संस्कृतमधील सुभाषिते मराठीत - २

Submitted by एम.कर्णिक on 22 January, 2012 - 07:30

पहिल्या भागाचे वाचकांनी स्वागत केल्यानंतर हा दुसरा भाग सादर करतो आहे. प्रत्येक भागात पाच किंवा जास्तीत जास्त सहा सुभाषितांचा समावेश असेल. म्हणजे 'ओव्हरडोस' होऊन वाचकांना कंटाळा येणार नाही असे वाटते. आणि हो, कुणाला एखादे सुभाषित अर्धवट लक्षात असेल आणि ते पूर्ण माहित करून घायची किंवा त्याचे मराठी रूपांतर वाचायची इच्छा असेल तर मला विचारपूसमधून कळवल्यास मी माझ्या परीने समाधान करण्याचा प्रयत्न अवश्य करीन.

६.
किम् कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिन: |
अकुलीनोऽपि विद्यावान् देवैरपि सुपूज्यते ||

अडाण्याचा फुका जन्म, जरी उच्च कुळातला |
अकुलिनांतिल विद्यावान पूज्य देवादिकांसही ||

७.
विद्वत्वं च नॄपत्वं च नैव तुल्यं कदाचन |
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ||

विद्वत्ता आणि राजेपण होणे नाही बरोबरी |
राजा पूज्य प्रजेपुरता, विद्वाना सर्व पूजती ||

८.
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं |
विरक्तस्य तृणं भार्या निस्पॄहस्य तृणं जगत् ||

उदारा तुच्छ धन तैसे, शूरा मरण मामुली |
सन्याशा तृणवत पत्नी, निर्मोह्या जग शून्यवत् ||

९.
द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता |
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता ||

द्राक्षे मलूलुनी जाती, शर्करा कडक होतसे |
स्वर्गलोकी लपे अमृत, सुभाषितरसा पुढे ||

१०.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती |
तस्यां हि काव्यम् मधुरं तस्मादपि सुभाषितम् ||

भाषांमाजी प्रथमा संस्कृत, देवभाषा मधुर अशी |
काव्ये तिच्यातली मधुतर, अन त्याहुनी सुभाषिते ||

११.
आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम्
अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतो सुखम्

आळश्याला न मिळे विद्या, अडाण्याला न संपदा |
दरिद्र्या नसती मित्र, मैत्रीवाचुनि सुख न ये ||

दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873

गुलमोहर: 

मौल्यवान, बोधप्रद, संग्रहणीय अशी ही काव्यधारा आहे. भरपूर सुभाषिते झाल्यावर त्याचे पुस्तक प्रकाशित व्हावे व ते घरोघरी पोचावे. पालकाना आपल्या बालकांना शिकवण देण्यासाठी त्यचा खूपच उपयोग होईल.
अवांतरः
१) श्लोक ६: अकुलीन दलीत अशी सर्रास तुलना होईल का?
२) श्लोक ९: स्वर्लोकी लपते अमृत, सुभाषितरसा पुढे : स्वर्लोकी: स्वरलोकी की स्वर्गलोकी? स्वरलोकी लपे अमृत सुभाषितरसामुळे?
३) प्रत्येक भागावरील ओळख आधीच्या भागावरील प्रतिक्रीयांवर आधारीत ठेवल्यास पुनरुक्ती टळेल.

प्रद्युम्न, दलीत ही जातीवाचक संज्ञा नाही. दलीत म्हणजे जे त्यागलेले आहेत, हक्कांपासून वंचीत आहेत ते. आताचे राजकिय संदर्भ त्यास लावू नये. (राजकीय दृष्ट्या पुढे पुढे सवर्णही दलीत होतील!)
कविला विस्तारीत (broad) अर्थ अपेक्षीत आहे.
बाकी काव्यमाला छान आहेच.

आज मुलीच्या शाळेत सुभाषित व त्याचा अर्थ सांगायचा होता तेव्हा येथील एक सुभाषित दिले आहे. धन्यवाद. ही मालिका चालू ठेवा. आम्ही वाचतो.

