राधाबाई, गोपिकाबाई, काशीबाई, अन्नपूर्णा, पार्वती, रमा, आनंदी

Submitted by अशोक. on 21 February, 2012 - 13:19

श्री.सेनापती यांच्या 'पानिपत' धाग्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादांनंतर नक्की जाणवले की मायबोलीच्याच सदस्यांना नव्हे तर ज्या काही बाहेरील लोकाना [जे टंकलेखन येत नाही म्हणून कोणत्याच संस्थळाचे सदस्य झालेले नाहीत] मी तो धागा वाचण्याचा आग्रह केला होता, त्यानीही या विषयाची व्याप्ती तसेच आजच्या जेट नव्हे तर नेट युगातही इतिहासाविषयी विविध वयोगटातील लोक (यात स्त्री/पुरुष दोन्ही आले) किती आस्था बाळगून आहेत हे पाहिल्यावर माझ्याजवळ समाधान व्यक्त केले असून इथून पुढेही हे लोक मायबोलीवर 'पाहुणे' या नात्याने वाचनमात्र का होईना, पण सतत येत राहतील.

"पानिपत" चा इतिहास आपण तपासला, पराभव कारणमीमांसेचेही विश्लेषण केले. या गोष्टी अजूनही व्यापकरित्या या पुढे चालत राहणार आहेत, त्याला कारण म्हणजे आपल्या लोकांच्या हृदयात शिवाजीराजांचे विजय जितक्या अभिमानाने वसले आहेत, तितक्याच तीव्रतेने पानिपत पराभवाचा 'सल'. हे लक्षण मानवी स्वभावाच्या जिवंतपणाची खूण आहे. ब्रिटिशांनी या महाकाय देशावर दीडशे वर्षे राज्य केले हा डाग आपण पुसून टाकू म्हटले तर 'काळ' तसे ते करू देत नाही. उलटपक्षी तो आपल्याला त्यातून 'तेज' प्रदान करतो आणि एकीच्या बळाचे महत्व किती प्रत्ययकारी होऊ शकतो हे स्वातंत्र्यलढ्यादरम्यान घडलेल्या विविध उदाहरणातून विशद करतो.

विजयातून उन्मत्त होऊ नये हे जसे एक सत्य आहे तितकेच पराभावातूनही नाऊमेद होऊ नये असेही शास्त्र सांगते. त्या शास्त्राच्या आधारेच रणातून परतणार्‍या वीरांच्या शारीरिक तसेच मानसिक जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करणारी प्रमुख व्यक्ती कोण असेल तर ती घरातील 'स्त्री'. पानिपतावरून पुण्यात परतलेल्या त्या शतशः विदीर्ण झालेल्या उरल्यासुरल्या सरदांराना आणि सैन्यांना पुढील वाटचालीसाठी स्त्री वर्गाकडूनच "उद्याचा सूर्य आशा घेऊन येईल" अशा धर्तीचा सहारा मिळाला असणार, कारण त्यानंतरही श्रीमंत माधवराव पेशव्यांनी अल्पकाळाच्या कारकिर्दीत मराठी सत्तेवर अबदालीने पाडलेला तो डाग काही प्रमाणात सुसह्य केला, हा इतिहास आहे. माधवरावांना रमाबाईची जशी सुयोग्य आणि समर्थ अशी साथ मिळाली, त्याबद्दल आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने वाचलेले असते. त्याला अर्थातच कारण म्हणजे रणजित देसाई यांची 'स्वामी' हे कादंबरी. या कादंबरीच्या यशाची चिकित्सा इथे करण्याचे प्रयोजन नसून या ललितकृतीने मराठी मनाला इतिहासाची गोडी लावली हे निखळ सत्य आहे.

१९६२ ते २०१२ ~ बरोबर ५० वर्षे झाली 'स्वामी' ला आणि त्या प्रकाशन वर्षापासून आजच्या तारखेलाही आपण 'पानिपत' या विषयावर भरभरून लिहितो आणि वाचतो ही बाब या वेगवान युगातही आपण त्या काळाशी किती घट्ट बांधलो गेलो आहे याचे द्योतक आहे.

या निमित्ताने काही सदस्यांनी अशीही एक प्रतिसादातून/विचारपूसमधून सूचना केली की, पेशवाईतील 'रमा' सारख्या सर्वच स्त्रियांची माहिती आपल्याला इथल्या चर्चेतून मिळाली तर वाचनाचा एक भरीव आनंद घेता येईल. त्यासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. इथे त्या स्त्रियांविषयी काही लिहिण्याच्या अगोदर आपलाच इतिहास नव्हे तर अगदी पौराणिक काळापासून "स्त्री' स्थानाचा त्या त्या घटनेतील सहभाग याचा मागोवा घेत गेल्यास असे दिसते की, 'रामायण = सीता", "महाभारत = द्रौपदी", "कृष्णयुग = राधा". ही प्रमुख नावे. पण यांच्याशिवायही अनेक स्त्रियांनी दोन्ही पक्षांकडून त्या काळात आपली नावे कोरलेली असतात, भले ती या तीन नायिकेंच्या तोडीची नसतील. तीच गोष्ट इतिहासाची. सध्यातरी आपल्या महाराष्ट्राचा इतिहास या मर्यादेतच विचार केल्यास शिवाजी आणि जीजाऊ ही मायलेकराची जोडी समोर येते. सईबाई आणि सोयराबाई या त्यांच्या दोन बायकांची नावे मराठी वाचकाला का माहीत आहेत तर त्या अनुक्रमे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांच्या माता म्हणून. पण शिवाजीराजे ज्यावेळी अफझलखान याच्या 'प्रतापगड' भेटीसाठी तयारी करीत होते त्यावेळी वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या सईबाईना देवाज्ञा झाली होती हेही ज्ञात नसते. निदान सईबाई ह्या संभाजीराजेची जन्मदात्री म्हणून किमान नाव तरी माहीत आहे, पण 'पुतळाबाई' ज्या महाराजांच्या शवाबरोबर 'सती' गेल्या त्यांच्याविषयी तरी किती खोलवर आपण जाणून घेतले आहे ? हा प्रश्न स्वतःलाच विचारला तर आपली पाटी त्याबाबत कोरी आहे असे दिसून येते. ह्या तिघींशिवायही "लक्ष्मी", "काशी", "सगुणा", "गुणवंती" आणि "सकवार" अशा ज्या पाच स्त्रिया राजाना पत्नी म्हणून होत्या त्यांचे महाराजांच्या निर्वाणानंतर काय झाले असेल ? इतिहासात त्यांच्याविषयी काय कसल्या आणि किती नोंदी असतील ? सईबाईचे लग्नाच्यावेळी वय होते ७ [महाराज होते ११ वर्षाचे], मग याच न्यायाने अन्यही त्याच वा त्याच्या आगेमागे वयाच्या असणार हेही नक्की. याना मुलेबाळे झाली असतील का ? असतील तर त्यांचे मराठा साम्राज्य विस्तारात किती भाग होता ?

