वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते - [५]

Submitted by दामोदरसुत on 14 February, 2012 - 12:46

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते - [५]
[*]मी जी सुभाषिते येथे देतो आहे त्यांचे वैशिष्टय आतापर्यंत स्पष्ट झाले असेलच. आपल्या ऐकण्यात, बोलण्यात, वाचण्यात कितीतरी संस्कृत वचने वारंवार येतात. संस्कृत येवो वा न येवो त्या वचनाचा भावार्थही आपल्याला बहुधा समजतो. ही वचने बहुतेक वेळा एखाद्या सुभाषिताचा वा काव्याचा एक भाग असतो. माझ्या सेवानिवृत्तीनंतर या पूर्ण सुभाषितांचा वा काव्यांचा शोध मी घेऊ लागलो. संस्कृत सुभाषितांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पण ज्या सुभाषितांमधील एखाद्या तुकड्याने का होईना आपल्याच काय पण हिंदी, गुजराथी वगैरे अन्य भारतीय भाषांमध्येही स्थान मिळविले आहे अशी संग्रहीत केलेली सुभाषिते/काव्ये मी येथे देतो आहे.
यातील अनेक वचने लहानपणापासून निव्वळ ऐकूनच आपल्याला माहीत झालेली असतात. त्याचा भावार्थ देखील आपल्याला मुद्दाम कोणी समजाऊन दिलेला असतोच असेही नाही. पण संदर्भाने आपल्याला तो कळत गेला असावा. पण क्वचित त्ते वचन कोणाला नीट ऐकुच गेले नसेल तर गंमतीही होऊ शकतात.
आमचा एक मित्र हुशार होता पण परिस्थितीने फ़ारसे शिकू शकला नाही. तरी शिकल्या सवरल्या मित्रांमध्ये ऊठबस असल्याने चांगल्यापैकी बहुश्रूत होता. गप्पाटप्पांच्या एका सेशनमध्ये त्याने शेजारी बसलेल्या मित्राला विचारले, "मगापासून दरवळ सोडतोयस. बेटया! गतं न शौच्यम?" यावर मला फार हसु आले आणि मी म्हणालो, "अरे वा! छान आहे हे विडंबन!" यावर त्याने विचारले, "इथे कसले आले आहे विडंबन?" नंतर उलगडा असा झाला की त्याला ते वचन तसेच आहे असे वाटत होते.
त्याला "गतं न शोच्यम" ऐवजी "गतं न शौच्यम" असे ऐकू आल्याने ही सर्व गंमत झाली.
आता "गतं न शोच्यम" चा अर्थ ’जे घडून गेले आहे त्याबद्दाल शोक करत बसू नये’ हा आपल्याला माहीत आहे.

मूळ सुभाषित असे-
गतं न शोच्यं मन्तव्यं। भविष्यं न तु चिंतयेत॥
वर्तमानानुकुल्येन। वर्तनीय विचक्षणैः॥

म्हणजे घडून गेलेल्या गोष्टीबद्दल वृथा शोक करू नये. आपल्या हाती नसलेल्या भविष्याबद्दलही चिंता करू नये. शहाण्या माणसाने वर्तमानाचाच विचार करावा.
[*] ’मृदंगोपि मुखलेपेन करोति मधुरध्वनिम॥’ हे वचन आपल्या दैनंदिन जीवनात सतत वापरात आणले जाणारे व्यावहारीक मार्गदर्शक तत्व होय. प्रत्यक्षात मात्र ’ लाच दिली की कामे होतात ’ हे सूचित करण्यासाठीच ते सहसा वापरले जाते. पूर्ण सुभाषित असे :
को न याति वशं लोके मुखे पिंडेन पूरित:
मृदंगोपि मुखलेपेन करोति मधुरध्वनिम॥

