कडधान्याच्या गोळ्यांची आमटी

Submitted by आरती on 5 November, 2011 - 20:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गोळे:
१ वाटी भिजवलेली कडधान्ये, [याचे बाजारात पाकीट मिळते, नाहीच मिळाले तर आपल्या आवडीप्रमाणे सम प्रमाणात एकत्र करून भिजवावी]
१/२ वाटी तांदळाचे पीठ,
२ चमचे तेल,
१/२ इंच आले,
१ हिरवी मिरची,
चवीप्रमाणे मीठ.

आमटी:
३ मोठ्या पाकळ्या लसूण,
४ चमचे दाण्याचा कुट [जाडसर असावा],
१/२ वाटी चिरलेली कोथिंबीर,
१ चमचा लाल तिखट,
१ चमचा गोडा मसाला,
१/२ चमचा साखर,
२ पाने कडीपत्ता,
३-४ वाट्या पाणी,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग,
चवीप्रमाणे मीठ.

क्रमवार पाककृती: 

आमटी:
कढईत तेल घेऊन फोडणी करावी. अगदी पातळ चकत्या करून लसूण मंद आचेवर चांगला लाल होऊ द्यावा. आता फोडणीत कडीपत्ता,हळद,हिंग,लाल तिखट, गोडा मसाला घालावा. थोडेसे डावाने हलवून घ्यावे, म्हणजे तिखटा-मसाल्याचा 'रॉ' वास निघून जातो. ३-४ वाट्या पाणी घालावे. साखर,कोथिंबीर, दाण्याचा कुट घालावा. आमटीला मंद आचेवर उकळू द्यावे, गोळे करायला घ्यावे.
A1.jpg

गोळे:
४ ते ५ तसा भिजवलेली कडधान्ये, मिरच्या, मीठ, आल्याचा तुकडा बारीक वाटून घ्यावे. वाटताना वरून पाणी घालू नये. एका भांड्यात वाटलेले मिश्रण, २ चमचे तेल आणि त्यात मावेल इतके तांदळाचे पीठ असे सगळे एकत्र करावे. साधारण थालापिठाच्या पीठ सारखा गोळा तयार होतो. याचे छोटे-छोटे गोल-गोल गोळे करून आमटीत सोडावे.
A2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

हे गोळे वाफेवर शिजून आपोआप आमटीत तरंगू लागतात. सगळे गोळे वर येईपर्यंत डावाने हलवू नये. एखादा गोळा फुटून आमटी घट्ट झालीच तर शेवटी वरून थोडे गरम पाणी घालावे.
गोळ्यांची गर्दी झाल्यास, वर आलेले गोळे हलकेच डावाने डिशमध्ये काढून घ्यावे आणि जेवणाच्यावेळी परत आमटीत मिक्स करावे. असे केल्याने खालच्या गोळ्यांना डोके वर काढणे सोप्पे जाते.
बेताचेच तिखट असेल तर पोळीबरोबर न खाता, नुसते खायला पण छान लागते. नुसते खाणार असाल तर, उकळलेल्या आमटीत थोडी काकडी किसून घातल्याने अजून खमंग लागते.

माहितीचा स्रोत: 
माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages