संस्कृतमधील सुभाषिते मराठीत - ३

Submitted by एम.कर्णिक on 25 January, 2012 - 17:59

दुसर्‍या सादरीकरणालादेखील चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हा तिसरा भाग इथे प्रकाशित करतो आहे. हा भाग सुद्धा गोड मानून घ्यावा ही प्रार्थना.

१२.
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि, न मनोरथै: |
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: ||

उद्योगानेच यश मिळते, स्वप्नरंजन ठरे फुका |
सिंह झोपेमधे असतां वदनी मृग शिरेल का? ||

१३.
उदये सविता रक्तो, रक्त:श्चास्तमये तथा |
सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता ||

उदयासमयी, अस्तासमयी दिनकर नारंगी |
सज्जन जरि का धनी वा निर्धन राहि एकरंगी ||

१४.
हंस: श्वेतो बक: श्वेतो, को भेदो बकहंसयो: |
नीरक्षीरविवेके तु हंस: हंसो बको बक: ||

हंस पांढरा, बकहि पांढरा, कसा भेद मग समजावा ?|
दूध नि पाणी अलग करी तो हंस, दुजा बक जाणावा ||

१५.
अग्नि: शेषं ॠण: शेषं शत्रु: शेषं तथैव च |
पुन: पुन: प्रवर्धेत तस्माच्शेषं न कारयेत् ||

शत्रू, अग्नि, कर्ज या तिन्हीना जर संपविले नाही |
पुन्हा वाढती म्हणुन तयातुन बाकी ठेवु नये काही ||

१६.
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक: ||

घोडा नाही हत्ती नाही वाघहि नाहिच नाही |
बकरा घेउन बळी, देवही दुर्बलघातक राही ||

दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २३ ते २७ - http://www.maayboli.com/node/32376
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873

गुलमोहर: 

मालिका उत्तम चालू आहे. हा तिसरा भागही फारच सुंदर. शाकुंतल नाटकातील चौथा अंक, त्यातही चौथा श्लोक जसा अति-सुंदर तसा आपला चौथा भागही अधिकच बोधप्रद होईल असे वाटते.
आपल्या आवाहनानुसार एक श्लोक पुढे देत आहे. यामध्ये पहिला भाग म्हणजे अतिपरिचयामुळे अनादर होतो हे समजले पण दुस-या ओळीतील चंदनाच्या लाकडाचा नीट संदर्भ लागला नाही. आपण खुलासा करू शकाल काय?
अतिपरिचयदवज्ञा संततगमनादनादरो भवति ।
मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ॥

>>मलये भिल्लपुरंध्री चन्दनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ॥

हे उदाहरण आहे अतिपरिचयादवद्न्या याचे.
पुरंध्री म्हणजे स्त्री. मलय - म्हणजे मलयगिरी किंवा मलय पर्वत जिथे खूपसारी चंदनाची झाडे आहेत.

मलय पर्वतावर राहणारी भिल्ल स्त्री चंदनाचे लाकूड इंधन म्हणून वापरते.

नंद्या:
हे खरे पण 'अतिपरिचयाशी या चंदनाच्या लाकडाचा काय संबंध लागतो?

मलय पर्वतावर चंदनाची झाडे मुबलक आहेत. ती स्त्री तिथेच रहात असल्याने तिचा चंदनाच्या झाडाशी परिचय अनेक प्रकारच्या मुबलक झाडांमधले एक झाड असा आहे. त्यामुळे तिला चंदनाच्या झाडाचा ’सुवासिक शीतल लेप’ हा उपयोग न जाणवता रोजच्या कामात इंधनासारखा उपयोग केला जातो.

कर्णिकजी, तिसरा भागही चांगला जमलाय.
यातली काही सुभाषितं नव्यानेच वाचली.
उदा. -----
अग्नि: शेषं ॠण: शेषं शत्रु: शेषं तथैव च |
पुन: पुन: प्रवर्धेत तस्माच्शेषं न कारयेत् ||

शत्रू, अग्नि, कर्ज या तिन्हीना जर संपविले नाही |
पुन्हा वाढती म्हणुन तयातुन बाकी ठेवु नये काही ||

-------------------------------------------------------------------------

एका सुभाषिताची दुसरी ओळ अर्धवट आठवतेय.
(अर्थ माहित आहे.)
"......... एरंडोपि द्रुमायते"
पूर्ण सुभाषित सांगाल का ?

निरस्तापदापदेशे एरन्डोपि द्रुमायते: जेथे झाडेच नसतात अशा ओसाड प्रदेशांत एरंडाच्या झाडालाही महत्वाचा वृक्ष म्हणून मान्यता मिळते.(वासरात लंगडी गाय शहाणी). चुकभूल देणे घेणे.

"......... एरंडोपि द्रुमायते"
पूर्ण सुभाषित हवं आहे.

यत्र विद्वज्जनो नस्ति श्लाघ्यास तत्रलपाधिरपि
निरस्तापदापे देसे एरंडोपि द्रुमायते

मस्त आहे ही मालिका.

चौदाव्यात 'तु हंस: हंसो बको बक:' याचा शब्दशः अर्थ कसा आहे? दोनदा हंस आणि दोनदा बक हे शब्द आले आहेत.

प्रद्युम्न आणि उल्हासराव,
ते संपूर्ण सुभाषित असे आहे:

यत्र विद्वत् जन: नास्ति, श्लाघ: तत्र अल्पाधि: अपि
निरस्ते पादपे देशे एरन्ड: अपि द्रुमायते

विग्रह दिल्यामुळे अर्थ स्पष्ट व्हावा. मराठीकरण पुढच्या भागात देईन.

प्रद्युम्न, अतिपरिचयात् ...... या सुभाषिताचा समावेश चौथ्या भागात करत आहे. नंद्या यांनी दिलेले स्पष्टीकरण एकदम बरोबर आहे. (आभार, नंद्या).
माधव, तुमच्या शंकेचे निरसन चारुदत्त यांनी अगदी योग्य शब्दात केले आहे.
चारुदत्त, धन्यवाद.

सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार.

थोडक्यात चंदनाची अतिपरिचयामुळे अवज्ञा झाली. >>>>सुंदर!
सुंदर सुभाषिते,मन प्रसन्न होते.
आभार कर्णिक साहेब.

कर्णिककाका हा भागही उत्तम आहे
अग्नि: शेषं ॠण: शेषं शत्रु: शेषं तथैव च |
पुन: पुन: प्रवर्धेत तस्माच्शेषं न कारयेत् ||>>>> हे सुभाषित फारच आवडले Happy

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक: ||

घोडा नाही हत्ती नाही वाघहि नाहिच नाही |
बकरा घेउन बळी, देवही दुर्बलघातक राही || >>>> ह्याचा अर्थ नीट समजला नाही...... देवही दुर्बलाचाच घात करतो असा होतो का?