राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोकजी - अति उत्तम लेखासाठी मनापासून धन्यवाद.
'बेफिकिर' व 'स्वाती आंबोळे' यांच्या प्रतिसादाला संपूर्ण अनुमोदन.

अवांतर - पेशवाई संपुष्टात आली तेव्हाच्या सर्व गोष्टी वाचायला खूप आवडेल. दुसरा बाजीराव हा भित्रा, पळपुटा म्हणून प्रसिद्ध असताना श्री. ना सं इनामदारांनी काही ऐतिहासिक कागदपत्रांचा दाखला देऊन हा आरोप खोडायचा प्रयत्न केला होता - हे सर्व जाणून घ्यायला खूप आवडेल.

अशोकराव,

ते जुन्या मढ्याचं एकदम पटलं बघा! कुणाचं काय बघायचं याचं यथास्थित आकलन होणं जरुरीचं आहे. लोकांना लोकमान्यांचा कित्ता घेण्याऐवजी अडकित्ता घेण्यात अधिक रस असतो! Happy

तसं बघायला गेलं तर वीरांना शृंगार शोभून दिसतो. मात्र प्रजाहिताच्या दृष्टीने राज्यकर्त्याने स्वत:च्या इंद्रियांवर नियंत्रण राखणं अतिशय महत्त्वाचं आहे.

आ.न.,
-गा.पै.

लेख अन प्रतिसादांतून उमटलेल्या शंका/प्रश्नांचे समाधान अतिशय आवडले. Happy इतिहास इतक्या रंजक भाषेत लिहीलेला आहे की अजून खूप खूप वाचायला आवडेल. Happy पानिपतही आता वाचते. Happy

परत एकदा नॉन - जजमेंटल दृष्टीकोनाबद्दल 'स्टॅण्डिंग ओव्हेशन' आणि आभार. Happy

वरदा, त्या काळचे माबो Lol

अतिशय आवडले लेखन! असेच त्याआधीच्या काळातील स्त्रियांबद्दल - म्हणजे जिजाऊंपासून पुढे- वाचायला आवडेल.

एक पॅटर्न जाणवला तो म्हणजे आईच्या हयातीत मुलाने प्रचंड सत्ता काबीज केली/बर्‍याच भागावर त्याची सत्ता होती असे फक्त जिजाबाई-शिवाजी आणि राधाबाई-बाजीराव यांच्याबाबतीतच झालेले दिसते.

दुसरे म्हणजे यातील बर्‍याच स्त्रिया जेमतेम २५-३० पर्यंतच जगलेल्या दिसतात. त्यात या पेशव्यांच्या बायका. मग त्यावेळच्या सर्वसाधारण लोकांचे (किंवा सर्वसाधारण स्त्रियांचे) आयुष्यमान किती असावे असा प्रश्न येतो.

गोपिकाबाईंच्या बाबतीत जे लिहीले आहे त्यात एक शंका - त्याकाळात एकापेक्षा जास्त बायका करण्याची पद्धत होती. मग एक बायको मनाविरूद्ध करावी लागली (छत्रपतींचे म्हणणे मान्य करण्यासाठी) तर एवढा विरोध का केला असेल त्यांनी? की ही पहिली बायको असणार होती, म्हणजे पुढे तिचा मुलगा पेशवा झाला असता म्हणून असावे?

मुळात शिवाजीच्या इतिहासाच्या मानाने पेशवाई काळाचे आमचे वाचन कमी, त्यात या स्त्रियांबद्दल तर फारशी माहिती नव्हतीच. या लेखामुळे ती मिळाली. अत्यंत सुंदर लेख!

चांगला लेख आणि प्रतिसाद. माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद !

असेच त्याआधीच्या काळातील स्त्रियांबद्दल - म्हणजे जिजाऊंपासून पुढे- वाचायला आवडेल. >>> माझ्याकडूनही ही विनंती.

अप्रतिम खजिना आहे हा...
धन्यवाद अशोकराव ...:)
ईतिहास मला पण लहानपासुन आवडतो.फक्त रंजक आहे म्हनुन नाही तर तो रक्तात आहे अस वाटत.