इतिहासाने अशा व्यक्तींचा आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाठपुरावा केलेला आहे की ज्यांची मुद्रा या राज्याच्या जडणघडणीत [मग ती उजवी असो वा डावी] उमटलेली आहे. पण एक भावुक इतिहासप्रेमी या नात्याने कधीकधी [विशेषतः इतिहासाच्या विविध कोठडीतून त्या काळाचा पाठपुरावा करतेसमयी] मनी कुठेतरी इतिहासात दुय्यम स्थान प्राप्त झालेल्या 'स्त्रियां' च्या विषयी कुतूहल जागृत होते. वाटते, असेल का एखादे एच.जी.वेल्सच्या कल्पनेतील "टाईम मशिन', ज्याचा उपयोग करून त्या काळात सदेह जावे आणि म्हणजे मग अशा विस्मृतीत गेलेल्या स्त्रियांचा मागोवा घेता येईल.

पण वेल्सने कादंबरीरुपाने मांडलेली ती "काल-प्रवासा"ची कल्पना अजून तरी कागदोपत्रीच राहिली असल्याने अभ्यासासाठी जी काही ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत त्यांच्या आधारेच "पेशवाईतील स्त्रिया" ना आपण इथे चर्चेसाठी पटलावर आणू आणि त्या अनुषंगाने त्या त्या पुरुषासमवेत त्यांच्या अर्धांगिनींने इतिहासात दिलेल्या साथीचे अवलोकन केल्यास तो वाचन-आनंद सर्वांना भावेल अशी आशा आहे.

छत्रपतींच्या कारकिर्दीत पेशवेपद भूषविणारे मोरोपंत पिंगळे यांच्यापासून ते बहिरोजी पिंगळे यांच्यापर्यंत त्यांच्या कामकाजांचे स्वरूप 'महाराजांचे प्रशासनातील उजवे हात' अशा पद्धतीचे होते. शाहू छत्रपतींनी सातार्‍याला प्रयाण करून राज्याची सर्वबाबतीतील जबाबदारीची मुखत्यारपत्रे पेशव्यांना दिली आणि त्या जागी बाळाजी विश्वनाथ भटांची नेमणूक केल्यावर खर्‍या अर्थाने 'पेशवे' हेच मराठा राज्याची सर्वार्थाने धुरा वाहू लागले. त्यामुळे या पदावर आरुढ झालेल्या पुरुषांबरोबर त्यांच्या स्त्रियांही अधिकृतरित्या राज्यकारभारात विशेष लक्ष घालू लागल्याचे दाखले आपल्याला सापडतात. म्हणून आपण थेट पहिल्या पेशव्यांच्या घरापासून लेखाची सुरूवात करू या.

१. राधाबाई
बाळाजी विश्वनाथ यांची पत्नी. ज्यांच्याकडे स्वतंत्र अर्थाने 'प्रथम पेशवेपत्नी' या पदाचा मान जाईल. बर्वे घराण्यातील राधाबाई यानी थेट राज्यकारभारात भाग घेतला असेल की नाही यावर दुमत होऊ शकेल पण त्यांचे पेशव्यांच्या इतिहासात नाव राहिल ते त्या "बाजीराव" आणि "चिमाजीअप्पा" या कमालीच्या शूरवीरांच्या मातोश्री म्हणून. राधाबाईना दोन मुलीही झाल्या. १. भिऊबाई, जिचा बारामतीच्या आबाजी जोशी यांच्याशी विवाह झाला तर २. अनुबाई हिचा विवाह पेशव्यांचे एक सरदार व्यंकटराव घोरपडे यांच्याशी झाला. घोरपडे घराणे हे इचलकरंजीचे जहागिरदार होते. आजही त्यांचे वंशज या गावात आहेत.

२. काशीबाई
थोरल्या बाजीरावांची पत्नी. बाळाजी [जे पुढे नानासाहेब पेशवे या नावाने प्रसिद्ध झाले] आणि रघुनाथराव [अर्थातच 'राघोभरारी'] ही दोन अपत्ये. काशीबाई यांची सवत म्हणजेच 'मस्तानी'. बाजीरावापासून मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव प्रथम त्या जोडप्याने 'कृष्ण' असे ठेवले होते. पण बाजीराव कितीही पराक्रमी असले तरी या तशा अनैतिक संबंधातून [ब्राह्मण+मुस्लिम] जन्माला आलेल्या मुलाला 'ब्राह्मणीखूण जानवे' घालण्याची बाजीरावाची मागणी पुण्याच्या सनातनी ब्रह्मवृंदाने फेटाळली होती. त्याला अर्थातच पाठिंबा होता तो राधाबाई आणि बंधू चिमाजीअप्पा यांचा. युद्धभूमीवर 'सिंह' असलेले बाजीराव घरातील पेचप्रसंगासमोर झुकले आणि मस्तानीला झालेल्या मुलाचे नाव 'समशेरबहाद्दर' असे ठेवण्यात आले.

मात्र मस्तानीच्या मृत्युनंतर काशीबाई यानीच समशेरबहाद्दरचे आईच्या ममतेने पालनपोषण केले आणि त्याला एक समर्थ योद्धाही बनविले. वयाच्या २७ व्या वर्षी पानिपतच्या त्या युद्धात समशेरही भाऊ आणि विश्वासराव यांच्यासमवेत वीरगती प्राप्त करता झाला. [समशेरचा निकाह एका मुस्लिम युवतीशीच झाला आणि त्यापासून अली समशेर हे अपत्यही. पेशव्यांनी बाजीरावाची ही आठवण जपली, पण अलीला बुंदेलखंड प्रांतातील जहागीरव्यवस्था देऊन. बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

३. अन्नपूर्णाबाई
या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांच्या पत्नी. [आपण नेहमी बाजीरावांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या आणि विजयाच्या कथा वाचत असतो, चर्चा करीत असतो, पण वास्तविक चिमाजीअप्पा हे या बाबतीत थोरल्या बंधूंच्या बरोबरीनेच रण गाजवित होते. अवघे ३३ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या वीरावर स्वतंत्र धागा इथे देणे फार गरजेचे आहे.] ~~ चिमाजी आणि अन्नपूर्णाबाई यांचे चिरंजीव म्हणजेच पानिपत युद्धातील ज्येष्ठ नाव 'सदाशिव' = सदाशिवरावभाऊ पेशवे.

चिमाजीरावांना सीताबाई नावाची आणखीन एक पत्नी होती. पण अपत्य मात्र एकच - सदाशिवराव. चिमाजी पानिपत काळात हयात नव्हते आणि ज्यावेळी सदाशिवरावांनाही अवघ्या ३० व्या वर्षी पानिपत संग्रामात वीरमरण आले त्यावेळी अन्नपूर्णाबाई आणि सीताबाई या हयात होत्या की नाही याविषयी इतिहास मौन बाळगून आहे.

