खाज्याचे कानवले

Submitted by मृण्मयी on 21 October, 2011 - 12:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

सारणासाठी:
१ खोबरं डोल. काळी पाठ काढून किसलेला. (किंवा बाजारात मिळणारा खोबर्‍याचा चुरा)
अर्धी वाटी कणीक चाळून
१ डाव खसखस
वेलदोडा जायफळ पावडर (जायफळ ऐच्छिक)
कुठलाही सुका मेवा नाही (कानोला तोंडात विरघळायला हवा, त्यात सुका मेवा चावायला लागायला नको. )
साखर (प्रमाण कृतीत दिलंय)

पारी:
२ वाट्या बारिक रवा
दूध पाणी एकत्र करून (१:१)
अर्धी वाटी साजुक तूप
१ डाव लोणी
१ डाव कॉर्न फ्लावर

क्रमवार पाककृती: 

सारणाची:
* खोबरं किसून अगदी मंद आचेवर गुलाबी भाजावं. थंड करून हातानी चुरून घ्यावं
* चाळलेली कणिक साजुक तुपावर (मंद आचेवर) भाजावी. फार खरपूस नको.
* खसखस भाजून घ्यावी.
* खोबरं, कणिक आणि खसखस एकत्र करून (थंड झाल्यावर) हे मिश्रण जितकं असेल तितकीच पिठीसाखर घालावी.

पारीची कृती: हा सगळ्यात ट्रिकी भाग. पारी छान झाली तरच पापुद्रे सुटून कानोला छान होतो.
* रवा दुध्-पाण्यात घट्ट भिजवून घ्यावा. तासभर ओल्या (पण घट्ट पिळलेल्या) कापडाखाली झाकून ठेवावा.
* या रव्याच्या गोळ्याला थोडं थोडं तूप टाकून व्यवस्थीत कुटून घ्यावं. (साधारण अर्धी वाटी साजुक तूप लागेल)
* कुटलेल्या रव्याच्या दोन पोळ्या लाटाव्या. एकीला बोटांनी खड्डे करून त्यात कॉर्न फ्लावर्-लोण्याचं मिश्रण लावावं (खड्ड्यात जरा भरपूर मिश्रण मावेल). त्यावर दुसरी पोळी ठेवून खड्डे-कॉर्न फ्लावर मिश्रण प्रकार रिपीट करावा.
* या दोन्ही पोळ्यांची लांबट गुंडाळी करून १ इंचाचे तुकडे करावे.
* प्रत्येक तुकड्याची दोन टोकं दोन्ही हातांच्या बोटात धरून उलट दिशेला अलगद फिरवावीत आणि अलगद दाबावी. हे झालं पागोटं.

* १ डाव लोणी आणि कोर्न फ्लावर एकत्र फेसून घ्यावं.

कानोला भरताना:
* पागोट्याची ओवल शेपमधे पोळी लाटावी. (फार दाब न देता, नाहीतर पापुद्रे सुटणार नाहीत). लाटताना कोर्न फ्लावर घ्यावं. लाटताना उरलेली पागोटी ओल्या फडक्याखाली झाकावी म्हणजे कोरखंडणार नाहीत.
* अर्धी पोळी हातानी झाकून उरलेल्यात सारण भरावं.
* किंचित दुधाचा हात लावून कानोला बंद करावा. कडा कातरणीनी कातरून कानोले ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावे.
* ८-१० कानोले झाले की मध्यम आचेवर तुपात गुलाबी रंगावर तळावे.

karanji.jpg

फोटो सौजन्य : रंजना कर्णिक, अन्कॅनी.

वाढणी/प्रमाण: 
नगांचा आकडा आकारावर अवलंबून.
अधिक टिपा: 

कॉर्नपिठाऐवजी तांदळाची पिठी देखिल वापरतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खवा पण घालतात का? माहिती नव्हतं.

ही घरी आई-आजी यांच्याकडून चालत आलेली पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे काही बदल न करता दिलीय.

आजीच्या सांगण्यानुसार तळलेल्या कानोल्यावर बंदा रुपया फूटभरावरून सोडला तर त्याचे तुकडे व्हायला हवेत इतका अलवार असावा. (कानोल्यांवर असं कही फेकून बघितलं नाही.) Proud

स्वाती, केले तर फोटो टाकते पागोट्यांचा.

कुणाकडे कानोले करतानाच्या पायर्‍यांचा किंवा तयार कानोल्यांचा फोटो असेल तर कृपया इथे द्या. Happy

मस्त दिसतायत. इतके दिवस फक्त ऐकले/वाचले होते याच्याबद्दल. आज पहिल्यांदा पाहिले. हलका पिवळा रंग म्हणजे दुरंगी कानवले वगैरे केलेते की काय?

मृ, आता करच हे कानवले, क्रमवार प्रचि काढ अन मग कानवले पाठवून दे इकडे Proud

काय मस्त दिसताहेत. थोडे तरी करून पहाणार वीकेंडला

सुंदर.
माझ्या आईची हातखंडा कृति. पण पागोटे न करता ती गोळी हातानेच
जरा लांबवते त्यामूळे पापुद्रे चंद्रकोरीच्या आकारात येतात.

मृण्मयी,
मस्त झालेत कानोले!!
खवा पण घालतात का? <<<<<<<<होय कानवले खव्याचे पण केले जातात,त्या साठि सारणा मध्येच सुक्या खोबर्‍या बरोबर खवा भाजुन घातला जातो.पण हे कानवले जास्त दिवस टिकत नाहित.
तळलेल्या कानोल्यावर बंदा रुपया फूटभरावरून सोडला तर त्याचे तुकडे व्हायला हवेत इतका अलवार असावा<<<<<<<<<<<< या सठि पारी सठि भिजवलेला रवा भरपुर कुटावा लागतो,म्हणजे कमित कमि तासभर तरी!!आमच्या लहान पणि मातोश्रि आणि काकी आम्हा मुलांना कामाला लावायच्या,दगडि पाट्या वर हा भिजवलेला रवा ठेवुन वरवंट्या नि कुटावा लागायचा,भिजवलेल्या रव्याचि कणि मोडुन तो मैद्या सारखा दिसायला हवा हे सांगितले जायचे,पण तो झालेला कानवला तोंडात टाकताच विरघळायचा!!
होळि ची तेल पोळि आणि दिवाळी चा खाज्याचा कानवला बनवताना आईचा भरपूर ओरडा खाल्ला आहे,अगदी सासरि जावुन प्रधानांची नाकं कापाल वगैरे सगळं!!!पण आजही कानवला बनवल्या शिवाय दिवाळि चा फील येत नाहि!!

कसला तोंपासु फोटो आहे ! स्लर्प...
मी हे करणं म्हणजे बालवाडीतल्या मुलाला थेट पीएचडीची परिक्षा Proud

दिसताहेत सुंदर.

करुन पाहायची हिंमत करु का?? चारपाच अयशस्वी प्रयत्नानंतर जमेल कदाचित Happy

http://www.misalpav.com/node/7694
ह्या मी वेगवेगळ्या रंगात केल्या आहेत. (इंद्रधनुष्यी करंज्या)
माबो वर माझी रेसिपी कुणीतरी स्वतःच्या नावे टाकल्याने (अर्थात त्यांना फोटो कॉपीपेस्ट करता आला नाहीये) मी पुन्हा टाकली नाहीये.

हायल मृ. _/\_
हे मला जमेल असे वाट्त नाहीये. Sad माझा पास. पण कधी फार उत्साह संचारला तर नोट केलय. थँक्यु. थँक्यु.

खवा पण घालतात का? <<<<<<<< आम्ही पिठी (सारण) संपल्यावर उरलेल्या पागोट्यांमध्ये खिमा घालतो . Happy

फारच कौशल्याची पाककृती आहे ही. आयतीच खाण्यात सुख आहे>>माझंही तेच मत आहे. Happy

पण खरंच ते पागोटे म्हणजे काय मला नीट समजलं नाही. कुणी केलं असल्यास फोटो टाका प्लीज.

कानवले अप्रतीम !! माझं जरा कन्फ्युजन झालंय. मी समजत होते हाताने मुरड घातलेला तो कानवला आणी कातण्याने कातलेली करंजी.

पागोट्यासंबंधी मी थोडे लिहू का ?

गुंडांळीचे काप काढल्यानंतर ते साधारण स्विस रोल प्रमाणे दिसतात, पण रुंदीला कमी आणि जाडीला जास्त असतात. ते तसेच दाबले आणि लाटले तर आतला साटा बाहेर येतो आणि लाटलेल्या पुरीला चक्राकार भेगा पडतात. तसेच रेटून जर करंजी केली तर हमखास सारण बाहेर येते.
हे टाळण्यासाठी त्या तूकड्याच्या आतली घडी आरपार न राहता थोडी ओव्हरलॅप व्हावी अशी युक्ती करावी लागते.
इथे दिलेला प्रकार म्हणते त्या तूकड्याची दोन्ही टोके धरुन जरासा पीळ द्यायचा. म्हणजे साधारण बाटलीचे झाकण उघडताना करतो ती अ‍ॅक्शन करायची, त्यामूळे मधल्या घड्या ओव्हरलॅप होतात व लाटताना भेगा पडत नाही.
माझ्या आईची पद्धत म्हणजे तो तूकडा उभा न दाबता जरा समोरच्या दिशेने दाबायचा. त्यामूळेही दोन्ही बाजूच्या घड्या एकमेकांवर न पडता जरा मागेपुढे होतात, त्यामूळेही लाटल्यावर भेगा पडत नाहीत.

अन्कॅनी, Lol

>>"खुळखुळा नाही झाला पाहिजे !" हो हो. ते राहिलंच! Lol

धन्यवाद दिनेशदा!

खरंय, पागोट्यांचा फोटो दिला तर कळायला सोपं जाईल. कोण टाकतंय? Happy

वरच्या फोटोतले कानवले मी केलेले नसून रंजना कर्णिक यांचे आहेत. क्रेडिट त्यांना! मी फक्त अन्कॅनीने दिलेला फोटो टाकलाय.

जाच आहे हा! मला पण कानवले हवे... आत्तच्या आत्ता! भ्याआअsssss
येणार आहेत कानवले भारतातून इकडे पण तोवर धीर कसा धरावा?

कळलं पागोटं.
मी आयुष्यात अजून चिरोटे आणि कानवले खाल्ले नाहीयेत. किंवा अगदी लहानपणी खाल्ले असतील तर लक्षात नाहीये.
वरची कृती माझ्या क्षमतेच्या परिघातली नाही त्यामुळे करून बघते म्हणण्यातही अर्थ नाही. Happy
आता कोण करून घालतंय का ह्याची वाट बघावी आणि तूर्तास फोटोवर समाधान मानावं झालं.

कातिल पाककॄती आहे ( चवीला आणि करायला दोन्ही ) Happy मला खिलवले आहेत माझ्या एका मैत्रिणीने. अगदी वर दिलीय तीच कॄती होती. भाजलेली कणिक + खोबर्‍याचे सारण. फोटोबद्दल तर काय बोलावे ? ... मला हा प्रकार करायला जमेल असे वाटत नाही. फोटोवरच समाधान मानावे हे उत्तम Happy

Pages