सणांचे नैवेद्य व फराळाचे प्रकार २) नारळी पौर्णिमा - ओल्या नारळाची करंजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 August, 2011 - 15:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ ओला नारळ खरवडून
पाव किलो गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप

गव्हाचे पिठ अर्धा किलो
१ चमचा रवा
चिमुटभर साखर
मिठ
तेल

क्रमवार पाककृती: 

पहिला गव्हाच्या पिठात मिठ, रवा, साखर टाकुन घ्या मग मिसळून २ चमचे तेलाचे मोहन (एका भांड्यात तेल तापवुन ते पिठावर ओता) टाका. आता थोडे थोडे पाणी टाकत पिठ घट्ट मळा. इतके घट्ट मळायचे की बोट पिठात सहज आत गेले नाही पाहीजे.

आता हे पिठ साधारण १ तास झाकुन ठेवा.

करंजीच्या आतल्या चवीसाठी (पुरणासाठी):
तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.

गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला. थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.

कढई गॅसवर ठेउन त्यात करंजी तळण्यासाठी लागणारे तेल गरम करत ठेवा. तेल चांगले कढू द्या.

पुरी करण्यासाठी लागतो तेवढा गोळा घ्या.

त्याची पोळीपाटावर पुरी एवढी चपाती लाटा.

त्या चपातीवर चमचा भरुन खोबर्‍याची चव मधोमध ठेवा.

आता चपातीचे एक टोक उचलून दुसर्‍या टोकाला मिटून पुरणाच्या कडेच्या बाजुला हाताने दाबा.

मस्त धारदार काचणीने करंजीची डिझाईन कापा.

कडेचा बाहेरचा भाग काढून एका पेपरवर झालेल्या करंज्या ठेवत चला.

पिठाचा लहानसा राई एवढा गोळा करुन तेलात टाकुन पहा तेल कढलय का ते. जर गोळा लगेच तरंगला तर तेल कढलय समजा. चिकटून राहीला तर अजुन तापू द्या.

तेल चांगले तापले की त्यात करंज्या तळण्यासाठी सोडा.

गॅस मिडीयम किंवा मंद ठेउन तिन-चार मिनीटांनी करंज्या पलटा.

करंज्यांना गोल्डन, लालसर रंग आला की झार्‍यात घेउन तेल निथळवा.

आता एका ताटात त्या काढून घ्या.

मोठ्या परातीत किंवा थाळ्यात वर्तमान पत्र टाकुन त्या त्याच्यावर ठेवा म्हणजे वर्तमान पत्रात अतिरिक्त तेल शोषल जाईल.

झाल्या ओल्या नारळाच्या करंज्या तयार.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन तरी लागतातच.
अधिक टिपा: 

आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे.

गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याच्याही करता येतात.

१) मोदक (नागपंचमी/गणपती) - http://www.maayboli.com/node/27898

पिठात मोहन जास्त घालु नये.

पुरण ओल नसाव. गरजेप्रमाणे गुळ अधिक घालू शकता.

गुळा ऐवजी साखरही घालू शकता. पण गुळाची चव जास्त चांगली येते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, एकदम मस्तच.....आता उचलुन तोंडात टाकावीशी वाटते Happy
मला भयंकर आवडतात या अशा करंज्या.

रच्याकाने या करंज्या नरम पडतात ना, कुरकुरीत राहतात का?

भयंकर आवडीचा पदार्थ! आई वसुबारसेला करते हाच काय तो फरक! एरवी मी दिवाळीत सुक्या खोबर्‍याच्या करंज्या फार खात नाही, ओल्या नारळाच्या वेगळ्या करायला लावते माझ्यासाठी Proud
भारी दिसतायत हां या करंज्या!

जागू , करंज्या मस्त दिसताहेत Happy .

आम्ही मात्र कव्हर रवा मैदा मिक्स करून बनवतो . त्यामुळे करंज्या तळूनसुद्धा थोड्या पांढरसरच दिसतात Wink ( त्या पांढर्‍याच दिसल्या पाहिजेत असा आग्रह असतो Happy ) . सारण फक्त आणि फक्त ओल्या नारळाचंच आणि तेही साखर घालूनच . ( एखाद्याला हे नियम अति वाटू शकतात , पण इलाज नाही . जरा फेरफार केला तर करंज्यांना कोणीही हात लावत नाही ) . आजी सारणात अगदी थोडासा रोझ इसेन्स सुद्धा घालायची , तिच्या करंज्या केवळ अप्रतिम व्हायच्या .

जागू तुझे चरणकमल कुठे आहेत? रच्याकने नुसते असे छान छान फोटो बघणे म्हणजे फार त्रासाचे काम आहे.
तुझा पत्ता देवून ठेव भारतात आले की तुझ्याकडेच येणार आहे मुक्कामाला. Proud

जागूं मस्तच गं Happy

संपदा +१ . पांढर्‍या दिसणं, फोड न येणं, डाग न पडणं याबद्दल अगदी अगदी Happy पण सीरीयसली, कणकेच्या करंज्या मऊ पडत नाहीत का?

आहाहा काय छान दिसत आहेत करंज्या. जागू तु खरोखर सुगरण आणि किति सगळे करतेस अगदि सगळ्या सणांचे. खूपच छान.

मी तेलात तळलेल्या करंज्या पहिल्यांदा ऐकल्या. माझी आई आणि सा.बा दोघी तुपात तळतात.