४. गोपिकाबाई
पेशवाई काळातील सर्वार्थाने ज्येष्ठ असे स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे गोपिकाबाई. बाजीरावांची सून आणि नानासाहेब पेशव्यांची पत्नी. सरदार रास्ते घराण्यातील या मुलीकडे राधाबाईंचे लक्ष गेले ते तिच्या देवपूजा, परिपाठ, संस्कार आणि बुद्धीमत्ता या गुणांमुळे. बाळाजीसाठी हीच कन्या पत्नी म्हणून पेशवे घराण्यात आणायची हा विचार तिथेच पक्का झाला होता. गोपिकाबाईनीही तो विश्वास सार्थ ठरविला होता आणि नानासाहेब पेशवेपदावर आरुढ झाल्यावर मराठा राज्यकारभार आणि विविध मसलतीत प्रत्यक्ष भाग घेणारी पहिली "पेशवीण" ठरली.

नानासाहेब "पेशवे' झाल्यापासून गोपिकाबाईंनी आपल्या राजकारणाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. नानांच्या त्या अंतर्गत सल्लागार जशा होत्या तशाच आपल्या परिवारातील कोणतीही अन्य स्त्री आपल्यपेक्षा वरचढ होणार नाही याकडेही त्या लक्ष देत असल्याने पेशवाईतील प्रमुख सरदार आणि अमात्य मंडळींशी त्या मिळूनमिसळून वागत. राघोबादादा हे नात्याने त्यांचे धाकटे दीर. ते आपल्या पराक्रमाने मराठा राज्यातील आघाडीचे वीर गणले जात असत, त्यामुळे त्यांची पत्नी 'आनंदीबाई' यांच्या महत्वाकांक्षेला आणखीन धुमारे फुटू नयेत याबाबत गोपिकाबाई दक्ष असत. तीच गोष्ट सदाशिवराव [चिमाजी पुत्र] भाऊंची पत्नी 'पार्वतीबाई' हिच्याबाबतही.

पार्वतीबाई यांच्याशी गोपिकाबाईंची अंतर्गत तेढ वाढण्याचे कारण झाले 'विश्वासराव'. नानासाहेब आणि गोपिकाबाईंचे हे चिरंजीव पुढे भावी पेशवे होणार होते. सरदार गुप्ते हे नाशिक प्रांताचे त्यावेळेचे जहागिरदार आणि त्यांच्याच घराण्यातील 'पार्वतीबाई' या त्यावेळी सातार्‍यात होत्या, त्यांच्याकडे गुप्त्यांची कन्या "राधिका" मुक्कामास आली होती. शाहू छत्रपतीही तिथेच वास्तव्याला असल्याने त्यानी तिला [राधिकेला] पाहिले होते व नानासाहेबांना सुचवून गुप्ते घराण्यातील हीच 'राधिका' भावी पेशवीणबाई म्हणून निश्चित केली होती. हा नातेसंबंध गोपिकाबाईना रुचला नव्हता; पण छत्रपतींच्या इच्छेपुढे नानासाहेब नकार देऊच शकत नव्हते. साखरपुडा झाला आणि पुढे त्याचवेळी पानिपताच्या तयारीत सारेच लागल्याने विश्वासरावांचे लग्न लांबणीवर पडले. विश्वासराव त्यात मारले गेले हा इतिहास सर्वश्रुत असल्याने त्याविषयी न लिहिता सांगत आहे की, लग्न न होताच ती १६ वर्षाची राधिका 'विधवा' झाली आणि पुढील सारे आयुष्य तिने विश्वासरावाच्या आठवणीतच गंगानदी काठच्या आश्रमात 'योगिनी' म्हणून व्यतीत केले. [राधिकाबाई सन १७९८ मध्ये अनंतात हरिद्वार इथेच अनंतात विलीन झाल्या.]

या करुण कहाणीचा आपल्या मनावर प्रभाव पडून आपण व्यथित होऊ; पण गोपिकाबाईने 'राधिका' ला आपल्या मुलाचा 'काळ' या नजरेतूनच सातत्याने पाहिले. मुळात त्यांना ती होऊ घातलेली सोयरिक पसंत नव्हतीच म्हणून लग्न जितक्या लांब टाकता येईल तितके ते टाकावे म्हणून नवर्‍यापुढे हट्टाने सदाशिवरावांच्यासमवेत विश्वासरावाला पानिपत युद्धात सहभागी करून घेण्याची मागणी पूर्ण करून घेतली. सार्‍या मराठेशाहीलाच 'पानिपत युद्धात भाऊंचे सैन्य अबदाली आणि नजीबला खडे चारणार' याची खात्री असल्याने विजयाचे सारे श्रेय 'सदाशिवरावा' ला न मिळता त्यातील मोठा हिस्सा 'विश्वासरावा'च्या पारडीत पडावा आणि छत्रपतींनी पुढचे पेशवे म्हणून सदाशिवरावांऐवजी विश्वासराव यालाच वस्त्रे द्यावीत अशीही गोपिकाबाईची चाल होती.

पण पानिपताचे दान उलटे पडले. जे सदाशिवराव डोळ्यात सलत होते ते तर गेलेच पण ज्याच्याबाबत भव्यदिव्य स्वप्ने मनी रचली तो 'विश्वास' ही कायमचा गेला. मग प्रथेप्रमाणे त्या 'भोगाला' कुणीतरी कारणीभूत आहे म्हणून कुणाकडेतरी बोट दाखवावे लागते. 'राधिका' च्या रुपात गोपिकाबाईंना ते ठिकाण सापडले आणि हिच्यामुळेच माझा मुलगा गेला हा समज अखेरपर्यंत त्यानी मनी जोपासला.

गोपिकाबाईंचे दुर्दैव इतके मोठे की, त्याना त्यांच्या हयातीतच पूर्ण वाढ झालेल्या आपल्या तिन्ही मुलांचे मृत्यू पाहणे नशिबी आले. विश्वासराव पानिपतावर धारातिर्थी पडले, दुसरे चिरंजीव माधवराव नि:संशय कर्तबगार झाले आणि पानिपताचे दु:ख आपल्या पराक्रमाने त्यानी कमी तर केलेच पण मुलूखगिरीही नावाजण्यासारखीच केली. राघोबादादा, सखारामपंत बोकिल, रास्ते यांच्या महत्वाकांक्षेला लगाम घातला. रमा समवेत संसारही छानपैकी चालणार, फुलणार असे वाटत असतानाच क्षयाने त्याना गाठले व त्यांचाही मृत्यू पाहण्याचा प्रसंग गोपिकाबाईंवर आला. तर तिसर्‍या मुलाचा - नारायणराव - याचाही पुण्यात अगदी डोळ्यासमोर शनिवारवाड्यात झालेला वध.

