सणांचे नैवेद्य व फराळाचे प्रकार २) नारळी पौर्णिमा - ओल्या नारळाची करंजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 August, 2011 - 15:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ ओला नारळ खरवडून
पाव किलो गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप

गव्हाचे पिठ अर्धा किलो
१ चमचा रवा
चिमुटभर साखर
मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

पहिला गव्हाच्या पिठात मिठ, रवा, साखर टाकुन घ्या मग मिसळून २ चमचे तेलाचे मोहन (एका भांड्यात तेल तापवुन ते पिठावर ओता) टाका. आता थोडे थोडे पाणी टाकत पिठ घट्ट मळा. इतके घट्ट मळायचे की बोट पिठात सहज आत गेले नाही पाहीजे.

आता हे पिठ साधारण १ तास झाकुन ठेवा.

करंजीच्या आतल्या चवीसाठी (पुरणासाठी):
तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.

गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला. थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.

कढई गॅसवर ठेउन त्यात करंजी तळण्यासाठी लागणारे तेल गरम करत ठेवा. तेल चांगले कढू द्या.

पुरी करण्यासाठी लागतो तेवढा गोळा घ्या.

त्याची पोळीपाटावर पुरी एवढी चपाती लाटा.

त्या चपातीवर चमचा भरुन खोबर्‍याची चव मधोमध ठेवा.

आता चपातीचे एक टोक उचलून दुसर्‍या टोकाला मिटून पुरणाच्या कडेच्या बाजुला हाताने दाबा.

मस्त धारदार काचणीने करंजीची डिझाईन कापा.

कडेचा बाहेरचा भाग काढून एका पेपरवर झालेल्या करंज्या ठेवत चला.

पिठाचा लहानसा राई एवढा गोळा करुन तेलात टाकुन पहा तेल कढलय का ते. जर गोळा लगेच तरंगला तर तेल कढलय समजा. चिकटून राहीला तर अजुन तापू द्या.

तेल चांगले तापले की त्यात करंज्या तळण्यासाठी सोडा.

गॅस मिडीयम किंवा मंद ठेउन तिन-चार मिनीटांनी करंज्या पलटा.

करंज्यांना गोल्डन, लालसर रंग आला की झार्‍यात घेउन तेल निथळवा.

आता एका ताटात त्या काढून घ्या.

मोठ्या परातीत किंवा थाळ्यात वर्तमान पत्र टाकुन त्या त्याच्यावर ठेवा म्हणजे वर्तमान पत्रात अतिरिक्त तेल शोषल जाईल.

झाल्या ओल्या नारळाच्या करंज्या तयार.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन तरी लागतातच.
अधिक टिपा: 

आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे.

गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याच्याही करता येतात.

१) मोदक (नागपंचमी/गणपती) - http://www.maayboli.com/node/27898

पिठात मोहन जास्त घालु नये.

पुरण ओल नसाव. गरजेप्रमाणे गुळ अधिक घालू शकता.

गुळा ऐवजी साखरही घालू शकता. पण गुळाची चव जास्त चांगली येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे माझ्याने निट मळले जात नाही. >>> मलापण घट्ट पिठं चांगली मळता येत नाहीत. नुसत्याच गुदगुल्या केल्यासारखं करते.

आईगं! किती तो अत्याचार!!! Proud मस्त दिसत आहेत करंज्या. आमच्याकडे वर्षातून एकदा-दोनदाच केल्या जातात, कारण तळणं वगैरे शक्यतो टाळतो. पण एकदा ह्या करंज्या केल्या की त्या संपायला वेळ लागत नाही!

लई बेस्ट! एकदम तोंपासु!
जागू, आता तू सगळे नैवद्याचे प्रकार लिहून काढलेस की मगच ठरवीन, की किती दिवस मुक्कामासाठी यायचे तुझ्याकडे Happy

मलापण घट्ट पिठं चांगली मळता येत नाहीत>>> फूड प्रोसेसर वापरावा.

जागू, अपन करंजी नय खाता. त्यामुळी ही रेसिपी मी वाचलीच नाही Happy तरीही. फोटो जाम छान आलेत.

नुसत्याच गुदगुल्या केल्यासारखं करते.
अश्वे Lol

अरुंधती, नंदिनी धन्स.