आमच्या कडे कव्हर पण नुस्त्या रव्याचे करतात आणि त्यात मोहन पण तुपाचंच असतं. करंजी पांढरी/किंचित गुलाबीच दिसावी हा आग्रह असतो. सोनेरी करंजी म्हण्जे अमेच्युर हात समजला जातो.

आमच्या कडे नवैद्याला जे गोडाचे पदार्थ बनतात त्यात मीठ पण घालत नाहित.

यम्म्मी... एकदम तोंपासु Happy

मला गुळापेक्षा साखरेच्या जास्त आवडतात.. चारोळ्या, वेलची, काजु आनि केशर..... ला ग ला Happy

फोटो लै भारी आहेत.. डायट गेले खड्ड्यात हा विचार मनात आणणारे Happy

ह्या करंज्या थंड झाल्यावर नरम पडत असणार कारण आत ओले सारण आहे. पण मुळात थंड होईतो त्या उरतील का हाच प्रश्न आहे Happy

गावी गणपतीच्या दुस-या दिवशी अशा करंज्या नी मोदक करतात त्याची आठवण झाली. Happy

जागू, अगं का हाल्-हाल करतेस आमच्या जीवांचे ? सकाळी तुझे धागे उघडायलाच नकोत. दिवसभराच्या ठरवलेल्या कामांवर परीणाम होतो. Proud
करंज्या सुरेख झाल्यात हे सांनल.

संपदा + १ Happy

करंज्यांना सारण साखरेचेच कारण मग मोदकाचं सारण आणि करंज्यांचं सारण यात काही फरक राहत नाही.

साधना, नाही गं, ओल्या नारळाच्या करंज्या पण छान कुरकुरीत राहतात. तळताना सारणातला ओलेपणा कव्हराला आतून शिजवतो. Happy

फार सुंदर दिसताहेत त्या टोपल्यात ठेवलेल्या करंज्या Happy

सारणात थोडा खवा घातला की खल्लाआआअस ! ओल्या नारळाच्या करंज्या अशा सोनेरीच आवडतात आमच्याकडे. पण तेलाऐवजी तुपात तळतात. सुक्या खोबर्‍याच्या (दिवाळीतल्या) करंज्या पांढरट असतात रवा मैद्यामुळे. तो भिजवलेला रवा मैदा कुटून कुटून जीव मेटाकुटीला येतो. पण फिनिश्ड प्रॉडक्ट अहाहा !

नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे. >>मला कधीही दिल्या तरी मी हादडीन tongue0021.gif

मस्तच झाल्यात करंज्या.
आमच्याकडे पण संपदाचेच नियम लागू. आईचा पेशंस नाही माझ्याकडे. आणि एवढा खटाटोप करुन ती फक्त एखादीच खाते.

जागू,

तोंडाला पाणी सुटेल अशी पाककृती, सुरेख फोटो आणि सजावट. आवडली.

मात्र,
मोठ्या परातीत किंवा थाळ्यात वर्तमान पत्र टाकुन त्या त्याच्यावर ठेवा म्हणजे वर्तमान पत्रात अतिरिक्त तेल शोषल जाईल.>>>>>
असे करणे चूक आहे. कारण वर्तमान पत्राची शाई पदार्थात शिरते. ही शाई पोटात काय उपद्रव करते ते नीट माहीत नाही पण डोळ्यांस अत्यंत अपायकारक असते.

म्हणून, तेल शोषले जाण्याकरता टिश्यू पेपर वापरावा ही सूचना!

दुसरे म्हणजे, पोषक मूल्ये टिकवून धरण्याच्या दृष्टीने करंज्या लाल होईस्तोवर न तळता, कोवळा तांबुस सोनेरी रंग चढताच उतरवाव्यात अशीही सूचना केल्याशिवाय राहावत नाही! अर्थातच असे केल्यास गरम खाल्या तरच कुरकुरित लागतात, एरव्ही निवल्यावर मऊ पडतात, हे ओघाने आलेच.

जे रुचेल, पटेल ते घ्यावे; अन्यथा सोडून द्यावे.

रचु नाही ग नरम पडत. नरम पडू नये म्हणुनच पिठात रवा, चिमुटभर साखर, मोहन घालतात.
दिपांजली, सशल, लालू, प्राजक्ता, प्रज्ञा, अनु, रुनी, प्रिया, आशुतोष, लाजो, साधना, मवा, अश्विनी, अरुण, पियापेटी, चातक, दिपा, दिनेशदा, दक्षिणा धन्यवाद.

संपदा, मंजूडी हो ग तशाही करतात. पण मैदा, साखर हानिकारक म्हणुन नाही करत आम्ही त्या. पण एक दिवस खायला काहीच हरकत नाही हे मात्र खरे.

बिल्वा मी पिठ जास्त वेळ मुरवले नाही १५ मिनीटांत करायला घेतल्या त्यामुळे कदाचित फोड आले असतील. शिवाय हे पिठ घट्ट असल्यामुळे मळायला त्रास पडतो. त्यामुळे माझ्याने निट मळले जात नाही. मैद्याच्या बाबतीत असे नाही घडत.
तरी जर फोड न येण्यासाठी काही उपाय असतील तर नक्की सांगा.

अक्षरी अग तुपातील पदार्थ मला जरा जड वाटतात म्हणुन मी नाही करत तुपात. साजुक तुपात करण एवढ पॉसिबल नाही. आमच्याकडे मिठाला काही नियम नाहीत.

भरत मयेकर, नरेंद्र गोळे खुप खुप धन्यवाद ही माहीती दिल्याबद्दल. आजच डिशु पेपर आणते.

Pages