पती नानासाहेब तर पानिपताच्या धक्क्यानेच स्वर्गवासी झाले होते आणि एकापाठोपाठ ही तिन्ही मुलेही गेल्याचे जिच्या कपाळी आले ती बाई भ्रमिष्ट झाली नसेल तर ते आश्चर्यच मानावे लागले असते. नारायणरावांच्या खूनानंतर गोपिकाबाईनी पुणे कायमचे सोडले आणि त्या नाशिकच्या आश्रमात येऊन दारोदारी भिक्षा मागून आपली गुजराण करू लागल्या. पण तिथेही त्यांच्या अंगातील जुना पिळ गेला नव्हता कारण भिक्षा मागताना ती त्या फक्त नाशिकातील सरदार घराण्यातील स्त्रियांकडून स्वीकारीत असत. एकदा अशाच फिरतीवर एका वाड्यासमोर आल्या आणि भिक्षेसाठी दिंडी दरवाजावरील घंटा वाजविली असता भिक्षेसाठी आलेल्या स्त्रीला पाहून वाड्यातून दुसरी एक स्त्री भिक्षा घेऊन आली. ती नेमकी होती सरदार गुप्ते यांची 'योगिनी' कन्या राधिका, जी हरिद्वार इथून एक जथ्थ्यासमवेत तीर्थयात्रेवर नाशिकला आली असता सरदार गुप्त्यांनी तिला आपल्या वाड्यावर काही दिवसासाठी आणले होते.

पण दरवाजात भिक्षा घेऊन आलेल्या राधिकेला पाहिल्यावर गोपिकाबाई संतापाने किंचाळू लागल्या. पतीनिधन आणि तीन मुलांचा अंत यामुळे झालेल्या अनावर दु:खाचा तो उद्रेक त्यानी राधिकेवर काढला. आजुबाजूच्या सरदारदरकदारांनी आणि स्त्रियांनी त्याना कसेबसे शांत करून पुन:श्च गोदावरी आश्रमात त्याना पोचते केले. ही घटना जुलै १७७८ मधील....आणि राधिकेचे झालेले 'अशुभ दर्शन' म्हणून प्रायश्चित घेणे गरजेचे आहे अशा भावनेतून गोपिकाबाईनी तिथे गोदावरी घाटावरच उपोषण चालू ठेवले आणि त्यातच त्यांचा ११ ऑगस्ट १७७८ मध्ये अंत झाला. ज्या राधिकेला पाहिले म्हणून त्यानी मृत्युला जवळ केले त्या राधिकेनेच या कधीही न झालेल्या 'सासू' वर गोदेकाठी अंत्यसंस्कार केले.

५. पार्वतीबाई
सदाशिवराव भाऊंची पत्नी; पानिपत संग्रामाच्यावेळी प्रत्यक्ष रणभूमीवर पतीसमवेत गेल्या होत्या. गोपिकांबाईंसारख्या ज्येष्ठ आणि वरचढ स्त्रीसमवेत आपणास राहायला नको व त्यापेक्षा पतीबरोबर युद्धात गेलेले ठीक या भावनेतूनही त्यांचा तो निर्णय होता असा इतिहासकारांनी तर्क काढला आहे. पार्वतीबाईंच्या दुर्दैवाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही कारण युद्धातील कधीही भरून न येणार्‍या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्याना पानिपताहून पुण्यात सुखरूप आणले. पण "मृत पती पाहिलेला नाही' या कारणावरून पार्वतीबाईनी स्वतःला 'विधवा' मानले नाही आणि त्यांच्या स्मृतीतच वाड्यावर रमाबाईसमवेत [ज्या आता पेशवीणबाई झाल्या होत्या] राहात होत्या. 'तोतयाच्या बंडा' ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. माधवरावांच्या बहरत जा असलेल्या कारकिर्दीकडे पाहातच त्या शांतपणे १७६३ मध्ये वयाच्या २९ व्या वर्षी मृत्युला सामोरे गेल्या. त्याना अपत्य नव्हते.

६. रमाबाई
काय लिहावे या पेशवे स्त्री यादीतील सर्वाधिक लोकप्रिय मुलीविषयी ? आज या क्षणी एकही सुशिक्षित मराठा घर नसेल की जिथे 'रमा-माधव' हे नाव माहीत नसेल. इतिहासातील पात्रे कशीही असू देत, पण 'रमा' या नावाने त्यावेळेच्या आणि आजच्याही जनतेत जे नाजूक हळवे असे घर केले आहे त्याला तोड नाही. इतिहासात क्वचितच असे एखादेदुसरे स्त्री व्यक्तिमत्व असेल की जिच्याविषयी इतक्या हळुवारपणे लिहिले बोलले जाते. पेशवे-इतिहास लेखन करणार्‍या सर्व लेखकांच्या लेखणीतून 'रमा' या नावाला जो मान दिला गेला आहे, तो अन्य कुठल्याच नाही. सर्वार्थाने 'प्रिय' अशी स्त्री म्हणजे माधवरावांची पत्नी - रमा. एक काव्यच आहे हे नाव म्हणजे. म्हणून या मुलीच्या निधनाची आठवणही इथे आणणे दुय्यम ठरते.
[हेही सांगणे दुय्यमच की माधवराव आणि रमा याना अपत्य नव्हते.]

७. आनंदीबाई
पेशवे इतिहासातील सर्वात काळेकुट्ट प्रकरण कुठले असेल तर शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेला 'नारायणराव पेशव्यां'चा निर्घृण खून. तोही सख्ख्या चुलत्या आणि चुलतीकडून. नाना फडणवीस आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी रामशास्त्रींच्या न्यायव्यवस्थेकडून त्या खून प्रकरणाचा छ्डा तर लावलाच पण त्या धक्कादायक प्रकरणाच्या मागे एकटे रघुनाथराव नसून अत्यंत महत्वाकांक्षी असलेली त्यांची पत्नी 'आनंदीबाई' आहेत हेही सिद्ध केले. ["ध" चा 'मा' हे प्रकरण इथे विस्ताराने लिहिण्याचे कारण नाही, इतके ते कुप्रसिद्ध आहे.]