तुमचे लेख अजुन येऊ द्यात. Happy

फारएण्ड ~

हा एक चांगला मुद्दा की त्या काळात मग 'सरासरी' आयुर्मान काय असेल ? प्लेग, टीबी हे दोन 'दादा' रोग त्या काळात चलतीत होते असे म्हट्ल्यास अतिशयोक्ती नाही. [प्लेगने तर अगदी लोकमान्य टिळकांच्या काळापर्यंत पुण्यात ठाण मांडले होते आणि मग त्या 'चापेकर बंधू' चे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात झाले आहे पण त्यांच्या नावाबरोबर त्या इतिहासात प्लेग हेही एक कारण आहेच.] पेशवे, पेशव्यांचे कुटुंब आणि मोठमोठाले सरदार मानकरी सोडल्यास सर्वसामान्य जनतेला कशाप्रकारे 'मेडिकल फॅसिलिटीज' असतील याचा केवळ तर्क बांधणेच आपल्या हाती आहे. कारण जर 'क्षय' केवळ माधवरावालाच नव्हे तर थेट चिमाजीअप्पा आणि नानासाहेबालाही सोडत नव्हता तर मग चिल्लरखुर्द्यांची काय कथा !

अठराव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकातील पुण्याच्या लोकसंख्येचे [अंदाजित] आकडे ब्रिटिश रेसिडेन्सी कागदपत्रात उपलब्ध आहेत. त्यावरून पुण्याची लोकसंख्या दीड लाख ते पावणेदोन लाख अशी होती, ती १८५७ च्या राष्ट्रव्यापी स्वातंत्र्ययुद्धापर्यंत चक्क ८० हजारावर आली होती - [आजच्या 'पुणे' हिशोबात हा आकडा किती 'मिनी' वाटतो हे इथल्या पुणेकरानाच जाणवेल.]

याचाच अर्थ लोकसंख्येची ही क्षीणता केवळ परकीय आक्रमणानेच दिसत्ये असे नसून ती रोगराईवर मात करता येण्यासारखी ठोस, प्रभावी उपचारपद्धती अस्तित्वातच नव्हती म्हणूनच. 'इन्फंट मॉर्टेलिटी रेट" ची तर मोजदादच करायला नको, इतकी भयावह वाटणारी परिस्थिती होती. अल्पवयातच मुलीचे लग्न उरकून घेण्याची प्रथा असल्याने कित्येकदा ती शरीराने पूर्णपणे विकसित होण्याच्या अगोदरच तिच्यावर 'मातृत्व' लादले जाण्याच्या पद्धतीमुळे कित्येकदा ती बिचारी बाळंतपणात दगावली जाण्याच्या शक्यता खूप असूनही 'कुळाला दीपक देऊन गेली, मोठी पुण्यवान मुलगी !" असे तिला सोयिस्कर देवपण देऊन कुटुंबिय तिच्या नावाने आंघोळ करीत. त्या मुलाला घरातील हयात असलेली आजी, मावशी, आत्या सांभाळे, तर अजून मिसरूडही न फुटलेला तो ताजाताजा 'बाप' नव्या गौराईला घरी आणण्याच्या तयारीत लागे.

अशी ही स्थिती सर्वच थरात असल्याने आयुष्य प्रदीर्घ असणे शक्यच नव्हते.

२. गोपिकाबाईंचा विरोध ~ विषयातील या बाबीविषयी लिहायचे म्हणजे परत ते ब्राह्मण जात आणि त्यातील उपजाती यांच्याच असलेल्या श्रेष्ठत्वाच्या भूताला इथे बाफवर आणण्यासारखे होईल. त्यामुळे त्या विषयाच्या खोलात न जाता इतकेच सांगतो की गोपिकाबाई स्वभावाने अत्यंत तापट तसेच करारीही होत्या. सदाशिवरावांचा मृतदेह सापडला नाही म्हणून पुण्यात पार्वतीबाईनी सवाष्णपण त्यागले नव्हते ही गोष्ट गोपिकाबाईना फार खटकत होती. सांगितले तर आश्चर्य वाटेल पण इतिहासकारांनी असेही नोंदविले आहे की, पुण्यातील चुलते-पुतणे आणि देशस्थ-कोकणस्थ हे वाद सुरू करण्याचे श्रेय गोपिकाबाईकडे जाते. खुद्द त्यांचा मुलगा माधवरावालाही आईचे हे वागणे बिलकूल पसंत नव्हते, तसेच राज्यकारभारातही नको तितकी दखल देत राहते म्हणून तिला गंगापुरात स्वतंत्र वाडा बांधून कायमची ठेवली होती.

