दाण्याची चटणी

Submitted by तृप्ती आवटी on 25 August, 2011 - 09:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाजलेले दाणे स्वच्छ सोलून, १/४ (पाव) वाटी डाळं, २ कडिपत्त्याची छान मोठी पानं, ५-६ लाल सुक्या मिरच्या किंवा तेवढ्याच हिरव्या मिरच्या, १ चमचा साखर, १ चमचा जिरं, २ चमचे तेल, २ चिमूट हिंग, १ चमचा मोहरी, १ वाटी "गोड" ताक, मीठ.

क्रमवार पाककृती: 

एक चमचा तेल तापवून त्यात चिमूटभर हिंग, जिरं ह्याची फोडणी करावी. त्यात कडिपत्ता, मिरच्या टाकून परतून घ्यावं. त्यातच दाणे आणि डाळं घालून सगळं आणखी परतावं. सगळं छान खरपूस परतलं की गार करायला ठेवावं. गार झाल्यावर हे सगळं मिक्सरमध्ये घालून जरुरीपुरतं पाणी घालत दाटसर चटणी वाटावी. वाटतानाच चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर साखर घालावी. वाटलेल्या चटणीत ताक घालून नीट मिसळून घ्यावं.

एक चमचा तेलात हिंग-मोहोरी-एखादी लाल सुकी मिरची अशी फोडणी करुन चटणीवर घालावी. ढोकळा किंवा इडलीसोबत चापावी. गुजराथी पद्धतीच्या पांढर्‍या ढोकळ्याबरोबर मस्त लागते.

qpi10gw.JPG

वाढणी/प्रमाण: 
४ मोठे
अधिक टिपा: 

_ताक "गोड"च हवे.
_ही चटणी माझ्या राजस्थानी मैत्रिणीने शिकवली. पण आमच्या इथे "हॉटेल"मध्ये खमण ढोकळ्यासोबत चटणी मिळते ती अशीच लागते. बाहेरची जरा जास्तच पातळ असते. घरी तशी केली नाही तरी चालेल Happy

माहितीचा स्रोत: 
आनंदी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी! Happy

मस्त दिसतेय रेसिपी.
मी डाळे-दाणे-कढिलिंब आणि साखर-मीठ-तिखट घालून करते कोरडीच. आता अशी करून बघेन. मोहोरी-जिरं वापरलं नाहिये या चटणीत. मस्त चव येत असणार.

गोड ताक कसे करतात मला माहिती नाही. घरी अनेकदा आज ताक अजिबात आंबट नाही असे ऐकले आहे. म्हणजे गोड ताक प्रकार ह्याच ग्रहावर अस्तित्वात आहे नक्कीच.

सर्वांना धन्यवाद. बरेच जणांनी ही चटणी छान लागते सांगितलेय म्हणजे त्यांना आधीच कृती माहिती होती तर. आता मला पाककृती पोलिसांची भिती वाटायला लागली आहे Proud

Happy म्हणजे नेहमीचे ताकच.
दुसरे म्हणजे दोन कडिपत्त्याची पानं म्हणजे दोन एकेकटी पानं की आख्खी संयुक्त पानं?
करून बघते ही चटणी.

गोड ताक व्हायला दही गोड हवं. म्हणजे पर्यायाने विरजण चांगलं हवं. दही/ विरजणाचं ताक खूप आंबट असेल तर नव्याने विरजण लावताना कमी घेऊन लावायचं. तरीही दुसर्‍या दिवशी आंबटपणा गेला नाही तर रोज थोडं करून विरजण गोडावर आणायचं. ३-४ दिवसांत आबंटढाण चवीचं विरजण/ ताक/ दही गोड होऊ शकतं. साखर घालयची नाही Happy

हे आईकडून.

मृदुला, मी ह्याच प्रश्नाची वाट बघत होते बघ Proud Light 1

दोन मोठी पानं म्हणजे दोन आख्खी संयुक्त पानं. २०-२५ किंवा जास्तच पानुटले होतील Happy

अरे वा, छान आहे की रेसिपी .. गोड ताक कुठून आणायचं हा प्रश्नच आहे पण मला चटणी थोडी आंबट झाली तरी चालेल .. Wink

गोड ताक म्हणाजे 'आंबट' नसलेले ताक. ताज्या कोमट दुधात एक चमचा विरजण घातले की चार तासात जे दही तयार होते त्याचे ताक गोड होते Happy

नाहीच झाले तर थोडे दुध घालायचे आंबट पणा कमी करयला. [किंवा साखर Happy ]

मस्त प्रकार. पहिले मला वाटलेले कोरडी चटणी असेल. पण इडली बरोबर नारळ न घालता खाण्याजोगी ही मस्त आहे. माझ्याकडे अर्धा नारळ पण संपत नाही व सुके खोबरे एका दिवसात खलास होते नुस्तेच खाउन.

भारतात एक जर्सी ब्रँड दही मिळते ते फार मस्त असते. जस्ट राइट त्याचे ताक बरोबर होइल. पांढरा ढोकळा मंजे अगदी हिरो आहे माझा. लैच आवड्तो.

मस्त वाटतेय, करुन बघणार.
दोन पानं म्हणजे मला खरच दोन सुटी पानं असं वाटलं होतं. मनात म्हणालेही कि कसं काय इतकं नेमकं प्रमाण सांगायला जमतं सुगरणींना !

Pages