हिरना... समझ-बूझ बन चरना

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

कुमारांचं निर्गुणी भजन ऐकत होतो.
कुमारांनी ते शब्द इतक्या आर्ततेने आळवलेत की काही केल्या ते शब्द विसरेनात. पण त्याचा अर्थ मात्र तितकासा कळला नाही.

शब्द असे आहेत -

हिरना...
समझ बूझ बन चरना
एक बन चरना
दूजे बन चरना
तीजे बन पग नही धरना

तीजे बन में पाँच पारधी
उन के नजर नही पडना
पाँच हिरना पच्चीस हिरनी
उन में एक चतुर ना

तोए मार तेरे मास विकावे
तेरे खाल का करेंगे बिछोना

कहे कबीरा जो सुन भइ साधो
गुरू के चरन चित धरना

इथून थोडा-फार अर्थ कळला. http://kabir-bani.blogspot.com/2009/10/5-hirana.html

हे हरिणा, या अरण्यात समजून-उमजून चर. अतिशय सावधगिरीने वावर.

पहिलं अरण्य - स्वातंत्र्य (?)
दुसरं - अध्यात्म (?)
तिसरं - मोह (?)

तिसर्‍या जंगलात पाच पारधी आहेत.
(पंचेंद्रीयांच्या लालसा?)
अर्थात तुझी शिकार टिपायला दबा धरून बसलेत. त्यांच्या नजरेस पडू नको.

पुढच्या ओळींत आहेत ते पाच हरिण आणि पंचवीस हरिण्या... सगळेच मूर्ख/मठ्ठ .. म्हणजे काय?

ते तुला मारून तुझं मांस विकणारे!
तुझी काळजी कुठून वाहणार ते? (असा अर्थ असावा बहुतेक. की आणखी काय आहे? एके ठिकाणी 'तुझ्या कातडीचा बिछाना करतील' असा अर्थ सापडला.)

या सगळ्यात गुरूची आस धरलीस तर सही-सलामत सुटशील.

आणि हरीणच का? मोहाच्या मागे मागचा-पुढचा कसला विचार न करता जीव तोडून पळते म्हणून?

कुमारांनी यात इतका जीव ओतलाय की त्यातली भावना अगदी ये हृदयीचे ते हृदयी अलगत पोचते. पण ते जे पोचते ते काय आहे हे मात्र कळले नाही. तुम्हाला याचा अर्थ माहीत असेल तर कृपया लिहा.

विषय: 
प्रकार: 

गजाभौ, तीन बनं कोणती हे कुठे स्पष्ट होत नाहीये, पण पाँच हिरना ही बहुधा पाच ज्ञानेंद्रियं असावीत आणि पंचवीस हरिणी (यात पंचवीस या आकड्याला महत्त्व नसावं, 'छप्पन पाहिलेत' टाइप) म्हणजे या ज्ञानेंद्रियांना सतत भुलवणार्‍या संवेदना असाव्यात.
हे सगळे शारीर सुखविलास म्हणून माँस / खाल (त्वचा) इत्यादींचा उल्लेख. ज्या माँसाकातडीच्या प्रेमात स्वतःला विसरतो आहेस, ती एक दिवस तुला विकून खाईल - अशा अर्थी.
हे सगळे अज्ञानी कारण त्यांना आत्म्याच्या खर्‍या स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. (तो पंचेंद्रियांना दृग्गोचर नाही.)

(या विचारधारेनुसार पहिली दोन बनं ही मन आणि बुद्धी असतील की काय अशी शंका येते. तसंच पाँच पारधी ही पंचमहाभूतं असतील काय अशीही.)

आहे माझ्याकडे याचा अर्थ. सेव्ह केलाय कोठेतरी. शोधते आणि देते इथं.... कबीराच्या गूढ रचनांपैकी एक रचना समजली जाते ही. मस्त मस्त Happy

तीन बनं .... तिसरं बन म्हणजे भौतिक सत्य / वास्तव जे आपण आपल्या इंद्रियांमार्फत अनुभवतो. दुसरं बन म्हणजे चित्ताचं साम्राज्य, आपली बुध्दी, चित्त यांचं विश्व. त्यात ऋषी, मुनींनी खोल ध्यानात ऐकलेले ध्वनी, नाद, पाहिलेले चित्र / दृश्य इत्यादी हेही येते. आणि पहिलं बन म्हणजे आत्म्याचं विश्व. जिथे जीव व शिव एकच असतो. तेव्हा कबीर म्हणतो की पहिल्या बनात चरा, दुसर्‍या बनात देखील चरा, पण तिसर्‍या बनात असे चरु नका. कारण ते ऐहिक सुखाचं बन आहे.
का? कारण तिसर्‍या बनात मनुष्याची सुखलोलुप प्रवृत्ती ही पाच इंद्रियांच्या ताब्यात असते. पंचेंद्रिये ही शिकारी असतात. शिकारी प्रवृत्तीचं प्रातिनिधित्व करतात. त्यांच्या हल्ल्याच्या परिघापासून दूर राहायला कबीर सांगतो.