असो, हा 'मानापमाना' चा विषय खरोखरी डोके खाणारा आहे; तसेच आजच्या युगातील व्याख्येत तो कालबाह्य मानला पाहिजे, म्हणून इथेच थांबतो.

अशोक पाटील

'कुळाला दीपक देऊन गेली, मोठी पुण्यवान मुलगी !" असा तिला सोयिस्कर देवपण देऊन कुटुंबिय तिच्या नावाने आंघोळ करीत. त्या मुलाला घरातील हयात असलेली आजी, मावशी, आत्या सांभाळे, तर अजून मिसरूडही न फुटलेला तो ताजाताजा 'बाप' नव्या गौराईला घरी आणण्याच्या तयारीत लागे. >>> :(. असो.

प्रतिसादही मस्तच आहेत पाटिलबुवा. Happy
एक छानपैकी लेखमालाच करा ना पेशवाई/ उत्तर मराठा काळ याबद्दल. जातिपातीच्या वादांची चिंता करू नका. कारण जे असे वाद घालायला सुरुवात करतात त्यांना कसलंही निमित्त लागत नाही. तेव्हा तुम्ही तसं नाही लिहिलंत तरी त्यांची इच्छा असेल तर ते कुरापत काढायचा प्रयत्न करणारच. तुम्ही लिहा. माझ्यासारखे अनेक 'न्यूट्रल' आणि उत्सुक वाचक आहेत इथे - ज्यांना वादात रस नसून माहितीपूर्ण लेखांमधे रस आहे.

आणि आताच्या युगात अनेक कल्पना, मानसिकता कालबाह्य झाल्यात हे खरे पण ऐतिहासिक काळात त्या अस्तित्वात होत्या आणि तत्कालीन परिस्थितीच्या अनेकवेळा कारणही होत्या. तेव्हा त्यांची चर्चा न करण्यासारखं काय आहे? जे झालं ते भूतकाळात - त्याची चर्चा तटस्थ दृष्टीने आपण केलीच पाहिजे आणि इतरांनाही हा तटस्थपणा चर्चेत आणण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे असं नाही का वाटत?

अशोकजी, तुमच्या पोष्ट वाचतोयचं.

कौतुकच्या भाषेत सांगायच झाल्यास "अजुन येऊ द्यातं"

अशोकजी, उत्तम लेख. त्याशिवाय तुम्ही केलेले शंकानिरसनदेखील खूप सुंदर आहे.
छान माहिती मिळत आहे.

पेशवाईतील या स्त्रियाना लिहिण्यावाचण्याचे शिक्षण मिळत असेल तर "पुस्तकाला हात लावेल ती विधवा होइल" ही समजूत केव्हापासून आली? हे जाणून घ्यायला आवडेल.

तसेच या काळामधे पेशव्यांचे दक्षिणेकडच्या राजांबरोबर नक्की कसे संबंध होते? त्यानी पेशव्याना कधी मदत वगैरे केली का?

वरदा, चर्चेबद्दल अनुमोदन. उत्तम चर्चा सुरू असताना नत॑द्रष्ट लोकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चर्चा पुढे नेता येते. तशीच ती नेऊ या. Happy

अशोकजी, अप्रतिम धागा. निवडकमध्ये घेतलाय.. अशाच धाग्यांनी व प्रतिसादांनी मायबोली समृद्ध होतेय.

अशोककाका, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांवर एक स्वतंत्र लेख येवुद्या आता. त्यांच्याबद्दल खुप ऐकलेय. अधिकृत माहिती तुमच्याकडूनच मिळू शकेल याची खात्री वाटल्याने तुम्हाला विनंती करतोय.

@विशाल,
अधिकृत माहिती # तुमच्याकडूनच मिळू शकेल याची खात्री वाटल्याने तुम्हाला विनंती करतोय.
>> +१ आणि # च्या येथे 'तटस्थपणे' हा शब्द लिहायची परवानगी द्या !! Happy .....

इतिहासाची मला विशेष गोडी नाही आणि हा धागा इतिहास सदरात होता म्हणुन उघडला पण नव्हता. पण प्रतिसाद १०० च्या वर गेले म्हटल्यावर माझी उत्सुकता ताणली गेली. आहे तरी काय हे म्हणुन धागा उघडला आणि मी काय मिसलं याची जाणिव झाली.