चांगला उपक्रम Happy

तरीही, सहाव्या श्लोकातील कुलिन व अकुलिन यातिल, कुल म्हणजे "उच्च" कुळ हा अर्थ विनाकारण चालू परिस्थितीचा प्रभावाने घेतलेला आहे असे वाटते.
तर अकुलिन करता "दलित" शब्द अप्रस्तुत्त वाटतोय.
दलितान्नाही कुल असतेच. तसेच अकुलिन याचा "वन्चित" असाही अर्थ होऊ शकत नाही. केवळ ज्याला "आगापिछा" - "अनुवंशिक तपशील" उरलेला नाही/माहित नाही/अनौरस असा "अकुलिन" होऊ शकतो.
मूद्दाम टोकतोय, कारण असाच अनावधानाने/गैरसमजातुन प्रसिद्ध झालेला/छापिल मजकुर पुढेमागे "पुरावे/दाखले" म्हणून वापरला जातो.
कृपया जाणकारान्नी अधिक खुलासा करावा Happy

६.
किम् कुलेन विशालेन विद्याहीनस्य देहिन: |
अकुलीनोऽपि विद्यावान् देवैरपि सुपूज्यते ||

अडाण्याचा फुका जन्म, जरी उच्च कुळातला |
दलितांतिल विद्यावान पूज्य देवादिकांसही ||

दलितान्नाही कुल असतेच. तसेच अकुलिन याचा "वन्चित" असाही अर्थ होऊ शकत नाही. केवळ ज्याला "आगापिछा" - "अनुवंशिक तपशील" उरलेला नाही/माहित नाही/अनौरस असा "अकुलिन" होऊ शकतो. >> +१

अकुलिन म्हणजे दलित किंवा खालच्या जातीतील नाही तर अनौरसासारखा, ज्याचे कुल त्यालाही माहिती नाही असा.

पण हे सुभाषित फारच सुंदर आहे.

कर्णिकसाहेब उपक्रम चालू ठेवा. Happy

>>> कर्णिकसाहेब उपक्रम चालू ठेवा. >>>
हो, थोडा शब्दच्छल झालाय, पण उपक्रम चालूच ठेवा Happy
(केदार, अकुलिन चा वर्णसन्कराशी संबन्धित अजुन एक अर्थ आहे, पण तो इथे द्यायचे धाडस मी करु शकलो नाही)

उपक्रमाचे स्वागत केलेत. सार्थक झाले. सर्वांना मनापासून धन्यवाद.

प्रद्युम्न, पाषाणभेद आणि limbutimbu,आपले विचारमंथन खूप चांगले वाटले.

-श्लोक ६ - प्रद्युम्न यांची सूचना स्वीकारतो आहे. दलित हा शब्द सध्याच्या राजकीय परिस्थितीतील संदर्भाने वापरला नव्हता. अकुलिन अशा अर्थी सोप्या मराठीत 'हलक्या कु़ळीचा' असे म्हटले जाते. अकुलीन हा शब्द संस्कृत भाषेशी जास्त जवळिक ठेवतो आहे एव्हढ्याचसाठी तो वापरला नव्हता. पण तोच वापरणे आता योग्य वाटते आहे. तसा बदल करीत आहे.
-लिंबुटिंबूजी, सुभाषितकाराला 'विशाल कुल'मधे उच्च कूळच अपेक्षित असावे. कारण विशाल म्हणजे मोठे, विस्तारित असा अर्थ इथे अप्रस्तुत आहे. त्या काळात चातुर्वर्ण्याचा प्रभाव जास्त होता त्यामुळे साधारणपणे शूद्र वर्गातील लोक खालच्या (नीच) कुळातील आणि ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य वर्गातील लोक वरच्या (उच्च) कुळातील मानले जायचे. दलित या शब्दाबद्दलचा आपला आक्षेप लक्षात घेऊन बदल केला आहेच.

-श्लोक ९ - माझ्या समजुतीप्रमाणे स्वर्लोक म्हणजे स्वर्गलोक. स्वरलोक नव्हे. तरीही गैरसमज टाळण्यासाठी ओळ आणखी सोपी करून लिहीत आहे.

- प्रस्तावनेबाबतची प्रद्युम्न यांची सूचना पुढील भागापासून स्वीकारत आहे.

पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

मस्तच उपक्रम आहे कर्णिकजी.
अनुवाद पण छान जमलेत.
एकच विनंती : प्रत्येक सुभाषिताबरोबर त्याचं वृत्त (शक्य असल्यास लक्षणांसहित) दिल्यास फार बरं होईल.