म्हणजे इच्छित गोष्टींची (द्रव्य, अधिकार इत्यादि) पुर्तता (मुखलेप) झाल्यावर कोण वश(आपलेसे) होत नाही? मृदुंग देखील मुखलेप (कातडी भागाच्या मध्यावर कणकेचा गोळा चिकटविल्यावर) केल्यावर (आपल्याला हवा तसा) गोड आवाज करतो (गोड आवाजात वाजू लागतो).
खरे तर कोणतेही काम करतांना माणसाला योग्य मोबदल्याची (मुखलेप) अपेक्षा असतेच असते. काम देणाराही काम करणाऱ्याकडून दर्जेदार कामाची (मधुर ध्वनीची) अपेक्षा करीतच असतो. योग्य मोबदला मिळाला तर प्रामाणिक लोक दर्जेदार काम करून देतातही. ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. याचा भ्रष्टाचाराशी कांही संबंध नाही. जेथे हे तत्व जाणून व्यवहार होतात तेथे शांति व समाधान टिकून राहाते.
मुखलेपाशिवायच मधुर आवाजाची अपेक्षा किंवा मुखलेप करूनही मधुर आवाज न देणे हा भ्रष्टाचार!

[*] ’काकः किं गरुडायते’ म्हणजे ’कावळा कधि गरुडाची बरोबरी करू शकेल का?’ या अर्थी हे वचन आपल्याला परिचित आहे. पूर्ण सुभाषित प्रथम वाचले ते खालील प्रसंगामुळेः
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावण्यास विरोध करणाऱ्या कृतघ्न राजकीय पक्षाच्या एका नीच वृत्तीच्या केंद्रीय मंत्र्याने अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये लावलेली सावरकरांची वचने काढून तर टाकलीच, पण अतिशय संतापजनक मुक्ताफळे उधळीत त्याचे समर्थनही केले. यामुळे संतापाची लाट उसळली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी रुद्रावतार धारण करून ’जोडे मारा’ कार्यक्रम हाती घेतल्याने मंत्र्याचे थोबाड बंद झाले. त्यावेळी अगदी अनपेक्षित अशी प्रतिक्रीया आली ती प्रसिद्ध गांधीवादी समाजवादी नेते स्वर्गीय ग.प्र.प्रधान सरांकडून! त्यांच्यासारख्या १००% गांधीवादी नेत्याला देखील इतका राग आला की त्यांचे ’सकाळ’ दैनिकात एक पत्रच प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी मंत्र्याला धारेवर धरतांना एक सुप्रसिद्ध संस्कृत श्लोकच उदधृत केला होता.
तो होता :
गुणैरुत्तुंगतां याति नोत्तुंगेनासनेन ना।
प्रासादशिखरोस्थोपि काकः किं गरुडायते?

म्हणजे थोरवी प्राप्त होते ती अंगी असलेल्या उच्च कोटीच्या गुणांमुळे. केवळ उच्चासनावर (अधिकारपदावर)
बसल्यामुळे नव्हे. राजप्रासादाच्या उंच शिखरावर बसलेला कावळा काय गरूड समजला जातो?
त्यांनी मंत्र्याला बजावले की अरे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जी थोरवी लाभली आहे ती त्यांच्या अलौकिक
कार्यकर्तृत्वाच्या बळावर! केवळ (अधिकारपदाच्या) उच्च स्थानावर बसल्यामुळे नव्हे!
या सुभाषिताचा उत्तरार्ध ’काकः किं गरुडायते?’ हे संस्कृत वचन अनेक ठिकाणी वाचायला वा ऐकायला मिळते. अधिकारपदावरील व्यक्तींना अनेक समारंभाना प्रमूख पाहुणे म्हणुन बोलावले जाते. प्रसंग साजरा करतांना, यांपैकी अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले कांही लोक, आपण टिळक, गांधी, फ़ुले, आंबेडकर असल्याचा आव आणून बोलत राहातात. त्यावेळी हे वचन हमखास आठवते.
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१] http://www.maayboli.com/node/32396
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[६] http://www.maayboli.com/node/32754

गुलमोहर: