दाण्याची चटणी

Submitted by तृप्ती आवटी on 25 August, 2011 - 09:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाजलेले दाणे स्वच्छ सोलून, १/४ (पाव) वाटी डाळं, २ कडिपत्त्याची छान मोठी पानं, ५-६ लाल सुक्या मिरच्या किंवा तेवढ्याच हिरव्या मिरच्या, १ चमचा साखर, १ चमचा जिरं, २ चमचे तेल, २ चिमूट हिंग, १ चमचा मोहरी, १ वाटी "गोड" ताक, मीठ.

क्रमवार पाककृती: 

एक चमचा तेल तापवून त्यात चिमूटभर हिंग, जिरं ह्याची फोडणी करावी. त्यात कडिपत्ता, मिरच्या टाकून परतून घ्यावं. त्यातच दाणे आणि डाळं घालून सगळं आणखी परतावं. सगळं छान खरपूस परतलं की गार करायला ठेवावं. गार झाल्यावर हे सगळं मिक्सरमध्ये घालून जरुरीपुरतं पाणी घालत दाटसर चटणी वाटावी. वाटतानाच चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर साखर घालावी. वाटलेल्या चटणीत ताक घालून नीट मिसळून घ्यावं.

एक चमचा तेलात हिंग-मोहोरी-एखादी लाल सुकी मिरची अशी फोडणी करुन चटणीवर घालावी. ढोकळा किंवा इडलीसोबत चापावी. गुजराथी पद्धतीच्या पांढर्‍या ढोकळ्याबरोबर मस्त लागते.

qpi10gw.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ मोठे
अधिक टिपा: 

_ताक "गोड"च हवे.
_ही चटणी माझ्या राजस्थानी मैत्रिणीने शिकवली. पण आमच्या इथे "हॉटेल"मध्ये खमण ढोकळ्यासोबत चटणी मिळते ती अशीच लागते. बाहेरची जरा जास्तच पातळ असते. घरी तशी केली नाही तरी चालेल Happy

माहितीचा स्रोत: 
आनंदी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी डाळे-दाणे-कढिलिंब आणि साखर-मीठ-तिखट घालून करते कोरडीच. आता अशी करून बघेन. मोहोरी-जिरं वापरलं नाहिये या चटणीत. मस्त चव येत असणार.>>
कढिलिंब?? की कडिपत्ता??

सिंडे मस्तय रेसिपी,
आधी सांगीतली असतीस तर ढोकळ्या बरोबर केली असती, अता परत ढोकळा करावा लागेल Proud

Pages