी जमली नाही तरी चालते! फक्त चांगली भाजली गेली की झालं. कुस्करली की कसं कळ्णार?
Wink

दही न घालता थोड जास्त पाणि घालून करते नेहमी. आता बघेन अशी करुन.

सायो, अगं भाकरी न येणार्‍याना उलट पर्वणी आहे. माझ्या भाकर्‍या चांगल्या होत नाहीत इथल्या पीठाच्या. मी बरेचदा फोडणीसाठी खास करते. Happy

मस्त..
मी कच्चा कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर आणि दही असं एकत्र करते >> वरुन चळचळीत फोडणी अहाहा.. बादवे, आमच्याकडे ह्याला तुक्कडखीर म्हणतात.. जबरदस्त आवडता पदार्थ!
सायो, भाकरी नीट जमली नाही तरी हा पदार्थ भारी होतो .. कारण भाकरी कुचकरायचीच असते शेवटी.

अशा रेसिपीज देऊ नये... ज्यांच्याकडे भाकरीचे पीठ नसते त्यांची किती पंचाईत होते, याची काही कल्पना आहे का तुला अल्पना? Happy

एकदम चविष्ट!!!

ज्यांच्याकडे भाकरीचे पीठ नसते त्यांची किती पंचाईत होते, याची काही कल्पना आहे का तुला अल्पना?<< +१ Lol

माझ्याकडे पण नसतं ग भाकरीच पीठ नेहेमी. यावेळी पोळ्यावाल्या मावशींचा मुलगा भोपाळहून घेवून आला ज्वारीचं पीठ. ते पण संपलं काल. आता घरून येणारं कोणी असलं कि त्यांना सांगावं लागेल.

एकदम मस्त. Happy खूप वर्षे झाली अशी भाकरी खाल्ली नाही. आजी बनवून द्यायची. आजच २-३ बाजरीच्या बडवून ठेवते म्हणजे सकाळी करता येईल. Happy ज्वारी आमच्याकडे कबुतर ग्रेड मिळते.

हो, शिळी भाकरी अप्रतिम लागते. आमच्याकडे कडक भाकरी बनवतात. चुलीच्या मागे ठेवून एकदम कडक करतात अशा भाकर्‍या तीन चार दिवस टिकतात. त्यांचा असा कुस्करा सही लागतो.

मला ज्वारीची भाकरी पायजेल. Sad

मी आज रात्री भाकरी करणार, उद्यासाठी उरवणार आणि सकाळी पोटभरून दहीभाकरीचा नाश्ता करून कामाला जाणार... Happy

Pages