संस्कृतमधील सुभाषिते मराठीत - ७

Submitted by एम.कर्णिक on 10 February, 2012 - 14:24

सुभाषितांचा सातवा भाग सादर करतो आहे. वाचकांना रुचेल अशी आशा करतो.

३३.
पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् |
मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा प्रदीयता ||

पृथीवरती तीनच रत्ने - अन्न, पाणी अन् सुभाषिते |
अवनीवरले मूर्खचि ते जे दगडांना म्हणती रत्ने ||

३४.
वनानि दहतो वन्हेस्सखा भवति मारूत: |
स एव दीपनाशाय कृशे कस्यास्ति सौहृदम् ||

वणवा भडकवुनी अग्नीचा साथी बनतो जो वारा |
विझवी इवली पणति. कोण दे दुर्बलमैत्रीला थारा ? ||

३५.
अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||

हा माझा हा परका मानी हलकी प्रवृत्ती |
सारी अवनी कुटुंब मानी जो उदारवृत्ती ||

३६.
अश्वस्य भूषणं वेगो मत्तं स्याद् गजभूषणं |
चातुर्यम् भूषणं नारया उद्योगो नरभूषणं ||

गति हे भूषण अश्वाचे, मस्ती हे गजभूषण |
नारीची चतुरता भूषण, नरा भूषण उद्यम ||

३७.
अमंत्रम् अक्षरम् नास्ति नास्ति मूलम् अनौषधिम् |
अयोग्य पुरूषं नास्ति योजकस्तत्रदुर्लभ: ||

मंत्राविना न अक्षर अन् मुळी ना जी न औषधी |
असमर्थ न नर कुणिही, योजकाचीच वानवा ||

दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873

गुलमोहर: 

गेले काही दिवस बाहेरगावी असल्याने हा भाग अत्ता वाचला.
कर्णिकजी,
हा उपक्रम कृपया सुरू ठेवावा......

छान उपक्रम!!
१४ क्रमांकाच्या श्लोकाच्या धर्तीवर अजुन एक

काकः कृष्णः पीकः कृष्णः कोभेदः पीककाकयो
वसंतसमये प्राप्ते काकः काकः पीकः पीकः

हा भागही उत्तम Happy
काल माझ्या मुलीच्या वर्गात त्यांना उपक्रमाच्या वहीत त्यांना येणारा एखादा संस्कृत श्लोक लिहायला सांगितलं, जिथे इतर मुलांना एखादाही श्लोक लिहिणे कठिण होत होतं तिथे माझ्या लेकीने चार श्लोक लिहून इतर मुलांनाही निरनिराळे श्लोक पुरवले. ह्याच क्रेडिट तुम्हालाच जाते. Happy

हा उपक्रम कृपया सुरू ठेवावा......>>>>> अनुमोदन

प्रद्युम्न, प्रज्ञा, चारुदत्त, उल्हासराव, स्वाती, सुनील, अर्चना आणि नंदन,
तुमच्याकडून मिळणारे प्रोत्साहन अनमोल आहे. मनःपूर्वक आभार.
सुनील, मला उपलब्द्ध असलेले सुभाषित तश्या शब्दात आहे. पण तुम्ही दाखवून दिलेला पाठभेद जास्त चांगला वाटला. तेव्हा तसा बदल करीत आहे. आभार.
नंदन, अनवधानाने राहिलेली त्रुटी निदर्शनाला आणल्याबद्दल वेगळे आभार. दुरुस्त करतो.

एम कर्णिकजी आपली ही सुभाषितमाला वाचली. फारच सुंदर! त्या त्या सुभाषिताचा अर्थ समजण्यासाठी आपण त्याचे मराठी सुभाषित तयार करताहात हा नाविन्यपूर्ण चांगला उपक्रम आहे. मराठी सुभाषिते छान जमली आहेत. सुभाषिते ही पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे आणि ती आपण पुढील पिढ्यांना दिली पाहिजे. आपला प्रयत्न त्या दिशेने जाणारा आहे. आपल्या इतका मोठा नसला तरी मीही असाच एक प्रयत्न चालवला आहे. तो तुम्हाला खालील लिन्क्स्वर पहाता येइल. कृपया तो पाहावा.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[५] http://www.maayboli.com/node/32686

अरुण आणि दामोदरसुत,
मनापासून आभार.
दामोदरसुत, आपण दिलेल्या लिंक्सवरून आपल्या अतिसुंदर उपक्रमाचा आस्वाद घेतला. त्याबद्दलची माझी प्रतिक्रियाही मी चौथ्या भागाच्या खाली दिली आहेच. मला खूप आवडले आपले लेखन.

कर्णिकसाहेब आणि दामोदरसुत,

आपण उभयता जे काम करत आहात त्याने मी प्रभावित आहे. आपले अनुवाद सरस आणि सुरस होत आहेत. वाचत तर मी आहेच मात्र आज प्रतिसादही देत आहे.

राजा भर्तृहरीच्या सर्वच नीति, शृंगार आणि वैराग्य शतकांचेही आपण अनुवाद करावेत ही नम्र विनंती. त्यामुळे यापूर्वीच झालेल्या त्यांच्या सुंदर मराठी अनुवादांत मोलाची भर पडेल असे मला वाटते आहे.

गोळेसाहेब,
आपल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल धन्यवाद. सर्वसाधारणपणे लोकाना ज्ञात असलेल्या निवडक सुभाषितांवर लक्ष केन्द्रित केले होते. संपूर्ण सुभाषित त्रिशतीचा अनुवाद करावा ही माझीही इच्छा आहेच. आणि आपल्या सूचनेनंतर ती बळावली आहे. अवश्य प्रयत्न करीन. पुन्हा एकदा आभार.