नलिनी अग आमचे एकत्र कुटुंब आहे त्याचा परीणाम म्हण किंवा पुर्वी पासुन माहेरी आणि सासरी चालत आलेली प्रथा यामुळे मी सगळेच सण करते. तुला वर्षभर रहायला याव लागेल.

मस्त ! करंज्या हा माझापण आवडता पदार्थ आहे. पण ह्या वर्षी मला बेक्ड करंज्या करून बघायच्या आहेत. कोणाकडे खात्रीशीर रेसिपी आहे का? मला शक्यतो सारण ओल्या नारळाचंच करायचयं. ड्रायफ्रुट्स वगैरेचं नको.
बेक्ड करताना कोणत्या तापमानाला बेक कराव? पीठाचं (कणीक/ मैदा आणि रवा) प्रमाण काय घ्याव? मोहन किती आणि कोणतं घालाव?

सुरेख. पदार्थ करणं, त्याचे करतानाचे फोटो काढण, आणि मग ते इथे टाकण, तुझ सगळच काम किती पद्धतशीर आहे ग Happy

मी या करंज्या रवा भिजवुन, फक्त रव्याच्याच करते. लाट्या करण्या आधी साट (?) लावल की मस्त खुशखुशीत होतात. आणि गुळाच्या ऐवजी साखर, अर्थातच पांढर्‍या स्वच्छ होण्यासाठी Happy

दिनेशदा कालच भाजी मार्केट मध्ये गेले तेंव्हा सगळ्या पावसाळी भाज्या बघुन मला ऋषीपंचमीच्या भाजीची आठवण झाली. आजच करण्याचा बेत होता. पण त्यासाठी म्हणजे भाज्या निवडण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणुन आता एखादा शनिवार ठरवेन. मागच्या महिन्यात नणंदेला डिलिव्हरी पुर्वी खावीशी वाटत होती तेंव्हा एकदा केली होती. पण त्यात सगळ्या भाज्यांची अट नसते ऋषीपंचमीच्या दिवसासारखी. त्यादिवशी करेन ती खरी भाजी. फोटो नक्की काढेन.

सोहा तुला जर नाही मिळाली रेसिपी तर मला विपुत विचार मी देईन माझ्याकडची.

आरती धन्स ग. रव्याच्या मी एकदा पाणिपुरीच्या पुर्‍या केल्या होत्या. एकदम खुसखुषीत होतात. काहीजण रव्याचे मोदकही करतात.

ओल्या नारळाच्या करंज्या केल्या आत्ताच.
मैदा + रवा वापरला. finally तळताना सारण बाहेर आलं नाही.
पण पारी चिकटवताना खूप वेळ लागला.
चिकटवायला दुध वापरत होते.
काय चुकलं असेल?

छान झाल्यात करंज्या..
<<<तरी जर फोड न येण्यासाठी काही उपाय असतील तर नक्की सांगा>>>....
माझ्या सा. बा. किमान दोन तास कणीक भिजवून ठेवतात आणि नंतर ती कुटून घेतात. मला वटते रवा घातल्यावर हे मस्ट आहे...त्यामुळे कणीक सारखी होत असावी.
मला ते कुटण्यापेक्शा फूड प्रोसेसर / मिक्स्रर ( व्हीपवर) बरा वाटतो.

जागु,
मी ते पीठ १ तासभर ओल्या फडक्या नी झाकून ठेवलं आणि नंतर कुटून घेतलं. त्यामुळे कोरड पडलं का?
पण असच करतात ना?
का मी लाटी जाड लाटली म्हणून? खूप पातळ लाटायची का?

ह्या मी अक्षयतृतीयेला केलेल्या ओल्या नारळाच्या करंज्या Happy
KaranjiB.jpgKranjiA.jpg
रवा १ वाटी आणि मैदा अर्धीवाटी (किंवा त्यापेक्षाथोडा कमी) याप्रमाणात केल्या. तुपाचं मोहन घालुन दुधात भिजवला रवा मैदा.

काल हा पदार्थ केला. मैद्याचा वापर नसल्याने खुश होते. सर्व सूचनांचं पालन केले. पण करंजीचं आवरण नरम पडले. मा.का.चु?

हो हो. पुरी सारखंच. अच्छा, म्हणजे चुकले नाहीये तर. आता कुरकुरीत आवरणासाठी पुढच्या खेपेस मैदा वापरून बघेन.
त्वरित उत्तरासाठी धन्यवाद जागु.

Pages