आनंदीबाई ह्या गुहागरच्या ओकांची कन्या. राघोबांशी त्यांचा विवाह (१७५६) झाल्यापासून आपला नवरा 'पेशवे' पदाचा हक्कदार आहे हीच भावना त्यानी त्यांच्या मनी चेतवीत ठेवली होती. गोपिकाबाईंचे वर्चस्व त्याना सहन होणे जितके शक्य नव्हते तितकेच त्यांच्या सरदारांसमवेतही संबंध कधी जुळू शकणारे नव्हते. रघुनाथराव पराक्रमी जरूर होते पण ज्याला सावध राजकारणी म्हटले जाते ते तसे कधीच दिसून आले नाही. विश्वासराव अकाली गेले आणि माधवराव अल्पवयीन म्हणून आपल्या नवर्‍याला - रघुनाथरावाना - पेशवाईची वस्त्रे मिळतील अशी आनंदीबाईंची जवळपास खात्री होतीच. पण छत्रपतींनी वंशपरंपरागत रचना मान्य केली असल्याने माधवराव व त्यांच्यानंतर नारायणराव हेच पेशवे झाल्याचे आनंदीबाईना पाहाणे अटळ झाले. माधवराव निपुत्रिक गेले आणि नारायणराव यांचे वैवाहिक जीवन [पत्नी काशीबाई] नुकतेच सुरू झाले असल्याने रघुनाथराव याना पेशवे होण्याची हीच संधी योग्य आहे असे आनंदीबाईनी ठरवून तो शनिवारवाडा प्रसंग घडवून आणण्याचे त्यानी धारिष्ट्य केले आणि तांत्रिकदृष्ट्या त्या यशस्वीही झाल्याचे इतिहास सांगतो.

पण दुर्दैवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अल्पकाळ का होईना, पण रघुनाथराव जरूर पेशवेपदी बसले पण नाना फडणविसांनी त्याना ते सुख घेऊ दिले नाही. 'बारभाईं'नी रघुनाथराव आणि पर्यायाने आनंदीबाईंची त्या पदावरून हकालपट्टी केली आणि एक वर्षाच्या 'सवाई माधवराव' यांच्या नावाने पेशवेपदाची नव्याने स्थापना केली. आनंदीबाई मध्यप्रदेशात धार प्रांतात पळून गेल्या आणि तिथेच त्यानी 'दुसर्‍या बाजीराव' ना जन्म दिला. त्यांच्या जन्मानंतर आठ वर्षांनी धार इथेच रघुनाथरावांचा मृत्यु झाला. त्यानंतर आनंदीबाईंचीही ससेहोलपटच झाली. रघुनाथरावांपासून झालेली दोन मुले आणि सवतीचा एक अशा तीन मुलांना घेऊनच मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यात त्यांच्यामुळेच होणार्‍या वादात आणि लढ्यात त्यांचे नवर्‍याच्या मृत्यूनंतरचे आयुष्य गेले. इकडे बारभाईनी 'सवाई माधवरावा' ला पेशवे गादीवर बसवून नाना फडणवीस यांच्याच अखत्यारीत राज्यकारभार चालू केल्याने दुसर्‍या बाजीरावाला निदान त्यावेळी तरी पुण्यात प्रवेश नव्हताच. सवाई माधवरावांनी वेड्याच्या भरात १७९६ मध्ये आत्महत्या केल्याने आणि ते निपुत्रिक वारल्याने त्यांच्या जागी 'पेशव्यां'चा अखेरचा वारस म्हणून नानांनी (आणि दौलतराव शिंद्यांनी) अन्य उपाय नाही म्हणून दुसर्‍या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रे दिली.

~ मात्र मुलगा मराठेशाहीचा "पेशवा' झाल्याचे सुख आनंदीबाईच्या नजरेला पडले नाही. त्यापूर्वीच ही एक महत्वाकांक्षी स्त्री १२ मार्च १७९४ रोजी महाड येथे नैराश्येतच निधन पावली होती.

अशोक पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई....

तू आणि शर्मिला यानी केलेली सूचना छानच आहे....पण हाच लेख थेट देण्यापेक्षा अन्य काही विकल्पाचा विचार करतो.

लेख या पूर्वी वाचला होताच. प्रतिक्रिया देणे राहून गेले होते. अतिशय वाचनीय लेख, आणि प्रतिक्रियाही. तारतम्य, तटस्थता आणि निर्लेप वृत्ती (जी लेखनातून दिसते) यांमुळे हा लेख एक वेगळ्याच उंचीवर पोचला आहे. निवडक दहात नोंदवला तर आहेच. पण आंतरजालावरच न रहाता हा लेख छापील माध्यमांतूनही यावा या काही जणांच्या ची विनंतीला आपण जरूर मान द्यावा आणि तोही लवकरच, असे सुचवावेसे वाटते.

अशोक, या लेखावरील प्रतिसाद आणि तो आवडलेले लोक यांची संख्या विक्रमी झाली आहे तेव्हा किती लोकांच्या मनाची तार तो छेडू शकला आहे हे त्यावरून जसे सिद्ध होते तसेच तुम्ही अधिक लेखन करणे किती अगत्याचे आहे हेही.
विकल्प म्हणजे हाच लेख पुनर्लिखित करणे असेल तर तसे लगेच कराच Happy

हिरा....सुजा....भारती

तुमच्यासारख्यांनी दिलेले असे प्रोत्साहनात्मक प्रतिसाद वाचताना आनंदासोबत समाधानही एवढ्यासाठी होते की लिखाणामागे केलेल्या अभ्यासाला एक प्रकारे पावती मिळत असते. माझा कधीही असा दावा नव्हता की केलेले लिखाण ऐतिहासिक अभ्यासाच्या आधारे केले आहे; कारण मी एक सर्वसामान्य "वाचक" आहे, "अभ्यासक" नव्हे. तरीही वाचकाच्या विचाराला कागदावर उतरण्यापूर्वी तो मजकूर ऐतिहासिकदृष्ट्याही शक्यतो बिनचूक उतरला जाण्यासाठी प्रसंगी भटकंतीही करावी लागली तर केलेली आहे. हल्लीच्या वेगवान युगाच्या काळात पूर्वीप्रमाणे ऐतिहासिक साधनसामुग्री साहित्य जपून ठेवणार्‍या सार्वजनिक संस्थाही जवळपास नामशेष होत चालल्या आहेत. पुणे मुंबई इथे काही प्रमाणात अशी ग्रंथालये आहेत, पण तिथेही आपल्या वेळेप्रमाणे सारे काही चटदिशी समोर येत असते असे नाही. अंगी फार सहनशीलता हवी असते एखादा कागद मिळविण्यासाठी. मलाही माझी नित्याची नोकरी सांभाळूनच ही आवड सांभाळावी लागत होती...त्यामुळे माझ्या एखाद्या मुद्द्याला ऐतिहासिक पाठबळ पुरावा हवाच असेल तर तो तात्काळ मिळेपर्यंत मग तो मुद्दा पटलावर घेताच येत नसे. सविस्तर लिखाणाला मर्यादा पडतात.

लोकही आपल्या गावात अमुक एक झाले होते...तमुक एक माहिती, ठिकाण इथेतिथे आहे...अशा पद्धतीचे मार्गदर्शनही करीत नाहीत. पण चिकाटी मात्र लागते. नाशिकच्या भटकंतीत मला आनंदवल्लीच्या भागातील नवश्या गणेश मंदिराकडे जाण्यास मिळाले होते. पण तो साराच भाग आता जमिनदोस्त झाला असणार...'ऐतिहासिक' महत्वाच्या गावी वसलेली वाडा-संस्कृतीही रस्ता रुंदीकरण नावाखाली नामशेष होत चालल्याचे आपण पाहतोच. त्यातही 'आनंदीबाई' ह्या सर्वमान्य 'खलनायिका' असल्याने त्यांच्या नावाशी निगडित असलेल्या वस्तू वा वास्तू यांची विचारपूस करणेही व्यर्थ व्याप मानला जाण्याची शक्यता गृहित धरलेली असतेच....थोडक्यात अशा नावाशी संबंधित असलेली ती जागा वा त्याविषयीची माहिती कुणी देतही नाहीत. १९९४-९५ ची ही गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ २० वर्षे होत आली. तर त्यावेळीही तिथे ज्या दोघातिघांकडे दप्तराच्या उपलब्धतेविषयी विचारले त्यांच्याकडून "आनंदीबाई" नाव उच्चारताच प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या. पन्नाशीतील ते लोक होते तरी ती वृत्ती मग पंचविशीतील युवक दुसरे काय सांगेल ?

हे आत्ताचे नव्हे तर पूर्वीच्या जमान्यातही अशा उदासिन वातावरणात ऐतिहासिक संशोधकांना या नैराश्येने भारलेल्या स्थानिकांकडून नकारार्थी सहकार्य मिळत होते. तरीही राजवाडे, रियासतकार सरदेसाई, शेजवलकर अशा जेष्ठांनी केलेले महान कार्य केवळ डोक्यावर घ्यावे असेच वाटत राहते. यांच्या संशोधनावर वाद झडले नाहीत का ? जरूर झाले...किंबहुना निरोगी इतिहास दर्शनासाठी ते गरजेचेही मानले गेले....आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी ही मंडळी तितकीच सक्षमही होतीच होती.

इतका मजकूर लिहायचे कारण असे की अशा पद्धतीचे साहित्य मोकळ्या संस्थळावर देताना मनी एक प्रकारची भीतीही असतेच की याचे स्वागत कसे होईल ? पण मी आभारी आहे इथल्या सर्व प्रतिसादकांचा की त्यानी निव्वळ "लेख आवडला" असे न लिहिता हा विषय पुढे फुलत जाण्यासाठीही प्रयत्नपूर्वक प्रतिसाद दिले....ज्या योगे मलाही अधिकचे वाचन करण्यास स्फुरण मिळाले. अधिकच्या वाचनाचा उपयोग होत असतोच.

अगो यांच्या

अगो | 10 August, 2014 - 19:05
आज 'रमा-माधव' पाहिला त्यात पानीपताच्या लढाईवर जाण्याआधी त्याचे लग्न झालेले दाखवले आहे. बायकोचे नाव लक्ष्मी दाखवले आहे.

तसेच

अगो | 11 August, 2014 - 09:30
सगळी चर्चा एकाच धाग्यावर राहावी म्हणून अशोकमामांनी विपुत दिलेले उत्तर इथे चिकटवत आहे.
***********
माझ्या स्वतःच्या वाचनात विश्वासराव यांची पत्नी म्हणून "लक्ष्मी" नामक कुणीही स्त्री आलेली नाही.

>>>>

दोन्ही पोष्टी परत तशाच यायला नकोत म्हणून मी वर फक्त संक्षिप्त स्वरूपात उदृत केल्या आहेत.

या दोन्ही पोष्टींचे उत्तर:

विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई म्हणून होत्याच. श्रीराम साठे लिखित "पेशवे" या संदर्भग्रंथवजा पुस्तकात पान क्रमांक ४८ वर त्यांची पुढीलप्रमाणे माहिती दिलेली आहे:
लक्ष्मीबाई (दीक्षित पटवर्धन घराणे) विवाह दिनांक २.५.१७५०. तिचा मृत्यू: १४.२.१७६३. (अपत्य नाही)

धन्यवाद Happy

त्याच पुस्तकात राधिकाबाईंबद्दल काही माहिती असेल तर ती थोडक्यात इथे लिहिता येईल का ?

मामा,

तुमचा लेख आधीच वाचला होता. मात्र रमा माधव पहिला आणि पुन्हा वाचला.
रमा मधव चित्रपटत तसेच रणन्गण नाटकत नानासहेब पेशव्यनी पानिपतच्या स्वारी वर असतान एका लहान मुलीशी लग्न केल्याच उल्लेख आहे. अर्थातच या दुर्दैवी मुलीबद्दल कुठेही उल्लेख अढळत नही. वयच्या अवघ्या ८व्या वर्षी आपल्या वडिलान्च्या वयाच्या माणसाशी विवाह होणे,पदरात पेशव्यान्ची सुन म्हणून पडलेले दान उलटे पडून वैधव्यास सामोरे जावे लागलेल्या या मुली बद्दल कही महिती उपलब्धा आहे काय? तीचे नाव? घराणे? पेशवयन्च्या नन्तर्च्या काळात जी राजकीय उलथापलथ झाली त्यात तीचे काय झाले?

धानी

पेशवेकालीन सामाजिक स्थितीवर शास्त्रांचा फार प्रभाव होता. राज्यकर्तेच ते असल्याने समाजरचनेविषयी काही नियम करावे लागले तर ते करत असत आणि त्याची अंमलबजावणी कठोरपणे होत असे. लग्नासाठी पुरुषाचे वय किती असावे यावर निर्बंध नव्हते. बहुपत्नीत्वाची प्रथा होतीच. "अंगवस्त्र....नाटकशाळा" आदी प्रकार शासकांकडून चालत, तसेच धनवानांकडूनही....विशेष म्हणजे स्त्री वर्गाकडून विरोध होण्याची सुतराम शक्यता नसायची कारण सारा कारभार पुरुषप्रधानच आणि स्त्री ने शिजवा वाढा काढा आणि उरल्या वेळेत देवदेव करा असाच सारा कारभार.

पेशव्यांनी तर कायदा केला होता....त्यातील एकच उतारा (जो इंग्रजीमध्ये आहे...पेशवे दप्तरातील....मुंबईच्या रॉयल एशियाटीक सोसायटी येतील ग्रंथालयात अशी पुस्तके मिळतात, अभ्यासासाठी) इथे देत आहे :

"....Apparently with a view to check the practice Peshwe further ordered that 'NO GIRL ABOVE 9 SHOULD REMAIN UNMARRIED'...thereby claiming for the State the right to interfere in what generally regarded as the promise of the Shastras...."

किती स्पष्ट आणि थेट अर्थ आहे याचा ? पेशव्यांतच नव्हे तर सार्‍या सुभ्यात मुलीच्या लग्नाचे वय जाहीर करताना हेही स्पष्ट केले आहे....९ व्या वर्षाच्या पुढे मुलीने बिनलग्नाचे राहू नये....राहिल्यास त्याबाबत सरकार त्यात लक्ष घालेल.

त्यामुळे ज्यावेळी नानासाहेबांना दुसर्‍या लग्नाची इच्छा झाली तेव्हा त्यानीही वय वर्षे ८ असलेलीच मुलगी बायको म्हणून आणली असणार.....वाड्यावर आली म्हणजे अशा मुलीच्या आयुष्याचे काय होते याची चौकशी कोण करणार ? तिचा हुंदकाच काय तर हसणेही कानावर पडणे मुश्किल....राजकीय उलथापालथीत जिथे सरदारदरकदारांची वाट लागते तिथे अशा खेळत्या वयातील मुलीची कसली चौकशी होणार ? जगतात इकडेतिकडे करत आणि जातात मरून.

तुमचा लेख वाचून माझ्या वडीलांची आठवण झाली. हे सारे मला तोंडपाठ आहे इतक्या वेळा त्यांच्याकडून ऐकले आहे. संपूरण आयुष्यच शनिवारवाडा आणि लाल महालाच्या कुशीत गेले.
छान लेख. माझ्याकडे वहीत पेशव्याच्या वंशावळीचा तक्ताही लिहीलाय मी.

आशूडी....

मला खूप आनंद झाला...तो अशासाठी की तुमच्या वडीलांकडून मिळालेला असला अस्सल इतिहासाचा वारसा तुम्ही कळतनकळत तोंडपाठ करून ठेवला आहे. इतिहासाची हेच तर खासियत असते की कानी पडताच ते मनी नोंदविण्याची हौस असेल तर दुसरे हवे तरी काय ? आज आपल्याला नेटच्या आणि संस्थळांच्या सोईमुळे अगदी अनोळखी समजल्या जाणार्‍या व्यक्तीसोबत या विषयावर अधिक लिहू बोलू शकतो....पण दिवस असेही होते की आपणच माहिती गोळा करायची आणि आपल्याजवळच ठेवायची. अशा स्थितीत रॉयल एशियाटीक सोसायटीसारख्या संस्थांनी जीवापाड जपून ठेवलेली पेशवेकालीन दप्तरे पाहिली की त्याचे महत्त्व लक्षात येते.

पेशवे वंशावळीचा तक्ता तुम्ही लिहून ठेवला ते कुणालातरी उपयुक्तही ठरेल. हा लेख लिहितानाही मला अशाच एका इतिहास संशोधकाकडील जुन्या डायर्‍यांचा उपयोग झाला होता.

मला पेशवाईतील फक्त थोरले माधवराव-रमाबाई हीच स्टोरी आवडते...बाकी मी पेशवाईची फॅन नाही..तरीही मला हा लेख आवडला..यावरुनही हा लेख किती नॉन-जजमेंटल आहे हे लक्षात यावे Happy मामा यू आर ग्रेट. अत्यंत वाचनीय, अभ्यासपूर्ण, संयमित, परखड लेख.
प्रतिक्रिया व चर्चाही वाचनीय.

लेख छान आहे. बर्‍याच गोष्टी माहित नव्हत्या.

येसूबाईंबद्द्ल माहिती मिळेल का? त्यांना औरंगजेबाने पकडले आणि पहिल्या बाजीरावांनी दिल्लीवरून त्यांची सुटका करून सातार्‍याला परत आणले, एवढीच माहिती आहे. हे शाळेत इतिहासाच्या पुस्तकात होते.
या मधल्या काळातील माहिती कुठे आहे का? बाजीरावांच्या आधी कोणीच त्यांच्या सुटकेचा प्रयत्न केला नाही? शाहू महाराजांबरोबर त्यांची पण सुटका का नाही केली?
कुठेतरी वाचल्यासारखं वाटतयं की दिलेरखानाने त्यांची मुलीसारखी काळजी घेतली. मानाने वागवले.
याविषयी कुठले पुस्तक आहे का?

बाजीराव मस्तानीचा हा वंश पुढे कसा फुलला की खुंटला याची इतिहासात नोंद असेलही पण त्याकडे कुणी खोलवर लक्षही दिलेले दिसत नाही.]

हा वंश पुढे आहे आणि अजूनही दत्तक न घेता आहे .

आज अचानक हा धागा वर आला आणि पुन्हा वाचला गेला.

अशोकदा, एक बदल हवा आहे तो म्हणजे पुतळाबाई राजांच्या शवाबरोबर सती गेल्या नाहीत तर संभाजीने गडावर येउन पुन्हा विधी पार पडल्यावर सती गेल्या.

अशोककाका, लेख आणि त्यापेक्षाही तुमचे प्रतिसाद खूप आवडले.
काल रात्री हा धागा वाचला. पण तुमच्या सौम्य भाषेच्या, व्यासंगाच्या, आणि वाईट ते शक्यतो टाळणार्‍या संयमाच्या जादूतून अजून सुटका झाली नाही.
खूप सुंदर लिहिलंय तुम्ही.

युरोपियन इतिहासावर वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लिहिलेले ग्रंथच्या ग्रंथ उपलब्ध आहेत.
शिवाजीराजांनंतरच्या मराठे - पेशवे इतिहास आमच्यासारख्या सामान्यांना जाणून घ्यायचे असेल तर कोणती पुस्तके उपलब्ध आहेत? (इंग्रजीही असतील तर सांगा)
अनबायस्ड आणि वस्तूनिष्ठ इतिहास सांगणारे काही ग्रंथ उपलब्ध असतील तर सूचवा.

तुम्ही जे रूमाल/बखरी इ. साहित्य वाचले आहे त्यासम साहित्य छापील पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे का?

साती.....

~ "इतिहास" विषयासंदर्भात तुम्ही दाखविलेली ही आस्था मला खूपच प्रभावित करणारी आहे. इतिहास अनुभवायाचा असेल तर संदर्भीय पुस्तकांचा अभ्यास करण ओघानेच आले. त्यात बायस्ड अनबायस्ड तसेच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वस्तुनिष्ठ लेखन करणारेही खूप असतात, त्याला नाईलाज असतो. फ़क्त आपला विवेक शाबूत ठेवून विद्यार्थ्यापेक्षाही त्रयस्थ वृत्तीने (हे फ़ार महत्त्वाचे असते) अभ्यासक म्हणून या विषयाच्या सखोल वाचनासाठी वेळ काढणे शक्य असल्यास जरूर तसे करावे; म्हणजे एका पुस्तकानंतर दुसरे, दुस-यानंतर तिसरे अशी चढती मोजणी सुरू होते. एकप्रकारे आनंदही मिळत जातो. इतिहास आपण बदलू शकत नाही हे तर उघडच आहे; पण वाचनामुळे त्या घटनांकडे पाहणे केवळ भक्तीभाव ठेवून चालत नाही याचा जो अनुभव येत राहतो....आणि येतोच...तो महत्त्वाचा.

काही ग्रंथ मी सुचवितो.....(इंग्लिश आणि मराठी). यातील इंग्रजी तुम्हाला नेटवर पीडीएफ़ रुपात उपलब्ध आहेतच शिवाय मराठी भाषेतील सारी पुस्तके पुण्यातील अप्पा बळवंत चौकात स्थित असलेल्या दुकानातून प्रत्यक्ष खरेदी करता येतील....(काहीसे भटकावे लागेल याचीही सूचना इथे देत आहे. कारण एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध असतील असेही नसते. तथापि तेथील विक्रेते आणि संचालक आवर्जून मार्गदर्शन करतात याचा मी अनुभव घेतला आहे.)

James Grant Duff – A History of the Mahrattas, first published 1826

A History of the Mahrattas Volume I
A History of the Mahrattas Volume II
A History of the Mahrattas Volume III

नेटवर आहेत. पण तुम्हाला पुस्तकरुपानेच वाचणे सोयीचे होईल असे वाटत असल्यास ऎमेझॉन किंवा फ़्लिपकार्टशी संपर्क साधावा लागेल. इंग्रजी लेखकांसमवेत सर जदुनाथ सरकार यांचीही ग्रंथसंपदा अशीच प्रभावी आहे. (हे सारे वाचायचे म्हणजे तुम्हाला हिमालय चढायला सांगतो आहे की काय ? अशी भीती मला वाटत आहे.)

मराठी (पुस्तकरुपातच मिळवावी लागतील....)

मराठी रियासत - गो.स.सरदेसाई (प्रचंड अशी ग्रंथसंपदा आहे....एकाचवेळी सारे उपलब्ध असतील असे नाही)
मराठ्यांचा इतिहास - खंड १ ते ५ , संपादक सर्वश्री अ रा कुलकर्णी, ग ह खरे
मराठ्यांचा इतिहासाची साधने खंड १ ते ६ - संपादक श्री.वि का राजवाडे
ऐतिहासिक पत्रव्यवहार ~ सर्वश्री गो.स.सरदेसाई, कृ पा कुलकर्णी
मोगल मराठा संघर्ष - सेतु माधवराव पगडी

शिवाजी संभाजी राजाराम....या साखळीबाबत पारसनीस, शेजवलकर आदींची ग्रंथसंपदा आजही उपलब्ध आहे, पण त्यासाठी प्रत्यक्ष पुण्यातील विक्रेत्यांसमवेत संपर्क साधून ती पाहून घ्यावी लागतील. अर्थात हे सारे एकाच वेळी करणे शक्य नाही हे मलाही माहीत असल्याने तुम्हाला जेव्हा जेव्हा सवड मिळेल त्या त्या वेळी मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल असा मला विश्वास वाटतो.

वाचनासाठी शुभेच्छा आत्ताच देतो.

रोहन....

~ पुतळाबाईंच्या संदर्भात सविस्तर नंतर इथेच लिहिले गेले होते...प्रतिसादातून..... त्या "सती" गेल्या हाच मुद्दा महत्त्वाचा होता म्हणून मी तितकेच लिहिले होते. महाराजांचा देह त्यावेळी नव्हता हे तर सत्यच.

मस्त यादी. हे सर्व वाचायला आणि समजायलाच एवढा वेळ लागतो कि नोंदी काढून आपले टिपण बनवून लेखन करायचे म्हणजे फारच वेळ जातो.

बापरे!
काय पटकन संदर्भग्रंथांची यादी दिलीत.
मी मराठीतून सुरूवात करते.
अनेकानेक धन्यवाद!
अभ्यास कसा करावा हे ही तुमच्याकडून शिकायला मिळतेय.

मराठी रियासत - गो.स.सरदेसाई ( जुने खंड १ ते ४५ पण ते नविन संपादित कमी केले आहेत)
इतिहास संग्रह - भाग १ ते ७, संपादक पारसनिस.
मराठ्यांचा इतिहास - खंड १ ते ५ , संपादक अ रा कुलकर्णी, ग ह खरे
शिंदेशाही इतिहासाची साधने - संपादक आनंदराव फाळके. ( पानिपत साठी उपयोगी)
मराठ्यांचा इतिहासाची साधने खंड १ ते ६ - संपादक वि का राजवाडे
ऐतीहासीक पत्रव्यवहार. गो.स.सरदेसाई, कृ पा कुलकर्णी
बाळाजी बाजीरावची रोजनिशी - संपादक पारसनिस.
मोगल मराठा संघर्ष - सेतु माधवराव पगडी
श्री छत्रपती शिवाजी - शेजवलकर
श्री छत्रपती महाराजयांचे चिकीत्सक चरित्र्य - वा सि बेंद्रे
श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र्य - वा सि बेंद्रे

इंग्रजी पुस्तक.

A History of the Mahrattas Volume 1, 2 and 3 James Grant Duff ( अमॅझॉन वर हे अजुनही मिळते)
The Marathas 1600-1818 -The New Cambridge History of India by Stewart Gordon
History of Aurangjeb - Sir Jadunath Sarkar
Military History of India - Sir Jadunath Sarkar
Rise of the Maratha power, and other essays, by M.G. Ranade
Marathas and the Marathas country by A. R Kulkarni
The second Maratha campaign, 1804-1805: Diary of James Young, officer, Bengal Horse Artillery, and twice sheriff of Calcutta by James Young

ही मराठा एम्पायरवर मी वाचलेली पुस्तके. ह्यातून बराच इतिहास शिकायला मिळतो. ज्यामुळे आपल्या पारंपारिक मतांना तडा जाऊ शकतो.

नविन संशोधनात काही पुस्तके आली असतील, ती शोधावी लागतील मागे लालूने एक सांगीतले होते. अहिल्याबाईवर ते कदाचित आले असेल आता बाजारात.

अशोकराव, एखादा मस्त लेख लिहायला घ्या. बरेच दिवस झाले काही वाचनिय मिळाले नाही मायबोलीवर. अहिल्याबाईंवर अभ्यास असेल तर त्यांच्यावर लिहा.

केदार, धन्यवाद!
इंटरेस्टींग दिसतेय लिस्ट.

बाळाजी बाजीरावाची रोजनिशी म्हणजे खरेच त्यांनी लिहिलेली/ लिहवून घेतलेली रोजनिशी आहे का?

पीनी,

येसूबाई यांच्यावर डॉक. मिराशी यांचे एक पुस्तक आहे ते जमल्यास मिळवा.

दिलेरखान आणि येसूबाई यांचा कधीही संबंध आला नाही.

काही पत्रे आहेत, त्यांनी दिलेले आदेश वगैरे आणि काही तत्कालिन संदर्भ पण ती चांगली माहिती आहे. आता ते पुस्तक केवळ भांडारकर मध्ये मिळेल बहुदा

Pages