अशोकजी, मानपासुन सांगतो, माझ्या सारख्या इतिहासात दगड असणार्‍याला तुमचा धागा आवडला यातच तुमच श्रेय आहे.

अतिशय संयत आणि अभ्यासपुर्ण लेख आहे तुमचा. प्रतिसाद ही तितकेच सुरेख.

आता तुम्ही लिहिलेला प्रत्येक धागा वाचणार हे तर नक्कीच.

असेच लिहीत रहा. आम्ही वाट पहातोय.

अनेक अनेक शुभेच्छा!!!

माझ्यासारखे अनेक 'न्यूट्रल' आणि उत्सुक वाचक आहेत इथे - ज्यांना वादात रस नसून माहितीपूर्ण लेखांमधे रस आहे.>>>>>>+ १००

सर्वश्री ~ शशांक, गामा पहिलवान, चारुदत्त, पराग, विशाल, हेम, गंधर्व, नीधप, प्रज्ञा, अनघा, नंदिनी, वरदा, गार्गी, महेश, आबासाहेब आदी सुहृद.

धन्यवाद तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि पुढील लेखनाची दिशा देण्यामागील अपेक्षाबाबतही. जरूर मी त्या अधिकच्या बाबीवर स्वतंत्र लेख लिहितो. फक्त होते असे की, केवळ 'चला या निमित्ताने आयती वादाची संधी आली पटलावर या तर घालू या दंगा" अशा मनोवृत्तीने कुणी प्रतिसाद देत गेले की मीच काय तुमच्यापैकीही कुणीही अशा लिखाणाचा लेखक निरुत्साही तर होतोच पण त्याला "हेल्पलेसनेस' जाणवतो ते अलगच.

सत्य इतिहास समजून घेण्यासाठी अंगी 'तटस्थता' असणे फार निकडीचे असते. इतिहासाचे दरवाजे उघडणे म्हणजे ते व्यक्तीपूजनासाठी जसे नकोत तसे व्यक्तीभंजनासाठीही असू नयेत. दोन्हीमध्ये तारतम्य भाव आणि मर्यादा असल्या तर वाचणारी व्यक्तीही तल्लीन होऊन वाचत जाते हे मी अनुभवले आहे. दोन्ही गोष्टीत अतिरेक करणारे लोक सांप्रत महाराष्ट्रदेशी आहेत ही बाब आता छुपी राहिलेली नाही. यात शुद्धसाधू किती आणि संधीसाधू किती याचा लेखाजोखा केल्यास दुसर्‍या गटातील "नैवेद्यापुरते हरिओम' करणारेच जास्त भेटतात.

तरीही या विषयातील अनेक कंगोर्‍यावर नक्की लिहित जाईन.

@ नंदिनी ~ आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यावर स्वतंत्र प्रतिसाद देतो.

अशोक पाटील

मला वाटतं आपण काहीजण तरी असं आपसात ठरवूयात की कुणीही विषयाबाहेरचा, अवांतर प्रतिसाद दिला, आणि तो कुठल्याही शब्दात असला, कितीही प्रक्षोभक किंवा त्रासदायक असला तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं. कशाचंही उत्तर द्यायला जायचं नाही. तो प्रतिसाद आलाच नाही असं समजून पुढे गेलं तर काही दिवसांनी याचा उपद्रव कमी होईल असं वाटतं. मी माझ्यापासूनच सुरुवात करते. मला मध्ययुगीन इतिहासातलं काही कळत नसल्याने मी फारशी चर्चेत उतरत नाही पण कुणी अगदी कैच्या कै विधानं केली की मलाही क्वचित मोह होतोच ठणकावून उत्तर द्यायचा. तर मी अशी उत्तरं या प्रतिसादापासून द्यायची टाळेन असा निश्चय करतेय. कस्काय? Happy

वरदाताई, तुमच्या वरील संदेशास अनुमोदन!

अशोकराव, इतिहास म्हणजे वस्तुस्थिती अधिक दृष्टीकोन. त्यामुळे आपण सारे ही चर्चा वस्तुस्थितीपुरती सीमित ठेवूया. Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages