वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते-[१]

Submitted by दामोदरसुत on 2 February, 2012 - 01:53

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[१]
’भुक्कंड’ नाव ऐकायला / वाचायला सुखद वाटत नाही म्हणून कांहीजण त्या धाग्यापासून दूरच राहिले. ’भुक्कंड’च्या प्रतिसादात कांही रसिक मजकूराला भुक्कड म्हणाले. तसा त्यांना हक्कही आहे. पण त्यांचे मत त्यांच्यापुरते! पण त्यामुळे मला 'अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख' या संस्कृत वचनाची आठवण झाली. हे वचन ज्या सुप्रसिद्ध सुभाषितात आहे ते सुभाषित असे-
इतर कर्मफलानी यदृच्छया! विलिख तानी सहे चतुरानन!
अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख!

कवी म्हणतोय, " हे ब्रम्हदेवा, मी केलेल्या कृत्यांबद्दल माझ्या नशिबात काय काय वाढून ठेवायचे असेल तसे ठेव. फक्त अरसिकाला काव्य शास्त्र विनोद सांगण्याची वेळ मात्र माझ्यावर आणू नकोस."
’भुक्कड’ नावाच्या धाग्याशी असलेल्या त्याच्या नामसादृश्यामुळे कांहीजणांनी ते वाचले तर कांहीजण दुरावले आणि कांहीनी आणखी सुभाषिते द्यावीत असे प्रोत्साहन दिले. त्यामुळे स्वमते वैशिष्टयपूर्ण अशा माझ्या सुभाषितसंग्रहातील दोन-तीन येथे द्यायचे ठरवले. या प्रास्ताविकात सुभाषितांची थोडी पुनरावृत्ती वाटली तरी पुढील भागात क्रमश: दोन-तीन दोन-तीन सुभाषिते, पुनरावृत्ती टाळून देण्याचा विचार आहे. त्यानंतर यात वैशिष्टयपूर्ण काय आहे ते वाचकांना जाणवेल अशी आशा वाटते. ते त्यांना न जाणवल्यास यात वैशिष्टयपूर्ण काय आहे ते सांगायला ’हम है ना!’.
’सत्य नेहमी कटु असते.’ असे व्यवहारी जगात लोक एकमेकाला सांगत असतात. अनेकदा व्यावहारिक शहाणपणाची शिकवण म्हणून "न ब्रूयात सत्यमप्रियम" हे संस्कृत वचन ऐकवले जाते. आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यात आणि मराठी-हिंदी साहित्यातही याचा उल्लेख वारंवार येतो. हे वचन बहुतेकांना त्याच्या अर्थासह माहीत असते पण ज्या एका सुपसिद्ध सुभाषिताचा ते एक भाग आहे ते पूर्ण सुभाषित माहीत असतेच असे नाही. ते संपूर्ण सुभाषितच खूप बोलके आहे. वरील वचनाचा कोठेही उल्लेख झाला की पुर्ण सुभाषितच अर्थासह सर्वांना ऐकविण्याची मी संधी घेत असतो. त्यामुळे आपली उजळणी तर होतेच पण हे सुभाषित पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचविण्यास हातभार लागतो. पूर्ण सुभाषित असे आहे-
सत्यं ब्रुयात् प्रियम् ब्रुयात न ब्रुयात् सत्यमप्रियम् |
प्रियम् च नानॄतम् ब्रुयात एष: धर्म: सनातन: ||

अर्थ- आवडणारे सत्य (खरे) बोलावे. पण न आवडणारे खरे बोलू नये. सुखावणारे खोटे बोलू नये. हेच योग्य आचरण आहे.
जगाच्या पाठीवरील कोठल्याही धर्माच्या, वंशाच्या, रंगाच्या, लिंगाच्या, वयाच्या माणसाला उपयोगी असे हे मार्गदर्शन आहे. सुंदराला सुंदर म्हणण्यात आपण आवडणारे सत्य बोलतो. कुरूपाला कुरूप म्हणणे आपण टाळतो तेव्हा आपण ’न ब्रुयात् सत्यमप्रियम्’ (न आवडणारे खरे बोलू नये) पाळून त्याचे मन विनाकारण दुःखी करीत नाही. आपण कुरुपाला सुंदर म्हणालो तर ’आवडणारे असत्य’ बोलणे होय.
विरोधाभास असा की ’आवडणारे असत्य’ बोलण्याचा आधार व्यवहारात वारंवार वापरला जातो. या कलेत तरबेज लोक बरेचदा यशस्वी होतांनाही दिसतात. कॉन्स्टेबलला इन्स्पेक्टर , क्लार्कला साहेब किंवा नर्सला डॉक्टर म्हटले जाते ते का? साहेबाच्या निरोपसमारंभात त्याच्यावर त्याच्यात नसलेल्या गुणांचे हार चढवले जातात ते का? पक्षाच्या वरच्या नेत्याची अनुयायी तोंड फाटेस्तोवर स्तुति करीत असतात ते का? असे करण्यात बहुदा स्वार्थ असतो. याला कारण आहे स्तुतीने सर्वच जण संतुष्ट होतात तर मग ’वचने किं दरिद्रता?’ म्हणजे बोलण्यात दारिद्र्य कशाला दाखवायचे?
’वचने किं दरिद्रता?’ हे संस्कृत वचन आपल्या वाचनात, बोलण्यात व ऐकण्यात वारंवार येते पण संपूर्ण सुभाषित? सहसा नाही.
संपूर्ण सुभाषित असे आहे -
प्रियवाक्य प्रदानेन अवघे तुष्यंति जन्तव:! तस्मात तदेव वक्तव्यं वचने किं दरिद्रता!
म्हणजे स्तुतीने सर्वच जण संतुष्ट होतात. असे जर आहे तर मग स्तुती करावीच. बोलण्यात दारिद्र्य कशाला दाखवायचे?
आणि थोड्या फरकाने -
हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते! परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता!
म्हणजे 'हातातले किंवा घरातले कांही द्यावे लागत नसतांना निव्वळ बोलण्याने जर दुसर्‍यावर उपकार होत असतील तर बोलण्यात दारिद्र्य कशाला दाखवायचे?'

वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[२] http://www.maayboli.com/node/32495
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[३] http://www.maayboli.com/node/32548
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[४] http://www.maayboli.com/node/32602
वैशिष्टयपूर्ण संस्कृत सुभाषिते -[५] http://www.maayboli.com/node/32686

गुलमोहर: 

अरसिकेषु कवित्व निवेदनं ! शिरसी मा लिख मा लिख मा लिख!

हे माहित असूनहि मी मायबोलीवर लिहीले, बरे लिहीले तर लिहीले पण
सत्यं ब्रुयात् प्रियम् ब्रुयात न ब्रुयात् सत्यमप्रियम् |
प्रियम् च नानॄतम् ब्रुयात एष: धर्म: सनातन: ||

हेहि पाळले नाही, असते तर मला मायबोलीवर कितीतरी जास्त मित्र मिळाले असते!
Sad

<<<<<हे वचन बहुतेकांना त्याच्या अर्थासह माहीत असते पण ज्या एका सुपसिद्ध सुभाषिताचा ते एक भाग आहे ते पूर्ण सुभाषित माहीत असतेच असे नाही.>>>>> हे बहुधा बर्‍याच सुभाषितांना लागू असावं...
चांगली मालिका .... उपक्रम आवडला.

<<<<पुर्ण सुभाषितच अर्थासह सर्वांना ऐकविण्याची मी संधी घेत असतो. त्यामुळे आपली उजळणी तर होतेच पण हे सुभाषित पुढल्या पिढ्यांपर्यंत पोचविण्यास हातभार लागतो.>>>> पटलं.

धावा, धावा, मदत करा.

'कालाय तस्मै नमः' हे ज्या श्लोकात आहे, तो श्लोक पूर्णपणे कुणाला माहित असल्यास इथे लिहाल का? वेळ असल्यास अर्थहि लिहावा, पण निदान श्लोक तरी पूर्ण लिहीला तरी मी आपला अत्यंत आभारी होईन.

धन्यवाद.

- आपला नम्र,
झक्की

इथे मिळाले
सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः । सर्वं यस्य वशादगात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः ।
मराठी अनुवाद:
ती रम्या नगरी, महान नृपती, मंत्रीगणांची सभा । ती विद्वानसभा, तशाच तेथील ललनाही चंद्रानना ॥
तो गर्वोन्नत राजपुत्रही, तसे ते भाट, त्यांच्या कथा । ज्या काळे, स्मरणास योग्य रचिले, काळास त्या वंदु या ॥

http://mr.upakram.org/node/3616
कालाय तस्मै नमः.

सा रम्या नगरी महान्स नृपतिः सामन्तचक्रं च तत्।
पार्श्वे सा च विदग्धराजपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः।
सर्वं यस्य वशादयात्स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
भर्तृहरि नीतिशतक.

ती रमणीय नगरी, तो महान् राजा, ते मन्त्रिमंडळ, पार्श्वभूमीवर ती विद्वानांची सभा, त्या चन्द्रमुखी युवती, तो उच्छृंखल राजपुत्रांचा घोळका, ते भाटचारण, त्या गोष्टी....हे सगळे ज्याच्यामुळे स्मृतिशेष झाले त्या काळाला नमस्कार असो

भरत मयेकर,
अनेक धन्यवाद.
माझा एक मित्र सध्या न्यू झीलंडमधे रहातो. तो काहीतरी लेख लिहीणार आहे. त्याला त्यात हा स्लोक लिहायचा आहे. त्याने लिहीला तर तुमची परवानगी आहे का?
धन्यवाद.

माझी परवानगी कशाला हवी? मी फक्त विजेरीने प्रकाशझोत टाकला हो!
श्लोक वापरायला कुणाच्याच परवानगीची गरज नसावी.

विजेरीने प्रकाशझोत टाकला हो!

कुठे झोत टाकायचा एव्हढीहि अक्कल मला नाही. मी झोत टाकला तर मला जळमटे दिसली म्हणून लगेच विजेरी बंद केली. दृष्टी आड ते सृष्टीआड. जळमटे काढायला नकोत! उगाच कष्ट!

झक्की, तुमच्या प्रतिसादांच्या मधेमधे कमर्शिअल ब्रेकसारखे येणारे हे वेगवेगळे धागे, इतरांचे प्रतिसाद वगैरे फार नकोसे होतात बुवा.