पंचेंद्रिये म्हणजे पाच हरणे. हरणासारखीच ती चंचल असतात. ही पाच हरणे तिसर्‍या म्हणजे ऐहिक भोगांच्या बनात सुखाच्या शोधात हिंडत असतात. पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये मिळून पंचवीस तर्‍हांनी भौतिक जगाचा आस्वाद घेता येतो. पण हे अनुभव काही स्थायी नाहीत. अक्षय नाहीत. चिरंतन नाहीत. ते टिकत नाहीत. पण तरीही ह्या पंचवीस तर्‍हांनी भौतिक सुखाचा पाठपुरावा करणे चालूच राहते. कबीर म्हणतो की या तर्‍हांपैकी कोणतीच तर्‍हा / प्रकार हा सत्य पाहण्यासाठी / दिसण्यासाठी पुरेसा नाही.

शेवटी ह्या सर्व पाठपुराव्याचा अंत (भौतिक सुखांच्या मागे धावण्याचा अंत) पाच इंद्रियरूपी शिकार्‍यांनी शोध घेण्याच्या चेतनेला मारून टाकण्यात होतो. ह्या सर्व तर्‍हा केवळ भूक भागविणे, सौंदर्य वर्धन करणे आणि भौतिक जगाला आणखी सजवण्यापुरत्या कामी येतात. परंतु त्या सत्याचा मागोवा घेत नाहीत.

मग अशा ह्या विषण्ण करणार्‍या वास्तवातून कोणता मार्ग आहे का? कबीर म्हणतो की सुखाच्या मागे धावण्याला कारण आहे ते मन. म्हणून इंद्रियांना ताब्यात ठेवण्यापेक्षा मनाला ताब्यात ठेवणे गरजेचे आहे. पण ते तर फार कठीण काम आहे. म्हणून कबीर पुढे म्हणतो की असं जे (काबूत न राहणारं) मन आहे ते अंतर्यामी अशा (अंतस्थ) गुरूच्या चरणी अर्पण करा. तो गुरू तुम्हाला मार्ग दाखवेल. खर्‍या सुखाचा खजिना गवसेल. ते सुख अक्षय असेल, चिरंतन असेल, समृध्दतेने परिपूर्ण असेल.

ज्ञानेंद्रिये - २ डोळे, २ कान, त्वचा, जीभ, नाक
कर्मेंद्रिये - २ हात, २ पाय, लिंग/योनी, गुद, वाणी
कर्मे -
१ - उत्सर्ग (बाहेर टाकणे)
२ - आनंद
३ - ग्रहण (घेणे)
४ - गमन (हालचाल करणे)
५ - भाषण (बोलणे)

भौतिक जगातील सुखांचा शोध घेणार्‍या पंचवीस तर्‍हा / पध्दती बाह्य सुखाचा उपभोग घेणे, त्याचा शोध सातत्याने, निर्दयपणे चालूच ठेवतात. पण त्यातील एकही तर्‍हा ही सर्व सुखे चिरंतन नाहीत, कायम टिकणारी नाहीत हे सत्य पाहण्याइतपत चतुर / चलाख नसते.

अकु धन्यवाद! गजानन खरोखर कुमारांनी इतकं आळवून आळवून गायलंय कुमारांनी गायलेली निर्गुणी भजनं ऐकणं हा एक वेगळाच सुरेख अनुभव आहे.

स्वाती, अकु अनेक धन्यवाद. Happy

अरुंधती,
पंचेंद्रिये ही शिकारी असतात <<<
आणि पुढे
पंचेंद्रिये म्हणजे पाच हरणे <<<

इथे माझा अजूनही गोंधळ आहे. म्हणजे आधी या इंद्रियांना शिकारी म्हटलेय आणि नंतर त्यांनाच हरिणं (भक्ष्य) म्हटलेय.

पाँच पारधी ही पंचमहाभूतं असतील काय अशीही शंका येते <<< स्वाती म्हणतेय तसे असावे का?

गजानन, एके ठिकाणी हरीण म्हणजे पंचेंद्रिये म्हटलंय, तर दुसर्‍या ठिकाणी हरीण म्हणजे सुखाची अभिलाषा, सुख धुंडाळत राहण्याची वृत्ती असं म्हटलंय.
पाच शिकारी म्हणजे 'पाँच संवेदी उत्तेजना'' असे म्हटले आहे, ज्याला sensory stimuli असे म्हणता येईल. आता पंचेंद्रिये म्हणजे पाच उत्तेजना होतात का, असा विचार केल्यावर मला जाणवले की नाही, पाच इंद्रिये म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. आणि उत्तेजना किंवा स्टिम्युलाय, म्हणजे दृश्य, गंध, ध्वनी, चव आणि स्पर्श.
तसा विचार केला तर अर्थ लागतोय. Happy

पाच इंद्रिये म्हणजे डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा. आणि उत्तेजना किंवा स्टिम्युलाय, म्हणजे दृश्य, गंध, ध्वनी, चव आणि स्पर्श. तसा विचार केला तर अर्थ लागतोय. <<< अकु, हो असंही असू शकेल. Happy